Thursday, September 4, 2014

दादोजी, शिवाजी महाराज आणि सत्य

'सध्याचे युग हे इतिहासाचे सर्वाधिक भान असलेले युग आहे. आधुनिक मानवाला कधी नव्हती इतकी स्वत:ची आणि म्हणून इतिहासाची जाणीव असते.. भूत, वर्तमान आणि भविष्य हे जिला शेवटचे टोक नाही अशा इतिहासाच्या साखळीतले दुवे आहेत.' 
हे अवतरण प्रसिद्ध इतिहासकार ई. ए. कार यांच्या 'इतिहास म्हणजे काय' या पुस्तकातील १५९ पानावरील आहे. भांडारकर संस्थेवरील हल्ल्यानंतरच्या गेल्या १० वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या इतिहासाच्या प्राध्यापकांचं, अभ्यासकांचं आणि काही स्वयंघोषित संशोधकांचं इतिहासाविषयीचं भान आणि इतिहासातील योग्य दुवे जोडण्याचे प्रयत्न हे हेतुपुरस्सररीत्या आणि संशयास्पद असल्याचं उघड उघड दिसतं. ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही, पण भांडारकर संस्थेवरील हल्ल्यानंतर त्याला जे विघातक स्वरूप आलं आहे, त्यातून इतिहासाची मोडतोड करण्याची, तो सोयीस्कररीत्या लिहिण्याची आणि इतिहासाच्या नावाखाली दमदाटी करण्याची अहमहमिकाच सुरू असल्याचं दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज तर यातील सर्वाधिक स्फोटक आणि वादग्रस्त विषय झाला आहे.
जेम्स लेन नामक एका पाश्चात्त्य लेखकानं 'शिवाजी : अ हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकात दादोजी कोंडदेव यांच्याविषयी केलेलं एक विधान या सर्वाला कारणीभूत ठरलं. आणि दादोजी यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासातून हद्दपार करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. इयत्ता चौथीचे क्रमिक पुस्तक बदलणं, लाल महालातील दादोजी यांचा पुतळा हटवणं आणि या सर्वाच्या आधी भांडारकरवरील हल्ला अशी ही मालिका पद्धतशीरपणे घडवली गेली. मराठा संघटना इतक्या आक्रमक झाल्या की, परिणामी शिवाजी महाराजांविषयी काही काळ बोलणंच बंद झालं. इतिहासाविषयी लेखन करणाऱ्यांमध्ये ब्राह्मण-ब्राह्मणेतर असे सरळ सरळ दोन तट पडले. आणि या दोन्ही तटांनी विविध ठिकाणी लेख लिहून एकमेकांना खोडून काढायला सुरुवात केली. 

या पुस्तकात ब्राह्मणेतरांनी दादोजी यांच्याबद्दल केलेल्या दाव्यांचं खंडण-मंडण करण्याचा प्रयत्न आहे. ब्राह्मणेतर लेखकांच्या लेखनात जसा आवेश, केवळ दोषारोप आणि आक्रमकता दिसते, तशीच या पुस्तकातही काही प्रमाणात आहे. पण ती ब्राह्मणेतर लेखकांइतकी अनाठायी नाही.
दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं, त्यांची नेमणूक खुद्द शहाजीराजांनीच केली होती, या दोन विधानांत या पुस्तकातलं सार संपतं. बाकी ब्राह्मणेतर लेखकांच्या लेखांना प्रत्युत्तर, त्यांचे दावे खोडून काढणं आणि त्यांच्या विधानातील विसंगती उघड करणं, असा भाग आहे. सरळ आणि स्पष्टच सांगायचं तर ब्राह्मणेतर लेखकांनी दादोजींविषयी केलेल्या लेखनाला खोडून काढण्याचा हा प्रयत्न आहे. आणि तो एका मर्यादित अर्थानं स्तुत्य आहे. कारण दादोजी यांचं शिवाजी महाराजांच्या जडणघडणीतलं स्थान नाकारण्यात काहीच अर्थ नाही. ज्यांना सत्य बोलण्याचं भय वाटतं, ते लोक असत्य विधानं करतात तेव्हा खरं तर इतिहासाचं काहीच नुकसान होत नाही. समाजाची काही काळ दिशाभूल होते. पण शेवटी जॉर्ज ऑर्वेल म्हणतो त्याचं प्रत्यंतर येतंच. तो म्हणतो - 'तुम्ही सर्व काळ सर्व लोकांना मूर्ख बनवू शकत नाही.' या पुस्तकाच्या वाचनातून लक्षात घेण्याची गोष्ट आहे ती एवढीच.
ज्यांना केवळ पुराव्यांची मोडतोड करायची आहे, सत्य दडवून ठेवायचं आहे आणि निव्वळ दमदाटी करायची आहे, त्यांची दखल न घेण्यातच सुज्ञता आहे. आणि ती महाराष्ट्रातील सुज्ञ जाणकारांनी गेल्या १० वर्षांत चांगल्या प्रकारे या प्रसंगाच्या संदर्भात दाखवली आहे. कारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर इतिहासविषयक लेखन करणाऱ्यांची शाब्दिक लढाई सत्यापेक्षा सत्याचा अपलाप करणारी आहे. आणि म्हणून त्याज्य आहे. असो. या पुस्तकातून लेखकाची तळमळ दृगोचर होते. आणि ती इष्टच आहे.
'हिंदूवी स्वराज्याचे कारभारी दादोजी कोंडदेव : खंडण आणि मंडण' - श्यामसुंदर सुळे, अखिल भारतीय मराठा विकास परिषद, तळेगाव, जि. पुणे, पृष्ठ- २४८,  मूल्य- ८० रुपये.

Monday, August 18, 2014

मराठा आरक्षणाचे मतलबी गाजर

मराठा आरक्षणाची मागणी ही तशी १९८९ पासून केली जात आहे. अलीकडच्या काळात, विशेषत: मंडलोत्तर जागतिकीकरणाच्या काळात तिला विशेष जोर आला आहे. आरक्षणाची मागणी करणाऱ्या विविध मराठा संघटना उदयाला आल्या. नवशिक्षित-अर्धशिक्षित बेरोजगार आणि संतप्त मराठा तरुणांना या संघटनांनी 'आरक्षणामुळे आपले प्रश्न सुटतील' असे आमिष दाखवल्याने आणि त्यांच्या सरंजामी मानसिकतेला चुकीच्या इतिहासाचे खतपाणी घातल्याने आरक्षणाच्या प्रश्नाचा तवा तापत आला आहे. अखेर एकदाचे जुलै महिन्यात राज्य सरकारने शिक्षण व नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देऊ  केले आहे. 'मराठा आरक्षण-भूमिका आणि वास्तव' हे पुस्तक त्याआधी दोन-चार दिवस म्हणजे २९ मे रोजी प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात पंचवीस लेख आहेत. कालेलकर आयोग, मंडल आयोग, न्या. बापट अहवाल, नचिअप्पन अहवाल याविषयीची थोडक्यात माहिती दिली आहे.  गोपीनाथ मुंडे, अशोक चव्हाण, विनोद तावडे, सुभाष देसाई, नारायण राणे, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले या राजकीय नेत्यांचे लेख आहेत, तर छत्रपती संभाजीराजे भोसले, विनायक मेटे, पुरुषोत्तम खेडेकर, प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे, दत्तात्रय परभणे या मराठा संघटनांच्या नेत्यांचे लेख आहेत. लेखकाच्या म्हणण्यानुसार त्याने संबंधितांच्या मुलाखती घेऊन हे लेख तयार केले आहेत; तर शरद पवार यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर एका स्वतंत्र लेखात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राजकीय नेत्यांचे व संघटनांच्या पुढाऱ्यांचे लेख वाचून खरे म्हणजे मोठी करमणूक होते. या सर्वानीच मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे, अशी भूमिका घेतली आहे. 'आपण मराठा समाजाच्या विरोधात आहोत', या अपप्रचाराच्या भीतीचे मूर्तिमंत रूप त्यांच्या लेखात स्वच्छपणे पडलेले दिसते.
या पुस्तकात पी. बी. सावंत, बी. जी. कोळसे-पाटील या माजी न्यायाधीशांचेही आरक्षणाचे समर्थन करणारे लेख आहेत. मराठा आरक्षणाचे उघड आणि थेट समर्थन तर करता येत नाही, म्हणून मग थोडंफार आडवळण घेत, राजकीय पुढाऱ्यांवर टीका करत त्यांनी आरक्षणाचे समर्थन केले आहे. सावंत हे मंडल आयोग छाननी समितीत होते. तरीही ते सुरुवातीपासून आणि या पुस्तकातील लेखातही मराठा आरक्षण घटनेच्या निकषावरही टिकेल असे म्हणतात, ही आश्चर्याची बाब आहे.
एकीकडे मराठी समाजाचा ओबीसीत समावेश केला म्हणजे आरक्षण देता येईल, या हुशारीने मराठा समाजाच्या काही संघटना आणि त्यांचे नेते मराठय़ांना ओबीसी कोटय़ातून आरक्षण मिळायला हवे, अशी भूमिका कधी छुपेपणाने तर कधी उघडपणाने घेताना दिसतात. या पुस्तकातील त्यांच्या लेखांमधूनही तीच रणनीती उघड होते.
पण हे सर्व लेख प्रतिक्रियावजा आहेत. लेखकाने केलेले शब्दांकन यथातथा म्हणावे या पात्रतेचे आहे. 'लोकांना सत्य समजावे' म्हणून लेखकाने केलेला 'नि:पक्ष आणि प्रामाणिक प्रयत्न' स्तुत्यच आहे, पण त्याला अधिक मेहनतीची आणि अभ्यासाची जोड दिली असती तर अधिक बरे झाले असते. कुठलाही तार्किक विचार नसल्यावर आणि कुठल्याही विषयाचा नीट अभ्यास नसल्यावर तांबट आळीतल्या ठोकाठोकीसारखा नुसताच खणखणाट होत राहतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठा आरक्षणावरून केले जाणारे राजकारण. ते किती वरवरचे, मतलबी आणि संधिसाधू आहे, याची झलक या पुस्तकातून नक्की कळू शकेल.
 'मराठा आरक्षण : भूमिका आणि वास्तव' - व्यंकटेश पाटील, ज्योतीचंद्र पब्लिकेशन, लातूर,

पृष्ठे - १६८, मूल्य - १०० रुपये. 

Tuesday, July 29, 2014

तिस-या प्रहरातील प्रश्नोपनिषद

प्रा. विजया राजाध्यक्ष म्हटले की, ‘बहुपेडी विंदा’, ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’, ‘कवितारती’, ‘शोध मर्ढेकरांचा’, ‘पुन्हा मर्ढेकर’ असे समीक्षाग्रंथ आठवतात. ‘संवाद’ या पुस्तकामध्ये विजयाबाईंनी विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ आणि वा. ल. कुलकर्णी यांच्या घेतलेल्या वाङ्मयीन मुलाखती मोठ्या रोचक आहेत.  विजयाबाईंनी आस्वादक समीक्षेला मराठीमध्ये काहीएक प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कामी काही दमदार पावले टाकली आहेत. पण तरीही आस्वादक समीक्षेविषयीचे समज काही पूर्णपणे नाहिसे झालेले नाहीत. या समीक्षालेखनाला दुय्यम मानले जातेच. पण विजयाबाईंनी त्याची पर्वा न करता आपले लेखन चालूच ठेवले आहे. दोन वर्षापूर्वी त्यांना विंदा करंदीकरांच्या नावाचा पहिला पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी आरती प्रभूंवर लेखन करण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

थोडक्यात विजयाबाई पूर्णपणे वाङ्मयीन स्वरूपाचे-त्यातही समीक्षात्मक स्वरूपाचे लेखन करणा-या लेखिका आहेत. पण एवढीच काही त्यांची ओळख नाही. विजयाबाई प्रदीर्घ काळ कथालेखनही करत आल्या आहेत. आत्तापर्यंत त्यांचे सतरा-अठरा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. नुकतेच त्यांचे नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पण ते समीक्षालेखन नाही की कथासंग्रह नाही. तो चक्क दोन कादंब-यांचा संग्रह आहे. या पुस्तकाचे नाव आहे, तीन प्रहर. या संग्रहामध्ये दोन लघुकांदब-या आहेत. म्हणजे आकाराने त्या लहान आहेत म्हणून त्यांना ढोबळ अर्थाने लघुकादंब-या म्हणायचे. विजयाबाईंनी ‘कादंबरी की लघुकादंबरी? वाचकांनीच ते ठरवावे’ असे प्रास्ताविकात सांगून टाकले आहे.

विशेष म्हणजे कादंबरी लेखनाचा विजयाबाईंचा हा पहिलाच प्रयत्न आहे. यातील ‘बंदिश’ ही पहिली कादंबरी ‘माझ्या लेखनप्रवासात घडलेला हा एक अपघात आहे’ असे त्यांनी प्रास्ताविकात लिहिले आहे, तर ‘आयुष्य : पहिलं की तिसरं?’ ही दुसरी कादंबरी हाही कादंबरी लेखनाची वाट शोधण्याचा, ती काही अंशी सापडली असे वाटण्याचा अनुभव’ असे लिहिले आहे. म्हणजे पुस्तकाचे नाव ‘तीन प्रहर’, त्यात दोन लघु म्हणाव्या अशा कादंब-या आणि प्रत्यक्षात तिस-या प्रहरातल्या विजयाबाईं-सारख्या व्रतस्थ समीक्षक-कथालेखिकेनं लिहिलेल्या, असा हा योग आहे. यातून या दोन्ही कादंब-यांचे विषय माणसाच्या तिस-या प्रहारातील जीवनाविषयीचे आहेत, हे ठसठशीतपणे अधोरेखित करायचे असावे.

‘बंदिश’ ही कादंबरी एका शास्त्रीय गायकाविषयीची आहे. म्हणजे संगीत हे तिच्या मध्यवर्ती आहे. जोगबुवा आणि विष्णू यांच्या संबंधांतून ही कादंबरी फुलत जाते. आयुष्य सपाट नसते, त्यात अनेक आरोह आणि अवरोह असतात. या दोन्हींची मिळून बंदिश होते.

‘आयुष्य : पहिलं की तिसरं?’ ही तर सरळ सरळ ‘नयन लागले पैलतीरी’ अशा अवस्थेत असलेल्या वामनराव आणि त्यांच्या कुटुंबाची कथा आहे. या दोन्ही कादंब-यांचे तपशील खूप देता येतील, पण त्या लघुकादंब-या असल्याने ते फार देण्यात अर्थ नाही. पण या दोन्ही कादंब-यांची काही साम्यस्थळे सांगता येतील. या दोन्हींमध्ये तिसरा प्रहर हा काळ मुख्य आहे. म्हणजे त्या काळात जगणा-या दोन नायकांची ही रुढार्थाने कथा आहे. शिवाय या दोन्हींमध्ये पात्रांची संख्या अगदी मोजकी आहे. ही कथानके तशी फार नावीन्यपूर्ण नाहीत, पण वाचनीय नक्कीच आहेत.

लेखिका काहीतरी सांगू पाहतेय, ते आपल्यापर्यंत पोहचतेही. पण थेटपणे भिडते का, याचे उत्तर फारसे समाधानकारकपणे देता येत नाही. पण लेखिकेनं या दोन्ही कादंब-यांच्या निमित्ताने वाधर्क्यातील माणसांविषयी काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते प्रश्नोपनिषद समजून घ्यायला हवे.

विजयाबाईंनी काही वर्षापूर्वी ‘मराठीतील काही कादंब-या या भरकटलेल्या कथा आहेत, असे म्हटले जाते. त्याला धरून असे म्हणता येईल की काही कथा या गुदमरलेल्या कादंब-या आहेत,’ असे विधान केले होते. त्याची इथे आठवण इथे होते, पण ती निराळ्या अर्थाने. कारण प्रस्तुत पुस्तक वाचून वाटते की, हा काही नियम असेलच असे मानायचे कारण नाही. किमान या पुस्तकाला तरी ते लागू पडत नाही. कारण विषयाच्या आवाक्यानुसारच त्यांची लांबी आहे. त्याला कादंबरी म्हणा किंवा लघुकादंबरी फारसा काही फरक पडत नाही. पण हे सगळे आपले वाचक म्हणून. अभ्यासू समीक्षकांची मते कदाचित वेगळीही असू शकतात.

तीन प्रहर : विजया राजाध्यक्ष, राजेंद्र प्रकाशन, मुंबई

‘मायाबाजारा’तली माणसं!

या संकलनात मंटोनं लिहिलेली बारा व्यक्तिचित्रं आहेत आणि त्या सर्वच व्यक्ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आहेत. यात अशोककुमार, नर्गिस, नसीम बानो, बाबूराव पटेल, सितारा, नूरजहाँ या परिचित नावांचा समावेश आहे, तसाच कुलदीप कौर, रफ़ीक ग़ज़नवी, बी. ए. देसाई, नवाब काश्मिरी, पारो, श्याम अशी काही फारशा चित्रपटशौकिन नसणा-यांसाठी अपरिचित म्हणावी अशीही नावं आहेत.

