Thursday, October 31, 2013

काय करावं आणि कसं पाहावं?

मूर्ती यांनी प्रत्येक विषयाला स्वानुभवाकडे तरी वळवलं आहे किंवा स्वानुभवाकडून तरी ते विषयाकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्या-लिहिण्यात सच्चेपणा आहे, कळकळ आहे आणि बांधीलकीही. त्यामुळे या पुस्तकातून काय करायला हवं आणि कसं पाहायला हवे, याबाबतचा दृष्टिकोन मिळू शकतो. आणि तो खूप महत्त्वाचा आहे, हेही खरे.

हे पुस्तक म्हणजे इन्फोसिसचे एक संस्थापक एन. नारायण मूर्ती यांनी वेळोवेळी दिलेल्या भाषणांचा आणि लिहिलेल्या काही नैमित्तिक लेखांचा संग्रह आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर या संग्रहाविषयी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा अभिप्राय छापला आहे. तो असा- ‘‘लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत. ते जगासामोर भारताच्या नव्या, प्रगतिशील चेहर्‍याचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच येणा-या पिढय़ांना माहितीपर, प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे.’’

त्याखाली मायक्रोसॉफ्ट कॉपरेरेशनच्या बिल गेट्स यांचा अभिप्राय आहे- ‘‘नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिलं आहे की, भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित कंपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तीच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नावीन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली आहे, आपली स्वत:कडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या संचाद्वारे, व्यवसायामधील मूल्यं आणि नेतृत्वगुणाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे.’’

खरं तर या दोन्ही प्रतिक्रियांमधून या पुस्तकाचं स्वरूप पुरेसं स्पष्ट होतं. या पुस्तकाकडे कसं आणि कोणत्या अपेक्षेनं पाहायला हवं याचंही सूचन या प्रतिक्रियांमध्ये आहे. नारायण मूर्ती यांनी आपल्या अतिशय साध्या घरातून सुरू केलेली ‘इन्फोसिस’ ही कंपनी आज जगातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. तिचा इथपर्यंतचा प्रवास हा सचोटी, मेहनत, सक्षम नेतृत्व, मूल्यं आणि सामाजिक बांधीलकी या पायावर उभा राहिला आहे. पण हे सगळं कसं जुळून आलं, हा वारसा कसा आणि कुठे मिळाला, याची स्पष्टीकरणं या संग्रहातील भाषणं आणि लेखांमध्ये सापडतात.

वाचकांच्या सोयीसाठी पुस्तकाचे एकंदर दहा भाग केले आहेत. विद्यार्थ्यांना संदेश, मूल्ये, महत्त्वाचे राष्ट्रीय मुद्दे, शिक्षण, नेतृत्वासमोरील आव्हानं, कॉपरेरेट आणि सार्वजनिक व्यवस्थापन, औद्योगिक सामाजिक जबाबदारी आणि समाजसेवा, उद्योजकता, जागतिकीकरण आणि इन्फोसिस या दहा विभागांमध्ये 38 भाषणं व लेखांचा समावेश आहे. ‘विद्यार्थ्यांना संदेश’ या पहिल्याच विभागात आठ भाषणं आहेत. तेवढे लेख वा भाषणं इतर कुठल्याच विभागात नाहीत. हे कदाचित जाणीवपूर्वक केलं आहे का, हे माहीत नाही! मात्र ही सर्वच भाषणं देशात आणि जगातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभात केलेली भाषणं आहेत, हेही नोंद घेण्यासारखं आहे.

