Saturday, November 5, 2011

हजारेशाहीचे रंगरूप

हा लेख गोविंद तळवलकर यांनी दिव्य मराठीमध्ये  ३० ऑक्टोंबर २०११ रोजी लिहिला आहे.


भारताची राजकीय व्यवस्था, निवडणूक पद्धती इत्यादी पूर्णपणे बदलण्याचा विडा अण्णा हजारे यांनी उचलला आहे. तथापि राळेगणसिद्धी या त्यांच्या गावाचा एकंदर कारभार आणि तेथील लोकांचे जीवन कसे चालते हे पाहणे जरुरीचे आहे. याबाबतीत मुकुल शर्मा यांनी तेथे जाऊन कोणते अनुभव घेतले त्याची माहिती येथे देत आहे. शर्मा हे सामाजिक प्रश्न, पर्यावरण, ग्रामीण विकास यासंबंधी लिहितात. त्यांनी राळेगणसिद्धीवरही लिहिले आहे. त्यांचा एक लेख वेबवर 14 एप्रिल रोजी वाचला. त्यात जे काही लिहिले होते त्याची शहानिशा करण्यास राळेगणसिद्धीजवळील एकास सांगितले. तेव्हा त्याने शर्मा यांची निरीक्षणे चूक आहेत असे कळवले. मी शर्मा यांना पत्र लिहून त्यांनी राळेगणसिद्धीसंबंधात केलेल्या मतप्रदर्शनाच्या विरुद्ध मिळालेली माहिती नमूद केली.

शर्मा यांनी लिहिले की, ते काही वर्षांपूर्वी ‘नवभारत टाइम्स’मध्ये शिकाऊ पत्रकार असताना मला भेटायला आले होते. त्यांनी राळेगणसिद्धीला 1995, 1999 व 2002 या वर्षी भेट दिली. दर वेळी काही दिवस मुक्काम केला. 2002 नंतर ते राळेगणसिद्धीला गेलेले नाहीत. तथापि त्यांनी पत्रात लिहिले आहे की, यूएनआय-वार्ता या वृत्तसंस्थेच्या दिल्लीच्या एका वार्ताहराने 2004-05 या काळातील राळेगणसिद्धीसंबंधी लिहिलेल्या पुस्तिकेतील माहितीप्रमाणे या परिस्थितीत बदल झालेला नाही. शर्मा यांनी 21 मे 2006 रोजी ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल विकली’तही लेख लिहिला होता. त्याची प्रतही शर्मा यांनी मला धाडली. त्यांचा वेबवरचा लेख 2006 च्या लेखात भर घालून लिहिलेला आहे. शर्मा यांनी अशीही पुस्ती जोडली की त्यांनी हजारे यांचे लेख, पुस्तके तसेच त्यांच्या दोन ध्वनिमुद्रित केलेल्या दीर्घ मुलाखतींचा आधार लिखाण करताना घेतला होता. एप्रिलमधील लेखात शर्मा यांनी प्रारंभी राळेगणसिद्धीच्या विकासामागची मनोभूमिका काय आहे याचे विवेचन केले आहे. काही मतांबद्दल विविध प्रतिक्रिया होऊ शकतात. तसेच काही ऐतिहासिक संदर्भ बरोबर नाहीत. राळेगणसिद्धीमधील शेतीसुधारणा, जलसिंचनाची वाढती उपलब्धता, जमिनीखालील पाण्याची वाढलेली उंची, बरीच वृक्षराजी, शिक्षणाची सोय आणि त्या क्षेत्रातील शिस्त, गावातील स्वच्छता इत्यादींबाबत त्यांनी लेखात पुरेसे विवेचन करून कौतुक केले आहे. गावची वस्ती तेव्हा सव्वादोन हजार होती. मराठा बहुसंख्य, तर अनुसूचित जाती आणि जमातीचे अत्यंत थोडे. लोकांनी ही विकासकामे एकत्रपणे खपून केली आहेत. यात जमिनीची बांधबंदिस्ती, रस्ते, शाळा वगैरेंच्या इमारती इत्यादींचा समावेश होतो. विविध कार्यकारी संस्थांद्वारे लोकांनी अनेक क्षेत्रांत विकासाची यंत्रणा उभी केली आहे. नसबंदी, नशाबंदी, कुºहाडबंदी, चाराबंदी व श्रमदान हे पाच नियम गावात लागू आहेत. आपण ते पाळू, अशी शपथ सर्व गावक-यांना घ्यावी लागते. हजारे यांच्या विचारांवर धार्मिकतेचा पगडा असल्यामुळे ही शपथ देवळात घेतली जाते.