मंटो हाच मुळात कलंदर आणि वेडापीर म्हणावा असा लेखक! जगण्याशी सतत चार हात करत अनेक लेखकांना सतत प्राप्त परिस्थितीशी झगडावं लागतं. पण मंटोला तर त्याच्या लेखनाशीही झगडावं लागलं. त्याच्या लेखनावरून अनेकदा गदारोळ झाले, कोर्टकचे-या झाल्या; त्याचा मंटोला खूप मनस्तापही झाला. मंटो आपल्या परीनं झगडत राहिला. त्यात काही काळ मंटो मुंबईतल्या हिंदी चित्रपटसृष्टीतही झगडत होता. त्या काळात मंटोचा पडद्यावरील आणि पडद्यामागच्या अनेक कलाकारांशी संपर्क आला. मंटो मुळात माणसांचा लोभी होती. त्याला माणसं आवडायचीच. तो सतत माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करत असायचा. त्याच्या कथा वाचताना याचा सातत्यानं प्रत्यय येत राहतो.

या संकलनाच्या मलपृष्ठावर मुहम्मद हसन अस्करी यांचा अभिप्राय आहे. तो असा- ‘‘मंटोच्या दृष्टीने कोणताही माणूस मूल्यहीन नव्हता. तो प्रत्येक माणसाला अशा विश्वासाने भेटायचा की त्याच्या अस्तित्वात कोणता ना कोणता अर्थ दडलेला असेल आणि एक ना एक दिवस हा अर्थ व्यक्त होईल. अशा विलक्षण माणसांबरोबर त्याला आठवडेच्या आठवडे भटकताना मी पाहिलं आहे. मला आश्चर्य वाटायचं की मंटो यांना कसं काय सहन करतो! पण मंटोला बोअर होणं माहीत नव्हतं. त्याच्यासाठी प्रत्येक मानवी जीवन आणि माणूस निसर्गाचं एक रूप होतं; तसंच प्रत्येक व्यक्ती मनोवेधक होती. चांगलं व वाईट, बुद्धिमान व मूर्ख, सभ्य व असभ्य असा प्रश्न मंटोजवळ जरादेखील नव्हता. त्याच्याजवळ माणसांचा स्वीकार करण्याची इतकी विलक्षण क्षमता होती की त्याच्यासोबत जो माणूस असेल, त्याच्यासारखाच तो व्हायचा.’’

या संकलनातली माणसं काही तशी सामान्य नव्हेत. मंटो ज्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत वावरत होता, तेव्हा ही माणसं फारशी नावारूपाला आली नव्हती, त्यातली काही नंतर बाहेरही पडली. पण अस्करी म्हणतात त्याप्रमाणे मंटोनं त्यांच्यासोबत जो काही काळ घालवला, त्यांचं काम पाहिलं, तो संपूर्ण काळच मंटोनं प्रत्येक व्यक्तिचित्रात उभा केला आहे. माणूस समजून घेताना मंटो त्याचा भवतालही समजून घेत असे. त्याच्या नजरेनं जगाकडे पाही. त्यामुळे ही सर्वच व्यक्तिचित्रं मनोवेधक झाली आहेत.

जगण्याचा संघर्ष, ऐश्वर्य आणि परत गतकाळाकडे हे चक्र उलटसुलट, तिरपागडं किंवा वाकडंतिकडं वाटय़ाला आलेल्या माणसांच्या कहाण्या काहीशा विदारक होतात. त्याला कधीकधी फार तार्किक कारणंही नसतात. पण कधीकधी चुकीचा काळ मात्र असतो. मंटोचे या संकलनातले नायक-नायिका तर ‘मायाबाजारा’तलेच होते आणि मंटोही त्यांच्यातच होता. त्यामुळे त्याच्यासाठी आतले-बाहेरचे असा हा प्रवास नव्हता. म्हणून या संकलनातून या बारा व्यक्तींबरोबर मंटोही तुकडय़ातुकडय़ातून उलगडतो.

याचा अनुभव अशोककुमारवरील पहिल्याच लेखात येतो. मंटोनं या लेखात अशोककुमार आणि बॉम्बे टॉकिजविषयी  लिहिलं आहे. अशोककुमारच्या अगदी साध्यासाध्या गोष्टीतून त्याच्या व्यक्तिमत्त्वावर पुरेसा प्रकाश टाकला आहे. पण त्याचवेळी या प्रकाशाचा एक झोत सतत मंटोवरही राहिला आहे. त्यामुळे या व्यक्तिचित्राचा शेवट अशोककुमारच्या नोटेशनवर न होता, तो मंटोचं पुढे काय होतं, या नोटेशनवर होतो.

नर्गिसच्या व्यक्तिचित्राची सुरुवातच फार मजेशीरपणे होते. मंटोची बायको आणि तिच्या दोन बहिणी मंटोच्या न कळत फावल्या वेळात वेगवेगळ्या अभिनेत्रींना फोन करून टाइमपास करत असतात. त्यात एकदा त्या नर्गिसला फोन करतात. तिची खूप तारीफ करतात. हा सिलसिला बरेच दिवस चालू राहतो. एकेदिवशी त्या नर्गिसला आपल्या घरी बोलावतात. नर्गिस जद्दनबाईला घेऊन त्यांना भेटायला जाते. पण नेमका त्याच दिवसी मंटो लवकर घरी येतो. मंटो त्या वेळी ‘फिल्मिस्तान’मध्ये नोकरी करत असतो. त्यामुळे जद्दनबाई त्याला फार चांगल्या पद्धतीनं ओळखत असतात. पण त्याविषयी त्याची बायको आणि मेहुण्या मंटोला काहीच सांगत नाहीत.

मंटोचीही ती नर्गिसशी पहिलीच भेट असते. पुढे मंटोनं नर्गिसच्या अभिनयाविषयी फार छान लिहिलं आहे. मंटो लिहितो, ‘‘नर्गिसने अभिनयाचे टप्पे हळूहळू गाठले, हे चांगलं झालं. एकाच उडीत तिने शेवटचा टप्पा गाठला असता तर चित्रपट पाहणा-या जाणकार मंडळींच्या व प्रेक्षकांच्या भावनांना अजाणतेपणाने दु:खाचा स्पर्श झाला असता. आपल्या अल्लडपणाच्या वयातही ती चित्रपटाच्या पडद्याबाहरेही अभिनेत्री बनून राहिली असती आणि चलाख व धूर्त व्यापाराच्या फुटपट्टीने आपलं आयुष्य मोजत राहिली असती.’’ शेवटी मंटोनं लिहिलं आहे, ‘‘शेवटी आयुष्य म्हणजे छाया-प्रकाशाची गुंफण आहे. या छाया-प्रकाशाच्या गुंफणीचं चित्रण म्हणजे हे फिल्मी जीवन! पण कधी कधी या फिल्मी जीवनात असा काही पेच पडतो, असं काही वळण येतं की प्रकाश हा प्रकाश उरत नाही, सावली ही सावली उरत नाही.’’

मेरठची कैची अर्थात पारो या अभिनेत्रीविषयी लिहिताना मंटोनं परत अशोककुमार यांच्याविषयीही लिहिलं आहे. कारण ही अभिनेत्री ‘फिल्मिस्तान’ची होती. पारो ही मेरठची वारांगना होती. हिंदी चित्रपटात काम करण्याच्या आवडीपायी ती ‘फिल्मिस्तान’मध्ये आली. तिनं काही चित्रपटही केले. पण त्यापेक्षा मंटोनं पारोचं व्यक्तिमत्त्व ज्या पद्धतीनं उभं केलं आहे, ते वाचून पाहण्यासारखंच आहे.

असं यातल्या सर्वच व्यक्तिचित्रांबद्दल सविस्तर लिहिता येईल. लिहायलाही हवं. पण लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, मंटोनं या संकलनातल्या प्रत्येक व्यक्तिचित्रात अशी काही जादू भरली आहे की, तुम्ही  प्रत्येक व्यक्तीमध्ये गुंतत जाता. या काही विजयाच्या कहाण्या नाहीत. मंटोनं कुणाचंही उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला नाही, तसंच कुणाचं खच्चीकरणही केलं नाही. त्यानं जे जे आहे ते ते तसं सांगितलं आहे. त्यामुळे यातल्या सर्वच व्यक्तिचित्रांमध्ये परस्परविसंगती, विसंवाद, संघर्ष, संकटं, मान-सन्मान, कौतुक, मानहानी, अशा अनेक गोष्टी येतात. विजय तेंडुलकरांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, ‘काही व्यक्ती या तुकड्या तुकड्यांनी लहान-मोठ्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही तुकडे मोठे असतात, काही तुकडे लहान असतात.’ मंटोची ही बारा व्यक्तिचित्रं अगदी तशीच आहेत.    


मुंबई नगरी बडी बांका

कुठल्याही शहराच्या स्थित्यंतराचा आलेख सातत्याने काढत राहणं, हे त्या शहराच्या स्थानीय इतिहासाच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वाचं असतं. मुंबई हे तर जगातलं एक महत्त्वाचं शहर आहे. त्याची न्यूयॉर्क आणि लंडनसारख्या शहराशी काहीशी अतिशयोक्त असली तरी तुलना केली जाते. मुंबईचं शांघाय वा सिंगापूर करण्याचीही भाषा राजकारणी मंडळी अधूनमधून करत असतात. मुंबईबद्दल बोलायला लागलो की, मूळ सात बेटं आणि ती जोडल्यानंतर वसत गेलेलं शहर, ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक इथे गुजरात आणि इतर ठिकाणांहून आणलेली माणसं, सुरुवातीचं मुंबई शहर अशा अनेक गोष्टींना सुरुवात होते. अठराव्या-एकोणिसाव्या शतकातली मुंबई ही खरोखरच काहीशी अद्भुत, रंजक आणि मनोरम्य म्हणावी अशी होती. ‘जिवाची मुंबई’ हा शब्दप्रयोग त्या मुंबईच्या भ्रमंतीतूनच तयार झाला असावा.

मुंबईचं वैभव म्हणजे मुंबईतल्या भव्य आणि प्रेक्षणीय वास्तू. या बव्हंशी वास्तू तयार करण्यात ब्रिटिशांचा मोठा वाटा आहे. ब्रिटिश ज्या ब्रिटनचे नागरिक त्यातल्या लंडन या शहराचं वास्तूवैभव तर कितीतरी प्रचंड आणि भव्य म्हणावं असं आहे. लंडन या शहराबद्दल किती पुस्तकं असावीत? साधारणपणे 25,000 पुस्तकं या एकटय़ा शहराविषयी आहेत, असं सांगितलं जातं. या पुस्तकांमध्येही कितीतरी प्रकारचं वैविध्य आहे. एकोणिसाव्या शतकातल्या लंडनमधील फॅशन, एकोणिसाव्या शतकात प्रकाशित झालेल्या पुस्तकांतील लंडन, 1945 नंतरचं लंडन, पहिल्या महायुद्धापूर्वीचं लंडन, दुस-या महायुद्धानंतरचं लंडन अशी कितीतरी विषयांवरील पुस्तकं आहेत. आणि अजूनही लिहिली जात आहेतच.

अगदी एवढय़ा प्रमाणावर नसलं तरी मुंबईविषयीचं कुतूहल आणि आकर्षणही काहीसं असंच म्हणावं लागेल. त्यात परकीय लेखकांपासून स्वकीयांपर्यंत अनेक अभ्यासकांचा समावेश आहे. अलीकडेच दिवंगत झालेल्या शारदा द्विवेदी यांची मुंबईवरील देखणी कॉफीटेबल बुक्स अनेकांना माहीत असतील. ‘बिहाइंड द ब्यूटीफूल फॉरेव्हर - लाइफ, डेथ अँड होप इन अ मुंबई अण्डरसिटी’ हे अलीकडेच प्रकाशित झालेलं कॅथरीन बू या अमेरिकन महिला पत्रकाराचं पुस्तक सध्या भारतीय इंग्रजी वाचकांमध्ये बरंच गाजतं आहे. मुंबईतल्या अधोविश्वाबद्दलचं हे पुस्तक आहे.

मराठीमध्ये एखादं पुस्तक गाजत आहे, असं म्हणण्याची सोय नाही, पण अलीकडेच प्रकाशित झालेल्या अरुण पुराणिक यांच्या ‘हरवलेली मुंबई’ या पुस्तकाची अवघ्या दोन महिन्यात दुसरी आवृत्ती निघावी, ही या पुस्तकाबद्दलची वाचकपसंती नोंदवणारी उल्लेखनीय घटना म्हणावी लागेल. चौरस आकार, भरपूर कृष्णधवल छायाचित्रं, देखणी छपाई आणि पुराणिक यांनी कष्टपूर्वक, अभ्यास करून नोंदवलेली मुंबईच्या काही वैशिष्टय़ांची सफर ही या पुस्तकाची काही महत्त्वाची वैशिष्टय़ं. तसं तर संशोधन करून कुठल्याही विषयावर पुस्तक लिहिणं हे काही विशेष नवलाचं मानायचं कारण नाही. पण याबाबतीत पुराणिक बरेचसे सरस आहेत. कारण ते मूळचे मुंबईकर. त्यांचा जन्म गिरगावातल्या एका जुन्या चाळीत झाला. त्यामुळे लहानपणापासून त्यांना मुंबईची ओळख होत गेली. (मुंबईतल्या वेश्या पाहिल्याची त्यांची आठवण ते दोन वर्षाचे असतानाची आहे.) पण लहानपण आणि तरुणपण या काळात पुराणिकांनी पाहिलेली मुंबई आता राहिली नाही. त्याच्या काही खुणाच तेवढय़ा शिल्लक राहिल्या आहेत. त्याही आता एकेककरून नाहीशा होत आहेत. गिरणगावातले उंचच्या उंच टॉवर आणि मॉल यांनी लालबाग-परळचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. मुंबईच्या जुन्या साऱ्याच वैशिष्टय़ांचा चेहरा असा बदलला नसला तरी तो पहिला राहिलेला नाही, हेही तितकेच खरे.

मुंबईचं ही सर्व स्थित्यंतर टिपणं तसं अवघडच होतं. त्यामुळे पुराणिक यांनी आपल्या या पुस्तकात दक्षिण मुंबईवरच भर दिला आहे. शिवाय हे लेख त्यांनी सुटेसुटे वेगवेगळ्या वेळी लिहिले आहेत. पण हा प्रत्येक लेख म्हणजे मनोरम्य आणि रंजकतेची परमावधी म्हणावी असा आहे. ‘चोर बाजार’ या लेखात पुराणिक लिहितात, ‘‘त्यावेळी सॅण्डहर्स्ट रोडवरून जाताना, नळ बाजाराच्या समोरच्या गल्ल्यातून, ‘रास्ते का माल सस्ते में’, ‘जुना पुराना सामान’, ‘बे बे रुपया, कोई भी माल उठाव’, ‘मिठा खाजा, बै पैसा’ असे तारसप्तकात ओरडत रस्त्यावर आपला माल विकणाऱ्या या मुस्लीम फेरीवाल्यांचा (काबाडी लोकांचा) आवाज (तत्कालीन व्हाईसरॉयच्या) त्यांच्या कानी पडला. त्या काळात विरळ लोकवस्ती व रस्त्यांवर गाडय़ांची फराशी रहदारी नसल्याने रस्त्यांवर शांतता नांदत असे. तेव्हा फेरीवाल्यांच्या आवाजाच्या त्रासाला त्रासिकपणे ‘क्या शोर बाजार है’ असे म्हणून व्हाइसरॉयसाहेबांनी नाक मुरडले होते. त्यावरून या जुन्या बाजाराचे नाव ‘शोर बाजार’ पडले. लोकांनी त्याचा ‘चोर बाजार’ असा अपभ्रंश केला.’’ अशी माहिती दिली आहे. हा लेख इतका मजेशीर आहे की, असा काहीएक बाजार मुंबईत आहे याचाच आपल्याला अचंबा वाटतो.

पुस्तकातला पहिलाच लेख आहे चाळसंस्कृतीविषयी. (अलीकडेच नीरा आडारकर यांनीही मुंबईतल्या चाळींविषयी इंग्रजीमध्ये कॉफीटेबल बुक काढलं आहे!) या लेखासोबतची छायाचित्रं पाहण्यासारखी आहेत. गिरगाव, ठाकूरद्वार या भागातल्या चाळींची काही वैशिष्टय़े नोंदवली आहेत. ‘‘पहाटे दुधाच्या लाईनीत उभे राहण्यापासून ते रात्री गच्चीत झोपायला जागा मिळेपर्यंत इथे फक्त संघर्ष आणि संघर्षच असतो. इथे वेळप्रसंगी भांडण, मारामारी केल्याशिवाय मूल मोठेच होऊ शकत नाही, हे कटू वास्तव आहे. त्यामुळे ‘धाडस’ त्यांच्या रक्तात नकळत बाणवले जाते.’’ असे पुराणिक शेवटी शेवटी लिहितात तेव्हा या चाळीतल्या विश्वाची ‘खरी गंमत’ कळते. आणि ते जग यापुढच्या काळात पाहायला आणि अनुभवायला मिळणार नाही, याची चुटपूटही लागते.

