Tuesday, June 12, 2012

मराठी साप्ताहिके आणि पाक्षिकांची सद्यस्थिती - भाग २

    आता शेवटी माझ्या आवडत्या एका साप्ताहिकाबद्दल आणि एका पाक्षिकाबद्दल सांगून थांबतो. दुर्दैवानं ही दोन्हीही इंग्रजीमध्ये आहेत. (मराठीतल्या साप्ताहिकांपैकी माझं आवडतं साप्ताहिक 'साधना' आहे हे वेगळं सांगायला नको.)


'आउटलुक' हे साप्ताहिक इंग्रजीमधलं एक आघाडीचं साप्ताहिक आहे. गेली पंधरा वर्षे विनोद मेहता प्रकाशित करत आहे. विविधता, लेखांचा आवाका, मजकुराची अचूकता, बोलकी छायाचित्रं-ग्राफिक्स, सुबक व उत्तम मांडणी, चांगलं मुद्रण आणि विनोद मेहतांचा प्रत्येक अंकावरील खास ठसा ही 'आउटलुक'ची प्रमुख वैशिष्टय़ं आहेत.
एखाद-दुसरा चांगला अंक काढणं ही तुलनेनं सोपी गोष्ट असते, पण सातत्यानं चांगले अंक काढणं, आपल्या वाचकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देणं हे शिवधुनष्य पेलणं सोपं नसतं. 'आउटलुक' त्याबाबतीत द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होतो. (पण इतर इंग्रजी साप्ताहिकं तृतीय श्रेणीत उत्तीर्ण होतात, म्हणजेच प्रथम श्रेणीत कुणीही उत्तीर्ण होत नाही.)
'आउटलुक'ची भाषा अतिशय सुबोध असते. ललित-वैचारिक असं त्यातल्या लेखांचं स्वरूप असतं. एकच विषय घेऊन त्याच्या वेगवेगळ्या बाजू समोर आणणं आणि एकाच विषयाचा पुरेसा पाठपुरावा करण्याचं काम 'आउटलुक' सातत्यानं करत असतं. अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील ए. राजा आणि नीरा राडिया यांच्यातील ध्वनिफीती 'आउटलुक'नंच बाहेर काढल्या. त्यात वीर संघवी, बरखा दत्त या इंग्रजीतल्या जान्यामान्या पत्रकारांच्या नावांचा भांडाफोडही 'आउटलुक'नंच केला.
मी नंतर ज्याच्याबद्दल सांगणार आहे ते 'फ्रंटलाइन' हे इंग्रजीतलं पाक्षिक इंटेलेक्च्युअल लोकांचं आहे, 'इंडिया टुडे' हे साप्ताहिक इंग्रजी नवसाक्षर लोकांचं आहे तर 'आउटलुक' या दोन्हींच्या मधल्या वाचकांचं आहे. जसा वैचारिक लेखन वाचणाऱयांचा एक वर्ग असतो, चरित्र-आत्मचरित्रं वाचणाऱयांचा एक वर्ग असतो आणि कथा-कादंबऱया वाचणाऱयांचा एक वर्ग असतो. तसंच हे आहे. आणखी नेमक्या भाषेत सांगायचं तर 'फ्रंटलाइन' हे आयडियॉलॉजिस्ट आहे, 'इंडिया टुडे' हे लोकानुनय करणारं आहे तर 'आउटलुक'मध्ये दोन्हींचं योग्य मिश्रण दिसतं.
थोडक्यात 'आउटलुक' मध्यममार्गी आहे. प्रसारमाध्यमं लोकशाही आणि स्वातंत्र्याचे राखणदार असतात, असं मानलं जातं. म्हणजे लोकशाही प्रक्रिया, लोकशाही मूल्ये, सामाजिक व आर्थिक नैतिकता आणि नैतिक सामाजिक व्यवहार यांची राखणदारी करणं म्हणजे पत्रकारिता करणं असं विश्लेषण जुनेजाणते पत्रकार करतात. अशी पत्रकारिता कधी शक्य होते, तर जेव्हा तुम्ही मध्यममार्गी असता. दुसरी गोष्ट म्हणजे जगात कुठेही मध्यममार्गी सरकारच सत्तेवर येऊ शकतं, मध्यममार्गी भूमिकाच मोठय़ा प्रमाणावर ग्राह्य मानल्या जातात आणि त्यांचाच प्रभाव जास्त असतो. 'आउटलुक' आणि 'फ्रंटलाइन' यांच्याकडे असा मध्यममार्गीपणा आहे.


आता थोडंसं 'फ्रंटलाइन'बद्दल. 'फ्रंटलाईन' हे इंग्रजीमध्ये गेली 26 वर्षे प्रकाशित होणारं पाक्षिक युनिक म्हणावं असं आहे. गंभीर आणि जबाबदार पत्रकारिता करणाऱया हिंदू वृत्तपत्रसमूहाच्या मालकीचं हे पाक्षिक आहे, त्यामुळे 'हिंदू'ला जी प्रतिष्ठा आहे तशीच 'फ्रंटलाइन'लाही आहे. 'फ्रंटलाइन' निर्विवादपणे एलिट क्लासचं पाक्षिक आहे. त्यातले सर्वच लेख गंभीर आणि सविस्तर असतात. हॉलिवुड-बॉलीवुड यांना त्यात थारा नसतो, क्रिकेट तर गेल्या 25 वर्षांत कधीही 'फ्रंटलाइन'च्या कव्हर पेजवर झळकलेलं नाही. एरवीही ते आतही नसतं. पॉप्युलर, चीप आणि पीत पत्रकारिता यापासून 'फ्रंटलाईन'ला सदैव लांब ठेवण्याची दक्षता त्याचे मुख्य संपादक एन. राम यांनी घेतली आहे. त्यामुळे त्याला वाचकांचा अनुनय करण्याची गरज पडत नाही.
शोधवृतान्त, चर्चा आणि भाष्य हे 'फ्रंटलाईन'चं बलस्थान आहे. 'फ्रंटलाइन'च्या यशस्वीपणाची चार कारणं आहेत. एक, ते पत्रकारिता गांभीर्यानं घेतात. दोन, 'फ्रंटलाईन'चा भर मुख्य विषयावर असतो. 'बिहाइंड एव्हरी इश्यू, देअर्स अ डिपर इश्यू' हा त्यांचा बाणा अहे. तीन, अमूक विषयाकडे कसं पाहावं हा दृष्टीकोन देण्यावर त्याचा भर असतो. त्यामुळे त्यात सर्व प्रकारच्या विचारांच्या लेखांना स्थान दिलं जातं, भलेही मग ते संपादकीय धोरणाच्या विरोधात असेल तरीही. अणि चौथं कारण आहे, आपली स्वत:ची स्वतंत्र आणि वेगळी ओळख सातत्यानं जपणं.
बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक पाठराखण, विचारांचा आदर, सामाजिक बांधीलकी मानणारी पत्रकारिता आणि राजकारण-अर्थकारण-सांस्कृतिक-बौद्धिक प्रश्नांविषयीची सजगता ही 'फ्रंटलाइन'ची चार प्रमुख वैशिष्टय़ं आहेत. पण यामुळं 'फ्रंटलाइन' व्यावसायिक मूल्यांना कमी लेखतं असंही नाही. उत्तम निर्मिती, चांगली छपाई, कागद आणि मांडणी याबाबत कसलीही तडजोड 'फ्रंटलाईन' करत नाही.
लोकप्रियता आणि ग्लॅमर नसतानाही एखाद्या नियतकालिकाच्या वाटय़ाला कशा प्रकारची प्रतिष्ठा येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून 'इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली', 'आऊटलुक', 'फ्रंटलाईन', 'सेमिनार' या इंग्रजीतल्या पहिल्या दोन साप्ताहिकांचा, एका पाक्षिकाचा आणि 'सेमिनार' या मासिकाचा मी आवर्जून उल्लेख करेन. आणि ही नियतकालिकं तुम्ही आवर्जून पाहावीत अशी शिफारसही करेन.


