Sunday, February 5, 2012

साहित्य संमेलन आणि डिकन्सची द्विजन्मशताब्दी

काल 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली, तर उद्या चार्ल्स डिकन्स या इंग्रजीतील अभिजात कादंबरीकाराच्या द्विजन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल.
 
या दोन्ही घटना परस्परांहून भिन्न आणि एकमेकांशी तुलना करता न येणाऱ्या. पण यानिमित्ताने दोन गोष्टींची विशेष दखल घ्यायला हवी. एक, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांचे प्रदीर्घ भाषण, तर दोन, ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांनी चार्ल्स डिकन्सवर ‘साधना’ (11 फेब्रु.)मध्ये लिहिलेला जवळपास तेवढाच प्रदीर्घ लेख. डहाके यांचे भाषण अ4 डेमी आकारातील 48 पानांचे आहे, तर तळवळकरांचा लेख साप्ताहिकाची 20 पाने एवढा आहे. तो अ4 डेमी आकारात 40 पानांचा होईल. तळवलकरांच्या लेखामधील एकंदर शब्दसंख्या आहे, सुमारे साडेआठ ते नऊ हजार, तर डहाके यांच्या लेखातील एकंदर शब्दसंख्या आहे, जवळपास अकरा हजार. साहित्य संमेलनाला 134 वर्षाची परंपरा आहे, तर डिकन्सच्या निधनाला 141 वर्षे होऊनही तो कादंब-याच्या रूपाने जिवंत आहे.
 
तळवलकर-डहाके तुलना इथे अभिप्रेत नाही. पण तळवलकरांनी मराठी वाचकांना इंग्रजी भाषेतली पुस्तके आणि इंग्रजी लेखक यांच्याकडे वळवले, तर डहाके यांचे वर्णन काही मराठी समीक्षक ‘अस्वस्थ शतकाचा कवी’ असे करतात, हे आवर्जून नमूद करायला हवे.
 
तळवलकर यांनी आपल्या या प्रदीर्घ लेखातून  डिकन्सचे व्यक्तिमत्त्व, विचार, साहित्य आणि त्याचा सामाजिक प्रभाव यांचा परामर्श घेताना डिकन्स प्रत्यक्ष जगला, वावरला तो काळच जिवंत केला आहे. या लेखात डोस्टोव्हस्की, जॉर्ज ऑर्वेल, ए. एम. फोर्स्टर, जॉर्ज बनार्ड शॉ, चेस्टर्टन अशा जागतिक कीर्तीच्या अनेक लेखकांचे संदर्भ आहेत. त्यांच्या डिकन्सविषयीच्या मतांचा ऊहापोह आहे.
 
डिकन्सने एकंदर सोळा कादंब-या लिहिल्या. ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’, ‘पिकविक पेपर्स’, ‘अ टेल ऑफ टू सिटीज’, ‘अवर म्युच्युअल फ्रेंड’, द ख्रिसमस बुक’ या त्यातील काही प्रसिद्ध कादंब-या. त्यांचीही तळवलकरांनी ओळख करून दिली आहे. तळवलकरांच्या लेखनीला उपमा, अलंकार, प्रतिमा यांचा सोस नाही. ती भाषेचा बडेजावही मिरवत नाही. तरीही या लेखात त्यांनी कितीतरी सौंदर्यस्थळे नोंदवली आहेत. इंग्लंडमध्ये लेखकांना किती मानसन्मान असतो याची प्रचिती जशी या लेखातून येते, तशीच डिकन्सच्या नावाने सुरू असलेली ‘दि डिकन्स फेलोशिप’ ही ११० वर्षापूर्वीची संस्था आजही कशी त्याच जोमाने काम करत आहे याचीही ओळख होते.
 
मार्क्‍सवादी, पंथवादी क्रांतिकारी, प्रॉटेस्टंट, कॅथलिक अशा कुठल्याच एका पंथात डिकन्सला बसवणे योग्य नसल्याचा निर्वाळा ऑर्वेलने दिला आहे. सामान्य लोक, गरिबांच्या घरातील आणि घराबाहेरील मुले हा डिकन्सचा चिंतनाचा आणि लेखनाचा विषय होता. त्याची ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’ ही कादंबरी बरीचशी आत्मचरित्रात्मक असली तरी त्यात अशा मुलांचे जीवन अतिशय प्रत्ययकारी रीतीने आले आहे. डिकन्सच्या ‘पिकविक पेपर्स’ या कादंबरीचा वाचकवर्ग अगदी खालच्या वर्गापासून न्यायाधीश, राजकारणी, डॉक्टर, वकील या उच्चभ्रूवर्गापर्यंत सर्वदूर म्हणावा इतका पसरलेला होता. आजवर डिकन्सची अनेक चरित्रे, त्याच्या साहित्याचा अभ्यास करणारी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आणि प्रत्यक्ष डिकन्सची पुस्तके तर आजही जगभर वाचली जात आहेतच. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानंतरही डिकन्स टिकून आहे ही गोष्टच किती थोर आहे!
 
