Monday, June 17, 2013

सावध ऐका पुढल्या हाका...

LOKSATTA : Sunday, June 16, 2013


उदारीकरणाच्या गेल्या दोन दशकांमध्ये शेती, सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमं, चित्रपट, संगीत, साहित्य या क्षेत्रांमध्ये झपाटय़ानं अनेक स्थित्यंतरं झाली. यातल्या काही क्षेत्रांचा तर नव्या तंत्रज्ञानानं अगदी कायापालट करून टाकला आहे. तो केवळ स्तिमित करणारा आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर संगीताचं घेता येईल. एकेकाळी संगीताच्या तबकडय़ा होत्या. मग एल. पी. आल्या. नंतर कॅसेट निघाल्या. त्यानंतर सी.डी.चं आगमन झालं. आणि आता मोबाइल आणि आयपॉड आलेत. यातल्या प्रत्येक नव्या तंत्रानं आधीचं तंत्र मोडीत काढलं. पण या सर्व प्रवासात संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदतच झाली. पूर्वी संगीत ऐकण्यावर बऱ्याच मर्यादा होत्या आणि त्यामुळे ती एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. पण मोबाइल आणि आयपॉड या दोन्हींनी संगीताला फारच सोयीस्कर, सर्वगामी आणि सर्वसंचारी करून टाकलं. त्यामुळे संगीत ही कुठेही, केव्हाही ऐकण्याची गोष्ट झाली. लोकही त्याचा फायदा घेऊ लागले. लोकल, बस, शाळा-कॉलेज, ऑफिस, घरी, प्रवासात, अगदी टॉयलेटमध्ये असतानाही आता संगीत ऐकता येतं. लोक ते ऐकतातही. तंत्रज्ञानानं संगीताच्या बाबतीत ही जी काही उलथापालथ घडवली आहे, ती लोकांच्या संगीताविषयीच्या दबावामुळे घडली नसून त्या- त्या क्षेत्रातल्या शक्यता तपासण्याच्या महत्त्वाकांक्षेतून घडली आहे. या नवनव्या तंत्रांमुळे संगीताची उपयुक्तता वाढली आणि ते सहजसाध्य झालं, म्हणून त्याचा वापर वाढला. असे बदल इतरही काही क्षेत्रांमध्ये होत आहेत. त्यात मराठी प्रकाशन व्यवहाराचाही उल्लेख करावा लागेल. संगीताइतक्या पटीत नाही, पण तशा प्रकारे मराठी पुस्तकांबाबतही स्थित्यंतरं झाली आहेत, होत आहेत.

एकेकाळी पुस्तकं विकत घेणं ही खास मध्यमवर्गाची चैन होती. पण गेल्या वीस वर्षांच्या काळात मध्यमवर्गाचे उच्च, मध्यम आणि निम्न असे तीन वर्ग झाले असून त्यात फार मोठय़ा समाजसमूहाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आता पुस्तक विकत घेण्याविषयीची अनुकूलता कितीतरी पटींनी वाढली आहे. पूर्वी आवडही कमी आणि अनुकूलताही कमी होती. आता सेवासुविधांच्या साधनांमुळे, माहितीच्या प्रचंड स्फोटामुळे आणि पैशाच्या खुळखुळण्यामुळे आवड आणि अनुकूलता या दोन्हींबाबत परिस्थिती खूपच सुधारली आहे. साहित्य संमेलनामध्ये तीन दिवसांत होणारी काही कोटींची पुस्तकविक्री, गावोगावी सातत्याने होणारी पुस्तक प्रदर्शने, ५० रुपयांत पुस्तकं मिळताहेत म्हटल्यावर तासन् तास रांगा लावून पुस्तकं विकत घेणारे लोक- ही काही उदाहरणं यासंदर्भात लक्षात घेण्यासारखी आहेत.


