गोविंद तळवळकर
यांना व्युत्पन्न पत्रकार, प्रकांड वाचक आणि साक्षेपी संपादक असे म्हणता येईल. महाराष्ट्र
टाइम्सचे ते सलग 29 वर्षे संपादक होते. त्यामुळे त्यांना `संपादक' म्हणून
खरोखर काहीतरी करून दाखवता आले. राजकारण-साहित्य-कला-संस्कृती अशा सर्व
विषयांबाबतची मर्मदृष्टी आणि वाचन असल्याने त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला सांस्कृतिक
चेहरा मिळवून दिला. वेगवेगळी सदरे, नवनवे
विषय यांचा पाठपुरावा केला. नामांकितांपासून नवोदितांपर्यंत अनेक
लेखकांना लिहिते केले. स्वत: ही पुस्तकांविषयी,
साहित्या (मराठी-भारतीय आणि
जागतिक)विषयी, विपुल म्हणावे इतके लेखन
केले. इंग्रजी भाषेवर आणि लंडन या शहरावर तर तळवळकरांचे नको इतके
प्रेम. त्यामुळे त्यांना काही लोक गंमतीने ब्रिटिश-भारतीय म्हणत. अर्थात हे तळवळकरांच्या पाठीमागे.
समोर म्हणायची कुणाची बिशाद होती?
तळवळकरांनी
लिहिलंही खूप. पण तळवळकरांच्या
लेखणीला विश्लेषणाची जोड नसे, नसते. कारण ते अजून ही लेखन करतात. पण ही काही त्यांच्यावरील टीका
होऊ शकत नाही. कारण वर्तमानपत्रांतमध्ये सामान्य वाचकांना गृहीत
धरून लिहावे लागते. त्यात या सामान्य वाचकाला अजिबात माहीत नसलेल्या
विषयाबद्दल सांगायचे असेल तर त्याचा रसाळ परिचय करून देणे, हा
चांगला मार्ग असतो. तळवळकरांनी तेच केले. पण हेही खरे की, तळवळकरांनी महाराष्ट्राला इंग्रजी पुस्तकं
वाचायची सवय लावली.
गोविंद तळवलकर
संपादक असतानाच्या `महाराष्ट्र टाइम्स'च्या `मैफल' पुरवणीत `ग्रंथांच्या सहवासात'
हे सदर प्रसिद्ध होत असे, त्यातलेच निवडक लेख सध्या `महाराष्ट्र
टाइम्स'मध्ये पत्रकार असलेल्या सारंग दर्शने
यांनी पुस्तक रूपाने आणले आहेत. शांताबाई शेळके,
व्यंकटेश माडगूळकर, दुर्गाबाई भागवत, श्रीराम लागू, सोली सोराबजी, जयंत
नारळीकर, मे. पुं. रेगे, शामलाल, एस. एल. भैरप्पा, ग. प्र. प्रधान, शा. शं. रेगे, मधु लिमये, गुलजार, श्री.
बा. जोशी इत्यादी 23 मान्यवरांच्या वाचन-ग्रंथसंग्रहाविषयी लालित्यपूर्ण लेख आहेत. यातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या.
पण हवी ती पुस्तके मिळवण्यासाठी केलेली धडपड आणि
यातायात यात्र समान.
शामलाल हे
`टाइम्स ऑफ इंडिया'चे माजी संपादक. त्यांनी जागतिक
साहित्यातील तीन पिढय़ांचे साहित्य वाचले. शिवाय स्वत:च्या संग्रहातील 20 हजार पुस्तकांपैकी प्रत्येक पुस्तक स्वत: निवडूनच घेतले. तरी आपण कोणत्याही
विषयातले तज्ञ नाही, असे ते नम्रपणे सांगतात.
डॉ. श्रीराम लागू यांचे वाचन चौफेर, पण बेशिस्त.
रसेलच्या निखळ बुद्धिप्रामाण्यवादाने त्यांना चांगलेच प्रभावीत केले. `मॅरेज आणि मॉरल्स' या रसेलच्या
पुस्तकाने आपण आतून हलून गेलो,
याची कबुली त्यांनी जाहीरपणे अनेकदा दिली आहे.
एस. एल. भैरप्पा भारतीय पातळीवरील एक आघाडीच्û कादंबरीकार, ते `क्लासिक'
सदरात मोडणारीच पुस्तके विकत घेतात. `पर्व' ही कादंबरी लिहिण्याआधी तब्बल साडेसहा वर्ष केवळ
महाभारत जीवनावरील पुस्तकांचे वाचन ते करत होते. (अर्थात, भैरप्पा आपल्या प्रत्येक कादंबरीविषयी असेच करतात.)
