एक सजग
आणि जबाबदार पत्रकार किती उत्तम प्रकारची बातमीदारी आणि कामगिरी करू शकतो, आपल्या काळाचा कसा
उत्तम साक्षीदार बनू शकतो आणि इतिहास घडवण्यात आपलाही खारीचा वाटा कसा उचलू शकतो,
याचं उत्तम उदाहरण म्हणून वि. स. माडीवाले यांच्या `अशी ही बिकट वाट' या 1972 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाकडे पाहता येईल.
हे मराठीतले एक महत्त्वाचे पण काहीसे दुर्लक्षित असे पुस्तक आहे.
माडीवाले
यांनी मराठी वृत्तपत्रांमध्ये पस्तीस-छत्तीस वर्षे पत्रकारिता केली. 1937च्या सुमाराला माडीवाले पुण्याच्या दै. प्रभातमध्ये वार्ताहर
म्हणून रुजू झाले. पुढे प्रभातमधून बाहेर पडून ते `काळ'मध्ये रुजू झाले. नंतर `लोकमान्य' आणि त्यानंतर पुन्हा `केसरी'मध्ये गेले. शेवटी `केसरी'तूनच निवृत्त झाले.
माडीवाले
यांनीच म्हटल्यानुसार हे पुस्तक एका वार्ताहराची दैनंदिनी आहे. त्यांनी लिहिले आहे,
``हे पुस्तक कथा नाही, कादंबरी नाही. प्रबंध तर नाहीच. मराठी वृत्तपत्रांतील एका वार्ताहराने
आपल्या आयुष्यात जे अनुभवले, सोसले, बोचले,
व भोगलेही त्याच्या या जिवंत स्मृति! मराठीत असा
प्रयत्न पहिलाच असावा अशी माझी तरी समजूत आहे. तो कितपत साध्य
झाला हे रसिकांनी ठरवावे. तेच सर्वेच्च न्यायालय. '' पण सर्वेच्च न्यायालयात बऱयाचदा महत्त्वाचे खटलेही प्रलंबित राहतात.
तसाच प्रकार माडीवाले यांच्या प्रस्तुत पुस्तकाबाबत झाला आहे असे म्हणावे
लागेल. निदान मराठी पत्रकारितेमध्ये तरी पाहिलेल्या, अनुभवलेल्या, घडवलेल्या आणि घडलेल्या घटनांचा इतिहास
सांगणारं पुस्तक कुणी लिहिल्याचं आपल्या पाहण्यात नाही, असे माडीवाल्यांनी
म्हटले आहे.
हे पुस्तक
तीन-चार कारणांसाठी
महत्त्वाचे आहे. पहिले, उत्कृष्ट बातमीदारी
कशी करावी याचे हे पुस्तक आदर्श नमुना आहे. दुसरे, माडीवाले यांनी पुण्यातच पत्रकारिता केली. त्यामुळे यातील
सर्व घटना पुण्यातील आहे. त्यातून पुण्याचा तत्कालिन इतिहास उलगडण्यास
मदत होते. तिसरे, पत्रकारांना बातम्या कशा
मिळतात याचे सर्वसामान्यांना फार कुतूहल असते. ते शमवण्याचे कामही
हे पुस्तक शंभर टक्के करील असा भरवसा वाटतो. चौथे, माडीवाले हाडाचे बातमीदार आहेत. त्यांच्या अंगोपांगांत
बातमी मुरलेली आहे. उभ्या आयुष्यात त्यांनी एकच व्यसन केले,
ते म्हणजे बातम्या मिळवण्याचे. ही वाट बिकट असली
तरी माडीवाले कधी कंटाळले नाहीत. कारण रोज नव्या बिकट वाटेवरून
त्यांना चालावे लागे. रोज नव्या संघर्षाला, प्रसंगाला आणि अंगावर शेकू पाहणाऱया घटनांना तोंड द्यावे लागे. पण त्या सर्वांतून माडीवाल्यांनी अतिशय कौशल्याने मार्ग काढला, त्यावर आपल्या हजरजबाबीपणामुळे मात केली. म्हणून ही बिकट
वाट अथपासून इतिपर्यंत कुठेही कंटाळवाणी झालेली नाही.