कथा-कादंबरी-कविता या सर्जनशील विषयांवरील पुस्तकांची संख्या 'जैसे थे' असताना उपयुक्ततावादी पुस्तकांची संख्या मात्र कमालीची वाढली आहे. त्यांना वाचकांचा खूप चांगला प्रतिसादही मिळतो आहे. पण या पुस्तकांना खुद्द काही प्रकाशकांकडून नाकं मुरडली जातात. वस्तुत: उपयुक्ततावादी पुस्तकं म्हणताना आपल्याला नेमकं काय अभिप्रेत आहे, हे नीट समजून घेतलं पाहिजे. त्यात मानसिक आरोग्य, अध्यात्म, जीवनशैली, स्वास्थ्य, आहार, करिअरविषयक, संभाषणकौशल्य अशा पुस्तकांचा समावेश होईल. पण त्यातच अपारंपरिक प्रकारातल्या पुस्तकांना टाकून चालणार नाही. या प्रकारात खूप वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं प्रकाशित होत आहेत. आयुष्यभर तोंडी तलाकच्या विरोधात काम करणाऱ्या सय्यदभाई यांचे 'दगडावरची पेरणी', विठ्ठल कामत यांचे 'इडली, ऑर्किड आणि मी', शोभा बोंद्रे यांचे 'मुंबईचे डबेवाले', सुनील ठाणेदार यांचे 'ही तो श्रींची इच्छा', रमेश जोशी यांचे 'माझी कॉपरेरेट यात्रा' अशा अनेक पुस्तकांचा उल्लेख करता येईल. राजहंस, मनोविकास यासारख्या प्रकाशन संस्था अपारंपरिक पुस्तकं मोठय़ा प्रमाणावर प्रकाशित करत आहेत. त्यांना वाचकांचा चांगला प्रतिसादही मिळतो आहे. या प्रकारच्या पुस्तकांचं वाढलेलं मार्केट ही खरं तर फार आश्वासक अशी संधी आहे मराठी प्रकाशकांसाठी.


इंटरनेट, ब्लॉग, इंग्रजी वर्तमानपत्रे यांच्यामुळे जगातील बेस्टसेलर आणि गाजलेल्या पुस्तकांची माहिती सहजासहजी वाचकांपर्यंत पोहोचू लागली आहे. त्यातून गाजलेली पुस्तकं, त्यांचे लेखक यांच्याविषयी उत्सुकता निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन आधी मेहता पब्लिशिंग हाऊस आणि नंतर साकेत प्रकाशन यांनी अनुवादित पुस्तकं प्रकाशित करायला सुरुवात केली. मेहताने तर कितीतरी विषयांवरील पुस्तके अनुवादित केली आहेत, करत आहेत. ही सर्व पुस्तकं बेस्टसेलर तरी आहेत किंवा गाजलेली तरी. त्यांच्याविषयी मराठी वाचक आता पुरेसा सजग झाल्यामुळे या पुस्तकांना बाजारात मागणी आहे. 


एकेकाळी वर्षांला किमान हजार-बाराशे पुस्तकं मराठीत प्रकाशित होत. ही संख्या गेल्या वीस वर्षांच्या काळात वाढून आता तीन हजारांच्याही पुढे गेली आहे. म्हणजे दर महिन्याला २५०-३०० नवी पुस्तकं बाजारात येतात. त्यांच्या प्रत्येकी एक हजार प्रती गृहीत धरल्या तर साधारणपणे तीन लाख पुस्तकांच्या प्रती छापल्या जातात. प्रत्येक पुस्तकाची किंमत ढोबळमानाने शंभर रुपये धरली तर किती कोटी रुपयांची उलाढाल होते, याचा अंदाज करता येईल. 


