Thursday, January 10, 2013

वाचावे असे काही...

सत्यापेक्षा तारतम्यविवेक
एकंदर भारतीय समाज इतिहासाविषयी इतका हळवा आणि भावनाशील असतो की, आपल्याकडे सर्वात जास्त वाद हे इतिहासाच्या बाबतीत होत असावेत. समतोल पद्धतीने, नीरक्षीरविवेकाने आणि सत्यच सांगायचे, पण सभ्य शब्दांत, अशा पद्धतीने इतिहास लिहिणारा कुणी हल्ली फार लोकप्रिय होऊ शकेल का, याविषयी जरा शंकाच वाटते. त्यातही 'आय अ‍ॅम अ हिस्टोरियन हू युजेस द पास्ट टू इल्युमिनेट द प्रेझेंट. आय डोंट गिव्ह सोल्यूशन्स..दॅट्स नॉट माय जॉब' असं स्पष्टपणे सांगणाऱ्या रामचंद्र गुहा यांची 'इतिहासकार' म्हणून असलेली लोकप्रियता केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आहे. 'इंडिया आफ्टर गांधी' हे गुहा यांचे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास सांगणारे पुस्तक प्रचंड गाजले. त्यानंतर गुहा नवीन काय लिहिताहेत, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. आता नुकताच त्यांचा Patriots and Partisans हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. यामध्ये त्यांनी २००५ ते २०११ या काळात लिहिलेल्या निबंधांचा समावेश आहे. काँग्रेस, हिंदूत्ववादी भाजप, डावे यांच्याविषयीचे निबंध ही गुहा यांच्या उदारमतवादीपणाची साक्ष देणारे आहेत. गांधी-नेहरू हा तर गुहा यांचा फारच हळवा कोपरा आहे, त्यामुळे त्यांच्यावरील लेखाचाही पुस्तकाच्या पहिल्या भागात समावेश आहे. दुसऱ्या भागातील लेख मात्र काहीसे हलकेफुलके आहेत. भारतातील द्वैभाषिक विद्वानांचा ऱ्हास का होतोय याविषयीचा सुंदर लेख आहे. याशिवाय नियतकालिकांचे संपादक, पुस्तक विक्रेते, प्रकाशन संस्था यांच्यावरील लेखांचाही समावेश आहे. वर्तमानकाळाविषयी सत्यापेक्षा तारतम्यविवेक बाळगणं ही आपली जबाबदारी असते, असं व्हाल्तेअर म्हणतो. रामचंद्र गुहा यांचं प्रस्तुत पुस्तक त्याचा चांगला नमुना आहे.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

