(१८ सप्टेम्बर २०११ च्या प्रहार, कोलाज मधील लेख.)
‘खाऊनपिऊन टामटुम’ इतकीच आपल्या एकंदर सामाजिक जीवनाची लांबी- रुंदी आणि खोली असेल, किमान तर्कसंगत आणि तारतम्यपूर्ण विचार आपल्याला करता येत नसेल, प्रतिक्रिया आणि विचार यातला फरक समजून घेता येत नसेल, सदासर्वदा भूतकाळातच आपण रमून जात असू तर वर्तमानाच्या हाकांना आपल्याला प्रतिसाद देता येणार नाही, हे उघड आहे. जागतिकीकरणाच्या गेल्या दोन दशकांत मराठी समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि वैचारिक अशी सर्वच क्षेत्रात कमीअधिक फरकाने जी केविलवाणी अवस्था झाली, त्यातून याचे प्रत्यंतर येतेच आहे.
थोडक्यात, ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही, त्यांनीच पुढाकार घेण्याची गरज असते. दिवाळी अंकांचा बहुतांशी कारभार अजूनही पुण्या-मुंबईतच एकवटलेला आहे. पण इथून प्रकाशित होणारे अंक म्हापशापासून चंद्रपूपर्यंत आणि नांदेड-उस्मानाबादपर्यंत जातात. म्हणजे पुण्या-मुंबईतला एक छोटा वर्ग दिवाळी अंकांबाबत महाराष्ट्राचे पुढारपण करतो आहे. त्यामुळे या छोटय़ा वर्गावरच मोठी जबाबदारी आहे. त्यांनी हे सांस्कृतिक प्रवक्तेपण नीट निभावले पाहिजे. आपले इतर बहुसंख्य लोक अनुकरण करत आहेत याचे भान ठेवले पाहिजे.
तर आणि तरच ही कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
सध्या मराठी साहित्य व्यवहारात मोठी धांदल सुरू आहे. लेखकांपासून बाइंडरपर्यंत सारे जण दिवाळी अंकांसाठी रात्रंदिवस खपत आहेत. कारण दिवाळी अंकांच्या निमित्ताने मराठी ग्रंथव्यवहारात मोठी उलाढाल होते. प्रस्थापित लेखकांपासून नवोदितांपर्यंत कितीतरी लेखक, संपादक, चित्रकार, मुद्रक, बाइंडर, वितरक, विक्रेते, जाहिरातदार कामाला लागतात. लेखकांच्या सर्जनशीलतेला, चित्रकारांच्या प्रतिभेलाही धुमारे फुटतात; संपादकांची कौशल्ये पणाला लागतात, तर मुद्रक, बाइंडर, वितरक, विक्रेते यांना रोजगार मिळतो. कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक होते. आणि या सर्वाचा परिपाक म्हणजे महाराष्ट्रातील तमाम रसिक वाचकांना दोन-अडीच महिने ‘वाचनानंदा’त मनसोक्त डुंबण्यासाठी, हुंदडण्यासाठी एक मोठा अवकाश उपलब्ध करून दिला जातो.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून साधारणपणे 400-500 दिवाळी अंक प्रकाशित होतात. महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरूनही काही अंकांचे प्रकाशन केले जाते. समाजातील बहुविध वाचकवर्ग आणि त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हे अंक काढले जातात. त्यामुळे या अंकांचे त्यांच्या प्रकारानुसार आणि वाचकानुसार काही गट पडतात. उदा. निखळ वाङ्मयीन, दैनिक-साप्ताहिकांचे, चळवळीची मुखपत्रे, ज्योतिष, धार्मिक-आध्यात्मिक, गुन्हेगारी-रहस्यकथा, आरोग्य, उद्योग-व्यापार, पर्यटन, पाककला, महिला, बाल-किशोर आणि चित्रपट-खेळ इत्यादी.
