Saturday, March 9, 2013

वेडेपीर, कलंदर

काही माणसं मोठी मजेशीर असतात. त्यांचे छंद जगावेगळे असतात. पण तरीही आपण काहीतरी वेगळं करतोय असंही त्यांना वाटत नाही. बाळ बेंडखळे हे असेच एक कलंदरवृत्तीचे छांदिस्ट गृहस्थ. यांना कुठला छंद असावा? तर भुयारं पाहण्याचा. जिथे कुठे भुयार आहे, अशी बातमी मिळायचा अवकाश हे चालले त्याच्या मागावर. मग त्यासाठी वेळ-काळ-तहान-भूक कशाचंही भान त्यांना राहत नाही. आपण अडचणीत येऊ, भुयारात साप, तरस-कोल्हे ते वाघापर्यंत अनेक प्राणी असतात.. पण बेंडखळेंना त्यांचीही भीती वाटत नाही. अंधाऱ्या जगातली, दगडाखालची, कडेकपाऱ्यांच्या बेचक्यातली, उजेड सहन न होणारी सृष्टी या माणसाला भुरळ घालते. त्यांच्याविषयी जाणून घेण्याची अनावर हौस व्यापून टाकते. बेंडखळेंनी आपल्या १२ आणि १६ वर्षांच्या बहिणींनाही भुयाराच्या अंधार कोठडय़ात उतरवले. हे त्यांचं वेड इतकं अनिवार आहे की, विवाहाच्या दुसऱ्या दिवशी बेंडखळे एका भुयारात लपून बसलेल्या जखमी वाघाला पाहायला गेले. त्याला अगदी बॅटरीच्या प्रकाशात चार हाताच्या अंतरावर डोळा भरून पाहण्यात रमून गेले.


या पुस्तकात एकंदर सात भुयारकथा आहेत. पहिल्या प्रकरणात भुयार कसं तयार होतं, त्याची शास्त्रीय-भौगोलिक माहिती, भुयारांचं व्यक्तिमत्त्व, भुयारांचे प्रकार (विहिरीतील, तळघरातील, किल्ल्यांच्या तटबंदीतील, बुरुजातील, डोंगरातील), त्यात आढळणारे सरडे, पाली, साप अशा प्राण्यांची माहिती आहे. दुसऱ्या प्रकरणात रत्नागिरीच्या हातखंब्याच्या गुहेत लपून बसलेल्या जखमी वाघाला आत शिरून पाहण्याच्या धाडसाची कहाणी वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात. तिसऱ्या प्रकरणात कोतुळ-संगमनेर परिसरातल्या कोंबडकिल्ल्यातल्या भुयाराची गोष्ट आहे. आतमध्ये गेलेलं कोणीही परत माघारी येत नाही, अशी या भुयाराबाबत स्थानिकांची माहिती होती, तेव्हा बेंडखळे यांचा आत जाऊन पाहण्याचा निश्चय आणखीनच दृढ झाला. भुयाराच्या तळापर्यंत गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, हे तर तरसाचं काम आहे. शिवाय तिथे एक गणपतीची मूर्तीही होती. म्हणजे काही वर्षांपूर्वी तिथे माणसांचा सहवास होता. चौथ्या प्रकरणात सह्य़ाद्रीच्या रांगेतल्या कुंजरगडातल्या भुयाराविषयी आहे. कुंजर म्हणजे हत्ती. या भुयारातही दोन सहकाऱ्यांना सोबत घेऊन गेले आणि सुखरूप बाहेर आले. तेव्हा बरीच मंडळी त्यांच्या स्वागतासाठी बाहेर उभी होती. पाचव्या प्रकरणात भुयारात उतरल्यावर भेटलेल्या धामण सापाच्या युगुलाची कशी भेट होते आणि भुयाराचा वरचा भाग कोसळल्यावर खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत बराच वेळ कसं निपचित पडून राहावं लागतं, याचा काहीसा थरारक अनुभव आहे. या प्रकरणाने भांबावलेली धामणजोडी शेवटी बेंडखळेंच्या अंगावरूनच बाहेर पडते. याच प्रकरणात बेंडखळे यांनी विषारी व बिनविषारी साप ओळखण्याचा आणि विषारी सापांना मारण्याचा वारसा आई-वडिलांकडूनच कसा मिळाला, याविषयीही लिहिलं आहे.

