Wednesday, September 14, 2011

सार्वकालिक आणि समकालीन

(ही पोस्ट विजयाबाई यांना पहिला विंदा पुरस्कार मिळाला त्यावेळी लिहिली होती.
२७ डिसेंबर २०१० ) 

‘‘कवितेबाबत माझी आवडनिवड विशिष्ट किंवा ठराविक नाही. स्वायत्त कविता माझ्या मनात घर करून राहते.’’

‘‘जी. ए. कुलकर्णीच्या दर्जाची, जातीची कथा मला लिहिता आली नसती. त्या पातळीवर जाण्याची आपली कुवत नाही याची मला जाणीव आहे.’’

‘‘मर्ढेकरांच्या सर्व कवितांचा अर्थ मला कळला आहे, असा माझा दावा नाही.’’

असा प्रांजळपणा विजयाबाई राजाध्यक्ष करू शकतात, नव्हे करतात. कारण कुठल्याही दुराग्रहापासून, अट्टाहासापासून त्यांनी स्वत:ला मुक्त ठेवलं आहे. विंदांच्या नावाच्या पहिला पुरस्कार त्यांना जाहीर झाल्यावरही ‘श्रेय विंदांचे आहे’ अशीच त्यांची प्रतिक्रिया होती.
 
खरं तर विजयाबाईंची पिढीच अशी आहे. ती सातत्यशील वृत्तीनं वाड्मयाचा गंभीरपूर्वक अभ्यास करणारी, साहित्यावर उत्कटपणे प्रेम करणारी आहे. रा. ग. जाधव, सुधीर रसाळ ही त्यांपैकीच काही नावं.
 
विजयाबाई मूळच्या कोल्हापूरच्या, विजया आपटे. शालेयवयात त्यांची वि. स. खांडेकर यांच्याशी मैत्री झाली. कोल्हापुरातच त्यांचं एम. ए. पर्यंतचं शिक्षण झालं.  1952साली मं. वि. राजाध्यक्ष कोल्हापूरला प्राध्यापक म्हणून आले. विजयाबाई त्यांच्या प्रेमात पडल्या, पत्नी झाल्या. नवपरिणीत जोडपं मुंबईला आलं, आणि त्यावेळच्या मुंबईत आणखी एका साहित्यिक दांपत्याची भर पडली. मुंबईत आल्यावर त्यांची पहिल्यांदा दिलीप चित्रे यांच्याशी ओळख झाली. वा. ल. कुलकर्णीचा तेव्हा समीक्षेमध्ये चांगला दबदबा होता. चित्र्यांनी बरईची वा.लं.शी, करंदीकरांशी ओळख करून दिली. ‘मौज’च्या गोटात सामील होण्याचा मार्ग ‘मौज’, ‘सत्यकथे’त विजयाबरईनी आधीच कथा लिहून सुकर करून घेतला होता.
 
विजयाबाई पहिल्यांदा एल्फिन्स्टन कॉलेजात मराठीच्या प्राध्यापक म्हणून जॉईन झाल्या. पुढे एसएनडीटी विद्यापीठात गेल्या. तिथून मराठीच्या विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. तिथं विजयाबाईंनी अनेक उत्तमोत्तम चर्चासत्रं घेतली. निवृत्तीनंतर विद्यापीठाने त्यांची ‘प्रोफेसर एमिरेटस’ म्हणून नेमणूक केली. विजयाबाईंनी त्याचं ‘सुप्रतिष्ठ प्राध्यापक’असं शुद्ध मराठी नामकरण केलं, स्वत:ला शोभेलंसं! 
 
विजयाबाई गेली पन्नासहून अधिक वर्षे कथालेखन करत आहेत. अठरा-वीस कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यातही त्यांनी स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. पण समीक्षेची पुस्तकं मात्र त्याच्या निमपटही नाहीत. आणि तरी ती मोलाची आहेत.
 
कवितेच्या आस्वादक समीक्षक अशीही विजयाबाईंची ओळख आहे. कविता हा त्यांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याचा, आस्थेचा, प्रेमाचा आणि चिंतनाचा विषय आहे. म्हणूनच त्यांचं समीक्षालेखन प्राधान्यानं कवितेविषयीचंच आहे. मर्ढेकरांच्या कवितेवर अगदी महाविद्यालयीन काळापासून त्यांनी चिंतनाला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी मर्ढेकरांवरच पीएच. डी. केली. मर्ढेकरांच्या एका एका कवितेवर आणि त्यातल्या एका एका शब्दांवर विजयाबाईंनी रमेश तेंडुलकर, शांता शेळके, मं. वि. राजाध्यक्ष यांच्याशी अतिशय सखोल चर्चा केल्या. पुढे ते चिंतन ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ (1991) या दोन खंडातून प्रकाशित झालं. त्याला 1993 साली साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला.
 
