Friday, October 14, 2011

इतिहास माणसाला शहाणा करतो


रामचंद्र गुहा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत आहेत. ते इतिहास, क्रिकेट आणि पर्यावरण या विषयांचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. `इंडिया आफ्टर गांधी' हे गुहांचं इंग्रजी पुस्तक 2007 साली प्रकाशित झालं, तेव्हा त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. `द इकॉनॉमिस्ट', `वॉल स्ट्रिट जर्नल', `वॉशिंग्टन पोस्ट', `सॅनफ्रॅन्सिको क्रॉनिकल', `टाइम आउट',`आऊटलुक' या नियतकालिकांनी या पुस्तकाची `बुक ऑफ ऑफ द इअर' म्हणून निवड केली होती. तर लंडनच्या `टाइम्स लिटररी सप्लिमेंट'नं `An insightful, spirited and elegantly crafted account of India since 1947' असा त्याचा गौरव केला होता.
       गुहांच्या या बहुचर्चित पुस्तकाचा मराठी अनुवाद  शारदा साठे यांनी `गांधींनंतरचा भारत' या नावानं केला आहे. (त्या सध्या `मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया' या गुहांच्या दुसऱया पुस्तकाचाही अनुवाद करत आहेत.) `जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही राष्ट्राचा इतिहास' असं गुहांनी या पुस्तकाला उपशीर्षक दिलं आहे. या पुस्तकाचे एकंदर पाच विभाग असून त्यात 30 प्रकरणांचा समावेश आहे. `तुकडेजोडणी', `नेहरूंचा भारत', `केंद्र सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न', `लोकप्रियतावादाचा उदय' आणि `ऐतिहासिक घटनांचा मागोवा' अशी या पाच विभागांची नावं आहेत तर उपसंहाराचं नाव आहे `एक अस्वाभिक राष्ट्र' आणि उपोद्घाताचं `भारत टिकून का आहे?'.
        भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीपासूनच `हिंदुस्थान वा भारत नावाचा देश आजही अस्तित्वात नाही आणि यापूर्वीही कधी नव्हता' अशा प्रकारचा जोरदार मतप्रवाह आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक विद्वानांमध्ये होता. त्यात सर जॉन स्ट्रची, रुडयार्ड किपलिंग, विन्स्टन चर्चिल यांचा समावेश होता. भारत स्वतंत्र झाल्यावर ही चर्चा `भारत फार काळ टिकू शकणार नाही' या विषयाकडे वळली. तेव्हाही भारताबद्दल भाकितं करणाऱयांमध्ये अनेक मान्यवर होते.
`उपसंहारा'मध्ये गुहांनी लिहिलं आहे की, ``सामाजिक संघर्षाची प्रयोगशाळा म्हणून एखाद्या इतिहासकाराच्या दृष्टीकोनातून विसाव्या शतकातील भारत हा एकोणिसाव्या शतकातील युरोपइतकाच रोमहर्षक आहे.'' पुस्तकलेखनमागची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणतात, ``निश्चित दृष्टिकोनापेक्षा माझ्यामधील कुतूहलाची भावना अधिक बळकट आहे. न्यायनिवाडात्मक निष्कर्ष काढण्यापेक्षा मला समजून घेण्यात अधिक रस आहे...पण या कथाकथनाची मी जी पद्धत अवलंबिली आहे ती निश्चित करण्यामागे दोन मूलभूत मनसुबे होते. एक म्हणजे भारताच्या सामाजिक आणि राजकीय वैविध्याचा आदर राखणे आणि दुसरे म्हणजे आतापर्यंत सर्व भारतीय व परदेशी अभ्यासक व नागरिकांना सदैव जे कोडे पडत आले आहे त्याचा उलगडा करणे. हे कोडे कोणते, तर भारत खरोखरच का अस्तित्वात आहे?''
         `तुकडेजोडणी' या पहिल्या विभागात भारत स्वतंत्र कसा झाला, पाकिस्तानची फाळणी, देशभर उसळलेल्या दंगली थांबवण्यासाठीचे म. गांधींचे प्रयत्न, त्यांची हत्त्या, संस्थानांचं विलिनीकरण, जम्मू आणि काश्मीरचं विलिनीकरण आणि राज्यघटना कशी साकारली याचा सविस्तर आढावा घेतला आहे. पहिल्या विभागातील शेवटच्या प्रकरणाचं नाव आहे, `संकल्पनांचा गोफ.' या प्रकरणात भारतीय राज्यघटना नेमकी कशी साकारली, तिचा मसुदा तयार होत असताना घटना समितीमध्ये कशा प्रकारे मतमतांतरं झाली, त्या चर्चेतून कोणत्या शिफारशी, सूचना स्वीकारल्या वा नाकारल्या गेल्या याचं अतिशय उत्तम विवेचन केलं आहे. एकूण 395 कलमं आणि 8 परिशिष्टय़ं असलेली भारतीय राज्यघटना ही जगातील बहुधा सर्वांत मोठी राज्यघटना असावी, असं गुहांनी या प्रकारणाच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे. ही घटना तयार व्हायलाही असाच प्रदीर्घ काळ लागला, तो गुहांनी अंदाजे तीन वर्षे दिला आहे. पण अगदी नेमकेपणानं सांगायचं तर 2 वर्षे, 11 महिने आणि 17 दिवस इतका तो काळ होता. घटना समितीतील शेवटचं भाषण करताना डॉ. आंबेडकरांनी भारतीय जनतेची निषेध करण्याची पद्धत, करिष्म्याच्या व्यक्तिमत्त्वापुढे अविचारीपणे झुकण्याची वृत्ती आणि फक्त `राजकीय लोकशाही'वरच आत्मसुंतुष्ट असण्याची वृत्ती याबाबत जे इशारे दिले आहेत, त्यांना मात्र आपण अजूनही पुरेशी वेसून घालू शकलेलो नाही असं वाटतं. 
       दुसऱया विभागाचं शीर्षकच `नेहरूंचा भारत' असं आहे. ते पुरेसं बोलकं आणि नेमकंही आहे. या विभागात 1949 ते 54 या सर्वांत धामधुमीच्या, ताणतणावाच्या आणि संघर्षाच्या काळाचा आलेख मांडला आहे. भाषावार प्रांतरचना, पहिली सार्वत्रिक निवडणूक, जगानं आश्चर्यानं तोंडात बोटं घालावीत अशी तिची आखणी करणारे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन, हिंदू कोड बिल, काश्मीर प्रश्न, नागा जमातींचा लढा अशा अनेक संकटातून नेहरू-पटेल यांनी अतिशय सामंजस्यानं आणि चातुर्यानं मार्ग काढला.
         `केंद्र सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न' हा तिसरा विभाग आहे. यात एकंदर चार प्रकरणं आहेत. ती अशी- दक्षिणेकडील राज्यांचं आव्हान, पराभवाचा अनुभव, वर्तमान कालखंडातील शांतता आणि अल्पसंख्याकांची काळजी. दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रामुख्यानं आहे, तो केरळचा प्रश्न. ई.एम.एस नंबुद्रीपाद यांनी नेहरूंपुढे मोठं आव्हान उभं केलं होतं. चीननं तिबेटवर कबजा मिळवल्यानं दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतला, त्यांच्यावतीनं भारतानं शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला, 1962मध्ये चीननं भारतावर आक्रमण करून भारताचा पराभव केला. या पराभवाचं खापर बरेच लोक नेहरूंच्या माथी फोडतात. पण सत्य परिस्थिती अशी होती की, भारतीय सैन्याची युद्धासाठी पुरेशी तयारी झालेली नव्हती, शिवाय चीनच्या तुलनेत भारतीय सैन्याकडे शस्त्रसामग्री फारच सामान्य होती, परराष्ट्र मंत्रीपदी अटेलतट्टू व्ही. के. कृष्ण मेनन असल्यानं इंग्लंड-अमेरिकेकडून शस्त्रास्त्र मागवून, ती भारतीय सैन्याला सरावाची होईपर्यंत मुत्सद्दीपणानं चीनशी बोलणी करणं हाच एकमेव उपाय होता. नेहरूंनी तेच केलं. या युद्धाच्या वेळी पं. नेहरू यांनी चीनच्या पंतप्रधानाबरोबर जो पत्रव्यवहार केला त्यातून त्यांच्या या मुत्सद्दीपणाची आणि दूरदृष्टीची प्रचिती येते. गुहांनी त्याबाबत कोणतंही भाष्य करण्याचं टाळलं आहे, पण त्यांनी दिलेले पुरावेच इतके सज्जड आहेत, की त्यावर वेगळं काही भाष्य करण्याची गरजही राहत नाही.
         सुरुवातीच्या या तीन विभागांमध्ये साधारपणे 1963 पर्यंतच्या काळातली स्वतंत्र भारताची वाटचाल अतिशय सविस्तर रेखाटली आहे. 450 पृष्ठे यासाठी गुहांनी दिलेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात लहान-मोठी जवळपास 500 संस्थानं होती. ती सरदार पटेल आणि त्यांचे सहाय्यक व्ही. पी. मेनन यांनी किती चातुर्यानं, सामंजस्यानं आणि प्रसंगी दटावणीनं भारतात सामील करून घेतलं याची कहाणी मोठी रोचक आणि मजेशीर आहे. ती लँडमार्क म्हणावी अशीच कामगिरी आहे.
