Monday, June 20, 2011

प्रखर आणि परखड
कुमार केतकर यांना आवडलेला प्रहार मधील अग्रलेख। त्यांचा SMS असा होता - Special congrats for a prompt and very good edit on Kamal Desai.- Kumar Ketkar
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

कमल देसाई यांच्या निधनाची फार मोठय़ा प्रमाणावर दखल घेतली जाण्याची शक्यता नाही आणि मराठी साहित्यविश्वातूनही फारशी हळहळ व्यक्त होणार नाही. कमलताई काही लोकप्रिय लेखिका नव्हत्या. दुसरी गोष्ट, कमलताईंच्या लिखित पुस्तकांची संख्या जेमतेम पाच आहे. दोन कथासंग्रह आणि तीन कादंब-या. त्यामुळे केवळ सतत लिहिणा-यांचेच वाचणा-यांच्या जगात कमलताईंसारखी प्रयोगशील, अस्तित्ववादी लेखिका मौजूद असणे हेच मुळी काहीसे अस्वाभाविक होते. तिसरे म्हणजे ‘काळा सूर्य’ आणि ‘हॅट घालणारी बाई’सारख्या आधुनिक संज्ञा-प्रवाहांना कवेत घेणा-या कादंब-या समजू शकणारा वाचकवर्ग मराठीत फार मोठय़ा प्रमाणात कधीही नव्हता आणि आजही नाही. मराठी वाचकवर्ग आजही प्राथमिक अवस्थेत आहे. त्याचे ऐतिहासिकतेविषयीचे आंधळे प्रेम आणि स्मरणरंजनवादी मानसिकता यांत कमलताईंसारखी प्रखर आधुनिक, बंडखोर आणि तरीही केवळ स्त्रीवादी नसणारी लेखिका बसू शकत नाही. 1962 साली पहिल्यांदा कमलताईंचा ‘रंग-1’ हा कथासंग्रह आला. निर्मिती, शोध आणि खेळ या प्रेरणा त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येतात. ‘रंग 1’ आणि 2 हे कथासंग्रह काय किंवा ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ काय ही कादंबरी काय- कमलताई साध्या गोष्टींपासून बोलायला सुरुवात करतात. मात्र बोलता बोलता खोल गंभीर तत्त्वचिंतनाकडे वाचकाला खेचून नेतात. हे सर्व त्या एवढय़ा अभावितपणे करतात की, वाचणा-याच्या ते त्या वेळी लक्षात येत नाही. त्यामुळे तो गाफील राहतो. कमलताई अचानक त्याला तत्त्वविचाराच्या चक्रव्यूहात उभा करतात, तेव्हा तो भांबावून जातो. त्याचा थेट अभिमन्यू होतो. म्हणूनच पहिली पाच-सहा वर्षे मराठी समीक्षकांना कमलताईंच्या लेखनाचा अदमासच आला नाही. हे साहित्य आहे का, असा प्रश्न त्यांना पडला. मात्र, मराठी साहित्यातील साडेतीन टक्क्यांच्या विरोधात उभे ठाकणा-या लघुनियतकालिकांच्या संपादक-लेखकांनी कमलताईंचे श्रेष्ठत्व मान्य केले. त्यामुळे विरोधाची धार काहीशी बोथट होत गेली, पण कमलताई सदाशिवपेठी साहित्याच्या शत्रू ठरल्या आणि अल्पसंख्य झाल्या. त्यांच्या कथा-कादंब-यांच्या नायिका स्त्रिया आहेत म्हणून त्यांना स्त्रीवादी लेबल लावणे धाष्टर्य़ाचे होईल. त्यांच्या लेखनात स्त्रीवादी प्रेरणा प्रखर असली तरी एक व्यक्ती म्हणून स्वत:ला प्रस्थापित करणे, ही त्यांची मुख्य प्रेरणा होती. नैतिकता आणि मानवी मूल्य याविषयीची त्यांची भूमिका अतिशय ठाम होती; ती प्रत्यक्ष जगण्यात आणि लेखनातही. मात्र पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्वत:ची मूल्यव्यवस्था प्रस्थापित करू पाहणा-या कुणालाही सहजासहजी मान्यता मिळणे अवघड असते. कमलताईंच्या बाबतीत तेच झाले. पण त्याची त्यांना कधी खंत वाटली नाही. त्यांना जे वाटत होते आणि ज्या पद्धतीने त्या जगत होत्या, तशाच पद्धतीने त्या लिहीत राहिल्या. त्यांना जगण्याबद्दल अपार कुतूहल होते. साहित्य, तत्त्वज्ञान, संगीत, चित्रकला, चित्रपट, जाहिरातकला अशा अनेक विषयांमध्ये त्या रस घेत. म्हणूनच वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्या ‘एक कप च्या’ या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका केली होती. मुख्य म्हणजे पुरुषप्रधान व्यवस्था मोडीत काढण्याएवढे बळ आपल्याकडे नाही, पण आपण त्या विरोधात ठाम उभे राहू शकतो, इतरांना उभे राहण्याची प्रेरणा देऊ शकतो याचे भान त्यांना होते. त्यासाठी त्यांनी पर्याय निवडला तो ललित साहित्याचा. त्यामुळे प्रयोगशीलता आणि मिथके यांच्या पातळी-वरूनच त्या लिहीत राहिल्या. ‘काळा सूर्य’ आणि ‘हॅट घालणारी बाई’ या कादंब-या मराठीत मैलाचा दगड आहेत की नाहीत यावर वाद होतील, पण त्या अत्यंत प्रयोगशील कादंबऱ्या आहेत, यावर मात्र सर्वाचेच एकमत होईल. मळलेल्या वाटा नाकारत नव्या वाटा धुंडाळणा-यांच्या नशिबी मानसन्मान, प्रसिद्धी आणि मान्यता येणे कठीण असते. ‘शंभर लोक ज्या रस्त्याने चालले आहेत, त्याच रस्त्याने आपणही जाणे; म्हणजे आपण योग्य मार्गाने जात आहोत असे नाही’, असे बायबलमध्ये एक वचन आहे. कमलताईंना ‘योग्य मार्ग’ कुठला याचे अतिशय सम्यक भान होते.

2 comments:

  1. कमल देसाई यांच्यावर लिहिलेला लेख मनापासून आवडला.मळलेल्या पायवाटा स्वताहून नाकारणे यासाठी मोठे धेर्य लागते.त्यांचे लिखाण ही तसेच..मुलभूत गोष्टींकडे वेगळ्या नजरेने पहायला लावणारे.लेख सुंदर लिहिलाय.

    ReplyDelete