'आउटलुक' आणि 'इंडिया टुडे' ही इंग्रजी साप्ताहिकं इंग्रजी वर्तमानपत्राच्या दोन पावलं पुढे असतात. अनेकदा या साप्ताहिकांच्या कव्हर स्टोरीज इंग्रर्जी वर्तमानपत्राच्या हेडलाइन्स होतात. तर 'फ्रंटलाइन' हे पाक्षिक 'आउटलुक-इंडिया टुडे' यांच्या चार पावलं पुढे असतं. त्यामुळे मला असं वाटतं की, मराठी साप्ताहिकांनी 'आउटलुक-इंडिया टुडे' यांचा आणि पाक्षिकांनी 'फ्रंटलाइन'ला प्रमाण मानायला हरकत नाही. त्यात त्यांचं नुकसान काहीच नाही. फायदा मात्र खूपच आहे.
मराठी साप्ताहिकं आणि पाक्षिकांना काय करता येण्यासारखं आहे? काही मुद्दे पाहू.
- हल्ली वर्तमानपत्रांमध्ये 800 ते 1000 शब्दांपेक्षा जास्त मोठे लेख सहसा येत नाहीत. त्यामुळे चिकित्सक-विश्लेषणात्मक आणि सम्यक दृष्टीकोन देणारे लेखन वर्तमानपत्रांमधून येत नाही. या कारणांमुळे बरेचसे अभ्यासक हल्ली वर्तमानपत्रांमध्ये लिहायला नाखूश असतात. साप्ताहिकं-पाक्षिकांना वर्तमानपत्रांची ही मर्यादा आपलं बलस्थान करता येण्यासारखं आहे. कारण त्यांच्याकडून चिकित्सक-विश्लेषणात्मक आणि सम्यक दृष्टीकोन देणाऱया लेखनाचीच अपेक्षा आहे.
- दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साप्ताहिकं-पाक्षिकांनी मानधन देण्याची 'सवय' लावून घेतली पाहिजे. दुर्दैवानं ती मराठीतल्या साप्ताहिकं-पाक्षिकांनी अजून लावून घेतलेली नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तरुण अभ्यासकांना शिष्यवृत्त्या देऊन, वेगवेगळ्या ठिकाणी लेखकांना पाठवून त्यांच्याकडून सविस्तर आणि दीर्घ लेख-वृतान्त लिहून घेतले पाहिजेत. 'माणूस'नं एकेकाळी हे खूप चांगल्या पद्धतीनं केलं होतं. किंबहुना ते 'माणूस'चं बलस्थान होतं.
- तिसरी गोष्ट जे लोक वर्तमानपत्रांमध्ये लिहितात, त्यांच्यावरच साप्ताहिकं-पाक्षिकांनी पूर्णपणे अवलंबून राहू नये. त्यांनी नवनवे लेखक शोधले पाहिजेत. जे लोक लेखक नाहीत, पण आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत, त्यांच्याकडून मुद्दामहून लिहून घेतले पाहिजे. थोडक्यात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना पुढे आणण्याचं काम केलं पाहिजे. हे काम वर्तमानपत्रं करू शकत नाहीत, तेवढा वेळ त्यांच्याकडे नाही. तेव्हा हे काम साप्ताहिकं-पाक्षिकं यांचंच आहे.
- हा मुद्दा एकदा सांगितलाच आहे. पण पुन्हा सांगतो. वर्तमानपत्रासारखे, म्हणजे ते जे छापतात त्याच दर्जाचं - सामान्य, इंटेरनेटवरून माहिती गोळा करून आंतररार्ष्टीय राजकारणाविषयी पाडलेले लेख वर्तमानपत्रांमध्ये हल्ली मोठय़ा प्रमाणावर येतात. हे लेखन अतिशय उथळ स्वरूपाचं असतं. तोच प्रकार साप्ताहिकं-पाक्षिकांनी करता कामा नये. त्यांनी विषयाच्या गाभ्याला हात घातला पाहिजे.
- आता शेवटचा मुद्दा. कुठल्याही साप्ताहिक-पाक्षिकानं कुठल्याही विचारसरणीचा पुरस्कार करता कामा नये. त्यांनी नि:पक्षपाती आणि उदारमतवादी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिवाय आपल्याभोवती मोजक्या लेखकांचंच कोंडाळं करून घेऊ नये. त्यामुळे काही दिवसांनी तुमचं साप्ताहिक-पाक्षिक हे विशिष्ट गटाचं-लोकांचं होतं. तर आपल्या केबिनच्या बाहेर पडून नवनव्या लेखकांचा, विषयांचा शोध घेतला पाहिजे. 'माणूस'चे संपादक श्री. ग. माजगावकर यांना आदर्श मानू नका हवं तर पण त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला काय हरकत आहे?

Monday, June 4, 2012

दोन तळीरामांच्या (दंत) कथा!

खरं म्हणजे खेडेगावातल्या सगळ्याच लोकांना सगळ्यांबद्दल माहिती असते. घरं वेगवेगळी असली तरी गाव म्हणून ते एका मोठय़ा कुटुंबाचाच भाग असल्यासारखे राहत असतात. त्यामुळे गावातल्या कुणाच्याही जावयाला ते ‘जावयबापू’ म्हणून हाक मारणार, चहा पाजणार. कुणाच्याही लेकीबाळीच्या सासरी गेले तर त्या मुलीला आवर्जून भेटणार, तिची विचारपूस करणार. थोडक्यात इतरांची सुख-दु:ख वाटून घेण्याचा प्रयत्न करणार. त्याला आपल्यापरीनं मदत करणार. या अशा एकोप्यामुळे ब-याचदा मोठय़ा गडबडी होतात, नामुष्कीला आणि मानहानीला तोंड देण्याची वेळ येते. पण गावातले शहाणेसुरते लोक ते करतात. त्रासदायक असलेल्या, अर्काट माणसालाही सांभाळात राहतात.
 
बाबुराव सांबरे आणि इशिनाथ काळे ही दोन पेताड आणि अर्काट माणसं अशीच आमच्या गावात होती. अति पिण्यानं इशिनाथ काळेंनी वरची वाट धरली तर बाबुराव सांबरे यांचं सारं वैभव लयाला गेलं.
 
बाबुराव सांबरे हे सव्वासहा फूट उंच, धिप्पाड आणि राजबिंडं म्हणावं असं व्यक्तिमत्त्व. गडी राकट असला तरी उत्तम गवंडी होता. पंचक्रोशीतल्या सर्व पाटलांचे, देशमुखांचे आणि बागाइतदारांचे वाडे, माडय़ा त्यांनी बांधल्या होत्या. त्यात बाबुराव सांबरे हे बेलदार समाजातले. त्यामुळे जातिनिष्ठ व्यवसाय असला तरी त्यात त्यांची मातब्बरी होती. थोडक्यात बाबुराव सांबरे हे तसं गाव पातळीवर का होईना वलयांकित नाव होतं.
 
या उलट इशीनाथ काळ्यांचं. गडी जेमतेम पाच फूट. अंगकाठीही किरकोळ म्हणावी अशीच. पण शहाण्णव कुळी मराठा असल्याने अंगी ताठा भरपूर. त्यामुळे वडिलोपार्जित इस्टेटीवर नांगर फिरवून आता ग्रामपंचायतीत नोकरीला. काम सकाळ-संध्याकाळ पाणी सोडायचं.
 
दोघेही मुलं-बाळं असलेले. सांबरे यांना तीन मुली, एक मुलगा, तर काळेंना दोन मुली, एक मुलगा. घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यात या दोघांना दारू पिण्याची भारी हौस. रोज संध्याकाळी ते कामावरून निघाले की, थेट हातभट्टीच्या गुत्त्यावर जाणार! तर्र होऊन घरी परतणार. सांबरे घरी जायला निघाले की, त्यांचं चालणं बघण्यासारखं असायचं. डुलत डुलत आणि झोकांडय़ा देत ते चालायचे. पण त्यात एक लय असायची. त्यांची अंगकाठी मजबूत असल्याने त्यात एक खानदाणीपणा असायचा. आम्ही मुलं त्यांच्या मागेमागे चालायचो. पण हे सारं रस्त्यावरच्या कुत्र्यांना आवडायचं नाही. ते मात्र सांबरेंचा भुंकून निषेध करायचे. हा गडी आपल्या अंगावर पडला तर काय घ्या,अशी त्यांना भीती वाटत असणार. पण सांबरेंना त्याची पर्वा नसायची. ते आपल्याच मस्तीत चालायचे. कुत्र्यांचं भुंकणं आणि आमचा गोंगाट त्यांच्या मागेमागे असायचा. स्वारी घरी परतल्यावर मात्र बायको-मुलांवर घसरायची. अंगणात पाऊल टाकताच बायकोच्या, द्वारकाबाईंच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली जायची. त्यांनी तीन मुलींनाच जन्म दिल्यामुळे त्यांना नको नको त्या शिव्या दिल्या जायच्या. शिवाय त्यांना रात्रीच्या जेवणाला सशाचं नाहीतर घोरपडीचं मटण हवं असायचं. ते द्वारकाबाई ऐनवेळ कुठून आणणार? मग सांबरे त्यांना मारझोड करणार. मग त्यांच्या मुली आक्रोश करणार. मध्ये कोण सोडवायला गेलं तर सांबरे त्यालाही मारणार. त्यामुळे हा तमाशा शेजारच्या दहा-वीस घरांना ऐकू जायचा. लोक हळहळायचे. द्वारकाबाईंचं त्यांना वाईट वाटायचं. मुलं त्यांच्या घराभोवती जमायची. त्यांच्याकडे पाहात सांबरे म्हणायचे, ‘‘द्वारकीचा मुका घ्यायला गेलं की, तोंडात तिचा तुटका ओठच येतो.’’ पोरं जाम हसायची त्याला. मग सांबरे पुन्हा पुन्हा तेच म्हणायचे. द्वारकाबाईंचा खालचा ओठ तुटलेला होता. रात्रभर सांबरेंच्या घरातून आरडाओरड, शिव्याशाप आणि रडण्याचे सूर घुमत असायचे.
 
काळेंचं घर सांबरेंच्या घरापासून 100 मीटर अंतरावर. पण इशिनाथ काळ्यांची त-हा थोडी वेगळी होती. ते हातभट्टीच्या गुत्त्यावरून तर्र होऊन बाहेर पडले की, बडबडायला लागायचे. रस्त्यावरून मोठमोठय़ा आवाजात बोलत त्यांची पदयात्रा घराच्या दिशनं चालायची. ते शिव्याशाप द्यायचे नाहीत. म्हणायचे, ‘‘आमचा भरत दोन डबलरोटय़ा खातो. कुणाच्या बापाचं खातो? आमच्याच घरचं खातो. आम्ही त्याला दोन रोज सकाळी चहाबरोबर दोन डबलरोटय़ा घेऊन देतो. आमची बायको इतरांच्या शेतावर कामाला जात नाही. का म्हणून जावं तिनं? आम्ही शहाण्णव कुळी मराठे आहोत. आम्ही इतरांची चाकरी का करावी? आणि शेतात काम करून बायको काळी पडली तर मग ती गोरी कशी होणार पुन्हा?’’ हे त्यांचं स्वगत रस्ताभर चालू असायचं. ती गावातल्या लोकांना मोठी करमणूक असायची.
 
दुस-या दिवशी सकाळी दोघेही नेहमीप्रमाणे कामावर निघायचे. तेव्हा शेजारचे लोक त्यांना म्हणायचे, ‘काय रात्री जरा जास्त झाली होती वाटतं?’ सांबरे आणि काळे त्यावर कानकोंडे होत ओशाळवाणं हसायचे. ‘आता दारू जरा कमी केली पाहिजे’ म्हणायचे. पण पुन्हा संध्याकाळी दोघंही तर्र होऊन जायचे. पुन्हा कालचाच सीन रंगायचा. शेजारपाजाऱ्यांना या गोष्टीची इतकी सवय होऊन गेली की, त्यांना त्याचं काही वाटेनासं झालं.
 