मात्र, गेल्या काही वर्षातल्या दिवाळी अंकांवर नजर टाकल्यावर काय लक्षात येते? अगदी स्पष्टपणे सांगायचे तर अलीकडच्या काही वर्षामध्ये दिवाळी अंकांमध्ये प्रचंड साचलेपण आले आहे. याची जाणीव काहींना आहेही; नाही असे नाही. ‘मौज’मध्ये आता कुठलीच ‘मौज’ उरली नाही. इतक्या वर्षानंतरही ‘मौज’चा फॉर्म्युला काही बदलत नाही आणि सुशेगात वृत्तीही. ‘ललित’ व ‘दीपावली’मध्येही आता फारसा दम राहिला नाही. ‘अक्षर’चे काम निखिल वागळे पाहात नसल्याने त्याची गाडीही घसरली आहे. ‘कालनिर्णय’च तेवढा तग धरून आहे. सदा डुंबरे निवृत्त झाले आणि ‘साप्ताहिक सकाळ’ची चांगल्या दिवाळी अंकाची परंपराही रिटायर केली गेली. ‘शब्द’ला अजून सूर सापडत नाही. अरुण शेवते गेल्या काही वर्षापासून आपल्या अंकाचे पुढे पुस्तक करता येईल असेच विषय घेऊन त्यावरच ‘ऋतुरंग’चा संपूर्ण अंक काढतात, तर इतरांना सतत चांगला दिवाळी अंक कसा काढावा याचा उपदेशामृत देणारे सुनील कर्णिक ‘नवा माणूस’ हा सामान्य वकुबाचा अंक काढतात. वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकांत तर, जाहिरातींचेच नावीन्य दिसते आणि मजकुराचा दर्जा त्यांच्या रविवार पुरवण्यांतील लेखांपेक्षा फार वेगळा नसतो. एखाद-दुसरा वाचनीय वा चांगला लेख, इतकेच या सर्वाच्या गुणवत्तेचे प्रमाण उरले आहे.
कमी पैशात भरघोस पुरवठादार
या प्रकारामुळे उथळ व फुटकळ साहित्याला चांगले दिवस आले आहेत. चटपटीत आणि चुरचुरीत मजकूर देखण्या सजावटीसह वाचकांच्या माथी मारला जातो. वाचकही डोक्याला फार ताप करून न घेता घटकाभराची करमणूक म्हणून त्याकडे पाहतात आणि सोडून देतात. कारण वाचन ही काही त्यांच्या आयुष्यातली नडीव गोष्ट नाही. त्यामुळे तो त्याला सहजासहजी जे उपलब्ध होईल, त्याचा स्वीकार करतो. आणि शेवटी कुठलाही वाचक ‘हे साहित्य आपल्याला अभिरुचिसंपन्न करणारे आहे की नाही?’ अशी फूटपट्टी घेऊन वाचायला बसत नाही. त्यामुळे सवंग लोकप्रियतेला आणि नाव प्रसिद्धीला हपापलेली लेखक मंडळी तेलाच्या घाण्यासारखा रतीब घालतात. संपादकांनाही कमी वेळेत, कमी पैशांत असे भरघोस पुरवठादार हवेच असतात.
एकेकाळी वीस-वीस अंकांमध्ये लिहिणारे लोक अजूनही जवळपास तेवढय़ाच अंकांत, त्याच प्रकारे लिहीत आहेत. त्यांच्या लेखनामध्ये आता काहीही नावीन्य राहिलेले नाही. अनिल अवचट, विजया राजाध्यक्ष, मंगेश पाडगावकर, शांताराम, यू. म. पठाण, गंगाधर पानतावणे, द. भि. कुलकर्णी, राजन खान, महावीर जोंधळे, फ. मुं. शिंदे, निळू दामले, भारत सासणे, बाबूमोशाय, ह. मो. मराठे, अच्युत गोडबोले अशा काही लेखकांनी त्यांचे लेखन थांबवावे असा उद्धट पण अतिशय नम्र सल्ला द्यावासा वाटतो. (या यादीत वाचकांना आपापल्या मनातील काही नावांचाही समावेश करता येईल.) अन् तेही वाचकांवर उपकार वगैरे करण्यासाठी नाही; तर त्यांच्या स्वत:साठीच त्यांनी लेखन थांबवणे गरजेचे आहे असे वाटते. कारण त्यांची जनमानसात जी चांगली प्रतिमा आहे, तिला त्यांच्याकडूनच तडा जातो आहे. संपादकांना-वाचकांना आपले लेखन हवे असेलही पण किती काळ लोकानुनय करायचा? आणि त्यातून आपलेच अवमूल्यन होत आहे त्याचे काय करायचे, याचाही विचार करायला नको काय?