        `लोकप्रियतावादाचा उदय' हा चौथा विभाग आहे. यातल्या पहिल्याच प्रकरणाची सुरुवात होते ती पं. नेहरूंच्या निधनानं. ती तारीख होती 27 मे 1964. स्वतंत्र भारताची एक लोकशाही, निधर्मी आणि सार्वभौम प्रजासत्ताक देश म्हणून पायाभरणी करणाऱया नेहरूंचं निधन हा तमाम भारतीयांना मोठाच धक्का होता. नेहरूंच्या निधनानंतर मात्र एका परीनं काँग्रेसच्या विघटनालाही सुरुवात होते, असं म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही. कारण काँग्रेसचे अध्यक्षच आपली पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा जाहीर करतात. तर तामीळनाडूचे कामराज पंतप्रधान होण्यासाठी पुढच्या चार दिवसांत 12 मुख्यमंत्री आणि 200 खासदारांना भेटतात. पण त्यांचं स्वप्न फलद्रूप होत नाही. मूर्ती लहान पण कीर्ती महान असणाऱया लाल बहादूर शास्त्राeंची पंतप्रधानपदी वर्णी लागते. `नेहरूंचा योग्य वारसदार' अशी त्यांची नंतर तारीफ होते. पण शास्त्राeंची अल्प कारकीर्दही धामधूम आणि संघर्षाचीच ठरते. काही दिवसांनी पाकबरोबर दुसरं युद्ध होतं. ताश्कंदमध्ये शास्त्राeंचं आकस्मिक निधन होतं.
         शास्त्राeनंतर `इंदिरा गांधी पर्वा'ला सुरुवात होते. इंदिरा गांधी यांचं धडाडीचं नेतृत्व काही ठाम निर्णय घेतं, पण जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामुळे त्या देशावर आणीबाणी लादतात. गुहा यांनी आणीबाणीला फार महत्त्व दिलेलं नाही. पण तरीही आणीबाणीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मोठी गळचेपी झाली, वगैरे वगैरे गैरसमज दूर करण्याचं काम या प्रकरणातून होतं. कुठलाही पूर्वग्रह न बाळगता आणि केवळ इतिहासकाराच्या दृष्टीकोनातूनच गुहा यांनी आणीबाणीविषयी लेखन केलं आहे. पण ते मात्र सज्जड पुराव्यांच्या आधारे. त्यामुळे त्यांच्या प्रतिपादनातून असा निष्कर्ष निघतो की, आणीबाणीला इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण दोघंही सारख्याच प्रमाणात जबाबदार आहेत. इंदिरा गांधी यांना खलनायक ठरवणाऱया आणि जयप्रकाशांना हिरो ठरवणाऱया बऱयाच महाराष्ट्र जनांच्या गळी हे कटूसत्य उतरणं अशक्य आहे.
       भारताच्या इतिहासातातलं सर्वात कळीचं वर्षे ठरलं ते 1984. या एका वर्षात भारतात काय काय घडलं? ऑपरेशन ब्ल्यू स्टार, इंदिरा गांधींची हत्त्या, हिंदू-शीख हिंसाचार,  राजीव गांधींचा राजकारणात प्रवेश, शहाबानो प्रकरण, भोपाळ दुर्घटना, महंमद अझरुद्दीनचा भारतीय क्रिकेट संघात प्रवेश, हॅलेचा धूमकेतू, राकेश शर्माला पहिल्या भारतीय अवकाशयात्रीचा मान, बचेंद्री पालची एव्हरेस्ट चढाई, कोलकात्यात पहिली भारतीय रेल्वे मेट्रो रेल्वे सेवा इत्यादी. 1984 या सालाविषयी गुहा यांनी 2010साली `आउटलुक'मध्ये `द ऍक्सिस इयर' (आसाचं वर्ष) या नावानं सविस्तर लेख लिहिला होता. प्रस्तुत पुस्तकामध्ये मात्र त्यांनी या वर्षाचं वर्णन `टर्ब्युलण्ट इयर' (प्रक्षुब्ध वर्ष, साठे यांनी त्यासाठी `खळबळजनक' असा शब्द वापरला आहे.) असं केलं आहे.
         `या पुत्राचाही उदय' या शेवटच्या प्रकरणाच्या सुरुवातीला गुहांनी समाजशास्त्रज्ञ आशीष नंदी यांचं एक अवतरण दिलं आहे, तेच पुरेसं बोलकं आहे. ते असं, ``भारतात सावळागोंधळ किंवा स्थैर्य हे पर्याय कधीच असू शकत नाही. आवरता येईल असा गोंधळ किंवा आवरता येणे शक्य नाही असा गोंधळ हेच पर्याय असू शकतात. मानवतावादी अराजक की अमानुष अराजक; सहनीय भोंगळपणा की असह्य भोंगळपणा हेच पर्याय आहेत.''
        पाचवा आणि शेवटचा विभाग आहे, `ऐतिहासिक घटनांचा मागोवा' हा. तो निरोपाचा आणि सर्वसमावेशक आढावा घेणारा आहे. `हक्क', `दंगली', `राज्यकर्ते', `समृद्धी' आणि `लोकांचे मनोरंजन' अशी यातल्या प्रकरणांची शीर्षकं आहेत. भारतातील जाती-जमाती, मंडल आयोग, कांशीराम आणि बसपचा उदय, जातीय संघर्ष, नक्षलवाद, काश्मीर खोऱयातील असंतोष, पंजाबमधील स्थिरता, बाबरी मशिदचा पाडाव, रास्वसंघ-भाजपाचं राजकारण, काश्मीरतील दहशतवादी, हिंदू पंडितांच्या हत्त्या आणि विस्थापन, 2002ची गोध्रा दंगल यांचा पहिल्या दोन प्रकरणांतून आढावा घेतला आहे. तर तिसऱया `राज्यकर्ते' या प्रकरणात लोकसभेच्या निवडणुका, राजकीय पक्ष-केंद्रीय आणि प्रादेशिक, 90च्या दशकातील भारतीय राजकारणातील गुंतागुंत, अणुबॉम्ब निर्मिती, कारगिल युद्ध, मुशर्रफ आग्रा भेट, वाजपेयींची पंतप्रधानपदाची कारकीर्द, राजकीय भ्रष्टाचार यांचा मागोवा घेत शेवटी गुहा लिहितात, ``साठ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर भारत हा आजही एक लोकशाही देश आहे. पण गेल्या दोन दशकातील घटनांनी त्याला आणखी एक विशेषण लाभलं आहे. आता ती काही फक्त संविधानात्मक लोकशाही राहिलेली नाही तर लोकप्रियतात्मक लोकशाही झाली आहे.''
          `समृद्धी' या प्रकरणात नावाप्रमाणेच भारताचा समृद्धीचा आढावा घेतला आहे. 1950चं दशक हे मुक्त बाजारपेठेच्या पुरस्कर्त्यांसाठी पूर्णपणे निरुपयोगी होतं. 1980 साली इंदिरा गांधी सत्तेत असताना जे. आर. डी. टाटा यांनी यांनी `टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ``अर्थव्यवस्था खुली करा आणि कसा फरक पडतो ते पाहा. अलीकडच्या काळात दक्षिण कोरिया, स्पेन, सिंगापूर आणि तैवान यांच्या अर्थव्यवस्था भरभराटीला आल्या आहेत. कारण या नव-औद्योगिक राष्ट्रांनी खाजगी उद्योगांना चालना दिली आहे. त्यावर ते आता निर्भर आहेत. आणि त्यांची शासकीय धोरणे खाजगी उद्योगांना प्रोत्साहन व पाठबळ देत आहेत.'' असं म्हटलं. टाटांचा प्रभाव म्हणा की आणखी काही पण त्यानंतर सरकारनं खाजगी उद्योगांबद्दलचा आपला आकस कमी केला. या दशकभरात जागतिक आणि भारतीय परिस्थिती इतकी वेगानं बदलत गेली की, 1991 सालच्या जुलै महिन्यात पी. व्ही. नरसिंहराव यांना नव्या आर्थिक धोरणांना सुरुवात करावी लागली.
       जागतिकीकरणाच्या निमित्तानं गुहा यांनी या प्रकरणात भारताच्या एकंदर आर्थिक प्रश्नांची चर्चा केली आहे. प्रकरणाच्या शेवटी गुहा लिहितात, ``भारत एक देश म्हणून टिकणार नाही ही कल्पना मात्र फारच अतिशयोक्तीपूर्ण आहे. कारण भारताची राज्यघटना बनविणाऱया आपल्या पूर्वसूरींनी त्यात सांस्कृतिक बहुविधता या एकाच राष्ट्रामध्ये फळेल व फुलेल अशी व्यवस्था केलेली आहे. त्याच वेळी हेही लक्षात ठेवले पाहिजे की भरात नजीकच्या काळात महासत्ता बनेल ही कल्पनाही अपरिपक्व आहे.''
         ही सांस्कृतिक बहुविधता काय आहे आणि तिचे घटक कोणकोणते आहेत याचा ऊहापोह `लोकांचे मनोरंजन' या शेवटच्या प्रकरणात आहे. जात, वर्ण, वर्ग, प्रदेश, भाषा, धर्म आणि लिंग या सर्व प्रकारच्या भेदांना ओलांडून जाण्याचं काम करतात ते हिंदी चित्रपट. त्यांचा गुहांनी सविस्तर मागोवा घेतला आहे. त्यानंतर आहे, नाटक, लोककला, हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीत. त्यानंतर येतात बिलियर्डस, हॉकी, फूटबॉल आणि क्रिकेट हे खेळ. शेवटी आकाशवाणी आणि दूरदर्शन. या सर्व गोष्टींनी भारताची बहुविध सांस्कृतिकता जपण्याचं, जोपासण्याचं आणि वाढवण्याचं काम केलं आहे. आणि सामाजिक उत्तरदायीत्वाचीही महत्त्वपूर्ण भूमिकाही निभावली आहे. गुहा लिहितात, ``...आता सार्वजनिक व्यक्ती फक्त स्वार्थासाठी काम करताना दिसतात. पण कलाकार, गीतकार, अभिनेते स्त्राe-पुरुष मात्र अजूनही सातत्याने वाढणाऱया श्रोतृवर्गाच्या आनंदासाठी काम करत असतात. ''