काही गावक-.यांनी एकत्र येऊन दोघांची दारू सुटण्यासाठी त्याना पंढरपूरच्या वारीला पाठवलं, डॉक्टरांकडे नेलं, गंडेदोरे बांधणा-या मांत्रिकाकडे नेलं. पण पहिले पाढे पंचावन्न. दोघांतही काही फरक पडला नाही. परिणामी सांबरे यांना लोक काम देईनासे झाले. कारण ते दोन दिवस कामावर जायचे, मालकाकडून कामाचे सगळे पैसे घ्यायचे आणि ते दारूत घालवायचे. मग काम नाही आणि काहीच नाही. काळे वेळेवर पाणी सोडायचे नाहीत. मग त्यांना कामावरून काढून टाकायची मागणी होऊ लागली, तेव्हा ते काम त्यांच्या बायकोनं आणि मुलानं करायला सुरुवात केली. परिणामी दोघंही रिकामटेकडे झाले. दिवसभर दारू पिऊन वाट्टेल तिथे पडू लागले. दारूसाठी घरातली भांडीकुंडी विकू लागले. घरातल्या वस्तू गहाण ठेवू लागले. 
 दारूपायी सांबरे यांची तब्येत खूपच खालावली, तर काळे आजारी पडून गेले. सांबरेंना त्यांच्या बायको-मुलानं घराबाहेर काढलं. त्यामुळे  आता त्यांना कुणी तरी जेवायला देतं, ते कुठेतरी झोपतात. दोन दोन दिवस आंघोळ करत नाहीत. गावातल्या लोकांना त्यांच्या सगळ्याच गोष्टी माहीत असल्याने कुणी त्यांना तसं फार काही बोलत नाही. लोक फक्त हळहळ व्यक्त करतात. कधीतरी विषय निघतो, तेव्हा सांबरे आणि काळे यांचे किस्से लोक एकमेकांना मोठय़ा आनंदानं सांगतात. हे किस्से आता अकबर-बिरबलाच्या गोष्टींतल्यासारखे झाले आहेत. त्यातले खरे किती आणि खोटे किती याची खातरजमा करणं अवघड. कारण प्रत्येक जण त्यात आपापल्या परीनं भर घालत असतो. त्यामुळे सांबरे आणि काळे या दोघांच्या कथा, आता दंतकथा झाल्या असून, त्या गावातच नाही तर आसपासच्या गावातही ‘तळीरामांच्या (दंत)कथा’ म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. गेली कितीतरी वर्षे त्यांची चर्चा चालूच आहे. 

‘दुर्लभ अभिव्यक्ति : विरल व्यक्तित्व’

(२१ फेब्रुवारी २०११ रोजी प्रहारमध्ये लिहिलेला लेख)

विनोद कुमार शुक्ल यांच्या ‘नौकर की कमीज’ या कादंबरीवर मणि कौल या दिग्दर्शकाने त्याच नावाने 1999 साली चित्रपट केला. त्यानंतर दहा वर्षानी पुन्हा एकदा मणि कौलच पुढे आला आणि आता तो शुक्ल यांच्या ‘दीवार में एक खिडम्की रहती थी’ या कादंबरीवर चित्रपट करतोय. खरं तर यानंतर विनोद कुमार यांच्याबद्दल फार काही लिहिण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ही दोनच पुस्तकं लिहिली असती तरी त्यांची आजच्याएवढीच ख्याती झाली असती.
 विनोद कुमार यांनी कथा, कविता आणि कादंबरी या तिन्ही वाङ्मयप्रकारत लेखन केले आहे. पण त्यांच्या पुस्तकांची संख्या अकरापेक्षा जास्त नाही. ‘लगभग जयहिन्द’, ‘वह आदमी नया गर्म कोट पहिनकर चला गया विचार की तरह’, ‘सब कुछ होना बचा रहेगा’, ‘अतिरिक्त नहीं’, ‘कविता से लंबी कविता’, ‘आकाश धरती को खटखटाता है’ हे सहा कवितासंग्रह; ‘नौकर की कमीज’, ‘खिलेगा तो देखेंगे’ आणि ‘दीवार में एक खिडम्की रहती थी’ या तीन कादंब-या; आणि ‘पेडम् पर कमरा’ व ‘महाविद्यालय’ हे दोन कथासंग्रह. त्यांच्या तिन्ही कविता आणि कादंब-यांचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, जर्मन या भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत.
..तर अशा या लेखकावर ‘सापेक्ष’ या हिंदीतल्या अनियतकालिकाने तब्बल 880 पानांचा विशेषांक काढला आहे. त्याचे नाव आहे, ‘दुर्लभ अभिव्यक्ति : विरल व्यक्तित्व’. हे विशेषण हिंदीमध्ये केवळ विनोद कुमार शुक्ल यांच्याबद्दलच वापरले जाऊ शकते, याची प्रचिती या अंकामधून येते.
 
या अंकाची रचनाच मोठी मस्त आहे. त्यातला पहिला विभाग आहे मुलाखतींचा. सुमनिका आणि अनूप सेठी, मेनका श्रीवास्तव आणि रमेश यादव, विचारदर्शिनी आणि देवेन्द्र मिश्र, संतोष आणि महावीर अग्रवाल या चार पती-पत्नीं एकमेकांशी चर्चा केली आहे, ती विनोद कुमार शुक्ल यांच्या लेखनाविषयी. त्यातून विनोद कुमार यांच्या स्वभावाचे, व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यांच्या लेखनाचेही विविध पैलू उलगडतात.
 
दुस-या विभागात अभय कुमार मिश्रा यांनी घेतलेली विनोद कुमार यांची तर महावीर अग्रवाल यांनी विनोद कुमार यांचा मुलगा शाश्वत गोपाल यांची घेतलेली मुलाखत आहे. पहिली मुलाखत हिंदीतल्या शमशेर, अज्ञेय, केदारनाथ सिंह, नागार्जुन यांच्याविषयी आहे तर दुसरी विनोद कुमार यांच्याविषयी.
 
‘स्मृतियों का अंतरिक्ष’मध्ये असग़र वजाहत, चन्द्रकान्त देवताले, निरंजन महावर, कमला प्रसाद, ओम भारती, चंद्रकांत पाटील, महावीर अग्रवाल यांनी विनोद कुमार यांच्याबद्दल लिहिलेले लेख आहेत.
 
विनोद कुमार यांच्या ‘नौकर की कमीज’, ‘खिलेगा तो देखेंगे’ आणि ‘दीवार में एक खिडम्की रहती थी’ या तीन कादंब-यांविषयीच्या लेखांचे तीन विभाग आहेत. कविताबद्दलच्या समीक्षालेखांचाही एक विभाग आहे.
 
विष्णु खरे यांनी विनोद कुमारांबद्दल लिहिले आहे, ‘‘अपनी कविता और किस्सागोई में विनोद कुमार शुक्ल हिन्दी के देशज, लौकिक चमत्कार हैं वे शायद हिन्दी के पहले ‘नेटिव जीनियस हैं.’ ’’
 
तर कमलेश्वर यांनी एका मुलाखतीत ‘नौकर की कमीज’ या विनोद कुमारांच्या कादंबरीबद्दल म्हटलं आहे, ‘‘नोकर की कमीज में गहरी संवेदना तो है ही, विषय वस्तु भी उस संवेदना में गुंथी हुई है. विनोद कुमार जी ने एक नया शिल्प गढम और विकसित किया है. मैं मानता हूँ कि ‘नौकर की कमीज’ आज भी हिन्दी उपन्यास का नया प्रस्थान बिंदू है. और बडी थीम का उपन्यास है.’’
 हा अंक काही समीक्षेचा विषय नाही, तो प्रत्यक्षच वाचायला हवा. पण हे खरं की, असं फक्त हिंदीमध्येच होऊ शकतं! कारण त्यासाठी साहित्यावर आणि साहित्यिकांवर निरतिशय प्रेम करणा-या संपादकांचा, वाचकांचा मोठा जनसमुदाय असावा लागतो. तशा प्रकारची ‘वाङ्मयीन संस्कृती’ तयार व्हावी लागते. ती मराठीमध्ये कधी काळी होती, असं म्हणतात. पण सध्या तिचा कुठे मागमूसही दिसत नाही. असो.

...नाही तर तुमच्याशिवाय

सब-कुछ ख़त्म हो जाने को भाषा स्वीकार नहीं करती, कला को शायद यह स्वीकार करना पडम्ता है. (संपादकीय, क)
  
हिंदीमध्ये या एकाक्षरी नावाचे चित्रकला, शिल्पकला आणि वैचारिक साहित्याला वाहिलेले द्वैमासिक आहे. मराठीमध्ये एकेकाळी अभिरूचीहेसत्यकथेच्या तोडीचं साहित्यविषयक मासिक होतं. त्यात पुरुषराज अळूरपांडे या नावाने पु.ल. देशपांडे, मं.वि. राजाध्यक्ष आणि अळूरकर हे तीन लेखक एक सदर लिहायचे. ..तर या मासिकामध्ये इरावती कर्वे या टोपणनावानं काही काळ लेखन करत होत्या. त्याची इथं काही जाणकार वाचकांना पटकन आठवण होऊ शकते.
 
 चा खुलासा करताना संपादक अंकाच्या मलपृष्ठावर कला सम्पदा एवं वैचारिकीअसंही आवर्जून छापतात. या अंकाचे संपादक आहेत विजय शंकर. त्यांच्या शब्दात या मासिकाचं स्वरूप असं आहे, ‘‘ ‘हिन्दी भाषा की एक बहुआयामी एवं बहुउद्देशीय कला पत्रिका है. हमारा साम्प्रतिक लक्ष्य भिन्न भारतीय भाषाओं के प्रमुख कवियों को पाठकों के समक्ष उपस्थित करना एवं उनकी कृतियों की आलोचना एवं समीक्षा करना है. यह प्रचेष्टा का एक पहलू है. विभिन्न भाषाओं के साहित्य, साहित्यकार एवं साहित्य प्रेमियों के बीच भावों के आदान-प्रदान एवं मत विनिमय को गति प्रदान करने के साथ-साथ उसे सशक्त भी करना है.’’ या अवतरणातली हिंदी वाचायला आणि समजायला थोडी कठीण वाटू शकते. तरी ते मुद्दाम दिला आहे. त्याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे हिंदी भाषेचं अतिशय समृद्ध आणि गंभीर रूप हे या अंकाचं एक वैशिष्टय़ आहे. आणि दुसरं, गंभीर वौचारिक साहित्य.
 
