Thursday, November 29, 2012

‘अजातशत्रू’ प्राध्यापक!

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही ‘समाजमान्यते’ची ठळक खूण मानली जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत ही समाजमान्यता शिक्षक, प्राध्यापक यांना होती, तशीच साहित्यिकांनाही होती. मराठीतले बहुतांश लेखक हे प्राध्यापक (मराठी व इंग्रजीचे ) आहेत. या प्राध्यापक मंडळींनीच मराठी साहित्याची बहुतांश निर्मिती केली आहे. त्यामुळे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना मिळाला, यातून त्यांची ‘समाजमान्यता’ सिद्ध होते

कोत्तापल्ले गेली चाळीस-बेचाळीस वर्षे अध्यापनाच्या क्षेत्रात आहेत. नांदेड जिह्यातील खेडय़ात जन्मलेल्या कोत्तापल्ले यांचा आजवरचा संघर्ष कौतुकास्पद आहे. मराठीचे अध्यापन, विद्यापीठीय संशोधन आणि महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील त्यांचा वावर जिनिअस म्हणावा असाच आहे. ‘अजातशत्रू’ असेच त्यांचे वर्णन केले जाते, कारण आपल्या सहकाऱ्यांना प्रत्येक गोष्टीत सामील करून घेत, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देत आणि गुणीजणांना प्रोत्साहन देण्याबाबत कोत्तापल्ले यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे. त्यामुळेच सर्व गटातटाच्या आणि संस्थांच्या लोकांमध्ये कोत्तापल्ले सहजपणे सामील होतात, त्यांना सामील करून घेतलंही जातं. अशा व्यक्ती अलीकडच्या काळात भिंग घेऊन शोधायची वेळ आली आहे. महाराष्ट्रातल्या उच्चशिक्षणाचा दर्जा आणि प्राध्यापकांचा वकूब दिवसेंदिवस घसरतोच आहे. 'प्राध्यापक' या शब्दाला हल्ली फारशी प्रतिष्ठा राहिली नाही त्याचे कारणही हेच आहे. किंबहुना हा शब्द आता 'मध्यमवर्गीय' या शब्दासारखा हेटाळणीसाठी वापरला जाऊ लागला आहे.
हा बदल गेल्या वीस वर्षांत झाला आहे. कारण या काळात प्राध्यापक आणि साहित्यिक यांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. एकेकाळी शिक्षक, प्राध्यापक आणि लेखक यांच्याविषयी समाजात मोठा आदर होता. त्यांच्या शब्दांना किंमत होती. ती अलीकडच्या काळात राहिली नाही. पूर्वी शिक्षक-प्राध्यापक मंडळी खाजगी टयूशनचा जोड धंदा करायची, आता ती  नियतकालिके (आयएसएसएन क्रमांक असलेली ) आणि प्रकाशन संस्था  यांचा जोड धंदा करू लागली आहेत. शासनाने आपल्याला भरपूर पगार, अनेक सवलती आणि कामाचे कमी तास दिले आहेत, ते आपण जो विषय शिकवणार आहोत, त्याची पूर्व तयारी-अभ्यास करण्यासाठी, हे समजून घेण्याएवढा  ज्यांचा वकूब नाही, त्यांच्याविषयी विद्यार्थांना आणि त्यांच्या पालकांना कसा आदर राहील?
अशा परिस्थितीत प्राध्यापक म्हणून नैतिकता, चारित्र्य आणि विद्वता यासाठी महाराष्ट्रात जी थोडी नावं घेतली जातात, त्यात नागनाथ कोत्तापल्ले यांचा प्राधान्याने समावेश केला जातो. ते निर्विवाद उत्तम शिक्षक आहेत. चांगल्या साहित्यिकाला जमणार नाही असे, विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ा घडवण्याचे काम त्यांनी इमाने-इतबारे केले आहे. ज्येष्ठ समीक्षक वा. . कुळकर्णी, सुधीर रसाळ, यु. . पठाण यांच्या संस्कारात वाढलेल्या कोत्तापल्ले यांनी तो वारसा अध्यापनातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे मौलिक काम केले आहेदासू वैद्य, इंद्रजीत भालेराव, कृष्णा किंबहुने हे त्यांचे विद्यार्थी मराठी साहित्यात नाव मिळवून आहेत.
वाङ्मयाची उत्तम जाण आणि सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती हा कोत्तापल्ले यांचा आजवरचा विशेष राहिला आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ते अशाच पद्धतीने, किंबहुना याहून अधिक चांगल्या प्रकारे काम करतील असा भरवसा वाटतो. कोत्तापल्ले यांच्या काळात पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग चैतन्याने आणि साहित्यमय वातावरणाने भारलेला होता. आपल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन, प्रशासन आणि उपक्रम  यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. प्रसंगी आपल्या भूमिकाही बाजूला ठेवल्या. तोच अनुभव ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू असतानाही आला. स्पष्टवक्तपणाचे अनुचित प्रयोग न करता सर्वाना सांभाळून घेत, त्यांचा विश्वास जिंकत, त्यांना पेलेल अशीच जबाबदारी देत काम करून घेण्याची नामी हातोटी कोत्तापल्ले यांच्याकडे आहे. हे कौशल्य त्यांना आता संमेलनाध्यक्ष म्हणून काम करताना अधिक उपयोगी ठरेल. त्यामुळे महाराष्ट्रातील मरगळलेल्या साहित्य वातावरणात उत्साह येईल आणि साहित्य संस्थांचा कारभार काही प्रमाणात तरी सुधारेल अशी आशा करायला हरकत नाही. साहित्य संस्था आणि त्यांची शिखर संस्था असलेले महामंडळ हा हल्ली वावदूकपणाचा आणि पोरकटपणाचा नमुना झाले आहे. या संस्थांत काम करणाऱ्या मुखंडांच्या जिभेला लगाम व हाताला काम मिळेल, अशी तजवीज कोत्तापल्ले नक्कीच करू शकतात. 