विकासकार्यात अडथळा येऊ नये आणि मतभेद होऊन गावातले वातावरण बिघडू नये म्हणून 2005 च्या आधी तीस वर्षे ग्रामपंचायतीच्या व सहकारी संस्थांच्याही निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत. निवडणूक ही कल्पनाच अण्णा हजारे यांना त्याज्य आहे. शर्मा यांना त्यांनी सांगितले की, सत्ता आणि राजकारण यामुळे भ्रष्टाचार माजतो. हजारे यांनी गावाचा विकास घडवून आणल्यामुळे त्यांचा प्रभाव इतका आहे की लोक त्यांच्या म्हणण्याबाहेर नाहीत आणि स्वतंत्रपणे ते निर्णय घेत नाहीत.

गणपत औटी हे काही काळ सरपंच होते. त्यांनी सांगितले की, अण्णा सांगतील तसे होत असते. लष्करी हुकूम पाळला जातो तसे आम्ही करत आलो. वर जे पाच नियम नमूद केले आहेत त्यांची अंमलबजावणी कशी होते? शर्मा यांनी हजारे यांची मते दिली आहेत. ती अशी की, सामाजिक बदलासाठी लोकांचे मन वळवावे लागते, परंतु दर वेळी लोक ऐकतीलच असे नाही; मग शारीरिक शिक्षा द्यावी लागते. पण नेहमी ती उपयोगात येतेच असे नाही आणि मग नैतिक बळ वापरावे लागते. आई मुलांचे लाड करते, पण चुकले तर तोंडात मारते; तसे कार्यकर्त्यांना सामाजिक कार्याच्या वेळी करावे लागते, असे समर्थन हजारे करतात. अण्णा हजारे यांनी समाजकार्याला सुरुवात केली तेव्हा राळेगणसिद्धी व आसपास दारूच्या भट्ट्या ब-याच होत्या, दुकाने होती. हजारे यांनी गावक-यांची सभा घेऊन ही सर्व दुकाने व भट्ट्या बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ब-याच भट्ट्या बंद झाल्या. नंतर जो कोणी मद्यपान करील त्याला शारीरिक शिक्षा देण्याचे ठरले. हजारे यांनी शर्मा यांना सांगितले की, नियमभंग करणारास देवळाच्या समोरच्या काटेरी तार गुंडाळलेल्या खांबाला बांधून फटके मारले जातात. ग्रामसभेने ठराव करून गावातल्या पंचवीस तरुणांचा गट केला आणि ही फटक्यांची शिक्षा देण्याचा त्यास अधिकार दिला. काही मद्यप्यांना या तरुणांनी व हजारे यांनी मिळून फटके मारले, असेही गणपत बाळासाहेब पाठारे म्हणाले.

उपसरपंच कैलास पोटे यांनी स्वत:ला हा अनुभव आल्याचेही सांगितले. फटके मारून मग पोलिसांच्या हवाली केले जाते. कुटुंब नियोजनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी होते, असे हजारे यांनी शर्मा यांना सांगितले. त्यांचे म्हणणे असे की, कुटुंब नियोजन हे देशभर झाले पाहिजे. जात व धर्म यांचा विचार न करता याची अंमलबजावणी बळाचा वापर करून झालीच पाहिजे; आपण राळेगणसिद्धीमध्ये तसा तो करतो. तेथे धूम्रपान बंद असून केवळ धार्मिक चित्रपटच बघण्यास परवानगी आहे आणि फक्त धार्मिक गीतेच ऐकता येतात. हजारे यांनी केबल टीव्ही निषिद्ध ठरवला आहे. म्हणून एकाने आपल्या घरावर डिश अ‍ॅण्टेना लावल्यावर त्याची कडक हजेरी घेतली गेली व त्याने माफी मागितली. कैलास पोटे यांनी शर्मा यांना ही माहिती दिली.