या पुस्तकात एकंदर वीस लेख आहेत. ‘गिरगाव चौपाटी’, ‘पानसुपारी’, ‘पानवाला’, ‘अलेक्झांड्रा’, ‘नाक्यावरचा इराणी’, ‘मुंबईतील पोसखाने’, ‘रामा गडी’ या शीर्षकांवरूनच त्या त्या लेखाचा विषय समजतो आणि त्या लेखांना दिलेल्या समर्पक छायाचित्रांतून जिवंत होतो. खरं तर या सर्वच लेखांबद्दल, त्यांच्या वैशिष्टय़ांबद्दल लिहिता येईल. पण ते जागेच्या मर्यादेअभावी शक्य नाही. आणि त्यातून वाचकांची रंजकताही कमी होण्याचा धोका आहे. कारण चित्रपटाचा शेवट जसा सांगू नये तसा या पुस्तकातल्या कुठल्याच लेखाचा गाभा सांगण्यात हशील नाही. तो प्रत्यक्ष वाचूनच अनुभवायला हवा.

पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पुस्तक कुणासाठी आहे? मुंबईविषयीचे आहे म्हणून ते फक्त मुंबईकरांसाठी आहे, असे अजिबात नाही. ज्या ज्या कुणाला मुंबईविषयी प्रामाणिक कुतूहल आहे, तिच्या जुन्या रूपाबद्दल आस्था आहे आणि स्थानिय इतिहासामध्ये रस आहे, त्या सर्वासाठी हे पुस्तक आहे. ही काही कथा-कादंबरी नाही, ही मुंबई शहराची एक धावती सफर आहे. तुम्ही या पुस्तकातली ठिकाणं प्रत्यक्षात पाहिली असतील तर तुम्हाला पुनप्र्रत्ययाचा आनंद मिळेल, पाहिली नसतील तर हे पुस्तक वाचून ती पाहण्याची इच्छा होईल. म्हणजे त्या जुन्या मुंबईचे आत्ता जे काही अवशेष शिल्लक आहेत, ते पाहता येतील. जुनी मुंबई आता अनुभवता येणार नाहीच, त्यामुळे त्यासाठी हे पुस्तक हाच काय तो काळ समजून घेण्याचा एक दुवा आहे.

Thursday, July 17, 2014

चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील गेली ४० वर्षे प्रामुख्याने हिंदी कवितांचा मराठी अनुवाद करीत आहेत. तो व्यावसायिक हेतूने नसून केवळ आणि निव्वळ कवितेवरील प्रेमापोटी करीत आहेत. म्हणूनच अनुवादाचा पेशा स्वीकारलेल्या या प्राध्यापकाच्या निष्ठेला महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीने नुकताच जाहीर केलेला पुरस्कार हा त्यांच्या साहित्यसेवेला केलेला सलामच म्हटला पाहिजे. औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयातून वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले पाटील म्हणजे हिंदी-मराठी या भाषांमधला एक महत्त्वाचा सांस्कृतिक दुवा. भीष्म सहानींच्या 'तमस'च्या त्यांनी केलेल्या मराठी अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तसाच त्यांनी मराठीतल्या दलित कवितांचा 'सूरज के वंशधर' या नावाने केलेला हिंदी अनुवादही वाखाणला गेला. नामदेव ढसाळ यांच्या कविता पहिल्यांदा महाराष्ट्राबाहेर पोहोचवल्या त्या त्यांच्या हिंदी अनुवादाने. 'समकालीन हिंदी कविता' या त्यांच्या संग्रहातून मैथिलीशरण गुप्त यांच्यापासून असद झैदींपर्यंतच्या हिंदूी कवींच्या कविता मराठीत आल्या. हिंदी कवितेसाठीचे मार्गदर्शक म्हणावे असे हे पुस्तक आहे. 'भूखंड तप रहा है' ही चंद्रकांत देवताले यांची दीर्घ कविता 'भूखंड तापू लागलंय' या नावाने त्यांनी मराठीत आणली. २००८ साली पाटील यांनी 'कवितान्तरण' हा अनुवादित कवितांचा पाचशेहून अधिक पृष्ठांचा संग्रह प्रकाशित केला. त्यात शंभरावर देशी-विदेशीकवींच्या एकंदर जवळपास ४०० कविता (मराठीत!) आहेत. एकाच कवीने विविध भाषांमधील, वेगवेगळ्या काळांतील आणि अतिशय भिन्न प्रकृतीच्या कवितांचा मराठीला परिचय करून द्यावा, यातून त्यांची सांस्कृतिक असोशी दिसते. या संग्रहासाठी त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. हिंदूीबरोबरच इंग्रजी, पंजाबी व कन्नड भाषेतील कविताही त्यांनी मराठीत आणल्या.
थोडक्यात, अनुवादाच्या क्षेत्रात असामान्य म्हणावे असे कर्तृत्व पाटील यांच्या नावे जमा आहे. चोखंदळ काव्यदृष्टी आणि कवितेवरील अव्यभिचारी निष्ठा यांचे निरंतर पाठबळ लाभलेल्या पाटील यांनी सुरुवातीपासून मराठीतल्या लघुअनियतकालिकांच्या चळवळीत अशोक शहाणे- भालचंद्र नेमाडे- रवींद्र किंबहुने- सतीश काळसेकर यांच्याबरोबर काम केले. औरंगाबादला त्यांनी नेमाडे आणि इतरांबरोबर सुरू केलेले 'वाचा प्रकाशन' बरेच वादळी ठरले होते. त्यानंतर त्यांनी अगदी अलीकडे 'तुला प्रकाशन' या नावाने काही कवितासंग्रह प्रकाशित केले होते. 'नि:संदर्भ', 'इत्थंभूत', 'बायका आणि इतर कविता', 'दिक्काल' हे पाटील यांचे स्वतंत्र कवितासंग्रह, तर 'आणि म्हणूनच', 'कवितेसमक्ष' ही काव्यसमीक्षेची पुस्तके, 'चौकटीबाहेरचे चेहरे' आणि 'विषयांतर' या दोन लेखसंग्रहात त्यांनी वेगवेगळ्या साहित्यिकांवर लिहिलेले लेखही विशेष उल्लेखनीय आहेत.

जया दडकर

काही माणसांना मानमरातब, प्रसिद्धी, कौतुकसोहळे यांच्याशी काडीमात्र देणंघेणं नसतं. असिधाराव्रतासारखं ते आपलं काम करत असतात. मराठीतील ज्येष्ठ लेखक जया दडकर हे अशा कलंदर वल्लींपैकीच एक नाव.
 'एक लेखक आणि एक खेडे', 'चिं. त्र्यं. खानोलकरांच्या शोधात', 'वि. स. खांडेकर सचित्र चरित्रपट' ही महत्त्वपूर्ण पुस्तकं आणि 'प्रकाशक रा. ज. देशमुख', 'संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश' (खंड १, सहसंपादक), 'श्री. दा. पानवलकर', 'निवडक पत्रे - नरहर कुरुंदकर' ही संपादनं दडकर यांच्या वेगळेपणाची, व्यासंगाची आणि परिश्रमाची उत्तम म्हणावीत अशी उदाहरणं आहेत. अस्सल मुंबईकराची जिद्द आणि संशोधकीय बाणा दडकर यांच्या व्यक्तिमत्त्वात मुरलेला आहे. रूढ चरित्रलेखन वा ललितरम्यतेऐवजी वेगळ्या तऱ्हेने माणसाचा तळठाव शोधत, त्याचा गाभा आणि आवाका उलगडण्याची दडकर यांची हातोटी विलक्षण आहे. खांडेकरांचा चरित्रपट काय किंवा खानोलकरांचा शोध, यातून दडकर यांची कसोशी आणि असोशी दृग्गोचर होते. श्री. पु. भागवतांचा सहवास आणि लघुनियतकालिकांची सोबत या दोन्ही गोष्टींचे धनी होण्याची संधी दडकर यांना मिळाली. म्हणूनच 'ललित' या ग्रंथप्रसारासाठी वाहिलेल्या मासिकाचा सुवर्णमहोत्सव आणि केशवराव कोठावळे पारितोषिकाचं तिसावं वर्ष यांचं औचित्य साधून या वर्षी दिलं जाणारं केशवराव कोठावळे पारितोषिक दडकर यांच्या 'दादासाहेब फाळके- काळ आणि कर्तृत्व' या ग्रंथाला मिळावं, ही जणू औचित्याची परमावधीच. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांची मराठीमध्ये तत्पूर्वी तीन चरित्रं लिहिली गेली होती. पण त्यातून फाळके यांना न्याय मिळत नाही, हे लक्षात आल्यावर दडकर यांनी फाळके नावाच्या महत्त्वाकांक्षी, प्रचंड हुन्नर असलेल्या जिगरी माणसाचं कालातीत कर्तृत्व त्यांना साजेलशा विस्तृत कॅनव्हासवर मांडण्याचा प्रयत्न केला. दडकर यांनी ज्या जागतिक परिप्रेक्ष्यात फाळके यांचं कर्तृत्व पाहिलं, त्यातून फाळके यांची भव्यता नेमकेपणाने अधोरेखित होते. फाळके भारतीय चित्रपटाचा श्रीगणेशा करत असताना जागतिक चित्रपटसृष्टीची वाटचाल कशा पद्धतीने होत होती याचा त्यांनी घेतलेला सविस्तर आढावा स्तिमित करतो. मराठीमध्ये अशा प्रकारच्या चरित्रलेखनाची पद्धत फारशी रूढ नाही, त्यामुळे २०११ साली प्रकाशित झालेल्या या चरित्राकडे कसं पाहावं, ते कसं वाचावं हे मराठी समीक्षक-वाचकांना ठरवता आलं नाही. त्यामुळे या चरित्राची व्हावी तशी चर्चा झाली नाही. 'देखल्या देवा दंडवत' या न्यायाने का असेना, आता तरी वाचक या चरित्राकडे वळतील अशी आशा करू या.

रवीन्द्र गोडबोले

प्रकाशन व्यवसायात ते काहीसे अपघातानेच आले. पुण्याच्या 'देशमुख आणि कंपनी'चे रा.ज. आणि सुलोचना देशमुख यांच्यानंतर या प्रकाशन संस्थेची मालकी गोडबोले यांच्याकडे आली. ते सुलोचनाबाईंचे भाचे. रा. ज. यांच्या निधनानंतर सुलोचनाबाईंना ते प्रकाशनाच्या कामात १९९५ पासून मदत करू लागले होते. ९८ मध्ये सुलोचनाबाईंचे निधन झाल्यावर त्यांनी 'देशमुख आणि कंपनी'चा प्रकाशन व्यवहार पूर्णपणे  बघायला सुरुवात केली. प्रकाशनासाठी कुठलेही पुस्तक स्वीकारताना संबंधित लेखकाबरोबर सविस्तर चर्चा करून त्याला पुन:पुन्हा त्याच्या हस्तलिखिताचे पुनर्लेखन करण्यास उद्युक्त करून त्याचे पुस्तक शक्य तितके परिपूर्ण करण्यावर गोडबोले यांचा कटाक्ष असे. त्यामुळे एकेका पुस्तकावर ते तीन तीन वर्षे काम करत. 'वेध महामानवाचा' (शिवाजी महाराजांवरील श्रीनिवास सामंत यांची कादंबरी), 'निवडक माटे', 'बा. भ. बोरकरांची समग्र कविता', 'धर्मक्षेत्रे-कुरुक्षेत्रे' (विश्वास दांडेकर), 'उत्तरायण' (रवींद्र शोभणे), 'निवडक कुरंदकर' अशी मोजकीच, पण महत्त्वाची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. गेल्या तीन वर्षांत त्यांनी केवळ दोनच कादंबऱ्या प्रकाशित केल्या. गोडबोले हे व्यवसायाने केमिकल इंजिनीअर. काही काळ त्यांनी विविध नोकऱ्याही केल्या. नंतर महाविद्यालयातल्या तीन मित्रांबरोबर त्यांनी अ‍ॅक्व्ॉरिअस टेक्नॉलॉजीज ही कंपनी १९९१ साली सुरू केली. बांधकामाला लागणारी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामग्री ते बनवत. रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग दर्शवणारे पट्टे, भिंतींना प्लास्टर करणारे यंत्र यांची भारतातील पहिली निर्मिती त्यांचीच. या कंपनीच्या अनेक उत्पादनांची युरोपकडे मोठय़ा प्रमाणावर निर्यात केली जाते. या कामातही त्यांची विचक्षण दृष्टी पाहायला मिळते. थोडक्यात गोडबोले निराळ्या वाटेने विचार व कृती करणारे आणि प्रत्येक कामात अचूकतेचा आग्रह धरणारे प्रकाशक आणि उद्योजक होते. विचाराने आधुनिक असले तरी गोडबोले यांना प्राचीन भारतीय संस्कृतीबद्दल डोळस कौतुकही होते. त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता यांचा अतिशय चांगला संगम त्यांच्यामध्ये पाहायला मिळत असे.
गेल्या पाचेक वर्षांत त्यांना महाभारताने झपाटले होते. महाभारताच्या प्रमाण संहितेपासून या विषयावरील अनेक पुस्तकांचे त्यांनी अतिशय बारकाईने वाचन केले होते. त्यातून 'महाभारत- संघर्ष आणि समन्वय' या पुस्तकाची निर्मिती झाली. महाभारताकडे इतक्या चिकित्सेने पाहणारा इरावती कर्वे यांच्या 'युगान्त'नंतरचा हा ग्रंथ असे त्याचे वर्णन जाणकारांनी केले आहे. 'औरंगजेब- शक्यता आणि शोकांतिका', 'सम्राट अकबर', 'इंद्राचा जन्म' आणि 'वेदांचा तो अर्थ' या चार संशोधनपर पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. ही पुस्तके म्हणजे त्यांची चिरस्थायी ओळख ठरेल.

नदीन गॉर्डिमर

20 November 1923 – 13 July 2014
वर्णविद्वेषाच्या काळ्याकुट्ट अरण्याला भेदत जाणारी लेखिका म्हणून नदीन गॉर्डिमरचे नाव १९९१ सालच्या नोबेल पुरस्काराने सर्वतोमुखी झाले असले तरी ती त्याआधी कित्येक वर्षांपासून रस्त्यावर आणि कागदावर त्या विरोधात सातत्याने झगडत होती. नदीनचे वडील ज्यू तर आई ब्रिटिश. व्यवसायानिमित्त हे कुटुंब दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले. वडिलांच्या दुकानात येणाऱ्या काळ्यांना ज्या तुच्छतेने वागवले जाई, ते पाहून लहानग्या नदीनच्या संवेदनशील मनावर ओरखडे उमटत. या ओरखडय़ांनी नदीन वयाच्या नवव्या वर्षांपासूनच लिहायला लागली. पंधराव्या वर्षी तिचे पहिले पुस्तक  प्रकाशित झाले.
आफ्रिकेत काळ्या-गोऱ्या वर्णसंघर्षांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये काही गोरेही होते. त्यापैकी एक बुलंद आवाज होता नदीनचा. महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या धर्तीवर 'आफ्रिकन नॅशनल काँग्रेस' शांततामय मार्गाने काम करीत असे. त्यात नदीन रुजू झाली. गोऱ्या सत्ताधीशांना नदीनचा हा संघर्ष कळत नव्हता. 'ही बया, गोरी असून काळ्यांच्या बाजूने का लढते?' असा त्यांचा सवाल असे. पण नदीन आपल्या अवतीभवती काळ्यांना जनावरांपेक्षाही अमानुष पद्धतीने वागवले जात असताना पाहूच शकत नसे. तिचा शांत स्वभाव अशा वेळी चवताळून उठे, तिच्या आवाजाला आणि शब्दांना धार येई. तिचे हे प्रखर शब्द आफ्रिकन सरकारला चटके देऊ लागले, तेव्हा 'द लेट बर्जर्स वर्ल्ड', 'अ वर्ल्ड ऑफ स्ट्रेंजर्स', 'बर्जर्स डॉटर', 'जुलैज पीपल' या तिच्या चार पुस्तकांवर सरकारने बंदी घातली. यातील पहिल्या दोन्ही पुस्तकांवरील बंदी दशकाहून अधिक काळ होती. मग नदीनची लढाई सेन्सॉरशिपच्या विरोधातही सुरू झाली. नदीनसाठी परदु:ख शीतल नव्हतेच. दु:खात असा भेदभाव करताच येत नाही, याचा वस्तुपाठ म्हणजे नदीनच्या कादंबऱ्या आणि कथा. १९९१ साली तिला नोबेल जाहीर करताना समितीने, 'तिच्या भव्य महाकाव्यासारख्या लेखनात परदु:खाबद्दलची तिची आत्मीयता प्रखरपणे प्रकट होते' असे नमूद केले. नोबेलबद्दल नदीनचे नेल्सन मंडेलांकडून अभिनंदन अपेक्षितच होते, पण जेव्हा तत्कालीन (आणि द. आफ्रिकेचे शेवटचे गोरे) राष्ट्राध्यक्ष फ्रेडरिक विलेम दि क्लर्क यांनीही तिचे अभिनंदन केले, तेव्हा नदीनला एक संघर्ष तडीस गेल्यासारखे वाटले. १५ कादंबऱ्या, २० कथासंग्रह आणि पाच लेखसंग्रह लिहिणारी नदीन जशी समर्थ लेखिका होती, तशीच समर्थ कार्यकर्तीही होती आणि तितकीच समर्थ आईसुद्धा. नव्वदच्या दशकात आफ्रिकन समाजाला एड्ससारख्या दुर्धर आजाराने ग्रासायला सुरुवात केली, तेव्हा त्याविषयी नदीनने तडफेने आणि हिरिरीने जनजागृती केली. ही संघर्षयात्रा १३ जुलै रोजी तिच्या निधनाने संपली.

