Tuesday, August 21, 2012

बंडखोर लेखिकेची पन्नाशी!

आपल्या लेखनाची सर्वाधिक किंमत चुकती करावी लागणं, त्यासाठी आपलं आयुष्यच पणाला लावावं लागणं, हे कुठल्याही काळात लेखकासाठी वेदनादायकच असतं. त्यातही धार्मिक कट्टरतावाद्यांविरुद्धचा लढा तर खूपच बिकट असतो. पण तो प्राणपणाने लढत जगातल्या असंख्य मुस्लीम आणि इतर स्त्रियांना आपल्यावर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरुद्ध बोलण्याची-लढण्याची प्रेरणा देणा-यांमध्ये तस्लिमा नासरीन यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागतो. त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा लेख......
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तस्लिमा नासरीन येत्या 25 ऑगस्टला वयाची पन्नाशी पूर्ण करत आहेत. पन्नाशी हा व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो, म्हणून त्यांच्या आजवरच्या लेखकीय कारकीर्दीचा आढावा घेणं सयुक्तिक ठरतं. 
“(Most of the) Publishers are afraid to publish her books. Book sellers are afraid to sell her books. Supporters afraid to support her publicly. Secularists are afraid to defend her when she is attacked by the religious fundamentalists.”
असं तस्लिमाच्या अधिकृत वेबसाइटवर एके ठिकाणी नमूद केलेलं आहे. 
तस्लिमाची आजवर 35 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांचं विषयवार वर्गीकरण केलं तर काय दिसतं? 1986 ते 2008 या काळात 13 कवितासंग्रह, 1990 ते 2007 या काळात 5 निबंधसंग्रह, 1991 ते 2009 या काळात 8 कादंब-या, 1994 ते 2007 या काळात 2 लघुकथासंग्रह आणि 1999 ते 2012 या काळात 7 आत्मचरित्रविषयक पुस्तकं अशी तस्लिमाची एकंदर ग्रंथसंपदा आहे. वयाच्या तेराव्या वर्षी तस्लिमानी लिहायला सुरुवात केली. वयाच्या 24 व्या वर्षी (1986 साली) त्यांचा ‘शिकोरे बिपुल खुधा’ (Hunger in the Roots) हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. 1990 पर्यंत आणखी दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले. 1990 मध्ये तस्लिमाच्या पहिल्या निबंधसंग्रहाचं प्रकाशन झालं. 1992 साली पहिली कादंबरी प्रकाशित झाली, तर 1999 साली पहिलं आत्मचरित्रविषयक पुस्तक प्रकाशित झालं. म्हणजे 2008 नंतर तस्लिमा पूर्णपणे कादंब-या आणि आत्मचरित्रविषयक लेखनाकडे वळल्या आहेत. 

तस्लिमाच्या ‘लज्जा’, ‘उतल हवा’, ‘नष्ट मेयेर-नष्ट गद्य’, ‘फरासी प्रेमिक’, ‘आमार मेयेबला’ या पुस्तकांचे आजवर मराठी अनुवाद झालेले आहेत. मराठीमध्ये या अनुवादित पुस्तकांवर कुठलेही वाद झालेले नाहीत, हे विशेष. या पुस्तकांचा खपही चांगला झालेला आहे. तस्लिमाच्या ‘फेरा’ या कादंबरीचा ‘फिट्टमफाट’ या नावानं अशोक शहाणे यांनी अनुवाद केला असून तो मुंबईतील ‘अक्षर प्रकाशन’च्या वतीने प्रकाशित झालेला आहे. बाकी सर्व पुस्तकांचे अनुवाद पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केले आहेत. त्यामुळे मराठी वाचकांनाही त्यांची जवळून ओळख आहे. 

19990 पासूनच बांगलादेशातील मुस्लीम कट्टरतावाद्यांनी तस्लिमा यांच्या विरोधात मोहीम सुरू केली होती. 1993 पासून 2004 पर्यंत तस्लिमा यांच्या एकंदर पाच पुस्तकांवर बंदी घालण्यात आली. ‘लज्जा’, ‘आमार मेयेबला’, ‘उतल हवा’, ‘को’, ‘सेई सोब ओन्ढोकार’ ही ती पाच पुस्तकं. तर ‘द्विखंडितो’ या पुस्तकावर प. बंगाल सरकारने 2003 साली बंदी घातली. मात्र सप्टेंबर 2005 मध्ये प. बंगालच्या उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतभर मोठय़ा प्रमाणावर दंगली, जाळपोळ आणि हिंसाचार झाला. याचीच प्रतिक्रिया म्हणून बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर तस्लिमा यांच्या ‘लज्जा’ या कादंबरीवर बंदी घालण्यात आली होती. 

