Saturday, September 17, 2011

दिवाळी अंकांची सांस्कृतिक रडकथा

(१८ सप्टेम्बर २०११ च्या प्रहार, कोलाज मधील लेख.)

सध्या मराठी साहित्य व्यवहारात मोठी धांदल सुरू आहे. लेखकांपासून बाइंडरपर्यंत सारे जण दिवाळी अंकांसाठी रात्रंदिवस खपत आहेत. कारण दिवाळी अंकांच्या निमित्ताने मराठी ग्रंथव्यवहारात मोठी उलाढाल होते. प्रस्थापित लेखकांपासून नवोदितांपर्यंत कितीतरी लेखक, संपादक, चित्रकार, मुद्रक, बाइंडर, वितरक, विक्रेते, जाहिरातदार कामाला लागतात. लेखकांच्या सर्जनशीलतेला, चित्रकारांच्या प्रतिभेलाही धुमारे फुटतात; संपादकांची कौशल्ये पणाला लागतात, तर मुद्रक, बाइंडर, वितरक, विक्रेते यांना रोजगार मिळतो. कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक होते. आणि या सर्वाचा परिपाक म्हणजे महाराष्ट्रातील तमाम रसिक वाचकांना दोन-अडीच महिने ‘वाचनानंदा’त मनसोक्त डुंबण्यासाठी, हुंदडण्यासाठी एक मोठा अवकाश उपलब्ध करून दिला जातो.
 
महाराष्ट्राच्या विविध भागांतून साधारणपणे 400-500 दिवाळी अंक प्रकाशित होतात. महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरूनही काही अंकांचे प्रकाशन केले जाते. समाजातील बहुविध वाचकवर्ग आणि त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हे अंक काढले जातात. त्यामुळे या अंकांचे त्यांच्या प्रकारानुसार आणि वाचकानुसार काही गट पडतात. उदा. निखळ वाङ्मयीन, दैनिक-साप्ताहिकांचे, चळवळीची मुखपत्रे, ज्योतिष, धार्मिक-आध्यात्मिक, गुन्हेगारी-रहस्यकथा, आरोग्य, उद्योग-व्यापार, पर्यटन, पाककला, महिला, बाल-किशोर आणि चित्रपट-खेळ इत्यादी.
 
मात्र, गेल्या काही वर्षातल्या दिवाळी अंकांवर नजर टाकल्यावर काय लक्षात येते? अगदी स्पष्टपणे सांगायचे तर अलीकडच्या काही वर्षामध्ये दिवाळी अंकांमध्ये प्रचंड साचलेपण आले आहे. याची जाणीव काहींना आहेही; नाही असे नाही. ‘मौज’मध्ये आता कुठलीच ‘मौज’ उरली नाही. इतक्या वर्षानंतरही ‘मौज’चा फॉर्म्युला काही बदलत नाही आणि सुशेगात वृत्तीही. ‘ललित’ व ‘दीपावली’मध्येही आता फारसा दम राहिला नाही. ‘अक्षर’चे काम निखिल वागळे पाहात नसल्याने त्याची गाडीही घसरली आहे. ‘कालनिर्णय’च तेवढा तग धरून आहे. सदा डुंबरे निवृत्त झाले आणि ‘साप्ताहिक सकाळ’ची चांगल्या दिवाळी अंकाची परंपराही रिटायर केली गेली. ‘शब्द’ला अजून सूर सापडत नाही. अरुण शेवते गेल्या काही वर्षापासून आपल्या अंकाचे पुढे पुस्तक करता येईल असेच विषय घेऊन त्यावरच ‘ऋतुरंग’चा संपूर्ण अंक काढतात, तर इतरांना सतत चांगला दिवाळी अंक कसा काढावा याचा उपदेशामृत देणारे सुनील कर्णिक ‘नवा माणूस’ हा सामान्य वकुबाचा अंक काढतात. वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकांत तर, जाहिरातींचेच नावीन्य दिसते आणि मजकुराचा दर्जा त्यांच्या रविवार पुरवण्यांतील लेखांपेक्षा फार वेगळा नसतो. एखाद-दुसरा वाचनीय वा चांगला लेख, इतकेच या सर्वाच्या गुणवत्तेचे प्रमाण उरले आहे.
कमी पैशात भरघोस पुरवठादार

या प्रकारामुळे उथळ व फुटकळ साहित्याला चांगले दिवस आले आहेत. चटपटीत आणि चुरचुरीत मजकूर देखण्या सजावटीसह वाचकांच्या माथी मारला जातो. वाचकही डोक्याला फार ताप करून न घेता घटकाभराची करमणूक म्हणून त्याकडे पाहतात आणि सोडून देतात. कारण वाचन ही काही त्यांच्या आयुष्यातली नडीव गोष्ट नाही. त्यामुळे तो त्याला सहजासहजी जे उपलब्ध होईल, त्याचा स्वीकार करतो. आणि शेवटी कुठलाही वाचक ‘हे साहित्य आपल्याला अभिरुचिसंपन्न करणारे आहे की नाही?’ अशी फूटपट्टी घेऊन वाचायला बसत नाही. त्यामुळे सवंग लोकप्रियतेला आणि नाव प्रसिद्धीला हपापलेली लेखक मंडळी तेलाच्या घाण्यासारखा रतीब घालतात. संपादकांनाही कमी वेळेत, कमी पैशांत असे भरघोस पुरवठादार हवेच असतात.
 
एकेकाळी वीस-वीस अंकांमध्ये लिहिणारे लोक अजूनही जवळपास तेवढय़ाच अंकांत, त्याच प्रकारे लिहीत आहेत. त्यांच्या लेखनामध्ये आता काहीही नावीन्य राहिलेले नाही. अनिल अवचट, विजया राजाध्यक्ष, मंगेश पाडगावकर, शांताराम, यू. म. पठाण, गंगाधर पानतावणे, द. भि. कुलकर्णी, राजन खान, महावीर जोंधळे, फ. मुं. शिंदे, निळू दामले, भारत सासणे, बाबूमोशाय, ह. मो. मराठे, अच्युत गोडबोले अशा काही लेखकांनी त्यांचे लेखन थांबवावे असा उद्धट पण अतिशय नम्र सल्ला द्यावासा वाटतो. (या यादीत वाचकांना आपापल्या मनातील काही नावांचाही समावेश करता येईल.) अन् तेही वाचकांवर उपकार वगैरे करण्यासाठी नाही; तर त्यांच्या स्वत:साठीच त्यांनी लेखन थांबवणे गरजेचे आहे असे वाटते. कारण त्यांची जनमानसात जी चांगली प्रतिमा आहे, तिला त्यांच्याकडूनच तडा जातो आहे. संपादकांना-वाचकांना आपले लेखन हवे असेलही पण किती काळ लोकानुनय करायचा? आणि त्यातून आपलेच अवमूल्यन होत आहे त्याचे काय करायचे, याचाही विचार करायला नको काय?
 
तर दुसरी गडबड अशी आहे की, काही मासिकांचे, दिवाळी अंकांचे संपादक सुमार वकुबाच्या लेखकांना सातत्याने लिहायला कशासाठी सांगत असतात अणि त्यांचे ते सामान्य लेखन कशासाठी छापत असतात हेही कळायला मार्ग नाही. वैयक्तिक हितसंबंध-स्नेहसंबंध या पलीकडे तुमचे जग नसेल तर त्याला हरकत घेण्याचे कारण नाही; पण ते तुम्ही वाचकांच्या माथी कशाला मारता? अशा संबंधां-संबंधांवर हजेरी लावणा-यांमध्ये संजय भास्कर जोशी, विलास खोले, निरंजन घाटे, शिरीष कणेकर, द्वारकानाथ संझगिरी, महेश केळुस्कर, प्रतिमा इंगोले, विजया वाड, विजय पाडळकर, श्रीनिवास हेमाडे, सुमेध वडावाला (रिसबूड), मधुकर धर्मापुरीकर, हेरंब कुलकर्णी, प्रवीण दवणे, अशा काहींचा सुळसुळाट झाला आहे.
 ब-याच अंकांतून प्रायोजित स्वरूपाचा मजकूर, गुणगौरवपर मुलाखती, नाटय़-चित्रपट क्षेत्रातल्या कलावंतांच्या प्रसिद्धीचा (गैर)वापर करून खपाच्या मार्गाने जाण्याची धडपड दिसते. असा मजकूर त्या त्या व्यक्तीची एक प्रकारची जाहिरातच असते. यापेक्षा उघड जाहिराती परवडल्या. त्यांचा निदान कुठला दावा तरी नसतो.


या कारणांमुळे दिवाळी अंकांविषयीची चर्चा आठवडय़ाच्या पुढे टिकेनाशी झालीय. मग त्यावरील वादविवाद तर दूरच राहोत. मग दरवर्षी ज्या संख्येने अंक निघतात, ते पाहता असे वाटू शकते की, एवढे अंक निघतात, म्हणजे त्यांना वाचकवर्ग असणारच. त्याचे कारण असे की, काही मोजके अपवाद वगळता संबंधितांकडून जे आकडे सांगितले जातात, ते सर्व चढय़ा बोलीतले असतात. त्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण होतो खरा, पण त्याला काही अर्थ नाही. गावोगावी भरणा-या पुस्तक-प्रदर्शनात ‘10 दिवसांत 10 कोटींची पुस्तक विक्री’ अशा ज्या बातम्या वृत्तपत्रांतून ठळक टायपातून छापून येतात, त्या वाचून सोडून द्याव्या अशा लायकीच्या असतात. जे पुस्तकांचे तेच दिवाळी अंकांचेही. मराठीत एका महिन्यात जेवढी पुस्तकांची विक्री होते, होऊ शकते, जवळपास तेवढीच दिवाळी अंकांचीही होते आणि त्यांना मिळणारा प्रतिसादही पुस्तकांसारखाच असतो. 

दुभती गाय, साईड बिझनेस
 एक मात्र खरे की, दिवाळी अंक काढण्यामागे अनेक उद्देश/हेतू असतात. त्यातही सुष्ट कमी, दुष्टच जास्त! मासिकांपुढे पर्याय नसतो.. वर्षाच्या शेवटी वाचकांना काहीतरी भरगच्च द्यावेच लागते. तो एक वाङ्मयीन परंपरेचा शिरस्ता झाला आहे. दैनिके-साप्ताहिके यांना जाहिरातींतून पैसा मिळतो. ज्योतिष, भविष्य, आरोग्य, वास्तुशास्त्र, पाककला ही लोकांची गरज असते. त्यामुळे याविषयांवरील अंक हमखास विकले जातात. दिवाळी अंक ही दोन-अडीच महिन्यांपुरती का होईना, पण काहींची ‘दुभती गाय’ झाली आहे. आपल्या हितसंबंधांचा वापर करून जाहिराती मिळवायच्या, मध्ये मध्ये मजकूर पेरायचा आणि दोन-चार लाखांची बेगमी करायची, असा ‘साइड बिझनेस’ या काळात भलताच फोफावतो. हे अंक बाजारात कधीच येत नाहीत. ते थेट जाहिरातदारांकडे जातात अन् उरलेले रद्दीत! राजकीय हेतूपोटी निघणा-या अंकांची संख्याही ब-यापैकी मोठी होत आहे. आता तर काळा पैसा ‘पांढरा’ करण्यासाठीही दिवाळी अंकांचा वापर होऊ लागला आहे, अशी कुजबूज कानावर येते.थोडक्यात काय तर परंपरा, अपरिहार्यता, स्पर्धा, चढाओढ, अहमहमिका आणि उद्दिष्टपूर्ती अशा काही कारणांवर दिवाळी अंकांचा डोलारा दरवर्षी उभा राहतो आहे.
त्यामुळे दिवाळी अंकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. ही स्थिती सुधारायला हवी हे तर खरेच! पण ते होणार कसे?
 
पण हा प्रश्न एकटय़ा दिवाळी अंकांपुरता असता तर ते शक्य होते. पण या प्रश्नाची व्याप्ती खूप मोठी आहे. ती आपल्या एकंदरच सांस्कृतिक-सामाजिक उत्तरदायित्वाशी निगडित आहे. 

अंगभूत आणि मुलभूत मर्यादा

आपल्याकडे एकंदरच हळहळे-हुळहुळे लोक फार आहेत. त्यामुळे सारा मामला हौसेचा नाहीतर एकांडय़ा शिलेदारांचा असतो. नुसत्या हौसेला वा एकांडय़ा शिलेदारीला स्वभावत:च अंगभूत आणि मूलभूत मर्यादा असतात. त्यात आपले प्रायोगिकतेचे वेडही अतोनात. अशा एकांडय़ा प्रयोगांचे वा वैयक्तिक अनुभवांचे सामाजिक सिद्धांत होत नसतात. तसे ते व्हावयाचे असतील तर त्यासाठी नियोजनबद्ध आणि सांघिक प्रयत्न करावे लागतात. अन् तेही वर्षानुवर्षे. पण सामोपचाराने आणि एकोप्याने प्रदीर्घ काळ काम करण्याचा मुळात महाराष्ट्राचा स्वभाव नाही आणि तशी इच्छाशक्तीही नाही. पन्नाशीनंतरही चालू असलेल्या कुठल्याही संस्था वा उपक्रम यांच्याकडे पाहिले की त्याची खात्रीच पटते.
 
‘नॅशनल जिओग्राफिक’ या मासिकाने भूगोल या शाखेला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, एवढेच नव्हे तर आजवर जगाच्या भूगोलाचा कोपरा न् कोपरा धुंडाळायचा प्रयत्न केला. ‘टाइम्स लिटररी सप्लिमेंट’ने इंग्रजी साहित्यासाठी केवळ एक व्यासपीठच उपलब्ध करून दिले नाही; तर समाज आणि साहित्याचा उत्तम अनुबंध निर्माण केला आहे. ‘ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ने दरवर्षी अपडेट आणि सर्वसमावेशक आवृत्ती प्रकाशित करून इंग्रजी भाषेचा आलेख चढता ठेवला आहे. असे किती उपक्रम महाराष्ट्रात 100 वर्षानंतरही तेवढय़ाच जोमदार आणि दमदारपणे चालू आहेत?
 
