Sunday, November 27, 2011

साहित्यशिक्षक

रवींद्र पिंगे यांना जाऊन आता तीन वर्षे झाली. पिंगे हयात असते तर आता 85 वर्षाचे झाले असते. पिंग्यांची आठवण मुद्दामहून कुणी करण्याचं कारण नाही. मागच्या आठवडय़ात मुंबईत एक छोटासा कार्यक्रम झाला खरा. पिंग्यांच्या पहिल्या स्मृतिदिनीही त्यांचं एक पुस्तक त्यांच्या मुलानं प्रकाशित केलं. पिंग्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या वाटेला आलेल्या एवढय़ाच दोन गोष्टी. त्याबद्दल खंत करण्याचं कारण नाही. खुद्द पिंग्यांनीही ती केली नसती. त्यांनी 2006 वा 2007च्या ललितमध्ये लिहिलंच होतं की, माझी आठवण कुणी करणार नाही. माझा वाढदिवसही कुणाला आठवणार नाही. पण माझ्या नातवाचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी आहे. त्यामुळे नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना माझी आठवण निघेल. पिंग्यांना स्वत:बद्दल किती अचूक अंदाज होता, याचा हा ढळढळीत पुरावाच म्हणावा लागेल.
  

पिंग्यांनी तीसेक पुस्तके लिहिली. परशुरामाची सावली’ (कादंबरी) हे त्यांचं पहिलं पुस्तक. त्याला पु. ल. देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात पुलंनी म्हटलं आहे की, दरवर्षी चार-दोन दिवाळी अंकांच्या संपादकांना पिंग्यांची आठवण यावी इतका पैस त्यांनी तयार केला आहे. आणि खरोखरच पिंग्यांनी या पैसची व्यवस्थित जपणूक केली. त्याचं आपल्या परीनं जतन-संवर्धनही केलं. म्हणजे पिंग्यांना आपलं लेखनकर्तृत्व चांगलंच ठाऊक होतं. शेवटच्या काळात ते आपल्या लेखनाची नीट दखल घेतली नाही, आपल्या पुस्तकांची नीट समीक्षा झाली नाही अशी तक्रार थोडय़ा नाराजीच्या सुरात करत. पण तीही क्वचितच. त्यामुळे त्यांना वैफल्य वा नैराश्य आलं नव्हतं हेही खरं. पिंग्यांचा स्वत:च्या लेखनकर्तृत्वाचा एकंदर अदमास हे मराठी साहित्यविश्वातलं एक दुर्मिळ उदाहरण म्हणावं लागेल. उतारवयात हा साक्षेप भल्याभल्यांकडे राहत नाही. निदान मराठीत तरी!
 
सुखसंगत, रिमझिम पाऊस, देवाघरचा पाऊस, पश्चिमेची धनदौलत, पश्चिमप्रभा, समाधानाचे सरोवर, तुषार आणि तारे, सुखाचं फूल, पश्चिमेचे पुत्र, प्राजक्ताची फांदी, पिंपळपान, हिरवीगार पानं, अत्तर आणि गुलाबपाणी ही पिंग्यांच्या पुस्तकांची नामावली. पिंग्यांनी साप्ताहिक माणूसमध्ये ओळीने 200 लेख लिहिले. त्यातील निवडक लेखनाचा संग्रह पुढे शतपावलीया नावाने राजहंसनेच काढला. 2007 साली राजहंस प्रकाशनानं सर्वोत्तम पिंगेहा त्यांच्या निवडक लेखांचा देखणा संग्रह काढला. त्याची बातमी सांगायला ते तीन मजले चढून आले होते. मी एकदा चुकून म्हणालो, तुमचा तो उत्तम पिंगेसंग्रह येतोय ना?’ पिंगे तत्परतेने म्हणाले, ‘सर्वोत्तम, सवरेत्तम िपगे!’ 

खरंच होतं ते! तो संग्रह सर्वोत्तम म्हणावा असाच आहे. कारण पिंग्यांनी लिहिलं खूप. परदेशी लेखकांवर लिहिलं, तसंच आशयघन ललितलेखनही केलं. त्या सर्वाचा मसावि त्यांच्या या पुस्तकात एकवटला आहे.
 
पिंग्यांचा काळच ललित लेखनाला पोषक होता. शिवाय आकाशवाणीमध्ये अनेक वर्षे नोकरी केल्यामुळे दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, विजय तेंडुलकर अशा अनेक मान्यवरांचा स्नेह/सहवास त्यांना लाभला. त्यामुळे त्यांचं अनुभवविश्व समृद्ध झालं. तो त्यांचा खूप मोठा लाभ होता. एरवी या नामवंतांचा सहवासच काय पण भेट घ्यायलाही इतरांना फार यातायात करावी लागली असती. वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, बरंच काही सोसावंही लागतं. पण पिंग्यांना त्यासाठी फार काही करावं लागलं नाही. सारे त्यांच्याकडेच येत आणि आपल्या अनुभवाची श्रीमंती देत. त्यात पिंग्यांचं बालपण कोकणात गेलेलं. या दोन्हीमुळे पिंग्यांचं ललितलेखक होणं क्रमप्राप्तच होतं.
 