 च्या कुठल्याच अंकातून करमणूक होण्याची शक्यता नाही. समाज प्रबोधन पत्रिकाहे मराठीतील नियतकालिक किंवा इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीहे इंग्रजीतील साप्ताहिक वाचताना अक्षरक्ष: झोप येते हो, असा उसासा टाकणा-या वाचकांसाठी हे मासिक अजिबात नाही. ज्यांना गंभीरपणे साहित्य आणि कलांविषयी जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठीच हे मासिक आहे.
 पण मग इतकं गंभीर मासिक चालू कसं काय शकतं असा प्रश्न काहींना पडू शकतो. पण आधी उल्लेख केलेल्या दोन्ही नियतकालिकांप्रमाणे ते अव्याहतपणे सुरू आहे. एवढंच नव्हे तर आठ वर्षापूर्वी सुरू झालेल्या या मासिकानं हिंदी आणि भारतीय भाषेतील जिज्ञासू वाचकांच्या वाचनक्रमात हक्काचं स्थान मिळवलं आहे.
या अंकात गंभीर लेखन वाचायला मिळतं तसं भारतीय भाषेतील एका मान्यवर कवीच्या आठ-दहा कविता आणि त्या कवीविषयीचा लेखही आवर्जून दिला जातो. विंदा कंरदीकर, के. सच्चिदानंद, उडिया कवी राधानाथ राय, पंजाबी कवी हरिभजन सिंह अशा दिग्गजांच्या कविताही या अंकातून प्रकाशित झाल्या आहेत, होत असतात.
 
हे मासिक डबल डेमी आकाराचे आहे. याची कागद आणि छपाई अतिशय उकृष्ट आणि निर्दोष असते. एक अंक जेमतेम चौतीस पानांचाच असतो, पण तो संपूर्ण वाचून काढायला किमान एक पूर्ण दिवस लागतो. या अंकाची मुखपृष्ठं आणि मलपृष्ठंही सुंदर असतात.
 वेगवेगळ्या भाषेतील साहित्य आणि भारतीय-आंतरराष्ट्र्रीय पातळीवरील चित्रकला, शिल्पकला याविषयी जाणून घ्यायचं असेल तरच या अंकाच्या वाटेला जावं. कारण अंकाच्या संपादक मंडळाचा मुळी असाच आग्रह आहे की, ‘आलात तर तुमच्यासह, नाही तर तुमच्याशिवाय.तेव्हा निर्णय तुमचा आहे.

छोट्या संमेलनांचा यशस्वी फॉर्म्युला

 (९ डिसेंबर २०१० रोजी प्रहारमध्ये लिहिलेला लेख) 
जुलै 2007 चा शेवटचा दिवस. या दिवशी संध्याकाळी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू आणि प्रसिद्ध नाटकाकर विजय तेंडुलकर यांची जाहीर
मुलाखत होणार होती. हे दोन्ही दिग्गज पहिल्यांदाच समोरासमोर येणार होते.
त्यामुळे पुण्यात मोठं उत्सुकतेचं वातावरण होतं. पण हा कार्यक्रम आयोजित करणा-या
राजन खान आणि त्यांच्या ‘अक्षर मानव’ या संस्थेला मात्र धाकधूक होती की, हा कार्यक्रम
यशस्वी होतो की नाही. कारण लागू-तेंडुलकरांशी वैयक्तिक संबंध असल्यानं त्यांचा होकार
सहजासहजी मिळाला खरा, पण आता कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचं मोठं आव्हान पुढे
ठाकलं होतं. बरं, संस्थेकडे आर्थिक बळ पुरेसं नव्हतं आणि मुनष्यबळही. त्यामुळे
कुठल्याही प्रकारची जाहिरात झाली नव्हती आणि प्रसिद्धीही. पण पाचच्या कार्यक्रमाला
पुणेकरांनी दुपारी दोनपासूनच शिस्तबद्ध रांगा लावायला सुरुवात केली. आणि राजन खान आणि
त्यांच्या कार्यकर्त्यांचं धाबं दणाणलं. पण कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला!
राजन खान हा माणूसच असाच आहे!आर्थिक बळ आणि मनुष्यबळ या दोन्हींचा कुठलीही फिकीर न
करता मनात येईल ते कार्यक्रम आखायचे, काही मित्रांच्या सहकार्यने यशस्वीही करायचे हा
त्यांचा खाक्या आहे. शिवाय णूस बोलायला एकदम फटकळ. पण मराठीतला आघाडीचा लेखक
असल्यानं सर्वाना परिचित. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला दिग्गजांपासून सर्वजण येणात. अनंत भावे,
रंगनाथ पठारे, वसंत आबाजी डहाके, मेघना पेठे, सौमित्र (किशोर कदम), दासू वैद्य, रमेश
इंगळे उत्रादकर, आसाराम लोमटे अशा सध्याच्या आघाडीच्या साहित्यिकांशी या संमेलनांत
हजेरी लावली आहे.
मराठीत छोटी-मोठी अनेक संमेलनं होतात. पण त्यातली बरीचशी मोघम संकल्पना घेऊन केली जातात. आपण
हे टाळायचं, असं ठरवून राजन खान यांनी एकेक विषय घेऊन संमेलनं करायला सुरुवात केली. गेल्या
तीन वर्षात त्यांनी यवतमाळ, चंद्रपूर, पाचगणी या ठिकाणी ‘अक्षर मानव’च्या माध्यमातून
‘मी संमेलन’, ‘मी-तू संमेलन’, ‘साहित्याचं साहित्य संमेलन’ अशी संमेलनं घेतली आहेत.
साहित्य असेल वा समाज यातल्या कुठल्याही व्यक्तीला ‘मी’चा शोध असतो. ‘मी’ भोवती जग असतं.
यातनं ‘मी संमेलन’ घ्यावं हे लक्षात आलं. या संमेलनातून ‘मी’च्या बाहेरही जग असतं.
एकाला दुसरा घटक लागतो, तेव्हा ‘मी-तू संमेलन’ घ्यावं असा प्रस्ताव पुढे आला. मग त्यावर
संमेलन घेण्यात आलं.
साहित्याचा इतर घटकांशी संबंध येतो. त्यातून ‘साहित्याचं साहित्य संमेलन’ घेण्यात आलं.
आणि आता यवतमाळ इथं अखिल भारतीय संमेलनाच्या तारखांनाच म्हणजे 25 ते 27
डिसेंबरला ‘विनोद साहित्य संमेलन’ आयोजित केलं आहे. सध्या आपल्या समाजातून आणि
साहित्यातून विनोद संपत चालला आहे. समाज गंभीर होत चालला आहे. पण समाजाला विनोदाची गरज
असतेच, म्हणून हे संमेलन आयोजित केले आहे असं राजन खान सांगतात.
राजन खान यांना यशस्वी संमेलनांचा फॉर्म्युला सापडला आहे. आता तर त्यांना
लोकांकडूनच वेगवेगळ्या संमेलनांचे पर्याय सुचवले जात आहेत. आमच्या गावीही असं
संमेलन घ्या अशी निमंत्रणं येऊ लागली आहेत. चंद्रपूरच्या भोयर नावाच्या तरुणानं तर
लग्नातल्या अनावश्यक खर्चाला फाटा देण्यासाठी ‘अक्षर मानव’चं संमेलनच लग्नात भरवलं
होतं. आणि त्याला वऱ्हाडी मंडळींसह सर्वानी चांगला प्रतिसाद दिला. त्या तरुणाची
आधी हिरमुसलेली बायकोही खुश झाली. आजवरच्या ‘अक्षर मानव’च्या सर्वच संमेलनांना
साहित्यिक-रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याची तीन-चार कारणं आहेत. फार गर्दी
व्हावी अशी राजन खान यांचीच अपेक्षा नसते. कार्यक्रमाला शंभर लोक आले तरी पुरे असं
त्यांचं म्हणणं असतं. पण कुठल्याही कार्यक्रमाला पाचशे-सातशे लोक येतातच, येतात.
कारण ही संमेलनं पाचगणीसारख्या निसर्गरम्य ठिकाणी असतात. तीन दिवस आणि चार
रात्री लेखक-वाचकांना एकमेकांशी मनमोकळा संवाद करता येतो, देवाणघेवाण करता येते.
त्यामुळे दिवसभराच्या कार्यक्रमानंतर रात्री शेकोटी पेटवून त्याभोवती काव्य-शास्त्र-विनोद यांना
उधाण येतं. तिथं संमेलनानंतरचं संमेलन भरतं.
माणसाच्या बौद्धिक विकासासाठी काम केलं पाहिजे असं राजन खान यांना वाटतं.
त्यासाठी आपण आपल्यापरीनं काय करू शकतो? तर समाजात खूप चांगलं काम असणारी आणि विचार असणारी
माणसं आहेत. त्यांना बोलावून लोकांसमोर बोलायला लावायचं, तत्कालीन प्रश्नांकडे कसं
पाहायचं याबाबत मागदर्शन करायला सांगायचं. यातलं काय घ्यायचं अन् काय नाही ही
समाजाची जबाबदारी आहे. पण समाजाला असं काहीतरी देणं ही आपली जबाबदारी आहे, ती मी
माझ्या परीनं पार पाडतो, असं राजन खान आपल्या उपद्व्यापाचं स्पष्टीकरण देतात.
लेखकानं नुसतं लिहून चालणार नाही. समाजाचं काहीतरी काम केलं पाहिजे. कोपरा धरून
लिहिण्यापेक्षा, कागदावरच नुसते संदेश देण्यापेक्षा काही तरी काम केलं पाहिजे, या
ऊर्मीतून राजन खान यांच्यासारख्या एका आघाडीच्या लेखकानं ‘अक्षर मानव’ या संस्थेच्या
माध्यमातून वेगळ्या वाटा शोधायचा प्रयत्न चालवला आहे. तो अनुकरणीय आहे. भविष्यात
‘आम्ही संमेलन’, ‘आपण संमेलन’, ‘वेगळ्या वाटांचे लेखक संमेलन’ अशी संमेलनं घेण्याचा
‘अक्षर मानव’चा विचार आहे. ती संमेलनं यशस्वी होतील यात आता काही शंका उरलेली नाही.
एकंदर मराठी साहित्यविश्वाचा विचार केला तर ही संमेलनं फार छोटय़ा स्वरूपाची आहेत. पण काय
करायचं नाही हे आधीच ठरवल्यानं या संमेलनात कुठलाही अनावश्यक खर्च केला जात नाही अन् निर्थक
चर्चाही होत नाही. हे एका अर्थानं औंदुबर संमेलनाला समांतर ठरणारे संमेलन आहे.
छोटय़ा स्वरूपाची संमेलन यशस्वी होतातच, पण तिथंही दर्जाचं आव्हान असतं. ‘अक्षर
मानव’च्या संमेलनांमधून ही गोष्ट निर्विवादपणे होते. आणि तेच त्यांचं यश आहे.