जे नाटय़संमेलनाचे रडगाणे तेच साहित्य संमेलनाचे, जे मराठी चित्रपटांचे, तेच मराठी नाटकांचे आणि जे मराठी साहित्याचे तेच दिवाळी अंकांचे! एकूण सा-या रडकथाच!! आणि तरीही आपण मराठी ज्ञानभाषा होण्याच्या बढाया मारणार!!! 

 ‘खाऊनपिऊन टामटुम’ इतकीच आपल्या एकंदर सामाजिक जीवनाची लांबी- रुंदी आणि खोली असेल, किमान तर्कसंगत आणि तारतम्यपूर्ण विचार आपल्याला करता येत नसेल, प्रतिक्रिया आणि विचार यातला फरक समजून घेता येत नसेल, सदासर्वदा भूतकाळातच आपण रमून जात असू तर वर्तमानाच्या हाकांना आपल्याला प्रतिसाद देता येणार नाही, हे उघड आहे. जागतिकीकरणाच्या गेल्या दोन दशकांत मराठी समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि वैचारिक अशी सर्वच क्षेत्रात कमीअधिक फरकाने जी केविलवाणी अवस्था झाली, त्यातून याचे प्रत्यंतर येतेच आहे.
त्याला दिवाळी अंकही अपवाद नाहीत. 


या साचलेपणातून कसा मार्ग काढता येईल?
 
 काही गोष्टींना लगोलग सुरुवात करावी लागेल. पहिली गोष्ट म्हणजे स्वत:पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. इतिहासकार शेजवलकरांच्या शब्दांत सांगायचे तर ‘समाजहितासाठी आपल्या आवडीनिवडी, स्वार्थ आणि अहंकार यांना कात्री’ लावावी लागेल.
 
त्यादृष्टीने ‘साप्ता. साधना’ चांगला प्रयत्न करत आहे, हे त्यांच्या अलीकडच्या अंकावरून कुणाच्याही लक्षात येईल. ‘उत्तम अनुवाद’चा अरुण जाखडे यांचा प्रयत्न चांगला आहे, पण केवळ इंग्रजी, रशियन, फ्रेंच या भाषांमधून थेट अनुवाद करणे पुरेसे नाही, दर्जेदार लेखनाची कसोशीने निवड करणेही अगत्याचे आहे.
 
खरे तर सध्या पूर्वीपेक्षा कधी नव्हे एवढा काळ आणि तंत्रज्ञान अनुकूल आहे. अजूनही काही लेखक आपले सर्वोत्तम लेखन दिवाळी अंकासाठीच राखून ठेवतात. आता जाहिराती मिळवण्यासाठी फार आटापिटा करावा लागत नाही. चित्रकार, मुद्रक यांचीही कमतरता नाही. संगणकामुळे, इंटरनेटमुळे पूर्वीपेक्षा कितीतरी वेगाने काम होऊ शकते. अशा परिस्थितीत तर दिवाळी अंक अधिकच चांगले निघायला हवेत.
 
दुसरी गोष्ट निव्वळ साहित्यकेंद्री विषयांपेक्षा ताजे विषय काहींनी घेतलेही आहेत, पण ते फारच वृत्तपत्रीय आहेत हेही तितकेच खरे. नवे नवे आणि मुख्य म्हणजे समाजकेंद्री असलेले कितीतरी विषय हाताळता येण्यासारखे आहेत. पण असे फारसे घडताना दिसत नाही. ‘साहित्यकेंद्री’ सत्ताकेंद्र ‘समाजकेंद्री’  झाल्याने फारसे काही बिघडणार नाही.
 
पण असे अजूनही घडताना दिसत नाही. याचा अर्थ स्पष्ट आणि सरळ आहे. हे लोक प्रामाणिकपणे काम करत नाहीत. त्यांनी खरोखरच खडबडून जागे होण्याची नितांत गरज आहे.
 
मौज, ललित, दीपावली, अक्षर, साधना, अंतर्नाद असे अंकही चौकटीबाहेर जाण्याचा प्रयत्न का करत नाहीत हे कळायला मार्ग नाही. या अंकांना महाराष्ट्रभरात मोठे नाव आहे, प्रतिष्ठा आहे. त्यामुळे त्यांनी कुठलेही प्रयोग केले तरी त्यांचा अंक घेतला जाईल, त्या प्रयोगांचे कौतुकच होईल. हेच गेली अनेक वर्षे दिवाळी/वार्षिकांक काढणाऱ्या लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत या वृत्तपत्रांनाही लागू आहे. त्यांच्या हाताशी एवढी मोठी यंत्रणा असते, त्यामुळे त्यांचे अंक संग्राह्यच व्हायला हवेत. त्यांनी केवळ मोठय़ा नावांचा हव्यास सोडायला हवा. 

 थोडक्यात, ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही, त्यांनीच पुढाकार घेण्याची गरज असते. दिवाळी अंकांचा बहुतांशी कारभार अजूनही पुण्या-मुंबईतच एकवटलेला आहे. पण इथून प्रकाशित होणारे अंक म्हापशापासून चंद्रपूपर्यंत आणि नांदेड-उस्मानाबादपर्यंत जातात. म्हणजे पुण्या-मुंबईतला एक छोटा वर्ग दिवाळी अंकांबाबत महाराष्ट्राचे पुढारपण करतो आहे. त्यामुळे या छोटय़ा वर्गावरच मोठी जबाबदारी आहे. त्यांनी हे सांस्कृतिक प्रवक्तेपण नीट निभावले पाहिजे. आपले इतर बहुसंख्य लोक अनुकरण करत आहेत याचे भान ठेवले पाहिजे.


तर आणि तरच ही कोंडी फुटण्याची शक्यता आहे.  

Wednesday, September 14, 2011

सार्वकालिक आणि समकालीन

(ही पोस्ट विजयाबाई यांना पहिला विंदा पुरस्कार मिळाला त्यावेळी लिहिली होती.
२७ डिसेंबर २०१० ) 

‘‘कवितेबाबत माझी आवडनिवड विशिष्ट किंवा ठराविक नाही. स्वायत्त कविता माझ्या मनात घर करून राहते.’’

‘‘जी. ए. कुलकर्णीच्या दर्जाची, जातीची कथा मला लिहिता आली नसती. त्या पातळीवर जाण्याची आपली कुवत नाही याची मला जाणीव आहे.’’

‘‘मर्ढेकरांच्या सर्व कवितांचा अर्थ मला कळला आहे, असा माझा दावा नाही.’’

असा प्रांजळपणा विजयाबाई राजाध्यक्ष करू शकतात, नव्हे करतात. कारण कुठल्याही दुराग्रहापासून, अट्टाहासापासून त्यांनी स्वत:ला मुक्त ठेवलं आहे. विंदांच्या नावाच्या पहिला पुरस्कार त्यांना जाहीर झाल्यावरही ‘श्रेय विंदांचे आहे’ अशीच त्यांची प्रतिक्रिया होती.
 
खरं तर विजयाबाईंची पिढीच अशी आहे. ती सातत्यशील वृत्तीनं वाड्मयाचा गंभीरपूर्वक अभ्यास करणारी, साहित्यावर उत्कटपणे प्रेम करणारी आहे. रा. ग. जाधव, सुधीर रसाळ ही त्यांपैकीच काही नावं.
 
विजयाबाई मूळच्या कोल्हापूरच्या, विजया आपटे. शालेयवयात त्यांची वि. स. खांडेकर यांच्याशी मैत्री झाली. कोल्हापुरातच त्यांचं एम. ए. पर्यंतचं शिक्षण झालं.  1952साली मं. वि. राजाध्यक्ष कोल्हापूरला प्राध्यापक म्हणून आले. विजयाबाई त्यांच्या प्रेमात पडल्या, पत्नी झाल्या. नवपरिणीत जोडपं मुंबईला आलं, आणि त्यावेळच्या मुंबईत आणखी एका साहित्यिक दांपत्याची भर पडली. मुंबईत आल्यावर त्यांची पहिल्यांदा दिलीप चित्रे यांच्याशी ओळख झाली. वा. ल. कुलकर्णीचा तेव्हा समीक्षेमध्ये चांगला दबदबा होता. चित्र्यांनी बरईची वा.लं.शी, करंदीकरांशी ओळख करून दिली. ‘मौज’च्या गोटात सामील होण्याचा मार्ग ‘मौज’, ‘सत्यकथे’त विजयाबरईनी आधीच कथा लिहून सुकर करून घेतला होता.
 
विजयाबाई पहिल्यांदा एल्फिन्स्टन कॉलेजात मराठीच्या प्राध्यापक म्हणून जॉईन झाल्या. पुढे एसएनडीटी विद्यापीठात गेल्या. तिथून मराठीच्या विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. तिथं विजयाबाईंनी अनेक उत्तमोत्तम चर्चासत्रं घेतली. निवृत्तीनंतर विद्यापीठाने त्यांची ‘प्रोफेसर एमिरेटस’ म्हणून नेमणूक केली. विजयाबाईंनी त्याचं ‘सुप्रतिष्ठ प्राध्यापक’असं शुद्ध मराठी नामकरण केलं, स्वत:ला शोभेलंसं! 
 
विजयाबाई गेली पन्नासहून अधिक वर्षे कथालेखन करत आहेत. अठरा-वीस कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यातही त्यांनी स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. पण समीक्षेची पुस्तकं मात्र त्याच्या निमपटही नाहीत. आणि तरी ती मोलाची आहेत.
 
कवितेच्या आस्वादक समीक्षक अशीही विजयाबाईंची ओळख आहे. कविता हा त्यांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याचा, आस्थेचा, प्रेमाचा आणि चिंतनाचा विषय आहे. म्हणूनच त्यांचं समीक्षालेखन प्राधान्यानं कवितेविषयीचंच आहे. मर्ढेकरांच्या कवितेवर अगदी महाविद्यालयीन काळापासून त्यांनी चिंतनाला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी मर्ढेकरांवरच पीएच. डी. केली. मर्ढेकरांच्या एका एका कवितेवर आणि त्यातल्या एका एका शब्दांवर विजयाबाईंनी रमेश तेंडुलकर, शांता शेळके, मं. वि. राजाध्यक्ष यांच्याशी अतिशय सखोल चर्चा केल्या. पुढे ते चिंतन ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ (1991) या दोन खंडातून प्रकाशित झालं. त्याला 1993 साली साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला.
 
त्यानंतर त्यांनी ‘पुन्हा मर्ढेकर’ आणि ‘शोध मर्ढेकरांचा’ ही दोन चरित्रपर पुस्तकंही लिहिली. त्यामुळे काही वेळा असं वाटतं होतं की, बाई मर्ढेकरांमध्येच अडकून पडल्या आहेत की काय! पण करंदीकरांच्या समग्र साहित्याचं परिशीलन ‘बहुपेडी विंदा’ या दोन खंडी ग्रंथातून त्यांनी अलीकडेच केलं. आणि आता त्यांनी आरती प्रभूंवरही सविस्तर लिहिण्याचा मनोदयही व्यक्त केला आहे. म्हणजे 77व्या वर्षीही लेखनाचे नवेनवे विषय त्यांना हाकारे घालत आहेत. हेही पुन्हा त्यांच्या ‘सार्वकालिक आणि समकालीन’ अभ्यासूवृत्तीचे द्योतक आहे. 

‘संवाद’ (1985) या पुस्तकात विजयाबाईंनी वा. ल. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ आणि विंदा करंदीकर यांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत. त्यात या तीन श्रेष्ठींच्या वाडमयीन व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या लेखनामागील प्रेरणांचा, त्यांच्या एकंदर साहित्यिक वाटचालीचा सविस्तर आढावा आहे. वाड्मयीन मुलाखती कशा घ्याव्यात त्याचं हे पुस्तक चांगलं उदाहरण ठरावं. 

विजयाबाई वृत्तीनं धार्मिक, सश्रद्ध आहेत. तोच प्रकार त्यांच्या लेखनाबाबतीतही आहे. पण विजयाबरईच्या श्रद्धेला कर्मकांडाची झालर नसते. म्हणूनच त्यांना तटस्थ राहता येतं आणि मोकळेपणाने केवळ कवितेचाच विचार करता येतो. ‘बहुपेडी विंदा’च्या दुसऱ्या खंडांमध्ये ‘अष्टदर्शने’वर त्यांनी लिहिलं आहे, ‘‘पद्यीकरणाच्या मर्यादा ओलांडण्याइतपत तरी काव्य करंदीकरांकडून अपेक्षित होतेच. ‘अष्टदर्शने’मधून ही अपेक्षा त्यांना पूर्ण करता आलेली नाही.’’ ही टिप्पणी कुणाला सावधपणाची वाटेल. पण विजयाबाईंचं एकंदर लेखन पाहिलं तर त्या सगळ्यामध्ये असाच सूर दिसेल. ‘मला हे असं असं वाटतं..इतरांना यापेक्षा वेगळंही वाटू शकतं’ अशी त्यांची विनयशील आणि अनाग्रही भूमिका असते. सर्जनशील लेखनाविषयी फार ठाम भूमिका घेता येत नाहीत याचं ते चांगलं उदाहरण आहे. म्हणूनच विजयाबाई कुठल्याही सिद्धांताची फूटपट्टी कवितेला विनाकारण लावत नाहीत. पण त्यातही त्यांचा म्हणून एक ठामपणा असतोच.

 विजयाबाईंची समीक्षा ही आस्वादक किंवा चरित्रात्मक स्वरूपाची आहे. अशा प्रकारच्या समीक्षेला मराठी साहित्य व्यवहारात फारसं मानाचं स्थान दिलं जात नाही. हा आक्षेप जमेस धरून विजयाबाई आपलं लेखन करत राहिल्या आणि आता त्यांनी त्यालाच प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, असं म्हणण्यात अतिशयोक्ती होणार नाही. विजयाबाई बहुप्रसवा कथालेखिका आहेतच, पण तशाच त्या चांगल्या वाचकही आहेत. मराठीतल्या प्रस्थापितांपासून अगदी नवोदित कवी-कथाकारांचं लेखनही त्या तितक्याच अगत्यानं वाचत असतात. इंग्रजी साहित्याचंही त्यांचं मोठं वाचन आहे. 