एका कादंबरीची क्रांती



चार्ल्स डिकन्स या ब्रिटिश कादंबरीकाराच्या 'द पिकविक पेपर्स' या कादंबरीने युरोपातील प्रकाशनव्यवहाराचं स्वरूप पालटून टाकलं! ही कादंबरी मार्च १८३६ ते ऑक्टोबर १९३७ या १९ महिन्यांच्या काळात दर महिन्याला काही प्रकरणं अशी हप्त्याहप्त्यानं प्रकाशित झाली. तशी ती होत असतानाच तिला लंडन आणि त्याबाहेर मोठी प्रसिद्धी मिळू लागली. लोक दर महिन्याची मोठय़ा आतुरतेनं वाट पाहू लागले. त्यात सर्वसामान्यांपासून न्यायाधीशांपर्यंत सर्व थरांतील वाचकांचा समावेश होता. तेव्हा ही गोष्ट काहीशी आश्चर्यकारक आणि बरीचशी अद्भुत होती. या कादंबरीचा लेखक डिकन्स हा तेव्हा अवघा २४ वर्षांचा तरुण होता. तोवर त्याचे लंडनविषयीचे केवळ काही लेख प्रकाशित झाले होते. नुकतंच लेटरप्रेसचं तंत्रज्ञान विकसित झालं होतं. त्याचा फायदा उठवत ही कादंबरीमालिका डिकन्सने लिहायला सुरुवात केली. पिकविक हा या कादंबरीचा नायक. तो पिकविक क्लबचा अध्यक्ष असतो. तो आणि त्याचे इतर तीन साथीदार फिरायला निघतात आणि त्या प्रवासाचा वृतान्त इतर सदस्यांना कळवतात, ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना. कादंबरीचं मूळ नाव आहे, The Posthumous Papers of the Pickwick Club.. ही कादंबरी नंतर एक-दोन महिन्यांनी म्हणजे १९३७ च्या शेवटी शेवटी पुस्तकरूपाने प्रकाशित झाली. तोवर युरोपात प्रकाशनव्यवसाय हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे, हे कुणाच्या गावीही नव्हतं. पुस्तकविक्रेतेच जोडधंडा म्हणून पुस्तकं छापत असत. शिवाय खुद्द लेखकाला पुस्तकाच्या प्रकाशनाच्या खर्चाचा बराचसा भाग उचलावा लागत असे. पण 'द पिकविक पेपर्स'ला अफाट यश मिळत गेलं. तिचे हप्तेच विक्रमी पद्धतीने विकले गेले आणि पुस्तकही. त्यामुळे पुस्तकांचा स्वतंत्रपणे व्यवसाय होऊ शकतो आणि त्यातून चांगले पैसे मिळू शकतात, हे सिद्ध झालं. प्रकाशन हा जोड व्यवसाय नाही, तो स्वतंत्रच व्यवसाय आहे, याची प्रचीती युरोपला आली आणि नव्या लोकांनी स्वतंत्रपणे प्रकाशनाकडे वळायला सुरुवात झाली. त्यामुळे लेखकाकडून त्याच्याच पुस्तकासाठी पैसे घेण्याची पद्धतही बंद झाली. म्हणजे 'द पिकविक पेपर्स'ने युरोपातल्या प्रकाशनव्यवसायात एकप्रकारे क्रांतीच केली. गतवर्षी डिकन्सची जन्मद्विशताब्दी साजरी झाली आणि आता या कादंबरीला पावणेदोनशे वर्ष झाली आहेत. डिकन्स अजूनही वाचला जातोच आहे..
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

रफी..नाम ही काफ़ी!
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी लग्न करून इंग्लंडला गेलेली आणि संसार-मुलं यामध्ये रमलेली एखादी व्यक्ती कधीकाळी केवढं धाडस करू शकते, याचं हे पुस्तक एक उदाहरण आहे. यास्मीन रफी ही ती व्यक्ती. यास्मीन सामान्य गृहिणी, तरी चित्रपट पाहणं आणि गाणी ऐकणं हा त्यांचा ध्यास होता. बरं, जुनी हिंदी गाणी ऐकणाऱ्याची लता-रफी या जोडगोळीपासून सुटका नसते. असे हे रफी यास्मीन यांचे सासरे.  यास्मीन मामंजींना 'अब्बा'च म्हणत.  अब्बांच्या गाण्यांनी नेहमीच भुरळ घातली. घरकाम करताना, मुलांचं कौडकौतुक करताना त्यांना पाश्र्वभूमीला अब्बांचा आवाज हवाच असायचा. रफी यांचं त्यांच्या आयुष्यातलं हे स्थान किती उत्कट आणि नादमय आहे, याची गुणगुण या चरित्रातून ऐकायला मिळते. रफी हे भारताचे नवे तानसेन आहेत, असं एकदा विख्यात संगीतकार नौशाद यांनी म्हटलं होतं. रफी यांनी त्यांच्या काळातील एस. डी. बर्मन, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, ओ. पी. नय्यर अशा अनेक संगीतकारांबरोबर काम केलं. प्रेमगीतं, युगुलगीतं, कव्वाली, गज़्‍ाल, भजन, असे सर्व प्रकारांत त्यांनी गाणी गायली. त्यांना जाऊन आता तीस-बत्तीस र्वष झाली. आता इतक्या वर्षांनंतर यास्मीन या त्यांनी त्यांचं चरित्र लिहिलं आहे.. तेही अपरिचित -घरगुती पैलूंवर भर देणारं! त्यांनी रफींचं एक व्यक्ती म्हणून रेखाटलेलं चित्र त्यांच्या आवाजासारखंच लोभस आहे. हे पुस्तक मूळ उर्दू- हिंदीत लिहिलं गेलं आणि त्या पुस्तकासोबतच त्याचं इंग्रजी रूपांतरही प्रसिद्ध झालं. चरित्रलेखनाच्या फुटपट्टय़ा न लावता, केवळ आठवणी म्हणून हे पुस्तक वाचायचा प्रयत्न केला तर रफींच्या सुरासारखी लय साधता येईल. कारण रफ़ी.. नामही काफ़ी हैं!

