Monday, November 1, 2010

पाहता लोचनी...


सकाळी सात वाजता दिल्लीच्या निजामुद्दिन स्टेशनवरून ‘ताज एक्सप्रेस’नं निघालो, तेव्हा मनात दोन पुस्तकं तरळत होती. पहिलं होतं, पत्रकार मा. पं. शिखरे यांचं ‘स्मृतीची चाळता पाने’ आणि दुसरं होतं वास्तुरचनाकार- ललितलेखक माधव आचवल यांचं ‘किमया’. शिखरे यांनी कलावंत, संवेदनाक्षम साहित्यिक, विचारवंत आल्डस हक्सले आणि थोर कांदबरीकार सॉमरसेट मॉम यांच्या ताजमहालाविषयीच्या मतांचा ऊहापोह केला आहे. हक्सले यांनी ताजमहाल पाहून झालेल्या निराशेचं आणि सौंदर्यशास्त्राच्या व शिल्पशास्त्राच्या दृष्टीनं ताजमहाल ही एक अगदी निकृष्ट प्रतीची कृती आहे असं म्हटलं आहे तर सॉमरसेट मॉम यांनी ताजमहालाच्या सौंदर्यानं भारावून जाऊन ‘माझं अंत:करण एका विचित्र आणि सुखकारक भावनेनं भरून ते विस्तारल्यासारखं वाटू लागलं. आश्चर्य, आनंद आणि मला वाटतं मुक्ततेचीही जाणीव मला झाली. मी नुकतंच सांख्य तत्त्वज्ञान वाचलं होतं; त्यात संपूर्ण मुक्तीच्याच प्रकाराची तात्पुरती मुक्ती म्हणजे कलानंद असं म्हटलं आहे. कदाचित माझ्या प्रत्यक्ष भावनांत या वचनाची आठवण मी अभावितपणे मिसळू दिली असावी,’ असं म्हटलं आहे.
माधव आचवल यांनी ‘किमया’मध्ये ताजमहाल नेमका कसा पाहावा, कधी पाहावा, कुठल्या कुठल्या वेळी आणि प्रत्येक प्रहरानंतर ताजमहालाची रूपं कशी बदलत जातात, याचं अतिशय ललितरम्य वर्णन केलं आहे. आग्रा स्टेशनवरून सायकल रिक्षानं ताजमहालाच्या दिशेनं निघालो खरा; पण हक्सले, मॉम आणि आचवल पाठ सोडायला तयार नव्हते. आणि तिघांपैकी कुणाला फॉलो करावं याचाही निवाडा होत नव्हता.
सकाळची साडेदहा-अकराला ताजमहालाशी लोकांच्या गर्दीसह पोचलो, तेव्हा विरळ धुक्यानं गुरफटलेला ताजमहाल सिंहासनावर बसल्यासारखा वाटत होता. तो जसजसा जवळ येत गेला तसातसा त्याचा भव्यपणा जाणवू लागला, खरं म्हणजे अंगावर येऊ लागला. जनप्रवाहाबरोबर आत गेलो, तर अनेक लोक मुमताजच्या कबरीला सलाम/नमस्कार करत होते. पण आतमध्ये काहीच पाहण्यासारखं नव्हतं. मग बाहेर पडलो, तर कमानी आणि घुमटांची परस्परपूरक रचना आणि त्यांच्यातली एकरूप लय जाणवायला लागली. एकाच पांढ-या शुभ्र संगमरवराच्या प्रती काढून वापरल्या असाव्यात असा कमालीचा एकसारखेपणा!
मग वेगवेगळ्या कोनातून आणि वेगवेगळ्या बाजूंनी ताजमहाल कसा दिसतो हेही पडताळून बघावंसं वाटू लागलं. पण सगळीकडे माणसं आणि त्यांचा कलकलाट. निरव शांततेची सोय नव्हती. मग वाटलं, हा कातरवेळी कसा दिसत असेल? आणि पावसाळ्यात? रिमझिमत्या पावसात याचं रूप कसं दिसत असेल? आणि पौणिमेच्या रात्री बारा वाजता? हिवाळ्यात ताजमहालाचं रूप गर्भवती स्त्रीसारखं सोज्वळ आणि सुंदर दिसत असेल की लेकुरवाळीसारखं तृप्त? यमुनेच्या पैलतीरावरून हा कसा दिसत असेल?
