Sunday, March 4, 2012

मरणोत्तर लोकोत्तर!

आपण मेल्यावर काय होतं, ही कुतूहलाची गोष्ट असते. पण ते पाहायला आपण हयात नसतो. पण एक खरं की, आपण, म्हणजे सर्वसामान्य माणसं, मेल्यावर आपल्याविषयीची स्वाभाविक प्रतिक्रिया ही चांगला माणूस होताअशीच (मोघम) असते! आपले कुटुंबीय काही काळ शोकाकूल होतात, उमाळे उसासे काढतात, तर आपला मित्र-परिवार आपल्याविषियीच्या त्यांच्या सहवासातल्या आठवणींना उजाळा देतो. म्हणूनच कदाचित कवीवर्य भा. रा. तांबे यांनी जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?’ असं म्हणून ठेवलं असावं! काही का असेना, कुठलाही सामान्य माणूस मेल्यावर तो काही काळ का होईना, सेलिब्रिटी होतो. त्याच्याविषयी सहसा वाईट बोललं जात नाही. जाहीरपणे तर नाहीच नाही. भले मग तो वाईट असेना! तसा अलिखित संकेत पाळला जातो.
 
पण जेव्हा आपले आयडॉल, आपले आदर्श जातात, तेव्हा काय होतं? सेलिब्रिटी तर ती आधीपासूनच असतात. निधनानंतर ती लिजंड (दंतकथा) होतात, आधीपेक्षाही जास्त माणूसहोतात! आपल्या अधिक जवळ येतात. प्रत्यक्षात आपण त्यांना कधी भेटलेलो नसतो, पण आता नेहमीच त्यांची भेट होऊ लागते!!
 
.तर आयडॉल म्हणता येईल अशा व्यक्तींविषयीच्या भाषणांचं फेअरवेल, गॉडस्पीडहे पुस्तक आहे. त्याचं उपशीर्षक आहे, ‘द ग्रेटेस्ट यूलजिज ऑफ अवर टाइम’. यूलजि म्हणजे शोकपर भाषण वा लेख. हा प्रकार आपल्याकडे फारसा नाही, पण पाश्चात्य देशात तो चांगलाच रुजलेला आहे. आणि अशा यूलजिजच्या संग्रहांची पुस्तकंही तिकडे प्रकाशित होतात, वाचली जातात आणि त्यांचा संग्रहही केला जातो. विसाव्या शतकातल्या 64 नामवंतांच्या अशा शोकपर भाषणांचं आणि लेखांचं फेअरवेल, गॉडस्पीडया पुस्तकाचं सायरस कोपेलँड यांनी संकलन-संपादन केलं आहे. सायरस हे काही लेखक-संपादक नाहीत. ते अ‍ॅड-गुरू आहेत. न्यू यॉर्कमध्ये राहणाऱ्या या अ‍ॅड-गुरूचा हा संग्रह उत्तम म्हणावा असा आहे. या पहिल्या पुस्तकानंतर सायरस यांनी तीन वर्षानी अ वंडरफुल लाइफ : 50 यूलजिज टू लिफ्ट द स्पिरिटहे पुस्तकही संपादित केलं आहे. 
 
फेअरवेल, गॉडस्पीडच्या प्रास्ताविक निवेदनात सायरस यांनी लिहिलं आहे- अ ग्रेट यूलजि इज बोथ आर्ट अँड आर्किटेक्चर-अ ब्रिज बिटविन द लिव्हिंग अँड द डेड, मेमरी अँड इटर्निटी. हेअर आर 64 ब्रिजेस टू क्रॉस.या आपल्याला पार करायच्या या पुलांमध्ये शास्त्रज्ञ, अभिनेते, लेखक, द्रष्टे, राजकारणी, संगीतकार या क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे. इझाडोरा डंकन, चे गव्हेरा, हेलन केलर, मार्टिन ल्यूथर किंग, कार्ल मार्क्‍स, हेन्री फोर्ड, ह्यूफरी बोगार्ट, रिचर्ड बर्टन, वॉल्टर मॅथ्यू, थॉमस एडिसन, अल्बर्ट आइन्स्टाइन, कार्ल जुंग, मार्शल मक्लुहान, एमिली डिकिन्सन, रॉबर्ट फ्रॉस्ट, मार्क ट्वेन, वॉल्टर व्हिटमन, व्हर्जिनिया वूल्फ, जॉन एफ. केनेडी अशा अनेकांचा त्यात समावेश आहे.
 
या नामवंताविषयी ज्यांनी भाषणं केलेली आहेत वा लेख लिहिलेले आहेत, तेही तेवढेच तोलामोलाचे आहेत. फ्रेडरिक एंगल्स यांनी कार्ल मार्क्‍स यांच्याविषयी, अर्नेस्ट स्टॉऊस या संशोधक सहाय्यकानं अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्याविषयी, फिडेल कॅस्ट्रो यांनी चे गव्हेराविषयी, व्हर्जिनिया वूल्फविषयी ख्रिस्तोफर आयशरवूड यांनी, मार्क ट्वेन यांच्याविषयी हेन्री डायक यांनी, थिओडर सेऊस गेइसेल यांच्याविषयी रॉबर्ट बर्नस्टाइन यांनी लिहिलं आहे. यातील चे गव्हेरा वगळता, इतर सर्वाचं निधन तसं नैसर्गिक म्हणावं लागेल!
 
