Wednesday, March 30, 2011

बाल, किशोर, युवक आणि ‘कलाभारती’


नुकतेच दिल्लीच्या ‘ललित कला अकादमी’ने 567 आणि 580 पानांचे दोन चित्रकलाविषयक लेखनाचे दोन खंड ‘कलाभारती’ या नावाने प्रकाशित केले आहेत. या दोन्ही खंडांमध्ये नवं लेखन फारसं नाही, तर इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांमधील पूर्वप्रकाशित लेखनाचाच समावेश आहे. या लेखनाचा आवाका तसा बराच मोठा आहे असं संपादक पीयूष दईया यांचं म्हणणं आहे.
अमूर्त चित्रकलेची भारतीय परंपरा, प्रवास, समज-गैरसमज यापासून भरताचा रससिद्धांत, गांधीजींची सौंदर्यदृष्टी, भारतीय कलेचा प्रवास, भारतीय चित्रकलेतील प्रवाह इथपर्यंत अनेकविध विषयांचा यात समावेश आहे. भारतातले आघाडीचे चित्रकार व्ही. एस. गायतोंडे, एम. एफ. हुसेन, एस. वासुदेव, अंबादास, जे. स्वामीनाथन, कृष्ण खन्ना, मनजीत बावा, गुलमा मोहम्मद शेख, गणेश हलोई, रविशंकर रावल, भूपेन खक्कर, ए. रामचंद्रन, तय्यब मेहता यांच्याविषयी लेख आहेत.


‘कलाभारती’च्या पहिल्या खंडात एकंदर 64 लेख आहेत. त्यातले सर्वात जास्त म्हणजे तब्बल बारा लेख व्ही. एस. गायतोंडे यांच्याबद्दल आहेत. त्यात गायतोंडे यांचा स्वत:चा एक लेख, त्यांच्या अव्यक्ता दास, ए. आय. क्लार्क व एस. व्ही. वासुदेव यांनी घेतलेल्या तीन मुलाखती आणि नितीन दादरावाला, ज्ञानेश्वर नाडकर्णी, सुधाकर यादव, नरेंद्र डेंगळे, किशोरी दास, विश्वास यंदे, मनोहर म्हात्रे, प्रफुल्ला डहाणुकर यांचे लेख अशी तब्बल 166 पाने गायतोंडे यांच्यावर खर्च केली आहेत. त्यानंतर तय्यब मेहता यांच्याविषयी पाच लेख, भास्कर कुलकर्णी यांच्याविषयी पाच लेख, गांधीजींच्या सौंदर्यदृष्टीविषयी पाच लेख, भूपेन खक्कर यांच्याविषयी चार लेख आणि गणेश हलोइ यांच्याबद्दल तीन लेख असा उतरता क्रम आहे. याशिवाय वसंत सरवटे, भगवान रामपुरे, विजय कुलकर्णी, एम. एफ. हुसेन, मोहन सामंत, नसरीन मोहमदी, मनजीत बावा, प्रभाकर कोलते यांच्याविषयी प्रत्येकी एका लेखाचा समावेश आहे. या खंडातली थोडी सखेद आश्चर्याची बाब म्हणजे चित्रकार अखिलेश यांच्याबद्दलही पाच लेख आहेत. आधीच्या नामवंतांच्या यादीत संपादक पीयूष दईया यांनी अखिलेश यांचाही समावेश केला आहे. तो तेही या प्रतिभावंतांच्याच मांदियाळीतले आहेत म्हणून की केवळ संपादकांचे मित्र आहेत म्हणून हे कळायला मार्ग नाही.


दुस-या खंडामध्ये सुधीर पटवर्धन यांच्याविषयी सात लेख आहेत. त्यातील पहिला लेख पटवर्धन यांनी स्वत: लिहिलेला आहे. निशिकांत ठकार यांनी पटवर्धनांची घेतलेली मुलाखत आहे तर पद्माकर कुलकर्णी, के. बिक्रमसिंह, वसंत आबाजी हडाके, जितिश कल्लाट आणि रणजित होस्काटे यांच्या लेखांचा समावेश आहे. 580 पानांच्या या खंडातील 82 पाने सुधीर पटवर्धन यांच्यासाठी दिलेली आहेत तर ‘इन्स्टॉलेशन’ या कलाप्रकारासाठी तब्बल 102 पाने दिली आहेत. त्यात एकंदर सत्तावीस लेखांचा समावेश आहे. दिलीप रानडे, विवान सुंदरम, अतुल भल्ला, शमशाद हुसेन, शिवजी पणिक्कर, आतिया अमजद, अनिरुद्ध चारी या मान्यवरांनी इन्स्टॉलेशनविषयी लिहिले आहे. याशिवाय या खंडात प्रभाकर बर्वे, माधव आचवल, द. ग. गोडसे, संभाजी कदम, बाबूराव सडवेलकर, सुहास बहुळकर, अमृता शेरगिल, व्यामेश शुक्ल, शमशेर बहादुर सिंह, जामिनी रॉय, जोगेन चौधरी, रवीन्द्रनाथ टागोर यांचेही कला-कलासमीक्षेविषयी लेख आहेत.