मराठी
वृत्तपत्र व्यवसायाला सुरुवात झाली, तीच मुळी लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून. हा प्रवाह स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाला, स्वातंत्र्यानंतरही
सुरुवातीच्या काही दशकांमध्ये तो बळकट होता. (मात्र ऐंशीनंतर हा
प्रवाह फारच क्षीण झाला आहे. याला स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय
परिस्थिती कारणीभूत असली तरी पत्रकारितेच्या नीतिमूल्यांबाबतचा कमी होत चाललेला आग्रह
आणि विश्वास हेही कारणीभूत आहेत असे वाटते.) माडीवाल्यांनी पत्रकारितेला
सुरुवात केली तीच मुळी स्वातंत्र्यपूर्व काळात. त्यामुळे त्यांनी
समाजहित आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. कोणत्याही
परिस्थीतीत पत्रकारितेच्या नीतीमूल्यांशी तडजोड केली नाही. केवळ सनसनाटी बातम्या हा तेव्हाच्या वृत्तपत्रसृष्टीचाच स्वभावधर्म नव्हता,
त्यामुळे तशा प्रकारच्या बातम्या मिळूनही माडीवाल्यांनी तो मोह कटाक्षानं
टाळला.
या पुस्तकातून
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर या दोन्ही काळातल्या पत्रकारितेतला फरक स्पष्ट
होतो. ब्रिटिश काळात
तर बातमीचा माग काढताना माडीवाल्यांच्या अनेक वेळा जिवावर बेतले. पण ते त्यातून सहीसलामत बाहेर पडले, ते सुदैवाने वगैरे
नाही तर पत्रकारितेनेच निर्माण केलेल्या नीतिमूल्यांनी. शिवाय
त्या वेळी दूरदर्शन, वृत्तवाहिन्या नव्हत्या. त्यामुळे लोकही वृत्तपत्रांवरच अवलंबून होते. मात्र तेव्हा
आताच्यासारख्या सोयी-सुविधा नसल्याने पत्रकारिता करणे कठीण होते.
`अशी ही बिकट वाट' या नावातूनच ते पुरेसे स्पष्ट
होते. त्यामुळे माडीवाल्यांसारख्या पत्रकारांची विशेष दखल वाचकांकडून
घेतली जात असे.
1935-36 साली
मराठी वृत्तपत्रात एकच वार्ताहर असायचा. गंगूबाईने पाटली चोरल्यापासून
डॉ. धनंजयराव गाडगीळ यांची अर्थशास्त्रावरील किंवा स्वा.
सावरकर, भाई डांगे, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, श्रीनिवास शास्त्रीय
यांची राजकारणावरील भाषणे-जाहीर मुलाखती,
न्यायालयात गाजलेले खटले, चोऱया-दरोडे, खून-बलात्कार अशा सर्व प्रकारच्या
वार्ता या एकाच वार्ताहराला द्याव्या लागत. या सर्व गोष्टींमुळे
माडीवाले यांना जीवनाचं सर्व अंगांचं, बाजूंचं आणि पैलूंचं चांगलं
दर्शन झालं. समाजमनाच्या मनोव्यापाराचा सूक्ष्म अभ्यास करता आला.
त्या सर्व गोष्टींचं प्रतिबिंब या पुस्तकात पडलं आहे. त्यामुळे हे पुस्तक अतिशय रोचक, रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक
झालं आहे.
माडीवाले
तसे मिष्किल आहेत. त्यांनी पत्रकारांचे तुटपुंजे पगार, वृत्तपत्रांची हलाखीची
अवस्था, संपादकांचा तऱहेवाईकपणा याविषयी थोडक्यात लिहिले आहे.