तर दुसरी गडबड अशी आहे की, काही मासिकांचे, दिवाळी अंकांचे संपादक सुमार वकुबाच्या लेखकांना सातत्याने लिहायला कशासाठी सांगत असतात अणि त्यांचे ते सामान्य लेखन कशासाठी छापत असतात हेही कळायला मार्ग नाही. वैयक्तिक हितसंबंध-स्नेहसंबंध या पलीकडे तुमचे जग नसेल तर त्याला हरकत घेण्याचे कारण नाही; पण ते तुम्ही वाचकांच्या माथी कशाला मारता? अशा संबंधां-संबंधांवर हजेरी लावणा-यांमध्ये संजय भास्कर जोशी, विलास खोले, निरंजन घाटे, शिरीष कणेकर, द्वारकानाथ संझगिरी, महेश केळुस्कर, प्रतिमा इंगोले, विजया वाड, विजय पाडळकर, श्रीनिवास हेमाडे, सुमेध वडावाला (रिसबूड), मधुकर धर्मापुरीकर, हेरंब कुलकर्णी, प्रवीण दवणे, अशा काहींचा सुळसुळाट झाला आहे.
ब-याच अंकांतून प्रायोजित स्वरूपाचा मजकूर, गुणगौरवपर मुलाखती, नाटय़-चित्रपट क्षेत्रातल्या कलावंतांच्या प्रसिद्धीचा (गैर)वापर करून खपाच्या मार्गाने जाण्याची धडपड दिसते. असा मजकूर त्या त्या व्यक्तीची एक प्रकारची जाहिरातच असते. यापेक्षा उघड जाहिराती परवडल्या. त्यांचा निदान कुठला दावा तरी नसतो.या कारणांमुळे दिवाळी अंकांविषयीची चर्चा आठवडय़ाच्या पुढे टिकेनाशी झालीय. मग त्यावरील वादविवाद तर दूरच राहोत. मग दरवर्षी ज्या संख्येने अंक निघतात, ते पाहता असे वाटू शकते की, एवढे अंक निघतात, म्हणजे त्यांना वाचकवर्ग असणारच. त्याचे कारण असे की, काही मोजके अपवाद वगळता संबंधितांकडून जे आकडे सांगितले जातात, ते सर्व चढय़ा बोलीतले असतात. त्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण होतो खरा, पण त्याला काही अर्थ नाही. गावोगावी भरणा-या पुस्तक-प्रदर्शनात ‘10 दिवसांत 10 कोटींची पुस्तक विक्री’ अशा ज्या बातम्या वृत्तपत्रांतून ठळक टायपातून छापून येतात, त्या वाचून सोडून द्याव्या अशा लायकीच्या असतात. जे पुस्तकांचे तेच दिवाळी अंकांचेही. मराठीत एका महिन्यात जेवढी पुस्तकांची विक्री होते, होऊ शकते, जवळपास तेवढीच दिवाळी अंकांचीही होते आणि त्यांना मिळणारा प्रतिसादही पुस्तकांसारखाच असतो.
दुभती गाय, साईड बिझनेस
एक मात्र खरे की, दिवाळी अंक काढण्यामागे अनेक उद्देश/हेतू असतात. त्यातही सुष्ट कमी, दुष्टच जास्त! मासिकांपुढे पर्याय नसतो.. वर्षाच्या शेवटी वाचकांना काहीतरी भरगच्च द्यावेच लागते. तो एक वाङ्मयीन परंपरेचा शिरस्ता झाला आहे. दैनिके-साप्ताहिके यांना जाहिरातींतून पैसा मिळतो. ज्योतिष, भविष्य, आरोग्य, वास्तुशास्त्र, पाककला ही लोकांची गरज असते. त्यामुळे याविषयांवरील अंक हमखास विकले जातात. दिवाळी अंक ही दोन-अडीच महिन्यांपुरती का होईना, पण काहींची ‘दुभती गाय’ झाली आहे. आपल्या हितसंबंधांचा वापर करून जाहिराती मिळवायच्या, मध्ये मध्ये मजकूर पेरायचा आणि दोन-चार लाखांची बेगमी करायची, असा ‘साइड बिझनेस’ या काळात भलताच फोफावतो. हे अंक बाजारात कधीच येत नाहीत. ते थेट जाहिरातदारांकडे जातात अन् उरलेले रद्दीत! राजकीय हेतूपोटी निघणा-या अंकांची संख्याही ब-यापैकी मोठी होत आहे. आता तर काळा पैसा ‘पांढरा’ करण्यासाठीही दिवाळी अंकांचा वापर होऊ लागला आहे, अशी कुजबूज कानावर येते.थोडक्यात काय तर परंपरा, अपरिहार्यता, स्पर्धा, चढाओढ, अहमहमिका आणि उद्दिष्टपूर्ती अशा काही कारणांवर दिवाळी अंकांचा डोलारा दरवर्षी उभा राहतो आहे. त्यामुळे दिवाळी अंकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. ही स्थिती सुधारायला हवी हे तर खरेच! पण ते होणार कसे?