1994 साली तस्लिमा यांना बांगलादेश सोडावा लागला. त्यानंतर त्या 10 वर्षे पाश्चात्य देशांमध्ये राहात होत्या. 2004 साली त्या कोलकात्यात परत आल्या. तिथे 2007 पर्यंत म्हणजे तीन वर्ष राहिल्या. 2008 मध्ये त्या स्वीडनला रवाना झाल्या. 2007मध्ये काही काळ दिल्लीमध्ये त्या राहत्या घरी स्थानबद्ध होत्या. तस्लिमा यांनी 2005  साली आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळावं, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांना केली होती. शिवराज पाटील तेव्हा गृहमंत्री होते. पण भारतातील प्रादेशिक विविधता आणि मुस्लीम समाजाची लक्षणीय संख्या विचारता घेता ताणतणाव निर्माण होण्याच्या खबरदारीतून त्यावर गृहमंत्र्यांनी काही निर्णय दिला नाही. 

पाकिस्तान आणि बांगलादेश हे मुस्लीमबहुल लोकसंख्या असलेले देश आहेत. तेथील धार्मिक कट्टरता आणि त्याच्या दुष्परिणामांच्या बातम्या सतत अधूनमधून येत असतात. मात्र अशा बातम्या भारतामध्ये क्वचित म्हणाव्या अशा संख्येने घडतात. भारतात मुस्लिमांची संख्या तशी लक्षणीय आहे. तरीही भारतीय मुसलमान हा सर्वसामान्यत: सहिष्णू मानला जाई. त्याला बाबरी मशिदीच्या पतनानंतर ब-याच प्रमाणात तडे गेले. गेल्या वर्षी जयपूरच्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सलमान रश्दी यांच्या उपस्थितीवरून वाद निर्माण होऊन त्यांना भारतातच येऊ न देण्याचा पण काही मुस्लीम संघटनांनी केला. असाच प्रकार तस्लिमा यांच्याबाबतीत प. बंगालमध्येही झाला होता. त्यांच्या ‘द्विखंडितो’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी नासरीन यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. 

सलमान रश्दी आणि तस्लिमा यांची नेहमी तुलना केली जाते, परंतु त्यांच्या लेखनामध्ये एक मूलभूत म्हणावा असा फरक आहे. रश्दींचं संपूर्ण लेखन हे इंग्रजीमध्ये आहे तर तस्लिमा या आपलं लेखन मुख्यत: बंगालीमध्ये म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये करतात. त्यानंतर त्याचे इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये अनुवाद होतात. रश्दी यांच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या 1988 साली प्रकाशित झालेल्या कादंबरीमुळे 14 फेब्रुवारी 1989 रोजी इराणचे धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी यांनी रश्दी यांना ठार मारण्याचा फतवा काढला. त्यानंतर बराच काळ रश्दी यांना भूमिगत राहून काळ काढावा लागला. या उलट तस्लिमा यांना त्यांच्या पुस्तकांमुळे बांगलादेश सोडावा लागला. त्यांच्यावर भारतात काही ठिकाणी हल्ले झाले. त्यांच्या पुस्तकांवर बंदी आली. पण त्यांना रश्दींसारखं फार काळ भूमिगत राहावं लागलं नाही. मुस्लीम कट्टरतावाद्यांनी तस्लिमाची हत्या करणा-याला दोन हजार डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं आहे. पण या फतव्याचंही काहीसं सलमान रश्दींसारखंच झालं आहे. तो आता अघोषितपणे मागे घेतल्यातच जमा आहे. 