ही भाषणं फार चमकदार नाहीत की फारशी प्रभावित करणारीही नाहीत. पण साध्या साध्या प्रसंगांतून मूर्ती यांनी ज्या गोष्टी त्यात सांगितल्या आहेत, त्यांनी त्यांचं आयुष्य कसं बदललं याचा प्रत्यय येतो. प्रत्येक विद्यार्थ्यांने शिक्षण संपवून बाहेरच्या जगात पाऊल ठेवताना ते जग नेमकं कसं आहे, हे समजावून घेतलं पाहिजे, स्पर्धेची-कष्टाची-गुणवत्तेची नेहमी तयारी ठेवली पाहिजे, हे मूर्ती थोडाफार बदल करत परत परत सांगतात, तेव्हा त्यांची जडणघडण कोणत्या मूल्यांच्या पायावर झाली आहे, हे स्पष्ट होत जातं.

म्हणजे या पुस्तकातून मूर्ती यांच्या अभ्यासाचे विषय कोणते आहेत, त्यांचा व्यासंग कसा आहे, त्यांनी कोणापासून प्रेरणा घेतली आणि भारताबद्दलची त्यांची व्हिजन काय आहे, यापेक्षा मूर्ती यांची जडणघडण कशी झाली, इन्फोसिसचा प्रवास कसा झाला आणि तिला प्रचंड यश कसं मिळालं, याची गुपितं समजावून घेता येतात.

‘जागतिकीकरण’ या भागात मूर्ती सरळ सरळ जागतिकीकरणाचा पुरस्कार करतात. त्यावर मूर्ती मोठय़ा कंपनीचे मालक असल्याने ते तसं करणारच, असा प्रश्न बहुधा हे पुस्तक वाचणारा तरी उपस्थित करणार नाही. कारण जागतिकीकरणाची अपरिहार्यता आणि त्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण मूर्तीनी करण्याचा प्रयत्न केला आहे. सेवा-उद्योगात जागतिकीकरणाने जी क्रांती केली आहे, त्याचाही आढावा त्यांनी घेतला आहे.

परंतु यातील काही भाषणं वा लेख फारच त्रोटक आहेत. उदाहरणार्थ ‘मी माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक असतो तर..’, ‘चक दे इंडिया’ इत्यादी. ते लेख वगळायला हवे होते असं वाटतं. त्यामुळे पुस्तक आणखी सुटसुटीत झालं असतं.

पश्चिमेकडून भारतानं काय शिकायला हवं आणि भारताकडून पश्चिमेनं काय शिकायला हवं, याविषयी मूर्ती बोलले आहेत, तसंच देशातील भ्रष्टाचार कसा थांबवता येईल याविषयी त्यांनी एक भाषण दिलं आहे. शहरनियोजन, धर्मनिरपेक्षतेचं महत्त्व, कॉपरेरेट गव्हर्नन्स, भांडवलवाद, उद्योजकता या विषयांवरही मूर्ती बोलले आहेत किंवा त्यांनी लिहिलं आहे.

एखादी व्यक्ती यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचते, तेव्हा समाज तिच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा करायला लागतो. ‘तुम्ही यावर बोललं पाहिजे’, ‘त्याविषयी बोललं पाहिजे’, ‘अमुक अमुकवर तुमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे’ असे आग्रह केले जातात. त्याचं प्रतिबिंब यातील काही भाषणांमध्ये आणि लेखांमध्येही पाहायला मिळतं. पण ‘आपण त्याविषयातले तज्ज्ञ अभ्यासक नाही आहोत’, हे लक्षात घेऊन मूर्ती यांनी चतुरपणे प्रत्येक विषयाला स्वानुभवाकडे तरी वळवलं आहे किंवा स्वानुभवाकडून तरी ते विषयाकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्या-लिहिण्यात सच्चेपणा आहे, कळकळ आहे आणि बांधीलकीही. म्हणून या पुस्तकातून काय करायला हवं आणि कसं पाहायला हवं, याबाबतचा दृष्टिकोन मिळू शकतो. आणि तो खूप महत्त्वाचा आहे, हेही खरं.

