Monday, January 23, 2012

विचारांचा खळखळाट!

महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या साहित्य आणि समाजकार्य पुरस्कारांनी एव्हाना बरीचशी प्रतिष्ठा मिळवली आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय आणि अनुकरणीय व्यक्तींचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम स्तुत्यच आहे. शिवाय त्यानिमित्ताने काढण्यात येणा-या पूर्वीच्या संवादिनीआणि मंथनया स्मरणिका आणि सध्याचा एकत्रित विशेषांक हेही या सोहळ्याचं एक प्रमुख वैशिष्टय़ राहिलं आहे. पण नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यानिमित्त काढलेला साधना साप्ताहिकाचा विशेषांक वाचताना मात्र काहीशी निराशा होते. कारण यातल्या बहुतांशी पुरस्कारप्राप्त लेखकांची आणि कार्यकर्त्यांची मनोगतं नकारात्मक आहेत. त्याला अपवाद आहे तो कविवर्य मंगेश पाडगावकर आणि बचतगटाचं काम करणा-या नीलिमा मिश्रा यांचा. गेली पन्नास वर्षे सतत कविता लिहूनही पाडगावकरांची भावना मला माणूस समजून घ्यायचा आहे’, अशीच आहे. मला माणूस समजला आहे, याविषयी ते एका अक्षरानंही बोलायला तयार नाहीत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाऊन, रॅमन मॅगसेसेसारखा प्रतिष्ठित पुरस्कार मिळूनही नीलिमा मिश्रा यांना अजून खूप काम करायचं आहे.
 पण हे दोन अपवाद वगळता मात्र इतर बहुतेक लेखांमधून व्यवस्थेविषयी आणि सभोवतालच्या परिस्थितीविषयी जरा जास्तच निराशाजनक चित्र रंगवलेलं दिसतंय. परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्तच फुगवून सांगण्याचा प्रकार आणि समस्यांचा बागुलबुवा करण्याचा प्रयत्न केला जातोय असं ही मनोगतं वाचताना वाटतं. आमच्या काळी असं होतंवा अमूक काळी असं होतंहा तर ज्येष्ठांचा शिरस्ताच असतो. शिवाय शासनयंत्रणेविषयीची नकारात्मकता हा तर सर्वामध्ये कॉमन म्हणावा असा फॅक्टर आहे. जगाला एका विशिष्ट दिशेनं ढकलण्याचं काम करण्यासाठी आपल्या परिघापुरतं काम करून भागत नाही तर त्यासाठी आधी जगाचं नीट आकलन करून घेण्याचीही गरज असते. जग जसं आहे, ते तसं का आहे हे समजून घेतल्याशिवाय त्याविषयी काही विधानं करणं हे फारसं बरोबर ठरत नाही.
पण इथं मात्र उलटच प्रकार दिसतो. ज्यांचं समाजाविषयीचं, राजकारणाविषयीचं आणि लोकशाहीविषयीचं आकलनही अगदीच तोकडं म्हणावं असं आहे, असेच लोक त्याविषयी बेधडक विधानं करत आहेत. त्याची साक्षच या मनोगतातून प्रचितीला येते.
 
या लोकांचं काम अनुकरणीय आहे याबाबतही वाद असायचं कारण नाही. पण याची जाणीव त्यांना स्वत:लाही असायला हवी. राज्यशास्त्रामध्ये स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हेअशी एक स्वातंत्र्याची व्याख्या सांगितली जाते. तोच मुद्दा इथेही आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे बोलताना, विधानं करताना ती जबाबदारीनं करायला नकोत का? आपल्या कामाचा परीघ, आपलं कार्यक्षेत्र मर्यादित असेल तर आपलं वक्तव्यही त्या क्षेत्रापुरतं, आपल्या अनुभवांपुरतंच असायला हवं. पण इथं नेमकं उलट दिसतं. साऱ्यांनी आपल्या प्रश्नांसाठी शासनव्यवस्था आणि समाजव्यवस्था यावर तोंडसुख घेण्यात समाधान मानलं आहे.
 
समाजातील विशिष्ट वास्तवाला भिडणारे साहित्य आणि प्रत्यक्ष समाजातील समस्यांना भिडणारे कार्यकर्ते यांच्याकडे किमान काही विचार असावा आणि किमान काही कृती असावी, जी उल्लेखनीय म्हणावी अशी आहे, असा विचार करून हे पुरस्कार दिले जातात. अर्थात एखाद्या पुस्तकाला वा व्यक्तीला पुरस्कार दिला जातो याचा अर्थच असा असतो की ते पुस्तक, ती व्यक्ती वा तिचा विचार आजच्या समाजासाठी उपयोगाचा आहे. पण यांच्याकडे नेमका कोणता विचार आहे हे त्यांच्या पुरस्कारप्राप्त पुस्तकांमधूनही दिसत नाही आणि त्यांच्या मनोगतांतूनही दिसत नाही. त्यामुळे या लोकांना समाजच नीट समजला नसावा, अशी साधार शंका येते.
 
आपल्या वैयक्तिक अनुभवांना सामाजिक सिद्धांताचं रूप द्यायचं नसतं. पण आपल्या वैयक्तिक अनुभवांना/प्रश्नांना सामाजिककरण्याची मोठी चढाओढ कार्यकर्तानामक लोकांमध्ये दिसून येते. सतत कुठल्यातरी दोषांचं खापर सरकारनामक यंत्रणेवर फोडलं की आपलं काम झालं यातच समाधान मानलं जात आहे. दीर्घकालीन समस्यांवर केल्या जाणा-या उपाययोजनाही दीर्घकालीनच असाव्या लागतात. सामाजिक सुधारणांमध्ये शॉर्टकट नसतो. हे अठराव्या-एकोणिसाव्या शतकापासून भारतात झालेल्या सामाजिक सुधारणांवरून आणि त्यांच्या गतीवरून लक्षात यायला हरकत नाही. पण ते लक्षात कोण घेणार? त्यासाठीचा अभ्यास करणार कोण? त्यामुळेच आठ हात लाकडाच्या नऊ हात धलप्या काढण्याचा प्रकार होतो आहे.
 
कवी दिलीप चित्रे यांनी कुठल्याशा कवितेत म्हटले आहे की,
 
कृतीमागचा विचार
आणि विचारामागची कृती
या दोन्हींच्या दरम्यान असते
मी दिलेली आहुती
 पण विचार करणा-यांनी कुठलीच कृती करायची नाही आणि कृती करणाऱ्यांनी कुठलाच, किमान तारतम्यपूर्ण ठरेल असा विचार करायचा नाही, असंच ठरवलं असेल तर परिस्थिती कठीणच राहणार..तिच्यात सुधारणा होण्याची फारशी शक्यता नाही. आणि तरीही हेच लोक अनुकरणीय म्हटले जास्त असतील तर तो मात्र मोठाच धोका आहे.

No comments:

Post a Comment