Friday, July 11, 2014

ये मेरी जोहराजबीं तुझे मालूम नहीं....

Zohra Sehgal  (27 April 1912 – 10 July 2014)
'टायटॅनिक' जहाज तब्बल १०२ वर्षांपूर्वी- म्हणजे १९१२ साली बुडाले, त्याच वर्षी जोहरा सेहगल जन्मल्या. हा निव्वळ योगायोग. त्या बुडालेल्या जहाजाशी जोहरा यांचा ओढूनताणून संबंध लावणे चूकच ठरेल. जगाला गवसणी घालण्याची जिद्द आणि तरीही आपला प्रवास आपल्याच वेगाने करण्याचा स्वभाव जोहरा यांच्याकडे होताच, पण मजेत जगण्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक आणि सांस्कृतिक समृद्धीही त्यांच्याकडे होती. या चैतन्यमयी आयुष्याची आनंदयात्रा आता निमाली आहे. एका शतकभराच्या साक्षीदार होण्याचे भाग्य लाभलेल्या सेहगल यांची सगळी आयुष्ययात्रा ही धाडसाची, संघर्षांची पण चैतन्याने रसरसलेली होती. त्यांच्या या प्रवासात हिंदी चित्रपटांचा किनारा जरा उशिराच आला. आज अनेकांना त्या आठवत असतील 'चीनी कम'मधील अमिताभ बच्चनच्या आईच्या भूमिकेसाठी. खुद्द अमिताभ यांनाही ही आई संस्मरणीय वाटली होतीच, मग चाहत्यांची काय कथा. 'माय' लागून गेलेल्या या आजीने वयाच्या ९५ वर्षी उत्साह, ऊर्जा, चैतन्य याबाबतीत या तगडय़ा अभिनेत्याला खरोखरीची तुल्यबळ साथ दिली. अशी साथ मिळाली की माणसे स्पर्धा करीत नाहीत, विनम्रपणे दुसऱ्याचे गुण स्वीकारतात. अमिताभ यांनीही म्हणे या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर जोहरा यांच्या प्रशंसेसाठी शम्पेन पाठवले आणि सोबत एक चिठ्ठी.. 'तुम्हालाही कदाचित माझ्यासह काम करणे आवडले असेल, अशी आशा आहे. तुमच्यासह काम करणे हा माझ्यासाठी नवलोत्सव होता.. तुमची अदम्य ऊर्जा साऱ्याच तरुणांना स्फूर्ती देणारी आहे'! अर्थात, या स्तुतीने जोहराआजी फुशारल्या नसतील.. लॉरेन्स ऑलिव्हिए, पृथ्वीराज कपूर, सई परांजपे, त्याहीआधी दिग्गज नर्तक उदय शंकर अशांसह काम करण्याची सवयच त्यांना झालेली होती.
उत्तर प्रदेशातील खानदानी मुसलमान कुटुंबातला जोहरा यांचा जन्म. हे घराणे ब्रिटिशांच्या आगमनानंतरही नोकझोक टिकवून राहिलेले. वाघिणीच्या दुधाचा स्वीकार करणारे आणि आचारविचारानेही तरक्कीपसंद. त्यामुळेच, शालेय शिक्षण पूर्ण होता-होता 'लग्नापेक्षा करिअरच करेन म्हणते मी' असे जोहरा म्हणाल्यावर काका, भाऊ यांच्याकडून पाठिंबाच मिळाला. वयाच्या अठराव्या वर्षी त्या जर्मनीला नृत्य शिकायला गेल्या. तीन वर्षांनी भारतात परत आल्यावर, भारतीय नृत्यशैलींचा प्रसार जगभर करणारे प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांच्या नृत्यसंस्थेत त्या रुजू झाल्या. पुढील आठ वर्षांतील त्यांचे जगभ्रमण याच संस्थेमार्फत झाले आणि इथेच त्यांना जन्माचा जोडीदारही मिळाला.. कामेश्वर सेहगल. लाहोरमध्ये स्थायिक होऊन या जोडप्याने स्वत:ची डान्स अकॅडमी सुरू केली. पण लवकरच फाळणीचे वातावरण सुरू झाले. हा देश की तो, याचा निर्णय घ्यावाच लागणार हे दिसू लागले, तेव्हा पतीसह त्या मुंबईला आल्या आणि इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेचा सांस्कृतिक आधार त्यांना सहज मिळाला. इप्टा हीच १९४०-५० या काळात मुंबईतील सर्वाधिक मोठी सांस्कृतिक चळवळ होती. मुंबईतील बुजुर्ग, जानेमाने आणि नवोदित कलाकार मोठय़ा संख्येने इप्टाशी संबंधित. उदय शंकरांच्या तालमीत वाढलेल्या सेहगल नाटय़ऋषी इब्राहिम अल्काझी आणि पृथ्वीराज कपूर यांच्या सहकारी झाल्या आणि त्यांच्या नृत्यकौशल्याला अभिनयाचे पैलू पडू लागले. जातिवंत कलाकाराला आपल्या कलेशिवाय बाकी साऱ्या गोष्टी शून्यवत वाटतात. त्यामुळेच, इप्टात चालून आलेल्या पदास नकार देऊन त्या पृथ्वीराज कपूर यांच्या 'पृथ्वी थिएटर्स'मध्ये आल्या. १९४५ ते ५९ पर्यंत त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासह 'दीवार' 'शाकुंतल',  'पठाण', 'गद्दार', 'आहुती', 'कलाकार', 'पैसा', 'किसान' अशा नाटकांची निर्मिती केली. 'पठाण'पासून नाटकात छोटय़ामोठय़ा भूमिकाही करायला सुरुवात केली. तब्बल १४ वर्षे त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासह काम केले. पतीच्या अपघाती निधनामुळे १९५९ साली जोहरा यांनी पृथ्वी थिएटरचा राजीनामा दिला आणि पुढच्याच वर्षी ही मातबर नाटय़संस्था बंद पडली.
जहाज बुडेलशी परिस्थिती असताना अंत:प्रवाह ओळखून जहाजाने नवा मार्ग शोधावा, तसे जोहरा यांनी पुढल्या दोन वर्षांत केले.. मुंबईऐवजी दिल्लीत राहून तेथील नाटय़संस्थेत काम आणि शंकर्स वीकलीमध्ये नृत्य समीक्षालेखन, अशी दुहेरी जबाबदारी जोहरा सांभाळू लागल्या. याच काळात तत्कालीन रशिया, पूर्व जर्मनी आणि झेकोस्लोव्हाकियाचा तीन महिन्यांचा दौरा करून, भारतीय नृत्य आणि नाटय़ाविषयी अनेक व्याख्याने त्यांनी दिली. मग १९६२ मध्ये अभिनय अभ्यासक्रमासाठी त्यांना ब्रिटिश शिष्यवृत्ती मिळाली आणि लंडनमध्ये त्यांच्या आयुष्यातील तिसरे पर्व सुरू झाले. तब्बल दशकभरच्या लंडन-वास्तव्यात सुरुवातीला त्यांनी कारकुनी केली, काही काळ चहाचे हॉटेलही चालवले. पण १९६६ मध्ये 'द लाँग डिस्टन्स डय़ुएल' या बीबीसीवर सादर होणाऱ्या कार्यक्रमात भूमिका मिळाली. मग बीबीसीच्याच रुडयार्ड किपलिंगवरील मालिकेत आणि इतर नाटकांत कामे मिळत गेली. तरीही १९७४ साली त्या दिल्लीला परतल्या. 'राष्ट्रीय लोकनृत्य पथका'चे काम केंद्र सरकारने त्यांच्यावर सोपवल्यामुळे, सर्व भारतीय भाषांतील लोकनृत्ये बसवून त्यांचे भारतभर प्रयोग जोहरा यांनी केले. पण लवकरच आणीबाणी लागू झाली आणि त्या एकाधिकारशाहीने या संस्थेचा बळी घेतला. इथे काही खरे नाही हे ओळखून त्या लंडनला परतल्या. १९८७ पर्यंत लंडनच्या रंगभूमीवरील तसेच बीबीसीवरील अनेक नाटकांत भूमिका केल्या. सर लॉरेन्स ऑलिव्हिए, दिग्दर्शक सर टायरॉन गथ्री, फिओना वॉकर, प्रिसिला मॉर्गन आणि जेम्स केरी या ब्रिटिश रंगभूमीवरील दीपस्तंभांबरोबर काम केले.
इप्टा, पृथ्वी थिएटर, लंडनमधील ओल्ड विक, द ब्रिटिश ड्रामा लीग, बीबीसी अशा चढत्या भाजणीच्या प्रवासात जोहरा यांची वाटचाल सुखकर झाली असे नाही. प्रत्येक वेळी विस्थापितासारखा त्यांना आपला गाशा गुंडाळून नव्या ठिकाणी स्वत:बरोबर आपल्या कलेचेही पुनर्वसन करावे लागले. पण त्या कधी हिंमत हरल्या नाहीत की त्यांनी आपली प्रतिभा आळसावू दिली नाही. मिळेल त्या मार्गाने त्या वाट काढत राहिल्या. आठ वर्षे उदय शंकर, १४ वर्षे पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर आणि तब्बल २५ वर्षे लंडनमध्ये टीव्हीवर काम केल्यावर सेहगल ८७ साली भारतात परतल्या तेव्हा खरे तर अनेक संधींनी त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहायला हवे होते. पण त्यांना हिंदी चित्रपटांतील छोटय़ा छोटय़ा भूमिका कराव्या लागल्या. तरीही त्यांनी उतारवयात १५ इंग्रजी नाटके, २६ चित्रपट आणि १४ टीव्ही मालिकांत काम केले. १९९३ ते २००५ या काळात काव्य-अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम केले. जाहिरातींसाठीही विचारणा होऊ लागली आणि जोहरा नाही म्हणाल्या नाहीत.. अशाच एका जाहिरातीत  विवेक ओबेरॉय त्यांचा हात हातात घेऊन म्हणतो, 'ये मेरी जोहराजबी, तुझे मालूम नहीं..'    
 काम करण्याची अफाट ऊर्जा, 'जाऊ तिथे तगून राहू' ही महत्त्वाकांक्षा, यांच्या जोडीला जगण्यावरचे नितांत प्रेम या गोष्टींनी जोहरा सेहगल यांना कायम चिरतरुण ठेवले. त्यांना पडद्यावर पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असेच म्हणावेसे वाटत असणार. उत्फुल्ल रसिकता आणि सळसळते चैतन्य यांचे शतक साजरे करून, त्याहीवर दोन वर्षे जगून त्या गेल्या.. न फुटण्याचे वरदान कोणत्याही जहाजाला मिळालेले नसते, पण आपले जहाज कसे डौलात पुढे नेत राहायचे, हे समजावे लागते. त्यासाठी केवळ निर्णयशक्ती नव्हे तर तंत्रावरली हुकमत आणि कौशल्यही आवश्यकच असते. हे सारे जोहरा नावाच्या जहाजाकडे होते. त्यालाही काळाच्या समुद्राने कवेत घेतले.