याउलट डहाके यांच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेबद्दलची सनातन चिंता, जागतिकीकरण, साहित्यिकांची उदासीनता हे विषय आहेत. जागतिकीकरणाच्या विरोधात बोलण्याची फॅशन तर मराठीमध्ये जागतिकीकरणा- बरोबरच उदयाला आलेली आहे. त्यामुळे जागतिकीकरण आणि फॅशन या दोन्ही गोष्टीला आता वीस वर्षे झाली आहेत. या वीस वर्षात जागतिकीकरणाने आपला देशातल्या शेती, सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमे, नाटक, चित्रपट, साहित्य अशा अनेक क्षेत्रांवर बरा-वाईट परिणाम केला आहे. त्याचे मोजमाप करायचे काम इंग्रजीमध्ये मार्क टुली, बिमल जालान, शंकर आचार्य, एम. एम. सुरी, इंडियन एक्सप्रेस ग्रुप अशा अनेकांनी आपापल्या परीने केले आहे. पण मराठी साहित्यिक इंग्रजी वाचत नाहीत. आणि वाचले तरी त्यांच्या आकलनाच्या मर्यादा इतक्या तोकडय़ा आहेत की, वंदना शिवा,         पी. साईनाथ, अरुंधती रॉय हे लोक लिहितात, तेवढेच खरे आणि बाकी सगळे झुट असा त्यांनी आधीच (गैर)समज करून घेतल्याने ते त्याची शहानिशा करायला जात नाहीत. आक्षेप आहे, तो डहाके यांनी जागतिकीकरणावर ते काल-आज आल्यासारखे तोंडसुख घ्यावे आणि तरीही त्यांना काय म्हणायचे आहे याचा थांग लागू नये यावर. जागतिकीकरण आले, तेव्हाही खरे तर ते स्वीकारायचे की नाकारायचे हा पर्याय आपल्यासाठी उपलब्ध नव्हताच. मिलिंद बोकील यांच्या शब्दांत सांगायचे तर ती ‘कालगती आहे, मानवी संस्कृतीने इतिहासाच्या या टप्प्यावर स्वीकारलेली ही एक जगण्याची पद्धत आहे’. त्यामुळे त्याच्या नावाने बोटे मोडून लोकांची दिशाभूल करण्याऐवजी स्वत:चा चष्मा काढून आपली दृष्टी आणि चष्मा दोन्ही स्वच्छ करण्याची गरज आहे! कारण एकीकडे जागतिकीकरणाचे सारे फायदे उपभोगायचे आणि दुसरीकडे त्यावर टीका करायची, हा दांभिकपणा म्हणवला जाऊ शकतो.
 
अर्थात डहाके यांनी लेखकांच्या मुस्कटदाबीबद्दल आणि उदासीनतेविषयी जे खडे बोल सुनावले आहेत, ते त्यांच्या भिडस्तपणाच्या पलीकडे जाणारे नक्कीच आहेत. तेही थोडके नसे. ‘गेली काही वर्षे मराठीची गरज कशी नाही याचा वृत्तपत्रांतून प्रचार करण्यात गेलेली आहेत’ अशी काही मोघम आणि अतिशयोक्त विधाने सोडली तर डहाकेंचे भाषण एकंदर आजवरच्या अध्यक्षीय भाषणांच्या परंपरेला साजेसेच आहे. त्यात नवीन असे फारसे काही नाही आणि फारसे अपेक्षाभंग करणारेही काही नाही.
 
तरीही डहाके यांच्याकडून आम्हाला जरा अधिक अपेक्षा होत्या अशा प्रतिक्रिया काही लोक व्यक्त करतील तर काही लोक तळवलकरांनी डिकन्सचे अधिक सखोल विश्लेषण केले असते तर बरे झाले असते असेही म्हणतील. तो मतभेदाचा मुद्दा आहे. पण आपल्या समाजाला जशी तळवलकरांची गरज आहे, तशीच डहाकेंचीही आहे. दोघेही आपापल्या जागी योग्यच आहेत. प्रश्न त्यांचा नसून आपला आहे. आपल्याला कुणाच्या कोणत्या गोष्टींचा आदर्श घ्यायचा आहे? कारण त्यावर आपल्या आकलनाच्या कक्षा रूंदावणे वा न रूंदावणे याचा न्यायनिवाडा अवलंबून आहे.
 