सहावं प्रकरण हे दाभोळच्या चंडिका देवस्थानातल्या भुयाराविषयी आहे. गुहेत असलेल्या या मंदिरात गेल्यावर तिथल्या पुजारी सांगतो की, आतमध्ये दोन भुयारं आहेत, एकातून थेट काशीला जाता येतं, तर दुसऱ्यातून बनारसला. पूर्वज इथूनच गुप्त प्रवास करत. बेंडखळेंनाही तसाच प्रवास करावासा वाटला. म्हणून ते त्या भुयारांत उतरले. तर ती आतमध्ये पूर्णपणे बंद होती. मग बेंडखळे बाहेर आले. नुकत्याच दर्शनासाठी आलेल्या आजोबांना तुमच्या नातवाला १५ मिनिटांत काशी-बनारस दाखवतो, म्हणून दोन्ही भुयारात घेऊन जातात. तो बाहेर आल्यावर खरी गोष्ट सांगतो आणि त्यांच्या कालपर्यंतच्या समजुतीवर फेरविचार करायला लावतो.

प्रत्येक प्रकरणाला बेंडखळे यांनी काढलेली रेखाचित्रंही सुरेख आहेत. प्रत्येक भुयाराची रचना त्यांनी काढून दाखवली आहे. शिवाय त्यात आढळणारे वेगवेगळे प्राणी, अात जाताना सोबत ठेवायची हत्यारं यांचीही रेखाचित्रं आहेत. मात्र त्या तुलनेत मुखपृष्ठावर केवळ बेंडखळेंचंच छायाचित्र छापलं आहे. ते मलपृष्ठावर घेऊन मुखपृष्ठ अधिक चांगलं करणं शक्य होतं.

साधी, सोपी भाषा हे या पुस्तकाचे एक वैशिष्टय़ आहे. आपण काहीतरी भन्नाट सांगतोय वा करतोय, असा त्यात आविर्भाव नाही. त्यामुळे लेखन मनाची पकड घेतं. भुयारं हा सृष्टीचा भौगोलिक आविष्कार असल्याने त्यात राहणाऱ्या जीवांचा त्यावर अधिक अधिकार आहे, त्यांना न दुखावता भुयार कसं पाहावं, याचा चांगला नमुना म्हणजे हे पुस्तक आहे. भुयाराविषयी अकारण, खातरजमा न करताच केवळ सांगोवांगीमुळे पसरलेल्या दंतकथांना निपटून काढण्याचाही प्रयत्न बेंडखळे यांनी केला आहे. इतक्या वेगवेगळ्या भुयारांत शिरूनही बेंडखळे आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना कुठलाही विपरित अनुभव आलेला नाही, हे विशेष महत्त्वाचं. बेंडखळे कुठलंही भुयार पाहताना स्वत:बरोबर कुणीतरी नवा सहकारी घेऊन गेले. कधी स्थानिक, कधी वयानं अगदीच लहान. तसे साहसी सहकारी त्यांना वेळोवेळी मिळालेही. आणि आता पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर तो अनुभव तपशीलवार आणि रोचकपणे मांडला आहे. वाचन हाही एकप्रकारचा सहप्रवास असतो. काहींना प्रत्यक्ष कृती करण्याची प्रेरणा अशा इतरांच्या अनुभवातूनही होत असते. सर्वानीच असं वेड स्वत:ला लावून घ्यावं, असं नाही, पण अशा वेडेपीर, कलंदर वृत्तीच्या माणसांविषयी निदान जाणून तरी घ्यावं.

'भुयार' - बाळ बेंडखळे, चैतन्यऋतु प्रकाशन, मुंबई, पृष्ठे - १०८, मूल्य - १३० रुपये.No comments:

Post a Comment