पाश्चात्य चष्म्यातून भारताकडे...


एक नवा प्रयत्न काही अनिवासी भारतीय आणि भारतीय मित्रांनी ‘otherwise’ या नव्या नियतकालिकाच्या निमित्ताने सुरू केला आहे. आणि म्हणून तो दखलपात्र आहे. A socio-literary effort of of friends from USA and India ’ अशी या नियतकालिकाची टॅगलाईन आहे.
१७ जानेवारी २०११ रोजी प्रहारमध्ये लिहिलेली नोंद. 

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
एकेकाळी परदेशात जाणा-या भारतीयांकडे उच्च शिक्षण, करिअर आणि पैसा मिळवणं अशी प्रलोभनं असायची. अजूनही ती काही प्रमाणात आहे. केवळ पैशासाठी इग्लंड-अमेरिका आणि इतरत्र जाणा-या तरुणांची संख्या आजही आहेच. तिकडे शिक्षण घेऊन हे लोक करिअर वगैरे करतात, पण कधीतरी भारतात येतात तेव्हा ते तिकडच्या देशाबद्दल तोंड भरून कौतुक करत असतात आणि भारताबद्दल मात्र तेवढीच तोंडभरून नाराजी बोलून दाखवतात. अर्थात याला काही सन्माननीय अपवाद आहेत. हे लोक आपल्यापरीनं आपल्या मातृभूमीसाठी काय करता येईल याचा प्रयत्न करतात, किमान भारतातल्या आपल्या मित्रांना, स्नेह्या-सोबत्यांना त्यांच्यापरीनं मदत करतात. समाजाच्या एकंदर चलणवलनात या गोष्टींचं महत्त्व फार नसेलही. पण त्या पॉझिटिव्हगोष्टी नक्कीच असतात.
 
असाच एक नवा प्रयत्न काही अनिवासी भारतीय आणि भारतीय मित्रांनी ‘otherwise’  या नव्या नियतकालिकाच्या निमित्ताने सुरू केला आहे. आणि म्हणून तो दखलपात्र आहे. A socio-literary effort of of friends from USA and India  अशी या नियतकालिकाची टॅगलाईन आहे. कृष्णन किशोर हे या नियतकालिकाचे मुख्य संपादक आहेत तर सुखजोत हे संपादक आहेत. कृष्णन हे कवी, निबंधलेखक असून सध्या ते अमेरिकेतल्या सेंट पॉल या ठिकाणी राहतात. सुखजोत हे लुधियाना येथे राहत असून या अनियतकालिकाचे कामकाज त्यांच्या या पत्त्यावरून चालते आहे.
www.otherwisejournal.com   या नावाने वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे, पण अजून तिचे काम बहुधा पूर्ण झाले नसावे. त्यामुळे तूर्त ती कार्यरत नाही.
otherwise’ चा पहिलाच अंक वैविध्यपूर्ण आणि भरगच्च म्हणावा असा आहे. इश्श्यू, फिक्शन, इंटरव्ह्यू, लिटररी पस्र्पस्पेक्टिव्ह, पोएट्री, प्रिव्ह्यू, अ‍ॅटोबायोग्राफी, द अदर वे असे मोठे सात विभाग आणि आर्ट, बुक रिव्ह्यू, म्युझिक असे छोटे विभागही आहेत. इश्श्यूया विभागातील पाचही लेख हे समाज-राजकारणाविषयीचे आहेत. मृदुला गर्ग या हिंदीतल्या आघाडीच्या लेखिकेने द क्वेश्चेनेबल राईज ऑफ द मिडल क्लास इन इंडियाअसा लेख लिहिला आहे. सध्या देशभरातील मध्यमवर्गाबद्दल सुलटसुलट चर्चा चालू असते. भारतीय मध्यमवर्ग हा जागतिकीकरणाचा खंदा पुरस्कर्ता आहे आणि सर्वात मोठा लाभार्थीही. पण याच वर्गावर सामाजिक नेतृत्वाची जबाबदारी असते. त्यामुळे या वर्गावर अलीकडच्या काळात जोरदार टीकाटिप्पणी होत असते. गर्ग यांनीही मध्यमवर्गासमोरची आव्हाने आणि आवाहने या दोन्हींचा चांगला आढावा घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आर्थिकदृष्टीनं विचार केला तर मध्मयवर्गापेक्षा लाभार्थी आणि न-लाभार्थी असे दोनच वर्ग भारतात आहेत.
 
मुस्लिम धर्माचे गाढे अभ्यासक असगर अली इंजिनिअर यांची नासीरुद्दीन हैदर खान यांनी घेतलेली मुलाखतही वाचनीय आहे. शीबा असलम फ़हमी या स्त्रीवादी लेखिकेने भारतीय मुस्लिम स्त्रियांच्या सद्यस्थितीबद्दल अतिशय परखड लेख लिहिला आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पीएच.डी.च्या विद्यार्थिनी असलेल्या शीबा या हंसया हिंदी मासिकामध्ये मुख्यधारा के अहंकारया नावाने सदरही लिहितात. त्याआधीही त्या हंसमध्येच जेंडर जिहादहे सदर लिहीत.
 
अनामिका यांनी घेतलेला भारतीय स्त्री लेखिकांच्या लेखनाचा आढावा, अरुण कमल यांनी हिंदी समकालीन कविता आणि समकाल यांची केलेली मांडणी, पंकज राग यांनी चित्रपट आणि साहित्य यांचा लावलेला अन्योन्य संबंध  आणि पंजाबीतले ज्येष्ठ लेखक गुरदयाल सिंह यांचा पंजाबी साहित्याबद्दलचा दृष्टिकोन हे लेखही आवर्जून वाचावेत असे आहेत.
 
एकंदर या पहिल्याच अंकात भारतीय पातळीवरील नामवंत लेखकांचे लेखन मिळवण्यात संपादकांना यश आलेले आहे. त्यामुळे हा अंक दिमाखदार झाला आहे. भारतीय साहित्य आणि समाज यांच्यातील नव्या बदलांचा कानोसा घेण्याचा हा प्रयत्न वाखाणण्यासारखा निश्चितच आहे.
 
मराठीमधील लेखिका उर्मिला पवार यांचीही या अंकात छोटी मुलाखत आहे. आणि त्यांच्या आयदानया गाजलेल्या आत्मचरित्राचा काही भागही सोबत दिला आहे. या मुलाखतीत पवार आपल्या जडणघडणीच्या काळाविषयी  बोलल्या आहेत. मात्र पवार यांच्याशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर त्यांनी या मुलाखतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली. ही मुलाखत मला न्याय देणारी नाही, ज्यांच्या प्रेरणेनं आम्हाला आत्मविश्वास मिळाला त्या बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख करण्याचेच मुलाखतकर्तीने टाळले आहे असे त्या म्हणाल्या.
 
आता थोडे संपादकांच्या लेखाविषयी. कृष्णन किशोर यांनी डू वुई हॅव अ चॉईस?’ या शीर्षकाचा लेख लिहिला आहे. त्याची मांडणी मात्र भारतातल्या जवळपास सर्वच गोष्टींबद्दल निराशेचा सूर लावणारी आहे. हा सूर लावताना मात्र त्यांनी नजरेसमोर भारतीय जनमानस आणि राष्ट्रमानस ठेवलेले नाही तर पाश्चात्य फूटपट्टय़ा लावलेल्या आहेत.
 
2007  साली युनायटेड नेशन्सने जगातल्या167   देशांचा सव्‍‌र्हे करून आपला अहवाल तयार केला. निवडणूक पद्धती, प्रशासन, सरकारी व्यवस्था, समाजाचा राजकीय सहभाग आणि त्याची राजकीय संस्कृती या पाच मुद्दय़ांचा आधारावर जगभरातील राज्यव्यवस्थेची पूर्ण लोकशाही’, ‘कमकुवत लोकशाही’, ‘हायब्रिड लोकशाही’, आणि अध्यक्षीय लोकशाहीअशा चार प्रकारात वर्गवारी केली. त्यात भारतीय लोकशाही कमकुवतअसल्याचा आणि डेन्मार्क व स्वीडन यांची लोकशाही पूर्ण लोकशाहीअसल्याचा निर्वाळा दिला आहे.
 
या अहवालाचा हवाला देत किशोर म्हणतात, ‘‘India is a wrong model with countless political parties without much different economic  or political thoughts.’’  या विधानाशी कुठलाही सुबुद्ध माणूस सहमत होणे अवघड आहे. असो. पण हा संपूर्ण लेख अशाच पद्धतीने मांडणी करत संपतो.
 खरं तर किशोर यांनी असे विद्वत मतप्रदर्शन करण्यापेक्षा आपली हे नियतकालिक सुरू करण्यामागची भूमिका सविस्तर मांडली असती तर जास्त बरे झाले असते. पण संपादकांना पाश्चात्य चष्म्यातूनच भारताकडे पाहायचे आहे. त्यांचा हा दृष्टीकोन त्यांच्या बाजूने परिपूर्ण असेलही पण त्यामुळे त्यांची निराशा कमी होण्याऐवजी वाढतच जाण्याचा धोका दिसतो. योग्य मापाचा आणि फायदेशीर चष्मा वापरला तर तो आपली दृष्टी सुधारतो, तसे केले नाही तर आपलीच दृष्टी खराब होते, इतरांचं काही नुकसान होत नाही. हा सिद्धांत किशोर यांनी लक्षात ठेवलेला बरा, असे सुचवावेसे वाटते.
बाकी त्यांच्या या नव्या नियतकालिकासाठी शुभेच्छा!

