Friday, September 7, 2012

समर्पक आणि समर्थ पर्यायी शब्दांसाठी...


अलीकडच्या काळात मराठीमध्ये कोशवाडमयाची परंपरा चांगलीच रोडावली आहे. कोश तयार करणं हे तसं प्रचंड वेळखाऊ आणि कष्टाचं काम असतं. शिवाय त्यासाठी मोठया आर्थिक साहाय्याची गरज असते. शिवाय इतक्या खस्ता खाऊन तयार केलेल्या कोशांना वाचकांचा म्हणावा तसा प्रतिसादही मिळत नाही. अशा अनेक कारणांमुळे कोशवाड्मयाची निर्मिती रोडावली, असे विश्लेषण काही लोक करतात. त्यात थोडेफार तथ्य आहे. पण थोडेफार म्हणावे इतकेच. कारण एकेकाळी मराठीमध्ये कोशवाड्मयाची समृद्ध आणि विपुल म्हणावी अशी परंपरा होती. अठराव्या-एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आजच्या तुलनेने सोयी-सुविधा फारशा नव्हत्या. आर्थिक साहाय्याचीही बोंब होती. पण केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेतून कितीतरी प्रकारच्या वैविध्यपूर्ण कोशांची निर्मिती झालेली दिसते. म्हणजे कोशनिर्मितीसाठी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षाच प्रबळ ठरते. हल्ली तिलाच काहीशी ओहोटी लागल्याने कोशवाङ्मयाचे दुर्भिक्ष्य जाणवते आहे. तरीही काही लोक निष्ठेने कोश तयार करत आहेतच. वि. शं. ठकार हे त्यापैकीच एक. नुकताच त्यांनी ‘इंग्रजी-मराठी पर्यायकोश’ तयार केला आहे.



या पर्यायकोशाची काही वैशिष्टय़ं आहेत. एक, हा मराठीतला अशा प्रकारचा पहिलाच कोश आहे. दोन, प्रत्येक इंग्रजी शब्दाला पाचपाच-सहासहा मराठी पर्यायी शब्द दिलेले आहेत. त्यामुळे त्यातून आपल्याला हव्या त्या योग्य शब्दाची निवड करणं सोप होतं. तीन, या कोशाची निर्मिती चांगली आहे. मजबुत पुठ्ठाबांधणी असूनही त्याची किंमत तुलनेनं स्वस्त म्हणावी अशी आहे. एक महत्त्वाचा फरक सुरुवातीलाच समजावून घेतला पाहिजे. हा ‘इंग्रजी-मराठी’ थिसॉरस आहे, पर्यायकोश आहे. ही इंग्रजी-मराठी डिक्शनरी नाही. डिक्शनरीमध्ये इंग्रजी शब्दांचा सरळ मराठी अर्थ दिलेला असतो. तो मूळ शब्दाच्या अर्थाच्या जवळ जाणारा असतो. थिसॉरस वा पर्यायकोश डिक्शनरीच्या पुढचा टप्पा असतो. यात मूळ शब्दाच्या विविध अर्थछटा लक्षात घेऊन त्याला एकापेक्षा जास्त पर्यायी शब्द सुचवलेले असतात. त्यामुळे मूळ शब्द त्या वाक्यामध्ये नेमका कोणत्या संदर्भाने वापरलेला आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी योग्य मराठी पर्याय शोधणे सोपे होते.

त्यामुळे हा कोश विशेषत: इंग्रजीतून मराठीमध्ये अनुवाद/भाषांतर करणा-या व्यावसायिक अनुवादकांसाठी, पत्रकारांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयोगी आहे. कुठल्याही भाषेतील शब्दांना त्या त्या भाषेतील सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक, राजकीय यांच्या संदर्भाबरोबरच प्रादेशिकतेचे आणि रीतीरिवाजांचेही कोंदण असते. शब्दांतून व्यक्त होण्याची प्रत्येक भाषेची एक विशिष्ट लकब असते, लहजा असतो. तो इतर भाषेत जसाच्या तसा अनुवादित करताना अनेकदा अडचणी येतात. कारण त्या भाषेत मूळ भाषेतल्या अर्थछटेसह त्या शब्दातली भावना व्यक्त होईल यासाठी तितका समर्पक आणि समर्थ शब्द असतोच असे नाही. ब-याचदा नसतोच. अशा वेळी त्या शब्दाच्या जवळ जाईल, असा पर्यायी शब्द योजावा लागतो. पण असा पर्यायी शब्द ऐनवेळी कसा सुचणार वा आठवणार? अनुवादकांना/भाषांतरकारांना अशा अडचणींना नेहमीच सामोरं जावं लागतं.