दुर्गाबाइचा लेखही चांगला आहे.
`मराठी संतसाहित्याने संस्कृत साहित्यात असलेली शास्त्रीय-वैज्ञानिक प्रवृत्ती
नष्ट केली, नुसतेच भाषावैभव वाढवले,'
हे त्यांचे निरीक्षण अतिशय नेमके आणि धारदार आहे.
खुशवंतसिंग
यांचा छोटेखानी लेख त्यांच्या एकूण बिनधास्त आणि स्वच्छंदी व्यक्तिमत्त्वासारखाच आहे.
`मी नको इतके वाचन करतो, कधी कधी दिवसाला एक पुस्तके
वाचतो,' असे ते म्हणतात. शिवाय स्वत:च स्वत:ला दरमहा तीन हजार रुपयांचा बुक अलाऊन्स देतात, जो त्यांचा
आयकरही वाचवतो!
रमेशचंद्र सरकार हे तत्त्वज्ञानाचे
प्राध्यापक. त्यांनी माथेरानला घोडय़ावर बसण्याचा प्रयत्न फसल्यावर त्या विषयावरची दोन पुस्तके वाचून,
त्यातल्या सूचना व छायाचित्रे अभ्यासून नाठाळ
घोडय़ांना कसे इशाऱयाप्रयाणे वागवले,
याचा किस्साही मस्तच आहे.
खरे तर या
पुस्तकात असे कितीतरी किस्से आहेत.
काही गमतीजमतीही
आहेतच. मे. पुं. रेगे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक `शनिमहात्म्य' आणि `शिवलीलामृत' यांना अवीट गोडीची
पुस्तके असे सर्टिफिकेट देतात, वर `प्रत्येकाने ती वाचलीच पाहिजेत' अशीही शिफारस करतात!
शांताबाइचा लेखही चांगला,
प्रामाणिक, पण वाचन बेशिस्त
आणि ग्रंथसंग्रहही. वर शिस्तीच्या वाचकांना टोमणा की,
`केवळ व्हिटामिन्सच्या पिल्सवर जगावे, फक्त पौष्टिक
आणि भरपूर जीवनसत्वे असलेलाच आहार घ्यावा, तसे या मंडळींचे वाचन असते.'
पण शेवटच्या काळात खुद्द शांताबाइनी आपल्या या बेशिस्त आणि स्वैरवाचनाबद्दल जाहीरपणे खेद व्यक्त केला. या पुस्तकात त्याचा उल्लेख नसला तरी
वाचनापायी आपण आयुष्यातला बराचसा वेळ वाया घालवला अशी त्यांनी जाहीरपणे कबुली दिलेली आहे.
या पुस्तकाचे संपादन मात्र काटेकोरपणे झालेले नाही. लेखांचा अनुक्रम व्यवस्थित नाही. पहिलाच लेख वाईट आहे. तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी व धर्मवीर भारती यांचे लेख त्रोटक तर त्र्यं. वि.
सरदेशमुख, गंगाधर गाडगीळ, जयवंत दळवी यांचे ले ख भरकटलेले आहेत. मधु लिमये आणि शां.
शं. रेगे यांचे
लेख नको इतके मोठे आहेत. त्यामुळे या पुस्तकाला `संपादन' असे न म्हणता `संकलन' म्हणणे योग्य ठरले असते.
संपादकांचे मनोगतीही अतिशय मोघम आहे. मूळ सदराची कल्पना काय होती, त्यानुसार लेखन आले का, सदर चालू असताना त्यावर
होत असले ली चर्चा, याविषयी त्यात काहीच
नाही...
निर्मितीच्या
अंगाने पुस्तक उत्तम आहे,
विविध क्षेत्रांतल्या मान्यवर वाचकांच्या लेखांमुळे वैचित्र्यपूर्ण आणि रोचक झाले आहे. हे पुस्तक वाचून काय वाचावे, कसे वाचावे आणि किती वाचावे हे जाणकारांना ठरवता यावे.
ग्रंथांच्या सहवासात - संपादन : सारंग
दर्शने
मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
पाने : 198 (1/4), किंमत : 250 रुपये
पाने : 198 (1/4), किंमत : 250 रुपये
No comments:
Post a Comment