मात्र हे पुस्तक वाचून कुणी फार झपाटून जाणार नाही. हे सेल्फ हेल्प वर्गातलं पुस्तक नाही. त्यामुळे ते वाचून मूर्तीसारखं यश आपल्याला मिळवता येईल, असा दृष्टिकोन असणा-यांसाठीही हे पुस्तक नाही. तर मूर्ती यांनी इन्फोसिस कोणत्या मानदंडावर उभा केला. ते मानदंड उभारले कसे आणि त्यांचं संवर्धन कसं केलं, हे समजावून देणारं हे पुस्तक आहे. ते त्यासाठीच वाचायला हवं.

अ बेटर इंडिया, अ बेटर वर्ल्ड : एन. नारायण मूर्ती, मराठी अनुवाद : चित्रा वाळिंबे, मेहता पब्लिशिंग हाऊस.

Sunday, October 27, 2013

(मराठी साहित्याची) कत्तल करणारा माणूस!

Published in Loksatta, Sunday, October 27, 2013
पन्नास वर्षांपूर्वी- १९६३ साली, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी अशोक शहाणे यांनी 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर 'क्ष'- किरण' या शीर्षकाचा घणाघाती लेख लिहून मराठी साहित्य व साहित्यिकांवर अक्षरश: बॉम्बगोळा टाकला होता. या घटनेच्या र्अधशतकपूर्तीनिमित्ताने या मूळ लेखाचा परामर्श....
वसंत सरवटे यांनी ठणठणपाळसाठी काढलेले मार्मिक चित्र, ललित, जानेवारी १९६४. 
-----------------------------------------------------------------------
अशोक शहाणे यांचं आत्ताचं वय वर्षे ७८ आहे. पन्नास वर्षांपूर्वी- १९६३ साली, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांनी 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर 'क्ष'- किरण' या शीर्षकाचा घणाघाती लेख लिहून मराठी साहित्यावर तेव्हा अक्षरश: आणि शब्दश: बॉम्बगोळा टाकला होता. हा मूळ लेख त्यांनी पुण्यात 'काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम' या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादासाठी लिहिला होता. खरं तर तेव्हा शहाणे यांचं मराठी साहित्यात विशेष काही नाव नव्हतं. बंगाली साहित्यिक मोती नंदी यांच्या काही कथांचा त्यांनी मराठी अनुवाद केला होता, तेवढाच. तेव्हा शहाणे पुण्याचं साहित्यपीठ मानल्या जाणाऱ्या मराठी साहित्य परिषदेपासून दहाएक मिनिटांच्या अंतरावर एक खोली भाडय़ानं घेऊन राहत होते. मधू साबणे, भालचंद्र नेमाडे हे त्यांचे त्यावेळचे मित्र.
त्यांच्या या लेखाचं इंग्रजी नाव 'लिटरेचर अँड कमिटमेंट' असं होतं. हा लेख त्यांनी मासिक 'मनोहर'ला पाठवला. त्याच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या अंकात हा लेख दोन भागांत 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर 'क्ष'-किरण' या नावानं छापून आला आणि मराठी साहित्यात एकच खळबळ उडाली. शहाणे यांनी एक प्रकारे मराठी साहित्याचा एक्स-रे काढून त्याचं चारित्र्यहनन केलं होतं. दुसरी गोष्ट अशी झाली की, 'मनोहर' हे मासिकही या लेखामुळे चर्चेत आलं. तोवर या मासिकाकडे साहित्यजगताचं विशेष लक्ष नव्हतं.
''क्ष'-किरण' छापून आल्यावर पुण्यातील मराठी साहित्यविश्वात मोठीच धांदल उडाली. पुढच्या दोन-चार दिवसांत या लेखाचा निषेध करण्यासाठी मसापमध्ये निषेध सभा बोलावण्यात आली. त्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडके होते. ते या लेखानं खूपच चिडले होते. त्यांचं अध्यक्षीय भाषण खूपच आवेशपूर्ण आणि भडकवणारं होतं. त्यांनी- ''जो हात हे लिखाण करू शकला व ज्या हाताने हे प्रसिद्धीसाठी स्वीकारले, ते हात कलम झाले पाहिजेत,'' असे संतप्त उद्गार काढले.
फडके यांच्या या विधानावरून पुण्यातली साहित्यजगतातली परिस्थिती किती स्फोटक बनली होती याची कल्पना येते. जो- तो या लेखावर तावातावानं बोलू लागला.