मध्येच एका बाकडय़ावर बसून डावा डोळा झाकून उजव्या डोळ्यानं त्याला पाहू लागलो मग उजवा झाकून डाव्यानं. नंतर डोन्ही डोळे किलकिले करून. पण लेकाचा सर्व कोनातून सारखाच दिसत होता. मग खालच्या गवतावर पसरून त्याच्याकडे पाहू लागलो. आता त्याच्या मागचं निळं आकाश घन वाटू लागलं आणि ताजमहाल हलका हलका! परिसरात एवढी गर्दी आणि सुरक्षारक्षक की आचवलांच्या सुचनेबरहुकूम मधल्या तळ्यात पाय सोडून बसण्याची शक्यता दुरापास्त होती. आजूबाजूचं कोण फोटो काढतंय, तर कोण निवांत जागा बघून दशम्या सोडतंय, कोण गप्पा छाटतंय पण कुणीच ताजमहालाबद्दल बोलताना कानावर येत नव्हतं. मग स्वत:चंच हसू आलं. पण मग भव्यदिव्य कलाकृतीचा सौंदर्यबोध तो काय?
मग वाटलं की, ताजमहालाची खरी गंमत त्याच्या आजूबाजूला आहे. बाजूच्या चारी कमानींनी ताजमहालाला तोलून धरल्यासारखे वाटत होतं आणि डावी-उजवीकडच्या दोन इमारतींनी सावरल्यासारखं! प्रवेशदारातून होणाऱ्या त्याच्या दूरस्थ दर्शनात गंमत आहे, तशी बाजूच्या बागेतल्या झाडांच्या फांद्यांआडच्या त्याच्या क्षणिक दर्शनातही. समोरच्या तळ्यात आहे, तशी मागच्या यमुनेच्या प्रवाहातही. या साऱ्यांसह ताजमहाल आहे. तेव्हा ताजमहाल पाहायच्या तो या सर्वासह. पण तसा तो पाहता येत नाही. म्हणजे नजरेच्या टप्प्यात मावत नाही. म्हणून त्याची तुकडय़ातुकडय़ातून अनुभूती घ्यावी लागते. मग त्या तुकडय़ांचा मनातल्या मनात ‘कॅलिडोस्कोप’ जोडून पाहावा लागतो.
चार साडेचार तास ताजमहाल सर्व बाजूंनी पाहूनही वाटत होतं, इथून बाकी साऱ्यांनी निघून जावं अन् आपण एकटंच उरावं. मग खरं काय ते समजेल. पण ते शक्य नव्हतं. म्हणून शेवटी बाहेर पडलो.
ताजमहालाच्या आवारात तो शहाजहाननं कधी बांधला याचा फलक आहे, पण या बांधकामासाठी किती मजूर किती वर्षे खपले, कमानी आणि घुमटांचा एकेक दगड घडवण्यासाठी त्यांना किती दिवस लागले, त्याबदल्यात शहाजहाननं त्यांना किती मजुरी दिली? याचा कुठेही निर्देश नाही. ताजमहाल भव्यदिव्य असेलही पण शहाजहान आदर्श राजा होता का? मग त्यानं एवढा खर्च प्रजेसाठी न करता बायकोच्या स्मारकासाठी का केला? मुमताज आधीच मरून गेल्यानं तिला याचा काहीच उपयोग नव्हता आणि त्यावेळच्या प्रजेलाही. केवळ आपलं नाव नंतरच्या लोकांच्या आठवणीत राहावं म्हणून कुठलाही शहाणा माणूस एवढा टोकाच अट्टाहास करेल का? ती शहाजहानसारख्या पराकोटीच्या चक्रम माणसांचीच कामं!
त्यामुळे ‘एक आमीर बादशहाने दौलत का सहारा लेकर हम गरिबों के मोहब्बत का उडमया है मज़ाक’ म्हणणारे साहिर लुधियानवीसारखे कवीलोक भाबडे वाटू लागले आणि ताजमहालाला भव्यदिव्य कलाकृती म्हणून सर्टिफिकेट देणारे वाह्यात वाटू लागले. ताजमहाल पाहताना भारावलेपण चालत नाही, अभावितपणा कामाला येत नाही, त्याचा कैवारही घेता येत नाही अन् तिरस्कारही करता येत नाही. ताजमहाल पाहताना अशी साऱ्याच बाजूंनी अडचण होते. त्यामुळे ताजमहाल पाहून अगदीच निराशा झाली नसली तरी उदास मात्र जरूर वाटलं.