पण एक छोटीशी अपेक्षाही व्यक्त करायला हरकत नसावी. २००४ साली औरंगाबादला झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव होते. संमेलनाआधी काही दिवसांपूर्वी संभाजी बिग्रेडने पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिटय़ूटची नासधुस केली होती. त्यावर संमेलनात काय प्रतिक्रिया उमटते याकडे सर्वाचे लक्ष लागलेले होते. संमेलनात या घटनेचा निषेध व्हायला हवा असा एक मतप्रवाह होता, तर दुसरा अध्यक्षांनी आपल्या भाषणात त्याविषयी बोलावे असे मानणाऱ्यांचा होता. संमेलनावर या तणावाची दाट छाया जाणवत होती. वादविवादापासून कायम चार हात लांब राहणाऱ्या आणि वृत्तीने-प्रवृत्तीने निरागस असणाऱ्या रागंच्या वाटय़ालाच अशी परिस्थिती यावी याची काहींना हळहळ वाटत होती. मात्र, अध्यक्षीय भाषणात भांडारकर वा संभाजी बिग्रेडचा नामोल्लेख रागंनी केला नाही. पण दोन वर्षानी म्हणजे फेब्रुवारी २००६च्या ‘अंतर्नाद’मध्ये ‘अध्यक्षीय हाल(अ)हवाल’ असा दीर्घ लेख लिहून स्वत:च स्वत:च्या अध्यक्षीय कारकिर्दीचा सडेतोड पंचनामा केला. त्याआधी आणि त्यानंतरही असा प्रांजळपणा पाहायला मिळाला नाही. रागंनी त्या लेखाच्या शेवटी लिहिले आहे, ‘संमेलनाचे अध्यक्षपद हे खूप उंचावरचे आसन आहे. अध्यक्षाने तिथे पोहोचले पाहिजे. हे भान मला तरी स्पष्टपणे लगेचच आले नाही. बहुधा अजूनही आले नाही..एखादा भव्यदिव्य योग वाटय़ास यावा आणि दुर्दैवाने त्याची दिव्यभव्यताच आपणाला समजू नये, असे काहीसे झाले असे मला वाटते.’ अध्यक्ष म्हणून ‘आपण नापास झाल्याची’ कबुली रागंनी त्यात दिली आहे.
 रागंचा हा लेख मध्यबिंदू मानून त्यानंतरच्या अध्यक्षांना त्यांच्या मनाचा कौल विचारायला हरकत नाही. खरे तर तो त्यांनी स्वत:हूनच जाहीर करणे अधिक श्रेयस्कर ठरेल. आणि तसे झाले तर मराठी साहित्यात नवी परंपरा सुरू होईल. डिकन्सला  इंग्लंडमध्ये जेवढी प्रतिष्ठा आहे, त्या तोडीची गुणवत्ता संपादन करण्याच्या दिशेने मराठी साहित्यिकांनी टाकलेले ते एक पाऊल असेल.

1 comment:

  1. केदार पाटनकर यांच्याकडून मेलद्वारे
    अपवादि वगळता चाळिशी उलटलेले मराठी साहित्यिक
    सोशल नेटवर्किंग का करीत नाहीत, हा प्रामाणिक अभ्यासाचा विषय आहे. गुप्तता राखण्यात बरे वाटणे, नियमितपणे नेटवर्किंग करणे न जमणे इत्यादी कारणांमुळे नेटवर्किंग जमत नसावे. शेवटी, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पर्याय आहे. चाळिशीच्या आतले तरूण लेखक या सगळ्याला नक्की अपवाद आहेत, असे माझे मत आहे. जागतिकीकरणाच्या आसपास ज्यांचे बालपण अथवा तरुणपण आले आहे ते नेटवर्किंगकडे दुर्लक्ष करू शकलेले नाहीत.
    डहाकेंच्या भाषणाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत. एका साहित्यिकाने भाषणाबद्दल एका वाहिनीवर आनंद व्यक्त केला तर एका वृत्तपत्रात फारसे हाती काही लागले नसल्याचा सूर उमटला. रा.ग.जाधव यांची आपण दिलेली प्रतिक्रिया मात्र बोलकी आहे.

    ReplyDelete