पण तरीही पुस्तकांच्या किमती हा अजूनही कळीचा मुद्दा ठरतो आहे. इंग्रजीमध्ये एकाच पुस्तकाच्या साधारणपणे हार्डबाऊंड आणि पेपरबॅक अशा दोन प्रकारांतल्या आवृत्त्या काढल्या जातात. काही वर्षांपूर्वी आधी फक्त हार्डबाऊंड आवृत्ती प्रकाशित केली जायची. मग त्यानंतर काही महिन्यांनी वा एखाद् दुसऱ्या वर्षांने पेपरबॅक आवृत्ती काढली जायची. आता इंग्रजी प्रकाशक तसे करत नाहीत. ते एकाच वेळी दोन्ही आवृत्त्या बाजारात आणू लागले आहेत. म्हणजे त्या पुस्तकाबद्दलची वाचकांची ओढ तीव्र असतानाच ते बाजारात येते आणि त्याची चांगली विक्री होते. मराठी प्रकाशकांनाही हा पर्याय स्वीकारता येण्यासारखा आहे. मध्यंतरी '५० रुपयांत एक पुस्तक' या योजनेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, त्यावरून याची खात्री पटायला हवी. तसे झाले तर पुस्तकांची विक्री कितीतरी पटींनी वाढेल. 


काळ बदलतो तशी वाचकांची अभिरुची बदलते. एकेकाळी शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, लेखक, संशोधक, शास्त्रज्ञ अशा बुद्धिजीवी लोकांपुरतीच पुस्तकं ही 'नडीव' गोष्ट होती. आता ती तशी राहिलेली नाही. तिचा परीघ कितीतरी पटींनी विस्तारला आहे. मात्र, त्या आसुसलेल्या, पुस्तकांची वाट पाहणाऱ्या वाचकांपर्यंत पोहोचण्यात मराठी प्रकाशकच कमी पडत आहेत. 


कुठलंही नवं माध्यम आलं की, त्याचे फायदे आणि तोटे सांगणारे लोक पुढे येत असतात. म्हणजे स्वागत करणारे आणि विरोध करणारे. ते मराठी प्रकाशन व्यवहारातही आहेत. ई-बुक रीडरमुळे छापील पुस्तकांचं भवितव्यच धोक्यात येणार असल्याची हाकाटी काहींनी सुरू केली आहे. छपाईचा शोध हा मानवाला लागलेला सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत स्वरूपाचा शोध आहे. म्हणजे असं की, छपाईचा शोध विजेच्या शोधासारखा आहे. वीज वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध होईल, तिचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येईल; पण तिला मोडीत काढून नवंच काहीतरी उभं राहणं हे जसं कठीण आहे, तसंच पुस्तक छपाईचंही आहे (सौरऊर्जा, बायोगॅस हे विजेला पर्याय म्हणून शोधले गेले असले तरी त्यामुळे विजेची अपरिहार्यता अजिबात कमी झालेली नाही!). त्यामुळे ई-बुक रीडरमुळे पुस्तकवाचनावर काही परिणाम होईल असे वाटत नाही. शिवाय त्यांची संख्या जेमतेम दोन टक्के भरेल इतकीही नाही. पण नको त्या गोष्टीसाठी आरडाओरड करणं ही काही मराठी प्रकाशकांची फॅशन झाली आहे. 


इंटरनेटमुळे बातम्या, छायाचित्रं, लेख, पुस्तकं, कोश सहजासहजी उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे लोकांची माहितीची भूक वाढली आहे. कारण माहिती मिळवणं सोपं झालं. त्यामुळे लोक इंटरनेटवर बऱ्याच गोष्टींसाठी अवलंबून राहू लागले आहेत. त्यातून वाचनाच्या दिशा विस्तारायला मदतच झाली आहे. 