इथे गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की, कोत्तापले यांच्याविषयीची साहित्यिक म्हणून - अगदी साहित्य रसिकांचीही - समाजाची पाटी कोरी असण्याची शक्यता अधिक आहे. त्यांनी जवळपास तीसेएक पुस्तकांचे लेखन केले असले तरी! त्यांनी कथा, कविता, कादंबरी, संपादन, अनुवाद अशा विविध प्रकारांत लेखन केले असले तरी त्यांची मुख्य ओळख समीक्षक अशीच आहे. ‘नवकथाकार शंकर पाटील’, ‘ग्रामीण साहित्य-स्वरूप आणि शोध’,‘साहित्याचा अन्वयार्थ’, ‘मराठी कविता- आकलन आणि आस्वाद’ अशी पुस्तके लिहिणारा समीक्षक कधीच लोकप्रिय असत नाही. पण कोत्तापल्ले यांनी लक्षणीय कथालेखनही केले. त्यांच्या कथा संवेदशीलतेने सामाजिक वास्तव टिपतात. म्हणूनच के. . पुरोहित यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकालाही त्या मोलाच्या वाटतात. महात्मा फुले यांचे ‘शेतकऱ्याचा असूड’ आणि ताराबाई शिंदे यांचे ‘स्त्रीपुरुषतुलना’ यांच्या सुधारित आवृत्त्यांचे संपादनही त्यांचे आहे

कोत्तापल्लेंसारख्या उत्तम प्राध्यापकाची समाजाला जास्त गरज आहे. कारण अशी व्यक्तीच समाजाचे सांस्कृतिक नेतृत्व अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. हल्ली योग्य माणसाकडे योग्य पदे सोपवली जात नाहीत अशी ओरड होत असते, पण बऱ्याचदा योग्य पदासाठी योग्य माणसे मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती असते. कोत्तापले यां ना आध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला, याचा अर्थ असा होतो की, योग्य माणसाकडे योग्य पद सोपवले गेले आहे. ती जबाबदारी त्यांना उत्तम प्रकारे पार पडता  यासाठी शुभेच्छा!


No comments:

Post a Comment