         या सर्वांच्या जोडीला गुहांनी पं. नेहरू, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, नागा चळवळीचे नेते अंगामी फिझो, केरळचे इ. एम. एस. नंबुद्रिपाद, काश्मीरचे शेख अब्दुल्ला यांची सविस्तर म्हणावी इतकी मोठी चरित्रंही लिहिली आहेत. भारताच्या पूर्वेकडच्या भागाविषयी एरवीही आपल्याला फारशी माहिती नसते. त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळाविषयी गुहांनी बरंच लिहिलं असल्यानं ती सर्वस्वी नवी माहिती आहे.
        गुहांनी अनेक अर्काइव्हज-विशेषत: नेहरू मेमोरिअल म्युझियम, अनेकांच्या आठवणी, पुस्तकं, चरित्रं आणि काही नामांकितांच्या खाजगी संदर्भांचाही लेखनासाठी वापर केला आहे. आणीबाणीविषयी लिहिण्यासाठी गुहांनी इंदिरा गांधी यांचे स्वाय्य सहाय्यक पी. एन. हक्सर यांच्या 1969-72 या काळातल्या संग्रहाचा वापर केला आहे.
        `भारत टिकून का आहे?' हे उपसंहाराचं शीर्षक आहे. प्रसिद्ध कादंबरीकार आर. के. नारायण यांनी व्ही. एस. नायपॉल यांनी 1961 साली लंडन मुक्कामी ऐकवलेल्या एका वाक्याची इथं आठवण होते. `Indian will go on'  असं त्या वेळी नारायण म्हणाले होते. भारताच्या टिकून राहण्याची कारणमीमांसा गुहांनी सार्वत्रिक निवडणुकांपासून केली आहे. ते लिहितात, ``भारतीय लोकशाहीचे मृत्युलेख तर अनेक वेळा लिहिले गेले आहेत. पुन्हा पुन्हा असे आवर्जून सांगितले गेले आहे की, हा गरीब, फाळणी झालेला, प्रचंड वेगळेपण असलेला देश खऱया अर्थाने मुक्त आणि न्याय्य निवडणुका फार काळ घेऊच शकणार नाही.'' पण पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून या देशात खरोखरच खऱया अर्थानं मुक्त आणि न्याय्य निवडणुका पार पडत आल्या आहेत. अगदी काश्मीरच्या खोऱयात आणि नक्षलवादी भागातही हिंसाचाराला, धाकदपटशाला न जुमानता लोक मतदानासाठी मोठय़ा प्रमाणावर रांगा लावतात हे सत्य साऱया जगाला माहीत आहे. अनेक परदेशी निरीक्षकांनीही मतदान स्थळी हजर राहून त्याच्या न्याय्यतेचा निर्वाळा दिलेला आहे. भारतासारख्या अजब देशात सार्वत्रिक निवडणुका इतक्या निर्धेक वातावरणात पार पडू शकतात, हाताच्या बोटावर मोजता येतील इतपतच गैरप्रकार घडतात ही एकच गोष्ट या देशाच्या एकसंधपणाची ग्वाही देण्यासाठी पुरेशी ठरावी.
    उठसूठ भारताची तुलना पाश्चात्य देशांशी-विशेषत: अमेरिका-लंडनशी करणाऱया चिंतातूर जंतूनाही गुहांनी फटकारलं आहे. ते दाखवून देतात की, पाश्चात्य जगातील राष्ट्रांना एकत्र बांधण्यासाठी एक भाषा, एक धर्म, एक भूभाग, एक शत्रू या पैकी एखादा वा हे सगळेच घटक कारणीभूत ठरलेले आहेत. भारत या सर्वच गोष्टींना सणसणीत आणि दणदणीत अपवाद आहे. भारतात हिंदू बहुसंख्य असले तरी भारत हिंदू राष्ट्र नाही. भारत धर्मनिरपेक्ष आहे, आणि सार्वभौम प्रजासत्ताक तर आहेच आहे. सध्याचे पंतप्रधान, लोकसभेच्या सभापती, उपराष्ट्रपती आणि काँग्रेसच्या अध्यक्षा यांच्याकडे पाहिले तरी ते पटेल. आणि हे प्रातिनिधित्व फक्त राजकारणातच दिसतं असं नाही, तर ते हिंदी चित्रपटांपासून खेळांपर्यंत आणि उद्योगांपासून ते शिक्षणव्यवस्थेपर्यंत सर्वत्रच पाहायला मिळतं.
   विविध धर्म, विविध भाषा हे भारतीय संघराज्याचे मैलाचे दगड आहेत. त्यामुळे राष्ट्रवादाचे पाश्चात्य सिद्धांत भारताला लागू होत नाहीत. भारतासारख्या इतकं वैविध्य असलेल्या देशात सलग साठ वर्षं लोकशाही टिकून राहणं हा जगापुढे भारतानं निर्माण केलेला नवा आदर्श आहे, हे समजून घेण्याची गरज आहे.
पण भारत हा खरोखरच लोकशाही देश आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर गुहा `फिप्टी-फिप्टी' असं देतात. ते लिहितात, ``जेव्हा निवडणुका होतात किंवा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा व आचारस्वातंत्र्याचा प्रश्न असतो तेव्हा इथे लोकशाही आचरणच असते. पण जेव्हा राजकारण्यांचा व्यवहार आणि राजकीय संस्थांचा प्रश्न येतो तेव्हा तिथे लोकशाही अभावनेच असते. पण भारतात पन्नास टक्के लोकशाही आहे ही वस्तुस्थितीसुद्धा इतिहास, परंपरा आणि सनातनी शहाणपणाला चपराक मारणारी आहे. '' गुहा म्हणतात, भारतात 50 टक्के लोकशाही असली तरी 80 टक्के एकजूट आहे. ``आजच्या भारताचे भवितव्य परमेश्वराच्या हातात नसून सामान्य माणसाच्या हातात आहे. जोपर्यंत भारतीय संविधान अगदी ओळखू येणार नाही इतके बदलले जात नाही आणि निवडणुका नित्यनेमाने व योग्य पद्धतीने पार पडतात, धर्मनिरपेक्षतेचे वातावरण व्यापक पातळीवर टिकविले जाते, नागरिक आपल्या पसंतीच्या भाषेत बोलू व लिहू शकतात, जोपर्यंत सर्वसमावेशक बाजारपेठ अस्तित्वात आहे आणि बऱयापैकी नागरी प्रशासन व सैन्यसेवा उपलब्ध आहे, आणि हो, हेही मी विसरू इच्छित नाही की जोपर्यंत हिंदी चित्रपट सर्वत्र पाहिले जातात आणि त्यातली गाणी गायिली जातात तोपर्यंत भारताचे अस्तित्व टिकून राहील.'' असा गुहांनी या पुस्तकाचा शेवट केला आहे. त्यावर काहीही भाष्य करण्याची गरज नाही.
       गुहा यांचं इंग्रजी लेखन अतिशय ओघवतं आहे. त्यांना जे काही सांगायचं असतं ते नीट तपशिलानिशी आणि स्पष्टेपणे सांगण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे त्यांची भाषणं आणि लेखन खूपच प्रभावी ठरतात. त्याचाच प्रत्यय त्यांच्या `इंडिया आफ्टर गांधी'मध्येही येतो. शारदा साठे यांनी त्याचा तितकाच समर्थपणे अनुवाद केला आहे. साठे यांचे या आधीचे अमर्त्य सेन, मोहित सेन, पी. चिदंबरम यांच्या पुस्तकांचे अनुवादही बरेच गाजले. मराठीमध्ये गंभीर स्वरूपाची चर्चा करणाऱया पुस्तकांचे अनुवाद करण्याच्या फंदात फारसं कुणी पडत नाहीत. महिन्याला जे ढिगाने अनुवाद होत आहेत, त्यांच्या यादीवरून सहज नजर फिरवली तरी याचा प्रत्यय येतो.
         राजकीय-सामाजिक जाणीवा प्रगल्भ असल्याशिवाय प्रस्तुत पुस्तकाचा अनुवाद करता येणं शक्यच नव्हतं. साठे यांना हे आव्हान स्वीकारता आलं ते त्यांच्या प्रगल्भ आणि विचारी दृष्टीकोनामुळेच. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा पुस्तकाचा उत्तम अनुवाद केल्याबद्दल त्यांना धन्यवादच द्यायला हवेत. पण एवढय़ा मोठय़ा पुस्तकाचा अनुवाद करताना काही त्रुटी-चुका राहणं साहजिक असतं. तशा त्या या पुस्तकातही आहेत. पण त्या किरकोळ म्हणाव्या अशाच आहेत.
         त्याची एक-दोन उदाहरणं पाहू. राज्यघटनेविषयीच्या शेवटच्या परिच्छेदाचा अनुवाद साठे यांनी असा केला आहे- ग्रॅनविल ऑस्टिन म्हणतात,``1787मध्ये फिलाडेल्फियात जे एक धाडस सुरू झाले होते त्यानंतरचे `भारतीय संविधानाची निर्मिती' हे एक फार महान राजकीय धाडस आहे. त्यात राष्ट्रीय आदर्शाची रूपरेखा दिली आहे. आणि त्यांच्या कार्यवाहीसाठी संस्थात्मक रचनाही तयार केली आहे. जी जनता पूर्वी भौतिक सुखे प्राप्त करून घेण्यासाठी वाटेल त्या मार्गांचा अवलंब करत असे, त्यांच्या दृष्टीने हे पाऊल खरोखरच प्रचंड होते. आणि त्याचे संपूर्ण श्रेय भारतीयांनाच जाते.''
       मूळ इंग्रजी उतारा असा आहे-Granville Austin has claimed that the framing of the Indian Constitution was ‘perhaps the greatest political venture since that originated in Philadelphia in 1787’. The outlining of a set of national ideals, and of an institutional mechanism to work towards them, was ‘a giganstic step for a people previously committed largely to irrational means of achieving other-worldly goals’. For this, as the title of the last section of Austin’s book proclaims, ‘the credit goes to the Indians’. म्हणजे मूळ इंग्रजी अवतरणात ऑस्टिन यांचा खूपच कमी मजकूर आहे. एकेक ओळीची तीन अवतरणं आहेत. पण साठे यांनी संबंध परिच्छेदच ऑस्टिन यांच्या तोंडी घातला आहे. त्यामुळे गुहांनी शेवटच्या वाक्यात जे भाष्य केलं आहे, तेही अनुवादात चुकलं आहे.
