Tuesday, October 11, 2011

‘एवम्’ रंगकर्मी

   
(बादल सरकार यांच्या निधनानंतर प्रहार मध्ये लिहिलेले टिपण, १६ मे २०११)
बादल सरकारांच्या जाण्याने एका द्रष्टय़ा नाटककाराला भारतीय रंगभूमी पारखी झाली आहे. मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि बादल सरकार हे आधुनिक भारतीय रंगभूमीवरील तीन महत्त्वाचे नाटककार. (गिरीश कार्नाड हे या नंतरच्या पिढीतले आहेत.) तीनेक वर्षापूर्वी तेंडुलकर गेले आणि आता बादल सरकार. बादलांच्या नाटकांचे भारतभर प्रयोग झाले, त्यांच्या नाटय़प्रयोगांचे महोत्सव भरवले गेले. बादल सरकार मुळात टाऊन प्लॅनर. त्यात काही काळ काम केल्यावर त्यांनी परदेशात जाऊन रंगभूमीचे रितसर शिक्षण घेतले आणि नंतरचे सारे आयुष्य रंगभूमीसाठी समर्पित केले. वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्यांनी आपले पहिले नाटक ‘सोल्यूशन एक्स’ लिहिले. त्यानंतर आणखी दोन नाटके लिहिली. पण 1963 मध्ये त्यांची ‘एवम् इंद्रजित’ व ‘वल्लभपूरची दंतकथा’ ही दोन नाटके आली आणि बादल सरकार या नावाची भारतीय रंगभूमीवर चर्चा होऊ लागली. त्यानंतर बादलांची 1974 पर्यंत सातत्याने नवनवी नाटके येत राहिली. मात्र ‘बाकी इतिहास’, ‘पगला घोडा’, ‘जुलूस’ आणि ‘सारी रात’ या नाटकांनी त्यांना अखिल भारतीय पातळीवर कीर्ती मिळवून दिली. पण केवळ पुरस्कार, कौतुक, मानसन्मान यासाठी बादल सरकार नाटक करत नव्हते. नाटक ही बादल सरकारांची जगण्याविषयी बोलण्याची भाषा होती. त्यामुळे पौराणिक मिथके, रूपकांपासून आधुनिक मूल्यांपर्यंत त्यांनी अनेक शक्यतांचे प्रयोग केले. पण या प्रयोगांतून आपल्याला पुरेसे समाधान मिळत नाही हे लक्षात आल्यावर साचेबद्ध कमानी रंगमंचाला सरळ रामराम ठोकला आणि नुक्कडम् नाटके करायला सुरुवात केली. बंगालच्या गावागावात जाऊन आपली नाटके सादर केली. पथनाटय़ाची आपापल्यापरीने चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला. नाटकांच्या माध्यमातून सामाजिक अत्याचार आणि विसंवादी समाजव्यवस्था यांना तीव्र विरोध केला आणि समाज व राजकारणातल्या दांभिकतेवर नेमकेपणाने बोट ठेवण्याचेही काम केले. त्यांचा हा वसा महाराष्ट्रातही मोजक्यांनी थोडाफार सांभाळला आहे. पं. सत्यदेव दुबे यांच्या भाषेत सांगायचे तर ‘नाटकाच्या अक्षांश-रेखांशादरम्यान जे जे काही करता येणे शक्य असते आणि नाटकाच्या म्हणून जेवढय़ा काही शक्यता असतात त्यांना पणाला लावण्याचे काम’ बादलांच्या नाटकांनी केले. पण तरीही ते समाधानी नव्हते. ‘मी तिस-या रंगमंचाच्या शोधात आहे’ असे त्यांनी चारेक वर्षापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. म्हणजे वयाच्या ऐंशीमध्येही बादल सरकारांना नाटकाच्या नवनव्या वाटा, नवनव्या शक्यता खुणावत होत्या. त्या अर्थाने ते ‘एवम रंगकर्मी’ होते.

No comments:

Post a Comment