त्यानंतर त्यांनी ‘पुन्हा मर्ढेकर’ आणि ‘शोध मर्ढेकरांचा’ ही दोन चरित्रपर पुस्तकंही लिहिली. त्यामुळे काही वेळा असं वाटतं होतं की, बाई मर्ढेकरांमध्येच अडकून पडल्या आहेत की काय! पण करंदीकरांच्या समग्र साहित्याचं परिशीलन ‘बहुपेडी विंदा’ या दोन खंडी ग्रंथातून त्यांनी अलीकडेच केलं. आणि आता त्यांनी आरती प्रभूंवरही सविस्तर लिहिण्याचा मनोदयही व्यक्त केला आहे. म्हणजे 77व्या वर्षीही लेखनाचे नवेनवे विषय त्यांना हाकारे घालत आहेत. हेही पुन्हा त्यांच्या ‘सार्वकालिक आणि समकालीन’ अभ्यासूवृत्तीचे द्योतक आहे. 

‘संवाद’ (1985) या पुस्तकात विजयाबाईंनी वा. ल. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ आणि विंदा करंदीकर यांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत. त्यात या तीन श्रेष्ठींच्या वाडमयीन व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या लेखनामागील प्रेरणांचा, त्यांच्या एकंदर साहित्यिक वाटचालीचा सविस्तर आढावा आहे. वाड्मयीन मुलाखती कशा घ्याव्यात त्याचं हे पुस्तक चांगलं उदाहरण ठरावं. 

विजयाबाई वृत्तीनं धार्मिक, सश्रद्ध आहेत. तोच प्रकार त्यांच्या लेखनाबाबतीतही आहे. पण विजयाबरईच्या श्रद्धेला कर्मकांडाची झालर नसते. म्हणूनच त्यांना तटस्थ राहता येतं आणि मोकळेपणाने केवळ कवितेचाच विचार करता येतो. ‘बहुपेडी विंदा’च्या दुसऱ्या खंडांमध्ये ‘अष्टदर्शने’वर त्यांनी लिहिलं आहे, ‘‘पद्यीकरणाच्या मर्यादा ओलांडण्याइतपत तरी काव्य करंदीकरांकडून अपेक्षित होतेच. ‘अष्टदर्शने’मधून ही अपेक्षा त्यांना पूर्ण करता आलेली नाही.’’ ही टिप्पणी कुणाला सावधपणाची वाटेल. पण विजयाबाईंचं एकंदर लेखन पाहिलं तर त्या सगळ्यामध्ये असाच सूर दिसेल. ‘मला हे असं असं वाटतं..इतरांना यापेक्षा वेगळंही वाटू शकतं’ अशी त्यांची विनयशील आणि अनाग्रही भूमिका असते. सर्जनशील लेखनाविषयी फार ठाम भूमिका घेता येत नाहीत याचं ते चांगलं उदाहरण आहे. म्हणूनच विजयाबाई कुठल्याही सिद्धांताची फूटपट्टी कवितेला विनाकारण लावत नाहीत. पण त्यातही त्यांचा म्हणून एक ठामपणा असतोच.

 विजयाबाईंची समीक्षा ही आस्वादक किंवा चरित्रात्मक स्वरूपाची आहे. अशा प्रकारच्या समीक्षेला मराठी साहित्य व्यवहारात फारसं मानाचं स्थान दिलं जात नाही. हा आक्षेप जमेस धरून विजयाबाई आपलं लेखन करत राहिल्या आणि आता त्यांनी त्यालाच प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, असं म्हणण्यात अतिशयोक्ती होणार नाही. विजयाबाई बहुप्रसवा कथालेखिका आहेतच, पण तशाच त्या चांगल्या वाचकही आहेत. मराठीतल्या प्रस्थापितांपासून अगदी नवोदित कवी-कथाकारांचं लेखनही त्या तितक्याच अगत्यानं वाचत असतात. इंग्रजी साहित्याचंही त्यांचं मोठं वाचन आहे. 


2001च्या इंदूर इथं भरलेल्या साहित्य संमेलनाच्या विजयाबाई अध्यक्ष होत्या. आणि महाराष्ट्राबोहर झालेलं ते अलीकडच्या काळातलं शेवटचं संमेलन. तिथल्या आपल्या अध्यक्षीय भाषणाला त्यांनी ‘सार्वकालिक आणि समकालीन’ असं अन्वयर्थक शीर्षक दिलं होतं. त्यात साहित्याचा नेमका अर्थ, सृजनाची प्रक्रिया कशी असते, सर्जनाच्या वाटेवर काय काय असते याविषयी त्यांना आकळलेलं त्यांनी सांगितलं. हे त्यांचं असिधाराव्रत अजूनही चालू आहे, असंच चालू राहो.

No comments:

Post a Comment