पण हा प्रश्न एकटय़ा दिवाळी अंकांपुरता असता तर ते शक्य होते. पण या प्रश्नाची व्याप्ती खूप मोठी आहे. ती आपल्या एकंदरच सांस्कृतिक-सामाजिक उत्तरदायित्वाशी निगडित आहे.
अंगभूत आणि मुलभूत मर्यादा
आपल्याकडे एकंदरच हळहळे-हुळहुळे लोक फार आहेत. त्यामुळे सारा मामला हौसेचा नाहीतर एकांडय़ा शिलेदारांचा असतो. नुसत्या हौसेला वा एकांडय़ा शिलेदारीला स्वभावत:च अंगभूत आणि मूलभूत मर्यादा असतात. त्यात आपले प्रायोगिकतेचे वेडही अतोनात. अशा एकांडय़ा प्रयोगांचे वा वैयक्तिक अनुभवांचे सामाजिक सिद्धांत होत नसतात. तसे ते व्हावयाचे असतील तर त्यासाठी नियोजनबद्ध आणि सांघिक प्रयत्न करावे लागतात. अन् तेही वर्षानुवर्षे. पण सामोपचाराने आणि एकोप्याने प्रदीर्घ काळ काम करण्याचा मुळात महाराष्ट्राचा स्वभाव नाही आणि तशी इच्छाशक्तीही नाही. पन्नाशीनंतरही चालू असलेल्या कुठल्याही संस्था वा उपक्रम यांच्याकडे पाहिले की त्याची खात्रीच पटते.
‘नॅशनल जिओग्राफिक’ या मासिकाने भूगोल या शाखेला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, एवढेच नव्हे तर आजवर जगाच्या भूगोलाचा कोपरा न् कोपरा धुंडाळायचा प्रयत्न केला. ‘टाइम्स लिटररी सप्लिमेंट’ने इंग्रजी साहित्यासाठी केवळ एक व्यासपीठच उपलब्ध करून दिले नाही; तर समाज आणि साहित्याचा उत्तम अनुबंध निर्माण केला आहे. ‘ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ने दरवर्षी अपडेट आणि सर्वसमावेशक आवृत्ती प्रकाशित करून इंग्रजी भाषेचा आलेख चढता ठेवला आहे. असे किती उपक्रम महाराष्ट्रात 100 वर्षानंतरही तेवढय़ाच जोमदार आणि दमदारपणे चालू आहेत?
जे नाटय़संमेलनाचे रडगाणे तेच साहित्य संमेलनाचे, जे मराठी चित्रपटांचे, तेच मराठी नाटकांचे आणि जे मराठी साहित्याचे तेच दिवाळी अंकांचे! एकूण सा-या रडकथाच!! आणि तरीही आपण मराठी ज्ञानभाषा होण्याच्या बढाया मारणार!!!
त्याला दिवाळी अंकही अपवाद नाहीत.
या साचलेपणातून कसा मार्ग काढता येईल?
काही गोष्टींना लगोलग सुरुवात करावी लागेल. पहिली गोष्ट म्हणजे स्वत:पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. इतिहासकार शेजवलकरांच्या शब्दांत सांगायचे तर ‘समाजहितासाठी आपल्या आवडीनिवडी, स्वार्थ आणि अहंकार यांना कात्री’ लावावी लागेल.
त्यादृष्टीने ‘साप्ता. साधना’ चांगला प्रयत्न करत आहे, हे त्यांच्या अलीकडच्या अंकावरून कुणाच्याही लक्षात येईल. ‘उत्तम अनुवाद’चा अरुण जाखडे यांचा प्रयत्न चांगला आहे, पण केवळ इंग्रजी, रशियन, फ्रेंच या भाषांमधून थेट अनुवाद करणे पुरेसे नाही, दर्जेदार लेखनाची कसोशीने निवड करणेही अगत्याचे आहे.