जानेवारी १९६४ च्या 'ललित'मध्ये ठणठणपाळ यांनी शहाणे यांच्या लेखावर मल्लिनाथी करणारा 'वाङ्मय आणि बांधिलकी' हा लेख लिहिला. ''अलीकडे मराठी साहित्यात, विशेषत: टीकाक्षेत्रात भोंगळपणा खूपच निर्माण झाला आहे. एखाद्या साहित्यकृतीविषयी टीकाकाराकडून स्पष्ट मत मिळणेच दुरापास्त होते. एखादी कृती बरी वाटावी, त्यातल्या त्यात उजवी ठरावी, अशी चमत्कारिक पद्धत रूढ झाली होती. पण अशा अनिश्चित भाषेला मूठमाती देणारा नवा टीकाकार उदयाला आला आहे! 'उदयाला आला' असे म्हणण्यापेक्षा तो 'चक्क डोक्यावर आला' असे म्हणणेच योग्य ठरावे! (तरीही ठरावेच!) हा नवा टीकाकार म्हणजे अशोक शहाणे ( 'मोती नंदी'फेम!). तसे म्हटले तर स्वारीने फारसे काही लिहिलेले नाही. अधिकतर मोती नंदी या बंगाली लेखकाच्या काही कथा त्यांनी भाषांतरित केल्या आहेत. पण स्वारी उपजत टीकाकार (टीकाखोरच!) आहे..'' अशी लेखाची सुरुवात करून ठणठणपाळने पुढे शहाण्यांनी वाङ्मयाची 'जे जे लिहिले गेले ते वाङ्मय' अशी सर्वसमावेशक व्याख्या कशी केली आहे, याचा उल्लेख केला आहे.
''लोकहितवादी चिपळूणकर, आगरकर, टिळक, केतकर वगैरे श्रेष्ठ, ज्येष्ठ विभूतींना त्यांनी एका परिच्छेदात गाडून टाकले आहे. हरी नारायण आपटे हे मोठे कादंबरीकार असे मराठी लोक अभिमानाने म्हणतात.. पण शहाण्यांच्या मते, हरीभाऊंनी स्कॉट आणि डिकन्स यांच्या कादंबऱ्या समोर ठेवून आपले लेखन केले. वा. म. जोशी, खांडेकर आणि विभावरी शिरूरकर ही मंडळी शहाण्यांचे दोन-चार फटके खाऊन जिवानिशी बचावली.. मर्ढेकर हे किमान एक महत्त्वाचेसुद्धा कवी नाहीत; कारण त्यांनी चार-दोन बऱ्या कविता लिहिल्या आणि बाकी जुळवाजुळव केली. 'एवढे कुणीही करतो'असे शहाणे यांचे मत. 'मीच कथा लिहावी' असा गर्व गंगाधर गाडगीळ यांनी आजवर वाहिला. पण फुकट! शहाणे यांनी त्यांना 'खुजे मर्ढेकर' म्हणून चक्क खाली बसवले आहे. (गर्वाचे घर खाली म्हणतात ते हे असे!) आणि ते नवकवी- विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर आणि वसंत बापट (चोर लेकाचे!) स्वत:ला नवकवी म्हणवून 'सत्यकथे'त कविता छापून घेत होते. बरे झाले त्यांची खोड मोडली ती! शहाणे यांनी त्यांना टपल्या मारून चक्क रविकिरण मंडळात बसवले आहे..'' असे शहाण्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर बॉम्बगोळे टाकले होते, त्यांच्या त्यांच्या नावानं परत ठणठणपाळनं ठणाणा केला.
शहाणे यांच्या मते, आधुनिक मराठी साहित्यात गोडसे भटजी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी, जी. ए. कुलकर्णी, आचार्य अत्रे, काकासाहेब गाडगीळ, पु. शि. रेगे हे मोजून सात लेखक. शहाण्यांना आठवं बोट काही मोडावं लागलं नाही. ए. वि. जोशी, विंदा करंदीकर हे लोक शहाणे यांच्या मते ठीक म्हणावेत असे. शहाणे यांनी विनोबा भावे यांना 'मराठीतला हा एकमात्र समग्र माणूस' असे म्हटले होते, तर बालकवींना 'अलीकडच्या काळात अस्सल कविता लिहिणारा हा एकमेव अस्सल कवी' असे या लेखात म्हटले होते.
शहाण्यांच्या मते, मराठीत थोर कलाकृती किती आहेत? मोजून तीन.
१) माझा प्रवास, २) स्मृतिचित्रे आणि ३) रणांगण.
झालं! यापल्याड शहाणे यांनी मराठी साहित्यात इतर कुणाचीही गणती केलेली नाही. निदान तेव्हा केली नव्हती, असं म्हणू या.
हा घणाघाती लेख पुस्तकरूपाने प्रकाशित व्हायला बराच काळ जावा लागला. शहाणे यांच्या 'नपेक्षा' (२००५) या एकुलत्या एक पुस्तकात या लेखाचा समावेश आहे. छापील २७ पाने भरेल एवढा हा लेख आहे. यात मराठी साहित्यिक आणि साहित्याचं टीकावस्त्रहरण करणारा मजकूर तसा तुलनेनं दहा पानांचाच आहे. बाकी लेखात साहित्याच्या संदर्भात बांधीलकी, साहित्यातली 'बीट' पिढी आणि स्वत:ची पिढी याविषयी लिहिलं आहे. आणि त्यात कुठेही शेरेबाजी नाही. विशेषत: त्यांनी स्वत:च्या पिढीचाही उद्धार केला आहे. 'आमची पिढी ही षंढांची पिढी आहे, असे आम्ही पूर्वीच जाहीर केले आहे,' असंही त्यांनी सांगून टाकलंय. त्याआधी शहाणे यांनी 'षंढांची पिढी' या नावानं एक कविता लिहिली होती. त्याचा हा संदर्भ आहे.