माडीवाले
यांनी अनेक महत्त्वाच्या बातम्या `ब्रेक' केल्या. त्या वाचताना आपण हर्षभरीत होतो. त्यांच्या या कामगिरीवर
तेव्हाच्या पत्रकारांना हेवा वाटायचाच, पण आजच्या वार्ताहरांनीही
हेवा वाटावा अशा या बातम्या आहेत. यातली एकेक बातमी माडीवाल्यांनी
कशी मिळवली हे वाचताना आपण गुंग होऊन जातो.
माडीवाले
यांनी या सबंध पुस्तकात कुठेही भाष्य करण्याचे
टाळलेले आहे. त्यांनी फक्त घटना सांगितल्या आहेत, पण त्या घटनाच इतक्या बोलक्या आहेत की, त्यावर वेगळ्या
भाष्याची गरजच राहत नाही. 1941 साली वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम
सुरू झाली. या सत्याग्रहाची आचारसंहिता काँग्रेसने ठरवून दिली
होती. त्यानुसार वैयक्तिक सत्याग्रह करणाऱयांना दंड झाला तर तो
न भरता तुरुंगातच गेलं पाहिजे असा दंडक होता. स्वातंत्र्याच्या
भावनेने सर्वात पहिल्यांदा जागृत झाला तो मध्यमवर्ग. त्याला सत्याग्रह
करून तुरुंगात जाण्याची आणि पर्यायाने देशासाठी काहीतरी केल्याची भावना महत्त्वाची
वाटत होती. अशाच एका पुण्यातल्या मध्यमवर्गीय बाइभनी सत्याग्रह
केला. न्यायालयात त्यांना दंडाची शिक्षा झाली पण त्यांनी तो भरण्याचं
नाकारल्यामुळे त्यांची रवानगी सकाळी अकरा वाजता येरवडय़ाच्या तुरुंगात झाली.
सकाळी माडीवाले न्यायालयात असल्याने त्यांना या बाई माहीत होत्या.
दुपारी कुणीतरी अज्ञाताने न्यायालयात जाऊन परस्पर त्या त्या बाईचाही दंड भरला . त्यामुळे चार वाजता न्यायालयाने बाईना मुक्त करण्याचा
आदेश दिला. त्यामुळे या बाईना आनंद होण्याऐवजी उलट दु:ख झालं. बाई कष्टी होईन तुरुंगाच्या बाहेर आल्या आणि
टांगा करून घरी परतल्या. तो टांगेवाला माडीवाल्यांचा मित्र होता.
संध्याकाळी भेटल्यावर तो माडीवाल्यांना म्हणाला, ``आज दुपारी येरवडा तुरुंगातून एका सत्याग्रही बाइची सुटका झाली व मीच त्यांना
घरी पोचतं केलं. पण बाई फारच कष्टी होत्या.'' माडीवाल्यांना त्या घटनेचा लगेच उलगडा झाला. ते त्यांच्या
घरी गेले. नोकराकडे निरोप दिल्यावर आतून बाइचा आवाज त्यांचा
कानावर पडला, `काळचा बातमीदार कुठला! काळच
आलाय.' अतिशय म्लान चेहरा करून त्या बाई बाहेर आल्या,
माडीवाल्यांशी बोलल्या. त्या काळात ही बातमी मोठी
खळबळजनक होती!
बातमीदार
किती चाणाक्ष असावा लागतो याचं उदाहरण या बातमीतून येतं.
अशा
अनेक खळबळजनक बातम्या माडीवाल्यांनी दिल्या असल्या तरी काही बातम्या मिळूनही त्या समाजहित
लक्षात घेऊन दिल्या नाहीत.
