Sunday, September 25, 2011

बोलकी नव्हे, कर्ती माणसे !( माझ्या 'कर्ती माणसे' या पुस्तकाची छपाई चालू आहे. पुस्तक संपादित असून त्यात महाराष्ट्रातील २४ सामाजिक कार्यकर्ते यांच्याविषयी लेख आहेत. या पुस्तकाला मी लिहिलेली ही प्रस्तावना. )

सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांनी बोलके सुधारकआणि कर्ते सुधारकअसे सुधारकांचे दोन वर्ग केले आहेत. जेव्हा बोलक्या सुधारकांचा संप्रदाय फोफावतो, तेव्हा कर्त्या सुधारकांची गरज निर्माण होते. महाराष्ट्रातल्या दुर्गम, आदिवासी भागांत, शहरांच्या बकाल वस्त्यांमध्ये काम करणारे कार्यकर्ते ते संतुलन राखण्याचे काम आपल्यापरीने करत असतात.
1960 ते 80 या काळात महाराष्ट्रातली तरुण पिढी समाजबदलाच्या ध्येयाने झपाटून गेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून बारा-तेरा वर्षे झाली होती. त्यामुळे उज्ज्वल आणि संपन्न भारताची स्वप्ने पाहणारी आधीची पिढी आणि विशी-बाविशीची तरुण पिढी स्वप्नाळू होती. पण स्वतंत्र भारताची सुरुवातीची पंधरा-सोळा वर्षे मोठी धामधुमीची होती. त्यातच 1962च्या युद्धात भारताला चीनकडून पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली. त्यानंतर अशा नामुष्कीची एक मोठी मालिकाच घडत गेली. 64 साली भारताचे आशास्थान असणाऱया नेहरूंचे निधन झाले. 65 साली पाकिस्तानबरोबर युद्ध झाले. ताश्कंदमध्ये दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे आकस्मिकपणे निधन झाले. त्यातच 67-68 साली उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये प्रचंड मोठे दुष्काळ पडले.
 साधारणपणे याच काळात अमेरिकेत हिप्पी संस्कृतीचा उदय झाला होता. फिडेल, कॅस्ट्रो, चे गव्हेरा हे तरुणाईचे हिरो म्हणून पुढे येत होते. तर शेजारच्या पाकिस्तानमध्ये लष्कराचे वर्चस्व वाढत होते आणि पूर्व पाकिस्तानमध्ये बरेच अराजक माजले होते.
या साऱया परिस्थितीचा आणि अस्वस्थतेचा त्या वेळच्या तरुणाईवर मोठा परिणाम झाला. या घुसळणीतून ती तावूनसुलाखून निघाली. ‘युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी आयडेंटिटी क्रायसिसमध्ये वाढलेली पिढीअसे त्या वेळच्या तरुण पिढीचे वर्णन करतात. ‘भारत स्वतंत्र झाला असला तरी सामाजिक-राजकीय पातळीवर आमूलाग्र बदलाची गरज आहे. क्रांती झाल्याशिवाय भारत सामर्थ्यशाली होणार नाही, म्हणून क्रांती करायची. पण कशी, तर आधी वैचारिक क्रांती, नंतर सामाजिक क्रांती आणि मग सर्वांगीण क्रांती करायची,’ असा मूलमंत्र काही जाणत्या लोकांनी तरुणाईला दिला. त्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. त्यातून महाराष्ट्रभर तरुण सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळी उभी राहिली.
1990 नंतर मात्र भारताने आर्थिक उदारीकरणाचा पुरस्कार केला. त्यातून पुन्हा एकदा मोठी सामाजिक घुसळण सुरू झाली. याच काळात सामाजिक चळवळीच्या आणि सामाजिक कार्याच्या व्याख्या बदलायला सुरुवात झाली. एमएसडब्ल्यूचे शिक्षण देणाऱया संस्था निघाल्या, त्यात नवे कार्यकर्ते तयार होऊ लागले. त्यातले काही तरुण आधीच्या सामाजिक चळवळींमध्ये तर बरेचसे एनजीओजमध्ये दाखल होऊ लागले. सामाजिक कार्याचेच मोठय़ा प्रमाणावर एनजीओकरण होऊ लागले. प्रश्नांना थेट भिडून संघर्ष करण्याऐवजी त्यांचे प्रदर्शन करण्याकडे कल वाढू लागला. त्यामुळे दूर कुठेतरी दुर्गम भागात काम करणाऱया संस्था-व्यक्तींकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यांचे प्रश्न प्रसारमाध्यमांमधून दुर्मीळ होऊ लागले. आणि हा बदल सर्वच क्षेत्रांमध्ये होऊ लागला. याच काळात हिंदी चित्रपटांमधून खेडी गायब होऊ लागली, समांतर चित्रपटांची चळवळ थंडावली. या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे तळागाळातल्या समाजासाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेने झपाटलेले मध्यमवर्गीय तरुण करिअरिस्ट होऊ लागले. एकंदर मध्यमवर्गानेच स्वतःला इतर समाजापासून तोडून घ्यायला सुरुवात केली. तो जागतिकीकरणाचा लाभार्थी आणि पुरस्कर्ता झाला. त्याच्या इच्छा-आकांक्षांना महत्त्व येऊ लागले. आणि त्याचीच प्रसारमाध्यमांपासून सरकारपर्यंत सर्वजण दखल घेऊ लागले.
थोडक्यात 90च्या दशकात महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींना उतरती कळा लागली. या धबडग्यात अनेकजण निराश झाले, बाहेर पडले, तर काहींनी मात्र आपला आशावाद जागता ठेवत आपले काम चालूच ठेवले. पण त्यांच्याबद्दलची समाजाची आस्था कमी होत गेल्याने त्यांचा आवाज क्षीण झाला.

