वयाच्या पंचविसाव्या वर्षी ‘कोसला’सारखी सशक्त कादंबरी लिहिणाऱ्या
डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे,
तर ‘कोसला’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीनेही सुवर्णमहोत्सवी वर्षात
पर्दापण केले आहे. ‘कोसला’ सलग तीन पिढय़ा वाचली जात असतानाच नेमाडय़ांची
गेल्या वर्षी ‘हिंदू’ ही ‘हिंदू’ या संकल्पनेचीच पुनर्माडणी करणारी नवी
कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यानिमित्ताने हा खास लेख...
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी 24 मे रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे, तर त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी लिहिलेली ‘कोसला’ ही
कादंबरी लवकरच सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण करेल. मुख्यत: कादंबरीकार
आणि कादंबरी-समीक्षक अशी नेमाडय़ांची ओळख सांगता येईल. पण नेमाड्यांविषयी
साहित्यक्षेत्रात आणि साहित्याबाहेरच्या जगात ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ आहे. त्यामुळे वाद, टीका, कौतुक, हेटाळणी आणि द्वेष आजवर नेमाडे यांच्या वाटय़ाला आलेले आहे. त्यातून त्यांच्या कादंब-याही सुटलेल्या नाहीत. ‘कोसला’विषयी आजही असलेली उलटसुलट चर्चा आणि गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘हिंदू’विषयी अहमहमिकेने होत असलेले वाद, यातून ते स्पष्ट होते.
नेमाडे
यांचे शत्रूही खूप आहेत. आपल्या फटकळ बोलण्याने ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत
नाहीत. सत्य बोलण्याची मोठी किंमत दर वेळीच मोजावी लागते. ती नेमाडे मोजत
आलेत. पण त्यामुळे एकंदर मराठी साहित्याचं भलंच झालेलं आहे. साहित्यातल्या
भोंदूगिरी, चापलूसगिरीला काही प्रमाणात तरी आळा बसला आहे. एकमेकांची तळी उचलणारे आणि नैतिक पातळीवर भ्रष्ट असलेले लोक समाजाचं, साहित्याचं पुढारपण करायला पुढे सरसावत असतात. त्यांना नेमाडे आपल्या एक-दोन फटका-यांनी ब-याचदा गारद करतात. ‘नेमाडपंथी दहशतवाद’ या शब्दाची निर्मिती त्यातूनच झाली आहे.
‘कोसला’नं तीन पिढय़ांवर आपला प्रभाव काही प्रमाणात का होईना कायम ठेवला आहे. आज पन्नाशी-साठीत असलेले लोक एकेकाळी ‘कोसला’नं खूप भारावून गेले होते. त्यांच्या तारुण्यात त्यांनी ही कादंबरी वाचली, तेव्हा त्यांच्यावर तिचा जो प्रभाव पडला, तो आजही काही प्रमाणात कायम आहे. ‘कोसला’, तिचा काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती याचा ‘कोसला’तलाच आलेख प्रमाण मानल्यामुळे या लोकांचं आकलन कसं राहिलं आणि आजही जे तरुण ‘कोसला’नं प्रभावित आहेत, त्यांचंही आकलन कसं आहे, याचा कुणीतरी सविस्तर अभ्यास करायला हवा. स्वातंत्र्यानंतर शिक्षणासाठी शहरात आलेल्या पहिल्या पिढीच्या मनोवस्थेचं चित्रण ‘कोसला’मध्ये आहे. त्यामुळे ती महाविद्यालयीन काळात प्रत्येक विद्यार्थ्यांला आवडते.
'कोसला'ची चवथी आवृत्ती. यात 'कोसला'चा लेखनकाळ २४ ऑगस्ट ते १० सप्टेंबर १९३८ असा दिला आहे. |
अपूर्व, द्रष्टी कादंबरी
जानेवारी 2000 मध्ये मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीनं ‘गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी’ या विषयावर एक चर्चासत्र घेण्यात आलं. त्यात गेल्या अर्धशतकातील सर्वश्रेष्ठ मराठी कादंबरी म्हणून ‘कोसला’चा आणि कादंबरीकार म्हणून नेमाडे यांचा गौरव काही समीक्षकांनी केला होता.