खरे तर सध्या पूर्वीपेक्षा कधी नव्हे एवढा काळ आणि तंत्रज्ञान अनुकूल आहे. अजूनही काही लेखक आपले सर्वोत्तम लेखन दिवाळी अंकासाठीच राखून ठेवतात. आता जाहिराती मिळवण्यासाठी फार आटापिटा करावा लागत नाही. चित्रकार, मुद्रक यांचीही कमतरता नाही. संगणकामुळे, इंटरनेटमुळे पूर्वीपेक्षा कितीतरी वेगाने काम होऊ शकते. अशा परिस्थितीत तर दिवाळी अंक अधिकच चांगले निघायला हवेत.
दुसरी गोष्ट निव्वळ साहित्यकेंद्री विषयांपेक्षा ताजे विषय काहींनी घेतलेही आहेत, पण ते फारच वृत्तपत्रीय आहेत हेही तितकेच खरे. नवे नवे आणि मुख्य म्हणजे समाजकेंद्री असलेले कितीतरी विषय हाताळता येण्यासारखे आहेत. पण असे फारसे घडताना दिसत नाही. ‘साहित्यकेंद्री’ सत्ताकेंद्र ‘समाजकेंद्री’ झाल्याने फारसे काही बिघडणार नाही.
पण असे अजूनही घडताना दिसत नाही. याचा अर्थ स्पष्ट आणि सरळ आहे. हे लोक प्रामाणिकपणे काम करत नाहीत. त्यांनी खरोखरच खडबडून जागे होण्याची नितांत गरज आहे.
मौज, ललित, दीपावली, अक्षर, साधना, अंतर्नाद असे अंकही चौकटीबाहेर जाण्याचा प्रयत्न का करत नाहीत हे कळायला मार्ग नाही. या अंकांना महाराष्ट्रभरात मोठे नाव आहे, प्रतिष्ठा आहे. त्यामुळे त्यांनी कुठलेही प्रयोग केले तरी त्यांचा अंक घेतला जाईल, त्या प्रयोगांचे कौतुकच होईल. हेच गेली अनेक वर्षे दिवाळी/वार्षिकांक काढणाऱ्या लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत या वृत्तपत्रांनाही लागू आहे. त्यांच्या हाताशी एवढी मोठी यंत्रणा असते, त्यामुळे त्यांचे अंक संग्राह्यच व्हायला हवेत. त्यांनी केवळ मोठय़ा नावांचा हव्यास सोडायला हवा.
तर आणि तरच ही कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
लेख चांगला आहे . आपण फार थेटपणे मतं मांडलीत . मी सत्तर सालापासून दिवाळी अंक वाचतो. आज दिनांक , समकालीन संस्कृती , अबकडई, हे फार वेगळे अंक असायचे. सोबत , किस्त्रीम , हंस , श्रीदीपलक्ष्मी , विशाखा आणि अलीकडे अंतर्नाद , अक्षर, पुरुषस्पंदन , पुरुषउवाच, ऋतुरंग हेही अंक हटके असायचे . पण आता सगळ्यांना भोवळ आली असे वाटते . हे सारे अंक जिथल्यातिथेच गटांगळ्या खात आहेत . तर काहींनी केव्हाच दम तोडला.असे का व्हावे ?
ReplyDelete- अशोक थोरात . अमरावती.