‘चांगल्या वाचका’चं समृद्ध जग!

काही लोक केवळ वेळ घालवण्यासाठी वा करमणुकीसाठी पुस्तकं वाचत नाहीत. आपल्या जगण्याचा अपरिहार्य भाग म्हणून वाचतात. वाचता यावं असं काम निवडतात किंवा आपल्या दैनंदिन कामातून शक्य तेवढा वेळ काढून वाचत राहतात. अशा लोकांचं वाचन वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण होतं आणि ते वाचक म्हणून प्रगल्भतेच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहचतात. या उलट काही लोक आयुष्यभर वाचत राहतात, पण आपण ‘चांगले वाचक’ वा ‘प्रगल्भ वाचक’ आहोत, असा दावा त्यांना करता येत नाही. 

खरं तर पुस्तकं वाचायची ती आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी, आपण राहतो ते जग समजून घेण्यासाठी, आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, आजूबाजूला जे काही घडतं आहे, त्याचं योग्य आणि सामग्र्यानं आकलन करून घेण्यासाठी. थोडक्यात आपल्या भोवतीच्या जगाचा अन्वयार्थ लावण्यासाठी पुस्तकं वाचायची असतात. पण हे आपल्याकडे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर सांगितलं जात नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तकं वाचायची ती केवळ परीक्षा पास होण्यासाठी आणि इतर पुस्तकं वाचायची ती केवळ करमणुकीसाठी, असा बहुतेकांचा समज होतो. असे लोक जगण्याची रोजची लढाई काही काळ विसरण्यासाठी, आपलं दु:ख विसरण्यासाठी वाचतात. वस्तुत: सर्व संघर्षात-हालअपेष्टांमध्ये आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सद्भिरूचीनं जगावं कसं याची शिकवण पुस्तकांशिवाय जगातला कुठलाही शिक्षक देत नाही. जगण्याशी दोन हात कसे करावेत, आपल्या आधीच्या लोकांनी कसे केले होते, त्यांच्या वेळची परिस्थिती कशी होती, आपल्या वेळची कशी आहे, त्यात साम्य-भेद काय आहेत, त्या घटना-घडामोडींचा अन्वयार्थ कसा लावायचा, जुन्यातलं काय घ्यावं आणि काय घेऊ नये, या तरतमभावाचा आणि तारतम्याचा साक्षेप पुस्तकं आपल्याला देतात. तो ज्यांना कमवता येतो, तो ‘चांगला’ वाचक म्हणावा!

असे चांगले वाचक कालांतरानं आपल्या वाचनाविषयी-पुस्तकप्रेमाविषयी लिहितात. त्या पुस्तकांना इंग्रजीमध्ये ‘बुक ऑन बुक्स’ असं म्हणतात. पण अशा पुस्तक लेखनासाठी काही पूर्वअटी असतात. एक म्हणजे पुस्तकांवर तुमचं मनस्वी प्रेम असावं लागतं. नाहीतर तुमचं लेखन हे पुस्तक परीक्षणांच्या धर्तीचं होतं. ‘बुक ऑन बुक्स’मध्ये पुस्तकाचं समीक्षण नव्हे तर रसग्रहण अपेक्षित असतं. त्यात तुमचा स्वानुभव, पुस्तक, त्याचा विषय, त्यातली तुमची गुंतागुंत, त्या पुस्तकावरून आठवणारे इतर तपशील-किस्से-आठवणी, त्या पुस्तकांविषयी इतरांनी व्यक्त केलेले अभिप्राय, ते ताडून पाहिल्यावर तुमची होणारी प्रतिक्रिया, अशा गोष्टी येतात. पुस्तकाशी पूर्णपणे समरस झाल्यावर ते वाचण्यापूर्वीचे तुम्ही आणि नंतरचे तुम्ही यात फरक पडायलाच हवा. पुस्तक वाचून झाल्यावरही त्याचे साद-पडसाद काही दिवस मनामध्ये उमटायला हवेत. ऑफिसात असताना, जेवताना वा बेडरूममध्ये लोळत पडलेलो असताना त्यातले प्रसंग आठवून हसायला यायला हवं. 

या पूर्वअटींना उतरणा-या वीणा वेणुगोपाल या पत्रकार-लेखिकेचं ‘वुड यू लाइक सम ब्रेड विथ दॅट बुक? अँड अदर इन्स्टन्सेस ऑफ लिटररी लव्ह’ या लांबलचक नावाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. नाव मोठं असलं तरी पुस्तक मात्र (डेमी आकार) अवघं 114 पानांचंच आहे. त्यात वाचनाविषयीचे-पुस्तकप्रेमाविषयीचे एकंदर चौदा लेख आहेत. ‘कमिंग होम’ आणि ‘लॉसिंग माय कॅरेक्टर’ या पहिल्या दोन लेखांत वेणुगोपाल बालपणापासूनचा आपला पुस्तकांशी आलेला संबंध आणि त्यांचा पडलेला प्रभाव सांगतात. पौगंडावस्थेतल्या एका मुलीची लैंगिक विषयावरील पुस्तकं वाचून काय अवस्था (!) होते, याचं मनमोकळं वर्णन ‘लॉसिंग माय कॅरेक्टर’ या लेखात आहे.
 
वीणा वेणुगोपाल या ‘आउटलुक बिझनेस’मध्ये साहाय्यक संपादक आहेत. पुस्तकं, प्रवास, कला, संस्कृती हे विषय असणा-या ‘बझ’ विभागाचं संपादन त्या करतात. सध्या त्या दिल्लीत राहत असल्या तरी पूर्वी  मुंबईत राहत. तेव्हा त्यांचं ऑफिस फोर्ट भागात होतं. पुस्तकप्रेमामुळे रोज संध्याकाळी या भागातल्या सेंकडहँड पुस्तकं विकणा-या विक्रेत्यांकडे चक्कर मारत. त्यात त्यांना अनेक गमतीशीर अनुभव आले. त्याचं वर्णन त्यांनी ‘पेपर व्हर्सेस पिक्झेल’ या तिस-या लेखात केलं आहे. एकदा त्यांनी मित्र निखिलसह 100 रुपयाला एक या प्रमाणे चौदा पुस्तकं विकत घेतली. त्यातल्या ‘अ हाऊस ऑफ मि. बिश्वास’ या पुस्तकावर Jahangir Mehta, September 12, 1980, A fox in search of a wolf असं लिहिलेलं असतं. या मेहतांचीच ती पुस्तकं असतात. त्यात वेणुगोपाल यांना बोर्डिग कार्डस, विमान तिकिटं, व्हिजिटिंग कार्डस, मेडिकल बिल्स अशा अनेक वस्तू सापडतात. काही पुस्तकांमध्ये काय काय लिहून ठेवलेलं असतं! निखिलकडच्या पुस्तकांमध्येही अशाच काही वस्तू सापडतात. त्यावरून हा जहांगीर मेहता कोण असावा, काय व्यवसाय करत असावा, याविषयी कॅफे माँदेगारमध्ये जोरदार गप्पा होतात. निखिलच्या एका पुस्तकात मेहतांचं एक शेअर सर्टिफिकेट मिळतं. त्यात  ACCचे 2000 शेअर त्यांनी घेतलेले असतात. निखिल आणि वेणुगोपाल ते त्यांना परत करायचे ठरवतात. मेहतांचा पत्ता शोधून काढतात. एके दिवशी दोघं काळबादेवीतल्या त्यांच्या घरी जातात. तेव्हा मेहतासाहेब त्यांची चांगलीच हजेरी घेतात. त्यांची Leeching Man, Parasites  अशा शब्दांत संभावना करतात. 

‘माय थ्री रुल्स फॉर रीडिंग इन अ बॉम्बे ट्रेन’ हा लेख लोकलमधल्या वाचनाची गंमत सांगतो. वेणुगोपाल म्हणतात, यातले दोन नियम हे अंतर्ज्ञानी आणि मूर्खपणाचे आहेत, तर एक स्वानुभवातून शिकलेला धडा आहे. त्यांचा पहिला नियम आहे, दर सोमवारी नव्या पुस्तकापासून वाचायला सुरुवात करावी. दुसरा नियम, कुठलंही मजेदार पुस्तक ट्रेनमध्ये वाचायचं नाही. आणि तिसरा नियम, पुस्तकांना तपकिरी रंगाचं कव्हर घालायचं. या तिन्ही नियमांची कारणमीमांसा वेणुगोपाल यांनी दिली आहे. हा लेख महिलांच्या डब्ब्यातून प्रवास करणाच्या वेणुगोपाल यांच्या स्वानुभवावर आधारित आहे. पण हे नियम पुरुषांच्या डब्ब्यातून प्रवास करणा-या स्त्रियांना लागू आहेत का किंवा पुरुषांच्या डब्ब्यातून प्रवास करणा-या पुरुषांनाही लागू पडू शकतात का, याविषयी त्यांनी काहीही म्हटलेलं नाही. मात्र हे नियम समजावून घेणं - ज्यांना ट्रेनमध्ये वाचन करायचं आहे - मुंबईकरांसाठी गरजेचं आहे.
 
असेच केवळ स्त्रियांनी वाचावेत असे आणखी दोन लेख या पुस्तकात आहेत. ‘व्हॉट नॉट टु रीड व्हेन यू आर प्रेग्नंट’ आणि ‘वुड यू लाइक सम ब्रेड विथ दॅट बुक’ हे ते लेख. पहिल्या लेखात वेणुगोपाल स्वत: गर्भवती असताना गर्भधारणेच्या काळाविषयीचं एक पुस्तक वाचत असतात. त्या पुस्तकातल्या टिप्स आणि वेणुगोपाल यांचं रोजचं जगणं, याविषयीचा हा लेख आहे. ‘वुड यू लाइक सम ब्रेड विथ दॅट बुक’ या लेखात वेणुगोपाल यांनी आपलं पाकनैपुण्य कोणकोणत्या पुस्तकांवर बेतलेलं आहे, याची रुचकर रेसिपी सांगितली आहे! 
 