मॅट्रिकच्या
परीक्षेचा पेपर आदल्या दिवशी फुटल्याची बातमी त्यांना मिळाली होती. तिने संबंध महाराष्ट्रात
खळबळ उडाली असती, पण माडीवाल्यांनी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन
नये म्हणून ती बातमी दिली नाही, अनेक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर
पाणी फिरवलं नाही. अशीच एक बातमी न देऊन त्यांनी परप्रांतीयांच्या
घशात जाणारा साखर कारखाना वाचला.
1942च्या लढय़ात
अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले होते. त्यातल्या अच्युतराव पटवर्धन
यांच्या मागावर पोलिस होते, पण पटवर्धन काही त्यांना सापडत नव्हते.
मग पोलिसांनी पत्रकाराला त्याची नक्की माहीत असेल म्हणून पुण्यातल्या
काही ठिकाणचे पत्ते देऊन त्या ठिकाणी अच्युतराव आले की, आपल्याला
कळवण्याची जबाबदारी अत्यंत विश्वासाने माडीवाले यांच्यावर सोपवली होती. पण देशप्रेम जागृत असलेल्या माडीवाल्यांनी त्या ठिकाणी अच्युतरावांनी येऊ नये
अशी व्यवस्था केली.
बातमीपेक्षाही
काही प्रसंगी समाजहित महत्त्वाचं असतं याचा वस्तुपाठ या घटनांनी मिळतो.
पण अनेक
वेळा बातमी देणं हे वार्ताहराचं कर्तव्य असतं. ती बातमी बाहेर फुटू नये म्हणून हितसंबंधी लोक कमालीची
गुप्तता पाळतात. निदान त्या काळात तरी तशी पद्धतच होती.
अशा वेळी वार्ताहराचा कस लागतो. पण अशा अनेक प्रसंगांवरही
माडीवाल्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर मात केली. 42च्या चळवळीत अनेक कार्यकर्त्यांना अटक करून 40-50 तरुणांवर
महाराष्ट्र कटाचा खटला भरवण्याची तयारी पोलिसांनी चालवली होती. पण हा खटला न्यायालयात टिकणार नाही असं काही पोलिस अधिकाऱयांना वाटत होतं,
तर काही खटल्याच्या बाजूने होते. ही बातमी मिळवण्यासाठी
माडीवाले एका बडय़ा पोलिस अधिकाऱयाच्या घरी गेले, पण त्यांनी त्याबद्दल
काहीही बोलण्यास नकार दिला. चहा देऊन माडीवाल्यांची बोळवण करण्याच्या
बेतात असतानाच तिथे त्यांच्या बरोबरीचे दुसरे अधिकारी आले. यजमान
अधिकाऱयाला माडीवाल्यांना जा म्हणता आलं नाही, ती संधी साधून
माडीवाले चेहऱयासमोर टाइम्स अंक धरून बसले. नेहरू शर्ट,
काळी टोपी, धोतर, वाढलेली
दाढी असा माडीवाल्यांचा गबाळा वेष पाहून त्या अधिकाऱयाला वाटलं हा कुणीतरी मदत मागायला
आलेला असावा. नंतर त्या अधिकाऱयाने महाराष्ट्र कटाचा खटला कसा
उभा राहू शकत नाही असं वरिष्ठांचंही मदत असल्याची इत्थंभूत माहिती दिली. माडीवाल्यांना मोठी बातमी मिळाली होती. यजमान पोलिस अधिकाऱयाने
``याद राख, यातील एक अक्षर जर बाहेर फुटलं,
तर त्याचे परिणाम फार वाईट होतील'' असा सज्जड दम
देऊनही माडीवाल्यांनी `महाराष्ट्र कटाचा खटला बारगळला'
अशी तब्बल आठ कॉलमी बातमी दिली. तिने मोठी धमाल
उडवून दिली. ही बातमी कशी फुटली, कोणी दिली
याची बरीच चौकशी झाली, पण त्याचा तपास शेवटपर्यंत लागला नाही.