2001च्या इंदूर इथं भरलेल्या साहित्य संमेलनाच्या विजयाबाई अध्यक्ष होत्या. आणि महाराष्ट्राबोहर झालेलं ते अलीकडच्या काळातलं शेवटचं संमेलन. तिथल्या आपल्या अध्यक्षीय भाषणाला त्यांनी ‘सार्वकालिक आणि समकालीन’ असं अन्वयर्थक शीर्षक दिलं होतं. त्यात साहित्याचा नेमका अर्थ, सृजनाची प्रक्रिया कशी असते, सर्जनाच्या वाटेवर काय काय असते याविषयी त्यांना आकळलेलं त्यांनी सांगितलं. हे त्यांचं असिधाराव्रत अजूनही चालू आहे, असंच चालू राहो.

Monday, September 5, 2011

बेकारी आणि पुस्तकं

माझ्या २००६ च्या दैनंदिनीतली ही काही पाने...


आज सोमवार होता. खिशात फक्त साडेसात रुपये. त्याचं पावशेर दही आणलं. त्यात साखर कालवून तेवढंच नाष्टय़ाला खाल्लं आणि बाहेर पडलो. आठवलेंकडे गेलो. त्यांच्याकडे ‘बासष्टचे गुन्हेगार’ आणि जॉन रीड यांचं ‘जगाला हादरवणारे दहा दिवस’ हे बोल्शेविक क्रांतीविषयीचं पुस्तक अशी दोन पुस्तकं उधारीवर घेतली, पन्नास रुपयांना. 
............
  आज जॉर्ज ऑर्वेलच्या निवडक लेखनाचा ओरिएंट लाँगमनचा एक छोटा संग्रह विकत घेतला. त्यातले सर्वच लेख चांगले आहेत. विशेषत: ‘व्हाय आय राईट?’ आणि ‘व्हाट इज सायन्स?’ हे दोन लेख उत्कृष्टच. ‘व्हाय आय राईट?’मध्ये ऑर्वेलनं लिहिलं आहे की, कोणताही लेखक चार कारणांसाठी लिहीत असतो- निव्वळ आत्माभिमान (Sheer egoism), सौंदर्यशोधाची ऊर्मी (Aesthetic enthusiasm), ऐतिहासिक जाणीव (Historical impulse) आणि राजकीय हेतू (Political purpose). ऑर्वेल म्हणतो गद्य लेखनामागे ही चार कारणं असतातच. ती व्यक्तीगणिक कमी-जास्त, मागे-पुढे असतील एवढाच काय तो फरक. पण या कारणांशिवाय लेखन करणारा लेखक दांभिक तरी असतो किंवा नि:सत्त्व तरी.     अप्पा बळवंत चौकातून आठवलेंकडे गेलो. सव्वाआठ वाजता. पाच-दहा मिनिटांनी आठवले आले. मग त्यांच्याकडे जॉर्ज आर्वेलची ‘अ‍ॅनिमल फार्म’, ‘लेनिन’ आणि ‘अरुण शौरी यांचे वडील एच.डी. शौरी यांच्यावरील एक पुस्तक अशी तीन पुस्तकं केवळ 25 रुपयांना घेतली. एच.डी. शौरी हे आयसीएस अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर दिल्लीमध्ये एक नागरी संस्था स्थापन करून बरंच काम केलं होतं. त्यांच्याविषयीचं हे पुस्तक निर्मितीच्या अंगानं नितांतसुंदर म्हणावं इतकं देखणं आहे. 
..............
आज संध्याकाळी डेक्कनवरील संभाजी पूलावरच्या रद्दीवाल्याकडे ‘प्राइड ऑफ इंडिया’च्या बऱ्याच प्रती दिसल्या. कॉफी टेबल आकाराचं हे पुस्तक आजवरच्या ‘मिस इंडियां’बद्दल होतं. ते पर्सिस खंबाटा या एका मिस इंडियानंच संपादित केलं होतं. पण पुस्तक १९९७पर्यंतचं होतं. म्हणजे दहाएक वर्षापूर्वीचं. पण या स्पर्धेची सुरुवात कशी झाली, आजवर कोण कोण मिस इंडिया झालं अशी बरीच महत्त्वाची माहिती त्यात होती. रद्दीवाल्याला किंमत विचारली तर म्हणाला 200 रुपये. विचार केला, ‘आपल्याला काय उपयोग या पुस्तकाचा?’ म्हणून त्याचा विचार सोडून दिला.
.................. 
आज परत डेक्कनवर गेलो तर कालच्या ‘प्राइड ऑफ इंडिया’च्या प्रती जशास तशा होत्या. मग पुस्तक पुन्हा एकदा चाळलं. चांगलं वाटलं. आता किंमत 100 रुपयावर आली होती. मग घेऊन टाकलं. 
...................
आठवले आज जरा उशिराच आले. पावसाची भूरभूर चालूच होती. आल्यावर ‘शेक्सपिअर खंड’, दि. पु. चित्रे यांचं ‘चाव्या’, अ.भा. नाटय़ संमेलन 1975ची स्मरणिका आणि ‘पूर्वाचलाचे आवाहन आणि आव्हान’ ही चार पुस्तकं 70 रुपयांना घेतली. मागील बाकी 110 रुपये. एकंदर 180 रुपये.
.................... 
सकाळी साडेसातला उठलो. पावणे नऊच्या सुमारास आठवलेंकडे गेलो. ‘लोकहितवादींची शतपत्रे’, ‘सांगते ऐका’, ‘जंगलातील दिवस’, ‘यशवंतराव चव्हाण - राजकारण व साहित्य’ आणि कार्ल मार्क्‍स-इंगल्स यांचं ‘भारताचे स्वातंत्र्युद्ध’ ही पाच पुस्तकं 120 रुपयांना घेतली. एकंदर बाकी 320 रुपये. तेथून लक्ष्मी रोडला आठवलेंच्या मुलाकडे आलो. रात्रीच ‘कॅथरीन मेयो आणि भारत’ हे पुस्तक वाचलं होतं. मेयोबाईंच्या ‘मदर इंडिया’ला प्रत्युत्तरादाखल लिहिलं गेलेलं ‘सिस्टर इंडिया’ मिळालं. ते 30 रुपयांना घेतलं. मग नॅशनल जिओग्राफिकचा जानेवारी 2006चा आणि एक जुना अंक 30 रुपयांना घेऊन त्याचीही 60 रुपये उधारी केली.

Sunday, August 21, 2011

सत्तर वर्षाचा तरुण


साधारणपणे 18 ते 35 हा वयोगट तरुण मानला जातो. अठराव्या वर्षी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळतो तर पस्तीशी हा तारुण्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. या अर्थाने 1960 ते 80 हा डॉ. कुमार सप्तर्षी यांचा बहराचा काळ मानता येईल तर 65 ते 80 या काळाला ख-या अर्थाने ‘सप्तर्षी पर्व’ म्हणता येईल. वयाच्या 18 ते 25 या काळात प्रत्येकाची वैचारिक जडणघडण होते. या काळात आपल्यावर परिणाम करणारे घटक आपली आयुष्याबद्दलची एकंदर भूमिका ठरवत असतात.
 
सप्तर्षी अहमदनगर जिल्ह्यातील राशीन या दुष्काळी खेडेगावातून साठच्या सुमारास पुण्यात आले, तेव्हा 21 वर्षाचे होते. नगरच्या वास्तव्यात त्यांना राजकीय पक्ष, पुढाऱ्यांच्या सभा, मोर्चे, आंदोलने यांचा चस्का लागला होता. तो पुण्यात आल्यावरही कायम राहिला.
 
याच वेळी देशपातळीवर बरेच काही घडत होते. डॉ. श्रीराम लागू यांनी स्वत:च्या पिढीचे वर्णन ‘गाफिल पिढी’ असे केले आहे, तर सप्तर्षी स्वत:च्या पिढीचे वर्णन ‘आयडेंटीटी क्रायसिसमध्ये वाढलेली पिढी’ असे करतात. कारण 1962 साली भारताचे चीनबरोबर युद्ध झाले. या पराभवाने त्या वेळच्या तरुण पिढीमध्ये मोठे नैराश्य निर्माण झाले. त्यानंतर दोनच वर्षानी नेहरूंचा मृत्यू झाला. नंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. लगेच पाकबरोबर युद्ध झाले. ताश्कंदला असताना शास्त्रींचे आकस्मिक निधन झाले. 1967 निवडणुकांमध्ये काँग्रेसची एकाधिकारशाही उद्ध्वस्त झाली. राम मनोहर लोहिया यांनी ‘अँटी काँग्रेस’ची चळवळ सुरू केली. 67-68 या काळामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये प्रचंड मोठे दुष्काळ पडले. ही झाली त्यावेळची भारतातली परिस्थिती. साधारपणे याच काळात अमेरिकेत हिप्पी संस्कृतीचा उदय झाला होता. क्रुश्चेव्ह, चे गव्हेरा हे तरुणाइचे हिरो म्हणून पुढे येत होते. शेजाराच्या पाकिस्तानमध्ये आर्मीचे वर्चस्व वाढत होते तर बांगलादेशामध्ये बरेच अराजक माजले होते. म्हणजे भारतात आणि भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अस्वस्थता होती. या परिस्थितीचा त्या वेळच्या तरुणाईवर मोठा परिणाम झाला. या साऱ्या घुसळणीतून ती तावूनसुलाखून निघाली. सप्तर्षी या काळाचंच अपत्य आहेत, हे नीट ध्यानात घेतल्याशिवाय त्यांचे योगदान नीटपणे समजून घेता येत नाही आणि त्यांचे विश्लेषणही करता येत नाही.
 
त्यातही सप्तर्षीचे वेगळेपण असे की, ते एका सामान्य खेडय़ातून आलेले होते. त्यांचे वडील त्या भागातले पहिले सरकारी डॉक्टर होते. अशा सुखवस्तू घरातला लाडका पण अभ्यासू मुलगा पुण्यात आल्यावर त्याला पंख फुटणे स्वाभाविक होते. एस. पी. कॉलजेनंतर ते वैद्यकीय शिक्षणासाठी बी. जे. मेडिकलला गेले. तिथे असताना सप्तर्षीनी तत्त्वज्ञानावरची पुस्तके आणि टॉलस्टॉय, गांधी, लेनिन, माओ यांच्या पुस्तकांची पारायणे केली. त्या वेळी बी. जे.तले डॉक्टर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे चांगल्या प्रकारे समाजजीवनाशी निगडीत होते. डॉ. अनिल अवचट,   डॉ. अनिल लिमये, डॉ. जब्बार पटेल, डॉ. सतीश आळेकर ही काही नावे वानगीदाखल सांगता येतील. तर पुण्यात राजकीय-समाजिक-सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नवनव्या घडामोडी घडत होत्या. एसेम जोशी, भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव, ग. प्र. प्रधान, नानासाहेब गोरे या समाजवादी नेत्यांकडे ही तरुण मंडळी आकर्षित होऊ लागली. समाजवादी, संघपरिवार यांच्या संस्था-संघटनांनी चांगली घुसळण चालवली होती. त्यामुळे त्या वेळच्या तरुण पिढीला आपण काहीतरी करावे असे वाटत होते.
 
‘युक्रांद’ची स्थापना म्हणजे पुण्यातले बौद्धिक वातावरण, राष्ट्रीय अस्वस्थता आणि घरचे टिपिकल ब्राम्हणी वातावरण यातून सप्तर्षीमधल्या तरुणाची जडणघडण झाली आहे. 1965 साली सप्तर्षीनी ‘यूथ ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली. त्या वेळी ते 26 वर्षाचे होते. या त्यांच्या संघटनेने विद्यार्थ्यांची अनेक आंदोलने केली. पूनम हॉटेलमध्ये वेटरची कामे करून, बूटपॉलिश करून बिहारमधील दुष्काळग्रस्तांसाठी 26,000 रुपयांचा निधी पाठवला. शिवाय 67च्या मे महिन्यात गया जिल्ह्यातील रजौली गावी (आता नवादा जिल्हा) अनिल अवचट आणि सप्तर्षीनी दोन महिने दवाखाना, कार्यकर्त्यांसाठी खाणावळ चालवली. बिहारहून आल्यावर, काहीतरी करून दाखवण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या या तरुणांनी ‘युक्रांद’ची स्थापना केली. या दलाचे मार्गदर्शक होते, प्रा. राम बापट, गं. बा. सरदार आणि दि. के. बेडेकर. या मान्यवरांना तरुण पिढीकडून चांगल्या अपेक्षा होत्या. भारत स्वतंत्र झाला असला तरी सामाजिक-राजकीय पातळीवर आमूलाग्र बदलाची गरज त्यांनी जाणवत होती, त्यामुळे ते तरुणाईवर भिस्त ठेवून होते. 

 ‘युक्रांद’ची स्थापना सिंहगडावरील लोकमान्य टिळकांच्या बंगल्यात झाली. त्या वेळी 40 तरुणी आणि 60 तरुण, असा 100 युवकांचा गट सप्तर्षि-अवचट यांनी तयार केला होता. क्रांती झाल्याशिवाय भारत सामर्थ्यशाली होणार नाही, म्हणून क्रांती करायची. पण कशी, तर आधी वैचारिक क्रांती, नंतर सामाजिक सुधारणा आणि मग सर्वागीण क्रांती असे त्यांचे तीन टप्पे होते. त्यावर सप्तर्षीचा आजही विश्वास आहे. या त्रिसूत्रीपासून ते आजही ढळलेले नाहीत. ‘आम्ही विद्यार्थी आणि आमच्या दंगली’ ही त्यांची पुस्तिका तेव्हा प्रकाशित झाली. ती वाचून पु. ल. देशपांडे, एसेम जोशी यांनी त्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ‘माणूस’च्या माजगावकरांनी ती आपल्या अंकात छापली. ‘आम्ही विद्यार्थी दंगली करणार. का करू नयेत?’ अशी भूमिका सप्तर्षीनी या पुस्तिकेमध्ये मांडली होती.
 