Wednesday, January 2, 2013

ललित अपेक्षा आणि वास्तव!

Loksatta, Published: Sunday, December 30, 2012

गोष्ट सहजासहजीं होणें व तीच योजनेनें होणें यांत फरक आहे. आपल्या जीवितांत योजना-राहित्याचा दोष फार मोठा आहे.
- श्री. म. माटे (अध्यक्षीय भाषण- सांगली, १९४३)

 
'ललित' हे खऱ्या अर्थाने मराठीतले पहिले आणि एकमेव बुक ट्रेड जर्नल आहे. अगदी पूर्णार्थाने नसले, तरी स्थूलपणे त्याचे स्वरूप तसेच आहे. त्यामुळेच तर त्यात 'ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेले मासिक' अशी टॅगलाइन पहिल्या अंकापासून येते आहे. 'ललित'च्या आधी ढवळे प्रकाशनाने 'इये मराठीचिये नगरी'च्या रूपाने असा प्रयत्न केला होता खरा; पण तो फारसा यशस्वी होऊ शकला नाही. परचुरे प्रकाशनानेही असेच एक मासिक काही काळ चालवले होते. पण त्याचे स्वरूप गृहपत्रिकेसारखेच होते. अलीकडच्या काळात 'मेहता मराठी ग्रंथजगत', 'प्रिय रसिक', 'आपले  वाङ्मयवृत्त', 'राजहंस ग्रंथवेध' अशा काही प्रकाशन संस्थांच्या गृहपत्रिका प्रकाशित होत आहेत. पण त्यांचा उद्देश फारच मर्यादित आहे. तसे 'ललित'चे नाही. कुठली प्रकाशन संस्था कोणते पुस्तक प्रकाशित करीत आहे, कुठल्या पुस्तकाची कोणती आवृत्ती वा पुनर्मुद्रित पुस्तक येते आहे, बाजारात कोणती नवीन पुस्तके येत आहेत, याची खबरबात जाणून घेण्यासाठी 'ललित' हाच काय तो आधार आहे. म्हणजेच 'ललित' मासिक हे मराठीतल्या प्रकाशन संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे आहे. त्यातून त्यांना वाचकांपर्यंत पोहोचता येते आणि वाचकांना पुस्तके व प्रकाशन संस्थांपर्यंत!


'ललित'चे हे वेगळेपण समजून घेतले पाहिजे. नाव 'ललित' असले तरी ते ग्रंथव्यवहाराशी संबंधित आहे. अशा प्रकारच्या नियतकालिकांचा वाचकवर्ग हा प्रकाशक, ग्रंथपाल, ग्रंथविक्रेते आणि ग्रंथांविषयी जिज्ञासा असलेले वाचक असा- म्हणजे तुलनेने मर्यादित असतो. तुलना म्हणून नाही, पण स्पष्टीकरणासाठी दोन उदाहरणे घेता येतील. 'द बुकसेलर' हे लंडनमधील साप्ताहिक १८५८ पासून चालू आहे. त्यात युरोपीय ग्रंथव्यवहारातील घडामोडी, बातम्या, विश्लेषण याविषयीची माहिती असते. युरोपातील सर्व पुस्तक विक्रेते आणि प्रकाशकांकडे हे साप्ताहिक जाते. शिवाय जगातील शंभर देशांमध्ये त्याचे पन्नास हजार वर्गणीदार आहेत. त्याचप्रमाणे 'पब्लिशर्स वीकली' हे साप्ताहिक १८७२ पासून न्यूयॉर्कहून प्रकाशित होते आहे. त्याचा खप पंचवीस हजाराहून अधिक आहे. त्यात अमेरिकेतील ग्रंथव्यवहाराची इत्थंभूत माहिती असते. 