यातील काही भाषणं त्या त्या व्यक्तीचं योगदान नेमकेपणानं सांगणारी आहेत (उदा. चे गव्हेरा, कार्ल मार्क्‍स), काही मजेशीर आहेत (उदा. वॉल्टर मॅथ्यू), तर काही आदरभाव व्यक्त करणारी आहेत. फिडेल कॅस्ट्रो यांनी चे गव्हेराविषयी केलेलं भाषण हे कुठल्याही कार्यकत्याच्या अंत:करणातील स्फूल्लिंग चेतवणारं आहे, तर अल्बर्ट आइन्स्टाइन या जगविख्यात शास्त्रज्ञाविषयी त्यांचे सहाय्यक अर्नेस्ट स्ट्राउस यांचं भाषण आइन्स्टाइन यांच्यातलं माणूसपण आणि माणुसकी सांगणारं आहे. वॉल्टर मॅथ्यू या इंग्रजी रंगभूमीवरील नटाविषयी त्यांच्या मुलाचं, चार्ली मॅथ्यूचं भाषण त्यांच्या प्रकृतीनुसार मजेशीर आहे. काही वेळा भन्नाट आठवणी, काही ठिकाणी आजवर अज्ञात असलेले काही पैलू, काही ठिकाणी स्वत:वरील आणि इतरांवरील त्या व्यक्तीचा प्रभाव तर काही वेळा त्या व्यक्तीसोबत घालवलेला काळ, असं या भाषणांचं स्वरूप आहे.
 
यातली काही भाषणं पाच-सहा पानांची आहेत, तर काही अगदीच लहान आणि जेमतेम म्हणावी अशी आहेत. मार्क ट्वेन यांच्याविषयीचं भाषण अवघं दीड पानांचं आहे, अमेलिया इरहार्ट या अमेरिकन शास्त्रज्ञााविषयी तिच्या बहिणीनं केलेली छोटीशी कविताच आहे!
 
थिओडर सेऊस गेईसेल यांच्याविषयी त्यांचा प्रकाशक आणि मित्र रॉबर्ट बर्नस्टाइन यांचं साडेपाच पानी भाषण बहुतांशी वैयक्तिक आठवणी सांगणारं असलं तरी त्यातून थिओडोर यांना सुरुवातीच्या काळात लेखक म्हणून करावा लागलेला संघर्ष, त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं लेखन यांचाही आलेख मांडला आहे. थिओडोर हे मुलांविषयी लिहिणारे लेखक. त्यांच्या पुस्तकांनी अनेक विक्रम केले. मुलांविषयीच्या लेखनासाठी त्यांना पुलित्झर पारितोषिकानं गौरवण्यात आलं. तर हिटलर लाइव्हजया त्यांच्या लघुपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला. पुढे थिओडोर यांनी गेराल्ड मॅकबोइंग-बोइंगया अ‍ॅनिमेटेड लघुपटासाठी दुस-यांदा ऑस्कर पटकावलं. मजा म्हणज,े थिओडोर यांचं अँड टू थिंक दॅट आय सॉ इट ऑनहे पहिलं मुलांविषयीचं पुस्तक 43 प्रकाशकांनी नाकारलं होतं! शेवटी ते त्यांच्या मित्रानं प्रकाशित केले, पुढे ते बरंच गाजलं.
 
ही भाषणं तशी नैमित्तिक, म्हणजे शोकसभेमध्ये केलेली, असल्यानं त्यात काही वेळा त्या व्यक्तीच्या  कारकिर्दीचा आलेख आलेला नाही, पण प्रत्येक भाषणाच्या शेवटी संपादकानं त्या त्या लेखकाचा जीवनपट थोडक्यात पण नेमकेपणानं दिला आहे. त्यामुळे आपल्याला एरवी अपरिचित असलेल्या काही व्यक्तींविषयी जाणून घ्यायला मदत होते. त्या व्यक्तीविषयीची उत्सूकता वाढते.
 
माणूस जन्माला का येतो, याचं बिनतोड आणि वादातीत उत्तर अजून सापडलेलं नाही. तसंच माणूस मेल्यावर कुठे जातो, या वरील संशोधनही अजून फारसं पुढे गेलेलं नाही. पण माणूस जेव्हा जगत असतो, तेव्हा तो जसा जगतो, त्यानुसार तो मेल्यानंतर लोक त्याची आठवण काढतात, त्याचं स्मरण करतात, त्याचे पुतळे उभारतात, त्याच्या नावे इमारती, प्रयोगशाला, रस्ते, बागा तयार करतात..माणूस मेल्यानंतरही त्याची सतत आठवण काढली जाणं, त्याच्या कामाचा उपभोग घेणं आणि त्याची पुस्तकं वाचणं, या साऱ्या गोष्टी त्यांच्याबाबतच होतात, जे लोक आपल्या निधनानंतरही जिवंतराहतात. त्यामुळे ते आधी होते, त्यापेक्षा आणखी मोठे होतात.
 
हे पुस्तक हयात नसलेल्या व्यक्तींविषयी असलं तरी ते फारसं गंभीर नाही, तर हलकंफुलकं, काही वेळा तर हसवणारंही आहे! काही लोकांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जात नाही, पण त्यांचं कर्तृत्व त्यांच्या मरणाचा सोहळा करायला उद्युक्त करतं! यातली माणसं तशीच आहेत.
 
फेअरवेल, गॉडस्पीड - द ग्रेटेस्ट यूलजिज ऑफ अवर टाइम : संपादक सायरस एम. कोपेलँड
हार्मनी बुक्स, न्यूयॉर्क
 पाने : 320, किंमत : 882 रुपये

No comments:

Post a Comment