Tuesday, August 13, 2013

गोष्टींच्या गोष्टींची गोष्ट

Published in LOksatta : Saturday, August 10, 2013

कवी, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक, संवादलेखक, अशी बहुआयामी प्रतिभा असलेल्या गुलज़ार यांची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही आणि ही गोष्ट ज्याला कळते त्याला गुलज़ारांच्या लेखणीच्या गुणवत्तेविषयीही सांगण्याची गरज नाही. त्याची आवश्यकताच नाही मुळी.
तेव्हा थेट सुरुवात करू. गुलज़ार यांनी मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टींचे हे पुस्तक, ‘बोस्कीज पंचतंत्र’. खरं तर हे विधान थोडं दुरुस्त करून असं म्हणावं लागेल की, गुलज़ारांची एकुलती एक मुलगी, मेघना हिच्यासाठी त्यांनी पंचतंत्रातल्या गोष्टींना दिलेलं हे नवं रूप आहे. मेघनाला गुलज़ारांनी लाडानं ‘बोस्की’ असं नाव ठेवलं, कारण तिचा पहिला स्पर्श मुलायम वस्त्रासारखा होता. आपल्या मुलांना कुणी वस्त्राचं नाव ठेवत नाही, पण गुलज़ारांसारख्या अलवार प्रतिभेच्या कवीनं ठेवलं!
बोस्की लहान असताना तिची आई, प्रसिद्ध अभिनेत्री राखी, तिला बंगाली बडबडगीते म्हणून दाखवत असे. आईची गीतं संपल्यावर बाबाची पाळी आली. बोस्कीला गोष्टी हव्या असत. गुलज़ार नवनव्या गोष्टी बनवून तिला सांगत, पण रोज मुलीला नवी गोष्ट देणार कुठून?  मग गुलज़ारांनी पंचतंत्रातल्या गोष्टींना नवं रूप देऊन त्या सांगायला सुरुवात केली. म्हणजे गोष्टी पंचतंत्रातल्या पण गुलज़ारांनी सांगितलेल्या. त्यामुळे त्या काव्यमय झाल्या. मोठय़ाने वाचता येऊ लागल्या आणि त्यांचा आनंदही घेता येऊ लागला. शिवाय त्यात आजच्या काळानुसार बदल केल्याने त्यांची खुमारीही वाढली. म्हणून हे गुलज़ारनिर्मित बोस्कीसाठीचं पंचतंत्र आहे. म्हणजे लहानग्यांसाठीचं.
आचार्य विष्णू शर्मा यांनी लिहिलेल्या गोष्टी ‘पंचतंत्र’ या नावाने ओळखल्या जातात. या गोष्टींचे पाच आहेत, म्हणून त्यांना ‘पंचतंत्र’ असे म्हटले जाते. एका राजाची तिन्ही मुलं आळशी असतात. नादान आणि बेजबाबदार मुलांमुळे राजा चिंतेत असतो. एके दिवशी राजाकडे विष्णू शर्मा नावाचा ब्राह्मण जातो. तो या तीन मुलांना सुधारण्यासाठी गोष्ट सांगायला सुरुवात करतो. त्याच या गोष्टी.
भारतीय साहित्यातील नीतिकथा या जागतिक पातळीवर मान्यता पावलेल्या आहेत. त्यात पंचतंत्राचा समावेश केला जातो. अकराव्या शतकापर्यंत पंचतंत्र पाश्चात्त्य जगात पोहोचले. तिथेही त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आणि ती आजही टिकून आहे. मठ्ठपणा आणि हुशारी, खोडकरपणा आणि शहाणपण, चातुर्य आणि कपट या मानवी नीतिमूल्यांची ओळख प्राण्यांच्या पात्रांद्वारे करून देण्याची कल्पकता अभिनव म्हणावी अशी आहे.
मानवी वृत्ती-प्रवृत्तींचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या पंचतंत्राच्या गोष्टी मुख्यत: मुलांसाठी लिहिलेल्या असल्या तरी त्या सर्व वयोगटातल्यांना आवडतात. बोलणारे प्राणी आणि लहान्यांची मोठय़ांवर मात, हा मुलांच्या जास्त कुतूहलाचा आणि आवडीचा विषय असल्यामुळे, त्यांना त्या जास्त आवडतात एवढंच.