‘कोसला’विषयी पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते अशोक केळकर यांच्यापर्यंत अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा ‘कोसलाबद्दल’ हा समीक्षालेखांचा संग्रहही प्रकाशित झाला आहे. आकाशवाणी मुंबईनं भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं ‘1947 ते 1997-सर्वोत्कृष्ट 10’ पुस्तकं अशी स्पर्धा घेतली होती. त्यात महाराष्ट्रभरातल्या वाचकांनी आपली पसंती कळवली. त्यात वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ला पहिला तर ‘कोसला’ला दुसरा क्रमांक मिळाला.
ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव या कादंबरीबद्दल म्हणतात, ‘‘कोसला ही अपूर्व कादंबरी, द्रष्टी कादंबरी म्हणता येईल काय? वास्तवाकडे ती वेगळ्या नजरेने पाहते, सखोलपणे पाहते, मनुष्य जीवनाच्या अस्तित्वाच्या मूलभूत प्रवृत्तीच्या व आकांक्षांच्या परिप्रेक्ष्यात पाहते; मार्मिकपणे, स्वतंत्रपणे व काही एक नैतिक मूल्यभानाने पाहते व या प्रकारचे तिचे पाहणे एक प्रकारचे द्रष्टेपण ठरते, असे म्हणता येईल. सुजाण वाचक व समाज या दोहोंना अवतीभवतीच्या वास्तवाचे आकलन करण्याची डोळस दृष्टी ही कादंबरी देते, हेही खरे आहे.’’ पण कोसला पूर्णत्वाने द्रष्टेपण देत नाही, असाही निर्वाळा रा. ग. जाधव देतात.थोडक्यात ‘कोसला’ आणि नेमाडे यांचा सत्तरीतल्या कादंबरी आणि कादंबरीकारांवर मोठा प्रभाव आहे.
पण साहित्याचे प्राध्यापक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि काही पत्रकार यांच्यापलीकडच्या समाजावर ‘कोसला’चा काही प्रभाव पडला आहे का? जे लोक गंभीर वाचनाचे भोक्ते आहेत, त्यांच्या ‘कोसला’विषयीच्या काय प्रतिक्रिया आहेत? ‘कोसला’ ज्या पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये घडते, तेथील सध्याच्या किती विद्यार्थ्यांनी ती वाचली आहे? याचा आता तरी कुणा जाणकारानं अभ्यास करायला हवा.
‘हिंदू’ संकल्पनेची पुनर्मांडणी
गेली पंचवीस-तीस वर्ष येणार येणार म्हणून चर्चेत असलेल्या नेमाडे यांच्या ‘हिंदू’ या कादंबरी चतुष्टयाचा पहिला भाग गेल्या वर्षी प्रकाशित झाला. ‘हिंदू’चे अजून तीन भाग प्रकाशित व्हायचे आहेत, त्यामुळे त्याविषयी आताच काही ठोस विधान करणे बरोबर नाही. पण ‘हिंदू’ या संकल्पनेची पुनर्माडणी करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे यासंदर्भात नेमाडे यांनीच ‘हिंदू’च्या प्रकाशनाआधी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.
‘हिंदू’ प्रकाशित झाल्यापासून त्यावर बोलण्याची, लिहिण्याची
अहमहमिकाच महाराष्ट्रात सुरू झाली आहे. गेल्या दीडेक वर्षात हिंदूवर
लिहिल्या गेलेल्या लेखांचे पाच-सहाशे पानांचे स्वतंत्र पुस्तकच होऊ शकेल.
याशिवाय औरंगाबाद आणि नांदेड इथं ‘हिंदू’वर चर्चासत्रं झाली. या निमित्ताने एक गोष्ट सिद्ध झाली की, ‘हिंदू’कडे आपली वैयक्तिक मतं, राग-लोभ, पूर्वग्रह, संस्कार यापलीकडे जाऊन पाहू शकतील असा आवाका मराठी समीक्षकांकडे नाही. त्यामुळे ‘हिंदू’ची यथायोग्य समीक्षा अजून तरी होऊ शकलेली नाही.
