Monday, May 30, 2011

तुकड्यातुकड्यांतला `बापमाणूस'विजय तेंडुलकरांच्या निधनाला पुढील महिन्यात तीन वर्षे पूर्ण होतील. आतापर्यंत तेंडुलकरांविषयी पाच-सहा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यात खुद्द त्यांच्याच ‘तें दिवस’ या अपूर्ण आत्मचरित्राचाही समावेश आहे. ही सर्वच पुस्तकं ममत्वानं आणि आपुलकीनं लिहिलेली आहेत. त्यामुळे ती केवळ आठवणी आणि अनुभवपर आहेत. त्यात तेंडुलकरांच्या नाटकांचं आणि तेंडुलकर एक लेखक म्हणून कुठल्याही प्रकारचं विश्लेषण नाही. मराठी नाटय़ परिषदेनं वा एखाद्या साहित्य संस्थेनं तेंडुलकरांचा गौरवग्रंथ अजून प्रकाशित केला नाही, याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत. कारण सध्या ग्रौरवग्रंथ नामक गोष्टीचं जे अजागळ खूळ मराठीत आहे, त्यात तेंडुलकरांचा समावेश करायचं धाडस कुणी करू शकलेलं नाही. हा बहुतेक तेंडुलकरांच्या वचकाचाच प्रभाव असावा!
‘बापमाणूस’ या निखिल वागळे संपादित पुस्तकाचं वर्णन ‘विजय तेंडुलकर नावाच्या माणसाचं आणि लेखकाचं देणं फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे,’ असं त्यांनी स्वत:च केलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात वागळे आणि मेघना पेठे यांनी ‘तेंडुलकर आमचे बाप आहेत’ असं म्हटलं होतं. या पुस्तकातल्या मेघना पेठे यांच्या लेखाचे नावही ‘माझा ‘मानद’ बाप’ असं आहे. त्यावरून या संग्रहाला तेच नाव दिलं असावं.
यात दिलीप प्रभावळकर, सदाशिव अमरापूरकर, दत्तप्रसाद दाभोळकर, जयंत पवार, राजू परुळेकर, युवराज मोहिते, कमलाकर नाडकर्णी, मेधा कुलकर्णी, हेमंत कर्णिक, रणधीर शिंदे यांचे लेख आणि वागळे यांनी घेतलेल्या तेंडुलकर-लागू यांच्या एकत्रित मुलाखतीचा समावेश आहे. यातल्या पहिल्या जवळपास अध्र्या लेखांचं स्वरूप अनुभव-आठवणीपर आहे. तर नंतर तेंडुलकरांची नाटकं, ललित लेखन आणि कथा यांच्याविषयी प्रत्येकी एक लेख आहे.
मेघना पेठे म्हणतात, ‘समाजाशी नाळेचं नातं असलेला आणि समाजमनाच्या नाडीचे ठोके नेमके मोजता येणारा हा लेखक..’ पेठेंचा हा लेखही उत्तम म्हणावं असं व्यक्तिचित्र आहे. दत्तप्रसाद दाभोलकर यांचा तब्बल 42 पानी लेख ‘पत्रांतून’ तेंडुलकरांचे काही मनस्वी पैलू उलगडून दाखवतो. बाकीच्या लेखांतूनही असाच एखाद-दुसरा पैलू पुढे येतो.
कमलाकर नाडकर्णी यांनी तेंडुलकरांच्या ‘चिमणीचं घर होतं मेणाचं’, ‘झाला अनंत हनुमंत’, ‘भाऊ मुरारराव’ या काही बिनगाजलेल्या नाटकांविषयी लिहिलं आहे. तेंडुलकरांची ‘घाशीराम कोतवाल’, ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’, ‘सखाराम बाइंडर’ ‘कमला’ आणि ‘बेबी’ ही पाच गाजलेली आणि खळबळजनक नाटकं. पण त्यांच्याविषयी न लिहिता नाडकर्णीनी या नाटकांवर लिहिलं आहे. हा स्तुत्य प्रयत्न आहे. पण हेमंत कर्णिक यांचा ‘कादंबरी-एक’ आणि ‘कादंबरी-दोन’ याविषयीचा आणि रणधीर शिंदे यांचा कथेविषयीचा लेख म्हणजे तेंडुलकरांचे लेखनातले नेमके योगदान काय हे न समजल्याचे पुरावे आहेत. रणधीर शिंदे यांच्या लेखाची सुरुवातच मुळी ‘गेल्या अर्धशतकातील मराठीतील एक श्रेष्ठ लेखक म्हणून विजय तेंडुलकरांना आपण ओळखतो,’ या पठडीबाज वाक्यानं होते. या लेखात मराठी समीक्षेची परिभाषा एवढी आहे की, त्यापेक्षा प्रत्यक्ष कथा वाचलेल्या बऱ्या असं वाटतं. मेधा कुलकर्णी यांचा लेख या पुस्तकात घेतला नसता तरी चाललं असतं, असं वाटतं.
तेंडुलकरांचं एक प्रसिद्ध वाक्य होतं, ‘प्रत्येक माणूस तुकडय़ा तुकडय़ांनी लहान किंवा मोठा असतो.’ या पुस्तकातूनही तेंडुलकरांच्या बापपणाचे काहीच तुकडे हाती लागतात. त्यामुळे किमान वाचनीय या पलीकडे पुस्तकाची कक्षा रूंदावत नाही. त्याचं कारण बहुधा हे सर्वच लेख पूर्वप्रकाशित आहेत. त्यातून एक सलगपणाचं पुरेसं समाधान मिळत नाही.
बापमाणूस - संपादक - निखिल वागळे
अक्षर प्रकाशन, मुंबई
पाने : 174, किंमत- 250 रुपये

No comments:

Post a Comment