‘युक्रांद’ची चार सूत्रे होती- 1) स्त्री-पुरुष समानता, 2) जातीपातीला विरोध, 3) धर्मनिरपेक्षता आणि 4) ग्रामीण-शहरी भागातली दरी मिटवणे. या चारही संस्कारांनी त्या वेळचा प्रत्येक युक्रांदी आणि युक्रांदच्या संपर्कातला तरुण झपाटून गेला होता. या चार संस्कारांनी त्या वेळच्या अनेक तरुणांना घडवले. नंतर काही कारणांनी युक्रांदमधून बाहेर पडलेल्यांनीही स्त्री-पुरुष समानतेबाबत आपल्यापरीने प्रयत्न केले. त्याची सुरुवात स्वत:पासून केली. जातीपातीला विरोध करण्यासाठी जाणीवपूर्वक आंतरजातीय लग्ने केली. धर्मनिरपेक्षतेचा लढा हा संघाच्या जातीयवादी प्रचाराला टक्कर देण्यासाठी उभारलेला लढा होता. त्या वेळची तरुण पिढी ही आता साठी-सत्तरीची आहे. आणि ती सर्व आजही ‘युक्रांद’चे योगदान मान्य करते. त्यात मुकुंद टाकसाळे, नरेंद्र दाभोळकर, नीलम गोऱ्हे, आनंद करंदीकर, प्रभाकर करंदीकर, सुरेश खोपडे, बबनराव पाचपुते, शांताराम पंदेरे, विलास भोंगाडे अशा अनेकांचा समावेश आहे. 77 साली युक्रांदमध्ये मतभेद झाल्यावर सप्तर्षी बाहेर पडले, तेव्हा ते पस्तीशीचे होते. मात्र 67 ते 77 या दहा वर्षाच्या काळात तत्कालीन तरुण पिढीला सुसंस्कारित करण्यात सप्तर्षी यांचा फार मोठा वाटा आहे.
 
आणीबाणी 1975 ला आली, त्याआधीच जेपींचे भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी आंदोलन सुरू झाले होते. त्यामुळे इंदिरा गांधींच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना झाली. ते सत्तेवर आले, पण त्यांचे सरकार जेमतेम अडीच वर्षेही टिकले नाही. या काळात सप्तर्षी महाराष्ट्रात होते. 80 नंतर तर जनता पक्ष पूर्णपणे भरकटला. भाजपने वेगळा मार्ग आखला, समाजवाद्यांचे पूर्ण विघटन होऊन अनेक समाजवादी राजकीय परिघाबाहेर- एनजीओंमध्ये गेले. क्रांतीची स्वप्ने पाहणा-या सप्तर्षीसारख्यांना या उलथापालथीने काहीसे निराश केले.
 
1967 ते 83 या काळात आजवर सप्तर्षीना एकंदर पस्तीस वेळा तुरुंगवास झाला आहे. 1973 साली सप्तर्षीनी पुण्यात पुरीच्या शंकराचार्याबरोबर जाहीर वादविवाद केला. 1967 मध्ये पुण्यातील महाविद्यालयांनी केलेल्या फीवाढ विरोधी आंदोलनापासून ते 83 मध्ये राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या ‘कुलगुरू हटाव’ मोहिमेपर्यंतची सप्तर्षीची सर्व आंदोलने ही विद्यार्थ्यांसाठीची आहेत. त्यांचा परीघ पुण्यापुरता मर्यादित नाही तर तो महाराष्ट्रभर विखुरलेला आहे. ऐंशीच्या दशकात सप्तर्षी महाराष्ट्रातल्या तरुणांचे हिरो होते, ते यामुळेच.
 
80-90 या दशकात सप्तर्षीनी वेगवेगळे प्रयोग केले. राशीनला शाळा-कॉलेज काढले, आसपासच्या गावांमध्ये शेतीचे प्रयोग केले. जनता दलाच्या तिकिटावर नगरमधून दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना यश आले नाही.
 
दुसरे पर्व
 
1991 साली सप्तर्षीचे दुसरे पर्व सुरू झाले. त्यांनी ‘सत्याग्रही विचारधारा’ हे वैचारिक मासिक सुरू केले. त्या वेळी माध्यमांचे आजच्या इतके वैपुल्य नव्हते. त्यामुळे ‘सत्याग्रही विचारधारा’ वैचारिक मासिक म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांपर्यंत पोहचले. 2001 पर्यंतचा काळ सप्तर्षीचा संपादक म्हणून बहराचा काळ होता. 2001ला त्यांनी ‘युक्रांद’चे पुनरुज्जीवन केले.
 
संपादक म्हणून सप्तर्षीनी जातीयवादी, धर्माध शक्ती आणि काँग्रेसची सरंजामशाही यांच्याबाबतची आपली भूमिका सातत्याने मांडली आहे. विश्व हिंदू परिषद, भाजप आणि महाराष्ट्रातल्या प्रांतीय संघटना या धर्माध शक्ती; शिवसेना, मराठा महासंघ, ब्राम्हणांच्या संघटना, दलितांच्या अस्मितेवर आधारित संस्था-संघटना हे जातीयवादी प्रवाह आणि काँग्रेसची संरजमाशाही या सर्वावर सप्तर्षीनी सडेतोड आणि अतिशय मुद्देसूद टीका केली आहे. याचबरोबर समाजवाद्यांमधील गट-तट आणि त्यांच्या भोंगळपणावरही ते टीका करत आले आहेत. हा त्यांचा पोलिटिकल करेक्टनेस हेच त्यांचे 90 नंतरचे महत्त्वाचे योगदान आहे, वैचारिक बलस्थान आहे. करेक्टिव्ह फॅक्टर म्हणून भूमिका बजावताना ते कुणाच्याही आहारी गेले नाहीत, त्यांनी कुणाचाही अनुनय केला नाही, हे त्यांचे वैचारिक मोठेपण.
 
व्यसन हेच टॉनिक
 
खाणे आणि गप्पा हे सप्तर्षीचे दोन महत्त्वाचे वीकपॉइंट्स आहेत. आजही त्यांच्याभोवती सतत तरुणांचा गराडा असतो. कुठल्याही तरुणाशी त्यांची पहिल्या पाच मिनिटांत मैत्री होते. कुठल्याही तरुणाला त्यांचे बोलणे दोन-तीन तास ऐकत राहावेसे वाटते. असे महाराष्ट्रात किती लोक आहेत? आजच्या तरुणाईबद्दल फारसे काही बरे बोलले जात नाही. पण सप्तर्षीना विचारले तर ते या तरुण पिढीचे गुणगानच करतील. ते तरुणाईबद्दल अजिबात निराश नाहीत आणि स्वत:च्या आजवरच्या यशापयशानेही त्यांना नैराश्य आलेले नाही. एवढा मोठा काळ पाहिलेल्या, त्यातही उमेदीच्या काळात सक्रिय राहिलेल्या माणसांना उतारवयात नैराश्य येते. ती फार नकारात्मक बोलतात, असा सार्वजनिक अनुभव आहे. पण सप्तर्षी तिथेही आपली विकेट काढतात. त्यांनी स्वत:ला भयंकर भयग्रस्ततेतून वाचवलेले आहे आणि आजच्या तरुणाईलाही आपल्या परीने वाचवायचा ते प्रयत्न करत आहेत.
 
तरुण मुले त्यांचे का ऐकतात? कारण ते तरुणाईच्या भाषेत बोलतात, त्यांना अपील होईल असे बोलतात. पोलिटिकली-सोशली-कल्चरली करेक्ट काय आहे, हे नेमकेपणाने सांगतात. त्यासाठी या माणसाकडे प्रचंड उत्साह आहे. तो सतत उत्साहाने फसफसलेला असतो. त्यामुळे तुम्ही कितीही प्रश्नांचे जंजाळ त्यांच्याकडे घेऊन गेलात तरी ते ऐकणाऱ्याचे समाधान होईपर्यंत खुलासेवार बोलतील, प्रश्नांशी भिडण्याची खिलाडूवृत्ती समजावून सांगतील. गप्पा मारायला ते सदैव तयार असतात. ते त्यांचे व्यसन इतके दांडगे आहे की, त्यालाच त्यांनी आपले टॉनिक बनवले आहे. त्यांच्या या गप्पांमध्ये कधीच म्हातारेकोतारे नसतात, तर लातूर-बीड-उस्मानाबाद-सोलापूर-कोल्हापूर या जिल्ह्यांमधून आलेली तरुण मुले असतात. सतत तरुणांच्या गराडय़ात असलेल्या सप्तर्षीना चिरतरुणही म्हणवत नाही. ते तरुणच आहेत!
 त्यामुळे आज त्यांना त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणा-याला ते म्हणतील, ‘तू माझा शत्रू आहेस का? की माझ्या शत्रूने तुला पाठवलेय?’

Sunday, August 14, 2011

सर्वव्यापी, सर्वज्ञानी जनलोकपाल!

 
‘मनुष्यघडणीमध्ये शारीरिक कष्टांचं महत्त्व कुणी नाकारत नाही पण मेंदू बिथरलेला असेल आणि अकलेचं भांडं लहान असेल तर कष्टातून तरी कोण काय शिकेल? इतरांना  देण्यासारखं त्याच्याकडे काय उरेल? आजही हा सत्प्रवृत्त पण अडाणी गोंधळ संपलेला नाही. अण्णा हजारे यांना ते केवळ निर्भय आणि तळमळीचे आहेत एवढय़ा एकाच कारणासाठी गुरू मानणारे अपराधी सुशिक्षित काही थोडे नाहीत.’’ 
-विनय हर्डीकर, विठोबाची आंगी, 2005 
 
‘‘सामाजिक प्रश्न प्रदर्शनात्मक मार्गाने सुटू शकतील का, हा विचार या आत्मिक व नैतिक सामर्थ्य लाभलेल्या अत्यल्पसंख्य व्यक्तींनी करणे आवश्यक आहे. बहुसंख्य नागरिक स्वेच्छेने वा अपरिहार्यपणे भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतले असताना, हे होणे शक्य नाही, हे वास्तव आहे. त्यासाठी सामाजिक नीतिमत्ता बदलली पाहिजे.’’
- अरुण टिकेकर, तारतम्य, 1994
 
भ्रष्टाचाराच्या विरोधात गेली 10-12 वर्षे सातत्याने आवाज उठवणा-या अण्णा हजारे यांनी गेले काही महिने ‘जनलोकपाल विधेयका’च्या निमित्ताने पुन्हा एकदा या देशातल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्लीमध्ये 16 ऑगस्टपासून सुरू होणारे त्यांचे बेमुदत उपोषण या आंदोलनाचा एक उत्कर्ष बिंदू ठरण्याची शक्यता आहे. अण्णांच्या या आंदोलनाच्या निमित्ताने काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. 


भ्रष्टाचाराविरोधात इतकी वर्षे लढा देऊनही अण्णांचे नेतृत्व वा आंदोलन महाराष्ट्राच्या सीमेबाहेर फारसे गेले नव्हते. ते ‘जनलोकपाल’च्या निमित्ताने एकदम राष्ट्रीय पातळीवर गेले. अगदी टीव्हीच्या माध्यमातून अण्णा देशभरात, घरोघरी पोहोचले. सध्या अण्णांवर प्रसिद्धीचा मोठा झोत आहे. होऊ घातलेल्या उपोषणाकडे संबंध देशातल्या जनतेचेच नव्हे तर जगातल्याही अनेक देशांचे लक्ष लागलेले आहे. पण राष्ट्रीय स्तरावर जाऊनही अण्णांच्या आंदोलनाचा फॉर्म्युला काही बदललेला दिसत नाही.
 
अण्णांचा भ्रष्टाचाराबाबतचा निर्धार स्तुत्य असाच आहे, पण तो व्यवहार्य आहे का, हा कळीचा आणि मूलभूत स्वरूपाचा प्रश्न आहे. दुसरे, अण्णांचा प्रामाणिकपणा आणि सचोटीबद्दल शंका घेण्याचे धाडस कुणीच करणार नाही, इतक्या या गोष्टी वादातीत आहेत. पण टीम अण्णांच्या ‘जनलोकपाल विधेयका’बाबत आणि त्यांच्या त्याबाबतच्या टोकाच्या आग्रहाबाबत शंका घ्यावी, असाच प्रकार आहे!
 
सुरुवातीला टीम अण्णांच्या केंद्र सरकारबरोबर लोकपाल मसुद्याबाबत चर्चेच्या फे-या होत असताना शांती भूषण यांनी ‘आपण नवी घटना बनवत आहोत’ असे सरकारी समितीतील सदस्यांना सुनावले होते, तेव्हाचे कायदामंत्री विरप्पा मोइली यांनी त्यांना तत्काळ अडवून, ‘तो कौल आपल्याला अजून जनतेने दिलेला नाही’ असे ऐकवले होते. पण टीम अण्णा त्या गैरसमजातून अजूनही बाहेर आलेले नाहीत, याचे मूर्तिमंत प्रतिबिंब त्यांच्या जनलोकपालाच्या मसुद्यामध्ये पडलेले आहे. अनेक परस्परविसंगती, हेकेखोरपणा, अल्पसमज, काही वेळा बोलवांवर विश्वास आणि अपुऱ्या आकलनातून त्यांचे निकर्ष आलेले आहेत, अशी खात्री त्यांचा मसुदा वाचल्यानंतर कुणाही सुबुद्ध माणसाची होईल.
 
