Thursday, July 17, 2014

चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील गेली ४० वर्षे प्रामुख्याने हिंदी कवितांचा मराठी अनुवाद करीत आहेत. तो व्यावसायिक हेतूने नसून केवळ आणि निव्वळ कवितेवरील प्रेमापोटी करीत आहेत. म्हणूनच अनुवादाचा पेशा स्वीकारलेल्या या प्राध्यापकाच्या निष्ठेला महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीने नुकताच जाहीर केलेला पुरस्कार हा त्यांच्या साहित्यसेवेला केलेला सलामच म्हटला पाहिजे. औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयातून वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले पाटील म्हणजे हिंदी-मराठी या भाषांमधला एक महत्त्वाचा सांस्कृतिक दुवा. भीष्म सहानींच्या 'तमस'च्या त्यांनी केलेल्या मराठी अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तसाच त्यांनी मराठीतल्या दलित कवितांचा 'सूरज के वंशधर' या नावाने केलेला हिंदी अनुवादही वाखाणला गेला. नामदेव ढसाळ यांच्या कविता पहिल्यांदा महाराष्ट्राबाहेर पोहोचवल्या त्या त्यांच्या हिंदी अनुवादाने. 'समकालीन हिंदी कविता' या त्यांच्या संग्रहातून मैथिलीशरण गुप्त यांच्यापासून असद झैदींपर्यंतच्या हिंदूी कवींच्या कविता मराठीत आल्या. हिंदी कवितेसाठीचे मार्गदर्शक म्हणावे असे हे पुस्तक आहे. 'भूखंड तप रहा है' ही चंद्रकांत देवताले यांची दीर्घ कविता 'भूखंड तापू लागलंय' या नावाने त्यांनी मराठीत आणली. २००८ साली पाटील यांनी 'कवितान्तरण' हा अनुवादित कवितांचा पाचशेहून अधिक पृष्ठांचा संग्रह प्रकाशित केला. त्यात शंभरावर देशी-विदेशीकवींच्या एकंदर जवळपास ४०० कविता (मराठीत!) आहेत. एकाच कवीने विविध भाषांमधील, वेगवेगळ्या काळांतील आणि अतिशय भिन्न प्रकृतीच्या कवितांचा मराठीला परिचय करून द्यावा, यातून त्यांची सांस्कृतिक असोशी दिसते. या संग्रहासाठी त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. हिंदूीबरोबरच इंग्रजी, पंजाबी व कन्नड भाषेतील कविताही त्यांनी मराठीत आणल्या.
थोडक्यात, अनुवादाच्या क्षेत्रात असामान्य म्हणावे असे कर्तृत्व पाटील यांच्या नावे जमा आहे. चोखंदळ काव्यदृष्टी आणि कवितेवरील अव्यभिचारी निष्ठा यांचे निरंतर पाठबळ लाभलेल्या पाटील यांनी सुरुवातीपासून मराठीतल्या लघुअनियतकालिकांच्या चळवळीत अशोक शहाणे- भालचंद्र नेमाडे- रवींद्र किंबहुने- सतीश काळसेकर यांच्याबरोबर काम केले. औरंगाबादला त्यांनी नेमाडे आणि इतरांबरोबर सुरू केलेले 'वाचा प्रकाशन' बरेच वादळी ठरले होते. त्यानंतर त्यांनी अगदी अलीकडे 'तुला प्रकाशन' या नावाने काही कवितासंग्रह प्रकाशित केले होते. 'नि:संदर्भ', 'इत्थंभूत', 'बायका आणि इतर कविता', 'दिक्काल' हे पाटील यांचे स्वतंत्र कवितासंग्रह, तर 'आणि म्हणूनच', 'कवितेसमक्ष' ही काव्यसमीक्षेची पुस्तके, 'चौकटीबाहेरचे चेहरे' आणि 'विषयांतर' या दोन लेखसंग्रहात त्यांनी वेगवेगळ्या साहित्यिकांवर लिहिलेले लेखही विशेष उल्लेखनीय आहेत.

No comments:

Post a Comment