 दुसरं उदाहरण. ``...आता ती काही फक्त संविधानात्मक लोकशाही राहिलेली नाही तर लोकप्रियतात्मक लोकशाही झाली आहे.'' हे पान 796 वरील शेवटचं विधान आहे. मूळ इंग्रजी विधान असं आहे, ``India is no longer a constitutional democracy but a populist one''. म्हणजे या वाक्याचा अनुवाद करताना थोडी गडबड झाली आहे. शिवाय `संविधानात्मक' या शब्दाशी यमक जुळवण्याच्या नादात `पॉप्युलिस्ट' या शब्दाचा अनुवाद `लोकप्रियतात्मक' असा सरकारी परिभाषेसारखा उगाचच संदिग्ध केला आहे. खरं तर तो `लोकानुनयी' असा करणं जास्त उचित झालं असतं असं वाटतं. अशा आणखी काही छोटय़ा गडबडी आहेत. मात्र या तशा सामान्य त्रुटी आहेत, पण या अनुवादाचं काटेकोरपणे संपादन झालं असतं, तर त्या टाळता आल्या असत्या, असं वाटतं.
        शारदा साठे यांनी मूळ इंग्रजी आवृत्तीतील ऋणनिर्देश, नोटस आणि संदर्भसूचीची 126 पानं वगळली आहेत. `जे इंग्रजीत वाचन करतात त्यांच्यासाठी ती मूळ ग्रंथात उपलब्ध आहे. ज्या मराठी वाचकांना ते संदर्भ पाहावयाचे असतील त्यांना मूळ पुस्तकापर्यंत जाणं अधिक सोयीचं ठरेल' असं त्यांनी त्याचं समर्थन केलं आहे. ते त्यांच्या दृष्टीनं सोयीचं असलं तरी वाचकांच्या दृष्टीनं मात्र गैरसोयीचं आहे. कारण ज्यांना मूळ इंग्रजी पुस्तक वाचता येऊ शकतं, ते मराठी अनुवाद कशाला वाचतील? शिवाय ज्या मराठी वाचकांना इंग्रजी येत नाही, पण त्यांना संदर्भ सूची पाहायची आहे, त्यांनी त्यासाठी आणखी 700-800 रुपये खर्च करावेत ही इच्छा व्यवहार्य नाही. मराठी अनुवादाची किंमत 800 रुपये असताना सूचीमुळे त्यात आणखी अशी किती वाढ झाली असती?
         त्यामुळे अशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण पुस्तकाला संदर्भसूची हवीच. ती अभ्यासकांसाठीच गरजेची असते असं नाही, जिज्ञासू आणि जाणकारांसाठीही गरजेची असते. अशी पुस्तकं वाचकांना इतर पुस्तकांकडे वळायला मदत करत असतात. उदा. संस्थानाच्या विलिनीकरणाची कहाणी वाचून व्ही. पी. मेनन यांचं `इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स' हे पुस्तक वाचण्याची उत्सूकता निर्माण होऊ शकते, किंवा राज्यघटनेविषयीचे प्रकरण वाचून ग्रॅनविल ऑस्टिन यांचं `द इंडियन कॉन्स्टिटय़ूशन-कॉर्नस्टोन ऑफ अ नेशन' हे पुस्तक वाचावंसं वाटू शकतं. कारण राज्यघटनेविषयीच्या प्रकरणात गुहा यांनी या पुस्तकाचा सर्वाधिक वेळा संदर्भ दिला आहे. पण अनुवादात सूचीच वगळली गेल्यानं ते सारे संदर्भ लक्षात येत नाहीत, आणि ठसतही नाहीत.
         शिवाय या निमित्तानं एक सुचवावंसं वाटतं की, इंग्रजीतील पुस्तकं ज्या आकारात प्रकाशित होतात, ते आकार-प्रकार मराठी प्रकाशकांनीही आत्मसात करायला हवेत. कारण डेमी आकारातली एवढी जाडजूड पुस्तकं सलग हातात धरणं शक्य नसतं आणि सोयीचंही. त्यामुळे हे पुस्तक वेगळ्या आकारात काढलं असतं तर ते अधिक सयुक्तिक झालं असतं.
       गेल्या साठ वर्षांत भारतात लोकशाही शासनप्रणाली टिकून राहिली, पण तिला काही अडचणींच्या डोंगरांचा कमी प्रमाणात सामना करावा लागला म्हणून नव्हे तर, तर अशा डोंगरामागून डोंगरांचा सामना करतच तिचा प्रवास चालू आहे. सुरुवातीची 10-15 वर्षे तर सर्वच बाजूंनी कस पाहणारी होती. सुदैवानं देशाच्या नेतृत्वाची धुरा पं. नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर अशा दिग्गजांच्या हाती असल्यानं भारत तगला. आणीबाणी, राज्य पातळीवरच्या आणि केंद्रीय पातळीवरच्या चळवळी, दंगली, हिंसाचार, राजकीय हिंसा-हत्या, जातीयवादी पक्ष-संघटना, हिंदुत्ववादी पक्ष-संघटना, नक्षलवाद, शेजारच्या देशांची आक्रमणं, विरप्पनसारखे बंडखोर अशा कितीतरी संकटांचा सामना करावा लागला, आजही करावा लागतो आहे. येत्या काळात `सिव्हिल सोसायटी' नामक भंपक लोकांचा उच्छाद ही नवी डोकेदुखी उभी राहण्याची चिन्हं अण्णा हजारेंच्या तथाकथित आंदोलनानं अधोरेखित केली आहेत.
        आता शेवटचा मुद्दा. या पुस्तकाचं नेमकं महत्त्व काय, कशासाठी वाचायचं हे पुस्तक? तर कुठल्याही घटनेचं, प्रश्नाचं सामग्य्ऱरानं आकलन करून घ्यायचं असेल तर राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या तिन्ही बाजूंचा विचार करावा लागतो. तरच ते आकलन निर्देषतेच्या जवळपास पोहोचू शकतं. गुहा यांनी या तिन्ही बाजूंचा पुरेसा विचार केला असल्यानं प्रस्तुत पुस्तक स्वातंत्र्योत्तर भारत समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.
       भारताविषयी आजवर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्म, जाती, वर्ग, संस्कृती, कला अशा अनेक  विषयांवर. सुनील खिलनानी यांनी त्यांच्या `आयडिया ऑफ इंडिया' या पुस्तकामध्ये भारताविषयीच्या अशा पुस्तकांची तब्बल 32 पानी सूची अवांतर वाचनासाठी दिली आहे. आणि तीही केवळ त्यांना आवडलेली वा चांगली वाटलेल्या पुस्तकांचीच यादी आहे.
पण गुहा यांच्या पुस्तकाची तुलना करावी अशी पुस्तकं मराठीत आणि इंग्रजीतही आजवर लिहिली गेली नाहीत आणि यापुढच्या काळात-निदान मराठीत तरी- लिहिली जाण्याची शक्यताही सध्याच्या वातावरणात दिसत नाही. मात्र इंग्रजीमध्येही एकच पुस्तक सापडतं. ते आहे बिपिन चंद्रा, मृदुला मुखर्जी आणि आदित्य मुखर्जी यांचं `इंडिया आफ्टर इंडिपेडन्स'. हे पुस्तक 1999 साली प्रकाशित झालं आहे, तर गुहांचं 2007 साली. पण गुहांचं पुस्तक अधिक चांगलं आहे. दुसरं चंद्रा-मुखर्जी यांचं पुस्तक फार ऍकेडेमिक आहे, त्यामुळे ते वाचताना कंटाळा येतो. गुहा यांचं पुस्तक मात्र फारच रंजक आहे. त्याला इन्फॉर्मल हिस्ट्री असं खरं तर म्हणायचा मोह होतो, पण ते फक्त शैलीच्या अंगानं.
        स्वतंत्र भारत नावाच्या लोकशाही देशाचा हा अगदी अलीकडच्या म्हणजे 1947 ते 2007 या साठ वर्षांचा इतिहास आहे. ही वाटचाल गुहांनी काहीशा स्थुलपणे मांडली आहे आणि तीही बव्हंशी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अंगानं. पण वस्तुनिष्ठ इतिहासलेखनाशी प्रामाणिक राहून मांडली आहे. गुहा उदारमतवादी (ते स्वत:ला `नेहरूवादी' म्हणवून घेतात. `नेहरूवादी माणूस' उदारमतवादी आणि सर्वसमावेशक विचार करणारा असतोच. पण गुहा यांच्या म्हणण्यानुसार ते सध्याच्या घडीला भारतातील सर्वात कमी वयाचे नेहरूवादी आहेत. त्यांचं वय सध्या 53 आहे.) असल्यानं त्यांच्या लेखनात कुठलाही पूर्वग्रह नाही. ही या पुस्तकाची सर्वात मोठी आणि जमेची बाजू आहे. किंबहुना त्यामुळेच हे पुस्तक आपले अनेक गैरसमज दूर करण्यास मदत करतं. इतिहास माणसाला शहाणा करतो असं बेकनचं एक वचन आहे. आपला गेल्या साठ वर्षांचा इतिहास आपल्याला बऱयाच प्रमाणात शहाणा करू शकतो आणि पुढची दिशाही दाखवू शकतो. मुद्दा आहे तो, आपल्याला शहाणं व्हायचं की नाही? महाराष्ट्रातल्या लेखक, अभ्यासक, इतिहासकार, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक आणि जाणकार वाचकांना या पुस्तकापासून शिकण्यासारखं खूप काही आहे.