Tuesday, June 24, 2014

हालहवाल एका धडपडय़ा प्रकाशकाची

प्रकाशनसंस्थांच्या संस्थापकांची आत्मचरित्रे आणि चरित्रे मराठीमध्ये फारच कमी आढळतात. मातब्बर म्हटल्या जाणाऱ्या रा. ज. देशमुख, श्री. पु. भागवत, रामदास भटकळ या प्रकाशकांनीही आत्मचरित्र लिहिण्याचे टाळले आहे. यातील काहींचे गौरवग्रंथ निघाले आहेत खरे, पण आत्मचरित्र ही फस्र्टहँड डॉक्युमेंटरी असते. संबंधित प्रकाशकाने स्वत: अनुभवलेला काळ त्यानेच सांगणे जास्त महत्त्वाचे असते. शिवाय मराठीमध्ये मोजके अपवाद वगळता गौरवग्रंथाची परंपरा ही फारशी नावाजण्याजोगी नाही. अलीकडच्या काळात तर ज्या प्रकारचे गौरवग्रंथ प्रकाशित होतात, त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे. असो. तर पहिल्या फळीतल्या प्रकाशकांनी आपली आत्मचरित्रे फारशी लिहिली नसली तरी दुसऱ्या फळीतल्या प्रकाशकांनीही फारशी लिहिलेली नाहीतच. पण त्यातील काही मात्र अलीकडे लिहू लागले आहेत. पुष्पक प्रकाशनाचे ह. ल. निपुणगे यांचे 'हलचल' हे त्यापैकीच एक. हे आत्मचरित्र खऱ्या अर्थाने प्रकाशकीय म्हणावे असे नाही. कारण निपुणगे यांनी केवळ प्रकाशन एके प्रकाशन असे काही केलेले नाही. खरं तर त्यांनी प्रकाशनाचा व्यवसाय करून पाहिला, मुद्रण व्यवसाय करून पाहिला, लायब्ररी चालवून पाहिली, दिवाळी अंक चालवला, कृषिवलसारख्या वार्षिक दैनंदिनी काढल्या, मासिक चालवले आणि उतारवयात मसापचे पदाधिकारी म्हणूनही काम केले. पण यापैकी कुठेच फार उल्लेखनीय म्हणावी अशी कामगिरी निपुणगे यांना करता आलेली नाही. पण हेही तितकेच खरे की, काय केले नाही यापेक्षा जे काही केले ते काय प्रतीचे आहे, असे पाहणे हे अधिक सयुक्तिक ठरते. निपुणगे यांच्या या आत्मचरित्राबाबतही तोच दृष्टिकोन ठेवला तर ते फारसे निराश करत नाही.
याची काही कारणे आहेत. एक म्हणजे अतिशय सामान्य परिस्थितीतून काबाडकष्टांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व पिढीतील निपुणगे आहेत. फारसे शिक्षण नसताना, जवळ कुठल्याही प्रकारचे भांडवल नसताना मंचरसारख्या ठिकाणाहून नेसत्या वस्त्रानिशी आईसह पुण्यात आले. भाडय़ाच्या खोलीत राहू लागले. आधी आलेपाक, मग उदबत्त्या, मग पेपर टाकणे, मग प्यून, नंतर कम्पाउंडर, लग्न व्यवस्थापक, बांधकाम मॅनेजर अशा मिळेल त्या नोकऱ्या करत निपुणगे यांनी आपली वाट शोधत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. नंतर ते व्हीनस प्रकाशनात कामाला लागले. त्यानंतर वोरा बुक कंपनीत. पडेल ते काम करण्याचा स्वभाव असल्याने आणि प्रामाणिकपणा अंगात मुरलेला असल्याने निपुणगे जातील तिथे लोकांचा विश्वास संपादन करत राहिले. वोरा कंपनीत काम करत असतानाच त्यांनी मित्राबरोबर नेपच्यून लायब्ररी सुरू केली. शाळा-कॉलेजमधील मुलांसाठी असलेल्या या लायब्ररीला चांगला प्रतिसादही मिळाला. लायब्ररी चालू असतानाच १ जून १९६३ रोजी निपुणगे यांनी पुष्पक प्रकाशन सुरू करून 'रेखन आणि लेखन' हे आपले पहिले पुस्तक प्रकाशित केले. या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पुण्यात एका होतकरू आणि धडपडय़ा प्रकाशकाची भर पडली.
निपुणगे यांनी प्रकाशनाला सुरुवात केली, त्याला आता जवळपास पन्नास र्वष होऊन गेली आहेत. या काळात त्यांनी   रा. चिं. ढेरे, उद्धव शेळके,   ह. मो. मराठे, बाळ गाडगीळ, ग. वि. अकोलकर अशा काही लेखकांची पुस्तके प्रकाशित केली. आचार्य अत्रे यांच्याविषयीची 'साहेब' ही कादंबरी उद्धव शेळके यांच्याकडून तर ग. दि. माडगूळकर यांच्याविषयीची 'निर्मोही' ही कादंबरी रवींद्र भट यांच्याकडून लिहून घेतली. या दोन्ही पुस्तकांकडून त्यांची फार अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. पण गप्प बसतील ते निपुणगे कसले. त्यांनी आपला धडपड करण्याचा उद्योग चालूच ठेवला. १९८१ सालापासून 'विशाखा' या दिवाळी अंकाचे पुनप्र्रकाशन करायला त्यांनी सुरुवात केली, मग बळीराजा, गृहिणी, कृषिवल या वार्षिक दैनंदिनींचे प्रयोग करून पाहिले. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. थोडेफार आर्थिक स्थैर्य आले.
त्यांच्या पत्नी त्यांना 'मारा अंधारात उडय़ा आणि धडपडा' असे म्हणत. निपुणगे यांच्या प्रकाशन, मुद्रण, मासिक, दैनंदिनी, दिवाळी अंक या सर्व उद्योगांसाठी हेच वर्णन समर्पक ठरते. त्यांच्या या प्रयोगांना त्यांच्या पत्नीची खंबीर साथ होती हेही तितकेच खरे. शिवाय त्यांनी नोकरी करून घर सांभाळले. त्यामुळे निपुणगे यांना धाडसी प्रयोग करून पाहण्याचे आणि सतत धडपडण्याचे स्वातंत्र्य मिळत राहिले!
प्रकाशकाने प्रकाशित केलेल्या एखाद्या पुस्तकावरून काही वादविवाद झाले नाहीत, न्यायालयीन खटले लढावे लागले नाहीत, असे सहसा होत नाही. सध्याच्या काळात या सव्यापसव्याच्या भीतीने अनेक मराठी-इंग्रजी प्रकाशक आपली पुस्तके सपशेल मागे घेतात किंवा नष्ट करून टाकतात. तर ते असो. विनोदी लेखक बाळ गाडगीळ यांच्या 'वळचणीचे पाणी' या आत्मचरित्राविषयी वर्षभराने फग्र्युसनचे माजी प्राचार्य बोकील यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून गाडगीळ आणि निपुणगे यांना न्यायालयात खेचले. त्याची छोटीशी हकिकतही रोचक म्हणावी अशी आहे.
असे संघर्षांचे छोटे-मोठे प्रसंग निपुणगे यांच्या आयुष्यात सतत आले आहेत. हे आत्मचरित्र अशा हकिकतींनीच भरले आहे. पण त्या सर्व आर्थिक संघर्षांच्या आणि व्यावहारिक हिकमतीच्या आहेत. निपुणगे यांनी त्यांना जमेल तेवढे आणि तसे प्रयोग करून स्थिर होण्याचा प्रयत्न केला. पण अशा गोष्टींना मूलभूत मर्यादा असते. त्यामुळे या चौकटीत जे आणि जेवढे शक्य होते, तेवढेच यश निपुणगे यांना मिळाले.
दिवाळी अंकासाठी, मासिकासाठी जाहिराती मिळवण्यासाठी काय काय करावे लागले, याविषयी निपुणगे यांनी सविस्तर लिहिले आहे, तसेच विशाखा या दिवाळी अंकात दरवर्षी काय काय साहित्य छापले याविषयी एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. केशवराव कोठावळे, श्री. ग. माजगावकर, वोरा कंपनीचे अमरेंद्र गाडगीळ, बाळ गाडगीळ अशा प्रकाशनव्यवहाराशी संबंधित व्यक्तींच्या स्वभावाचे काही पैलू निपुणगे यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून नोंदवले आहेत. शेवटचे प्रकरण हे त्यांच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतील कामाविषयीचे आहे. या प्रकरणातून मसापचे अंतरंग काही प्रमाणात जाणून घ्यायला मदत होते. या साहित्यिक संस्थेत कशा प्रकारचे राजकारण चालते, त्याची चांगल्या प्रकारे माहिती होते आणि राजकारणी काय किंवा साहित्य व्यवहारात लुडबुड करणाऱ्या व्यक्ती काय, यांच्यात कसा फारसा फरक नसतो, हे आपसूकच समजायला मदत होते.
प्रकाशनापासून सुरुवात करून पुस्तक विक्री, मुद्रण व्यवसाय, दिवाळी अंक इथपर्यंत प्रवास केलेल्या एका धडपडय़ा प्रकाशकाचे हे आत्मचरित्र आहे. साडेतीनशे पानांचे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकाला आवडेलच
असे नाही, पण प्रकाशन व्यवहाराशी संबंधित असलेल्यांना यातून काही संदर्भ-माहिती मिळू शकते आणि ज्यांना या क्षेत्राकडे वळायचे आहे त्यांना काय करू नये आणि कशा प्रकारे करू नये, याचा धडा या आत्मचरित्रातून नक्की मिळू शकतो. त्यांनी या पुस्तकाच्या वाटेला जायला काहीच हरकत नाही. फार थोर असे काही हाती लागणार नाही हे खरे, पण फार अपेक्षाभंगही होणार नाही.  
'हलचल' - ह. ल. निपुणगे, पुष्पक प्रकाशन, पुणे,
पृष्ठे - ३५२, मूल्य - ३५० रुपये.

कर्तेपणाकडून शहाणपणाकडे?

भारतीय प्रशासन सेवेतील माजी ज्येष्ठ अधिकारी पवन के. वर्मा यांची वर्तमान भारतीय समाजाचे भाष्यकार म्हणून ओळख झाली ती, १९९८ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'द ग्रेट इंडियन मिडल क्लास' या पुस्तकामुळे. जागतिकीकरणोत्तर भारतीय लोकव्यवहाराचे, विशेषत: मोठय़ा शहरांमधील नव्याने उदयाला येत असलेल्या मध्यमवर्गाचे वर्मा यांनी या पुस्तकात अतिशय यथार्थ विश्लेषण केले आहे. साहजिकच या पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि विदेशी भाषांमध्येही अनुवाद झाले. त्यानंतर २००० साली वर्मा यांनी पत्रकार रेणुका खांडेकर यांच्यासह 'मॅक्झिमाइज युवर लाइफ- अ‍ॅन अ‍ॅक्शन प्लॅन फॉर द इंडियन मिडल क्लास' या पुस्तकाचे लेखन केले. त्यानंतर 'बिइंग इंडियन- द ट्रथ अबाऊट व्हाय द २१ सेन्चुरी विल बी इंडियाज' (२००४), 'बिकमिंग इंडियन - द अनफिनिश्ड रिव्हॉल्युशन ऑफ कल्चर अँड आयडेंटिटी' (२०१०) ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील पहिल्या पुस्तकाची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली. म्हणजे गेली सोळा-सतरा वर्षे वर्मा सातत्याने भारतीय मध्यमवर्गाचे निरनिराळे प्रकारे विश्लेषण करत आहेत, त्याला त्याच्या कर्तव्याची, पूर्वाश्रमीच्या समृद्ध वारशाची, भारतीय संस्कृतीची, समाजाप्रतिच्या उत्तरदायित्वाची आणि भविष्यातील आव्हानांची जाणीव करून देत आहेत.
जागतिकीकरणोत्तर भारतीय मध्यमवर्ग हा महत्त्वाकांक्षी आणि सुख-समृद्धीला प्राध्यान्य देणारा आहे. सुशिक्षित, करिअरिस्ट असलेल्या या वर्गाला देशाचे राजकारण स्वच्छ, कार्यक्षम आणि विकासाभिमुख हवे आहे. साहजिकच या वर्गाच्या इच्छा-आकांक्षांचा प्रतिध्वनी उमटायला सुरुवात झाली. दुसरीकडे जागतिकीकरणामुळे शिक्षण, आरोग्य, राहणीमान, संधी यांचा लाभ मिळवून या वर्गाच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत गेली. त्यामुळे भारतीय राजकारणाचे कर्तेपणही याच वर्गाकडे आले. त्याचे ठसठशीत प्रतिबिंब २०१४च्या निवडणुकांत उमटलेले पाहायला मिळाले. त्यामुळे 'भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारी निवडणूक,' असे भविष्यात या निवडणुकीचे वर्णन केले जाण्याची शक्यता आहे.
आजच्या भारतीय मध्यमवर्गाची भूमिका बदलण्याची सात कारणे वर्मा यांनी पहिल्या प्रकरणात दिली आहेत. या वर्गाची वाढती आणि मतपेटीवर परिणाम करू शकणारी संख्या, पॅन-इंडियनसारखा स्वत:चा विस्तारलेला समूह, आपल्या वर्गाबाबतची सजगता, हा वर्ग वयाने पंचविशीच्या आतबाहेर असणे, या वर्गाचे सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाइल या साधनांवरील आधिपत्य, सामाजिक प्रश्नांविषयीचे भान आणि सरकार-प्रशासन यांच्या अकार्यक्षमतेविषयीची चीड, ही ती सात कारणे. या सात कारणांमुळे या मध्यमवर्गाच्या व्यक्तिमत्त्वात, भूमिकेत, प्रभावात आणि गुणवत्तेत बदल झाला आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्नांबाबत हा वर्ग रस्त्यावर उतरू लागला आहे, आपल्यापरीने त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करू लागला आहे, ही चांगली गोष्ट आहे, असे वर्मा म्हणतात. पण त्याच वेळी काही कळीचे प्रश्नही उपस्थित करतात. याची भविष्यातील दिशा काय असेल, मध्यमवर्गाच्या या संतापाला आणि सामाजिकतेला भविष्यात क्रांतिकारी, सकारात्मक बदलाचे कोंदण मिळू शकेल काय? की आहे ते बदला, पण नवे काहीच धोरण नाही, असा हा प्रकार आहे का? मध्यमवर्गाची ही ऊर्जा 'गेम चेंजर' ठरणार की हा 'सिनिकल गेम प्लॅन' ठरणार?
दुसऱ्या प्रकरणात मध्यमवर्गाच्या सामाजिक आणि राजकीय भूमिकेविषयी नेमके प्रश्न विचारले आहेत. त्यासाठी त्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मध्यमवर्गाची भूमिका नेमकेपणाने विशद केली आहे. म. गांधी, पं. नेहरू, आणीबाणी, बाबरी मशीद, आरक्षण, आर्थिक सुधारणा याबाबतच्या तत्कालीन मध्यमवर्गाच्या भूमिकेचे दाखले दिले आहेत.
तिसऱ्या प्रकरणात मध्यमवर्गाला राजकारणात बदल हवाय, पण त्या बदलाची दिशा काय असायला हवी, याचा ऊहापोह केला आहे.
शेवटच्या समारोपाच्या प्रकरणात वर्मा  मध्यमवर्गाने राज्यकर्त्यांची मानसिकता त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारून बदलायला हवी, असे सांगतात. कारण योग्य प्रश्न विचारण्यातून तुमचे शहाणपण सिद्ध होत असते. हे शहाणपण दाखवतानाच भारतात धार्मिक सौहार्द आणि सुप्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या दोन्ही तितक्याच सामंजस्याने हाताळल्या जायला हव्यात, हेही वर्मा नमूद करतात.
थोडक्यात कर्त्यांच्या भूमिकेत गेलेल्या मध्यमवर्गाने शहाण्यासुरत्याचीही भूमिका निभवायला हवी आणि त्यासाठी कशाकशाचे भान ठेवायला हवे, हे सांगणारे हे पुस्तक आहे.
द न्यू इंडियन मिडल क्लास -
द चॅलेंज ऑफ २०१४ अँड बियाँड :
पवन के. वर्मा,
हार्पर कॉलिन्स, नोएडा,
पाने : १०१, किंमत : २९९ रुपये.

Wednesday, June 4, 2014

राम पटवर्धन - 'ओपन' दृष्टीचा संपादक

29 July 2010 रोजी ठाण्याच्या घरी काढलेले छायाचित्र   
राम पटवर्धन यांनी मला २०१० साली सविस्तर मुलाखत दिली. आपले पूर्वायुष्य, सत्यकथा, ग्रंथसंपादन अशा अनेक विषयांवर मन मोकळं केलं. दुर्दैवाने तीच त्यांची शेवटची मुलाखत ठरली. त्या मुलाखतीच्या अनुभवाविषयी...
,,,,,,,,,,,,,,,,
सत्यकथा बंद पडून आता जवळपास ३२ वर्षे झाली आहेत, पण अजूनही मराठीतल्या वाङ्मयीन मासिकांचा विषय निघाला की, त्याची सुरुवात ‘सत्यकथा’पासूनच होते. आणि ‘सत्यकथा’ म्हटलं की श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांचीच नावं आठवतात. विचक्षण दृष्टी आणि साहित्यावरचं अनिवार प्रेम यांच्या जोरावर या दोन संपादकांनी ‘सत्यकथा’ला श्रेष्ठ दर्जा मिळवून दिला. पटवर्धन तसे ‘सत्यकथा’चे संपादक सहा-सात वर्षंच होते. पण मौजेत त्यांनी जवळपास चाळीस वर्षे काम केले. ‘सत्यकथा’ बंद पडल्यावर पाचेक वर्षांनी म्हणजे १९८७मध्ये ते मौजेतून निवृत्त झाले होते. तेव्हापासून पटवर्धन हे जवळपास अज्ञातवासात असल्यासारखेच होते. या काळात त्यांनी मौजसाठी काही पुस्तकांचे संपादन केले, तेवढेच. त्यामुळे त्यांच्याशी बोलून त्यांचा काळ, संपादकीय दृष्टिकोन जाणून घ्यावा या हेतूने त्यांच्याशी चार-पाच तास निवांत गप्पा मारल्या. त्यातून पटवर्धन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही नवे कंगारे उलगडले.


पटवर्धन शिवाजी पार्कच्या शाळेत शिकले. तिथे त्यांना शिकवायला साक्षात पु. ल. देशपांडे होते. ते पटवर्धन यांना इंग्रजी शिकवत. या शाळेत पटवर्धन यांच्या दोन वर्ग पुढे बाळासाहेब ठाकरे होते. त्यावेळी पटवर्धन काहीबाही लिहीत होते. एकदा त्यांनी मॅझर्ड झिलावू या पोलिश लेखकाच्या एका लेखाचा अनुवाद केला आणि पु.लं.ना दाखवला. ते म्हणाले, ‘हे उद्याा मला एका स्वतंत्र कागदावर सुवाच्य अक्षरात लिहून दे.’ तो अनुवाद पु.लं.नी त्याकाळी प्रचंड दबदबा असलेल्या ‘अभिरुची’मध्ये छापून आणला. साल होतं १९४६. पण त्यानंतर काही पटवर्धन यांनी अनुवाद केले नाहीत. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘नाना तºहा’ झाल्या. त्यात अनुवाद प्रकरण मागे पडत गेलं. हे आपलं काम नाही असं त्यांनी ठरवून टाकलं.

चित्रकार जतीन दास यांनी राम पटवर्धन यांचे काढलेले रेखाचित्र

शिक्षण पूर्ण करून कुठं तरी मामलेदार कचेरी वा आणखी कुठं नोकरी करायची एवढंच पटवर्धन यांनी ठरवलं होतं. तसे ते सचिवालयात नोकरीलाही लागले. पण साहित्याचं अनिवार प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. मग त्यांनी ती नोकरी सोडून दिली. रुइयाच्या चौकात तेव्हा अनेक साहित्यिक जमत असत. त्यात पटवर्धनही सहभागी होत. त्याबाबत पटवर्धन यांनी एक रंजक किस्सा सांगितला तो असा- एकदा तिथे त्यांना पु. ल. भेटले. म्हणाले, ‘अरे, तू एसएससीला पहिला आला होतास. मग तू सायन्स घेतलं असशील?’ पटवर्धन म्हणाले, ‘नाही. मी साहित्य घेतलंय.’ पु.ल. म्हणाले, ‘हा कुठून दुर्विचार सुचला तुला? हे तुला जड नाही का जाणार?’ पटवर्धन म्हणाले, ‘माझं ठरलेलं आहे. मी साहित्याचाच व्यासंग करणार. त्याची मी पर्वा करत नाही.’ (शेवटचं वाक्य मी मनातल्या मनात म्हटलं, अशी पुस्ती त्यावर पटवर्धन यांनी हळूच केली.) असं दोन-तीनदा घडलं. पु.लं. एकदा त्यांना म्हणाले, ‘तू सचिवालय कशाला सोडलंस? तिथे तुला चांगली करिअर करता आली असती.’ पण सचिवालयात साहित्याला काही स्थान नव्हतं म्हणून ते पटवर्धन यांनी सोडून दिलं. कशाचीच पर्वा करायची नाही आणि आपण कशाची पर्वा करत नाही या शब्दांचाही उच्चार करायचा नाही, असा पटवर्धन यांचा बाणा होता.


