Monday, June 25, 2012

अस्मितेचे प्रश्न, हिंसाचाराची धग

डॉ. अमर्त्य सेन यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. ‘कल्याणकारी अर्थशास्त्र’ या शाखेला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचा हा सिद्धान्त जगभर नावाजला. नोबेल पुरस्कारानंही त्यावर पसंतीची मोहोर उठवली. सेन हे कोणतीही विचारसरणी अंतिम मानत नाहीत. काहीसा कठोर नि:पक्षपातीपणा आणि चिकित्सक वास्तववाद हे त्यांच्या संशोधनाचे निकष राहिले आहेत. निधर्मीवाद, सहिष्णुता, मानवता आणि आशावाद ही मूल्ये मात्र ते प्रमाण मानतात. गरिबांविषयी त्यांना खूप आस्था आणि कणव आहे. ‘अर्थशास्त्र हे गरीब, पीडित लोकांविषयी भाष्य करते; म्हणूनच मला ते जवळचे वाटते’, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. विषमता, गरिबी आणि दुष्काळ याविषयी लोकशाही पद्धतीने उपाययोजना या संदर्भात त्यांनी बरेच लेखन केले आहे. ‘कल्याणकारी अर्थशास्त्रा’तील योगदानामुळे त्यांना 1998 सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

डॉ. सेन यांनी राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांची मांडणी करणारे लेखनही केले आहे. ‘अर्ग्युमेंटेटिव्हव्ह इंडियन’आणि ‘आयडेंटिटी अँड व्हायोलन्स’ ही त्यांची दोन पुस्तके त्याची उदाहरणे आहेत. (पहिल्याचा ‘वाद-संवादप्रिय भारतीय’या नावाने शारदा साठे यांनी आणि दुस-याचा अनुवाद ‘अस्मिता आणि हिंसाचार’या नावाने   डॉ. सुप्रिया सहस्र्बुद्धे यांनी मराठी अनुवाद केला आहे.) ही दोन्ही पुस्तके पेंग्विन इंडियाच्या यात्रा बुक्सने प्रकाशित केली आहेत. ‘वाद-संवादप्रिय भारतीय’ हे पुस्तक भारतीयत्वाचा समृद्ध वारसा सांगणारे आहे, तर ‘अस्मिता आणि हिंसाचार’मध्ये लोकांच्या संकुचित व क्षुद्र होण्याचे भयानक परिणाम सांगितले आहेत.

अलीकडच्या काळात केवळ महाराष्ट्राला, भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना अस्मितेच्या दिवसेंदिवस उग्र होऊ पाहणा-या समस्येने ग्रासले आहे. या अस्मितेपायी जगभर कशा पद्धतीने हिंसाचार होतो आहे, याचा वेध डॉ. सेन यांनी ‘अस्मिता आणि हिंसाचार’ या पुस्तकात घेतला आहे. या पुस्तकात प्रास्ताविक, प्रस्तावनेसह एकूण नऊ प्रकरणे आहेत. त्यातली पहिली सहा प्रकरणे ही डॉ. सेन यांनी नोव्हेंबर 2001 ते एप्रिल 2002 या काळात बोस्टन विद्यापीठात दिलेली व्याख्याने आहेत. नंतरच्या तीन प्रकरणांत नोव्हेंबर 1998 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या एका व्याख्यानाचा आणि त्यांच्या इतर लेखनाचा समावेश आहे.

डॉ. सेन ‘कल्याणकारी अर्थशास्त्रा’चे पुरस्कत्रे असले तरी ते जागतिकीकरणाचेही पाठीराखे आहेत आणि या दोन्हींचा योग्य समतोल कसा ठेवला जाऊ शकतो, या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकातील ‘पाश्चिमात्य जग आणि त्याला विरोध’ आणि ‘जागतिकीकरण आणि उच्चारस्वातंत्र्य’ हेही अनुक्रमे पाचवे आणि सातवे प्रकरण विशेष वाचनीय आहे. सातव्या प्रकरणात सेन यांनी ‘जागतिकीकरणाला विरोध हा केवळ पाश्चिमात्त्यीकरणाला विरोध’ या टीकेचा यथोचित समाचार घेऊन पाश्चिमात्यीकरणाचा पाया दृढ करण्याचे काम पौर्वात्यांनी’ कसे केले आहे, याची सोदाहरण मांडणी केली आहे. तर पाचव्या प्रकरणात ‘जे जे पाश्चात्त्य ते ते त्याज्य’ या द्वेषाच्या भावनेचेही योग्य पण संयत शब्दांत खंडन केले आहे.

‘संस्कृती आणि केंद्र’ या सहाव्या प्रकरणात संस्कृती हीच मुळी कशी परिवर्तनीय असते याची मांडणी केली आहे. ‘विशिष्ट संस्कृतीत जन्म घेणे हा सांस्कृतिक स्वातंत्र्याचा प्रकार नव्हे हे तर उघड आहे आणि केवळ जन्मामुळे एखाद्या व्यक्तीवर ज्या गोष्टीचा ठसा उमटत असेल, ती गोष्ट टिकवून ठेवणे, हा स्वातंत्र्याचा विनियोग नव्हे,’ हे त्यांचे निरीक्षण त्या दृष्टीने चिंतनीय आहे. सध्याच्या सांस्कृतिक संपर्कातून जगभरातील कुठलीच संस्कृती अस्सल देशी राहणे, कसे अवघड आहे याची मांडणी ‘बहुसंस्कृतिवाद आणि स्वातंत्र्य’ या आठव्या प्रकरणात केली आहे.

जगाविषयीचे विनाकारण असलेले भ्रम आणि इतरांचा द्वेष हीच माणसांची अस्मिता आहे/असते, हे ठरवण्याच्या अट्टाहासातून जगभर कशा प्रकारचा हिंसाचार होतो आहे, याचा वेध इतर प्रकरणांतून घेतला आहे. डॉ. सेन यांच्या मतांशी सर्वच जण सहमत होतील असे नाही, परंतु त्यांच्या तर्कशुद्ध युक्तिवादांचा आणि प्रत्येक प्रश्नाच्या सर्व बाजू समजून घेण्याच्या पद्धतीचा प्रतिवाद करणे मात्र अवघड आहे. त्यांची लेखनशैली अतिशय संयमित वाटत असली तरी ती तितकीच रोखठोकही आहे.

अस्मिता आणि हिंसाचाराचा प्रश्न नेमका काय आहे आणि त्याचे जगभरचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.

आयडेंटिटी अँड व्हायोलन्स - डॉ. अमर्त्य सेन
पेंग्विन इंडिया, दिल्ली
पाने : 240, किंमत : 299 रुपये

1 comment:

  1. सुंदर विवेचन केले पुस्तकाचे
    वाचायला जरूर आवडेल.

    ReplyDelete