‘हिंदू’ची समीक्षा करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं ‘खंडेराव, अडगळ आवरत जा राव!’ हा सुहास पळशीकर यांचा, ‘हिंदू : एक महाकथन’ हा विनय हर्डीकर यांचा आणि ‘हिंदू कशी वाचावी?’ हा डॉ. सदानंद मोरे यांचा लेख, असे तीनच लेख करतात. पळशीकर-हर्डीकर यांनी राजकीय-सामाजिक दृष्टिकोनातून ‘हिंदू’कडे पाहिले आहे, तर मोरे यांनी ‘‘हिंदू धर्म नावाच्या चमत्कारिक चीजेला इतक्या विविध अंगांनी भिडणारी, अभ्यासाचा पाया आणि वास्तवाची चौकट न सोडता सिद्ध झालेली ही कलाकृती सध्या तरी एकमेवाद्वितीयच म्हणावी लागेल’’, असे लिहून ‘हिंदू’चा परिप्रेक्ष्य नेमका काय आहे, याची दिशा सांगितली आहे. मोरे सांगतात त्या पार्श्वभूमीवर ‘हिंदू’ समजून घ्यायची तर मराठी समीक्षकांना खूपच अभ्यास करावा लागेल. तशी तयारी आणि क्षमता निदान सध्यातरी कुणा मराठी समीक्षकामध्ये आहे, असे दिसत नाही. त्यामुळे ‘हिंदू’ची सम्यक आणि समग्र समीक्षा व्हायला पुढची 25-30 वर्षे लागणार.
तोवर ‘कोसला’ टिकून राहिल का? आणि राहिली तर ते नेमाडे यांना स्वत:ला तरी आवडेल का हाही प्रश्न आहे. पण नेमाडे यांनी ‘हिंदू’चे उर्वरित भाग लवकरात लवकर लिहून प्रकाशित करावेत, असे नक्की वाटते.
कुचकामी आणि निरुपयोगी परिभाषा
कादंबरीलेखनाबरोबरच नेमाडे यांनी समीक्षालेखनात जे योगदान दिलेलं आहे, त्याचीही
सम्यक चर्चा होण्याची गरज आहे. विद्यापीठीय पातळीवरील मराठी समीक्षा ही
कुचकामी आणि निरुपयोगी परिभाषेत अडकून पडल्याने ती कधीचीच कालबाह्य झाली
आहे. या प्राध्यापकी भाषेनेच मराठी भाषेच्या प्रवाहीपणाचं ब-याच प्रमाणात
वाजीकरण करण्याचं काम केलं आहे. शिवाय या मराठी प्राध्यापकांचं
राजकीय-सामाजिक-आर्थिक विषयांबाबतचं आकलन अतिसुमार असतं. सर्जनशील साहित्य
कसं जन्माला येतं? ते समाजातल्या नैतिकतेच्या गोष्टी उचलूनच जन्माला येतं की नवी नैतिकता जन्माला घालतं, याचं उत्तर दिल्याशिवाय सर्जनशील साहित्याचा नेमका काय उपयोग असतो याचा न्यायनिवाडा कसा करता येईल?
‘बहुधा पंचविशीत जे पुस्तक लिहिलेलं असतं, ते
लेखकाच्या बरोबर नेहमी जात असतं. कारण त्या लेखकासोबत लोक वाचत असतात आणि
तेही लेखकाबरोबर मोठे होत होत पन्नाशीपर्यंत तरी ते पुस्तक तरंगत वर राहतं.
नंतर पंचविशीतली नवी पिढी येते आणि ही मागची पिढी आपोआप बाद होत जाते,’ असं स्वत: नेमाडे यांनीच एका भाषणात म्हटलं आहे. ‘कोसला’च्या बाबत तसं झालं का? नसेल तर का झालं नाही?
या
प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नसण्याचं एक कारण म्हणजे नेमाडे यांच्या
लेखनाबद्दल असलेले गैरसमज वा त्याविषयी भक्तिभावानं केलं जाणारं लेखन हे तर
नाही ना, याचाही विचार झाला पाहिजे.
कारण साहित्यिकांपासून पत्रकारांपर्यंत नेमाड्यांची ‘कावीळ’ झालेले
लोक खूप आहेत. पण त्यांची विश्वासार्हता कवडीमोलाची असल्याने त्यांना
कुणीही गंभीरपणे घेत नाही. पण हे लोक तरीही नेमाडेंचा द्वेष करत असतात. अशा
लोकांना पुरून उरत नेमाडे यांनी ‘कोसला’कार ते ‘हिंदू’कार
असा प्रवास केला आहे. शिवाय कादंबरीसारख्या सशक्त वाङ्मयप्रकाराची त्यांनी
उत्तम समीक्षा केली आहे. चांगला लेखक आपल्यानंतर चार-दोन चांगले लेखक
घडावेत यासाठी प्रयत्नशील असतोच. नेमाडे यांच्या कादंब-यांनी तशी सोय करून
ठेवली आहे, एवढं नक्की!
No comments:
Post a Comment