खुद्द सुकेतू मेहतालाच त्याचं मुंबईवरील पुस्तक विकत घेऊन वाचण्यासारखं नाही, असं वेणुगोपाल सांगतात. तेही ते वाचण्याआधीच. तेव्हा मेहता त्यांना तुम्ही वाचून तर पहा, कारण मीच या पुस्तकाचा लेखक आहे, असं सांगतो. त्यावर वेणुगोपाल शरमिंद्या होऊन त्याला कॉफी प्यायला घेऊन जातात. हा सुखसंवाद घडतो ‘स्ट्रँड’मध्ये. ‘द जॉय ऑफ रीडिंग’ या लेखात आपल्या लेकीला पुस्तकं वाचून दाखवतानाचा अनुभव, तर ‘द अल्युअर ऑफ अरेबिया’ हा लेख अरेबियामधील स्त्रियांचं जगणं उलगडणा-या पुस्तकांविषयी आहे.
 
या छोट्याशा पुस्तकात वेणुगोपाल यांनी बालपण, नोकरी, लग्न, मूल, प्रवास, करिअर, संसार अशा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पुस्तकांनी केलेली सोबत, त्यांचा लाभलेला सहवास यांच्याविषयी ममत्वानं लिहिलं आहे. पत्रकारितेत असल्यानं वेणुगोपाल यांची शैली साधी-सोपी-सरळ आहे. ‘नमनाला घडाभर तेल’ घालवायचा उपद्व्याप त्यांना रुचणारा नसल्यानं सारे लेख आटोपशीर आणि नेमके आहेत. जगात दोन प्रकारची माणसं असतात, असं वेणुगोपाल यांना वाटतं. एक, जे एव्हरेस्टवर जाण्यासाठी एक आठवडा बेस कॅम्पवर ट्रेनिंग घेतात, खाऊन घेतात. दुसरे, जे रात्री शांतपणे झोपू शकत नाहीत. हे पुस्तक या दुस-या प्रकारच्या लोकांसाठी आहे, असं त्या सांगतात. कारण जगण्याच्या समस्येवरची काही गुपितं त्यांनी यात सांगितली आहेत. अन् ती कुठलाही आव न आणता, कुठलंही ठाम विधान न करता. शहाण्या माणसानं पुस्तकांच्या सोबतीनं जगायचं असतं! वेणुगोपाल यांनी आत्तापर्यंत तसं केलं आणि ते आता या पुस्तकातून इतरांशी शेअरही केलं आहे.  

वुड यू लाइक सम ब्रेड विथ दॅट बुक? अँड अदर इन्स्टन्सेस ऑफ लिटररी लव्ह : वीणा वेणुगोपाल
योडा प्रेस, नवी दिल्ली
पाने : 114, किंमत : 195 रुपये

Wednesday, May 23, 2012

सार्वभौम लोकशाहीचं प्रतीक

भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 रोजी, तर 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. फेब्रुवारी 1952 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. मग लोकसभेची पहिली बैठक 13 मे 1952 रोजी झाली. त्याला गेल्या आठवड्यात साठ वर्षे पूर्ण झाली. म्हणजे आपल्या देशातल्या लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणा-या संसदेनं एकसष्टीत पर्दापण केलं आहे.

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांना एकत्रितपणे संसद मानलं जातं. संसदेला स्वातंत्र्यपूर्व काळात कौन्सिल हाऊस म्हटलं जात असे. राष्ट्रपती भवनाचा एक भाग म्हणून या वास्तूची योजना प्राथमिक पातळीवर करण्यात आली होती. पण 1919च्या माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणाच्या वेळी भारतीय संसद म्हणून तिची रचना करण्याचं ठरलं. 18 जानेवारी 1927 रोजी भारताचा गव्हर्नर-जनरल लॉर्ड आयर्विनच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन करण्यात आलं.

जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाची जगातील सर्वात मोठी राज्यघटना तयार करण्याचं काम याच वास्तूच्या साक्षीनं पार पडलं. 395 कलमे आणि आठ परिशिष्टांची ही घटना डिसेंबर 1946 ते डिसेंबर 1949 या तीन वर्षाच्या काळात, अगदी नेमकेपणानं सांगायचं तर दोन वर्षे 11 महिने आणि 17 दिवसांत तयार झाली. त्यासाठी संविधान मंडळानं 165 दिवसांमध्ये 11 सत्रं घेतली. भारतीय संविधान मंडळाच्या कामकाजाचा संपूर्ण वृतान्त 11 जाडजूड भागांत छापला आहे. त्यातील काही भाग तर एक हजार पानांपेक्षा मोठे आहेत. ‘भारतीयांच्या वादसंवाद-प्रियतेचा तो सज्जड पुरावाच आहे जणू! पण निव्वळ तेवढेच नव्हे, तर भारतीयांची सखोल व सम्यक दृष्टी, प्रखर बुद्धिमत्ता, तळमळ आणि विनोदबुद्धीचे दर्शनही त्यातून आपल्याला घडते,’ असं या खंडांचं वर्णन इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केलं आहे.
 
संसदेनं आजवर भारताच्या लोकशाहीचं प्रतिनिधित्व केलं. ती भारतीय लोकशाहीचं मूर्तिमंत प्रतीक आहे, मूर्तरूप आहे. भारत हा ख-या अर्थानं सार्वभौम प्रजासत्ताक आहे. त्याचं यथोचित दर्शन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पाहायला मिळतं. या सार्वभौम प्रजासत्ताकाचं प्रतिनिधित्व करणारी संसदही सार्वभौम आहे, यावर दोन्ही सभागृहांमधील सभासदांचा विश्वास असतो. देशातल्या कळीच्या प्रश्नावर हिरिरीनं आणि प्रसंगी हमरीतुमरीवर येऊन चर्चा करणारे खासदार हे भारताच्या प्रचंड वैविध्याचं जसं प्रतिनिधित्व करत असतात, तसंच प्रश्न चर्चेनेच सोडवायचे असतात, यावरही त्यांची श्रद्धा असते. म्हणूनच भारतीय माणूस हा ‘आर्ग्यूमेंटेटिव्ह इंडियन’ आहे असं अमर्त्य सेन म्हणतात. त्याचा पुरावा संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये रोजच्या रोज पाहायला मिळतो.
 
याच संसदेनं पं. जवाहरलाल नेहरू यांच्यापासून डॉ. मनमोहनसिंग यांच्यापर्यंत आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापासून प्रतिभा पाटील यांच्यापर्यंत आणि ग. वा. मावळंकर यांच्यापासून मीराकुमार यांच्यापर्यंत अनेक पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष पाहिले. इथूनच देश चालवला जातो. आणि इथंच सा-या देशाचं हितही राखलं जातं. भारत हा आज जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि यापुढेही राहिल, याचा ग्वाही संसदेची भक्कम वास्तू आजवर देत आली आहे, यापुढेही देत राहिल. पण इथवरचा प्रवास काही साधा-सरळ झालेला नाही. त्यामागे कितीतरी घटना-घडामोडींची उलथापालथ आहे. काही कटु अनुभवही आहेत. पण दिमाखानं मिरवावं, अशा घटनांची साखळीही याच संसदेनं निर्माण केलेली आहे.

भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेनं संपन्न असलेल्या देशाबद्दल जगाला सुरुवातीला प्रचंड साशंकता होती. भारतीय लोकशाही हा त्यांना जुगार वाटत होता. कारण इथं यापूर्वी अशा प्रकारची सर्वसमावेशक आणि सार्वभौम लोकशाही अस्तित्वात नव्हती. एक धर्म, एक राष्ट्र या संकल्पनेवर उभ्या राहिलेल्या युरोपीय देशांना तर भारतीय लोकशाही ही कल्पनाच दु:स्वप्नासारखी वाटत होती. त्यामुळे युरोपीय आणि अमेरिकन विचारवंतांना-बुद्धिवाद्यांना-राज्यकर्त्यांना भारतीय लोकशाहीचा हा प्रयोग फार काळ टिकणार नाही, असंच वाटत होतं. तसं त्यांनी बोलून-लिहून दाखवलं होतं. आज ना उद्या भारताचे पूर्वीसारखेच तुकडे पडून भारत परत विखंडीत होईल, अशी अटकळ ते बांधून होते. इतिहासकार गुहा म्हणतात, ही पाश्चात्यांची साशंकता कधी संपली तर भारताच्या स्वातंत्र्याला आणि लोकशाहीला 1997 साली पन्नास वर्षे पूर्ण झाली तेव्हा. मग भारताच्या लोकशाहीविषयी जगभर मोठ्या कौतुकानं लिहिलं गेलं. तेव्हापासून पाश्चात्य आणि भारतीयांमध्ये भारताविषयी पुस्तकं लिहिण्याची जणू काही अहमहमिकाच सुरू झाली आहे! आजवर भारत आणि भारतीय लोकशाहीविषयी कितीतरी पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्यांचं संसदेच्या साठीनिमित्त स्मरण करणं, वाचन करणं आणि भारतीय लोकशाही सामंजस्यानं समजून घेणं, हे आपल्या अधिक हिताचं आहे आणि लोकशाही भारताचा नागरिक म्हणून कर्तव्यही आहे.


