ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं 'चार नगरांतले माझे विश्व' हे
आत्मचरित्र मराठीतलं एक वेगळ्या प्रकारचं आत्मकथन आहे, असं म्हणावं लागेल.
निदान अलीकडच्या काळातलं तरी. केवळ मराठीतच नाहीतर जगभरच साहित्यातले
सर्वाधिक वाद आत्मचरित्राच्या संदर्भातच होताना दिसतात. कारण बहुतांश वेळा
आत्मचरित्र लिहिताना सोयीस्कर सत्य सांगण्याचा प्रयत्न केला जातो किंवा
आत्मसमर्थन वा कबुलीजबाब दिला जातो. सत्य-असत्याची आणि प्रसंगी कल्पितांची
सरमिसळ केली जात असल्यानं आत्मचरित्राच्या सत्यतेबाबत बऱ्याचदा प्रश्न
उपस्थित केले जातात. शिवाय 'सत्य' या संज्ञेचे अर्थही वेगवेगळे असतात, असं
एका नोबेलविजेत्या शास्त्रज्ञानं म्हटलं आहे. कारण ते कुठल्या विषयाच्या
संदर्भात आहे, यावर त्या सत्याची सत्यता अवलंबून असते.
नारळीकरांच्या आत्मचरित्राबाबत असा काही वाद होण्याचं कारण नाही. त्यांचं ऋजु व्यक्तिमत्त्व आणि कमालीचा सज्जनपणा त्यांच्या या लेखनातही पुरेपूर उतरला आहे. शिवाय कटुतेचे प्रसंग त्यांनी कटाक्षानं टाळले आहेत. त्यामुळे सगळंच काही सांगणार नाही, पण सांगेन ते सत्य सांगेन, या न्यायानं नारळीकरांनी हे लेखन केलं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. त्यातून त्यांची नम्रता, गुणग्राहकता, बुद्धिमत्ता यांचा प्रत्यय सतत येत राहतो. पण हेही खरंच की, नारळीकरांना स्वतच्या आयुष्याकडे फार तटस्थपणे पाहता आलेलं नाही. इतर व्यक्तींबाबतही हा तटस्थपणा त्यांनी फारसा दाखवलेला नाही. त्याला त्यांची ऋजुता आड आली असावी.
केंब्रिज आणि आयुका हा नारळीकरांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि क्रिएटिव्ह असा कालखंड होता. एका बाजूला संशोधन आणि दुसऱ्या बाजूला संस्थात्मक निर्मिती या दोन्ही आघाडय़ांवर नारळीकरांनी केलेलं काम आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता पावलेलं आहे. त्यातून आजच्या आणि उद्याच्या पिढय़ांना शिकण्यासारखं खूप काही आहे.
नारळीकरांनी या आत्मकथनाला अवघं दोन पानांचं प्रास्ताविक लिहिलं आहे. त्यात त्यांनी तीन महत्त्वाची विधानं केली आहेत-
- माझे आजवरचे आयुष्य मुख्यत्वेकरून चार नगरांत गेले - बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे. प्रत्येक संक्रमणाच्या वेळी आपण एक धाडस करतो आहोत असे वाटायचे.
- आत्मचरित्र कसे लिहावे याचे काही दंडक असले तर ते मला माहीत नाहीत. मला माझी गोष्ट जशी सांगाविशी वाटली तशी मी सांगितली आहे.
- माझ्यावरील लेख, माझ्या सार्वजनिक मुलाखती वगैरेंतून माझ्याबद्दल पुष्कळ माहिती आता 'पब्लिक डोमेन'मध्ये आहे. तरी पण 'सांगण्याजोगी' नवी माहिती वाचकांना ह्य़ा आत्मकथनात मिळेल असे मला तरी वाटते.
