ज्येष्ठ पत्रकार वा. दा. रानडे हे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही काळात वावरलेले आणि मुख्य म्हणजे पत्रकारिता केलेले एक महत्त्वाचे पत्रकार होते. त्यांचं मंगळवारी पुण्यात वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. ही बातमी सर्वात अगोदर समजली ती फेसबुकवर. ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक यांनी त्याविषयीची पोस्ट अपलोड केली तेव्हा. पुण्यातील वर्तमानपत्रांनी रानडय़ांच्या निधनाची बातमी देणं सयुक्तिक होतं, पण मुंबईच्या कुठल्याच वर्तमानपत्रातमध्ये ती छापून आलेली दिसली नाही.
रानडे मूळचे नगर जिल्ह्यातील. त्यांचं कुटुंब स्वातंत्र्यपूर्व काळात, 1943 मध्ये पुण्यात स्थायिक झालं. त्या वेळी रानडे अकरा वर्षाचे होते. रमणबागेत त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं. नंतर त्यांनी फग्र्युसन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतली. मराठी आणि संस्कृत या विषयात त्यांना रस होता. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संबंध आला. एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, पां. वा. गाडगीळ यांची काँग्रेस भवनातील भाषणं ऐकण्यास ते आवर्जून जात. 1945 मध्ये ते विद्यार्थी चळवळीत काम करणा-या ‘नॅशनॅलिस्ट ग्रुप’मध्ये सहभागी झाले. याचवर्षी ते ‘सकाळ’मध्ये रुजू झाले. तिथं त्यांनी वेगवेगळ्या पदांवर सलग 38 वर्षे पत्रकारिता केली. 1983 मध्ये निवृत्त झाले.
विद्यार्थिदशेतच ‘राष्ट्रसेवा दल’ आणि ‘नॅशनॅलिस्ट ग्रुप’ यांच्या संपर्कात आल्यानं रानडेंची वैचारिक जडणघडण होण्यास मदत झाली. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळ, त्यामुळे राष्ट्रवादाचे ते पुरस्कर्ते झाले. पण रानडे अत्यंत मितभाषी होते. त्यामुळे कुठल्याच गोष्टीवर ते हिरिरीनं वाद घालत नसत. आपलं म्हणणं शांतपणे मांडत आणि समोरच्याचं तेवढय़ाच शांतपणे ऐकून घेत. आपण पत्रकारितेत दीर्घकाळ काम केलं आहे, ‘सकाळ’ या आघाडीच्या दैनिकाचे काही काळ संपादकही होतो, याचा बडेजाव त्यांनी इतरांसमोर तर सोडाच स्वत:शी तरी कधी मिरवला असेल की नाही, याचीही शंकाच वाटते. पत्रकारितेत थोडंफार जरी काम केलं तरी अनेकांना चांगल्या गुणापेक्षा दुर्गुण जास्त चिकटतात. स्वत:ला ते इतरांपेक्षा आणि सर्वसामान्यांपेक्षा वेगळं समजायला लागतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात दर्प जाणवायला लागतो. पुण्यातलं पत्रकारितेचं पर्यावरण तसं सदाशिवपेठी असल्यामुळे तिथं हे प्रकर्षानं जाणवतं. त्याला काही अपवाद आहेत, नाही असं नाही. त्यातल्या आधीच्या पिढीतल्या अपवादांत्मक नावांपैकी ‘पुणे पत्रकार संघा’चे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव पटवर्धन, रामभाऊ जोशी आणि वा. दा. रानडे. आता तर तिघेही नाहीत. पण तिघांमध्येही बरंच साम्य होतं. वागण्या-बोलण्यातील ऋजुता, तरुण पत्रकारांविषयीची आस्था आणि मध्यममार्गी भूमिका या गोष्टी या तिघांनीही कधी कुणाला शिकवल्या नाहीत. त्यांच्या संपर्कात येणा-याला त्या आपोआप उमगत, समजत आणि त्यांचा गांभीर्यानं विचार करावा लागे.
2004 चा सुमार असेल. मी ‘प्रभात’मध्ये काम करत होतो. रविवार पुरवणीची जबाबदारी होती. एके दिवशी संपादकांनी बोलावून घेतलं आणि ‘हे वा. दा. रानडे’ अशी समोरच्या वयोवृद्ध गृहस्थांची ओळख करून दिली. त्यांचं सदर सुरू करत असल्याचंही सांगितलं. ते रोजच्या अंकात संपादकीय पानावर होतं. तेही पान मीच पाहात असल्यानं मग माझा रानडय़ांशी नियमित संपर्क येऊ लागला. ते आठवडय़ातून दोन वेळा लिहीत. त्यांचं अक्षर अतिशय बारीक आणि गिचमिडं होतं. डीटीपी ऑपरेटरांना तर ते लागतच नसे. मग मला त्यांच्याशेजारी बसून तो मजकूर त्यांना सांगावा लागे, पण त्याचा सराव होईपर्यंत पंचाइतच व्हायची.