अण्णा हजारे स्वत: शाकाहारी आहेत. त्यांच्या मते हिंदू तत्त्वज्ञानाप्रमाणे शाकाहार हा अधिक योग्य ठरतो; मांसाहारामुळे लोक युद्धाला प्रवृत्त होतात. मांसाहार हा कनिष्ठच ठरवून तसा गलिच्छ आहार खाता, तसेच कपडे करता म्हणून तुमचे विचारही गलिच्छ असतात, असे हजारे यांनी हरिजन इत्यादींना ऐकवल्याची माहिती शर्मा यांनी दिली आहे. अर्थात हरिजनांच्या शिक्षणाची व्यवस्था करून त्यांनी दोन-चार दलितांना महाविद्यालयीन शिक्षणही मिळवून दिले आणि ते डॉक्टर झाले. तथापि शर्मा यांचा मुख्य आक्षेप असा की, हजारे व त्यांच्या सहका-यांनी राळेगणसिद्धीमध्ये दलितांना मदत केली असली तरी त्यांच्या चौकटीत दलितांना वरच्या वर्तुळात हक्काची जागा नाही; त्यात उपकाराची भावना आहे, स्वाभाविक हक्क मान्य करण्याची नाही. तथापि रा. स्व. संघाचे इंग्रजी मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ ने काही वर्षांपूर्वी हजारे यांच्या कार्यासंबंधी एक लेखमाला प्रसिद्ध केली होती. हिंदू

संस्कार लोकांवर ठसवण्याचे हजारे यांचे कार्य त्या लेखकाला आदर्श वाटले. धार्मिक विचारांच्या संस्कारांमुळे आपण सर्व एकाच कुटुंबाचे घटक आहोत ही भावना वाढली असे त्या लेखकाचे म्हणणे. तथापि दलितांमध्ये यामुळे आज्ञाधारकपणाची भावना बळकट झाली आणि बहुसंख्य जमातीचे वर्चस्व मानण्याची प्रथा चालू राहिली.

या सर्व माहितीवरून मला काही प्रश्न पडतात ते असे : फटक्यांची शिक्षा देण्याचा अधिकार हजारे आणि ग्रामसभा यांना कोणी दिला? पोलिस व सरकार यांना याची दखल घ्यावीशी का वाटली नाही? राज्य सरकार अण्णा हजारे यांचे दास बनले आहे काय? कुटुंब नियोजनाच्या बाबतीत संजय गांधींच्या पलीकडे हजारे यांची मजल गेली आहे असे दिसते. अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य काही काळ होते तेव्हा त्याने प्रत्येक व्यक्तीचे जीवन साचेबंद केले होते. गाणीबजावणी बंद केली होती. हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये तालिबानच्या आधीच तसे केले. शाकाहार हा मांसाहारापेक्षा नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ असे मानणे हा अहंकार आहे व चूक आहे. हिटलरने हजारो-लाखो ज्यूंना जिवंत जाळले. तो तर शाकाहारी होता. पण अण्णा हजारे यांना आपल्याभोवती जग फिरत असल्याचा भ्रम होत असून त्यांना जे मान्य तेच इतरांनाही मान्य झाले पाहिजे, असा त्यांचा हुकूमशाही दंडक आहे.