'लोकांना माहीत नाही असं तुमच्या चरित्रात सांगण्याजोगं काही उरलं आहे काय?' या सुनीताबाई देशपांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला नारळीकरांनी दिलेलं उत्तर म्हणजे त्यांचं वरील तिसरं विधान. त्याचा मात्र पुरेपूर प्रत्यय या आत्मकथनामध्ये येत राहतो.
असं म्हणतात की, आत्मचरित्र हे लेखकानं स्वतकडे त्रयस्थपणे पाहून लिहिलेलं स्वतचंच चरित्र असतं. त्यामुळे त्यातून 'मी कसा झालो -घडलो?' याची कहाणी सांगायची असते. रूढार्थानं हे आत्मचरित्रही त्याला अपवाद नाही. नारळीकर नावाचा सुखवस्तू मध्यमवर्गातला बुद्धिमान मुलगा बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे या चार शहरांमध्ये कसा घडला आणि आपल्या अफाट बुद्धिमत्तेनं त्यानं यशाची शिखरं कशी पादाक्रांत केली, याची ही उत्कंठावर्धक व प्रेरणादायी कहाणी आहे.
नारळीकरांनी या आत्मकथनाचे एकंदर चार भाग केले आहेत. त्यानुसार बनारससाठी ८५ पानं, केंब्रिजसाठी २६० पानं, मुंबईसाठी १०६ आणि पुण्यासाठी ८१ पानं खर्च केली आहेत.
नारळीकरांचं बालपण, माध्यमिक-महाविद्यालयीन शिक्षण बनारसमध्ये गेलं. म्हणजे बनारस विद्यापीठामध्ये. बनारसमध्ये आणि उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीच्या काळात कोल्हापूरमध्ये घालवलेले दिवस, हा त्यांच्या आयुष्यातील रम्य बालपणाचा काळ होता. त्याविषयी त्यांनी समरसून लिहिलं आहे.
या आत्मचरित्रातील सर्वाधिक भाग नारळीकरांच्या केंब्रिजमधील वास्तव्यानं व्यापला आहे. ते साहजिकही आहे. पदवीनंतर त्यांनी केंब्रिजला प्रयाण केलं. तेथील शैक्षणिक वातावरणाविषयी नारळीकरांनी अतिशय सविस्तरपणे लिहिलं आहे. नारळीकरांनी या भागात केंब्रिज-ऑक्सफर्डमधील सुप्त स्पर्धा, सुट्टय़ांच्या काळात युरोप आणि युरोपबाहेर केलेले प्रवास, रँगलरीचे दिवस, फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले पीएच.डी.चे संशोधन, किंग्स कॉलेज फेलो, ई. एम. फोर्स्टर ('पॅसेज टू इंडिया'वाले) यांच्याशी झालेला स्नेह, मंगला राजवाडे यांच्याशी विवाह आणि संसाराची सुरुवातीची काही र्वष याविषयी लिहिलं आहे. त्यांच्या जगभर मान्यता पावलेल्या संशोधनाविषयी लिहिताना ते नेमकं काय आहे, हे सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीनं नारळीकरांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. केंब्रिजमधील विद्यापीठीय पातळीवरील शैक्षणिक वातावरण आणि संशोधनासाठीची अनुकूलता या गोष्टी या भागातून चांगल्या प्रकारे जाणून घेता येतात. यात नारळीकरांनी केंब्रिजची आपल्याकडील विद्यापीठीय शिक्षणाशी तुलना केलेली नाही, पण त्यांनी दिलेले तपशीलच इतके परिणामकारक आहेत की, तशी तुलना वाचकाच्या मनात साकारू लागते.
