Sunday, February 1, 2015

भारत नावाचं डम्पिंग ग्राउंड



भारतातील इंग्रजी प्रकाशन व्यवसाय भारतीय मध्यमवर्गाबरोबरच वाढतो आहे. त्यामुळे अमेरिकेतील मोठय़ा प्रकाशन संस्थाही भारतीय बाजारात पेठेत दाखल होऊ लागल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच अ‍ॅमेझॉन डॉट कॉमनं पुस्तक विक्री आणि इतर वस्तूंच्या ऑनलाइन विक्रीत उडी घेऊन फ्लिपकार्ट, इन्फिबीम, ईबे यांसारख्या काही कंपन्यांपुढे मोठं आव्हान उभं केलं आहे. ही स्पर्धा इतकी अटीतटीची होऊ पाहत आहे की, 'आम्ही आमची कंपनी कुठल्याही परिस्थितीत कुणालाही विकणार नाही,' असं सांगणारे फ्लिपकार्टचे संस्थापक प्रमुख सचिन-बिनी बन्सल आता बंगलुरूमधील Myntra या ऑनलाइन कंपनीबरोबर विलीनीकरणाच्या पवित्र्यात आहेत. असो. सांगायचा मुद्दा असा की, या पाश्र्वभूमीवर 'भारत हे अमेरिकन साहित्याचं डम्पिंग ग्राउंड होण्याची शक्यता आहे,' असं विधान ब्रिटिश लिटररी एजंट डेव्हिड गॉडविन यांनी नुकत्याच कोलकात्यात झालेल्या साहित्य महोत्सवामध्ये केलं आहे. गॉडविन ही प्रकाशनक्षेत्रातील अतिशय जाणकार आणि अभ्यासू व्यक्ती आहे. याशिवाय ते अरुंधती रॉय, विक्रम शेठ, अरविंद अडिगा, किरण देसाई, विल्यम डॅलरिम्पल, जीत थाईल या बुकर प्राइझपर्यंत पोचलेल्या वा त्यासाठी नामांकन मिळालेल्या लेखकांचे 'लिटररी एजंट' आहेत. गॉडविन यांनी पुढं म्हटलं आहे की, 'मोठय़ा प्रकाशन संस्था भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे पण त्यामुळे छोटय़ा प्रकाशन संस्था स्पर्धेतून बाहेर फेकल्या जात आहेत.' मोठय़ा प्रकाशन संस्थांकडे मोठं आर्थिक बळ, यंत्रणा आणि संसाधनं असल्यानं छोटय़ा आणि एकहाती चालणाऱ्या प्रकाशन संस्थांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संस्था प्रकाशन व्यवसायातल्या 'समांतर चळवळी'चे शिलेदार आहेत. त्या प्रवाहाबाहेर फेकल्या जाणं, हे भारतीय प्रकाशन व्यवसायासाठीच नव्हे तर चांगलं साहित्य वाचू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठीच आपत्ती ठरू शकतं. मात्र या नव्या बाजाराचा अमेरिकन प्रकाशन संस्था मोठय़ा प्रमाणावर फायदा करून घेत आहेत. सध्या भारतीय बाजारात ज्या प्रकारचं पल्प फिक्शन दिसतं, ते बहुतांशी अमेरिकन तरी असतं किंवा त्याचं अनुकरण तरी. रॅण्डम हाऊससारख्या मोठय़ा प्रकाशन संस्था भारतीय बाजारपेठेत बेस्टसेलर ठरलेली वा ठरवली गेलेलीच पुस्तकं पाठवतात. याच प्रकाशन संस्थांची चांगली, दर्जेदार म्हणावी अशी पुस्तकं भारतीय पुस्तक विक्रेत्यांनी मागितली तर त्यांच्या मागणीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही वा ते गांभीर्यानं घेतलं जात नाही. बऱ्याचदा भारतात चांगली पुस्तकं विकत मिळत नाहीत, त्याचं कारणही हेच आहे. म्हणजे आपल्याला हवा तोच माल रेटत राहायचा, त्याचीच सवय लोकांना लावायची आणि रग्गड पैसा मिळवायचा, अशी सरळ सरळ व्यावसायिक रणनीती अमेरिकन प्रकाशन संस्थांची आहे.  आणि त्यात आपण फसतो आहोत… निव्वळ कचरा माथ्यावर मारून घेत आहोत.

No comments:

Post a Comment