3 comments:

  1. मुळात हुकुमशाही हि निरपेक्षपणे राबविता आल्यास त्याचे तोट्या पेक्षा फायदे अधिक असू शकतात ह्या बद्दल तितकासा वाद नसावा.फक्त हाच हुकुमशहा जेव्हा क्वचित प्रसंगी एककल्लीपणा कडे झुकतो ,तेव्हा काही वादविवाद उद्भवणे स्वाभाविक बनते.टीम अण्णांच्या काही माजी मान्यवरांच्या म्हणण्या नुसार अण्णांच्या स्वभाव-दोषा मुळे ती मंडळी त्यांच्या पासून दुरावली गेली.सध्याच्या राजू परुळेकर ब्लॉग प्रकरणात अण्णांचा खोटारडेपणा मात्र उघड्यावर आला हे कुणी नाकारू शकत नाही.अण्णा ज्या गांधीगिरीचा झेंडा पुढे नेऊ इच्छितात,त्या गांधींचा सदैव सत्याची कास धरणारा,वेळप्रसंगी स्वतःची चूक /चुका मान्य करण्याचा त्यांचा मनाचा मोठेपणा,आपल्या अंगी बानवण्यास अण्णा सोयीस्कर विसरले/विसरतात,हीच ह्या एकूणच आंदोलनातील वरवर दिसायला खूप छोटी पण परिणामांचे दृष्टीने फार मोठी अशी गोष्ट आहे." एखादी गोष्ट केल्या नंतर, "नाही" म्हणून पडणे ,घुमजाव करणे हि घाणेरडी जरी असली तरी पण एक कला आहे.धडधडीत,उघड-उघड खोटे बोलणे हे माणूस मोठा होण्याचे/झाल्याचे लक्षण असते/आहे.तथापि ते लोक,वास्तवता लोकांना कळून देखील,कुणाला त्याचा शहानिशा करता येणार नाही,व तसा प्रयत्न कुणी केल्यासच तो पुरावा कमकुवत समाजाला जाईल ह्याची व्यवस्थित काळजी घेतात.अण्णा ह्यात खूपच कच्चे आहेत.त्यांचे वयोमान पहाता कुणी ते चव्हाट्यावर आणत नव्हते हि वास्तवता होती,पण राजू परुळेकर पडले हाडाचे,तेथे सध्या पंचाईत झाली.त्या मुळे ह्या पुढे अण्णांनी सध्याच्या काळातील गतिमान मिडिया आणि त्या अनुषंगाने येणारी साधने ,त्यांचे फायदे तोटे ह्याचा व्यवस्थित अभ्यास करून मगच पुढील पावले उचलावीत असे आग्रहाने म्हणावेसे वाटते.अण्णांचे आंदोलन हि ह्या देशाची नि काळाची गरज आहे पण ते एकटे हे आंदोलन पुढे नेऊ शकणार नाहीत हि वास्तवता आहे त्या मुळे चांगले नि लायक असे लोक त्यांच्या पासून वेगाने दूर होणे हे बरे नव्हे.अण्णांनी मौनात असताना आत्मपरीक्षण करावे असे आग्रहाचे सांगणे.

    ReplyDelete
  2. mynac, लेख वाचून अंतर्मुख झाले , विचार थांबले पण तुमची कमेंट वाचली ,सहमत आहे . एक माणूस १००% ,संपूर्णपणे चांगला नसतोच जसा हात एका बाजूने पांढरा तसा दुसऱ्या बाजूने काळा आहेच कि ! म्हणून ज्याच्याकडे जे चांगलं आहे ते घेऊन एका आदर्श समाजरचनेचा पाया तयार होणे गरजेचे आहे !

    ReplyDelete
  3. Excuse me, am writing in English because my browser does not support Marathi font yet. Here is what I think. It is amazing how much we scrutinize a person like Hazare; while we do not apply such intense scrutiny to almost every politician today, who badly need it. Nobody is perfect. Anna has tried to do good in his life as he thought was good according to his life experiences. You may doubt his methods and judgement about good or bad. That is highly subjective. But you cannot doubt his sincerity Towards his intentions and his deeds. None of what he has done has resulted in his personal enrichment interns of wealth or comfort. I cannot think of any other leader or politician or so called think tanks, who would swear that their social work NEVER materially benefited them. There is a weight to what Anna says, not necessarily because it is logically and politically correct, but simply because it is earnestly insisted by a person, who stands nothing to gain out of it, his life gives credibility to honesty of his intention. This poor old kind man really does not deserve ruthless tearing down.

    ReplyDelete