केंब्रिजमध्ये असतानाच नारळीकरांच्या बुद्धिमत्तेची चुणूक खगोलशास्त्रज्ञांना जाणवू लागली होती. त्यांची गांभीर्यानं दखलं घेतली जाऊ लागली. थोडक्यात केंब्रिजमध्ये नारळीकरांचा भविष्यकाळ उज्ज्वल होता, पण त्यांनी केंब्रिजच्या वैभवाचा त्याग करून, भारतात परतायचा निर्णय घेतला. मुंबईला टीआयएफआरमध्ये क्वांटम कॉस्मॉलजीवर संशोधनाला सुरुवात केली. पुढे नेहरू तारांगणची निर्मितीही त्यांच्या कल्पनेतून आणि पुढाकारातून झाली. त्याची राजकीय कहाणी वाचनीय आहे. या भागात नारळीकरांनी टीआयएफआरमधील वातावरण, संचालक आणि सहकारी, संशोधनाची पद्धत आणि राजकारण याविषयीही थोडक्यात लिहिलं आहे.
टीआयएफआरमधून बाहेर पडल्यावर वर्षभरातच नारळीकरांनी युजीसीच्या साहाय्यानं पुणे विद्यापीठाच्या आवारात आयुकाची निर्मिती करायला सुरुवात केली. चार्लस कोरिया यांच्या कल्पनेतून आयुकाची वास्तू साकारली. हा निर्मितीप्रक्रियेचा इतिहास रंजक आहे. आयुका ही भारतातली पहिलीवहिली वैज्ञानिक संशोधन संस्था, जी विज्ञानप्रसार व शालेय विद्यार्थ्यांत विज्ञान रुजवणं यासाठी सुरुवातीपासून काम करते आहे. जिचा प्रदीर्घ काळ संचालक म्हणून काम करताना नारळीकरांनी तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवून दिला. या काळात त्यांनी सरकारी अनास्था, लहरीपणा आणि राजकारण यांचाही अनुभव घेतला. पूर्णपणे आपल्या संशोधनाला वाहून घेतलेल्या शास्त्रज्ञांना जेव्हा प्रशासकीय काम करावं लागतं, त्यातील राजकारणाचा सामना करावा लागतो, तेव्हा त्याचा सराव नसल्यानं ते वैतागतात आणि काहीसं नकारात्मक चित्र रंगवतात की काय असं वाटतं. नारळीकरांबाबतही याचा प्रत्यय येतो. त्यांची बहुतांश निरीक्षणं बरोबरच आहेत, पण निष्कर्ष काढताना मात्र त्यांनी काही ठिकाणी घाई केली आहे असं वाटतं.
'मागे वळून पाहताना' या शेवटच्या प्रकरणात नारळीकरांनी थोडंसं भाष्य, काही निरीक्षणं आणि काही खंत व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी सुरुवातीला आपल्या पाच स्फूर्तिस्थानांविषयी लिहिलं आहे. त्यात आई-वडील, शिक्षक, फ्रेड हॉएल, इ. एम. फॉर्स्टर आणि बाळासाहेब राजवाडे या पाच व्यक्तींचा समावेश आहे. पण ही टिपणं फारच छोटी असल्यानं त्या त्या व्यक्तींचे स्वभाव, वैशिष्टय़ आणि गुण सांगण्यापलीकडे ती जात नाहीत.
त्यानंतर विश्वरचनाशास्त्राबाबत अतिशय नेमकी पण कळीचा मुद्दा माडंणारी टिपणी केली आहे. ते लिहितात, 'संशोधनाला उपलब्ध मुबलक पैसा. पैशापाठोपाठ संशोधनाच्या सुखसोयी, आणि त्यांच्याशी जोडलेला अधिकार. हे टिकवून धरायला तुमचे सिद्धान्त बरोबर आहेत हे पैसा पुरवणाऱ्यांना (बहुतांशी सरकारी समित्यांना) पटले पाहिजे. त्या 'मोहा'पायी आहे तो सिद्धान्त टिकवण्याचे प्रयत्न असतात.' पुढे नारळीकर लिहितात, 'विश्वरचनाशास्त्र हा विषय आज वैज्ञानिक राहिला नसून त्यांत अवैज्ञानिक अटकळबाजी वाढत चालली आहे.'