‘योगायोग’ या शब्दाला पटवर्धन यांच्या आयुष्यात बरंच स्थान आहे. कारण ते ‘सत्यकथे’त आले तेही योगायोगानेच. श्रीपु तेव्हा रुइया कॉलेजमध्ये शिकवत होते. पटवर्धन त्यांचेच विद्याार्थी. ‘मौज’चे तत्कालीन संपादक ग. रा. कामत हे चित्रपटसृष्टीत नशीब आजमावयाला चालले होते. त्यामुळे श्रीपुंनी पटवर्धन यांना मौजमध्ये यायची ऑफर दिली. मौजसारख्या संस्थेत काम करण्याची संधी मिळतेय तर का सोडा, असा विचार करून पटवर्धन तयार झाले. आधी मौज साप्ताहिकात रुजू झाले. (तसे तर ते आधीपासूनच रुजू होते म्हणा!) सत्यकथा ही विशिष्ट लेखकांचीच मक्तेदारी होती आणि तिचं स्वरूप सदाशिवपेठी होतं, या आरोपात कितपत तथ्य आहे, असं विचारल्यावर पटवर्धन म्हणाले की, ‘फारसं नाही.’ पटवर्धन यांनी सुर्वे, ढसाळ, दि. के. बेडेकर अशा अनेक लेखकांना मौजेतून लिहितं केलं. तरीही काही लेखक आमच्याकडून सुटले हे त्यांना मान्य होतं. ‘कुठलंही मासिक हे सर्व साहित्याला सामावून घेऊच शकत नाही. त्यामुळे उगाच भलत्या गमजा मारू नयेत,’ असा पटवर्धनांचा स्वत:वर शेरा मारला!

व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी राम पटवर्धन यांचे काढलेले अर्कचित्र

भागवत-पटवर्धन यांच्या संपादनाविषयी बरंच उलटसुलट बोललं जातं. त्यावर ‘ते सगळे प्रवाद आहेत’, असा निर्वाळा पटवर्धन यांनी दिला. आणि तो खरा असावा. कारण पटवर्धन काय किंवा श्रीपु काय, त्यांच्या संपादनामुळे नाराज झालेल्या लेखकांची नावे ऐकायलाही मिळत नाहीत. किमान जाहीरपणे तरी तसं कुणी बोललेलं नाही. कारण संपादन म्हणजे फुलवणं, लेखनाच्या आत गुदमरलेली थीम फुलून कशी येईल या पद्धतीने पटवर्धन साहित्याकडे पाहत. त्यामुळे ते संपादनाला ‘संगोपन’ असा शब्द वापरत. पटवर्धन म्हणाले की, ‘कडक शिस्तीचे हेडमास्तर अशी आमची जी ओळख आहे, ती फक्त प्रतिमाच आहे. जी मंडळी लांबून बघत असतात त्यांनी ती करून घेतली आहे.’ पटवर्धन लेखकाशी रीतसर चर्चा करूनच पुनर्लेखन करून घेत. यातून सानिया, आशा बगे, दीपा गोवारीकर, आनंद विनायक जातेगावकर या साहित्यिकांना उत्तेजन देण्यात आणि त्यांचं सुरुवातीचं लेखन ‘सत्यकथा’त छापलं गेलं, ते पटवर्धन यांच्यामुळेच.


मौज हा तत्कालीन लेखक-चित्रकार-नाटककार अशा सांस्कृतिक क्षेत्रातल्या प्रस्थापित आणि नवोदितांचा गप्पांचा अड्डा होता. त्यांना सांभाळायचं काम सुरुवातीला श्रीपु करत, नंतर ते पटवर्धन यांच्याकडे आलं. पटवर्धन या सगळ्यात असून सर्वांपासून अलिप्त असत. ते कुठल्याही वादात पडत नसत. पण शिरा ताणून, घसा फोडून उच्चरवाने बोलणाºयांना ते युक्तीने लिहितं करत आणि ते लेखन ‘सत्यकथा’त छापत. त्यावर चर्चा व्हावी असं त्यांना वाटत असे. पण बºयाचदा त्यावर काहीच चर्चा होत नसे. असे एकदा पटवर्धन यांनी ‘चार डावे दृष्टिक्षेप’ या नावाने मराठी साहित्याची माक्र्सवादी समीक्षा करणारे चार लेख छापले. पण त्यावर कसलाही प्रतिसाद नाही की चर्चा नाही. एकदम नि:शब्द शांतता. असं झालं की पटवर्धन अस्वस्थ होत. म्हणून त्याचं वर्णन त्यांनी ‘कानठळ्या बसवणारा शुकशुकाट’ असं केलं. त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्ताने ग्रंथालीने २००३ साली त्यांचा जो सत्कार समारंभ केला. तेव्हाही पटवर्धनांनी मराठी साहित्यातील या ‘कानठळ्या बसवणाºया शुकशुकाटाचा’ उल्लेख केला. पटवर्धन यांची मराठी साहित्याची समीक्षा म्हणून त्यांच्या या वाक्प्रचाराचं बरंच कौतुकही झालं. पण त्याविषयी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी ते ‘डेफनिंग सायलेन्स’चं ते भाषांतर आहे असं मोकळेपणानं सांगून टाकलं.


पटवर्धन यांनी फारसं स्वतंत्र लेखन केलेलं नाही. लेखनाची त्यांना हौस नव्हती असं म्हटलं तरी चालेल, किंवा मग तेही श्रीपुंचेच सहकारी असल्याने लेखनाबाबत काहीसे उदासीन होते असं म्हणावं लागले. तरीही प्रसंगपरत्वे त्यांनी काही मोजके लेख लिहिले आहेत. ‘सत्यकथे’त ते मराठी नाटकांच्या परीक्षणाचे सदर श्रीरंग या नावाने लिहित. सत्यकथेतच त्यांनी चेकॉव्हच्या काही कथांचे अनुवाद केले. विष्णुपंत भागवत आणि जयवंत दळवी यांच्या आग्रहावरून त्यांनी मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या ‘द यर्लिंग’ या पुस्तकाचा ‘पाडस’ या नावानं मराठी अनुवाद केला आहे. सर्वोत्कृष्ट अनुवाद म्हणून गेली अनेक वर्षं या पुस्तकाचा उल्लेख केला जातो आहे. पटवर्धन यांना दोन मुलं - श्रीरंग आणि अनिरुद्ध. पहिला वकील आहे तर दुसरा ऑडिटर. या दोघांनाही जवळपास ‘पाडस’ तोंडपाठ आहे. याशिवाय ‘नाइन फिफ्टीन टू फ्रिडम’चा ‘अखेरचा रामराम’ आणि बी. के. अय्यंगार यांच्या पुस्तकाचा ‘योगदीपिका’ असे दोन मराठी अनुवाद पटवर्धन यांच्या नावावर आहेत. पुष्कळ लोक अय्यंगार यांच्या अनुवादाला ‘तुमची योगायोगदीपिका’ असं म्हणतात.


पटवर्धन यांचा डावा डोळा बहुधा जन्मापासूनच दुबळा होता. त्यामुळे त्यांना कधी चष्माही लावता आला नाही. त्यावर पटवर्धन यांची टिप्पणी मोठी मासलेवाईक होती, ते म्हणाले, ‘ते एका अर्थानं बरंच झालं. त्यामुळे जगाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन ओपन राहिला.’ पटवर्धन यांच्या या ओपन दृष्टिकोनाचं एक उदाहरण सांगायला हरकत नाही. लघुअनियतकालिकांच्या चळवळीतल्या राजा ढाले, सतीश काळसेकर वगैरे मंडळींनी ५ मार्च १९७९ रोजी मौजच्या कार्यालयासमोर ‘सत्यकथा’ची जाहीर होळी केली. या घटनेचा उल्लेख सत्यकथाच्या प्रस्थापित कंपूशाहीचा केलेला निषेध म्हणून अनेक वेळा केला जातो. गंमत म्हणजे जाहीर निमंत्रणपत्रिका छापून हा ऐतिहासिक कार्यक्रम करणाºयांपैकी कुणीही याविषयीची सत्य गोष्ट आजवर कधी जाहीरपणे सांगितली नाही. राम पटवर्धन यांनी या मुलाखतीत याविषयीची सत्यकथा सांगितली, ती अशी की- त्या दिवशी राजा ढाले वगैरे मंडळी मौजच्या कार्यालयासमारे पोचली खरी, पण घाईगडबडीत त्यांच्याकडे असलेला एकुलता एक अंक ते घरीच विसरून आले होते. दरम्यान बाहेरची गडबड ऐकून पटवर्धन आणि त्यांचे सहकारी गुरुनाथ सामंत खिडकीत आले. सामंत पटवर्धन यांना म्हणाले की, ‘हे लोक सत्यकथेची होळी करायला आले आहेत.’ सामंत मौजेत काम करत असले तरी लघुअनियतकालिकांशी संबंधित होते. त्यामुळे पटवर्धन त्यांना म्हणाले की, ‘तुम्ही मौजेच्या स्टाफपैकी असलात तरी तुम्ही त्यांच्यातले आहात. तेव्हा तुम्ही त्यांच्यात जा. आणि जाताना सत्यकथाचे अंकही घेऊन जा.’ त्यानुसार सामंत अंक घेऊन खाली उतरले आणि जथ्यात सामील झाले. त्यांना जथ्यावाल्यांकडे अंक नाही याची कल्पना नव्हती. मग त्यांनी स्वत:कडचे अंक त्यांना दिले आणि त्याचीच होळी करण्यात आली. म्हणजे सत्यकथाची होळी करण्यात आली ती मौजेच्या जिवावर. आणि त्याविषयी पटवर्धन यांनी स्वत:हून कधीही ब्र उच्चारला नव्हता. त्यांना विचारल्यावरच त्यांनी ही गोष्ट सांगितली. पटवर्धन यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ओपन होता तो हा असा!


सध्या आपल्या आजूबाजूला जे काही चाललं आहे, त्याला सामावून घेईल असं मराठी साहित्यिकांच्या आणि वाङ्मयीन मासिकांच्या हातात काही राहिलेलं नाही. सगळाच काळ बदलला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पटवर्धन यांनी अनुवाद केलेल्या ‘पाडस’चा शेवट फार सुंदर आहे. त्याचं शेवटचं वाक्य आहे, ‘पोरा, जीवन फार सुंदर आहे, पण ते सोपं मात्र नाही.’ हे समजून घेऊन पटवर्धन जगले. त्यामुळे त्यांना कधी कुठल्याही लौकिकाचा, प्रलोभनाचा आणि प्रसिद्धीचा मोह झाला नाही. सत्त्वशीलतेनं त्यांनी आपलं साहित्याचं संपादन, नव्हे संगोपन करण्याचं काम केलं. श्रीपुंनी त्यांचा उल्लेख ‘अभिन्नजीव सहकारी’ असा करून म्हटलं आहे, ‘ते मला सहकारी म्हणून लाभले हे मी माझं भाग्यच समजतो.’ पटवर्धनही स्वत:चा उल्लेख ‘दत्तक घेतलेला भागवत’ असाच करत. मौजमधून निवृत्त झाल्यावरही त्यांना लेखकपणाच्या प्रलोभनाचा मोह झाला नाही. शांतपणे ते अज्ञातवासात निघून गेले. त्यानंतर २००३ साली ग्रंथालीनं त्यांची पंच्याहत्तरी साजरी केली तेवढंच काय ते त्यांचं जाहीर कार्यक्रमातलं दर्शन. त्यानंतर ते पुन्हा अज्ञातवासात गेले. आणि आता तितक्याच शांतपणे निघून गेले.

Tuesday, April 22, 2014

शेक्सपिअर सर्वत्र आहे!

Published in Loksatta, Saturday, April 19, 2014
येत्या २३ एप्रिलला शेक्सपिअरच्या जन्माला ४५० वर्ष होतील. आजही सर्वाधिक वाचला जाणारा, सर्वाधिक खपाचा, जगातल्या सर्व भाषांत पोचलेला आणि जगातील सर्व साहित्यावर-साहित्यिकांवर प्रभाव असलेला नाटककार म्हणून शेक्सपिअरचं स्थान अबाधित आहे. केवळ ४० नाटकं आणि १५४ सॉनेट एवढीच ग्रंथसंपदा शेक्सपिअरच्या नावावर जमा आहे. पण त्याच्या नाटकांचे प्रयोग जगभरातल्या जवळपास सर्व भाषांमध्ये झाले आहेत, आजही होत आहेत. इंग्रजी नाटकाचा चेहरामोहरा बदलायचं काम शेक्सपिअरनं केलं. रॉयल शेक्सपिअर कंपनी ही नाटय़संस्था तर शेक्सपिअरच्या नाटकांचे प्रयोग गेल्या कित्येक वर्षांपासून करत आली आहे. आताही २३ ते २६ एप्रिलदरम्यान ती शेक्सपिअरच्या नाटकांचे नव्यानं प्रयोग करणार आहे. शेक्सपिअरच्या कुठल्या ना कुठल्या नाटकाचा जगभरात प्रत्येक मिनिटाला एक याप्रमाणे कुठे ना कुठे सतत प्रयोग चालू असतो!
इंग्रजी भाषा शेक्सपिअर आणि बायबल यांनी घडवली आहे असं म्हटलं जातं. इंग्रजी भाषा ही बहुतांशी शेक्सपिअरीन आहे. शेक्सपिअरनं या भाषेच्या अक्षांश-रेखांशमध्ये जे जे काही व्यक्त करता येईल, ते ते आपल्या नाटकांमधून केलं आहे. भावनेच्या प्रत्येक छटेला, सूक्ष्मादिसूक्ष्म भेदाला इंग्रजीत स्वतंत्र शब्द आहेत. त्याचं बरंचसं श्रेयही शेक्सपिअरलाच जातं. त्यामुळे इंग्रजी भाषा व बायबल या दोन्ही गोष्टी या इंग्रजाच्या मानबिंदू आहेत. इंग्रज माणूस जिथे जिथे जातो, तिथे तिथे तो या दोन्ही गोष्टी घेऊन जातो. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत शेक्सपिअर आणि बायबल या दोन्ही गोष्टी आणल्या. अल्पावधीतच शेक्सपिअरनं भारतीय वाचकांचा आणि लेखकांचा कब्जा घेतला. एक काळ असा होता की, महाराष्ट्रात शेक्सपिअरचे भाषांतरकार, अभ्यासक आणि चाहते यांची संख्या लक्षणीय म्हणावी इतकी होती. आजही ती काही प्रमाणात आहे. शेक्सपिअरचे 'डायहार्ट फॅन' म्हणावे असे बरेच लोक आजही महाराष्ट्रात आहेत. त्यांना शेक्सपिअरविषयी ब्र उच्चारलेला चालत नाही. तसंही त्याच्याविषयी ब्र उच्चारणं सोपं नाहीच. पण चुकूनमाकून उच्चारला गेला तर त्याची धडगत राहत नाही. असो.
ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने यावर्षी शेक्सपिअरच्या १७०० शब्दांचा समावेश नव्या आवृत्तीमध्ये केला आहे. स्व्ॉगर, क्रिटिक्स, गॉसिप, अ‍ॅड्व्हर्टायजिंग हे शब्द शेक्सपिअरची देणगी आहे. 'जग ही एक रंगभूमी आहे', 'असे मित्र असल्यावर शत्रूची काय गरज?', 'नावात काय आहे?', 'जगावं की मरावं?' असे काही वाक्प्रचार मराठीत इतके रूढ झाले आहेत की, ते मूळ शेक्सपिअरच्या नाटकातील आहेत, याची अनेकांना खबरबात नसते.
शेक्सपिअरनं मानवी जीवनाकडे इतक्या विविध पद्धतीनं पाहिलं आहे की, तसं इतर कुणालाही फारसं जमलेलं नाही. तो जीवनाकडे पाहताना ३६० अंशाचा कोन वापरत असावा! त्यामुळे केवळ काळ्या आणि पांढऱ्या रंगात त्याच्या नाटकातील पात्रं नसतात. मानवी जगण्याच्या सर्व छटा त्याच्या नाटकांतून व्यक्त होतात. 'रोमिओ अँड ज्युलिएट', 'ज्युलिअस सीझर', 'अ मिडसमर नाइट्स ड्रीम', 'हॅम्लेट', 'किंग लिअर', 'र्मचट टू व्हेनिस' ही शेक्सपिअरची नाटकं भाषिक श्रीमंती, मानवी सुखात्मिका-शोकांतिका, प्रहसन, विनोद, उपहास, उपरोध, प्रेम, कारुण्य, सौंदर्य यांचं उच्चप्रतीचं दर्शन घडवतात.
शेक्सपिअरच्या 'ज्युलिअस सीझर' या नाटकाचा पहिला प्रयोग १५९९ मध्ये झाला. शेक्सपिअरचं निधन २३ एप्रिल १६१६ रोजी वयाच्या ५२व्या वर्षी झालं. ८,२०,००० लोक दरवर्षी शेक्सपिअरच्या लंडनमधील घराला भेट देतात. शेक्सपिअरच्या नाटकांचे अनुवाद जवळपास जगभरातल्या सर्व भाषांमध्ये झाले आहेत. इंग्रजीत लिहिणारे बहुतांशी लेखक सर्वाधिक प्रमाणात शेक्सपिअरचीच अवतरणं देतात..
शेक्सपिअर हा जगातला असा लेखक आहे, ज्याच्याशिवाय मानवी जीवनाची थोरवी समजून घेताच येत नाही. विंदा करंदीकरांची एक कविता आहे 'तुकोबा-शेक्सपिअर भेटी'विषयी-
तुकोबांच्या भेटी । शेक्सपिअर आला ।।
तो झाला सोहळा। दुकानात.
जाहली दोघांची । उराउरी भेट
उरातलें थेट । उरामध्ये.
तुका म्हणे ''विल्या। तुझे कर्म थोर;
अवघाचि संसार । उभा केला।।''
शेक्सपीअर म्हणे । ''एक ते राहिले; ।
तुवा जे पाहिले विटेवरी.''
तुका म्हणे, ''बाबा ते त्वां बरे केले,
त्याने तडे गेले। संसाराला;
विठठ्ल अट्टल। त्याची रीत न्यारी
माझी पाटी कोरी । लिहोनिया.''
शेक्सपीअर म्हणे, ''तुझ्या शब्दामुळे
मातीत खेळले । शब्दातीत''
तुका म्हणे, ''गडय़ा। वृथा शब्दपीट
प्रत्येकाची वाट । वेगळाली
वेगळिये वाटे । वेगळिये काटे;
काटय़ासंगे भेटे । पुन्हा तोच.
ऐक ऐक वाजे । घंटा ही मंदिरी।
कजागीण घरी । वाट पाहे.''
दोघे निघोनिया गेले दोन दिशां।
कवतिक आकाशा आवरेना ।।

Monday, March 24, 2014

गो. पु. देशपांडे यांच्याविषयी..