अशा स्वरूपाची साप्ताहिके मराठीतच काय, पण कुठल्याच प्रादेशिक भाषेत फारशी चालणार नाहीत. म्हणूनच 'ललित' मासिक गेली ४९ वर्षे अखंड प्रकाशित होत आहे याबद्दल त्याचे कौतुक करायला हवे. 'ललित'ने सामान्य मराठी वाचकाची पुस्तकांबाबतची उत्सुकता वाढवण्याचे मोठे काम केले आहे. सामान्य वाचक फार गंभीर आणि प्राध्यापकी थाटाची समीक्षा वाचत नाहीत. अशा वाचकांची पुस्तकांविषयीची भूक शमवण्याचे काम 'ललित'ने केले आहे. याशिवाय गावोगावच्या ग्रंथालयांपुढे पुस्तकांची निवड आणि खरेदी हा मोठाच यक्षप्रश्न असतो. याबाबतीत 'ललित' त्यांच्यासाठी अप्रत्यक्ष मार्गदर्शकाचे काम करतो. हे त्याचे बलस्थान व सामथ्र्य आहे. प्रकाशकांचे तर ते हक्काचे व्यासपीठ आहे. 'ललित'मधील पुस्तकांच्या जाहिरातीही ग्रंथनिवडीसंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावतात. इतर कुठल्याही मासिकातल्या पुस्तकांच्या जाहिराती इतक्या बारकाईने वाचल्या जात नसाव्यात आणि त्यांची अशी उपयुक्तताही नसावी. 'ललित'सारखे दुसरे मासिक मराठीमध्ये नाही. त्या अर्थाने ते अजून तरी एकमात्र आहे.


'ललित' सुरुवातीपासूनच काहीसे साहित्याकडे झुकलेले आहे. तसे असायला हरकत नाही. मात्र, पुस्तकांशी निगडित किमान महत्त्वाच्या घडामोडींची आणि सर्व प्रकारच्या पुस्तकांची दखल त्याने घ्यायला हवी. ई-बुक, आयपॅड, ऑनलाइन पुस्तक खरेदी आणि त्यांचा मराठी ग्रंथव्यवहारावर होणारा संभाव्य परिणाम जाणून घेण्यासाठी 'ललित' हे सर्वाधिक भरवशाचे माध्यम असायला हवे होते. पण त्याची गंधवार्ताही अजून 'ललित'पर्यंत पोहोचलेली दिसत नाही. 'ललित'मध्ये अजूनही दखल घेतली जाते ती केवळ कथा-कादंबऱ्या, चरित्र-आत्मचरित्रे यांचीच. याव्यतिरिक्त इतर संदर्भ साहित्य, वैचारिक, सामाजिक, राजकीय व उपयुक्त विषयांवरील पुस्तकांकडे मात्र 'ललित'ने पाठ फिरवल्यासारखी वाटते. असे होता कामा नये. त्याने आपल्या कक्षा विस्तारायला हव्यात. गेल्या काही वर्षांत निव्वळ वाङ्मयीन नियतकालिकांना ओहोटी लागली आहे. पण 'ललित'ला या अडचणीचा सामना करावा लागत नाही, ही विशेष नोंदण्यासारखी गोष्ट आहे.


दुसरे म्हणजे अलीकडच्या काळात 'ललित'मध्ये कल्पकता व नियोजनाचा अभाव प्रकर्षांने जाणवू लागलेला आहे. त्यापायी अंकांमध्ये साचलेपण आले आहे. तेच ते लेखक त्याच त्या विषयांवर वर्षांनुर्वष लेखन करताना दिसतात. (अर्थात हे अलीकडच्या काळात मराठी पुस्तके आणि दिवाळी अंकांमध्येही जाणवते. यावर्षीच्या दिवाळी अंकांची चर्चा जेमतेम आठवडाभरही न होण्याचे कारण हेच आहे.) नेमकी इथूनच संपादकाची भूमिका आणि हस्तक्षेप सुरू व्हायला हवा. एकतर लेखक बदलले पाहिजेत किंवा मग त्यांचे विषय तरी! पण हे दोन्ही बदलले जात नसतील आणि त्यांच्या लेखनाचा दर्जा गोठला असेल तर याचा दोष संबंधित लेखकापेक्षा संपादकावर अधिक येतो.


