खरं
म्हणजे खेडेगावातल्या सगळ्याच लोकांना सगळ्यांबद्दल माहिती असते. घरं
वेगवेगळी असली तरी गाव म्हणून ते एका मोठय़ा कुटुंबाचाच भाग असल्यासारखे
राहत असतात. त्यामुळे गावातल्या कुणाच्याही जावयाला ते ‘जावयबापू’ म्हणून हाक मारणार, चहा पाजणार. कुणाच्याही लेकीबाळीच्या सासरी गेले तर त्या मुलीला आवर्जून भेटणार, तिची
विचारपूस करणार. थोडक्यात इतरांची सुख-दु:ख वाटून घेण्याचा प्रयत्न करणार.
त्याला आपल्यापरीनं मदत करणार. या अशा एकोप्यामुळे ब-याचदा मोठय़ा गडबडी
होतात, नामुष्कीला आणि मानहानीला तोंड देण्याची वेळ येते. पण गावातले शहाणेसुरते लोक ते करतात. त्रासदायक असलेल्या, अर्काट माणसालाही सांभाळात राहतात.
बाबुराव
सांबरे आणि इशिनाथ काळे ही दोन पेताड आणि अर्काट माणसं अशीच आमच्या गावात
होती. अति पिण्यानं इशिनाथ काळेंनी वरची वाट धरली तर बाबुराव सांबरे यांचं
सारं वैभव लयाला गेलं.
बाबुराव सांबरे हे सव्वासहा फूट उंच, धिप्पाड आणि राजबिंडं म्हणावं असं व्यक्तिमत्त्व. गडी राकट असला तरी उत्तम गवंडी होता. पंचक्रोशीतल्या सर्व पाटलांचे, देशमुखांचे आणि बागाइतदारांचे वाडे, माडय़ा
त्यांनी बांधल्या होत्या. त्यात बाबुराव सांबरे हे बेलदार समाजातले.
त्यामुळे जातिनिष्ठ व्यवसाय असला तरी त्यात त्यांची मातब्बरी होती.
थोडक्यात बाबुराव सांबरे हे तसं गाव पातळीवर का होईना वलयांकित नाव होतं.
या
उलट इशीनाथ काळ्यांचं. गडी जेमतेम पाच फूट. अंगकाठीही किरकोळ म्हणावी
अशीच. पण शहाण्णव कुळी मराठा असल्याने अंगी ताठा भरपूर. त्यामुळे
वडिलोपार्जित इस्टेटीवर नांगर फिरवून आता ग्रामपंचायतीत नोकरीला. काम
सकाळ-संध्याकाळ पाणी सोडायचं.
दोघेही मुलं-बाळं असलेले. सांबरे यांना तीन मुली, एक मुलगा, तर काळेंना दोन मुली, एक मुलगा. घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यात या दोघांना दारू पिण्याची भारी हौस. रोज संध्याकाळी ते कामावरून निघाले की, थेट हातभट्टीच्या गुत्त्यावर जाणार! तर्र होऊन घरी परतणार. सांबरे घरी जायला निघाले की, त्यांचं
चालणं बघण्यासारखं असायचं. डुलत डुलत आणि झोकांडय़ा देत ते चालायचे. पण
त्यात एक लय असायची. त्यांची अंगकाठी मजबूत असल्याने त्यात एक खानदाणीपणा
असायचा. आम्ही मुलं त्यांच्या मागेमागे चालायचो. पण हे सारं रस्त्यावरच्या
कुत्र्यांना आवडायचं नाही. ते मात्र सांबरेंचा भुंकून निषेध करायचे. हा गडी
आपल्या अंगावर पडला तर काय घ्या,अशी त्यांना भीती वाटत
असणार. पण सांबरेंना त्याची पर्वा नसायची. ते आपल्याच मस्तीत चालायचे.
कुत्र्यांचं भुंकणं आणि आमचा गोंगाट त्यांच्या मागेमागे असायचा. स्वारी घरी
परतल्यावर मात्र बायको-मुलांवर घसरायची. अंगणात पाऊल टाकताच बायकोच्या, द्वारकाबाईंच्या
नावाने शिव्यांची लाखोली वाहिली जायची. त्यांनी तीन मुलींनाच जन्म
दिल्यामुळे त्यांना नको नको त्या शिव्या दिल्या जायच्या. शिवाय त्यांना
रात्रीच्या जेवणाला सशाचं नाहीतर घोरपडीचं मटण हवं असायचं. ते द्वारकाबाई
ऐनवेळ कुठून आणणार? मग सांबरे त्यांना मारझोड करणार. मग त्यांच्या मुली आक्रोश करणार. मध्ये
कोण सोडवायला गेलं तर सांबरे त्यालाही मारणार. त्यामुळे हा तमाशा
शेजारच्या दहा-वीस घरांना ऐकू जायचा. लोक हळहळायचे. द्वारकाबाईंचं त्यांना
वाईट वाटायचं. मुलं त्यांच्या घराभोवती जमायची. त्यांच्याकडे पाहात सांबरे
म्हणायचे, ‘‘द्वारकीचा मुका घ्यायला गेलं की, तोंडात तिचा तुटका ओठच येतो.’’ पोरं
जाम हसायची त्याला. मग सांबरे पुन्हा पुन्हा तेच म्हणायचे. द्वारकाबाईंचा
खालचा ओठ तुटलेला होता. रात्रभर सांबरेंच्या घरातून आरडाओरड, शिव्याशाप आणि रडण्याचे सूर घुमत असायचे.