ReplyDeleteदिवाळी अंकांचा शतकोत्सव साजरा करण्यात सरकारने उदासीनता दाखविली. मी दिवाळी अंकांचा वाचक आहे. दिवाळी अंक आजही मला आनंद देतात. म्हणूनच मी या कार्यात सहभागी झालो. हे सांस्कृतिक वैभव जोपासणे, हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. सगळ्यांनी मिळून ते पूर्ण करूया. दिवाळी अंकांनी काळानुरूप बदल केले आहेत. ही परंपरा यापुढेही कायम राहील असा मला विश्वास आहे. गेल्या 106 वर्षांतील दिवाळी अंकांचे कायमस्वरूपी संग्रहालय आणि वाचनालय आम्ही सुरू करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने संग्रहित झालेल्या सहा अंका पैकी दोन अंक या संग्रहालयासाठी देण्यात येतील. व उर्वरित चार अंका पैकी दोन अंक विविध ठिकाणावर भरवण्यात येणा-या दिवाळी अंक प्रदर्शनात मांडण्यात येतील व दोन अंक स्पर्धेसाठी असतील. संपादकांनी आपले मागील दिवाळी अंक या संग्रहालयासाठी पाठवून या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करावे. 1909 साली पहिला दिवाळी अंक काढणारे का. र. मित्र यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागामार्फत टपाल तिकीट काढण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच भारत सरकारला सादर केला जाईल व त्यांचे आजगावमध्ये स्मारक उभारण्यात यावे या साठी प्रयत्न केले जातील.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (6) प्रती नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअर मार्फत या संस्थेकडे दिनांक 31 डिसेंबर 2014 पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, या पत्यावर पाठवाव्यात किवा 02322 - 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेचा निकाल विजेत्या दिवाळी अंकाच्या नावासकट बातमीच्या माध्यमातून सर्व मान्यवर मराठी दैनिके, साप्ताहिके, आकाशवाणी केंद्रे, दूरदर्शन तसेच खासगी दुरचित्रवाहिन्याकडे प्रसिद्धीसाठी पाठवले जातील. तसेच या दरम्यान दिवाळी अंकांचे प्रदर्शनहि भरवण्यात येणार असून प्रदर्शनात मांडण्यासाठी दोन अंक पाठवावे. ज्यांनी स्पर्धेसाठी अंक पाठवलेले असतील त्यांनी प्रदर्शनासाठी वेगळे अंक पाठविण्याची आवश्यकता नाही. प्रदर्शनास कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. मागील वर्षी सर्व स्तरातून 500 पेक्षा अधिक दिवाळी अंक सहभागी झाले होते, प्रतिवर्षी दिवाळी अंकांची स्पर्धा वाढते आहे व स्पर्धकांचीही संख्या वाढते आहे. मागील स्पर्धेचा निकाल व संक्षिप्त अहवाल एखाद्या स्पर्धकाने लेखी मागणी केल्यास त्यास तो टपालाने पाठविला जाईल.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दिवाळी अंक स्पर्धेसाठी पाठविण्यापूर्वी कृपया खालील बाबींचा विचार करावा…
o आपला दिवाळी अंक मुदतीत पोहचायला हवा, शेवटच्या तारखेनंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.
o शक्यतो आपले पार्सल नोंदणीकृत डाकेने पाठवावे. कुरिअरने पाठविण्यापूर्वी जयसिंगपूर येथे कोणत्या कुरिअर कंपन्या सेवा देतात याची खातरजमा करावी किंवा स्पर्धा आयोजकांशी संपर्क साधून कुरिअर कंपनी चे नाव जाणून घ्यावे.
o आपल्या दिवाळी अंकाच्या वेगळे पणाबद्दल 1000 शब्दात परीक्षण पाठवावे. अथवा अन्य नियतकालिकात आपल्या दिवाळी अंकाबाबत परीक्षण अथवा लेख छापून आला असल्यास त्या लेखाचे कात्रण किवा झेरॉक्स प्रत पाठवावी.
o आपल्या नियतकालिकाचा नमुना अंक (आपण जर नियतकालिक चालवत असाल तर)
o या पूर्वी प्राप्त झालेल्या अन्य पुरस्काराची माहिती. (पुरस्काराचे नाव, वर्ष, पुरस्कार देणा-या संस्थेचे नाव)
o नियमित अंकाचा प्रकाशन कालावधी - □ दैनिक □ साप्ताहिक □ पाक्षिक □ मासिक □ द्वैमासिक □ त्रैमासिक □ अर्धवार्षिक □ वार्षिक □ अनियतकालिक
o परीक्षक मंडळाचा निर्णय हा अंतिम राहील व या बाबत कोणतीही तक्रार चालणार नाही.
o दिवाळी अंक व प्रकाशन संस्थेस असलेल्या अन्य सदस्यत्वाचा तपशील. (सदस्यत्वचा प्रकार, वर्ष, संस्थेचे नाव)
o एखादी किंवा सर्व प्रवेशिका कोणत्याही कारणाशिवाय नाकारण्याचा, कोणत्याही वेळी नियम - अटी मध्ये बदल करणे, पूर्व सूचना न देता स्पर्धा रद्द करण्याचा, स्पर्धेची मुदत कमी करण्याचा / वाढविण्याचा, स्पर्धेचा निकाल राखून ठेवण्याचा आणि पारितोषिक वितरणाची तारीख ठरविण्याचा अधिकार आयोजकांना राहील.