2 August1938 – 16 October 2013
 गो. पु. यांचे निधन झाल्यावर हा लेख लिहिला होता. तो तेव्हा अप्रकाशित राहिला. आता इथे देतो आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गोविंद पुरुषोत्तम देशपांडे आत्ताआत्तापर्यंत पुण्यातल्या निवडक सार्वजनिक कार्यक्रमांत दिसत. त्यामुळे त्यांचं जाणं तसं अनपेक्षितच म्हणायला हवं. २ ऑगस्ट रोजी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता होणार होती. पण ते आता होणे नाही. असो. त्यांची महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक वर्तुळात ओळख आहे ती, ‘गोपु’ या नावाने तर दिल्लीच्या बुद्धिजीवी वर्तुळात त्यांना ‘जीपीडी’ या नावाने संबोधले जाई.
गोपु मराठीतले एकमेव राजकीय नाटककार होते, याबाबत कुणाचंही दुमत व्हायचं कारण नाही. मराठी नाटकाच्या सीमारेषा कौटुंबिक-सामाजिक या विषयाच्या मर्यादा उल्लंघून पुढे वा आजूबाजूला जाताना फारशा दिसत नाहीत. अशा काहीशा एकारलेल्या परिस्थितीत जाणीवपूर्वक राजकीय नाटक पुढे आणण्याचं काम गोपुंनी केलं. नाटककार म्हटला की, तो प्रमाणापेक्षा जास्त सर्जनशील असायचाच, असा आपल्याकडे परिपाठ असतो. त्यामुळे अशा नाटककारांच्या नाटकामध्ये प्रखर सामाजिक वास्तव असलं तरी त्यात फिक्शनचाच भाग अधिक असतो. शिवाय मराठी नाटककार हे मराठी कथा-कादंबरीकारांसारखेच राजकीय-सामाजिकदृष्ट्या बधिर असतात. त्यांचं या विषयांचं वाचन आणि आकलन फारच वरवरचं असतं. आणि तरीही आपल्याला वाटतं वा दिसतं तेवढंच सत्य असा त्यांचा आविर्भाव असतो. गोपुंच्या नाटकात हे दिसत नाही. त्याचं कारण त्यांची राजकारणाची समज अतिशय चांगली होती. किंवा असं म्हणू या की, इतर मराठी नाटककारांपेक्षा कितीतरी जास्त होती. अनेक वर्षे दिल्लीत राहिल्यामुळे, जवाहरलाल विद्याापीठासारख्या डाव्या विचारसरणीचं प्राबल्य असलेल्या ठिकाणी अध्यापन करत असल्यामुळे त्यांचा राजकारणाचा चांगला परिचय आणि अभ्यास होता.
वर्ग हा गोपुंचा आवडता शब्द. त्यांच्या भाषेत म्हणायचं तर, वसंत कानेटकर यांचा कौटुंबिक रोमँटिसिझम आणि विजय तेंडुलकरांचा कौटुंबिक हिंसाचार ही मराठी नाटकातली दोन स्कूल्स. या दोन्हींच्या मध्ये मराठी नाटकांची लांबीरुंदी संपून जाते. या दोन्ही स्कूल्सपेक्षा आणि एकंदरच मराठी नाटकांमध्ये गोपुंची नाटकं त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे वेगळी ठरतात. कारण ती पूर्णपणे राजकीय नाटकं आहेत. त्याहीपेक्षा विचारसरणीची नाटकं आहेत. गोपुंची वैचारिक बांधीलकी डाव्या विचारसरणीशी होती. डावे लोक आपले तत्त्वज्ञान प्राणपणाने जपायचा प्रयत्न करतात. जगण्यासाठी विचारसरणी ही नितांत निकडीची गोष्ट असते त्यांच्यासाठी. पण मानवी व्यवहार केवळ वैचारिक तर्कप्रामाण्यावर चालत नाही. आणि हेच नेमके डावे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे त्यांची फरपट होते. अर्थात केवळ आपलीच विचारसरणी प्रमाण मानणाºया आणि तिला चिकटून बसलेल्या प्रत्येकाच्या बाबतीत, ते होतंच. म्हणजे विशिष्ट ध्येयवादातून प्रेरित होऊन काम करणाºयांची शोकांतिका होते. हा विचारव्यूह मांडायचा प्रयत्न गोपुंनी आपल्या नाटकांमधून केला. त्यांचं पहिलं नाटक, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ ते ‘शेवटचा दिस’पर्यंत हेच दिसतं. प्रखर सामाजिक जाणिवांना विचारसरणीची जोड असेल तर माणसांचं काय होतं, हे गोपुंच्या नाटकातून जाणून घेता येतं.
गोपुंच्या आधीही राजकीय विचारसरणीची नाटकं लिहिण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. त्यांच्याच म्हणण्यानुसार म. फुले यांनी तो प्रयत्न १८८५ साली ‘तृतीय रत्न’सारखं नाटक लिहून केला होता. पण त्याचे प्रयोगच तेव्हा होऊ शकले नाहीत. १९७२ साली प्रकाशित झालेल्या गोपुंच्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या पहिल्याच नाटकाचं दिग्दर्शन पं. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकानं केलं, तर त्यातील श्रीधर विश्वनाथ ही प्रमुख व्यक्तिरेखा डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती. तीही ‘हे आपण केलेच पाहिजे’ उत्कट तीव्रतेतून. या नाटकाने त्यांनी चकित केलं होतं.
थोडक्यात, विचारसरणीशी प्रामाणिक बांधीलकी मानून सातत्याने गंभीर राजकीय नाटक लिहिणारे निदान मराठीमध्ये तरी गोपुंशिवाय दुसरं नाव घेता येत नाही. नंतरच्या काळात दलित लेखकांनी सामाजिक जाणीवेची नाटकं लिहिली. पण त्यात विद्रोह आणि चीड यांचं पारडं जास्त भरतं. गोपुंचा भारतीय विचारांचा चांगला अभ्यास होता. त्यामुळेच त्यांच्या नाटकांमध्ये गांभीर्य आणि मोठा विचारव्यूह पाहायला मिळतो.
‘उद्ध्वस्त धर्मशाळा’चा त्या काळी खूप गाजावाजा झाला असला तरी त्यांच्या इतर नाटकांचं तसं झालं नाही. खरं तर त्यांची नाटकं दिग्दर्शक आणि प्रेक्षक या दोघांनाही सहजासहजी पेलता येतील, अशीच कधीच नव्हती. नाटक हा गंभीर कलाप्रकार आहे, ही डॉ. लागूंची धारणा असली तरी ती बºयाच मराठी दिग्दर्शकांची आणि प्रेक्षकांची नाही. त्यांच्यासाठी तो व्यवसायाचा आणि करमणुकीचाच भाग आहे. अशा परिस्थितीत गोपुंच्या नाटकाचे प्रयोग होणं शक्य नव्हतंच. पण त्यांनी म. फुले यांच्यावर लिहिलेल्या ‘सत्यशोधक’ या चरित्रनाटकाचे मागील दीड-दोन वर्षांत महाराष्ट्रभर १०० प्रयोग झाले. दिग्दर्शक अतुल पेठे यांनी पुणे महानगरपालिकेतील कामगारांना घेऊन हे नाटक केलं. त्याला महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद मिळाला. हे नाटकही राजकीय नाटकच मानलं जातं. मानलं जायला हवं. कारण सार्वकालीनत्व आणि समकालीनता असल्याशिवाय असं घडू शकत नाही.
गोपु हे वैचारिक शिस्त मानणारे आणि अ‍ॅकॅडेमिक प्रवृत्तीचे अभ्यासक होते. शिवाय लिहिणार ते गंभीर विषयावर. ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’ या प्रतिष्ठित साप्ताहिकात त्यांनी वीस-पंचवीस वर्षे सदरलेखन केले. मुंबईतून प्रकाशित होणाºया या साप्ताहिकाचा भारतातील बुद्धिजीवींच्यावर्तुळात चांगलाच दबदबा आहे. याशिवाय त्यांनी ‘निबंध’ हा विस्मृतीत जात असलेला वाङ्मयप्रकार टिकून राहावा म्हणून ‘चर्चक निबंध’ हे दोन खंडी पुस्तकही लिहिले. हा त्यांचा अतिशय आवडता साहित्यप्रकार. निबंधातून वैचारिक मांडणी चांगल्या प्रकारे करता येते. विचारांचा व्यापक पट मांडता येतो. पण तसं लेखन मराठीमध्येच होत नसल्याने ‘निबंधा’च्या वाट्याला फारसं कुणी जाताना दिसत नाही. कारण त्यासाठी वैचारिक शिस्त असावी लागते. आणि चांगल्या प्रकारे विचारही करता यावा लागतो. निबंधाच्या -हासाविषयी त्यांना सतत खंत वाटत असे.
गोपु काही विनाकारण विधानं करून प्रसिद्धी मिळवणारे नव्हते. पण वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दीच्या (१९९८) निमित्ताने दिल्लीत झालेल्या परिसंवादात गोपुंनी त्यांच्यावर प्रखर टीका केली होती. त्यावर तेव्हा मोठं वादंग माजलं होतं. गोपुंनी महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा वल्गना खांडेकरप्रेमींनी केल्या होत्या. विचारांच्या लढाया विचारांनीच लढायच्या असतात. त्यात आततायीपणा आणि भाबडेपणा आणायचा नसतो, याचं भान आपल्याला अजूनही फारसं आलेलं नाही. त्यामुळे अशा प्रतिक्रिया दुर्दैवी असल्या तरी अनपेक्षित म्हणता येत नाहीत. पण योग्य वेळी आणि योग्य जागी केलेले औचित्यभंग स्वागतार्हच असतात. मात्र याबाबतीतही आपण निदान साक्षर व्हायलाही तयार नाही. तर ते असो.
गोपुंच्या नाटकांची यथायोग्य समीक्षा गेल्या तीस-चाळीस वर्षांत तरी झाली नाही. कारण त्यांची नाटकं समजण्याएवढं राजकीय आकलन मराठी नाट्यसमीक्षकांकडे नाही. त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणारच आहे. पण खरी भीती आहे, ती ही की, गोपुंनंतर राजकीय नाटक मराठीमध्ये लिहिलं जाणार की नाही? याचं उत्तरही आता देता येण्यासारखं नाही. त्यामुळे त्यांचा राजकीय नाटकांचा वारसा पेलायला कोण पुढे येणार हा प्रश्न आहे.
गोपु हे तसे बुद्धिजीवींच्या वर्तुळातले. त्यामुळे त्यांचा गोतावळाही त्याच वर्गातला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही. पण त्यांचा खराखुरा जिवलग मित्र होते, प्रा. राम बापट. गतवर्षी याच महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच बापट यांचं निधन झालं. तर आता गोपुंचं. बापट लोकाभिमुख विचारवंत तर गोपु अ‍ॅकॅडेमिक. ही दोन्ही माणसं महाराष्ट्राचं वैभव होती. आता ती दोन्ही नाहीत. आणि रूढ शब्द वापरायचा तर त्यांच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही.

शतक एकविसावे, दशक पहिले

एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानं जग बदलवलं असं खरोखर म्हणता येईल की नाही, असा प्रशद्ब्रा काहींना नक्की पडू शकतो. पण या दशकात घडलेल्या नानाविध घटना, घडामोडी, तंत्रज्ञानातील बदल आणि जग गमावून बसलेल्या गोष्टी यांची गोळाबेरीज केली तर त्यात तथ्य आहे हे नाकारता येत नाही.
-----------------------------------------------------
कुठलंही शतक संपून नवीन शतक सुरू झालं की, त्याचा आढावा घेण्याची पद्धत असते. मागे वळून त्या शतकाकडे पाहिलं की, त्यात घडून आलेल्या किती तरी उलथापालथींनी आपण स्तिमित होऊन जातो. केवळ भारतापुरता विचार करायचा तर एकोणिसावे शतक हे भारतीय प्रबोधनाचं शतक मानलं जातं. या शतकात केवळ भारतातच नाही तर जगातही उत्क्रांतीचा अतिप्रगत टप्पा ओलांडला गेला. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, तंत्रज्ञान, माहिती, संस्कृती, व्यापार अशा अनेक क्षेत्रांत विधायक बदल घडून आले. जगाची एका नव्या संकल्पनेशी ओळख होऊन त्याचा प्रवास अधिकाधिक विधायकतेकडे होईल, असा आशावाद निर्माण झाला. पण विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानंतरच त्याला पहिल्या महायुद्धाच्या रूपानं तडे जायला सुरुवात झाली. नंतर दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध यांनी जग ढवळून निघालं. जगातले किती तरी देश स्वतंत्र झाले आणि मग जग पुन्हा नव्या बदलांना सामोरं जाऊ लागलं. साठीच्या दशकानं तर साहित्यापासून समाजापर्यंत मोठं स्थित्यंतर घडवून आणलं. त्याचा प्रभाव ओसरतो न ओसरतो तोच नव्वदचं दशक सुरू झालं. विसाव्या शतकातल्या या शेवटच्या दशकानं एकविसाव्या शतकाची नांदी केली आणि मग एकविसावं शतक पुन्हा नवी आव्हानं घेऊन आलं आणि नव्या संधीही.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानं आशा, निराशा आणि अनेक धक्कादायक गोष्टी यांचे संमिश्र रूप दाखवलं. म्हणून या दशकाला ब्रिटिश पत्रकार, लेखक आणि संपादक टीम फुटमन ‘द नॉटिज’ असं म्हणतो. २००० ते २००९ या दशकानं जग बदलवलं. दहशतवाद, युद्ध, आर्थिक पेचप्रसंग यांनी सुरुवात केली. यूट्यूब, ट्विटर, फेसबुक, आयपॅड, विकिलिक्स, सीसीटीव्ही अशा अनेक तंत्रज्ञानीय चमत्कारांची सुरुवात केली. ग्लोबल वॉर्मिंग, रिअ‍ॅलिटी टीव्ही शोज, उच्चभ्रू संस्कृती-सेलिब्रिटी संस्कृतीचा उदय, ऑनलाइन शॉपिंग, सुपरमार्केट्स, आयट्यून्स, आयपॉड, आयट्युन्स अशा गोष्टींना जन्माला घातलं.
११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वल्र्ड ट्रेड सेंटर दहशतवाद्याांनी जमीनदोस्त केले आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ‘वॉर ऑन टेरर’ची ललकारी दिली. ही घटना टीव्हीमुळे जगभर पोहोचली, पाहिली गेली. साहित्यापासून चित्रपटापर्यंत या घटनेचे कसकसे पडसाद उमटले याचा आढावा फुटमन यांनी पहिल्या प्रकरणात घेतला आहे.
दुस-या प्रकरणात अमेरिका-युरोपात मुस्लिमांविषयी तयार झालेल्या वातावरणाची आणि बुश यांच्या युद्धखोर कारनाम्यांची जंत्री सादर केली आहे.
तिस-या प्रकरणात ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येचं गांभीर्य सांगतानाच अमेरिकेसारख्या भांडवलशाहीचा पुरस्कार करणाºया देशांनी पर्यावरणाच्या तत्त्वांना सोडचिठ्ठी कशी दिली, तर कतार, सौदी अरेबिया, चीन या देशांनी नव्या संधींचा कसा वापर करून घेतला याचा स्थूल आढावा घेतला आहे.
प्रकरण चार ते आठमध्ये रिअ‍ॅलिटी टीव्ही शोजपासून आयपॉडपर्यंतच्या तंत्रज्ञानातील करामतींचे विहंगावलोकन केलं आहे.
नवव्या प्रकरणात जगातील एकमेव महासत्ता म्हणवल्या जाणाºया अमेरिकेचा -हास आणि नवी महासत्ता म्हणून पुढे येत असलेल्या चीनची घोडदौड मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दहाव्या प्रकरणात २००८च्या आर्थिक पेचप्रसंगाची उकल केली आहे.
शेवटच्या निष्कर्षाच्या प्रकरणात पुढच्या दशकात काय काय होऊ शकेल, याचा अदमास वर्तवला आहे. म्हणजे क्लिंटन कन्या चेल्सा ही ब्रिटनची पंतप्रधान होईल आणि तिला कोलंबिया आणि व्हेनेझुएला यांच्यातील युद्ध थांबवल्याबद्दल शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाईल, पॉप गायिका मॅडोना आणि हॉलीवूड अभिनेत्री अँजेलिना जोली या (चुकून) एकमेकांची मुलं दत्तक घेतील, रिचर्ड ब्रॅनसनसारखा उद्याोगपती पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं विमान तयार करेल इत्यादी इत्यादी. 
तर ते असो. त्यानंतरच्या तीन परिशिष्टांत या दशकात जन्माला आलेले नवे शब्द, काळाच्या पडद्यााआड गेलेल्या व्यक्ती, संकल्पना आणि सांस्कृतिक मानदंड आणि दशकातील महत्त्वाचे वाक्प्रचार दिले आहेत.
९\११, इस्लामोफॅसिझम, इर्नोनॉमिक्स, नूब, ब्लूक (ब्लॉगचं पुस्तकरूप), सेक्सटिंग, डिकॅडिटीज, सेलेब्युटार्ड, बँकस्टर, ट्याइब अशा अनेक शब्द-संकल्पना २०००-२००९ या शतकात जन्माला आल्या, रूढ झाल्या.
जगाला एका विशिष्ट दिशेनं ढकलण्याचं, त्याला वळण लावण्याचं, निदान त्याला विचारप्रवृत्त करण्याचं काम वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान, बुद्धिमान आणि प्रतिभावान मंडळी करत असतात. पण या दशकात त्या आघाडीवरही मोठी हानी झाली आहे. बार्बारा कार्टलंड, डॉन ब्रॅडमन, जॉर्ज हॅरिसन, स्टॅन्ले अनविन, रॉबर्ता बोलॅनो, यासर अराफत, मर्लिन मन्रो, एडवर्ज सैद, जॅक देरिदा, रोनाल्ड रेगन, आर्थर मिलर, बेटी फ्रिडमन, जे. के. गालब्रेथ, सद्दाम हुसेन, इंगमार बर्गमन, बेनझीर भुत्तो, ऑर्थ सी क्लार्क, बॉबी फिशर, एडमंड हिलरी, मरिअम मकेबा, हेरॉल्ड पिंटर, जॉन अपडाईक अशा अनेक मान्यवरांना जग या दशकात गमावून बसलं. हे पुस्तक केवळ घटना-घडामोडींची जंत्री देत नाही तर त्यांचा कार्यकारण संबंध आणि त्यांची इष्टनिष्टताही स्पष्ट करतं. त्यामुळे पुस्तक दशकाचा अदमास देण्यात चांगल्यापैकी यशस्वी झालं आहे. ते केवळ दशकाची दैनंदिनी झालेलं नाही, हे विशेष.
हे पुस्तक वाचणं हा काहीसा रोलरकोस्टरमधून दशकभराचा केलेल्या प्रवासासारखा गमतीशीर अनुभव आहे.