कसा लागणार? कारण ती बातमी फुटली होती हे खरे,
पण ती कुणीही माडीवाल्यांना दिली नव्हती. ती त्यांनीच
अक्कल हुशारीने मिळवली होती.
माडीवाल्यांनी
दरोडेखोरांच्याही अनेक बातम्या दिल्या. त्यात त्यांनी त्यांची सत्प्रवृत्तीही नोंदवली आहे.
पण उलटय़ा काळजाच्या दोन गुन्हेगारांना बोलतं करण्यात पोलिसांनाही मोठी
मदत केली. त्यातल्या पहिल्याला खून केलेल्या जागी उलटा टांगण्याची
युक्ती सुचवून, तर दुसरा त्याच्याविषयीची माडीवाल्यांची बातमी
वाचून कोसळला.
तो काळच
असा होता की, घरातून बाहेर
पडल्यावर परत घरी येणं होईल की नाही याचा भरवसा नसे. माडीवाले
पुण्याच्या पोलिस इन्सपेक्टरच्या तावडीतून एकदोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा मरता मरता
वाचले. शहरात रोज निदर्शनं, मोर्चे,
लाठीमार चालू होता. पोलिस वैतागून गेले.
1942च्या चले जावच्या घोषणेने मोठे रणकंदन माजवले होते. अनेक नेते भूमिगत झाले होते. पण त्यांच्या आदेशानुसार
विद्यार्थी शाळा-महाविद्यालयातून बाहेर पडले. त्यांच्यावर पोलिसांनी अमानुष पद्धतीने लाठीमार-गोळीबार
केला. त्यात 9 ऑगस्टला पुण्यातल्या एस.
पी. महाविद्यालयासमोर पुण्याचा मुख्य पोलिस अधिकारी
हॅमंडच्या हातून दोन्ही माणसं वाचली. ते दोघे वार्ताहर होते,
एक होते स्वत: माडीवाले आणि दुसरे भि. ना. ठाकोर. त्यानंतर 12
ऑगस्टला पुण्यात ब्रेनगेन असलेल्या चिलखती गाडय़ा फिरू लागल्या.
दिसेल त्याच्यावर गोळीबार करू लागल्या. अप्पा बळवंत
चौकात झालेल्या गोळीबारातून माडीवाले आणि ठाकोर मरता मरता वाचले.
पुढच्या
वर्षी 26 जानेवारीला
पुण्यातल्या राजा बहादूर गिरणीला मोठा आग लागली होती. फरासखान्याजवळ
माडीवाले उभे होते आणि तिथून दोन आगीचे बंब ठणाणा करत निघाले. त्यावरून कुठेतरी मोठी आग लागली हे माडीवाल्यांनी ताडलं आणि ते त्यांचा पाठलाग
करत गिरणीजवळ पोचले. हॅमंडनं सरळ त्यांच्या छातीलाच पिस्तुल लावलं
आणि विचारलं, ``तू नेमका या वेळी येथे कसा अलास? गिरणीला आग लागणार हे तुला अगोदर माहीत असलं पाहिजे. खरं सांग ही आग कोणी लावली?'' तेवढय़ात नांदे फौजदार धावत
हॅमंडजवळ येऊन म्हणाले, ``सर, ही इज रिपोर्टर.''
तासाभरानं आग विझल्यावर आणि हॅमंडचं डोकं शांत झाल्यावर त्यानं माडीवाल्यांची
माफी मागितली.
ब्रिटिश
सरकारने हजारो नेते-कार्यकर्ते यांना तुरुंगात डांबलं होतं. पोलिस अधिकारी
त्याविषयीच्या वार्ता चाळून, गाळून देत. त्यातल्या कुणी उपोषण केलं, कुणाला मारहाण झाली याचा
सुगावा लागणं शक्य नव्हतं. त्यांची दहा ओळींचा बातमी आली तरी
लोकांना हायसं वाटत असे. पण त्या बातम्या मिळणार कशा?