या कवितेचा एक किस्सा आहे. ही कविता ग. दि. माडगूळकर यांच्या वाचनात आली. तेव्हा भाऊ पाध्ये यांच्या पुस्तकावरून सेन्सॉर बोर्डाचा वाद चालू होता आणि गदिमा त्या बोर्डावर होते. डेक्कनला मित्रासोबत फिरत असताना ते सहज म्हणून गदिमांना भेटायला गेले. मित्रानं शहाणे यांची ओळख करून देताच गदिमा म्हणाले, ''अरे, याचं कुणीतरी लग्न लावून द्या रे! म्हणजे हा पुन्हा असं काही लिहिणार नाही.'' तर ते असो.
''क्ष' किरण'मध्ये टिळक, आगरकर, मर्ढेकर, गाडगीळ, बापट, करंदीकर, पु. ल. देशपांडे या आदरणीय आणि प्रात:स्मरणीय व्यक्तिमत्त्वांबद्दल शेरेबाजीवजा विधाने केल्यामुळे खळबळ उडणं साहजिकच होतं.
आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे खंड गेली ३०-४० वर्षे मसाप प्रकाशित करीत आहे. पण तो अजूनही पूर्ण व्हायला तयार नाही. शहाणे यांनी मात्र पन्नास वर्षांपूर्वीच तो अवघ्या छापील २७ पानांमध्ये मांडून दाखवला आणि त्याशिवायही बरंच काही सांगितलं.
तत्कालीन मराठी साहित्यिक आणि साहित्याची अशी कत्तल केल्यावर शहाणे यांनी गप्प बसावं ना! पण गप्प बसतील तर ते शहाणे कुठले! त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, 'आपल्याकडे नाही तरी म्हणायची पद्धतच आहे- गप्प बसायचं काय घेतो? पण मी काही गप्प बसणार नाही. अजून बरंच काम बाकी आहे.' क्ष-किरण टाकल्यापासून शहाणे यांचं मराठी साहित्याचं शल्यचिकित्सा करण्याचं काम चालूच आहे. ते लिहितात कमी; पण बोलतात खूप. जगणं थोर आणि लिहिणं कमअस्सल- अशी त्यांची धारणा तेव्हा होती आणि आजही आहे. ते एका दृष्टीनं चांगलंच आहे. एरवी त्यांच्या साध्या बोलण्यातही चार-दोन साहित्यिकांचे खून पडतातच.
त्यामुळे जरा सावध राहा.