या कार्यकर्त्यांची आणि पुरोगामी साहित्यिकांची उमेद वाढवण्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशनने 1994 साली  ‘साहित्य पुरस्कार योजनातर सामाजिक कार्यकर्त्यांसाठी 1996 पासून समाजसेवा गौरव पुरस्कारया योजना सुरू केल्या.
पहिल्या वर्षी चार समाजकार्य पुरस्कार सुरू केले. प्रत्येकी 50 हजार रुपये आणि मानचिन्ह असे त्यांचे स्वरूप ठरवण्यात आले. या पुरस्कारासाठी संस्था व व्यक्ती यांच्या नावांचा विचार करताना पुढील बाबी विचारात घेण्याचे ठरले
1) सामाजिक संस्था व व्यक्ती आपले कार्य व विचार यांच्या साहाय्याने विवेकनिष्ठा व वैज्ञानिक दृष्टी, सामाजिक न्याय ही मूल्ये रुजवण्यासाठी सातत्याने प्रबोधनाचे कार्य करत आहेत.
2) पर्यावरण-संतुलनाचा ध्यास घेऊन संशोधन, प्रयोग, लोकशिक्षण, जनसंघटन यांसारख्या विविध मार्गांनी ज्या व्यक्ती अविरत कार्य करत आहेत.
3) ज्या व्यक्तींच्या कार्यामुळे महिलांयांमध्ये स्वावलंबन व स्वातंत्र्याविषयीच्या जाणिवा वाढत आहेत आणि अन्यायाविरुद्ध झगडण्याची इर्ष्या जागृत होत आहे.
2005 पासून ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाऊ लागला, तर 2008 पासून तरुण कार्यकर्त्यांसाठी युवा पुरस्कार सुरू करण्यात आला.
या योजनेला आता पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. या पंधरा वर्षांत 70 व्यक्तींना आणि 17 संस्थांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे या हेतूने हा लेखसंग्रह प्रकाशित करण्यात येत आहे. मात्र 70 व्यक्तींविषयीच्या एकूणएक लेखांचा समावेश करणे शक्य नव्हते. ते व्यवहार्यही नव्हते. शिवाय त्यापैकी काही आता हयात नाहीत तर काहींचे काम वयोपरत्वे थांबले आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या निवडक 24 व्यक्तींचाच यात समावेश आहे.
फाउंडेशनच्या वतीने प्रकाशित होणारी मंथनही अतिशय देखणी स्मरणिका हे या योजनेचे सुरुवातीपासूनच वैशिष्टय़े राहिले आहे. त्यामुळे प्रस्तुत संग्रहातील जवळपास सर्वच लेख मंथनच्या स्मरणिकांमधून घेतलेले आहेत. मात्र या लेखांमध्ये नव्याने काही मजकुराची भर टाकण्यात आली, त्यांचे पुनर्लेखन करून घेण्यात आले. त्यामुळे काही लेख अद्ययावत झाले आहेत. सय्यदभाई यांच्या दगडावरची पेरणीया पुस्तकाला विशेष पुरस्कार मिळाला. ते त्यांचे आत्मकथन नसून कार्यकथनआहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्यालाच आहे, त्यामुळे त्यांचाही समावेश यात केला आहे. सय्यदभाई यांच्याविषयीचा लेख सुभाष वारे यांनी नव्याने लिहून दिला. या संग्रहातील सर्वच लेखकांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार. तसेच या संग्रहाची कल्पना सुरुवातीपासून उचलून धरणारे पुरस्कार योजनेचे प्रवर्तक सुनील देशमुख आणि लोकवाङ्मय गृहाचेचे प्रकाश विश्वासराव यांचेही आभार. ‘लोकवाङ्मयआणि केशव गोरे ट्रस्ट यांनी या पुरस्कारांची कार्यवाही 12-13 वर्षे केली. मागच्या दोन वर्षांपासून ती साधना ट्रस्टकरत आहे. त्या सर्वांचे लेखांच्या संमतीबद्दल आभार.
या संग्रहातले सर्वच लेख हे त्या त्या व्यक्तींना पुरस्कार मिळाल्यावर लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा परिचय आणि गौरव हाच त्यामागचा प्रधान हेतू आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन आणि विश्लेषण अपेक्षित नव्हते. त्यामुळे प्रस्तुत संग्रहाचे संपादन करतानाही ते अपेक्षित नव्हतेच.
मात्र निवडलेल्या सर्वच व्यक्ती आणि त्यांचे काम परस्परांहून भिन्न आणि वैशिष्टय़पूर्ण आहे. यात आठ महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. त्यांची संख्या पुरुष कार्यकर्त्यांपेक्षा निम्मी असली तरी त्यांचा लढाऊ बाणा पाहता त्या पुरुषांइतक्याच सक्षमपणे काम करत आहेत हे लक्षात येईल. मग ते उल्का महाजन-सुरेखा दळवी यांचे सेझविरोधी आंदोलन असो की भुरीबाई शेमळे, पूर्णिमा मेहेर यांचे आदिवासींसाठीचे काम असो. संग्रहातील सर्वाधिक म्हणजे दहा व्यक्ती विदर्भातील आहेत. याशिवाय तिस्ता सेटलवाड, आनंद पटवर्धन यांच्यासह बस्तू रेगे, काळूराम दोधडे, प्रतिभा शिंदे हेही आहेत. म्हणजे आदिवासी-दुर्गम भागातील लोकांसाठी काम करणारे आणि शहरांतील धार्मिक सलोख्यासाठी, न्यायासाठी झगडणारे अशा सर्वांची इथे मांदियाळीआहे. थोडक्यात, दुर्गम खेडे ते शहरांच्या मध्यवस्त्या या दोन्ही ठिकाणी कामाची गरज असते आणि आहे, हेच या व्यक्तींच्या कामातून अधोरेखित होते.