आधीची 'सामान्य' सदरे बंद करून नवीन 'सामान्य' सदरांचा अंकात समावेश केला म्हणजे संपादकाचे काम संपले असा समज करून घेणे, हे फारच वाईट आहे. संपादकाची खरी कसोटी असते ती योग्य विषय आणि त्यासाठी सुयोग्य लेखकाची निवड करण्यात! 'विज्ञानयुग' या मराठीतल्या पहिल्या विज्ञानकथा मासिकाचे संपादक गजानन क्षीरसागर म्हणत, 'मजकुराचे आणि माणसांचे संपादन या दोन्ही गोष्टी संपादकाने सतत करत राहिल्या पाहिजेत.' 'ललित'मध्ये या दोन्ही गोष्टी काहीशा सैलपणे केल्या जातात असे दिसते. नवनवी माणसे साक्षेपाने शोधली पाहिजेत. त्यांच्याकडून चांगले लिहून घेतले पाहिजे. आणि त्यावर पुरेसे संपादकीय संस्कारही केले पाहिजेत. 


पूर्वीचे ग्रंथप्रेमी मंडळ आणि तत्कालिन संपादक-मालक केशवराव कोठावळे 'ललित'साठी पुरेसा वेळ देत. प्रत्येक अंकाविषयी चर्चा करत. त्यामुळे 'ललित'चे अंक चांगले निघत. सध्या तसे ग्रंथप्रेमी मंडळ आहे की नाही, माहीत नाही. पण असलेच तर ते पुरेसा वेळ देत नसावे. कारण त्यांच्या मेहनतीचे प्रतिबिंब अंकात कुठे पडताना दिसत नाही. एरवीच्या अंकांत नाही, पण दिवाळी अंकातसुद्धा 'ललित' असे प्रयत्न करताना दिसत नाही. दिवाळी अंकासाठी लेखन मागणारी पत्रे अतिशय मोघम व सरधोपट असतात. शिवाय ती त्याच त्या लेखकांना पाठवली जातात. त्यामुळे त्याच त्या प्रकारचे लेखन दिवाळी अंकात येते. परिणामी गेल्या दहा-बारा वर्षांतले 'ललित'चे दिवाळी अंक त्याच्या पूर्वीच्या दर्जाला साजेसे निघत नाहीत. (या पाश्र्वभूमीवर सुवर्णमहोत्सवानिमित्ताने 'ललित' पुढील वर्षभर वाचनसंस्कृती, कविता, ललितगद्य, समीक्षा, वाङ्मयीन नियतकालिके, कथा, कादंबरी, दृश्यकला, चरित्रे-आत्मचरित्रे, नाटक अशा दहा विषयांवर विशेषांक काढणार आहे. त्यांचे पुरेसे आधी नियोजन करून प्रत्येक अंकासाठी स्वतंत्र अतिथी संपादकाची नेमणूक केली गेली आहे. हे अंक कितपत चांगले असतील आणि त्यांचे संपादन कसे होईल, हा औत्सुक्याचा विषय ठरावा. परंतु यानिमित्ताने संपादकांची क्रियाशीलता सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे.)


'ललित लक्षवेधी'मध्ये आपले पुस्तक यावे असे लेखकांना वाटते. तसेच यावेळी 'लक्षवेधी' पुस्तके कुठली आहेत, याची उत्सुकता वाचकांना असते. या सदराकरता दर महिन्याला चार पुस्तकांची निवड केली जाते. पण ती पुरेशा गांभीर्याने होते असे दिसत नाही. याची दोन-तीन कारणे आहेत. एक म्हणजे मॅजेस्टिक प्रकाशनाचे एक पुस्तक दर महिन्याला त्यात असतेच असते. खरे तर 'ललित'चे एकंदर स्वरूप पाहता ही गोष्ट टाळता येणे शक्य आहे. शिवाय द्यायचेच असेल तर मग त्या पुस्तकाची निवड अधिक काळजीपूर्वक करायला हवी; जेणेकरून त्यावर सहसा आक्षेप घेतला जाणार नाही. दुसरे- अलीकडच्या काळात काही ठरावीक प्रकाशकांचीच पुस्तके त्यात पुन:पुन्हा निवडली जातात. तर काही प्रकाशकांची पुस्तके बहुधा मुद्दामहून वगळली जातात. शिवाय 'लक्षवेधी'मध्ये पुस्तक निवडल्यावर त्याच्या 'मुखपृष्ठावरील छपाईचा खर्च' या नावाखाली संबंधित प्रकाशकांकडून पैसे घेतले जातात. या सदराची वाचकप्रियता पाहता प्रकाशक ते देतातही. पण जे देत नाहीत, त्यांची पुस्तके वगळून अशावेळी अन्य पुस्तकांची निवड केली जाते. हे सर्वथा गैर आहे. याचे समर्थन होऊच शकत नाही.