द नॉटिज- अ डिकेड दॅट चेंजन्ड -द वल्र्ड २०००-२००९ : टीम फुटमन, क्रिमसन, लंडन, पाने : २०३ रुपये,  किंमत : ९.९९ पौंड.

Monday, January 20, 2014

बंडखोर कवी आणि लढाऊ कार्यकर्ता!

( १५ फेब्रुवारी १९४९-१५ जानेवारी २०१४)

नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुण्याजवळील पूर या छोटय़ा गावी झाला. त्यांच्या आईचं गाव कनेरसर. ही दोन्ही गावं नदीच्या दोन्ही तीरावर आहेत, पुण्यापासून ४० किमी अंतरावर. ढसाळ लहानपणीच वडिलांसोबत मुंबईत आले. इथल्या गोलपिठात त्यांनी वास्तव्य केलं. त्यांचे वडील खाटीकखान्यात खाटीक म्हणून काम करत. ढसाळांचं पाचवीपासूनचं शिक्षण मुंबईतच झालं. दहावीनंतर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. सुरुवातीच्या काळात ढसाळांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केलं, वेश्यावस्तीतही काम केलं. याच काळात चळवळीकडे ते वळले.
१७-१८व्या वर्षांपासूनच ढसाळांनी कविता लिहायला सुरुवात केली. टॅक्सी ड्रायव्हर असताना ढसाळ एकदा एका कविसंमेलनाला गेले होते. तिथं त्यांनी विचारलं की, मलाही कविता वाचायचीय. हा गबाळा मुलगा काय कविता वाचणार या हेटाळणीनं त्यांना परवानगी दिली. पण त्यांच्या कविता ऐकून सगळे अवाक झाले. नंतर ग. दि. माडगूळकर म्हणाले, 'आता रसाळ नामदेवांचा (संत नामदेव) काळ संपून ढसाळ नामदेवांचा काळ सुरू झालाय.'
विद्रोहाच्या प्रखर व तीव्र स्वर असलेल्या त्यांच्या कवितेनं सर्व साहित्य-जगताचं लक्ष वेधून घेतलं. 'गोलपिठा' (१९७२) या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मुंबईचं अधोविश्व आणि दलित समाजाच्या व्यथा-वेदना त्यांनी अतिशय रांगडय़ा, जोशपूर्ण आणि कळकळीनं आपल्या कवितेतून मांडल्या.
'गोलपिठा'तल्या सगळ्याच कवितांनी आणि त्यातल्या धगधगीत वास्तवानं मराठी साहित्याला आणि मराठी समाजाला हलवून सोडलं. 'मंदाकिनी पाटील' ही त्यातली अशीच एका वेश्येची कहाणी सांगणारी दाहक कविता. 'गोलपिठा'ला विजय तेंडुलकरांनी प्रस्तावना लिहिली आहे. (त्या वेळी ढसाळ तेंडुलकरांना 'सर' म्हणत, पण नंतर त्यांचे संबंध तणावपूर्ण झाले. तेंडुलकरांची 'कन्यादान', 'कमला' ही नाटकं दलितविरोधी, त्यांची मानहानी करणारी असल्यानं ढसाळ त्यांचे विरोधक बनले. त्यांचा तो राग तेंडुलकरांच्या निधनापर्यंत कायम राहिला.)
ढसाळांनी 'आंधळे शतक' या पुस्तकात एके ठिकाणी म्हटलंय की, 'जगातला सर्वात जुना व्यवसाय हा वेश्याव्यवसाय समजला जातो. देहविक्री करून चरितार्थ चालवणं हे पाश्चात्त्यांत प्राचीन काळी गलिच्छ मानलं जात नव्हतं. मुंबईतला प्रतिष्ठित वेश्याव्यवसाय १७ व्या शतकातच सुरू झाला असं मानलं जातं.'
मुंबईतला रेड लाइट एरिया म्हणजे कामाठीपुरा, फोरास रोड, पूर्वीचा फॉकलंड रोड, गोलपिठा, जमना मॅन्शन, ग्रांट रोड पूल... या एरियातल्या प्रत्येक गोष्टीविषयी ढसाळांना तपशीलवार माहिती होती. 'आंधळे शतक'मध्ये त्यांनी लिहिलंय, 'प्रत्येक मालकिणीच्या मागे माफिया असतो. कामाठीपुऱ्यात अशा १६ टोळय़ा आणि १०० मनीलेंडर्स आहेत. रेड लाइट एरियावर नियंत्रण ठेवणारी व्हिजिलन्स ब्रँच देहापासून दिडकीपर्यंत सर्व प्रकारचे हप्ते राजरोस उकळत असते. ते पोलीस अधिकाऱ्यापासून उच्चाधिकाऱ्यापर्यंत जातात.'
ढसाळांचं 'पिला हाऊस'शी जवळचं नातं 
होतं. त्यांची 'पिला हाऊसचा मृत्यू' नावाची कविताही आहे. त्यावर त्यांनी लेखही लिहिलेत. 'कामाठीपुरा', 'संत फॉकलंड रोड', 'भेंडी-बाजार' या काही कविताही अशाच.
मलिका अमरशेख यांच्याबरोबरचं नामदेव ढसाळ यांचं आयुष्यही बरंचसं वादळी राहिलं. १९८० च्या दशकात काही काळ ते वेगळेही राहिले आहेत. मलिकाताईंनी मला 'उद्ध्वस्त व्हायचंय' या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्याविषयी फार उघडपणे लिहिलंय. मात्र त्यांचा मुलगा आशुतोषनं त्यांना पुन्हा एकत्र आणलं. सध्या अंधेरीच्या घरी ते तिघे एकत्र राहत.
राजकीय चळवळ
 
ढसाळांनी ९ जुलै १९७२ रोजी कवी ज. वि. पवार यांच्यासह 'दलित पँथर' या लढाऊ संघटनेची स्थापना केली. १९७५-८० दरम्यान शिवसेनेचा 'टायगर' (बाळासाहेब ठाकरे), फॉरवर्ड ब्लॉकचे 'लॉयन' (जांबुवंतराव थोटे) आणि दलितांचा 'पँथर' (नामदेव ढसाळ) अशा तीन शक्ती तोडीस तोड मानल्या जायच्या. 'तुमचा टायगर तर आमचा पँथर' अशा घोषणा पँथरचे कार्यकर्ते द्यायचे. पण दशकभरातच या संघटनेत फूट पडली. ढसाळ यांचं आणीबाणीला उघड उघड समर्थन होतं. त्यांनी 'आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र-प्रियदर्शिनी' नावाची एक दीर्घ कविता इंदिरा गांधींवर लिहिली आहे. दरम्यान, काही काळ ढसाळ यांनी काँग्रेसमध्येही काम केलं. मग नंतरच्या काळात नामदेव ढसाळ राजकारणापासून काहीसे बाजूला  पडले. १९९० नंतर ढसाळ पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. १९९२ साली नामदेव ढसाळ खासदार होते. त्याआधीही एकदा खेडमधून, तर एकदा मुंबईतून त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती. अलीकडच्या काळात ढसाळांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. एवढंच नव्हे तर त्यांच्या राजकीय भूमिका अलीकडच्या काळात सातत्यानं वादग्रस्त ठरल्या.
साहित्य चळवळ
गेली काही वर्षं ढसाळ मुंबईत 'इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिव्हल' भरवत होते. पण पैशाअभावी त्यात सातत्य राहिलं नाही. एका वर्षी गुंथर ग्राससारख्या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाला बोलावण्यात आलं होतं, परंतु काही कारणानं ते येऊ शकले नाहीत.
त्रिनिदादमध्ये वास्तव्यास असलेले 
पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल जेव्हा जेव्हा भारतात, विशेषत: मुंबईत येत, तेव्हा तेव्हा ढसाळांना सोबत घेऊन फिरत. ढसाळांकडून त्यांनी कामाठीपुऱ्यापासून अनेक गोष्टी समजावून घेतल्या, पण त्याविषयी दूषित नजरेनं लिहिलं. ढसाळांचा त्यांच्याबरोबरचा अनुभव काही चांगला नाही. ढसाळ त्यांना 'त्रिनिदादचा ब्राह्मण' म्हणत.
दिलीप चित्रे यांनी गौरी देशपांडे यांच्या घरासमोर 'साहित्य सहवासा'त धरणं आंदोलन केलं होतं. त्यात ढसाळ सहभागी झाले होते. नंतर एकदा चित्रे यांनी 'साहित्य सहवासा'तील दडपशाहीविरुद्ध आंदोलन केलं, तेव्हा ढसाळ यांनी चार-पाच लॉऱ्या भरून पँथर कार्यकर्ते आणि भाई संगारेसह पाठिंबा दिला होता.
लेखन
डिसेंबर १९८० मध्ये ढसाळ आजारी पडले. जानेवारी १९८१ मध्ये त्यांना 'मायस्थेनिया ग्रेविस' हा आजार असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर गेली ३०-३२ वर्षे ते या आजाराशी लढत होते. पण या काळातही त्यांनी तेवढय़ाच जोमानं कवितालेखनही केलं.
ढसाळ यांचे आतापर्यंत एकंदर बारा कवितासंग्रह आणि दोन कादंबऱ्या आणि चार लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. 'आज दिनांक'मध्ये 'माहौल' नावानं त्यांनी सदर लिहिलं होतं. त्यातल्या जहाल, रोखठोक आणि आगपाखड करणाऱ्या भाषेमुळे ते चांगलंच गाजलं. त्याचंच पुढे 'आंधळे शतक' हे पुस्तक आलं. 'सामना' या दैनिकात त्यांनी प्रदीर्घ काळ 'सर्व काही समष्टीसाठी' हे सदर लिहिलं तर 'सत्यता' या साप्ताहिकाचंही काही काळ संपादन केलं. त्यांच्या कवितांचे हिंदी, इंग्रजी तसेच अन्य भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या कवितांच्या इंग्रजी अनुवादाला २००७चा ब्रिटिश कौन्सिलचा पुरस्कार मिळाला आहे.
ढसाळांचा 'तृष्णा' या नावानं गाण्याचा अल्बमही येणार होता. त्यातली गाणी शंकर महादेवनसारख्या नामवंतांनी गायलीत. या अल्बमचं रेकॉर्डिगही झालंय. पण अजून तो काही आलेला नाही. त्याच्या रेकॉर्डिगच्या सी. डी. ढसाळांच्या घरी धूळ खात पडल्यात. ढसाळांचा स्वतंत्र म्हणावा असा शेवटचा संग्रह म्हणजे 'निर्वाणा अगोदरची पीडा'. या संग्रहातील ढसाळांची कविता ही विद्रोहाची नसून ती समष्टीच्या सनातन दु:खाविषयी बोलणारी आहे. व्यक्तिगत व सामाजिक विद्रोहापासून समष्टीच्या दु:खापर्यंत झालेला ढसाळ यांच्या कवितेचा प्रवास आता थांबला आहे.
ब्रेख्त हा नाटककार म्हणत असे, 'फॅसिस्ट कवी-लेखकांना पहिले ठार मारतात, पण आता काळ बदललाय, फॅसिस्टही बदललेत. आता ते कवी-लेखकांना जिवे मारत नाहीत. अनुल्लेखानं, बहिष्कृत करून मारतात.' एका वेळी हा प्रयोग या मनोवृत्तीच्या लोकांनी भाऊ पाध्ये यांच्यावर केला होता. त्यानंतर तो ढसाळ यांच्यावर केला गेला. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ढसाळांची कविता भारतभर आणि जगातही अनेक ठिकाणी पोचली, वाखाणली गेली.
अलीकडे ढसाळ अंधेरी-मालाड लिंक रोडवर 'मोगल दरबार' नावाचं छोटंसं हॉटेल चालवत होते. आजच्या मराठी समाजात कवी-लेखकांना सुखा-समाधानानं जगणं महाकठीण. गेली अनेक वर्षं ढसाळ यांनी त्याचा अनुभव घेतला. पण या समाजावर बहिष्कार टाकण्याएवढय़ा टोकाला जाण्याइतपत ते कधी कडवट झाले नाहीत. ढसाळांनी लेखनाकडे कधीही व्यावसायिक वृत्तीनं पाहिलं नाही. स्वत:ला ते प्रज्ञावंत-निष्ठावंत लेखक-कवीच मानत. त्यांच्यातील राजकीय-सामाजिक कार्यकर्ता वजा केला तर उरतो तो फक्त लेखक-कवीच.
साहित्य अकादमी या भारतीय साहित्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय संस्थेनं आपल्या सुवर्णमहोत्सवानिमित्त भारतभरातल्या साहित्यिकांमधून नामदेव ढसाळ यांची निवड केली. नामदेव ढसाळांना मराठीतील नोबेल पुरस्काराच्या तोडीचा लेखक मानलं जातं. त्यांच्या मोजक्याच कवितांचा इंग्रजीत अनुवाद झाला असला तरी जगभरातल्या नामवंत साहित्यिकांना नामदेव ढसाळ त्यांच्या हलवून टाकणाऱ्या कवितांमुळे माहीत आहेत.