गांधींनंतरचा भारत : रामचंद्र गुहा, अनुवाद- शारदा साठे
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे
पाने : 888+35, किंमत : 800 रुपये

Tuesday, October 11, 2011

‘एवम्’ रंगकर्मी

   
(बादल सरकार यांच्या निधनानंतर प्रहार मध्ये लिहिलेले टिपण, १६ मे २०११)
बादल सरकारांच्या जाण्याने एका द्रष्टय़ा नाटककाराला भारतीय रंगभूमी पारखी झाली आहे. मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि बादल सरकार हे आधुनिक भारतीय रंगभूमीवरील तीन महत्त्वाचे नाटककार. (गिरीश कार्नाड हे या नंतरच्या पिढीतले आहेत.) तीनेक वर्षापूर्वी तेंडुलकर गेले आणि आता बादल सरकार. बादलांच्या नाटकांचे भारतभर प्रयोग झाले, त्यांच्या नाटय़प्रयोगांचे महोत्सव भरवले गेले. बादल सरकार मुळात टाऊन प्लॅनर. त्यात काही काळ काम केल्यावर त्यांनी परदेशात जाऊन रंगभूमीचे रितसर शिक्षण घेतले आणि नंतरचे सारे आयुष्य रंगभूमीसाठी समर्पित केले. वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्यांनी आपले पहिले नाटक ‘सोल्यूशन एक्स’ लिहिले. त्यानंतर आणखी दोन नाटके लिहिली. पण 1963 मध्ये त्यांची ‘एवम् इंद्रजित’ व ‘वल्लभपूरची दंतकथा’ ही दोन नाटके आली आणि बादल सरकार या नावाची भारतीय रंगभूमीवर चर्चा होऊ लागली. त्यानंतर बादलांची 1974 पर्यंत सातत्याने नवनवी नाटके येत राहिली. मात्र ‘बाकी इतिहास’, ‘पगला घोडा’, ‘जुलूस’ आणि ‘सारी रात’ या नाटकांनी त्यांना अखिल भारतीय पातळीवर कीर्ती मिळवून दिली. पण केवळ पुरस्कार, कौतुक, मानसन्मान यासाठी बादल सरकार नाटक करत नव्हते. नाटक ही बादल सरकारांची जगण्याविषयी बोलण्याची भाषा होती. त्यामुळे पौराणिक मिथके, रूपकांपासून आधुनिक मूल्यांपर्यंत त्यांनी अनेक शक्यतांचे प्रयोग केले. पण या प्रयोगांतून आपल्याला पुरेसे समाधान मिळत नाही हे लक्षात आल्यावर साचेबद्ध कमानी रंगमंचाला सरळ रामराम ठोकला आणि नुक्कडम् नाटके करायला सुरुवात केली. बंगालच्या गावागावात जाऊन आपली नाटके सादर केली. पथनाटय़ाची आपापल्यापरीने चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला. नाटकांच्या माध्यमातून सामाजिक अत्याचार आणि विसंवादी समाजव्यवस्था यांना तीव्र विरोध केला आणि समाज व राजकारणातल्या दांभिकतेवर नेमकेपणाने बोट ठेवण्याचेही काम केले. त्यांचा हा वसा महाराष्ट्रातही मोजक्यांनी थोडाफार सांभाळला आहे. पं. सत्यदेव दुबे यांच्या भाषेत सांगायचे तर ‘नाटकाच्या अक्षांश-रेखांशादरम्यान जे जे काही करता येणे शक्य असते आणि नाटकाच्या म्हणून जेवढय़ा काही शक्यता असतात त्यांना पणाला लावण्याचे काम’ बादलांच्या नाटकांनी केले. पण तरीही ते समाधानी नव्हते. ‘मी तिस-या रंगमंचाच्या शोधात आहे’ असे त्यांनी चारेक वर्षापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. म्हणजे वयाच्या ऐंशीमध्येही बादल सरकारांना नाटकाच्या नवनव्या वाटा, नवनव्या शक्यता खुणावत होत्या. त्या अर्थाने ते ‘एवम रंगकर्मी’ होते.

जगण्याला भिडणारा नाटककार

 (महेश एलकुंचवार यांना जनस्थान पुरस्कार जाहीर झाल्यावर प्रहार मध्ये लिहिलेला लेख 
   - १९ जानेवारी २०११ )
एखाद्या व्यक्तीचा उचित पुरस्कार देऊन गौरव करणे हा समाजाने त्या व्यक्तीविषयी व्यक्त केलेला आदरभाव असतो तसेच ती त्या व्यक्तीच्या योगदानाची पोचपावतीही असते. असे योग हल्ली महाराष्ट्रात फारसे येत नाहीत. पण साक्षात कुसुमाग्रजांनीच पुढाकार घेऊन सुरू केलेला आणि दर दोन वर्षानी दिला जाणारा ‘जनस्थान पुरस्कार’ मात्र याला सुरुवातीपासून अपवाद ठरला आहे. या वर्षी तो महेश एलकुंचवार यांच्यासारख्या मराठी नाटय़सृष्टीला नवीन वळण देणा-या आणि नवे आयाम आजमावणा-या नाटककाराला जाहीर झाला आहे. एलकुंचवार हे अगदी योगायोगाने नाटय़लेखनाकडे वळले असले तरी त्यांनी आजवर एकाहून एक श्रेष्ठ अशा नाटय़कृती दिल्या आहेत. 1967 मध्ये त्यांनी लिहायला सुरुवात केली. म्हणजे गेली 43 वर्षे त्यांच्या एकांकिका, दीर्घाक आणि नाटके यांनी महाराष्ट्रातल्या जाणकार प्रेक्षक-रसिकांच्या पसंतीची मोहोर मिळवलेली आहे. ‘पश्चिमप्रभा’ आणि ‘मौनराग’ ही दोन अलीकडची पुस्तके सोडली तर एलकुंचवार यांनी नाटकाव्यतिरिक्त इतर फारसे काही लिहिलेले नाही, ही गोष्ट त्यांच्या नाटय़धर्मीत्वाची निजखूण मानायला हरकत नाही. विजया मेहता, विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे, डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रभावळीत शोभून दिसणारे आणि तिथेही स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ते नाटककार आहेत. एलकुंचवार हे प्रायोगिक नाटककार आहेत असे म्हटले जाते. पण त्यांच्या नाटय़प्रतिभेने प्रायोगिक नाटकाच्या सर्व शक्यता ज्या ताकदीने वापरल्या आहेत, तशा क्वचितच इतर कुणी वापरल्या असतील. ‘वाडा चिरेबंदी-भग्न तळ्याकाठी-युगान्त’ ही त्रिनाटय़धारा हे याचे उत्तम उदाहरण. विजय तेंडुलकर, सतीश आळेकर आणि महेश एलकुंचवार हे एका मांदियाळीतले नाटककार आहेत. या तिन्ही दिग्गजांमधला समान दुवा म्हणजे मानवी संबंधांचा नितांत शोध घेण्याची वृत्ती. एलकुंचवारांची नाटके ही मानवी जगण्याशी दोन हात करणारी आहेत. ती ‘व्यावसायिक’ कधीच नव्हती. तसा प्रयत्नही एलकुंचवारांनी  केला नाही. आपली नाटके मध्यमवर्गीय आहेत, याची पुरेपूर जाणीव एलकुंचवारांनाही आहे. विजय तेंडुलकर, विजया मेहता आणि श्री. पु. भागवत यांचे ऋण एलकुंचवारांनी स्वत:च मान्य केलेले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असा भाग्ययोग फार कमी लोकांच्या वाटय़ाला येतो हेही खरे. पण या भाग्यालाच एलकुंचवारांनी कधी सार्थकता मानली नाही. एकेकाळी ‘गाबरे’ हे नाटक- ‘टाकतोच आता महाराष्ट्रावर बॉम्ब’ या अभिनिवेशाने लिहिले, पण ते आता मलाच वाचवत नाही, असे स्पष्ट आणि जाहीरपणे सांगण्याचे धाडस एलकुंचवारच करू जाणोत. ‘सुलतान’ हे एलकुंचवारांचे पहिले नाटक. तिथपासून ते अलीकडच्या ‘वासांसि जीर्णानि’पर्यंतचा एलकुंचवारांचा नाटय़प्रवास वेगवेगळ्या आव्हानांनी भरलेला आहे. त्यांची नाटके दिग्दर्शकांसाठी जशी आव्हाने निर्माण करतात, तशीच ती प्रेक्षक-रसिकांसाठीही करतात. एलकुंचवार हा सतत अस्वस्थ असलेला, मानवी नातेसंबंधांचा नितांत शोध घेणारा नाटककार आहे. त्यांचा जगण्याशी सारखा झगडा चाललेला असतो. या झगडय़ातून माणसांच्या चंगळवादाचे, भोगवादाचे आणि मूल्यांना सोडचिठ्ठी दिल्यामुळे टोचायला लागलेली सुखे यांची व्यामिश्रता त्यांच्या नाटकात दिसते. मूल्यांची पडझड, मध्यमवर्गीय लोकजीवनातल्या दांभिकपणावर प्रहार करणारे आणि जगण्याशी चाललेला सततचा झगडा हे एलकुंचवारांचे आवडीचे विषय. तेंडुलकर, आळेकर आणि एलकुंचवार यांच्या नाटकांवर तुच्छतावादी परंपरेचे जनक अशी टीका बऱ्याचदा झाली आहे. पण त्यांच्या नाटकातला मानवी संबंधांचा झगडा नीट बारकाईने पाहिला तर ती अतिशय सघन, आशयसंपन्न आणि वास्तवाला कवेत घेऊ पाहणारी नाटके आहेत हे लक्षात येते. प्रायोगिक नाटकातल्या सर्व शक्यता आजमावणारा, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणारा आणि मानवी जगण्याशी थेट भिडणारा नाटककार म्हणून महेश एलकुंचवार यांचे नाव भारतीय पातळीवर आदराने घेतले जाते. अशा या नाटककाराला जनस्थान पुरस्काराने गौरवले जात आहे, हे कुसुमाग्रजांच्या परंपरेला शोभणारे आहे. 