रश्दी यांच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाने पाश्चात्य देशातील मुस्लीम लेखकांना इस्लाम आणि कुराण यांची चिकित्सा करण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर अशी पुस्तकं मोठय़ा संख्येनं लिहिली जाऊ लागली. अजूनही लिहिली जात आहेत. त्यात कथा-कादंब-या आणि वैचारिक अशा दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यातील अमेरिकास्थित लेखिका इरशाद मंजी यांच्या एका पुस्तकाचा गेल्या वर्षीच ‘तिढा आजच्या इस्लामचा!’ या नावानं मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनीही तस्लिमा यांच्याप्रमाणेच इस्लाम धर्मातील आणि कुराणातील अनेक विसंगतींवर टीका केली आहे. इस्लाम आणि कुराणमध्ये स्त्रियांविषयी जी प्रतिकूलता आहे, त्यावर त्या वस्तुनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ पद्धतीनं झोड उठवतात. धर्म हा मानवताविरोधीच असतो, हे त्यांना मान्य नाही. म्हणजे मंजी या मध्यममार्गी आहेत, तशा तस्लिमा नाहीत. त्यांना इस्लाम धर्मच संपवून टाकावा, असं वाटतं. अशी काही त्यांची मतं टोकाची म्हणावीत इतकी एकारलेली असतात. त्यांची ही धारणा टोकाच्या फँटसीसारखी आहे. या कारणांमुळे तस्लिमा यांच्या अलीकडच्या लेखनात आक्रस्ताळेपणाही वाढताना दिसतो आहे. ‘सारे जण आपल्याविरुद्ध कट करत आहेत’, अशाच भूमिकेतून त्यांचं लेखन आणि वागणं-बोलणं असतं. एकटया-दुकटया व्यक्तींच्या प्रतिक्रिया फार गांभीर्यानं घ्यायच्या नसतात, पण तस्लिमा ब-याचदा त्या प्रतिक्रियांनाच सामाजिक सिद्धान्त मानून लिहितात-बोलतात. हल्ली तस्लिमा जागतिक सेलेब्रिटी झाल्या आहेत. त्यामुळे त्या काय बोलतात, याकडे जगभरातील प्रसारमाध्यमांचं लक्ष लागलेलं असतं. अशा वेळी तस्लिमा यांच्याकडून अधिक जबाबदारपणाची आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा आहे. पण ती त्या नेहमीच धुडकावून लावतात आणि अतिशय सवंग विधानं करतात. नुकत्याच अमेरिकेत गुरुद्वारामध्ये झालेल्या हिंसाचाराविषयीची त्यांची प्रतिक्रिया अशाच स्वरूपाची आहे.

तस्लिमाचा लढा जगातल्या सर्वाधिक धार्मिक पगडा असलेल्या समाजातील मुल्ला-मौलवींविरोधात आहे. तेव्हा त्यांच्याशी त्यांच्याच पातळीवर जाऊन वाद-विवाद करण्याची गरज नसते. तस्लिमा यांच्या लेखनात ते भान ब-यापैकी पाळलंही जातं. पण त्यांची वक्तव्यं आणि विधानं यात मात्र त्या या गोष्टींना ब-याचदा हरताळ फासतात. टोकाची मतं व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना टोकाचा विरोध होतो, आणि म्हणून मोठय़ा प्रमाणावर बुद्धिमंतांचा पाठिंबाही मिळत नाही. त्यासाठी अधिक संयमितपणे व्यक्त व्हावं लागतं. विचारांची लढाई विचारांच्या पातळीवरच लढावी लागते. पाश्चात्य देशातील कितीतरी मुस्लीम लेखिका आणि लेखक अभ्यासावर आधारलेले आणि सज्जड पुरावे देणारं लेखन करत आहेत. त्यांचा प्रतिवाद मुस्लीम धर्माधांना सहजासहजी करता येत नाही. अशा लेखनाचा इष्ट परिणाम होऊन तो तळागाळातल्या समाजापर्यंत झिरपायला वेळ लागतो. कुठलाही सामाजिक बदल एकाएकी होत नाही. त्यासाठी मोठा काळ उलटावा लागतो. आणि त्या काळात आपल्या उद्दिष्टांसाठी अविरत काम करत राहणारी फौजही तयार करावी लागते. ती केली तरच या बदलाची गाडी सुरळीत राहते. कारण दीर्घकालीन समस्या या जटिल असतात, त्यामुळे त्यांच्यावरची उपाययोजनाही दीर्घकालीनच असावी लागते. असे प्रश्न शॉर्टकटने कधीही सुटत नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे सारेच प्रश्न जसे कायद्याने सुटत नाहीत, तसे मोर्चे-आंदोलने आणि लेखन यातूनही सुटत नाहीत. या सा-यांचा एकसमयावच्छेदेकरून व्हावा लागतो. सध्याची परिस्थिती त्या दिशेनेच प्रवास करत आहे. त्यामुळे काळही तस्लिमा यांच्या बाजूने आहे. फक्त गरज आहे ती मर्मदृष्टीची. 20-30 हे तारुण्याचं आणि बंडखोरीचं वय असतं. 40-50 हा आयुष्याच्या प्रगल्भतेचा टप्पा असतो. तस्लिमा यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याकडून तशा प्रगल्भ व संयत लेखनाची-वर्तनाची अपेक्षा करणं, नक्कीच अनाठायी ठरणार नाही.

No comments:

Post a Comment