Wednesday, July 28, 2010

‘हिंदू’च्या निमित्ताने...


समर्थक आणि विरोधक
सध्या सगळीकडे डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ची जोरदार चर्चा होते आहे. नेमाडपंथी आणि नेमाडेंचे चाहते ही कादंबरी झपाटल्यासारखी वाचत आहेत, तिचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे नेमाडेंचे विरोधक या कादंबरीच्या माध्यमातून नेमाडेंवर शरसंधान करण्याची संधी शोधत आहेत. त्यामुळे ते अगदी सुक्ष्मदर्शकातून पाहावे तसे कादंबरीचे वाचन करत आहेत. मात्र त्यातल्या काहींच्या पदरी निराशा पडत आहे, कारण कादंबरी वाचून संपल्यावर तिला वाईट म्हणणे त्यांना शक्य होत नाहीये. तर तिसरीकडे ज्या वाचकांनी उत्सूकतेपोटी या कादंबरीची आगावू नोंदणी केली होती, ते मात्र आपली प्रत नेमाडय़ांच्या स्वाक्षरीसह मिळण्याची वाट पाहात आहेत. ‘हिंदू’विषयीची उत्सूकता मात्र सर्व थरांपर्यंत पोहचते आहे, ही फार चांगली आणि सुखद घटना म्हणावी लागेल.
पॉप्युलर प्रकाशनाने ‘हिंदू’ची पहिली आवृत्ती २५ हजार प्रतींची छापायची ठरवली होती, असं म्हणतात. पण त्यांच्या अपेक्षेनुसार तर ‘हिंदू’ची नोंदणी झाली नाहीच पण ती पाच हजाराचाही आकडा गाठू शकली नाही अशीही चर्चा आहे. मात्र मराठी साहित्याचा आजवरचा लौकिक आणि परिघ पाहता ही संख्याही काही कमी म्हणता येणार नाही.


नेमाडे आणि भैरप्पा
नेमाडे यांच्या ‘हिंदू’चे प्रकाशनाआधीच एकदा पुनर्मुद्रण करण्यात आले. १८ जुलैला ‘हिंदू’चे प्रकाशन झाले, त्याआधी किमान दोन महिने तिची आगावू नोंदणी चालू होती. प्रकाशनाच्या दिवशीही अनेक जण उत्साहाने ५०० रुपये खर्चून ‘हिंदू’ची प्रत विकत घेत होते. याच सुमारास म्हणजे २८ जुनला कर्नाटकात एस. एल. भैरप्पा यांच्या ‘कवलू’ या नव्या कादंबरीचे प्रकाशन झाले. तिचे प्रकाशनाआधीच दोनदा पुनर्मुद्रण करण्यात आले तर पुढच्या दहा दिवसात पाच वेळा पुनर्मुद्रण करण्यात आले. आतापर्यंत हा आकडा दुप्पट झाला नसला तरी दीडपट नक्कीच झाला असणार. भैरप्पा गेली चाळीस वर्षे कन्नडमधील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार मानले जातात. गेल्या चाळीस वर्षात त्यांनी वीसपेक्षा अधिक कादंब-या लिहिल्या आहेत. म्हणजे दोन वर्षाला एक कादंबरी. इथे नेमाडे आणि भैरप्पा अशी तुलना करायची नाही तर कन्नड वाचक आणि मराटी वाचक अशी तुलना अपेक्षित आहे.


नेमाडेंचे आयकॉनिक छायाचित्र
डॉ. भालचंद्र नेमाडे यांची मी ‘दै. प्रहार’साठी २२ जुनला मुलाखत घेतली. कांदिवलीच्या नेमाडे यांच्या घरी ही मुलाखत झाली. त्यासाठी आमचा दै. ‘प्रहार’चा सिनिअर फोटोग्राफर संदेश घोसाळकरला घेऊन गेलो होतो. नेमाडे यांच्या अभ्यासिकेत मुलाखत सुरू झाली आणि तसा संदेशचा कॅमेराही. मुलाखत जवळपास तासभर झाली. तोवर संदेशचा कॅमेरा चालूच होता. मुलाखत संपल्यावरही तो नेमाडे यांना हात वर करा, इकडे पाहा, तिकडे पाहा, असे उभे राहा, तसे उभे राहा अशा सुचनांबरहुकूम वागायला लावत होता. त्याचा तो बिनधास्त उद्योग पाहून मलाच मनातल्या मनात भीती वाटत होती, याच्या या सुचनांनी नेमाडे वैतागणार तर नाहीत ना. पण नेमाडे सर त्यांच्या झुपकेदार मिशांमुळे (आणि त्यांच्या तिखट बोलण्यामुळेही) उग्र आणि रागीट वाटत असले तरी प्रत्यक्षात ते फारच साधे आणि प्रेमळ असल्याचा प्रत्यय आला.
असो. मुलाखत सुरू असताना नेमाडे यांचा बोलण्याचा ओघात संदेशने टिपलेला आणि आम्हा सर्वाना आवडलेला फोटो दै. ‘प्रहार’च्या ‘कोलाज’ (२७ जुन) पुरवणीच्या पहिल्या पानावर मुलाखतीसह छापला. या मुलाखतीची बरीच चर्चा झाली. अनेकांना आवडली. तसे फोन, एसएमएसही मला आले. विशेष म्हणजे नेमाडेंनाही आवडली.


पुढे १८ जुलैला ‘हिंदू’च्या प्रकाशनासाठी साडेचार वाजता मी रवीन्द्र नाटय़ मंदिरात गेलो, तर व्यासपीठावर संदेशने काढलेला आणि आम्ही ‘प्रहार’मध्ये छापलेला फोटो मोठय़ा आकारात बॅनरवर झळकत होता. दुस-या दिवशी या कार्यक्रमाची बातमी दै. ‘लोकमत’ने पहिल्या पानावर छापली. त्यासोबत जो फोटो छापला त्यात खुर्चीत बसलेले नेमाडे आणि त्यांच्या पाठीमागे हाच फोटो बॅनरवर झळकत होता. त्यानंतर समीक्षक शांता गोखले यांनी २२ जुलै रोजी ‘मुंबई मिरर’मध्ये ‘हिंदूज अँड हराप्पा’ हा लेख लिहिला. त्यातही हाच फोटो छापण्यात आला. संदेशच्या नावात थोडीशी चूक झाली पण त्याला क्रेडिट दिले गेले, पण त्यासाठीची पूर्वकल्पना मात्र संदेश आणि ‘प्रहार’ला देण्यात आली नव्हती. हे समजल्यावर स्वत: शांताबाईंनी दिलगिरी व्यक्त केली. प्रश्न तसा छोटाच होता. पण त्यातही शांताबरईनी स्वत: लक्ष घातले, हा त्यांचा मोठेपणा. असो.
तर सांगायचं असं की, नेमाडे यांचा संदेशने काढलेला हा फोटो असा आयकॉनिक होत चालला आहे.


सध्या मीही ‘हिंदू’ वाचतोय. आतापर्यंत शंभरेक पानं वाचली आहेत. लवकरच स्पीड वाढवून ती संपवण्याचा विचार आहे. तेव्हा तिच्यावर सविस्तर लिहिनच. तुर्तास एवढेच.

No comments:

Post a Comment