मुळात मतभिन्नता आहे ती, लोकपाल विधेयकाबाबत सरकारच्या आणि टीम अण्णांच्या दृष्टिकोनात. सरकारला लोकपाल ही यंत्रणा आहे त्या व्यवस्थेत आणि मर्यादेत राहून करावी अशी माहितीचा अधिकार कायद्यासारखी, पण त्यापेक्षा सक्षम असावी असे वाटते. माहिती अधिकार कायद्याची परिणामकारकता पाहिली तर, आहे त्या व्यवस्थेतही शासनव्यवस्थेला, गैरकारभारांना कसा आळा घालता येतो, याची काही प्रमाणात तरी खात्री पटते. गंमत म्हणजे या कायद्याबाबत अण्णा हजारे यांचाच पुढाकार होता. महाराष्ट्रात हा कायदा पहिल्यांदा लागू करण्यात अण्णांचेच योगदान आहे. हा कायदा न्याय्य आणि संसदीय परंपरेचे भान ठेवणारा आहे. प्रत्यक्ष शिक्षा करण्याचा कुठलाही अधिकार नसताना तो आपल्या मर्यादेतही चांगले काम करत आहे हे अण्णा स्वत:ही कबूल करतील. गेल्या दोन-अडीच वर्षात भारतभरात आठ माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्त्या झाल्या, हे निषेधार्ह आहेच, पण यातून या कायद्याचा वचकही सिद्ध होत नाही काय? त्याबाबत कोणत्याही प्रकारचा विचार न करता, नव्या कायद्यासाठी सर्वाना वेठीला धरायचं हा दुराग्रह ठरेल.
 
एकदा म्हणायचे या देशातली न्यायव्यवस्था ब-यापैकी निर्दोष आहे, गेल्या 54 वर्षात भारतात लोकशाही रुजवण्यात न्यायव्यवस्थेचा मोठा वाटा आहे.. नंतर म्हणायचे न्याययंत्रणाही लोकपालाच्या कक्षेत हवी. त्यात सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांचाही समावेश हवाच. कारण का, तर ‘काही न्यायाधीशांच्या संशयास्पद व्यवहाराच्या बातम्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्याचे ऐकण्यात येते.’- अशी मोघम विधाने ‘जनलोकपाल’च्या प्रचारापत्रकांत छापली जाताहेत.
 
‘जनतेसमोर खटल्याचा निवाडा होईल म्हणजे पारदर्शकता येईल’ हा टीम अण्णांचा सल्ला फार आकर्षक आणि गोंडस असला तरी तो अजिबात व्यवहार्य नाही. शिवाय ही जनता नेमकी कोण आणि किती असेल हेही या विधेयकात स्पष्ट नाही. यामुळेच तर टीम अण्णांचे विधेयक केंद्र सरकारला आणि देशातल्या बहुतेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मान्य नाही.

 दीर्घकालीन आणि अतिशय जटिल स्वरूपाच्या समस्येवरची उपाययोजनाही तितकीच दीर्घकालीन आणि जबाबदार स्वरूपाची असावी लागते. त्यासाठी प्रत्येक वेळी नव्या व्यवस्थेचा पर्याय असू शकत नाही. आहे त्या यंत्रणांचा सक्षमपणे वापर केला तरी खूप काही करता येऊ शकते. मात्र या यंत्रणा सक्षम करण्यासाठी काहीच प्रयत्न करायचे नाहीत, तशा शक्यताही गृहीत धरायच्या नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा होतो की, प्रश्नांची गुंतागुंत टीम अण्णांना समजून घ्यायची नसावी वा ती त्यांना समजलेली नसावी. त्यांच्या आग्रहातून तरी तसेच चित्र निर्माण होत आहे. टीम अण्णा फक्त समस्येचे सुलभीकरण करण्याच्या नि झटपट तोडगा काढण्याच्या मागे आहे. त्यामुळे टीम अण्णांना लोकशाही शासनव्यवस्था तरी नीट कळली आहे का, याचीही शंका येते. 
  
समजा टीम अण्णांच्या जनलोकपालातील तरतुदीनुसार एक समांतर न्यायव्यवस्था निर्माण केली तरी त्यासाठीची प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्याची आणि कर्तव्यदक्ष माणसे आणणार कुठून? कारण ‘भ्रष्टाचाराने संपूर्ण देशात थैमान घातले आहे, सामान्य माणसांना जीवन जगणे अशक्य झालेले आहे, कुठेही गेले तरी पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही’ असे निदान टीम अण्णाच करत आहे. शिवाय जनलोकपालाच्या चौकशीची पद्धत भारतीय राज्यघटनेतल्या फौजदारी प्रक्रिया संहितेनुसारच असेल असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे प्राथमिक चौकशीनंतर फिर्याद दाखल केली जाईल. नंतर तपास होईल व न्यायालयात खटला दाखल केला जाईल. या प्रक्रियेनुसारच खटल्यांचा न्यायनिवाडा करण्यासाठी तालुका स्तरापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत एक मोठी यंत्रणा देशात कार्यरत आहे. तिथे दाखल होणारे खटले, त्यांचा तपास, साक्षी-पुरावे यात एवढा वेळ जातो की, काही काही खटल्यांचा निकाल लागायला पंचवीस-तीस वर्षे लागतात. शिवाय शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये हे भारतीय न्यायव्यवस्थेचे मूलभूत तत्त्व आहे. त्यानुसार आरोपीला त्याच्या बचावाची पूर्ण संधी दिली जाते. न्यायालयात पुरावे सिद्ध करणे किती अवघड असते हे टीम अण्णांनाही चांगले माहीत असावे. तेव्हा जनलोकपालांची यंत्रणाही न्यायव्यवस्थेप्रमाणे काम करणार असेल, ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार असेल, तर त्यांचाही प्रत्येक खटल्याचे साक्षी-पुरावे तपासण्यामध्ये वेळ जाईल की नाही? की खटला समोर आल्या-आल्या ‘छू मंतर’ करून त्याचा निकाल दिला जाईल?
 
म्हणजे अण्णांचे लोकपाल आणि लोकायुक्त सर्वज्ञानी, सर्वव्यापी परमेश्वरच असावे लागतील. इतक्या जादुई वेगाने काम करणे कुठल्याही मनुष्यप्राण्याला शक्य होईल असे वाटत नाही. त्यामुळे असा प्रकार एखाद्या कथा-कादंबरीतल्या फँटसीमध्येच घडू शकतो. थोडक्यात टीम अण्णा एका अवास्तव ‘युटोपिया’मध्ये वावरत आहे.
 
एका मर्यादित अर्थाने अरुण भाटिया, गो. रा. खैरनार आणि टी. एन. शेषन यांच्याशी टीम अण्णांचे साम्य दिसते. निर्भीड आणि स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्ती या भाषणातल्या मिनिटामिनिटाला टाळी घेणाऱ्या वाक्यासारख्या असतात! त्यात वास्तवाची आणि भाकितांची अद्भुत सरमिसळ असते. म्हणून त्या हिरो होतात. समाज त्यांना डोक्यावर घेतो. या कारणांमुळे प्रशासनातला भ्रष्टाचार, गैरव्यवहार निपटून काढण्याचा प्रयत्न करणारे सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातले ताईत होतात. त्यांची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ होते. ते स्वत:ही तिच्या मोहात पडतात आणि आपण आधी प्रशासकीय अधिकारी आहोत, जबाबदार नागरिक आहोत हे विसरून जातात. त्याचे पर्यवसान स्वत:च्याच कारकिर्दीचा आत्मघात करून घेण्यात होतो. देशातला सर्व भ्रष्टाचार निपटून काढण्याचे उत्तरदायित्व आपल्याकडेच आहे आणि आपणच ते करू शकतो, या चढेल अहंकारानेच प्रशासनाचे आणि पर्यायाने समाजाचेही नुकसान होते. त्यातून प्रशासन सुधारत नाही अन् समाजालाही दुसरे भाटिया-खैरनार-शेषन घडवण्याच्या शक्यता दिसत नाहीत.
 
अण्णा वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमांमधून, जाहीर भाषणांतून ‘काळे इंग्रज, गोरे इंग्रज’, ‘दुसरा स्वातंत्र्यलढा’, ‘लोकपाल नहीं तो, चले जाव’ अशा आकर्षक घोषणा देऊन जनतेला भावनिक आव्हानांच्या पेचात  पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. जनताही शासकीय अनास्था, दिरंगाई आणि अनागोंदीला, सततच्या महागाईला विटलेली असल्याने अण्णांच्या या प्रलोभनाला बळी पडत असल्याचे चित्र दिसते आहे. मात्र सामाजिक नीतिमत्तेच्या आणि सार्वजनिक चारित्र्याच्या संकल्पनेत या गोष्टी बसत नाहीत, हे समजून घेण्याची गरज आहे. 

 अण्णांच्या या आग्रहाच्या दुराग्रहामुळेच त्यांच्या याआधीच्या आंदोलनांना सुरुवातीला समर्थन देणारे, जाहीर पाठिंबा देणारे आणि त्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षि, भाई वैद्य, सदाशिवराव तिनईकर, जे. एफ. रिबेरो, अविनाश धर्माधिकारी यांच्यासारखे अनेक लोक नंतर अण्णांपासून दुरावले. कारण आंदोलनाचा परीघ न्याय्य मार्गानी वाढवण्याऐवजी अण्णांमध्ये स्वत:लाच प्रत्येक वेळी मोठे करण्याची ‘नेकेड अ‍ॅम्बिशन’ निर्माण होत राहिली आहे. परिणामी अण्णांची आजवरची आंदोलने फारशी यशस्वी झाली नाहीत. परवाही मुंबईत अण्णा म्हणाले, ‘समाजासाठी काम करता यावं म्हणूनच मी लग्न केलं नाही.’ आपल्या निस्पृहतेचे पुरावे सतत देण्याची गरज भासणे, विशेषत: ते जनतेला माहीत असतानाही, याला जनतेची सुहानुभूती मिळवण्याचा खटाटोपच म्हणता येऊ शकते. 


त्याचे काही दुष्परिणाम आताच दिसू लागले आहेत. सुरुवातीला ठामपणे अण्णांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या, त्यांना वारेमाप प्रसिद्धी देणाऱ्या काही वृत्तवाहिन्या आणि  वृत्तपत्रांनीही अण्णांच्या आंदोलनाबाबतचा आपला प्राधान्यक्रम बदलायला सुरुवात केली आहे. समाजाचा आरसा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांचा हा कल टीम अण्णा समजून घेत नसेल, तर ती या टीमची आत्मवंचनाच ठरण्याची शक्यता आहे.
 
काही वर्षापूर्वी शरद पवारही ‘अण्णांना निस्पृहतेचा गर्व झाला आहे’ असे म्हणाले होते. त्यात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. ‘निस्पृहतेचा गर्व’ ही चांगलीच गोष्ट आहे. पण ती समाजाच्या भल्यासाठी वापरली जाते की स्वत:च्या मागण्यांसाठी, हेही पाहायला हवे. सध्या असे चित्र दिसते आहे की, अण्णा सरकार आणि जनतेचेही इमोशनल ब्लॅकमेलिंग करत आहेत.
 
थोडक्यात टीम अण्णाही सध्या जनलोकपालाचे दिवास्वप्न दाखवून सिव्हिल सोसायटीकडून स्वत:चीच प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ करून घेत आहे. मात्र हे करताना आपण देशाच्या लोकशाहीला, घटनात्मक सार्वभौमत्वालाच आव्हान देतोय, याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. ‘आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा’ या टोकाच्या हेकेखोरपणातून आपण हुकूमशाही प्रवृत्तीचेच दर्शन घडवत आहोत, याचे साधे भानही टीम अण्णांना राहिलेले नाही, ही शोचनीय बाब म्हणावी लागेल. 

Saturday, July 23, 2011

‘मौज’ची एकसष्टी : खंत ना खेद?


एक ऑगस्ट रोजी ‘मौज प्रकाशन गृह’ या संस्थेला एकसष्ठ र्वष पूर्ण होतील. खरं तर संस्थेची एकसष्ठी साजरी करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही. त्यामुळे ‘मौज’ कुठलाही समारंभ करणार नाही. तसेही ‘मौज’ला समारंभाचे एकंदर वावडेच आहे. ‘मौज’चा रौप्यमहोत्सवही ‘पॉप्युलर’ प्रकाशनानेच पुढाकार घेऊन 28 सप्टेंबर 1975 रोजी मुंबईत साजरा केला होता. पण ‘मौज’ची साठी अर्थात हीरक महोत्सव साजरा करण्याची चांगली संधी ‘मौज’च्या संबंधितांनी घालवली, असं खेदाने म्हणावं लागेल. उलट हा हीरक महोत्सव दिमाखदारपणे साजरा व्हायला हवा होता. पण मागच्या वर्षात साधा कार्यक्रमही झालेला नाही. कदाचित श्रीपुंच्या निधनाला अजून जेमतेम चार र्वषही झाली नाहीत म्हणून कदाचित ‘मौज’कडून हा समारंभ झाला नसावा. मात्र मराठी प्रकाशन व्यवसायातील इतर घटकांनी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातल्या शिलेदारांनीही त्याबाबत कुठलाही पुढाकार घेतला नाही हे मात्र आणखी सखेद आश्चर्यजनक आहे. ‘मौज’च्या पुस्तकांना आदर्श मानणा-या आणि आपले पुस्तक मौजमध्येच छापून घेणाऱ्या प्रकाशकांनाही याचा विसर पडावा?