2 comments:

  1. त्यामुळे ताजमहाल पाहून अगदीच निराशा झाली नसली तरी उदास मात्र जरूर वाटलं.....मार्मिक..तरल..मन:स्थिती चिमटीत पकडनारे...

    ReplyDelete
  2. ताजमहाल सफेद संगमरवर दगडात आहे. दगड स्वतः प्रकाश परवर्तीत करतो बंधनीत त्याच्या छटा समावलेल्या आहेत. ताजमहाल पाहाताना पुर्व अनुमान न बांधाता निव्वळ अनुमानाने पाहावा. इतिहास शोधताना गल्लत नेहमी होते. भूगोल पाहाताना आपण मनुष्य असल्याची जाणीव राखावी. भूमिती पाहाताना सर्वासमावेशक विषयांची ओळख ठेवावी. प्रदर्शक आपल्या विचारांना सौंदर्य बहाल करून प्रदर्शन करतो. समाज अनेक विचारांचे मंथन करून इतिहास लिहितो. ताजमहाल एक सौंदर्य निर्मिती आहे जी निर्माण होताना अन्नेक वर्ष लागली एका मुघल बादशहाने निर्माण केला आहे. प्रेम हा आत्मा त्यात आहे. तो यमुना किनारी आहे. हिंदुस्तानात आहे. प्रेमतत्वावर आधारित आहे. तो धर्मद्वेषापासून वेगळा झाला आहे. सर्व मानवजात त्याकडे सांकेतिक चिन्ह म्हणून पहात आहे. त्याची किर्ती जगभर पसरली आहे. त्याचा अवकाश निराळा आहे. तो संगमरवर दगडासारखा आहे. वेगवेगळ्या छटानी भरला आहे. तो वेगळ्या मोसमात वेगळा रंग भरतो. त्या सगळ्या छटाना पाहायला जो काळ लागतो तो दर्शकाकडे कमी असतो. म्हणून दर्शक उदास होतो. प्रेमात मन कधीही भरत नाही. मन फक्त रमत राहते. प्रेम मथुरेत आहे, प्रेम आग्रा येथे आहे. सर्व उत्तर भारत वेगवेगळ्या कारणाने अंतरविरोधाच्या उदाहरणांनी ओतप्रोत भरला आहे. इतिहास, प्रागैतिहास, प्राचीन ते आदी काळापासून प्रेम प्रकरणांनी बहरत राहिला आहे. अगदी ययाती-देवयानी ते बाजीराव-मस्तनी पर्यंत म्हणून आपण ती जागा सोडताना उदास होत राहतो. इतिहास माहिती देतो. पुस्तके लेखकाचे मनोगत सांगतात. दर्शक म्हणून आपण काय पाहु इच्च्छितो एवढे फक्त समायोचीत असते

    ReplyDelete