‘कलाभारती’चा दुसरा खंड इन्स्टॉलेशनविषयी असल्याने या पुढच्या काळात या कलेला महत्त्व येणार आहे वा ही कला महत्त्वाची ठरू शकते असे संपादकांना यातून सुचवायचे आहे का? पण मग अमूर्त चित्रकलेचे काय? तिचा प्रवास कसा होईल? एकंदर भारतीय चित्रकला सध्या ज्या टप्प्यावर आहे, तिचा या पुढचा प्रवास कसा राहील याविषयी या दोन्ही खंडांमध्ये लेखन नाही. काही महत्त्वाचे चित्रकार, त्यांचा चित्रकलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि कलासमीक्षकांच्या नजरेतून या चित्रकारांची चित्रे असे या दोन्ही खंडांचे स्थूलस्वरूप आहे.


‘ललित कला अकादमी’चा हा दोन खंडी दस्तावेज महत्त्वाची यासाठी आहे की, यामुळे इंग्रजी, हिंदी, मराठी अशा भाषेतील वेगवेगळी पुस्तकं, मोनोग्राफ, नियतकालिकं, कॅटलॉग यामध्ये विखुरलेले हे लेखन इथं एकत्रितपणे वाचायला मिळते. त्यामुळे भारतीय चित्रकलेचा इतिहास समजून घ्यायला मदत होऊ शकते. भारतीय चित्रकलेतील कळीच्या ते समकालीन चित्रकलेच्या निकडीच्या प्रश्नांपर्यंतची चर्चा या दोन खंडांमधून वाचायला मिळते. आणखी एक म्हणजे कलेविषयी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये कुठल्या प्रकारचे आणि काय प्रतीचे लेखन झाले आहे, होत आहे, हेही या खंडांमधून जाणून घ्यायला मदत होते.


मराठीमध्ये चित्रकला वा कलासमीक्षेविषयी गंभीरच काय पण प्राथमिक पातळीवरच्या पुस्तकांचीही वाणवा आहे. इंग्रजीमध्ये मात्र या दोन्हींवरच्या पुस्तकांची भरमार आहे, तर हिंदीमध्ये भाषिक उलटापलटीच्या कसरतीमध्ये केवळ गंभीरपणाचा देखावा करणारे लेखन जोरावर आहे. या दिखावेगिरीचा नमुना म्हणूनही ‘कलाभारती’च्या या दोन खंडांकडे पाहता येईल.


मराठीमध्ये शालेय अभ्यासक्रमात मराठीच्या पाठय़पुस्तकांची ‘बालभारती’, ‘किशोरभारती’ आणि ‘युवकभारती’ अशी चढती श्रेणी असते. कलाविषयक लेखनातला ‘ललित कला अकादमी’चा हा प्रयत्न या तिन्हींचा एकत्रित अवतार आहे. याचा अर्थ असा की, भारतीय चित्रकलेची आस्वादक समीक्षा आणि कलामीमांसा अजून पुरेशी प्रौढ व्हायला तयार नाही. पण कुठल्याही पुस्तकाचा हेतू इतका सामान्य कधीच नसतो. निदान नसावा. पुस्तक वाचताना लेखकाशी असलेले मतभेद शोधले पाहिजेत, असे एका पाश्चात्य लेखकाने म्हटले आहे. ‘कलाभारती’च्या दोन्ही खंडांतले लेखन त्या प्रतवारीचे नसल्याने तो प्रकार इथे संभवत नाही. यात कला म्हणजे काय, कलेकडे कसे पाहावे, कलाआस्वाद, आणि कलासमीक्षकांची मते यांचाच परिचय घडतो. त्यापलीकडे जाऊन गंभीरपणे कलेची चर्चा यात आढळत नाही. किंवा सामान्य वाचकांची अभिरूची समृद्ध होईल अशी मांडणीही फारशी नाही. पण तरीही ‘कलाभारती’मध्ये बाल, किशोर आणि युवक या तीन अवस्थांमधल्या भारतीय कलेची चर्चा आपापल्या मगदुरानुसार चित्रकार आणि कलासमीक्षकांनी केली आहे. ती निदान समजून घेणे महत्त्वाचे आहे. कलाभारती : खंड 1 व 2, संपादक : पीयूष दईया ललित कला अकादमी, दिल्ली किंमत : प्रत्येकी 750 रुपये , पाने : खंड पहिला 567, खंड दुसरा 580 (पुस्तके मिळण्याचे ठिकाण-पिपल्स बुक हाऊस, मुंबई. दूर. 022-22873768)

No comments:

Post a Comment