रानडे सिंहगड रोडला कुठेतरी राहायचे. प्रभातचं ऑफिस लक्ष्मी रोडला विजय टॉकिज शेजारी. पण लेख मात्र ते स्वत: आणून द्यायचे. दोन मजले चढत वर यायचे. ‘खाली आल्यावर निरोप द्या, मी खाली येत जाईन’ असं त्यांना अनेक वेळा सांगून पाहिलं, पण ‘पुढच्या वेळी तसं करू’ म्हणून ते निघून जात. आणि पुन्हा तसंच करत. खरं तर या वयात त्यांनी इतका आटापिटा का करावा, असा प्रश्न पडे. पण त्यांच्याशी बोलण्यातून कळलं की, त्यांची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नाही. शिवाय ते फक्त ‘प्रभात’मध्ये लिहीत असंही नाही. पुण्यातल्या अद्वैत फीचर्स या वृत्तसंस्थेसाठीही ते बरंच लिहीत. साप्ताहिक ‘साधना’मध्येही त्यांचे लेख अधूनमधून येत असत. लेखनाचे सर्व विषयही भारताचे शेजारी देश किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण.
आता विषय इतके महत्त्वाचे असल्यामुळे त्यांचं लेखन छापलं जात असेच. पण त्यांच्या लेखनाला अजिबात शैली नव्हती. शिवाय त्यातली माहितीही तशी सामान्य असे. ‘कानकून परिषद अनिर्णित’, ‘एका भिंतीच्या निमित्ताने पुन्हा इस्त्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष’, ‘राजकीय मुत्सद्देगिरीतून आर्थिक विकास’, ‘संरक्षणाचे धोरण प्रोअॅक्टिव्ह हवे’, ‘दुस-या मंदीची भीती’, ‘दहशतवाद्यांशी समझोत्याची संभाव्य दिशा’ अशी काही त्यांच्या लेखांची शीर्षकं. ‘प्रांतरचना व महाराष्ट्र’ (1956), ‘भारताचे लोकमत’ (1962), ‘माओचा चीन’ (1967), ‘बंगला देस’ (1972), ‘निवडणुका कोणासाठी, कशासाठी?’ आणि ‘समाजवादी चळवळीची वाटचाल’ (2010) अशी काही पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत.
रानडय़ांच्या एकंदर लेखनाकडे कसं पाहावं हे लक्षात यायला बराच काळ जावा लागला. त्यांचं लेखन सक्तीनं वाचावंच लागत असल्यानं हळूहळू लक्षात येतं गेलं की, रानडे वर्तमानपत्रांचा सरासरी वाचक ज्या पद्धतीच्या लेखनाची अपेक्षा करतो, त्या पद्धतीचं लिहीत. त्यांचे लेखनाचे विषयच मुळी तसे अपरिचित, त्यामुळे त्यात फार सखोल विश्लेषणावरच भर दिला तर ते लेखन सामान्य वाचकांसाठी राहणार नाही. चाळीसेक वर्षे पत्रकारितेत काम करणा-या रानडय़ांना तसं लेखन करायचंच नव्हतं. कारण ज्यांना सखोल विश्लेषण जाणून घ्यायचं, त्यांच्यासाठी इतर अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यांनी त्यांचा वापर करावा. सामान्य वाचकांना अपरिचित विषयावरची परिचित म्हणजे सामान्य माहिती देणं, हाच रानडय़ांच्या लेखनाचा मुख्य पैलू होता. आणि तो महत्त्वाचाही होता. अशा पद्धतीच्या लेखनाची गरज काल होती, आजही आहे आणि उद्याही राहणारच. कारण शेवटच्या माणसाचं हित पाहणं हे लोकशाहीचं काम असतं. तिचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचंही तेच काम असतं. त्या शेवटच्या माणसाला आंतरराष्ट्रीय घडामोंडीविषयी किमान साक्षर करावं, या व्रतानं रानडे शेवटच्या काळापर्यंत लेखन करत राहिले. त्यात त्यांची आर्थिक नड ही अपरिहार्यता होतीच, पण तरीही त्यांचं लेखन याच निकषावर तोललं जायला हवं.
No comments:
Post a Comment