वार्ताहरांना येरवडा तुरुंगात प्रवेश नव्हता. मग
माडीवाले यांनी एक शक्कल लढवली. तुरुंगातल्या कैद्यांच्या जेवणाचे
डबे बाहेरून जात. आत
जाताना त्यांची तपासणी होई पण ते खरकटे डबे बाहेर येताना त्यांची तपासणी होण्याचं कारण
नव्हतं. मग माडीवाल्यांनी त्या परतीच्या डब्यांतून आतल्या घडामोडी
कार्यकर्त्यांना लिहून पाठवायला सांगितल्या. त्यामुळे वर्तमानपत्रात
रोजच्या रोज वार्ता प्रसिद्ध होऊ लागल्या. लोक त्यामुळे खूश होऊ
लागले, तर पोलिस हैराण झाले. मात्र त्यांना
काही त्या बातम्यांचा तपास लागेना. पण एके दिवस लागला तेव्हा
माडीवाल्यांची `डबा-वार्ता सर्व्हिस'
बंद झाली.
अशीच
आणखी एक बातमी. महात्मा गांधी पंधरा दिवस पुण्यात असताना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
स्तरावरील जान्यामान्या पत्रकारांचा मोठा ताफा त्यांच्याबरोबर होता. एक पत्रकार तर गांधींजींसोबत संपूर्ण भारत फिरलेला होता. पण त्या सर्वांना गुंगारा देऊन माडीवाल्यांनी गांधीजींविषयीच्या ज्या बातम्या
त्या काळात दिल्या, त्याने तर या पत्रकारांनीही आश्चर्याने तोंडात
बोटं घातली होती.
देहू
रोड बॉम्ब कट, महाराष्ट्र
कट, कॅपिटॉल व वेस्टएण्ड बॉम्बस्फोट अशा अनेक स्वातंत्र्यपूर्व
काळातील महत्त्वाच्या घटनांविषयीच्या बातम्यांचं पितृत्व माडीवाल्यांकडे जाते,
त्याविषयी त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलं आहे.
पारतंत्र्याच्या
काळात वार्ताहरांचं जीवन अगदीच हलाखीचं म्हणावं असं होतं.
समाजात मान नव्हता, राजदरबारी प्रतिष्ठा होती,
आर्थिक स्थिती समाधानकारक नव्हती. अधिकारी तिरस्कारानं
पाहत, उपेक्षा करत अणि बातम्या तर सर्वच प्रकारच्या मिळवाव्या
लागत. बहुधा त्यामुळेच या आव्हानांना तोंड देण्यास माडीवालेंसारखे
वार्ताहर सुसज्ज असत. प्राणपणाने काम करत. माडीवाल्यांनी तर बहादरदार बातमीदारी
केली. एवढेच नव्हे तर `मंडई विद्यापीठ'
आणि `मनमाड मार्ग' हे दोन
नवे शब्दप्रयोगही घडवले. त्यांच्या
हकिकतीही
मजेशीर आहेत.
या पुस्तकातल्या
सुरुवातीच्या 125
पानांमध्ये माडीवाल्यांनी फक्त स्वातंत्र्यापूर्वीच्या पत्रकारितेविषयी
लिहिलं आहे, तर उरलेल्या 102 पानांमध्ये
1947 ते 62 या काळातल्या पत्रकारितेविषयी
लिहिलं आहे. 14 ऑगस्ट 1947 या दिवशी संपूर्ण
देशाप्रमाणेच पुणे शहरालाही सणाचं रूप आलं होतं. पुणे जिल्ह्याचे
तत्कालीन जिल्हाधिकारी (आणि पुढे पुणे शहराला नवा चेहरा देणारे
कर्तबगार पालिका आयुक्त) स. गो. बर्वे यांनी राष्ट्रध्वज फडकवला.
