Sunday, February 1, 2015

गुलज़ार बोलतात त्याची कविता होते

भारतीय मध्यमवर्गाचा ताळेबंद मांडणाऱ्या पवन वर्मा यांनी अलीकडे अनुवादकाच्या भूमिकेत प्रवेश केला आहे आणि उर्दू-हिंदीतील लोकप्रिय गीतकार-कवी गुलज़ार यांची पुस्तके इंग्रजीत अनुवादित करण्यास सुरुवात केली आहे. गुलज़ार यांच्या 'सिलेक्टेड पोएम्स', 'निग्लेक्टेड पोएम्स' या दोन कवितासंग्रहानंतर 'ग्रीन पोएम्स' हा त्यांनी अनुवादित केलेला तिसरा संग्रह. दरम्यान 'हाफ अ रुपी' या नावाने गुलज़ार यांच्या निवडक कथांचाही अनुवाद केला आहे. वर्मा यांनी याआधी कैफ़ी आज़्‍ामी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचाही इंग्रजी अनुवाद केला आहे. त्यामुळे कवितांचा अनुवाद करायला ते सरावलेले आहेत, असं समजायला हरकत नाही. या संग्रहात गुलज़ार यांच्या निसर्गाविषयीच्या ५९ कविता आहेत. नदी, तळी, ओढे, पर्वत, बर्फ, पाऊस, ढग, आकाश, जमीन, हवा, झाडे यांच्याविषयीच्या या कविता निसर्गाविषयीची हळुवार आणि चैतन्यशील भावना उजागर करतात. माती, जमीन, पाणी याविषयी गुलज़ार यांचं आतडय़ाचं नातं आहे. निसर्गाला ते आपल्या अवतीभवतीची सर्वात चैतन्यशील आणि रसरशीत दुनिया मानतात. त्यामुळे त्याविषयी लिहिताना गुलज़ार आपली अक्षरे मोरपंखाच्या बोरूने लिहितात. या कविता म्हणजे जणू काही निसर्गातील विविध घटकांची स्वगतं आहेत, फक्त ती गुलज़ार यांच्या शब्दांतून उतरली आहेत. त्यामुळे आपलं म्हणणं सांगताना ती काव्यमय भाषेचा आणि लीनतेचा आधार घेतात. अतिशय प्रेमानं आपल्याशी हिजगूज करतात. त्यामुळे ही निसर्गसूक्तं आवाहनांनी भरलेली आहेत. त्यांच्या हाकांनी आपलं लक्ष वेधून घेतात.
गुलज़ार ज्याला स्पर्श करतील त्याची कविता होते. त्या कवितेला लय, नाद, स्वाद, रुची, गंध, सारं काही असतं. म्हणून ती समोरच्याला वेढून टाकते. या कविता वाचकाला नवी 'नजर' देतात, निसर्गाकडे पाहण्याची. त्याला अनुभवण्याची. त्याच्या जवळ जाण्याची. आणि त्याला आपल्यात सामावून घेण्याचीसुद्धा.
वर्मा यांनी इंग्रजी अनुवादाबरोबर त्यांचे हिंदी लिप्यंतर दिले आहे. त्यामुळे अनुवाद ताडून पाहण्याचीही आयतीच सोय झाली आहे.
ग्रीन पोएम्स : गुलज़ार, अनुवाद - पवन के. वर्मा,
 पेंग्विन बुक्स, गुरगाव,
 पाने : १३१, किंमत : २५० रुपये.



No comments:

Post a Comment