पिंग्यांना दोन व्यसनं होती. एक सतत फिरण्याचं आणि दुसरं, नव्यातल्या नव्या लेखकांचं वाचून त्याला प्रोत्साहन द्यायचं, मार्गदर्शन करायचं. नव्याबद्दल त्यांना फार कुतूहल असायचं. साहित्याच्या क्षेत्रात लुडबूड करू पाहणा-या तरुण मुलांच्या आजोबांची भूमिका करायला त्यांना फार आवडत असे. शिवाय त्याला वेगवेगळ्या साहित्यिकांचा परिचय करून देत. त्याविषयी भरभरून बोलत. त्याच्या वाकडय़ातिकडय़ा प्रश्नांना तर अक्षरक्ष: रात्री-अपरात्री कधीही उत्तरं देत, त्याचं समाधान करत. पिंग्यांना लेखक असण्याचा इगो नव्हता आणि ते भयंकर भ्रमनिरासापासून बचावलेले होते, ही थोरच गोष्ट होती. याचमुळेच त्यांची दृष्टी शेवटपर्यंत स्वच्छ आणि प्रसन्न राहिली.
 ग. प्र. प्रधान हे पिंग्यांचे समकालीन. प्रधानमास्तर ख-या अर्थाने समाजशिक्षक होते. तर पिंगे खऱ्या अर्थाने साहित्यशिक्षक होते असे म्हणावे लागेल. 

पिंगे अजातशत्रू होते. त्यांच्याबद्दल कुणीही वावगा शब्द कधी बोलल्याचं ऐकायलाही मिळालं नाही. आणि पिंगे तर कधीच कुणाविषयी वावदूक बोलत नसत. त्यांच्या लेखनात एक संथ लय आहे, पण कुठेही चढ-उतार नाहीत की चढा सूर नाही. पिंग्यांचा स्वभावही असाच होता. ज्याच्याशी पटत नाही, त्याच्याशी संबंध ठेवायचा नाही. संपला विषय!
 
पिंग्यांचं लेखन त्यांच्या काळातल्या मध्यमवर्गाला सुखावणारं होतं. त्यावेळचे अनंत काणेकरांसारखे काही लेखकही तसंच लेखन करत. तो मध्यमवर्गच आता राहिला नाही. त्यामुळे पिंग्यांच्या पुस्तकाबाबत आता बोललं जाणं दुरापास्तच आहे. आणि साहजिकही. त्यांचा काळ स्वातंत्र्य उपभोगायला मिळालेल्या पिढीचा काळ होता. त्यामुळे त्यांच्या पिढीत ध्येयवाद होता. ध्येयवादी माणसं भाबडी असतातच. पिंगेही होते. पण त्यांच्यातला साहित्यशिक्षक त्याहून मोठा होता. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांची आठवण कुणाला राहिली नाही, कुणी ती वाचली नाहीत तरी पिंग्यांची आठवण करणं हे मराठी साहित्यक्षेत्राच्या निकोपपणाला सुदृढ करणारंच आहे यात शंका नाही. 

4 comments:

  1. राम, तुझ्यासाऱख्या माणसानं एका मिडिऑकर लेखकाचा आणि त्याहूनही अधिक मिडिऑकर माणसाचा एवढा उदो उदो का करावा ते समजत नाही.
    - मुकुंद टाकसाळे

    ReplyDelete
  2. कै. रवींद्र पिंगे या बुजूर्ग लेखकाचे साहित्य कुणाला आवडले नाही, तर ते चालेल.परंतु म्हणून त्यांना मिडीऑकर लेखक म्हणणे चुकीचे आहे आणि असे म्हणणा-याची पातळी दाखवणारे आहे. यावर श्री राम जगताप यांनी उत्तर द्यावे, एवढेच मी म्हणेन.

    मंगेश नाबर

    ReplyDelete
  3. आपल्या वरील पोस्टवरील श्री. टांकसाले यांचे मत कै. रवीन्द्र पिंगे यांच्यावर अन्याय केल्यासारखे वाटते. या जगातून कायमचे गेलेल्या एका मान्यवर व्यक्तीविषयी असे जाहीर लिहिण्याची वेळ का आली याचा श्री. मुकुंद हे खुलासा करतील तर बरे होईल.

    ReplyDelete