1 ऑगस्ट 1950 रोजी ‘आमची माती, आमचं आकाश’ हे अनंत काणेकर-दीनानाथ दलाल यांचं पुस्तक प्रकाशित करून ‘मौज’ प्रकाशनगृहाचा श्रीगणेशा झाला. त्या आधी ‘मौज’ साप्ताहिक, ‘सत्यकथा’ मासिक आणि मौज प्रिटिंग ब्युरो असं ‘मौज’चं कार्यक्षेत्र होतं. स्वत:च्या मालकीचा छापखाना हा ‘मौज’चा यूएसपी होता आणि आहे. या पाठबळावरच प्रकाशन संस्था उभी राहिली. प्रकाशनाला सुरुवात केल्यानंतर गेल्या 61 वर्षात ‘मौज’ने केवळ 664 पुस्तके प्रकाशित केली आहेत. म्हणजे साधारपणे वर्षाला दहा-अकरा पुस्तकं. हे काही व्यावसायिकतेचं लक्षण नाही. पण ‘मौज’ निव्वळ व्यावसायिक संस्था कधीच नव्हती. कथा, कादंबरी, कविता, नाटक, प्रवासवर्णन, ललित, सौंदर्यशास्त्र, समीक्षा, राजकीय-सामाजिक आणि बालवाङ्मय या वाङ्मय प्रकारातील अनेक दर्जेदार पुस्तकं ‘मौज’ने आजवर प्रकाशित केली आहेत. सांस्कृतिक मूल्यांना आणि वाङ्मयीन निष्ठेला प्राधान्य देणं हा ‘मौज’चा स्वभावधर्म आहे.
‘मौज’ हे एकेकाळी विशेषत: ‘सत्यकथे’च्या काळात आणि त्यानंतरही श्री. पु. भागवत हयात असेपर्यंत वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनाचं एक केंद्र होतं. मराठीतल्या अव्वल दर्जाच्या लेखकांचा गोतावळा त्यांच्याभोवती सतत असे. ‘मौज’च्या प्रकाशनांची सूची पाहिली तरी ते कुणाच्याही लक्षात येईल. शिवाय हा गोतावळा नुसताच रिकामटेकडय़ा आणि शिळोप्याच्या गावगप्पा मारणारा नव्हता, तर तो चैतन्याने रसरसलेला होता. प्रत्येकाचा पिंड, त्याच्या क्षमता लक्षात घेऊन श्रीपु त्याच्याकडून लेखन करून घेत असत. नवकथा आणि नवकविता हे मराठी साहित्यातले दोन महत्त्वाचे प्रवाह आणि साठोत्तरी साहित्य हा श्रीपु आणि ‘मौज’ या सांस्कृतिक केंद्राचाच परिपाक आहे, असं म्हटलं तरी त्यात फारशी अतिशयोक्ती होणार नाही.



‘मौज’कडून आपलं पुस्तक यावं ही मराठीतल्या नामवंत आणि नवोदित लेखकांची सुप्त महत्त्वाकांक्षा असते. यातच मौजचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. कारण ‘मौज’ पुस्तकांची निवड चोखंदळपणे करतं आणि ते प्रकाशित करण्यासाठी जिव्हाळ्याने परिश्रम घेतं. पुस्तकांबद्दलची ‘मौज’ची ही आस्था मराठी प्रकाशन व्यवसायातील एक अनुकरणीय आणि आदर्शदायी गोष्ट आहे. अशीच आस्था असणाऱ्या पॉप्युलर, प्रास, ज्योत्स्ना अशा काही इतर प्रकाशनसंस्था आहेत. पण त्यांचा परीघ आणि सातत्य मौजएवढे नाही. संपादकीय संस्कारांनी पुस्तकाला परिपूर्णता व सौष्ठव देणं, भाषेची शुद्धता आणि डौल यांची काळजी, पुस्तकातील संदर्भ-तपशील अचूकच असतील याबाबत ‘मौज’एवढी कुठलीही प्रकाशन संस्था दक्षता घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते त्याच्या मांडणीपर्यंत आणि लेखकाच्या नावापासून ते पुस्तकाच्या गुणवत्तेपर्यंत मौजची मुद्रा त्यांच्या प्रत्येक पुस्तकावर उमटलेली दिसते. मुद्रा शोभावी असंच ‘मौज’चं बोधचिन्हही आहे! संपादन आणि निर्मिती याबाबत ‘मौज’ची तुलना ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ आणि ‘केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस’ या इंग्रजी भाषेतील प्रकाशन संस्थांशी करता येण्यासारखी आहे.


मराठी प्रकाशन व्यवसायामध्ये ‘खप’ हा प्रमुख निकष सुरुवातीपासूनच राहिला आहे. अलीकडच्या काळात तर काउंटर सेलला न खपणारी पुस्तकंही मोठय़ा प्रमाणावर प्रकाशित केली जात आहेत. ती प्रकाशक कुठल्या पद्धतीने खपवतात, ही गोष्ट जाणकारांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. ‘मौज’ या गोष्टीला अपवाद आहे. खपापेक्षा पुस्तकाचा दर्जा हा मौजसाठी प्राधान्याचा निकष आहे. त्यामुळेच आजही पाच-सात रुपयांपासून तीस-चाळीस रुपयांपर्यंतची ‘मौज’ची अनेक चांगली चांगली पुस्तकं बाजारात उपलब्ध असतात. किंबहुना पहिलीच आवृत्ती न संपलेली ‘मौज’एवढी पुस्तकं इतर कुठल्याही प्रकाशन संस्थेची नसावीत. शिवाय आपली सर्व प्रकाशनं वाचकांसाठी उपलब्ध असावीत, हा मौजचा गुणविशेष आहे; मग त्यांची मागणी पुरेशी असो वा नसो. मात्र ‘मौज’ने पुस्तकाचे संपादन आणि निर्मिती याकडे ज्या प्रमाणात लक्ष दिलं तसं जाहिरात आणि विक्री-वितरण याकडे दिलेलं नाही. अलीकडच्या काळात ‘मौज’ने काही वादग्रस्त पुस्तकंही प्रकाशित केली आहेत, पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीही नाही.

अर्थात ‘मौज’बद्दल गैरसमजही खूप आहेत. ते ऐकीव माहितीवर आणि बव्हंशी इतरांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहेत. ‘मौज’ परिवारात शिरकाव न करू शकलेले आणि स्वत:बद्दल पुरेसा आत्मविश्वास नसल्याने तिकडे न फिरकलेल्यांनी ते काम इमानेइतबारे केले आहे. या लोकांच्या टीकेमध्ये श्रीपु-राम पटवर्धन यांच्या संपादनाची खिल्ली उडवणं आणि ‘मौज’च्या संथ कारभाराची चेष्टा करणं यापलीकडे फारसे तथ्यपूर्ण मुद्दे नाहीत. पण मौजेच्या संपादनामुळे आपल्या पुस्तकाचं वा लेखक म्हणून आपलं काही नुकसान झालं आहे, असं अद्याप एकाही लेखकाने म्हटलेलं नाही हेही लक्षात घेण्यासारखं आहे. आजवर ‘मौज’ला केवळ साहित्य अकादमीची 23 पारितोषिकं मिळालेली आहेत. ती त्यांनी लॉबिंग करून मिळवली आहेत, असं कुणा सुबुद्ध माणसाला म्हणता येईल? त्यामुळे ‘मौज’कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. ‘मौज’ ही भागवत बंधूंच्या मालकीची संस्था असली तरी ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात एक अतिशय ठोस प्रकारची भूमिका अदा करणारी प्रकाशन संस्थाही आहे. त्याअर्थाने ती सामाजिक संस्था आहे. त्या दृष्टीनेच ‘मौज’कडे पाहायला हवं. दुसरं, ‘मौज’ने आजवर जी प्रकाशनं काढली आहेत, ती काय प्रतीची आहेत यावरच तिचे मूल्यमापन व्हायला हवं, ‘मौज’ने काय केलं नाही हा मूल्यमापनाचा निकष बेजबाबदार आणि आततायीपणाचा आहे.
 
महाराष्ट्रातल्या प्रकाशन संस्थाच नाही तर राजकीय-सामाजिक-साहित्यिक, कुठल्याही क्षेत्रातील संस्थांना साठी-पंचाहत्तरीनंतर ओहोटी लागते, हा आजवरचा इतिहास आहे. शंभर-दोनशे वर्षाची खणखणीत परंपरा असलेल्या संस्था महाराष्ट्रात अभावनेच दिसतात. कारण मुळात या संस्थांचा तंबू एकखांबी असतो. तो खांब निखळला की, ‘आता कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ अशी चर्चा सुरू होते. श्रीपु नसल्याने आता ‘मौज’बाबतही तसे अधूनमधून कुजबुजत्या स्वरात बोलले जाते आहेच. शिवाय श्रीपुंनी आपला सक्षम उत्तराधिकारी तयार न करण्याची चूक इतरांप्रमाणेच केली आहे. ते राम पटवर्धनांचा उल्लेख ‘अभिन्नजीव सहकारी’ असा करत, पण पटवर्धन तर श्रीपुंच्याही आधी ‘मौजे’तून निवृत्त झाले. त्यानंतरच्या काळात तसा सहकारी श्रीपुंना निर्माण करता आला नाही, हेही कटू असले तरी सत्य आहे.
 
आता शेवटचा मुद्दा. महाराष्ट्रीयांच्या सांस्कृतिक अग्रक्रमात पुस्तकांना फार खालचे स्थान आहे, अशी खंत श्रीपुंनी 1987 च्या प्रकाशक परिषदेत व्यक्त केली होती. गेल्या चोवीस वर्षातही त्यात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे ‘मौज’बद्दल काय आस्था असणार? अर्थात त्यामुळे ‘मौज’चं योगदान आणि श्रेय अजिबात कमी होत नाही, उलट उघड होते ती आपल्या सांस्कृतिक दारिद्रय़ाची परिसीमा.

Wednesday, July 20, 2011

लोकपालाचा इतिहास आणि प्रवास

गेली जवळपास दोन महिने अण्णा हजारे चर्चेत आहेत, ते त्यांच्या लोकपाल विधेयकामुळे. त्यासाठी ते आंदोलन, उपोषण, सरकारबरोबर चर्चा आणि वाद असे समादामदंडभेदासारखे मार्ग अवलंबत आहेत. अण्णा हजारे केंद्रातल्या राजकीय पुढाऱ्यांच्या आणि शासकीय अधिका-याच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल विधेयक आणू पाहत आहेत. त्यासाठी मात्र आपणच तयार केलेला विधेयकाचा मसुदा सरकारने स्वीकारावा असा आग्रह आहे. सरकारबरोबर त्यांनी चर्चेची तयारी दाखवून संयुक्त मसुदा तयार करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी त्या वाटेतही सातत्याने विघ्ने येत आहेत. मात्र अण्णा हजारे ज्या लोकपाल विधेयकासाठी सरकारशी भांडत आहेत, ते नेमके काय आहे, याची पुरेशी कल्पना जनसामान्यांना अजून आलेली नाही. अण्णा व त्यांचे सहकारी आणि केंद्र सरकारनेही या विधेयकाच्या एकूण एक तरतुदी जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा फारसा प्रयत्न केलेला नाही. त्यासाठी त्यांना पुरेसे विश्वासात घेतले नाही, असे एकंदर वातावरण आहे. या परिस्थिीमध्ये माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी ‘लोकपालाची मोहिनी’ हे पुस्तक लिहून या विधेयकाचा इतिहास आणि आजवरचा प्रवास थोडक्यात सांगितला आहे. ‘भ्रष्टाचार - स्वातंत्र्याला लागलेले खग्रास ग्रहण’, ‘लोकपाल विधेयकाचे उदंड पीक’, ‘लोकपाल - नुसतीच वैधानिक अडगळ’ आणि ‘लोकपाल - जादूची कांडी नव्हे’ आणि उपसंहार अशा एकंदर पाच प्रकरणातून हा इतिहास आणि प्रवास ओघवत्या शब्दात मांडला आहे.






गोडबोले यांनी प्रदीर्घ काळ खुद्द केंद्र सरकारमध्येच काम केले असल्याने त्यांच्या लेखनाला प्रत्यक्ष अनुभवाची आणि अस्सल पुराव्यांची जोड आहे. तेच या पुस्तकाचेही महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. ते लिहितात, ‘‘लोकपालाची निर्मिती हा भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईतील डावपेचाचा केवळ एक भाग असणार आहे. नुसत्या लोकपालाच्या निर्मितीने काही विशेष साध्य होणार नाही.’’




पुस्तकात गोडबोले यांनी भ्रष्टाचार हा किती व्यापक प्रश्न आहे आणि तो केवळ केंद्रातल्या राजकीय पुढाऱ्यांपुरता मर्यादित कसा नाही हे स्पष्टपणे सांगितले आहे. पैसे वा लाच खाणे याच गोष्टीशी हे विधेयक जोडले गेले तर त्याचे काय तोटे होऊ शकतात, हेही त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी आपल्या राजकर्त्यांची, शासकीय अधिकाऱ्यांची आणि भारतीय नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. नाहीतर नुसते कायदे करून काही उपयोग होत नाही. अटकपूर्व जामिनाची तरतुद, माहितीची अधिकार यांचा कसा दुरुपयोग होत आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे.


पण गोडबोले यांनी मात्र केंद्र सरकारचे अधिकार लोकपाल विधेयकाच्या माध्यमातून कमी करण्याला विरोधच केला आहे. ते म्हणतात, ‘‘शेवटी लोकशाहीत सरकार हे संसदेला जबाबदार असते. लोकपालाची निर्मिती करून लोकनिर्वाचित सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरणार नाही आणि त्यातून नवे प्रश्न निर्माण होतील. यावर उपाय म्हणून अशी व्यवस्था अमलात आणली पाहिजे की, या सर्व संस्था स्वतंत्रपणे कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता आपले काम करू शकतील.’’ लोकशाही प्रक्रियेचे उत्तम भान असलेला आणि लोकपाल विधेयकाचा मसुदा बारकाईने वाचलेला कुठलाही सुबुद्ध माणूस गोडबोले यांच्या या मताशी सहमत होईल. खरे म्हणजे या पुस्तकात सरकारविषयी गोडबोले यांनी सतत टीकेचा आणि नैराश्याचा सूर लावलेला आहे, पण तरीही त्यांना भारतीय लोकशाहीबद्दल मात्र पूर्ण विश्वास आहे, असे जाणवते.


अलीकडच्या काळात सामाजिक संस्था-संघटना यांना आपल्या प्रत्येक तक्रारीसाठी नवा कायदा हवा असतो, त्यासाठी त्या रस्त्यावर उतरतात, आंदोलने करतात, सरकारवर दबाव आणतात. प्रसंगी तसे कायदे करायला सरकारला भाग पाडतात आणि पुढे पुन्हा त्यांची अमलबजावणी नीट होत नाही म्हणून सरकारला टीकेचे लक्ष्य करतात. आधीचे कायदे आपल्या मागण्यांसाठी पुरेसे आहेत की नाही, त्यासाठी आपण पुरेसा पाठपुरावा करतो की नाही हे नीटपणे जाणून न घेताच ते आपला अजेंडा चालवू पाहतात. एकेकाळी शासनाने आपल्या सर्वच प्रश्नांचे पितृत्व घेतले पाहिजे आणि सर्व अपयशाचे धनीही झाले पाहिजे अशी जनसामान्यांपासून सर्वाची अपेक्षा असायची. पण कुठलीही शासनव्यवस्था अशा मार्गानी सक्षम होऊ शकत नाही, उलट ती कमकुवतच होण्याची शक्यता असते. शिवाय दीर्घकालीन समस्येसाठी दीर्घकालीनच उपाययोजना करायची असते, तात्पुरत्या मलमपट्टय़ा उपयोगाच्या नसतात, हेही लक्षात घेतले जात नाही. पण सध्या लोकपाल विधेयकाबाबत तोच प्रकार घडताना दिसतो आहे.