Sunday, October 2, 2011

मराठा समाज - वास्तव आणि अपेक्षा

मित्रहो, 
ग्रंथ ज्या हेतुपूरस्सरतेने आणि संयमाने लिहिले जातात, तितक्याच हेतुपूरस्सरतेने आणि संयमाने ते वाचले गेले पाहिजेत.
- हेन्री डेव्हिड थोरो


जगाविषयीचे चुकीचे दृष्टीकोन, चुकीच्या नैतिक कल्पना, चुकीच्या वर्तन-सवयी हे सर्व घटक आमच्या दुखांची कारणे आहेत असे मला वाटते.
-   रसेल
मराठा समाज संपादित करताना हाच विचार आमच्या मनात होता आणि आहे. त्यामुळे ही अवतरणे पुस्तकाच्या सुरुवातीलाच छापली आहेत. 



डॉ. बाबा आढाव, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. भा ल भोळे, शांताराम पंदेरे, ताराबाई शिंदे, डॉ. सदानंद मोरे, प्रा. प्रकाश पवार, डॉ. कुमार सप्तर्षी, प्रा. शेषराव मोरे, बाळासाहेब विखे - पाटील आणि वरुणराज भिडे या मान्यवर लेखकांचे विचार प्रगल्भ लेख असलेले पुस्तक आम्ही संपादित केले असून ते नुकतेच राजहंस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. ते आपण जरूर पहा आणि आपला अभिप्राय कळवा.

मराठा समाज - वास्तव आणि अपेक्षा

संपादक - राम जगताप \ सुशील धसकटे
राजहंस प्रकाशन, पुणे
पाने - २२६ , किंमत - २०० रुपये

Sunday, September 25, 2011

बोलकी नव्हे, कर्ती माणसे !



( माझ्या 'कर्ती माणसे' या पुस्तकाची छपाई चालू आहे. पुस्तक संपादित असून त्यात महाराष्ट्रातील २४ सामाजिक कार्यकर्ते यांच्याविषयी लेख आहेत. या पुस्तकाला मी लिहिलेली ही प्रस्तावना. )

‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकरांनी ‘बोलके सुधारक’ आणि ‘कर्ते सुधारक’ असे सुधारकांचे दोन वर्ग केले आहेत. जेव्हा ‘बोलक्या सुधारकां’चा संप्रदाय फोफावतो, तेव्हा ‘कर्त्या सुधारकां’ची गरज निर्माण होते. महाराष्ट्रातल्या दुर्गम, आदिवासी भागांत, शहरांच्या बकाल वस्त्यांमध्ये काम करणारे कार्यकर्ते ते संतुलन राखण्याचे काम आपल्यापरीने करत असतात.
1960 ते 80 या काळात महाराष्ट्रातली तरुण पिढी समाजबदलाच्या ध्येयाने झपाटून गेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून बारा-तेरा वर्षे झाली होती. त्यामुळे उज्ज्वल आणि संपन्न भारताची स्वप्ने पाहणारी आधीची पिढी आणि विशी-बाविशीची तरुण पिढी स्वप्नाळू होती. पण स्वतंत्र भारताची सुरुवातीची पंधरा-सोळा वर्षे मोठी धामधुमीची होती. त्यातच 1962च्या युद्धात भारताला चीनकडून पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली. त्यानंतर अशा नामुष्कीची एक मोठी मालिकाच घडत गेली. 64 साली भारताचे आशास्थान असणाऱया नेहरूंचे निधन झाले. 65 साली पाकिस्तानबरोबर युद्ध झाले. ताश्कंदमध्ये दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे आकस्मिकपणे निधन झाले. त्यातच 67-68 साली उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये प्रचंड मोठे दुष्काळ पडले.
 साधारणपणे याच काळात अमेरिकेत हिप्पी संस्कृतीचा उदय झाला होता. फिडेल, कॅस्ट्रो, चे गव्हेरा हे तरुणाईचे हिरो म्हणून पुढे येत होते. तर शेजारच्या पाकिस्तानमध्ये लष्कराचे वर्चस्व वाढत होते आणि पूर्व पाकिस्तानमध्ये बरेच अराजक माजले होते.
या साऱया परिस्थितीचा आणि अस्वस्थतेचा त्या वेळच्या तरुणाईवर मोठा परिणाम झाला. या घुसळणीतून ती तावूनसुलाखून निघाली. ‘युक्रांद’चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी ‘आयडेंटिटी क्रायसिसमध्ये वाढलेली पिढी’ असे त्या वेळच्या तरुण पिढीचे वर्णन करतात. ‘भारत स्वतंत्र झाला असला तरी सामाजिक-राजकीय पातळीवर आमूलाग्र बदलाची गरज आहे. क्रांती झाल्याशिवाय भारत सामर्थ्यशाली होणार नाही, म्हणून क्रांती करायची. पण कशी, तर आधी वैचारिक क्रांती, नंतर सामाजिक क्रांती आणि मग सर्वांगीण क्रांती करायची,’ असा मूलमंत्र काही जाणत्या लोकांनी तरुणाईला दिला. त्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. त्यातून महाराष्ट्रभर तरुण सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळी उभी राहिली.
1990 नंतर मात्र भारताने आर्थिक उदारीकरणाचा पुरस्कार केला. त्यातून पुन्हा एकदा मोठी सामाजिक घुसळण सुरू झाली. याच काळात सामाजिक चळवळीच्या आणि सामाजिक कार्याच्या व्याख्या बदलायला सुरुवात झाली. एमएसडब्ल्यूचे शिक्षण देणाऱया संस्था निघाल्या, त्यात नवे कार्यकर्ते तयार होऊ लागले. त्यातले काही तरुण आधीच्या सामाजिक चळवळींमध्ये तर बरेचसे एनजीओजमध्ये दाखल होऊ लागले. सामाजिक कार्याचेच मोठय़ा प्रमाणावर एनजीओकरण होऊ लागले. प्रश्नांना थेट भिडून संघर्ष करण्याऐवजी त्यांचे प्रदर्शन करण्याकडे कल वाढू लागला. त्यामुळे दूर कुठेतरी दुर्गम भागात काम करणाऱया संस्था-व्यक्तींकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यांचे प्रश्न प्रसारमाध्यमांमधून दुर्मीळ होऊ लागले. आणि हा बदल सर्वच क्षेत्रांमध्ये होऊ लागला. याच काळात हिंदी चित्रपटांमधून खेडी गायब होऊ लागली, समांतर चित्रपटांची चळवळ थंडावली. या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे तळागाळातल्या समाजासाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेने झपाटलेले मध्यमवर्गीय तरुण करिअरिस्ट होऊ लागले. एकंदर मध्यमवर्गानेच स्वतःला इतर समाजापासून तोडून घ्यायला सुरुवात केली. तो जागतिकीकरणाचा लाभार्थी आणि पुरस्कर्ता झाला. त्याच्या इच्छा-आकांक्षांना महत्त्व येऊ लागले. आणि त्याचीच प्रसारमाध्यमांपासून सरकारपर्यंत सर्वजण दखल घेऊ लागले.
थोडक्यात 90च्या दशकात महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींना उतरती कळा लागली. या धबडग्यात अनेकजण निराश झाले, बाहेर पडले, तर काहींनी मात्र आपला आशावाद जागता ठेवत आपले काम चालूच ठेवले. पण त्यांच्याबद्दलची समाजाची आस्था कमी होत गेल्याने त्यांचा आवाज क्षीण झाला.