यानंतर इंग्रजी आणि मराठी या भाषांविषयी म्हणजे इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाविषयी आणि मराठीच्या भवितव्याविषयी काही विधानं केली आहेत. त्यात कुठलाही ठोस युक्तिवाद नारळीकरांनी केलेला नाही. इंग्रजीचा प्रभाव वाढत जाणार आहे आणि ती यापुढच्या काळात अनिवार्य भाषा होणार आहे, हे निर्विवाद म्हणावं इतकं स्वयंस्पष्ट आहे. पण मराठी टिकायची असेल तर केवळ उत्कृष्ट साहित्यनिर्मिती होत राहिली पाहिजे, हे नारळीकरांचं मत रास्त असलं तरी पुरेसं आणि पर्याप्त वाटत नाही. तुमचा देवावर विश्वास आहे का, या अनेकवार विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तरही नारळीकरांनी सावधपणेच दिलं आहे. त्यात त्यांचा चतुरपणाच जास्त दिसतो.
या आत्मकथनातून नारळीकरांचा जीवनविषयक दृष्टिकोन फारसा समोर येत नाही, त्यांच्या जगण्याविषयीच्या धारणाही पुरेशा स्पष्ट होत नाहीत. वाचकांना त्यांच्याविषयी नसलेली काही नवी माहिती सांगणं, (बहुधा एवढाच) हेतू असल्यानं हे आत्मचरित्र फार पसरट, पाल्हाळिक झालं आहे. या आत्मकथनाचं शीर्षकही अतिशय अनाकर्षक आहे.
या पुस्तकावर काटेकोरपणे संपादकीय संस्कार झाले असते तर हे टाळता येणं शक्य होतं. त्यामुळे पृष्ठसंख्या बरीच कमी होऊन ते अधिक सुटसुटीत झालं असतं. आशयही अधिक नेमकेपणानं वाचकांना भिडला असता. परिणामी वाचनीयता वाढली असती. पण संपादनाच्या पातळीवर जी साक्षेपी मेहनत घेतली जायला हवी होती, ती घेतली गेली नसावी असं वाटतं.
नारळीकरांच्या या आत्मकथनाची पहिली आवृत्ती २६ जानेवारी रोजी प्रकाशित झाली. सुमारे पाचशेहून अधिक पानं, तेवढीच किंमत असलेल्या या पुस्तकाची २ ऑक्टोबर रोजी दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. यातून नारळीकरांविषयीचं महाराष्ट्रीयांचं कुतूहल आणि आस्था व्यक्त होते, हेही तितकंच खरं.
हे आत्मचरित्र वाचलंच पाहिजे, असं आहे. यात प्रेरणा घ्यावी अशा अनेक गोष्टी, प्रसंग आहेत. शिवाय हे नारळीकरांचं आत्मचरित्र असलं तरी एका अर्थानं काही प्रमाणात केंब्रिज, टीआयएफआर आणि आयुका यांचं चरित्रही आहे. ही चरित्रकथा जाणून घ्यावी अशीच आहे. त्यातून प्रत्येकाला काही ना काही नक्की मिळू शकतं. शास्त्रज्ञ आणि माणूस म्हणून नारळीकरांना काही प्रमाणात जाणून घेण्यासाठी हे आत्मकथन नक्कीच मदत करू शकतं. सुनीताबाईंनी विचारलेल्या प्रश्नाचा उत्तरार्ध बरोबर होता, पण त्याचा पूर्वार्ध मात्र अपूर्ण होता, याची खात्री हे आत्मकथन वाचताना पटते. पण नारळीकरांसारखी माणसं इतकी अफाट आहेत, की त्यांच्याविषयी अशा एखाद्या पुस्तकातून पूर्णपणे जाणून घेता येणं शक्य होत नाही, हेही तितकंच खरं.
चार नगरांतले माझे विश्व - जयंत विष्णु नारळीकर, मौज प्रकाशन गृह, मुंबई
पृष्ठे - ५४६, मूल्य - ५०० रुपये.

No comments:
Post a Comment