वाक्प्रचार-म्हणी यांचा अनुवाद करणं तर आणखीनच कठीण होतं. कारण या वाक्प्रचार-म्हणींना ब-याचदा मूळ भाषेतल्या सांस्कृतिकतेतून काही अर्थ चिटकलेले असतात. ते समजावून घेतल्याशिवाय त्यांचा अर्थासह अनुवाद करणं शक्य होत नाही. शिवाय इंग्रजी म्हणींचा अनुवाद करणं तर फार मुष्किलीचं काम होऊन बसतं. कवितेतील प्रतिमा आणि वाक्प्रचार-म्हणी ही अनुवादातील मोठी अडचण असते. ते लक्षात घेऊन ठकार यांनी इंग्रजी शब्दांसाठी मराठी वाक्प्रचार आणि म्हणीही सुचवल्या आहेत.

पुस्तकांचे अनुवाद करणा-यांकडे पुरेसा वेळ असतो, पण वर्तमानपत्रं वा वृत्तसंस्थांमध्ये काम करणा-या व्यक्तींना मात्र कमीत कमी वेळेत शक्य तेवढा निर्दोष अनुवाद करायचा असतो. अशा वेळी संबंधित अनुवादकाचं दोन्ही भाषांवर चांगलं प्रभुत्व असावं लागतं. शब्दसंग्रहही भरपूर असावा लागतो. पण तरीही योग्य वेळी योग्य शब्द सुचणे, हे तसं कसब आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी हाताशी एखादा चांगला पर्यायी शब्दकोश असणं उत्तम असतं. प्रस्तुत कोश त्यासाठी उत्तम पर्याय आहे. हल्ली मराठीमध्ये ब-याचदा भयानक वाक्यं आणि निर्थक शब्दांचा वापर केला जातो. त्याचं कारण योग्य शब्दांविषयीचं अज्ञान हेच असतं. म्हणायचं असतं एक, प्रत्यक्षात लिहिलं जातं दुसरंच, हा विनोद तर वर्तमानपत्रांमध्ये नेहमीच पाहायला मिळतो. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात अतिशय गैरलागू, धेडगुजरी शब्दांचा वापर केला जातो. म्हणून पत्रकारांनाही हा कोश हाताशी ठेवल्यास फायदा होऊ शकतो.

आणखी एक. कोश कसा वापरायचा हेही कौशल्याचं काम असतं. तो नियमित सरावाचा भाग असतो. सतत कोश वापरण्याची सवय लावून घेतल्याशिवाय कोशाच्या सामर्थ्यांचा नीट उलगडा होऊ शकत नाही. कोशातून आपल्याला हवी ती माहिती, शब्द अचूकपणे पटकन शोधून काढणे हा सरावाचा भाग असतो. एकदा का तो झाला की, मग कोश पाहण्याची गोडी लागते. तशी ती लागल्यावर कोशाच्या सामर्थ्यांचा सतत पुनप्रत्यय येतो. हा पर्यायकोश सतत जवळ बाळगळ्यास आणि वेळ मिळेल तसा अधूनमधून चाळल्यास आपल्या शब्दसंख्येत मोलाची भर पडू शकते. मराठी-इंग्रजी भाषांच्या अभ्यासक-प्राध्यापकांना, साहित्यिकांना, अनुवादकांना, पत्रकारांना आणि विद्यार्थ्यांना या कोशामुळे चांगलाच फायदा होईल. त्यांच्या इंग्रजी-मराठी या दोन्ही भाषा समृद्ध होण्यास हातभार लागेल. मराठी भाषाही चांगली समृद्ध असून एका शब्दाला किती विविध पर्यायी शब्द आहेत, याचा अंदाज या छोटेखानी कोशातून येईल. ‘हि-याला पैलू पाडणं’ हे कसब असतं. हि-यासारखे शब्दांनाही अनेक पैलू असतात. शब्दांचे हे विविध पैलू लक्षात घेऊन त्यांचा योग्य वेळी योग्य जागी वापर करणं, हेही कसबी कामच असतं. ते कसब शिकवण्याचं काम हा पर्यायकोश काही प्रमाणात नक्कीच करू शकतो.


इंग्रजी-मराठी पर्यायकोश : संकलक-संपादक : वि. शं. ठकार

नितीन प्रकाशन, पुणे

पाने : 328, किंमत : 200 रुपये

No comments:

Post a Comment