समाजबदल आणि सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत चार घटक महत्त्वाचे असतात. 1) राजकारण, 2) प्रशासन, 3) प्रसारमाध्यमे आणि 4) सामाजिक संस्था वा व्यक्ती.
1) राजकारण ः राजकारणातले पक्ष, संघटना आणि व्यक्तींना येनकेनप्रकारे सत्ता हस्तगत करायची असते. त्यासाठी त्यांना समूहाचा विचार करावा लागतो. तुलनेने लहान समूह वा समाजगट त्यांना निवडणुकीत यश मिळवून देत नाहीत. शिवाय भारतीय समाज जात, वर्ग, माझं गाव, माझं शहर असा विभागला जातो. त्यामुळे निवडणुका, मतदान याकडे राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जास्त लक्ष असते.
2) प्रशासन ः प्रशासनातही प्रामुख्याने समूहाचाच विचार केला जातो. प्रत्येक विषयासाठी अगदी सामान्य पातळीवर जाऊन काम करणे प्रशासनाला शक्यही नसते. तसा प्रयत्न झाला तरी दोन-चार वर्षांनी नोकरी बदलणाऱया प्रशासकीय अधिकाऱयांना त्या कामाबाबत तेवढी आस्था राहत नाही. शिवाय त्यांच्या काम करण्याला मर्यादा असतात. त्यांना ढोबळमानाने पाहावे लागते.
3) प्रसारमाध्यमे ः प्रसारमाध्यमांनाही प्रामुख्याने आपला वाचक वा प्रेक्षक कोण आहे, कुठल्या भागातला आहे हे पाहावे लागते. तो मुख्यतः महानगरांमध्ये एकवटलेला असल्याने त्यांना आवडेल, रुचेल आणि पचेल अशाच पद्धतीने पत्रकारिता करावी लागते. शिवाय जो विषय चर्चेत आहे त्याविषयी सजग राहावे लागते. सातत्याने एकच प्रश्न वा विषय लावून धरता येत नाही. कारण प्रेक्षक-वाचक त्याला कंटाळतात.
4) सामाजिक संस्था वा व्यक्ती ः आदिवासी, भंगी, कचरा कामगार, खाण कामगार अशा काही विषयांत काम करणे आवश्यक असते. पण इतक्या खोलात जाऊन त्या विषयाच्या कानाकोपऱयांना भिडणे राजकारणी, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांना शक्य नसते. ते फक्त सामाजिक काम करणाऱया व्यक्ती वा संस्थांनाच शक्य असते. त्यामुळे वरच्या तिन्ही घटकांची मर्यादा हेच त्यांचे मोठे बलस्थान असते. या व्यक्ती वा संघटना एकेक प्रश्न हातात घेऊन तो धसाला लावू शकतात. त्यांचे उद्दिष्ट एका अर्थाने काहीसे मर्यादित असल्याने ते त्याभोवतीच आपली सर्व ऊर्जा एकवटतात. त्यासाठी वरच्या तिन्ही घटकांशी लढा देऊन