Monday, October 14, 2013

परवानगी आणि श्रेयाचा हक्क


First Published in Loksatta, 13 Oct.2013
अरुण कोलटकरांच्या 'परंपरा' या कवितेच्या स्वामित्व हक्काबाबत (कॉपीराइट) न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे मराठी साहित्यविश्वात नाही म्हटलं तरी थोडीशी खळबळ निर्माण झाली. सकृद्दर्शनी हा निकाल अनेकांना चक्रावून टाकणारा वाटतो आहे. केवळ परवानगी घेतली नाही म्हणून संबंधिताला न्यायालयात खेचणे आणि न्यायालयाने अशी शिक्षा सुनावणे, हे साहित्य क्षेत्रातील अनेकांना गोंधळात टाकणारे वाटते. खरे तर यात काहीही बुचकळ्यात टाकणारे वा गोंधळात पाडणारे नाही. हे सर्व कॉपीराइट कायद्याला धरून आहे.
    
१९१४ साली 'इंडियन कॉपीराइट अ‍ॅक्ट' कायदा प्रथम अस्तित्वात आला. १९५७मध्ये 'द कॉपीराइट अ‍ॅक्ट १९५७' असे त्याचे नामकरण करण्यात आले. तेव्हापासून १९९४पर्यंत त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. कोणतीही स्वतंत्र निर्मिती -म्हणजे कलाकृती, रंगमंचीय आविष्कार, संगीत इ. तयार केल्यावर त्याचा स्वामित्व हक्क(कॉपीराइट) त्याच्या कर्त्यांला मिळतो. त्यासाठी लेखी करारच केला पाहिजे असे बंधन नाही. पुस्तकावर लेखक, प्रकाशक यांचे नाव असेल तरी त्यांना हा हक्कनिसर्गत: मिळतो. छापील माध्यम नसेल तेव्हा त्याचा करार करून घ्यायला हवा. स्वतंत्र बौद्धिक प्रयत्नातून जे काही निर्माण होते, त्याचा स्वामित्व हक्क त्याच्या कर्त्यांकडेच असतो. त्याने इतर कुणाला लेखी कराराद्वारे वा इतर मार्गाने तो दिला असला, त्याचा योग्य तो मोबदला घेतला असला तरी त्याचा निर्मितीकर्त्यांचा मूळ हक्क कायम राहतो. म्हणजे मूळ कृतीत बदल करणे, त्यात काटछाट करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्या कृतीला बाधा येत असेल वा त्यायोगे कर्त्यांच्या प्रतिष्ठेला वा कीर्तीला धक्का बसत असेल तर अशा प्रती प्रकाशित करण्यास आणि त्याचे वितरण करण्यास कर्ता कायद्याने रोखू शकतो किंवा संबंधितांकडे नुकसानभरपाईही मागू शकतो. मूळ कर्त्यांच्या निधनानंतर त्याचे वारसदारही हा हक्कबजावू शकतात. लेखकाच्या निधनानंतर ६० वर्षांनी त्याचा वा त्याच्या वारसदारांचा त्या पुस्तकावरील हक्क संपुष्टात येत असला तरी वरील हक्कशाबूत राहतो. 
                    