याशिवाय 'दृष्टिक्षेप' या सदरात जी पुस्तके निवडली जातात, ती बऱ्याचदा अतिशय सामान्य असतात. त्याबाबत कुठलाही निकष नसणे, हीच पूर्वअट आहे की काय, अशी शंका येते. प्रत्येक महिन्याला प्रकाशित होणारी सर्व पुस्तके 'बाजारात आलेली पुस्तके' या यादीत नसतात. ही यादी शक्य तेवढी परिपूर्ण करायचा प्रयत्न केला जात नाही. थोडक्यात- पुस्तकांची निवड काळजीपूर्वक करायला हवी आणि ती शक्य तेवढी निदरेषही असायला हवी. याचे कारण कुठल्याही मासिकाने चांगला मजकूर सातत्याने दिला, तरच त्याचे वाचकांकडून स्वागत होते. त्याचबरोबर दर्जा व गुणवत्ता टिकवली तरच त्याच्याविषयी विश्वासार्हता निर्माण होते. या स्वागतशील व विश्वासार्हतेला जाहिरात, वितरण व प्रसिद्धीची योग्य जोड दिली तर त्या मासिकाचा खप चांगल्या प्रकारे वाढू शकतो. 'ललित'बाबत या शक्यता अधिक संभाव्य आहेत.


अलीकडे 'ललित'चे संपादकीय धोरण वा भूमिका कळेनाशी झाली आहे. कारण त्यात संपादकीय नसते. पूर्वी असे नव्हते. 'ललित'च्या पहिल्या अंकाचे संपादकीय राम पटवर्धन यांच्याकडून लिहून घेतले गेले होते. शंकर सारडा 'ललित'चे संपादक होते त्या काळात ते नियमितपणे संपादकीय लिहीत. मराठी, भारतीय आणि जागतिक ग्रंथव्यवहारातल्या घडामोडींची ओळख करून देण्याचे काम संपादकीयातून व्हायला हवे. याबाबतीत 'मेहता मराठी ग्रंथजगत' या गृहपत्रिकेची संपादकीये उल्लेखनीय असतात. ई-बुक, अ‍ॅमेझॉन डॉट कॉम, फ्लीपकार्ट, ऑनलाइन पुस्तक प्रकाशन अशा जागतिक ग्रंथव्यवहारातल्या घडामोडींची यथायोग्य दखल त्यात घेतली जाते. शिवाय मराठी ग्रंथव्यवहारातल्या घडामोडींसाठीही प्रत्येक अंकात आठ-दहा पाने असतात. या दोन्ही गोष्टी खरे तर 'ललित'ने करायला हव्यात.


नॅशनल बुक ट्रस्टतर्फे दिल्लीत दर दोन वर्षांनी जागतिक पुस्तक प्रदर्शन भरवले जाते. अगदी अलीकडेपर्यंत कोलकात्यामध्ये 'आमार मोईबला' हे मोठे प्रदर्शन भरवले जाई. भारतीय ग्रंथव्यवहारातील या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. पण त्यांची 'ललित'ने कधी दखल घेतलेली दिसत नाही. पुढील वर्षांपासून दिल्लीचे प्रदर्शन दरवर्षी भरणार आहे. तिथे काही कोटी रुपयांची उलाढाल होते. पुस्तकांचे हक्क दिले-घेतले जातात. आपल्याच देशात ग्रंथव्यवहारात घडणाऱ्या अशा घडमोडींची दखल घेण्याची सर्वाधिक जबाबदारी 'ललित'ची आहे. ती टाळून कसे चालेल? यासाठी आपला प्रतिनिधी पाठवणे, त्याचा खर्च करणे 'ललित'सारख्या मासिकाला शक्य नाही, हे लक्षात घेताही असे वाटते की, या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातून काही प्रकाशक-लेखक जात असतात. त्यांच्याकडून याबद्दल लिहून घेणे अशक्य नाही. 