पुण्याची
म्युनिसिपालिटी रद्द करण्याचा निर्णय, केसरीचे संपादक तात्यासाहेब केळकर यांचं निधन,
महात्मा गांधी यांच्या खुनानंतर पुण्यात उसळलेला आगडोंब, केशवराव जेधे-शंकरराव मोरे यांच्या प्रचारसभांची धुमाळी,
शेकापचा दाभाडी प्रबंध, गोवामुक्ती संग्राम अशा
अनेक घटनांविषयी माडीवाल्यांनी दिलेली माहिती वेगळी आणि रोचक आहे.
त्यानंतर
सुरू होतो तो संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा लढा. त्या काळात पुण्यात
काय वातावरण होतं याचं उत्तम चित्र माडीवाल्यांनी उभं केलं आहे.
12 जुलै 1961
या दिवशी पानशेतच्या रूपाने पुणे शहरावर अवकळा पसरली होती, त्याची बातमीही माडीवाल्यांनीच पहिल्यांदा डेक्कन जिमखान्याच्या इन्स्पेक्टरला
दिली. याशिवाय इतर अनेकांना फोन करून सजग करायचे काम केले.
त्यावेळचा गोंधळ त्यांनी चांगल्या प्रकारे टिपला आहे. पानशेत फुटीची वार्ता `केसरी'चे
संपादक जयंतराव टिळक यांना माडीवाल्यांनी दिली, तेव्हा त्यांनी
पुराच्या पाण्याने केसरीवाडय़ाचे काय नुकसान होईल याची पर्वा न करता ताबडतोब नारायण
पेठेतल्या नदीकाठच्या अनाथ हिंदू महिलाश्रमात धाव घेतली. स्वत:चा जीव धोक्यात घालून तिथल्या स्त्रिया व मुलींची मोठय़ा संकटातून धैर्यानं
सुटका केली. तो प्रसंग टिळकांच्या परंपरागत वारशाची खूण सांगणारा
आहेच, पण उदात्त माणुसकीचंही दर्शन घडवणारा आहे.
माडीवाल्यांचं
हे पुस्तक 1972 साली केसरी
प्रकाशनानं प्रकाशित केलं. डेमी क्राऊन आकारातल्या सोळा +
227 पानांचं पुस्तक आहे. यातली 227 पानं कमालीची वाचनीय आहेत. पहिल्या सोळा पानांतील बारा
पानं मात्र वाया घालवली आहेत. अर्थात त्यात लेखकाचीच चूक आहे.
कारण त्याला आपण कोणत्या प्रकारचं पुस्तक लिहिलं आहे, याचा नीट अंदाज आला नसावा. म्हणून त्यांनी हे बारा पानी
प्रस्तावनेचं ठिगळ त्याला जोडलं असावं. बरे ती प्रस्तावनाही कुणा
जाणकार संपादकाची घ्यावी, तर तसंही केलं नाही. पत्रकारितेच्या जगाची फारशी माहिती नाही अशा पण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व
म्हटल्या जाणाऱया पु.ल. देशपांडे यांची
प्रस्तावना घेतली. पण माडीवाले यांची ही चूक माफ करण्यासारखी
आहे. कारण पुस्तक वाचताना सुरुवातीच्या प्रस्तावनेच्या आपल्याला
पार विसर पडतो.
पत्रकारांचं
जग अनेकरंगी, बहुढंगी असतं.
त्यात जगाचं रोज नवं दर्शन होत असतं. राजकारण्यांच्या
जगात वावरताना, त्यांच्या मनातील गुपितं फोडताना, स्वत:च्या बुद्धीचा कस लागेल तर कधी गुन्हेगार जगात महशूर
असलेले गुन्हेगारही भेटतील. भोंदूबाबांशी गाठ पडेल तशी सज्जनांशीही
ओळख होईल. कलाक्षेत्रातल्या लोकांचं मुखवटे आणि खरे चेहरे एकाच
वेळी अनुभवायला मिळतील. त्यामुळे अनेकरंगी, बहुढंगी असलं तरी पत्रकारितेइतकं बेभरवशाचं दुसरं क्षेत्र नाही. या सर्वांतून स्वत:चं स्वत्व काय ठेवणं, ते जपणं ही मोठी अवघड गोष्ट होऊन बसते. मात्र तरीही `हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं' असा अहंकाराचा वास आपल्या वागण्या-बोलण्याला येऊ द्यायचा
नसतो.