थोडक्यात कॉपीराइट कायदा हा मूळ लेखकाच्या वा कर्त्यांच्या हक्काचे संरक्षण करणारा कायदा आहे. त्यामुळे इतर कुणालाही परवानगीशिवाय त्याचा वापर वा गैरवापर करता येत नाही. त्याचा भंग केल्यास दिवाणी व फौजदारी या दोन्ही कायद्याप्रमाणे कारवाई करता येते. तो सिद्ध झाल्यास सहा महिने ते तीन वर्षे तुरुंगवास किंवा ५० हजार ते दोन लाख रुपये दंड होऊ शकतो.
बौद्धिक संपदा ही लेखक, गीतकार, संगीतकार यांची वैयक्तिक संपत्ती असते. तो त्याचा एकमेव हक्कदार असतात. त्यांनी त्यांचे हक्क इतर कुणाला दिले तरीसुद्धा त्याचा पूर्णत: वा अंशत: वापर करण्यासाठी मूळ कर्त्यांची आणि ज्याच्याकडे सध्या त्याचे मुखत्यारपत्र असेल त्यांची परवानगी अनिवार्य असते.   


याचा अर्थ असा नाही की, संशोधन वा इतर प्रकारच्या लेखनासाठी इतरांच्या लेखनातील उद्धृते, उतारे वा काही भाग वापरताच येत नाही. मर्यादित उद्दिष्टांसाठी आणि योग्य कारणासाठी असा वापर अवश्य करता येतो, पण ते कसे वा किती प्रमाणात वापरायचे हे समजून घेतले पाहिजे. शिवाय त्याचा आपल्याकडून व्यावसायिक कारणासाठी वापर केला जात नाही ना, हेही पाहिले पाहिजे. विद्यापीठीय पातळीवरील एम.फिल, पीएच.डी. यांसारखे वा तत्सम संशोधन हे जोपर्यंत काही निवडक लोकांपुरतेच मर्यादित असते, त्याचा व्यावसायिक वापर (पुस्तकरूप वा इतर मार्गाने सार्वत्रिक करणे) केला जात नाही, तोपर्यंत ते कायद्याच्या कक्षेत येत नाही. पण जेव्हा ते पुस्तकरूपाने प्रकाशित करावयाचे असते तेव्हा त्यासाठी संबंधित लेखकांच्या लेखी परवानग्या घेणे बंधनकारक असते. संशोधन प्रकल्प वा प्रबंधांसाठीही संबंधितांची परवानगी घेणे गरजेचे असते. निदान मराठीमध्ये तरी अशा प्रकारच्या परवानगीसाठी कुणीही लेखक, त्यांचे वारसदार आणि प्रकाशक अडवणूक करत नाहीत आणि आर्थिक मोबदल्याचीही अपेक्षा करत नाहीत. एखाद्या नाटककाराच्या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते आणि दर प्रयोगाचे मानधनही द्यावे लागते. तशा प्रकारच्या सूचना पूर्वी आणि आताही नाटकांच्या पुस्तकात स्पष्टपणे छापलेल्या असतात.