या कार्यकर्त्यांची आणि पुरोगामी साहित्यिकांची उमेद वाढवण्यासाठी ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ने 1994 साली  ‘साहित्य पुरस्कार योजना’ तर सामाजिक कार्यकर्त्यांसाठी 1996 पासून ‘समाजसेवा गौरव पुरस्कार’ या योजना सुरू केल्या.
पहिल्या वर्षी चार समाजकार्य पुरस्कार सुरू केले. प्रत्येकी 50 हजार रुपये आणि मानचिन्ह असे त्यांचे स्वरूप ठरवण्यात आले. या पुरस्कारासाठी संस्था व व्यक्ती यांच्या नावांचा विचार करताना पुढील बाबी विचारात घेण्याचे ठरले—
1) सामाजिक संस्था व व्यक्ती आपले कार्य व विचार यांच्या साहाय्याने विवेकनिष्ठा व वैज्ञानिक दृष्टी, सामाजिक न्याय ही मूल्ये रुजवण्यासाठी सातत्याने प्रबोधनाचे कार्य करत आहेत.
2) पर्यावरण-संतुलनाचा ध्यास घेऊन संशोधन, प्रयोग, लोकशिक्षण, जनसंघटन यांसारख्या विविध मार्गांनी ज्या व्यक्ती अविरत कार्य करत आहेत.
3) ज्या व्यक्तींच्या कार्यामुळे महिलांयांमध्ये स्वावलंबन व स्वातंत्र्याविषयीच्या जाणिवा वाढत आहेत आणि अन्यायाविरुद्ध झगडण्याची इर्ष्या जागृत होत आहे.
2005 पासून ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाऊ लागला, तर 2008 पासून तरुण कार्यकर्त्यांसाठी युवा पुरस्कार सुरू करण्यात आला.
या योजनेला आता पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. या पंधरा वर्षांत 70 व्यक्तींना आणि 17 संस्थांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे या हेतूने हा लेखसंग्रह प्रकाशित करण्यात येत आहे. मात्र 70 व्यक्तींविषयीच्या एकूणएक लेखांचा समावेश करणे शक्य नव्हते. ते व्यवहार्यही नव्हते. शिवाय त्यापैकी काही आता हयात नाहीत तर काहींचे काम वयोपरत्वे थांबले आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या निवडक 24 व्यक्तींचाच यात समावेश आहे.
‘फाउंडेशन’च्या वतीने प्रकाशित होणारी ‘मंथन’ ही अतिशय देखणी स्मरणिका हे या योजनेचे सुरुवातीपासूनच वैशिष्टय़े राहिले आहे. त्यामुळे प्रस्तुत संग्रहातील जवळपास सर्वच लेख ‘मंथन’च्या स्मरणिकांमधून घेतलेले आहेत. मात्र या लेखांमध्ये नव्याने काही मजकुराची भर टाकण्यात आली, त्यांचे पुनर्लेखन करून घेण्यात आले. त्यामुळे काही लेख अद्ययावत झाले आहेत. सय्यदभाई यांच्या ‘दगडावरची पेरणी’ या पुस्तकाला विशेष पुरस्कार मिळाला. ते त्यांचे आत्मकथन नसून ‘कार्यकथन’ आहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्यालाच आहे, त्यामुळे त्यांचाही समावेश यात केला आहे. सय्यदभाई यांच्याविषयीचा लेख सुभाष वारे यांनी नव्याने लिहून दिला. या संग्रहातील सर्वच लेखकांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार. तसेच या संग्रहाची कल्पना सुरुवातीपासून उचलून धरणारे ‘पुरस्कार योजने’चे प्रवर्तक सुनील देशमुख आणि ‘लोकवाङ्मय गृहाचे’चे प्रकाश विश्वासराव यांचेही आभार. ‘लोकवाङ्मय’ आणि केशव गोरे ट्रस्ट यांनी या पुरस्कारांची कार्यवाही 12-13 वर्षे केली. मागच्या दोन वर्षांपासून ती ‘साधना ट्रस्ट’ करत आहे. त्या सर्वांचे लेखांच्या संमतीबद्दल आभार.
या संग्रहातले सर्वच लेख हे त्या त्या व्यक्तींना पुरस्कार मिळाल्यावर लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा परिचय आणि गौरव हाच त्यामागचा प्रधान हेतू आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन आणि विश्लेषण अपेक्षित नव्हते. त्यामुळे प्रस्तुत संग्रहाचे संपादन करतानाही ते अपेक्षित नव्हतेच.
मात्र निवडलेल्या सर्वच व्यक्ती आणि त्यांचे काम परस्परांहून भिन्न आणि वैशिष्टय़पूर्ण आहे. यात आठ महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. त्यांची संख्या पुरुष कार्यकर्त्यांपेक्षा निम्मी असली तरी त्यांचा लढाऊ बाणा पाहता त्या पुरुषांइतक्याच सक्षमपणे काम करत आहेत हे लक्षात येईल. मग ते उल्का महाजन-सुरेखा दळवी यांचे सेझविरोधी आंदोलन असो की भुरीबाई शेमळे, पूर्णिमा मेहेर यांचे आदिवासींसाठीचे काम असो. संग्रहातील सर्वाधिक म्हणजे दहा व्यक्ती विदर्भातील आहेत. याशिवाय तिस्ता सेटलवाड, आनंद पटवर्धन यांच्यासह बस्तू रेगे, काळूराम दोधडे, प्रतिभा शिंदे हेही आहेत. म्हणजे आदिवासी-दुर्गम भागातील लोकांसाठी काम करणारे आणि शहरांतील धार्मिक सलोख्यासाठी, न्यायासाठी झगडणारे अशा सर्वांची इथे ‘मांदियाळी’ आहे. थोडक्यात, दुर्गम खेडे ते शहरांच्या मध्यवस्त्या या दोन्ही ठिकाणी कामाची गरज असते आणि आहे, हेच या व्यक्तींच्या कामातून अधोरेखित होते.

समाजबदल आणि सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत चार घटक महत्त्वाचे असतात. 1) राजकारण, 2) प्रशासन, 3) प्रसारमाध्यमे आणि 4) सामाजिक संस्था वा व्यक्ती.
1) राजकारण ः राजकारणातले पक्ष, संघटना आणि व्यक्तींना येनकेनप्रकारे सत्ता हस्तगत करायची असते. त्यासाठी त्यांना समूहाचा विचार करावा लागतो. तुलनेने लहान समूह वा समाजगट त्यांना निवडणुकीत यश मिळवून देत नाहीत. शिवाय भारतीय समाज जात, वर्ग, माझं गाव, माझं शहर असा विभागला जातो. त्यामुळे निवडणुका, मतदान याकडे राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जास्त लक्ष असते.
2) प्रशासन ः प्रशासनातही प्रामुख्याने समूहाचाच विचार केला जातो. प्रत्येक विषयासाठी अगदी सामान्य पातळीवर जाऊन काम करणे प्रशासनाला शक्यही नसते. तसा प्रयत्न झाला तरी दोन-चार वर्षांनी नोकरी बदलणाऱया प्रशासकीय अधिकाऱयांना त्या कामाबाबत तेवढी आस्था राहत नाही. शिवाय त्यांच्या काम करण्याला मर्यादा असतात. त्यांना ढोबळमानाने पाहावे लागते.
3) प्रसारमाध्यमे ः प्रसारमाध्यमांनाही प्रामुख्याने आपला वाचक वा प्रेक्षक कोण आहे, कुठल्या भागातला आहे हे पाहावे लागते. तो मुख्यतः महानगरांमध्ये एकवटलेला असल्याने त्यांना आवडेल, रुचेल आणि पचेल अशाच पद्धतीने पत्रकारिता करावी लागते. शिवाय जो विषय चर्चेत आहे त्याविषयी सजग राहावे लागते. सातत्याने एकच प्रश्न वा विषय लावून धरता येत नाही. कारण प्रेक्षक-वाचक त्याला कंटाळतात.
4) सामाजिक संस्था वा व्यक्ती ः आदिवासी, भंगी, कचरा कामगार, खाण कामगार अशा काही विषयांत काम करणे आवश्यक असते. पण इतक्या खोलात जाऊन त्या विषयाच्या कानाकोपऱयांना भिडणे राजकारणी, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांना शक्य नसते. ते फक्त सामाजिक काम करणाऱया व्यक्ती वा संस्थांनाच शक्य असते. त्यामुळे वरच्या तिन्ही घटकांची मर्यादा हेच त्यांचे मोठे बलस्थान असते. या व्यक्ती वा संघटना एकेक प्रश्न हातात घेऊन तो धसाला लावू शकतात. त्यांचे उद्दिष्ट एका अर्थाने काहीसे मर्यादित असल्याने ते त्याभोवतीच आपली सर्व ऊर्जा एकवटतात. त्यासाठी वरच्या तिन्ही घटकांशी लढा देऊन स्वतःच्या मागण्या पदरात पाडून घेण्याचे काम करतात, स्वतःची दखल घ्यायला भाग पाडतात. आपले उभे आयुष्य तळागाळातल्या लोकांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी खर्च करतात. त्यासाठी सातत्याने संघर्ष करत राहतात. ज्यांचे प्रश्न कुणी उचलून धरणार नाही अशा लोकांसाठी काम करतात. म्हणून ते उल्लेखनीय आणि अनुकरणीय ठरते.
प्रस्थापित ध्येयधोरणांविरुद्ध बंडखोरी पुकारून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करणारी ही ‘कर्ती माणसं’ आहेत. त्यांनी हा निर्णय झपाटलेपणातून घेतलेला आहे. विकासाचा वाटा तळागाळातल्या लोकांना मिळावा, त्यांच्या आयुष्यातही स्वातंत्र्याची पहाट यावी यासाठी त्यांनी स्वतःला त्यांच्या वतीने पणाला लावले आहे. आपल्या सुखवस्तू जीवनावर आणि भौतिक सुखसोयींवर तुळशीपत्र ठेवले आहे. अर्पणपत्रिकेमध्ये म. गांधींनी सांगितलेली सात ‘सामाजिक’ पापकर्मे दिली आहेत. प्रस्तुत संग्रहातील सर्वच कार्यकर्ते त्या पापकर्मांच्या विरोधात आपापल्या परीने झगडत आहेत.
रचनात्मक संघर्षाचा हा आविष्कार अनुकरणीय आहे. तशी प्रेरणा हे पुस्तक वाचणाऱया प्रत्येकाला मिळो. ‘समाजहितासाठी आपल्या आवडीनिवडी, स्वार्थ आणि अहंकार यांना कात्री लावणे’ अशी इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी ‘सामाजिक नीतिमत्ता’ या शब्दाची व्याख्या केली आहे. त्या न्यायाने हे नीतिमत्ता जोपासणारे ‘कर्ते’ लोक आहेत. सामाजिक नीतिमत्ता ही सार्वजनिक चारित्र्याचीही पूर्वअट असते. या संग्रहातील ‘कर्त्या माणसां’चे वेगळेपण आहे ते या अर्थाने.
(प्रकाशक लोकवांगमय गृह, भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी, मुंबई-२५. फोन-०२२-२४३६२४७४, किंमत - २०० रुपये.)

Saturday, September 24, 2011

आणखी एक ‘कन्नड टागोर’!