हल्ली चांगली पुस्तक परीक्षणे लिहिणारे मिळत नाहीत, ही सार्वत्रिक समस्या आहे. अशी तक्रार करणारे खूपजण भेटतात. पण त्यावर उपाय करू धजणाऱ्या वा पर्याय शोधणाऱ्यांची संख्या अत्यल्पच आहे. आधीच्या लोकांकडून नीट तटस्थ आणि समतोल समीक्षा होत नसेल तर नव्या लेखकांचा शोध घेणे, त्यांना लिहिते करणे, हा यावर उपाय आहे. याशिवाय मान्यवर साहित्यिकांनी चांगल्या वा आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर लिहिणे, ही आपली जबाबदारी आहे असे मानून चार-सहा महिन्यांतून एखाद् दुसऱ्या पुस्तकावर लिहिणे, हाही चांगला पर्याय आहे. 'बार्बियानाची शाळा', 'बलुतं' यांसारख्या काही पुस्तकांवर पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या लेखांमुळेच या पुस्तकांची अधिक चर्चा झाली, हे इथे लक्षात घ्यायला हवे. समतोल व तटस्थ समीक्षेचा उपयोग समाजाची वाङ्मयीन महत्ता वाढण्यासाठी होत असतो. टी. एस. इलियट या जगप्रसिद्ध कवी-समीक्षकाने म्हटले आहे, 'व्यक्तीच्या आस्वादाचे शुद्धीकरण आणि समाजाच्या अभिरूचीचे उन्नयन हे समीक्षेचे प्रयोजन आहे.' तेव्हा नामवंत साहित्यिकांनी इतरांच्या पुस्तकांवर लिहिण्यात कमीपणा मानायचे काही कारण नाही. उलट, त्यांनी ती आपले सामाजिक दायित्व मानायला हवे. अशा लेखकांना लिहिते करण्यासाठी 'ललित'ने जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजेत.


थोडक्यात- 'ललित'ने आपले वेगळेपण जपायला हवे. त्यासाठी त्याने कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या ४९ वर्षांत 'ललित'ला पर्याय उभा राहू शकलेला नाही. येत्या काळातही तो उभा राहण्याची शक्यता कमीच. याचे कारण नव्या मासिकांना सर्वच पातळीवर अडचणींचा सामना करावा लागतो. नवे लेखक, नवे लेखन, जाहिराती, प्रसिद्धी, वितरण अशा सर्वच पातळ्यांवर त्यांना लढावे लागते. आणि मुख्य म्हणजे विश्वासार्हता कमवावी लागते. त्यासाठी मोठी तितिक्षा करावी लागते. तेवढा धीर अनेकांना धरवत नाही. यातले काहीच 'ललित'ला करायची गरज नाहीए. 'ललित'साठी महाराष्ट्रातला कुठलाही लेखक सहजी लिहायला तयार असतो. प्रश्न आहे तो केवळ त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना लिहिते करण्याचा! 


'ललित'मधील लेखनाबाबत, पुस्तकनिवडीसंदर्भात मतभेद जरूर असतील; पण त्याचे मराठी ग्रंथव्यवहारातले महत्त्व कुणालाही नाकारता येणार नाही. तेवढी पुण्याई त्याने नक्कीच मिळविली आहे.


'ललित'ची आवश्यकता यापुढच्या काळात तर खूपच आहे. तंत्रज्ञानाच्या सुलभतेने आज ज्या संख्येने पुस्तके प्रकाशित होत आहेत, त्यांतून चांगले ते वाचकांपर्यंत, ग्रंथालयांपर्यंत पोहोचविण्याचे काम 'ललित' करीत आहे. पुस्तकांशी समाजाचे नाते जोडण्याचे, जोडलेले नाते वृद्धिंगत करण्याचे काम काही प्रमाणात का होईना, हे मासिक करत आहे. पुस्तके आणि समाज यांच्यामध्ये साकव तयार करण्याचा प्रयत्न आपल्यापरीने ते करत आहे. 'ललित'ने यापुढच्या काळात तो अधिक नेटकेपणाने करावा आणि काळानुसार बदलण्याचे आव्हान पेलावे, हीच सदिच्छा.