स्वत:च्या जबाबदारीची योग्य
जाणीव ठेवली तर आणि ती निरपेक्ष बुद्धीने वापरली तर पत्रकारिता ही फार मोठी शक्ती असते.
लोकशाहीमध्ये पत्रकारितेला चौथा स्तंभ म्हटलं जातं ते याचसाठी.
याचं नितांतसुंदर दर्शन माडीवाल्यांनी या पुस्तकातून घडवलं आहे.
डाव्या
आणि उजव्या नाकीपुडीसाठी दोन वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जायला लागण्याचा सध्याचा काळ आहे. हे स्पेशलायझेशन सर्वच
क्षेत्रात बेसुमार पद्धतीनं झालं आहे. पत्रकारिताही त्याला अपवाद
नाही. सध्या विषयवार बातमीदारांची फलटण प्रत्येक वृत्तपत्राच्या
दिमतीला असते. त्यामुळे जीवनाच्या सर्व अंगांना भिडण्याची,
ती समजावून घेण्याची संधी हल्लीच्या बातमीदारांना मिळेलच असं नाही,
हेही तितकंच खरं आहे. पण म्हणून माडीवाल्यांचं
पुस्तक युटोपिया ठरत नाही, हेही लक्षात घेणं आवश्यक आहे.
हे पुस्तक चांगल्या बातमीदारीचा वस्तुपाठ आहे. म्हणून ते पत्रकारितेच्या सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य पाठय़पुस्तक म्हणून
लावावंच, पण प्रत्येक वृत्तपत्रांत बातमीदारी करणाऱया बातमीदारानंही
सदोदित जवळ बाळगावं असं आहे... आणि पत्रकारितेबद्दल कुतूहल असणाऱयांनीही
हे पुस्तक वाचायलाच हवं. शिवाय ज्यांना 1937-61 या काळात पुणेकेंद्रित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटना-घडामोडी जाणून घ्यायच्या असतील त्यांच्यासाठीही हे पुस्तक महत्त्वाचं आहे.
या काळात पुणे-मुंबई ही शहरं राजकारण-समाजकारण-पत्रकारिता-मोर्चे आंदोलनं-चळवळी-सभा-संमेलने असे अनेकविध
गोष्टींचे केंद्र होतं, त्याची झलकही या पुस्तकात पाहायला मिळते.
मात्र हे पुस्तक सध्या उपलब्ध नाही, ते कुणातरी
जाणकार प्रकाशकानं पुनर्मुद्रित करायला हवं.
Unsung Hero!!
ReplyDeleteIt will be interesting to know how did you get copy of this book?
माझ्या एका मित्राला ती एका रद्दीच्या दुकानात मिळाली. त्याने ती मला भेट दिली. पत्रकाराने लिहिलेले पुस्तक असल्याने मला काही त्याचा उपयोग होईल असे त्याला वाटले. मी ते वाचायला घेतले आणि त्याच्या अक्षरक्ष: प्रेमात पडलो. फारच चांगले पुस्तक आहे. इतरांना त्याची ओळख करून द्यावी म्हणून मग मी हा लेख लिहिला. आभार आपल्या प्रतिसादाबद्दल.
Deleteतुम्ही नेहमीच माझा ब्लॉग वाचून प्रतिसाद लिहिता याबद्दल मनापासून आभार.
एका अप्रतिम पुस्तकाची तोंडओळख करून दिल्याबद्दल आभार
ReplyDelete