याचं चांगलं प्रत्यंतर येतं ते 'अक्षरधारा'च्या पुस्तक प्रदर्शनात. महाराष्ट्रभर फिरून पुस्तक प्रदर्शन करणाऱ्या या संस्थेने इंटरनेट आणि इतर ठिकाणांहून माहिती पोहोचून उत्सुकता चाळवलेल्या लोकांना आधी पुस्तकांपर्यंत आणण्याचं काम केलं. मग त्यांच्यापुढे वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांचे अगणित पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे केवळ पुस्तकं पाहण्यासाठी, कुणाला तरी भेट देण्यासाठी वा मुलांसाठी पुस्तकं विकत घ्यायला येणारा मध्यमवर्ग हळूहळू चाराऐवजी सहा आणि सहाऐवजी दहा पुस्तकं एकाच वेळी विकत घेऊ लागला. 'अक्षरधारा'च्या पुस्तक प्रदर्शनात येणारा बहुतांश ग्राहक हा पुस्तकांविषयी उत्सुकता असणारा, पण वाचनाविषयी तसा अनभिज्ञ असलेला असतो. 
उदारीकरणाचा काळ हा अधिक चांगल्या प्रकारे व्यावसायिकता अंगी बाळगण्याचा काळ आहे. त्या तुलनेत मराठी प्रकाशन व्यवहार मात्र अजून सुशेगात आहे. लेखकाचे मानधन, पुस्तकांची विक्री, जाहिरात, वितरण, प्रसिद्धी यांबाबत ते गाफील म्हणावे इतके मागे तरी आहेत किंवा रडके तरी आहेत. शिवाय जुनी नीतिमूल्यं उराशी कवटाळून बसलेले आहेत. स्वत:हून कुठलाही नवीन बदल स्वीकारायचा नाही; पण इतर कुणी करत असेल तर त्याला मात्र नावं ठेवायची! 


आजचं बदलतं समाजवास्तव टिपणाऱ्या, त्यांना भिडू पाहणाऱ्या विषयांचा शोध घेऊन त्यावर पुस्तकं लिहून देणाऱ्या लेखकांचा शोध घेणं आणि त्यांना लिहितं करण्याची गरज आहे. लेखकानं प्रकाशकाकडे हस्तलिखित आणून देणं आणि प्रकाशकाने ते प्रकाशित करणं, यापेक्षा आता प्रकाशकांनी नव्या विषयांचा आणि नव्या लेखकांचा शोध घेणं गरजेचं झालं आहे. साधना प्रकाशनाला फारसं मनुष्यबळ हाताशी नसताना, कुठलीही यंत्रणा नसताना जे शक्य होत आहे, ते ज्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित करत आहेत, आणि त्यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्यातून चार गोष्टी व्यावसायिक प्रकाशकांना शिकता येण्यासारख्या आहेत. नक्षलवाद ही आजची अतिशय ज्वलंत राष्ट्रीय समस्या आहे. त्यावरचं मराठीतलं पहिलं पुस्तक साधनानं प्रकाशित केलं. हे इतर कुठल्याही प्रकाशकाला सुचलं नाही. अजूनही या विषयावर मराठीत लेखन होण्याची नितांत गरज आहे. अशीच- बदलता ग्रामीण महाराष्ट्र, बदलती शहरं यांची स्पंदनं टिपणारं, त्यात होणाऱ्या बदलांना गवसणी घालू पाहणारी पुस्तकं येण्याचीही तेवढीच निकड आहे. उदारीकरणाचं समर्थन करणारं, त्याचं स्वागत करणारं लेखन मराठीत कुणीही करताना दिसत नाही. समर्थन न करू दे; पण होत असलेले बदल तरी आपण नीटपणे समजून घेणार आणि समजावून देणार आहोत की नाही, याचा मराठी प्रकाशकांनी गांभीर्याने विचार करायची गरज आहे.

  
थोडक्यात, उदारीकरणाच्या काळाने मराठी प्रकाशन व्यवहारात अनेक संधी निर्माण केल्या आहेत, तशी काही आव्हानेही उभी केली आहेत. या संधीचा मराठी प्रकाशक जितक्या चांगल्या प्रकारे लाभ उठवतील आणि आव्हानांना जेवढय़ा धीराने सामोरे जातील, तेवढं त्यांच्या आणि वाचकांच्याही फायद्याचंच आहे!

No comments:

Post a Comment