त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक लोकपाल विधेयकाची किमान साधकबाधक चर्चा करते हेही नसे थोडके.



लोकपालाची मोहिनी : माधव गोडबोले

राजहंस प्रकाशन, पुणे

पाने : 140 , किंमत : 125 रुपये

Monday, June 20, 2011

प्रखर आणि परखड




कुमार केतकर यांना आवडलेला प्रहार मधील अग्रलेख। त्यांचा SMS असा होता - Special congrats for a prompt and very good edit on Kamal Desai.- Kumar Ketkar
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

कमल देसाई यांच्या निधनाची फार मोठय़ा प्रमाणावर दखल घेतली जाण्याची शक्यता नाही आणि मराठी साहित्यविश्वातूनही फारशी हळहळ व्यक्त होणार नाही. कमलताई काही लोकप्रिय लेखिका नव्हत्या. दुसरी गोष्ट, कमलताईंच्या लिखित पुस्तकांची संख्या जेमतेम पाच आहे. दोन कथासंग्रह आणि तीन कादंब-या. त्यामुळे केवळ सतत लिहिणा-यांचेच वाचणा-यांच्या जगात कमलताईंसारखी प्रयोगशील, अस्तित्ववादी लेखिका मौजूद असणे हेच मुळी काहीसे अस्वाभाविक होते. तिसरे म्हणजे ‘काळा सूर्य’ आणि ‘हॅट घालणारी बाई’सारख्या आधुनिक संज्ञा-प्रवाहांना कवेत घेणा-या कादंब-या समजू शकणारा वाचकवर्ग मराठीत फार मोठय़ा प्रमाणात कधीही नव्हता आणि आजही नाही. मराठी वाचकवर्ग आजही प्राथमिक अवस्थेत आहे. त्याचे ऐतिहासिकतेविषयीचे आंधळे प्रेम आणि स्मरणरंजनवादी मानसिकता यांत कमलताईंसारखी प्रखर आधुनिक, बंडखोर आणि तरीही केवळ स्त्रीवादी नसणारी लेखिका बसू शकत नाही. 1962 साली पहिल्यांदा कमलताईंचा ‘रंग-1’ हा कथासंग्रह आला. निर्मिती, शोध आणि खेळ या प्रेरणा त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येतात. ‘रंग 1’ आणि 2 हे कथासंग्रह काय किंवा ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ काय ही कादंबरी काय- कमलताई साध्या गोष्टींपासून बोलायला सुरुवात करतात. मात्र बोलता बोलता खोल गंभीर तत्त्वचिंतनाकडे वाचकाला खेचून नेतात. हे सर्व त्या एवढय़ा अभावितपणे करतात की, वाचणा-याच्या ते त्या वेळी लक्षात येत नाही. त्यामुळे तो गाफील राहतो. कमलताई अचानक त्याला तत्त्वविचाराच्या चक्रव्यूहात उभा करतात, तेव्हा तो भांबावून जातो. त्याचा थेट अभिमन्यू होतो. म्हणूनच पहिली पाच-सहा वर्षे मराठी समीक्षकांना कमलताईंच्या लेखनाचा अदमासच आला नाही. हे साहित्य आहे का, असा प्रश्न त्यांना पडला. मात्र, मराठी साहित्यातील साडेतीन टक्क्यांच्या विरोधात उभे ठाकणा-या लघुनियतकालिकांच्या संपादक-लेखकांनी कमलताईंचे श्रेष्ठत्व मान्य केले. त्यामुळे विरोधाची धार काहीशी बोथट होत गेली, पण कमलताई सदाशिवपेठी साहित्याच्या शत्रू ठरल्या आणि अल्पसंख्य झाल्या. त्यांच्या कथा-कादंब-यांच्या नायिका स्त्रिया आहेत म्हणून त्यांना स्त्रीवादी लेबल लावणे धाष्टर्य़ाचे होईल. त्यांच्या लेखनात स्त्रीवादी प्रेरणा प्रखर असली तरी एक व्यक्ती म्हणून स्वत:ला प्रस्थापित करणे, ही त्यांची मुख्य प्रेरणा होती. नैतिकता आणि मानवी मूल्य याविषयीची त्यांची भूमिका अतिशय ठाम होती; ती प्रत्यक्ष जगण्यात आणि लेखनातही. मात्र पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्वत:ची मूल्यव्यवस्था प्रस्थापित करू पाहणा-या कुणालाही सहजासहजी मान्यता मिळणे अवघड असते. कमलताईंच्या बाबतीत तेच झाले. पण त्याची त्यांना कधी खंत वाटली नाही. त्यांना जे वाटत होते आणि ज्या पद्धतीने त्या जगत होत्या, तशाच पद्धतीने त्या लिहीत राहिल्या. त्यांना जगण्याबद्दल अपार कुतूहल होते. साहित्य, तत्त्वज्ञान, संगीत, चित्रकला, चित्रपट, जाहिरातकला अशा अनेक विषयांमध्ये त्या रस घेत. म्हणूनच वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्या ‘एक कप च्या’ या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका केली होती. मुख्य म्हणजे पुरुषप्रधान व्यवस्था मोडीत काढण्याएवढे बळ आपल्याकडे नाही, पण आपण त्या विरोधात ठाम उभे राहू शकतो, इतरांना उभे राहण्याची प्रेरणा देऊ शकतो याचे भान त्यांना होते. त्यासाठी त्यांनी पर्याय निवडला तो ललित साहित्याचा. त्यामुळे प्रयोगशीलता आणि मिथके यांच्या पातळी-वरूनच त्या लिहीत राहिल्या. ‘काळा सूर्य’ आणि ‘हॅट घालणारी बाई’ या कादंब-या मराठीत मैलाचा दगड आहेत की नाहीत यावर वाद होतील, पण त्या अत्यंत प्रयोगशील कादंबऱ्या आहेत, यावर मात्र सर्वाचेच एकमत होईल. मळलेल्या वाटा नाकारत नव्या वाटा धुंडाळणा-यांच्या नशिबी मानसन्मान, प्रसिद्धी आणि मान्यता येणे कठीण असते. ‘शंभर लोक ज्या रस्त्याने चालले आहेत, त्याच रस्त्याने आपणही जाणे; म्हणजे आपण योग्य मार्गाने जात आहोत असे नाही’, असे बायबलमध्ये एक वचन आहे. कमलताईंना ‘योग्य मार्ग’ कुठला याचे अतिशय सम्यक भान होते.

Sunday, June 19, 2011

ग्रंथ-मार्गदर्शकाच्या पाऊलवाटा



महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आणि व्युत्पन्न पंडित गोविंद तळवळकर यांचं ‘सौरभ’ हे नवीन पुस्तक नुकतंच बाजारात आलं आहे. तळवळकरांचं लेखन अतिशय नेमकं, मुद्देसूद आणि तपशीलपूर्ण असतं. त्यांची भाषा प्रवाही असली तरी ती अनंलकृत असल्याने तिच्यामध्ये एक प्रकारचा आकर्षकपणा असतो. त्यामुळे त्यांचं लेखन खिळवून ठेवत नसलं तरी ते वाचलं जातं. शिवाय तळवळकरांनी निवडलेली पुस्तकंच अशी असतात की, त्यांच्याबद्दलचं वाचकांचं कुतूहल अनावर असतं. मुळात ग्रंथप्रेम हे तळवळकरांच्या पिढीचंच काहीसं व्यवच्छेदक लक्षण आहे. मग ते श्यामलाल असोत की गिरीलाल जैन असोत. श्यामलाल यांची ‘अ हंड्रेड एन्काउंटर्स’ आणि ‘इंडियन रिअ‍ॅलिटिज’ ही ग्रंथपरीक्षणाची पुस्तकं आणि तळवळकर यांच्या ‘वाचता वाचता’चे दोन खंड ही केवळ त्यांनी वाचलेल्या पुस्तकांविषयीची पुस्तकं नाहीत तर ते ज्या काळात लिहीत होते, त्या काळाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा तो दस्तएवज आहे. जगभर काय लिहिलं जातं आहे, ते कुठल्या पद्धतीचं आणि काय प्रतीचं आहे याचा तो सफरनामा आहे. तळवलकर आणि श्यामलाल यांची पुस्तकं वाचताना हा पुन्हा पुन्हा प्रत्यय येतो.



यामुळे तळवळकरांचं लेखन महाराष्ट्रातील जिज्ञासूंच्या कायम कुतूहलाचा विषय राहिलं आहे. महाराष्ट्राच्या जाणकारांच्या दोन-चार पिढय़ा तळवकरांची शिफारस प्रमाण मानून घडल्या आहेत. तळवळकरांनी पाच-सहा वर्षापूर्वी ‘ललित’ या ग्रंथप्रसाराला वाहिलेल्या मासिकामध्ये ‘सौरभ’ या नावाने जीवनाच्या विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या अलक्षित पैलूंची ओळख मुख्यत: ग्रंथांच्या माध्यमातून करून द्यायला सुरुवात केली, तेव्हा हे सदर अल्पावधीतच लोकप्रिय झालं होतं. म्हणूनच त्यातील निवडक लेखांचा पहिला खंड त्यांनी नुकताच पुस्तकरूपाने प्रकाशित केला आहे.



प्रस्तुत पुस्तकात एकंदर बावीस लेख आहेत. त्यामध्ये गर्ट्रुड बेल, गिलगुड, जॉर्ज ऑर्वेल, डिकन्स, महाकवी गटे, उमर खय्याम, चेकॉव्ह, ओरहान पाहमूक, अ‍ॅलन बुलक, केनान, जी. के. गालब्रेथ, थॉमस पेन, आइन्स्टाइन अशा जागतिक साहित्यातील लेखक, कादंबरीकार, इतिहासकार आणि तत्त्वज्ञ यांचा समावेश आहे. यामध्ये दोनच भारतीय व्यक्ती आहेत. त्या म्हणजे इंदिरा गांधी आणि रामानंद चतर्जी. तळवळकर यांची पिढी ही नेहरूवादाची कट्टर पुरस्कर्ती आहे. त्याचप्रमाणे त्यांना इंदिरा गांधींबद्दलही सम्यक सहानुभूती आहे. त्यामुळे वरकरणी या पुस्तकात त्यांचा समावेश थोडासा अनुचित वाटला तरी स्वाभाविक आहे आणि नावाप्रमाणेच हा लेखही इंदिरा गांधींचं वाचन, त्यांची पक्षीनिरीक्षणामधली जाणकारी, चित्रपटांबद्दलची आत्मीयता, चित्रकला अशा पैलूंची पत्रव्यवहारातून ओळख करून देणारा आहे.



एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतामध्ये विविध विषयांना वाहिलेली आणि दर्जेदार अशी नियतकालिकं प्रकाशित होत होती. त्यावेळच्या कलकत्ता या शहरामधून रामानंद चतर्जी ‘मॉडर्न रिव्ह्यू’ हे नियतकालिक चालवत. बंगाली साहित्य आणि संस्कृतीचे अभिमानी असलेले चतर्जी आपल्या मासिकातून मात्र भारतातील विविध भाषा आणि संस्कृती यांची ओळख करून देत. तळवळकरांनी लिहिले आहे की, त्या वेळच्या नियतकालिकांमध्ये चतर्जी यांचे ‘मॉडर्न रिव्ह्यू’ परिपूर्ण आणि प्रगल्भ असं नियतकालिक होतं. गुणवत्तेच्या बाबतीत तर ते अव्वलच होतं. सर यदुनाथ सरकार, नीरद चौधरी, रवीन्द्रनाथ टागोर अशा मान्यवरांनी त्यात लेखन केलं. चतर्जी यांची पंधरावीस पानांची संपादकीय लेख ‘मॉडर्न रिव्ह्यू’चे खास वैशिष्टय़ होतं.


जॉर्ज ऑर्वेल यांची जन्मशताब्दी 2003 मध्ये साजरी झाली. त्यानिमित्ताने तळवळकरांनी ऑर्वेलच्या समग्र लेखनाची ओळख करून देताना ऑर्वेलविषयी लिहिली गेलेली पुस्तकं, त्याच्या पुस्तकांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या यांचाही साधार आढावा घेतला आहे. तर ‘अ‍ॅन्टन चेकॉव्ह अ‍ॅन्ड हिज टाइम्स’ या चेकॉव्हच्या मित्रांनी लिहिलेल्या पुस्तकाचा ‘मित्रांच्या दृष्टीतून चेकॉव्ह’ या लेखात परिचय करून दिला आहे. अठराव्या शतकात जर्मनीच्या सांस्कृतिक जीवनाचं अविभाज्य भाग असलेल्या गटे यांच्या पुस्तकाची ओळख करून देताना त्याच्या विचारविश्वाचीही सफर घडवली आहे.



उमर खय्याम यांच्या रुबायाबद्दल आपण ऐकून असतो. जागतिक वाङ्मयात खय्यामला कीर्ती मिळाली ती रुबायामुळेच. एडवर्ड फित्झेराल्ड या इंग्रजी कवीने त्यांच्या रुबायाचा इंग्रजी अनुवाद केला आणि पाश्चात्य जगात या पौर्वात्य कवीने आपली नाममुद्रा उमटवली. इंग्लंड-अमेरिकेत तर खय्यामच्या नावाने क्लब स्थापन झाले. त्या सर्वाचा मागोवा तळवळकरांनी घेतला आहे. खय्यामच्या रुबायांनी प्रभावित झालेल्यांमध्ये अमेरिकेचे सांस्कृतिक दैवत मार्क ट्वेन यांचाही समावेश होता. ट्वेनच्या नर्मविनोदी साहित्याने आणि त्यांच्या हजरजबाबी चातुर्याने तर जगभरातल्या वाचकांना वेड लावलं आहे.