पंचतंत्रातल्या गोष्टी लिहिल्या गेल्या तेव्हापासूनच म्हणजे तिसऱ्या शतकापासूनच समकालीन आणि सार्वकालिक ठरत आल्या आहेत. आजही त्या तितक्याच आवडीने वाचल्या जातात. मूळ गोष्टींमध्ये नंतरच्या काळात अनेकांनी आपापल्या परीने भर घातली. आता गुलज़ार यांनी त्याच कथा आपल्या प्रतिभेने नव्याने लिहिल्या आहेत. हा या गोष्टींचा गुलज़ारकृत नवा अवतार नितांतसुंदर आणि मनोरम आहे.
गुलज़ारांनी पंचतंत्रातल्या निवडलेल्या गोष्टी आणि त्यांना चढवलेला साज, यामुळे हे पुस्तक वाचणं, पाहणं, चाळणं आणि इतरांना वाचून दाखवणं या सर्वच दृष्टींनी उत्तम म्हणावं असं झालं आहे.
या पुस्तकात एकंदर तेरा गोष्टी आहेत. उंदराशी आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न लावून देणारा बाप, बलाढय़ सिंहाला फसवणारा चिमुकला उंदीर, पाहुण्यांचा कडकडून चावा घेणारा डास, गायचं न थांबणारं गाढव, स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवणारं मुंगूस, हलव्याचं भाडं मिळाल्यावर स्वप्नरंजनात अडकलेला मूर्ख पंडित.. खरं तर या पुस्तकातल्या सर्वच गोष्टी अनेकांना ऐकून, वाचून माहीत असतीलच. पण त्या पुन्हा वाचायला, वाचून दाखवायलाही आवडतील, कारण पुन:पुन्हा वाचाव्या अशाच त्या आहेत.
या पुस्तकाची अर्पणपत्रिकाही गमतीशीर आहे. गुलज़ारांनी हे पुस्तक त्यांच्या सूर, ताल आणि लय यांना अर्पण केले आहे. सूर म्हणजे त्यांचा नातू समय, ताल म्हणजे जावई गोविंद आणि लय म्हणजे मुलगी बोस्की (मेघना). तुम्हीही तुमच्या मुलांना, नातवंडांना या गोष्टी वाचवून दाखवू शकता. आणि गाऊनसुद्धा! हो, गाऊनच. कारण या गोष्टी काव्यमय आहेत. गाणं गुणगुणावं तशा या गुणगुणता येतात. लयीत वाचता येतात आणि त्यांच्याशी तालही मिळवता येतो.
रोहिणी चौधरी यांनी या मूळ हिंदीतल्या गोष्टींचा सुरेख इंग्रजी अनुवाद केला आहे, तर राजीव इपे यांनी त्यांना साजेशी चित्रं काढून त्यांच्या देखणेपणात भर घातली आहे.
अरेबियन नाइट्सबाबत अनेक वर्षे गैरसमज होता की, त्या लहान मुलांच्या गोष्टी नाहीत. त्या फार अश्लील आहेत वगैरे वगैरे. तशाच काहीसा गैरसमज पंचतंत्राविषयीही आहे की, या फक्त मुलांच्या गोष्टी आहेत. कुठलेही अभिजात पुस्तक हे फक्त अमुकांसाठी असे नसते, ते सर्वासाठी असते. पंचतंत्रातल्या गोष्टी वाचून मुलांना आनंद मिळतो, तर मोठय़ांना त्यातून शहाणपण मिळते आणि जगण्याचं इंगित नीट समजूनही घेता येतं. गुलज़ारांच्या लेखणीतून उतरलेल्या या पंचतंत्रीय गोष्टीही त्याला अपवाद नाहीत. त्यांचं पुनर्वाचन सर्वासाठी आनंददायी ठरेल, यात शंका नाही.

बोस्कीज पंचतंत्र : गुलज़ार,
प्रकाशक : रुपा-रेड टर्टल, नवी दिल्ली,
पाने : १०७, किंमत : १९५ रुपये.

No comments:

Post a Comment