इतिहासाची जाण नसणं हे न्यून मानण्यालाच कंबार यांचा आक्षेप होता. त्यांच्या मते ब्रिटिशांसमोर आपण स्वीकारलेल्या बौद्धिक शरणागतीमुळेच इतिहासाच्या चौकटीबाहेरचं जगणं आपल्यालाही लांच्छनास्पद वाटू लागलं.
पाश्चात्यांच्या पावलांवर पाऊल टाकून आपणही आपल्या भूतकाळाचे अवशेष मांडून ठेवण्यासाठी संग्रहालयं उभारली, पण मुळात आपण आपला भूतकाळ आपल्या वर्तमानातून जगणारी माणसं होतो. कंबार सांगतात, इतिहासाची ब्रिटिश व्याख्या स्वीकारल्यामुळेच आपण आपलंच साहित्य शतखंडीत रूपात पाहू लागलो आहोत. 
  - शशी थरुर, 2003

कंबार हे दुर्मिळ साहित्यदृष्टी लाभलेले असे  साहित्यिक आहेत, ज्यांनी स्थानिक लोकसमूहांनी जपलेली विश्वात्मकता जाणली. ते नव्या पुराणांचे रचनाकार आहेत.
- यू. आर. अनंतमूर्ती, 2011

कन्नड साहित्य हे अखिल भारतीय साहित्यात सर्वात मानाचं, सुप्रतिष्ठित, चर्चेतलं आणि दर्जेदार मानलं जातं. एकविसाव्या शतकातल्या इंटरनेट, वेबसाईटस आणि गुगल यांचा भारतात कुणी सर्वाधिक उपयोग करून घेतला?असेल तर तो हिंदी आणि कन्नड या दोन भाषांनी. हिंदीतल्या तर जवळ जवळ एकूण एक मासिकांच्या वेबसाईट आहेत, नवं लेखन सातत्यानं ब्लॉगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातं. अनेक लेखक-पत्रकार नियमितपणे ब्लॉग लिहितात. असंच कन्नडबाबतही आहे. मराठी मासिकं आणि मराठी साहित्यिक यांना वेबसाईट आणि ब्लॉग यांची दुनिया अजून अपरिचितच आहे.
 
आजवर सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार कन्नड साहित्यिकांनाच मिळाले आहेत. कुप्पली वेंकटआप्पा पुटप्पा (कुवेंपू) (1967), द. रा. बेंद्रे (1973), के. शिवराम कारंथ (1977), माटी व्यंकटेश अय्यंगार (1983), व्ही. के. गोकाक (1990), यू. आर. अनंतमूर्ती (1994), गिरीश कार्नाड (1998) आणि नुकत्याच जाहीर झालेल्या पुरस्काराचे मानकरी चंद्रशेखर कंबार (2010).
 
चंद्रशेखर कंबार यांची ओळख कवी, नाटककार, कादंबरीकार, लोककथाकार, फिल्ममेकर आणि संगीतकार अशी बहुविध आहे. कंबार यांचे साहित्य लोककलेचा वारसा सांगणारं आहे. उत्तर कर्नाटकातल्या लोककथा आणि मिथकथा यांचा त्यांच्या लेखनावर प्रभाव दिसतो. कंबार बालपणापासून लोकनाटय़ाशी संबंधित आहेत. माणसांचं जगण-वागणं त्यांनी आपल्या नाटकांमधून समर्थपणे उभं केलं आहे. त्यामुळे समकालीन भारतीय रंगभूमीनं त्यांच्या अनेक नाटकांची दखल घेतली आहे. ‘महामाई’, ‘गाणं पंचरंगी पोपटाचं’, ‘कहाणी वाघाच्या सावलीची’, ‘श्रीचंपा’ अशा त्यांच्या काही नाटकांचे मराठी अनुवाद झाले आहेत.
 
कंबार हे कन्नडमधील    द. रा. बेंद्रे यांच्यानंतरचे महत्त्वाचे द्रष्टे कवी आहेत. कंबार यांच्या नावावर 21 नाटकं, 8 कवितासंग्रह, 3 कादंब-या, 12 संशोधनपर लेखसंग्रह अशी विपुल ग्रंथसंपदा आहे. ‘संगीथा’, ‘सांग्या बाल्या’ आणि ‘सिंगरेव्वा मट्ट् अरमाने’ या त्यांच्या तीन पुस्तकांवर चित्रपट झालेले आहेत, तर ‘काडू कुदुरे’ (जंगली घोडा) या चित्रपटाचे दिग्दर्शन कंबार यांनी केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक लघुपट बनवले आहेत. अनेक ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शनही केले आहे. कंबार यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये दोन वर्षे अध्यापन केले. त्यानंतर बेंगलोर विद्यापीठात वीस वर्षे अध्यापन केले, हम्पी विद्यापीठाचे ते संस्थापक कुलगुरू झाले. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे चेअरमन, कर्नाटक नाटक अकादेमीचे संचालक अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत. कबीर सन्मान, कालिदास सन्मान, टागोर साहित्य सन्मान, संगीत नाटक अकादेमी पुरस्कार, साहित्य अकादेमी पुरस्कार, पद्मश्री आणि ‘काडू कुदुरे’च्या गीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक सन्मानही त्यांना मिळाले आहेत. यावरून कंबार यांच्या सर्वस्पर्शी संचाराचा अंदाज यायला हरकत नाही. ‘आयुष्यभर केवळ लेखन, वाचन, मनन करणे ही समाजविकृती आहे’ असं इतिहासकार शेजवलकर यांनी म्हटलं आहे. ही समाजविकृती कन्नड साहित्यिकांमध्ये दिसत नाही. कंबारही त्याला अपवाद नाहीत.
 
सर्वच कन्नड साहित्यिक आपल्या मातृभाषेचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. अनंतमूर्ती, भैरप्पा, कार्नाड आणि कंबारही. शालेय शिक्षण मातृभाषेतूनच द्यायला हवे, असा त्यांचा आग्रह असतो आणि आहे. त्यासाठी ते आपल्यापरीने प्रयत्नही करतात. शासन व्यवस्थेशी पंगा घेण्याची तयारी दाखवतात. ही ‘कन्नडिगा वृत्ती’ अनुकरणीय आहे.
 
टागोरांइतक्याच सर्वस्पर्शी प्रतिभेची देणगी लाभलेला माणूस म्हणून ‘यक्षगान’कर्ते के. शिवराम कारंथ यांचं वर्णन रामचंद्र गुहा यांनी ‘कन्नड टागोर’ असं केलं आहे. चौफेर मुशाफिरी करणारे चंद्रशेखर कंबार हेही कारंथांसारखा लोकसंस्कृतीचा वारसा आपल्यापरीने सांगत आलेत. त्यामुळे त्यांना दुसरा ‘कन्नड टागोर’ असं म्हटलं तर त्यात फारशी अतिशयोक्ती होईल असं वाटत नाही. कारण कुठलंही साहित्य हे त्या त्या प्रदेशाच्या इतिहास, भूगोल, संस्कृती, लोककला, मिथकं, परंपरा, आदर्श, प्रेरणा यांच्या सामीलकीतूनच निर्माण होत असतं. त्याचा नाद केवळ कंबार यांच्या लेखनातूनच नव्हे तर कन्नडमधल्या अनेक साहित्यिकांच्या लेखनातून येतो. त्यामुळेच कन्नड साहित्य हे भारतीय भाषेतलं सर्वोत्तम साहित्य आणि कन्नड भाषा ही अभिजात भाषा ठरते. कंबार त्याच परंपरेचे पाइक आहेत. लेखन ही त्यांची जगण्याविषयी बोलण्याची भाषा आहे. ज्ञानपीठ मिळाल्यावर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली तीही मार्मिक होती. ते म्हणाले की, ‘लेखकाला असे वाटत असेल की, त्याचे लेखन त्याला पूर्णपणे समाधान देते आहे, तर त्यानं लेखन थांबवलं पाहिजे. मला अजून तसं वाटत नाही. म्हणून मी लिहितो.’
 
भारतीय समाजाचं असं एक वैशिष्टय़ं आहे की, त्याला सगळ्याच गोष्टींमध्ये काहीतरी तिरपागडं दिसत असतं. निदान तसं तो शोधून तरी काढतोच. त्यामुळे केवळ पुरस्कारावर लेखनाचा दर्जा अवलंबून असतो का, असं कृतक समाधान काही लोक करून घेतात. पण कृतघ्नतेच्याही अनेक गोष्टी, विरोधाभास भारतीय समाजामध्ये दिसतात. त्यामुळेच ‘मानवी अनुभवातील सर्वात गौरवास्पद आणि सर्वात घृणास्पद असं जे जे काही आहे ते भारतात आढळतं’ असं पं. नेहरूंनी म्हटलं होतं. भारत हे एक अस्वाभाविक राष्ट्र आहे. विविध भाषा, विविध धर्म, विविध पंथ-वर्ग, विविध जाती-जमाती यांचं कडबोळं म्हणावं असा भारत आहे. पण ‘विविधेतत एकता’ या समानसूत्रावर भारताची सांस्कृतिक उभारणी झालेली आहे. त्यात सर्वात मोठा वाटा आहे, तो लोककलेचा. चंद्रशेखर कंबार नाटककार आणि कवी म्हणून या लोककलेचा वारसा सांगत आले आहेत. त्या समृद्ध वारश्याची जपणूक करत आले आहेत. भारतीय समाजाला आणि संस्कृतीला कशाचं अगत्य आहे, त्यांच्या स्वागतशील वृत्तीचं नेमकं गमक काय, या प्रश्नाचं खणखणीतपणे आणि अगदी ठासून सांगावं असं उत्तर आहे, लोककला. 

 इतरांना सतत नाकं मुरडणाऱ्या मराठी साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या लोककलेला असं व्यासपीठ मिळवून दिलं आहे का? मराठी नाटककारांनी अशी लोककलेच्या वारशाची जपवणूक केली आहे का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधीतरी मिळायला हवी की नको? आपल्याकडे रा. चिं. ढेरे आणि तारा भवाळकर हे दोनच लोककलेचे संशोधक-अभ्यासक. बाकी लोककलेचा अभ्यास होणार तो विद्यापीठीय पातळीवर आणि त्याचा परिघ विद्यापीठाच्या आवारापुरताच, असाच महाराष्ट्राच्या लोककलेचा आलेख असेल तर महाराष्ट्राला कन्नडकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.