थोडक्यात तळवळकरांचे हे पुस्तक त्यांना आवडलेल्या पुस्तकांचा आणि लेखकांचा परिचय करून देणारे आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा ओळख करून देण्यात फार हशील नाही. पण मग याचं महत्त्व काय? तर हे पुस्तक वाचून आपल्याला काय वाचावं आणि काय वाचू नये याचा विवेक करता येईल असं वाटतं. कुठलाच माणूस जगातली सर्व पुस्तकंच काय पण आपल्या भाषेत प्रकाशित झालेली सर्व पुस्तकंही वाचू शकत नाही. खरं तर तशी गरजही नसते. पण अजिबात शिस्त नसलेल्या आणि भरकटलेल्या वाचनाचा काहीही उपयोग होत नाही. त्या त्या वेळी त्याचं आपल्याकडून समर्थन केलं जातं. पण उतारवयात जेव्हा आपली क्रयशक्ती आणि वाचनशक्ती कमी होते आणि अजून खूप वाचून व्हायचं बाकीच आहे असं लक्षात येतं, तेव्हा आपण आजवर खूप वेळ क्षुल्लक पुस्तकं वाचण्यात घालवला असं वाटायला लागतं. अशी कबुली मराठीतल्या अनेक मान्यवर लेखकांनीही वेळोवळी दिली आहे. अशी पश्चातापाची वेळ येऊ द्यायची नसेल तर एका चांगल्या ग्रंथ-मार्गदर्शकाची गरज असते. तळवळकरांचे हे पुस्तक ती भूमिका उत्तमप्रकारे निभावू शकते.



मात्र तळवळकरांनाच पूर्णपणे प्रमाण मानता कामा नये. कारण या पुस्तकात फक्त ओळखपरेड आहे, ही काही समीक्षा नाही. किंबहुना कुठल्याही पुस्तकाबद्दल लिहिताना तळवळकर टीकेचा स्वर शक्यतो लावत नाहीत. लेखकाला काय सांगायचं आहे आणि ते त्याने कशाच्या आधारे सांगितलं आहे, याचाच ते वेध घेतात. अर्थात ही त्यांच्या लेखनातली उणीव नव्हे तर पुस्तकांकडे कसं पाहावं याचा तो वस्तुपाठ आहे. उत्तम वाचक होण्यासाठी आधी उत्तम पुस्तकं वाचली पाहिजेत आणि उत्तम पुस्तकं कुठली हे जाणून घेण्यासाठी तळवळकरांसारख्या ग्रंथ-मार्गदर्शकाच्या पाऊलवाटेवरून चाललं पाहिजे.



या पुस्तकाबाबत एकच छोटासा आक्षेप नोंदवता येईल. तोही अनुक्रमणिकेपुरता मर्यादित आहे. त्यात दिलेला ‘सुंदर मी होणार’ हा चौथ्या क्रमांकाचा लेख मूळ पुस्तकात नाही. त्यामुळे त्यापुढील सर्वच पानांचे अनुक्रमांक चुकले आहेत. पण ते न पाहताही हे पुस्तक आपल्याला हवं तिथपासून वाचता येईलच.

Sunday, June 5, 2011

‘श्यामची आई’ची जन्मकथा!





1935 नाही, 36!
‘श्यामची आई’च्या पहिल्या आवृत्तीवर दासनवमी शके 1857 असे छापलेले असल्याने ही आवृत्ती 1935 सालीच प्रकाशित झाली, असा ढोबळ अंदाज केला जातो आणि तोच गृहीत धरला जातो. अनाथ विद्यार्थी गृह (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित केल्यावर पहिल्या आवृत्तीचे साल 1935 असेच छापले. ते अजूनही तसेच छापले जाते. खरी गोष्ट अशी आहे की, शके आणि इसवीसन या दोन कालगणनांमध्ये 78 वर्षाचा फरक असतो. पण शके ही भारतीय कालगणना असल्याने त्याच्या वर्षाची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार मार्च-एप्रिलमध्ये होते. त्यामुळे शकेच्या सालामध्ये इंग्रजी महिन्यांचा मार्च-एप्रिल ते मार्च-एप्रिल हा काळ येतो. मग दासनवमी शके 1857 चे इसवीसनामध्ये अचूक वार, तारीख, महिना आणि साल काय येईल, याचा साने गुरुजींची पुतणी सुधा बोडा यांनी बराच शोध घेतला. त्यांनी जुन्या पंचांग तज्ज्ञांकडून सारे पडताळून घेतले, तेव्हा ‘श्यामची आई’ची अचूक तारीख 16 फेब्रुवारी 1936 आहे, हे सिद्ध झाले. त्यामुळे चालू वर्ष ‘श्यामची आई’चे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.




‘पुस्तक म्हणजे ज्यातून स्वत:ला साठवावे, आठवावे आणि वाटावेही’ अशी साने गुरुजींनी चांगल्या पुस्तकाची व्याख्या केली आहे. ती त्यांच्या सर्वच लेखनाला लागू पडते. त्यातही गुरुजींचे सर्वात आवडते पुस्तक आहे, ‘श्यामची आई’. या पुस्तकाला तर ही व्याख्या अगदीच समर्पक आणि यथायोग्य वाटते.
साने गुरुजींनी आपल्या उत्तर आयुष्यातील 1930 ते 1950 या वीस वर्षापैकी तब्बल सहा वर्ष सहा महिने हा काळ धुळे, नाशिक, जळगाव आणि येरवडा येथील तुरुंगात काढला. याच काळात त्यांनी बरेचसे लेखन केले. 17 जानेवारी 1932 ते ऑक्टोबर 33 हे एकवीस महिने गुरुजी नाशिकच्या तुरुंगात होते. तिथेच त्यांनी दररोज रात्री आपल्या सहका-यांना आधी आईच्या आठवणी सांगितल्या. मग त्यांच्या आग्रहावरून त्या लिहून काढल्या. ते पुस्तक म्हणजे ‘श्यामची आई’. या पुस्तकातील 36 रात्री साने गुरुजींनी 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 1933 या पाच दिवसांतल्या चार रात्रींत लिहून काढल्या. उरलेल्या नऊ रात्री मात्र त्यांनी तुरुंगातून सुटका झाल्यावर लिहिल्या. मात्र पुस्तक करताना त्यातील तीन रात्री त्यांनी वगळून फक्त 42 रात्रींचेच पुस्तक केले. त्या तीन रात्रींमध्ये कोणत्या आठवणी होत्या, हा प्रश्न कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा आहे. पण त्याविषयी गुरुजींनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत आणि इतरत्रही काहीही खुलासा केलेला नाही.






साने गुरुजींचे नाव पांडुरंग असले तरी त्यांचे घरगुती नाव पंढरीनाथ होते. पण त्यांना स्वत:ला मात्र ‘राम’ हे नाव अधिक आवडत असे. पुढे ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिताना गुरुजींनी ‘श्याम’ हे नाव घेतले. कारण त्यांच्या आईचे नाव ‘यशोदा’ होते. ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांनी याविषयी एके ठिकाणी नमूद केले आहे. पुढे ‘श्याम’ या नावानेच गुरुजींनी इतरही काही लेखन केले.






‘श्यामची आई’चे हस्तलिखित साठ-सत्तर लोकांनी वाचले, ऐकले, असे साने गुरुजींनीच लिहिले आहे. त्यातले एक होते यशवंतराव चव्हाण. दयार्णव कोपर्डेकर यांचा गुरुजींशी चांगला परिचय होता. साने गुरुजींनीच कोपर्डेकरांचे लग्न ठरवले होते. हे कोपर्डेकर आणि यशवंतराव चव्हाण शालेय मित्र. चव्हाणांची कोपर्डेकरांनी साने गुरुजींशी ओळख करून दिली होती. दयार्णव कोपर्डेकर ‘सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला’च्या प्रचारासाठी फिरते विक्रेते म्हणून काम करत होते. जळगाव, इंदूर, देवास, उज्जन, रतलाम, बडोदे, सोलापूर, अकोला, अमरावती अशा अनेक ठिकाणी फिरून त्यांनी पुस्तकांची विक्री केली होती. कोपर्डेकरांनी आपले ‘श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशित करावे, अशी साने गुरुजींची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी हस्तलिखिताच्या वह्या कोपर्डेकरांकडे दिल्या. त्या त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना ‘हे पुस्तक प्रकाशित करावे का?’ यासाठी वाचायला दिल्या. त्याविषयी चव्हाणांनी लिहिले आहे, ‘‘श्यामची आई वाचत असताना अनेक वेळा माझे डोळे पाणावून आले.. साने गुरुजींचे प्रत्येक वाक्य भावनेने ओथंबून गेलेले व आईच्या प्रेमाने ओसंडून चाललेले होते.’’ चव्हाणांनी कोपर्डेकरांना हे पुस्तक त्वरेने प्रकाशित करण्याची सूचना केली, पण काही कारणाने कोपर्डेकरांना ते शक्य झाले नाही.






मग, ‘श्यामच्या आई’ची पहिली आवृत्ती अमळनेरच्या जगन्नाथ गोपाळ गोखले यांनी प्रकाशित केली. त्यावर दासनवमी शके 1857 असा उल्लेख आहे. किंमत आहे एक रुपया. या पुस्तकाचे मुखपृष्ठही गुरुजींच्या नागेश पिंगळे या विद्यार्थ्यांने तयार केले आहे. या पुस्तकावर मात्र पां. स. साने असा उल्लेख आहे. हे पुस्तक अमळनेरहून प्रकाशित झाले असले तरी त्याची छपाई मात्र पुण्यातल्या लोकसंग्रह छापखान्यात झाली. ‘श्यामची आई’ प्रकाशित झाल्यावर काही महिन्यांनीच गुरुजींच्या ‘पत्री’ या कवितासंग्रहावर इंग्रज सरकारने बंदी आणली. हा संग्रह पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृहाच्या मालकीच्या लोकसंग्रह छापखान्याने छापला होता. त्यामुळे त्यांच्याकडे इंग्रज सरकारने दोन हजार रुपयांचा जामीन मागितला, तो त्यांनी भरलाही. पण आपल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या संस्थेला नाहक भरुदड बसला, याचे साने गुरुजींना फार वाईट वाटले. त्यामुळे त्यांनी ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे सर्व हक्क 500 रुपयांमध्ये अनाथ विद्यार्थी गृहाला देऊन टाकण्याचा निर्णय घेतला.






16 ऑक्टोबर 1936 रोजी झालेला हा करार मोठा मजेशीर आहे. अनाथ विद्यार्थी गृहाने गुरुजींना पुस्तकावर दहा टक्के मानधन देण्याची तयारी दाखवली होती, पण ते त्यांना नको होते. म्हणून मग गुरुजींना कराराच्या आधी 50 रुपये आणि उरलेले 450 रुपये करार झाल्यानंतर दिले. पण त्याच वेळी संस्थेला देणगी म्हणून गुरुजींकडून 100 रुपये घेण्यात आले. म्हणजे त्यांच्या हातात अवघे 400 रुपयेच पडले. त्याबदल्यात गुरुजींनी ‘श्यामच्या आई’चे तहहयात हक्क देऊन टाकले. त्यात भाषांतराच्या हक्काचाही समावेश होता. हा करार करून गुरुजी घरी आले खरे पण त्यांना खूप वाईट वाटले. आपले अतिशय आवडते पुस्तक त्यांना नाइलाजास्तव विकावे लागल्याची निराशा त्यांना लपवता आली नाही. हताशपणे ते सहका-यांना म्हणाले, ‘आज मी माझ्या आईला विकून आलो’.




मराठीमधले रांगा लावून लोकांनी विकत घेतलेले पहिले पुस्तक म्हणजे लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’. ‘गीतारहस्य’ विक्रीसाठी तयार असल्याची जाहिरात 15 जून 1915 च्या ‘केसरी’च्या अंकात प्रकाशित झाली. ती वाचून सकाळपासूनच लोकांनी केसरी वाडय़ासमोर रांगा लावल्या. ‘गीतारहस्या’ची सहा महिन्यातच दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. तेव्हापासून या ग्रंथाचे गेली 95 वर्षे सातत्याने पुनर्मुद्रण होत आहे.
विनोबा भावे यांनी 1930 मध्ये ‘गीताई’ लिहिले. ‘गीताई’च्या 1932 पासून आतापर्यंत 240 आवृत्त्या निघाल्या, सुमारे 40 लाख प्रती विकल्या गेल्या. विनोबांनीच 1932 मध्ये धुळ्याच्या तुरुंगात ‘गीता प्रवचने’ दिली, ती साने गुरुजींनी लिहून घेतली. त्याचे पुस्तक 1945 मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकाच्याही आत्तापर्यंत 40 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. शिवाय देशी-परदेशी मिळून 23 भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्या सर्वाचा विचार केला तर या पुस्तकाच्या सुमारे पंचविसेक लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.




या तीन पुस्तकानंतर आवृत्त्या, विक्री आणि प्रभाव या तिन्ही बाबतींत ‘श्यामची आई’चा नंबर लागतो. आजवर ‘श्यामची आई’च्या 56 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्याचा हिंदी अनुवाद 1940 मध्येच झाला. त्यानंतर दोन इंग्रजी अनुवाद झाले. त्यातला एक पुणे विद्यार्थी गृहाने प्रकाशित केला तर दुसरा भारतीय विद्या भवनने. याशिवाय कानडीमध्येही अनुवाद झाला. ‘चित्ररूप श्यामची आई’ ही कॉमिक्स आवृत्तीही प्रकाशित झाली. डॉ. मु. ब. शहा यांनी ‘संवादरूप श्यामची आई’ लिहिले तर प्रभाकर ठेंगडी यांनी ‘श्यामची आई’चे नाटय़रूपांतर केले.