स्वतःच्या मागण्या पदरात पाडून घेण्याचे काम करतात, स्वतःची दखल घ्यायला भाग पाडतात. आपले उभे आयुष्य तळागाळातल्या लोकांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी खर्च करतात. त्यासाठी सातत्याने संघर्ष करत राहतात. ज्यांचे प्रश्न कुणी उचलून धरणार नाही अशा लोकांसाठी काम करतात. म्हणून ते उल्लेखनीय आणि अनुकरणीय ठरते.
प्रस्थापित ध्येयधोरणांविरुद्ध बंडखोरी पुकारून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करणारी ही कर्ती माणसंआहेत. त्यांनी हा निर्णय झपाटलेपणातून घेतलेला आहे. विकासाचा वाटा तळागाळातल्या लोकांना मिळावा, त्यांच्या आयुष्यातही स्वातंत्र्याची पहाट यावी यासाठी त्यांनी स्वतःला त्यांच्या वतीने पणाला लावले आहे. आपल्या सुखवस्तू जीवनावर आणि भौतिक सुखसोयींवर तुळशीपत्र ठेवले आहे. अर्पणपत्रिकेमध्ये म. गांधींनी सांगितलेली सात सामाजिकपापकर्मे दिली आहेत. प्रस्तुत संग्रहातील सर्वच कार्यकर्ते त्या पापकर्मांच्या विरोधात आपापल्या परीने झगडत आहेत.
रचनात्मक संघर्षाचा हा आविष्कार अनुकरणीय आहे. तशी प्रेरणा हे पुस्तक वाचणाऱया प्रत्येकाला मिळो. ‘समाजहितासाठी आपल्या आवडीनिवडी, स्वार्थ आणि अहंकार यांना कात्री लावणेअशी इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी सामाजिक नीतिमत्ताया शब्दाची व्याख्या केली आहे. त्या न्यायाने हे नीतिमत्ता जोपासणारे कर्तेलोक आहेत. सामाजिक नीतिमत्ता ही सार्वजनिक चारित्र्याचीही पूर्वअट असते. या संग्रहातील कर्त्या माणसांचे वेगळेपण आहे ते या अर्थाने.
(प्रकाशक लोकवांगमय गृह, भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी, मुंबई-२५. फोन-०२२-२४३६२४७४, किंमत - २०० रुपये.)

2 comments:

  1. पुस्तकपरिचय आवडला. प्रसिद्ध झाल्यावर मिळवून नक्की वाचेन. आगरकरांच्या 'कर्ते सुधारक' ह्या व्याख्येवरून हा प्रसिद्ध निबंध आठवला - http://www.smartercarter.com/Essays/Thinking%20as%20a%20Hobby%20-%20Golding.html

    ReplyDelete
  2. छान! प्रत्येकानं वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे.परिचय करून दिल्याबद्दल आभार! शुभेच्छा!

    ReplyDelete