काळेंचं
घर सांबरेंच्या घरापासून 100 मीटर अंतरावर. पण इशिनाथ काळ्यांची त-हा थोडी
वेगळी होती. ते हातभट्टीच्या गुत्त्यावरून तर्र होऊन बाहेर पडले की, बडबडायला लागायचे. रस्त्यावरून मोठमोठय़ा आवाजात बोलत त्यांची पदयात्रा घराच्या दिशनं चालायची. ते शिव्याशाप द्यायचे नाहीत. म्हणायचे, ‘‘आमचा भरत दोन डबलरोटय़ा खातो. कुणाच्या बापाचं खातो? आमच्याच
घरचं खातो. आम्ही त्याला दोन रोज सकाळी चहाबरोबर दोन डबलरोटय़ा घेऊन देतो.
आमची बायको इतरांच्या शेतावर कामाला जात नाही. का म्हणून जावं तिनं? आम्ही शहाण्णव कुळी मराठे आहोत. आम्ही इतरांची चाकरी का करावी? आणि शेतात काम करून बायको काळी पडली तर मग ती गोरी कशी होणार पुन्हा?’’ हे त्यांचं स्वगत रस्ताभर चालू असायचं. ती गावातल्या लोकांना मोठी करमणूक असायची.
दुस-या दिवशी सकाळी दोघेही नेहमीप्रमाणे कामावर निघायचे. तेव्हा शेजारचे लोक त्यांना म्हणायचे, ‘काय रात्री जरा जास्त झाली होती वाटतं?’ सांबरे आणि काळे त्यावर कानकोंडे होत ओशाळवाणं हसायचे. ‘आता दारू जरा कमी केली पाहिजे’ म्हणायचे.
पण पुन्हा संध्याकाळी दोघंही तर्र होऊन जायचे. पुन्हा कालचाच सीन रंगायचा.
शेजारपाजाऱ्यांना या गोष्टीची इतकी सवय होऊन गेली की, त्यांना त्याचं काही वाटेनासं झालं.
काही गावक-.यांनी एकत्र येऊन दोघांची दारू सुटण्यासाठी त्याना पंढरपूरच्या वारीला पाठवलं, डॉक्टरांकडे नेलं, गंडेदोरे
बांधणा-या मांत्रिकाकडे नेलं. पण पहिले पाढे पंचावन्न. दोघांतही काही फरक
पडला नाही. परिणामी सांबरे यांना लोक काम देईनासे झाले. कारण ते दोन दिवस
कामावर जायचे, मालकाकडून कामाचे सगळे पैसे घ्यायचे आणि ते
दारूत घालवायचे. मग काम नाही आणि काहीच नाही. काळे वेळेवर पाणी सोडायचे
नाहीत. मग त्यांना कामावरून काढून टाकायची मागणी होऊ लागली, तेव्हा
ते काम त्यांच्या बायकोनं आणि मुलानं करायला सुरुवात केली. परिणामी दोघंही
रिकामटेकडे झाले. दिवसभर दारू पिऊन वाट्टेल तिथे पडू लागले. दारूसाठी
घरातली भांडीकुंडी विकू लागले. घरातल्या वस्तू गहाण ठेवू लागले.
दारूपायी सांबरे यांची तब्येत खूपच खालावली, तर काळे आजारी पडून गेले. सांबरेंना त्यांच्या बायको-मुलानं घराबाहेर काढलं. त्यामुळे आता त्यांना कुणी तरी जेवायला देतं, ते
कुठेतरी झोपतात. दोन दोन दिवस आंघोळ करत नाहीत. गावातल्या लोकांना
त्यांच्या सगळ्याच गोष्टी माहीत असल्याने कुणी त्यांना तसं फार काही बोलत
नाही. लोक फक्त हळहळ व्यक्त करतात. कधीतरी विषय निघतो, तेव्हा
सांबरे आणि काळे यांचे किस्से लोक एकमेकांना मोठय़ा आनंदानं सांगतात. हे
किस्से आता अकबर-बिरबलाच्या गोष्टींतल्यासारखे झाले आहेत. त्यातले खरे किती
आणि खोटे किती याची खातरजमा करणं अवघड. कारण प्रत्येक जण त्यात आपापल्या
परीनं भर घालत असतो. त्यामुळे सांबरे आणि काळे या दोघांच्या कथा, आता दंतकथा झाल्या असून, त्या गावातच नाही तर आसपासच्या गावातही ‘तळीरामांच्या (दंत)कथा’ म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. गेली कितीतरी वर्षे त्यांची चर्चा चालूच आहे.
No comments:
Post a Comment