मर्यादित उद्दिष्ट आणि योग्य कारण म्हणजे नेमके काय याबाबत भारतीय कॉपीराइट कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही. परंतु युरोप-अमेरिकेतील कॉपीराइट कायद्यांमध्ये काही संकेत दिलेले आहेत आणि ते तिकडे यथायोग्य रीतीने पाळलेही जातात. त्यासाठी तिकडील लेखक-प्रकाशकांच्या संघटना पुरेशा सजग आणि सतर्क आहेत. इतर लेखकांच्या लेखनातील भाग वापरताना तो संबंधित पुस्तकाच्या दहा टक्क्यापेक्षा जास्त असू नये वा त्या पुस्तकातील एकच अवतरण वापरायचे असेल तर ते ४०० शब्दांपेक्षा मोठे असू नये. आपल्याकडे असे संकेत निदान अजून तरी तयार केले गेलेले नाहीत. भारतातील सर्व प्रकाशकांची शिखर संघटना असलेल्या 'फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स'ने याबाबतीत पुढाकार घेऊन ते तयार केले तर संशोधक, अभ्यासक आणि इतरांना त्याचा फायदा होऊ शकेल. मात्र ते संकेत आता नाहीत म्हणून इतरांच्या लेखनाचा आपल्याला हवा तसा वापर करता येत नाही, हे लक्षात घ्यायलाच हवे.

भारतात स्वामित्व हक्काविषयीचे अज्ञान आणि बेजबाबदारपणा यातून अनेक प्रमाद घडतात. उदा. आपल्याकडे पुस्तकांच्या पायरेटेड प्रतींचा मोठय़ा प्रमाणावर काळाबाजार होतो. इंग्रजी पुस्तकांबाबत तो जास्त होत असला तरी आता मराठी पुस्तकांबाबतही हे प्रकार होऊ लागले आहेत. 'अग्निपंख', 'मृत्युजंय', 'छावा', 'ययाती' अशा काही पुस्तकांबाबत हे प्रकार अलीकडच्या काळात घडले आहेत. 'फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स'ने २००६ साली प्रकाशित केलेल्या 'अण्डरस्टॅण्डिंग कॉपीराइट लॉ' या पुस्तकानुसार पायरसीमुळे दरवर्षी ब्रिटनमध्ये ८०० कोटी, अमेरिकेत २५०० कोटी तर भारतात ४०० कोटी रुपयांचे संबंधित लेखक-प्रकाशकांचे नुकसान होते.


शिवाय रंगमंचीय, चित्रपटीय आविष्कार, रूपांतर, अनुवाद, या आणि अशा प्रकाराबाबतही पुरेशी सजगता नसल्यामुळे त्यायोगेही होणाऱ्या गैरवापराचे प्रमाणही बरेच आहे. संबंधित लेखकाच्या, प्रकाशकाच्या परवानगीशिवाय त्याच्या लेखनाचे अंश, संक्षिप्त भाग वा उद्धृते बिनदिक्कतपणे वापरली जातात. संबंधितांना कळवण्याचे सौजन्य न दाखवता आणि परवानगी न घेता 'सब कुछ चलता है' या न्यायाने सारे दडपून नेण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्व गैरप्रकार थांबवायचे असतील तर लेखक-प्रकाशकांनी वा त्यांच्या वारसदारांनी स्वामित्व हक्क कायदा नीट समजावून घेतला पाहिजे. तो घेतला तर योग्य ती दाद मागता येते. आपले आर्थिक नुकसान आणि गैरवापर या दोन्ही गोष्टी टाळता येतात. 

 सत्य हा बचाव होऊ शकत नाही तसेच अज्ञान हाही बचाव होऊ शकत नाही. त्यामुळे मूळ लेखकाबरोबरच संबंधित प्रकाशकालाही कारवाईला सामोरे जावे लागते. पण लेखक-प्रकाशक सजग असतील तर असे बेजबाबदार प्रकार पूर्णपणे थांबवता येतात, याचे उदाहरण म्हणून शहाणे-सकाळ या खटल्याकडे पाहायला हवे. आपल्या न्याय हक्कासाठी कोर्टाची पायरी चढायला काहीच हरकत नाही, हा धडा या प्रकरणातून लेखक आणि प्रकाशकांनी घ्यायला  हवा.