1) वर्किंग अ डेमॉक्रेटिक काँन्स्टिट्यूशन : द इंडियन एक्सपिअरन्स - ग्रॅनविल ऑस्टिन 
2) द इंडियन काँन्स्टिट्यूशन : कॉर्नरस्टोन ऑफ अ नेशन - ग्रॅनविल ऑस्टिन 
3) हिस्टरी ऑफ द पार्लिमेंट ऑफ इंडिया (खंड 1 ते 5) - सुभाष कश्यप 
4) फिप्टी इअर्स ऑफ इंडियन पार्लिमेंट - जी. सी. मलहोत्रा 
5) हिस्ट्री ऑफ पार्लिमेंटरी डेमॉक्रसी - सुभाष कश्यप 
6) पार्लिमेंटरी डेमॉक्रसी अँड पॉलिटिकल चेंज इन इंडिया - एम. आर. बिजू 
7) व्हॉट एल्स इंडियन पार्लिमेंट? : अ‍ॅन एक्झॉटिव्ह डायग्नोसिस - ए. सूर्या प्रकाश 
8) पार्लिमेंट अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन - बी. गोस्वामी 
9) पार्लिमेंटरी इन्स्टिटय़ुशन्स इन इंडिया : डेव्हलपमेंट ऑर डिके - डी. सुंदर राम 
10) पार्लिमेंट डेमॉक्रसी ऑफ इंडिया : अ क्रिटीकल कॉमेन्टरी - के. व्ही. राव 
11) द इंडियन पार्लिमेंट : अ डेमॉक्रसी अ‍ॅट वर्क - बी. एल. शंकर/वॅलेरिनय रॉड्रीग्ज 
12) इंडिया आफ्टर गांधी - रामचंद्र गुहा

Thursday, May 17, 2012

समाज बदलविणाऱ्या माणसांविषयी...

लोकसत्ताच्या नागपुर आवृत्तीच्या विदर्भरंग या पुरवणीत (रविवार, १३ मे २०१२) मी संपादित केलेल्या ‘कर्ती माणसं’ या पुस्तकाबद्दल  प्रा. अजय देशपांडे यांनी लिहिलेला लेख.
 ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

           राम जगताप यांनी संपादित केलेल्या ‘कर्ती माणसं’ या पुस्तकात ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ या  संस्थेने उल्लेखनीय व अनुकरणीय सामाजिक कार्यासाठी पुरस्कार देऊन गौरविलेल्या चोवीस कार्यकर्त्यांची ओळख आहे. मोहन हिराबाई हिरालाल, भुरीबाई मानसिंग शेमळे, सुरेश खैरनार, अर्जुन कोकाटे, व्यंकप्पा भोसले, राजन इंदुलकर, वाहरू सोनवणे, प्रतिभा शिंदे, पूर्णिमा मेहर, तिस्ता सेटलवाड, रमेश हरळकर, पोपटराव पवार, विलास भोंगाडे, आनंद पटवर्धन, उत्का महाजन, दस्ता इस्वलकर, विवेक माँटेरो, कुमुद पावडे, काळूराम दोघडे, रेहाना बैलिम, बापुसाहेब म्हेत्री, सुरेखा दळवी, सय्यद भाई, बस्तु रेगे या चोवीस कार्यकर्त्यांविषयीचे लेख या पुस्तकात आहेत. या पुस्तकाचा हेतू आणि पुस्तकातील लेखन याविषयी मुखपृष्ठावर जो मजकूर दिला आहे ‘तो बोलका’ आहे.
‘या कार्यकर्त्यांच्या जीवनाविषयक प्रेरणा काय होत्या त्यांना प्रतिकूल परिस्थितीतही लढण्याचे व टिकून राहण्याचे बळ कोठून मिळाले आणि विकासाच्या वेगळ्या पायवाटा कशा तयार करता आल्या याचे काही वस्तुपाठ या पुस्तकात आहेत. या कार्यकर्त्यांनी संस्थेच्या व संघटनेच्या माध्यमातून वंचित-शोषित-उपेक्षित घटकांचे प्रश्न ऐरणीवर कसे आणले, त्यांची कैफियत शासन दरबारी कशी मांडली व त्यांना संघर्षांस कसे प्रवृत्त केले याची झलक यात दिसते. त्यामुळे हे पुस्तक वाचताना आपल्या दैनंदिन जीवनाच्या परिघाबाहेर पाहण्यास व स्वत:चे जगणे वागणे तपासून घेण्यास तसेच सामाजिक जाणिवा विकसित करण्यास प्रवृत्त करते’.
          या पुस्तकातले लेखन सामाजिक कार्य करू पाहणाऱ्या प्रत्येकाला त्या आगीची माहिती देणारे आहे. अगदी चाकोरीतील झापडबंद जगणे जगणाऱ्या माणसांना हे पुस्तक एका वेगळ्या जगाचे अवलोकन करायला लावणारे आहे. चाकोरीतील झापडबंद जगण्याला सामाजिक जाणिवांची दृष्टी देण्याचे कार्य हे पुस्तक करते.
          या पुस्तकाच्या प्रारंभी महात्मा गांधींनी सांगितलेली सात ‘सामाजिक’ पापकर्मे दिलेली आहेत. ‘तत्त्वहीन राजकारण नीतिमत्ताही व्यापार, कष्टाविना संपत्ती, चारित्र्याविना शिक्षण, मानवतेविना विज्ञान, विवेकहीन सुखोपभोग, त्यागरहितभक्ती’ या सात सामाजिक पापकर्माना आज समाज आकंठ बुडालेला असल्याचे दिसते. महात्मा गांधींनी सांगितलेल्या या सात पापकर्माचे मोह  टाळून खऱ्याअर्थाने दगडावर पेरणी करून आयुष्य फुलविणाऱ्या चोवीस कार्यरत कार्यकर्त्यांच्या जीवन आणि कार्याची ओळख या पुस्तकात करून दिलेली आहे.
          प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या चोवीस कार्यकर्त्यांविषयी ज्योती केळकर, जे.जी. खैरनार, विलास भोंगाडे, सुभाष वारे, सुरेश शिरपूरकर, सुरेश जोशी, अविनाश कदम, जयंत पाटील, रमाकांत पाटील, मीना कर्णिक, प्रतिभा जोशी, सुरेशचंद्र वारघडे, रूपा कुलकर्णी-बोधी, कुंदा प्रमिला नीळकंठ, सुरेखा दळवी, गजानन खातु, गीता महाशब्दे, नरेंद्र बोडके, राजन अन्वर यांनी लिहिले आहे. हे लेखन भक्तीच्या भावनेने झालेले नाही. हा या सर्व लेखनाचा सामायिक विशेष आहे. प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या कार्याविषयी लिहिणारी ही मंडळी सामाजिक चळवळींची उत्तम जाण असणारी आहे. अशा प्रकारच्या लेखनासाठी आवश्यक ती तटस्थता आणि नि:पक्ष दृष्टी हे लेखन करणाऱ्या मंडळीं जवळ आहे. त्यातील काही तर प्रत्यक्ष कार्यरत असणाारे कार्यकर्ते आहेत. त्यामळे या पुस्तकातील लेखनाचे स्वरूप फार वेगळे असल्याचे जाणवते. कार्यकर्ते व सामाजिक संस्थाची कार्यपध्दती आणि विचार प्रणाली यांची उत्तम जाण असल्याने या लेखकांचे लेखन प्रत्यक्ष सामाजिक चळवळीतील सारे ताणेबाणे व ताणतणाव देखील समजून घेणारे आहे. माणसांचे अनुभव , प्रत्यक्ष कार्य, जगणे आणि विचार या बाबी समजून घेतल्या की समाज आणि चळवळ देखील समजून घेता येते. आता सामाजिक चळवळी किंवा समाजकार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या आणि समाजासाठी काही तरी करू इच्छिणाऱ्या तरुणांना हे पुस्तक मार्गदर्शिकेसारखे उपयुक्त ठरणारे आहे.
          या पुस्तकाच्या पानापानांवर जे तत्वज्ञान वाचायला मिळते, ते प्रत्यक्ष कृतीतून उगवलेले आहे.  ‘आडनावावरून जात कळते म्हणून आडनावाचा त्याग करणे, स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान मिळते, बालकाला जन्म देण्याचे, त्यांचे संगोपन करण्याचे काम आईचे; परंतु तिच्या नावाला कुठे स्थान नाही, हे बदलायला हवे, असे मनोमन पटल्यावर आपल्या मोहन या नावापुढे आधी आईचे व नंतर वडिलांचे नाव लावणे त्याने आचरणात आणले. हे विचार आणि आचार यात समानता असावी, याचे हे बोलके उदाहरण’ (पृष्ठे १७) ‘डॉ. खैरनार यांनी आश्रम स्थापन केला नाही की एखादी एनजीओ स्थापन करून सरकारी व विदेशातील निधीवर सामाजिक कार्याची मर्दुमकी गाजवली नाही. त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वात हे कार्य बसत नाही. चळवळीत झोकून देणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे ते आयुष्यात जमिनीवर चाललेल्या चळवळीत सहभागी झाले. संस्थांचे वार्षिक अहवाल तयार करून व त्यावर फोटो चिकटवून निधी जमा करण्याच्या फंदात डॉ. खैरनार पडले नाहीत. त्यांच्या समाजिक कार्याचे मूळ जर कशात असेल तर त्यांच्या संवेदनेत. हा माणूस अत्यंत संवेदनशील आहे. मग भागलपूरचा संहार असो की, गुजरात सरकार पुरस्कृत विशिष्ट समाजाची कत्तल असो, अशा घटनांमुळे डॉ. खैरनार यांचे हृदय दुभंगले जाते. सांप्रदायिक शक्तीच्या विरोधात लढणाचे बळ त्यांच्या या संवेदनेत आहे.’(पृष्ठे ३६) अशी वाक्ये, घटना, प्रसंग सत्य प्रकटीकरण आणि नि:पक्षपणाच्या तळमळीतून सांगितली गेली आहेत. प्रत्यक्ष चळवळीतून अंकुरलेली विचारप्रणाली येथे प्रकट झाली आहे. या चोवीस कार्यकर्त्यांची वैचारिक घडण आणि कृतिप्रवणता त्यांचे अनुभव, त्यांचे लढे, त्यांच्यावर आलेले जीवघेणे प्रसंग, प्रतिकूल परिस्थितीतही न ढळणारा त्यांचा अभंग विश्वास, प्रबोधनाच्या चळवळीवरची आणि प्रबोधनकारी विचारांवरची अविचल निष्ठा त्यांनी उभे केलेले कार्य आणि घडवून आणलेल्या परिवर्तनाचा सारा लेखाजोखा वाचताना आपल्याही मनात प्रबोधनासाठीच्या  कृतिप्रवण विचारांचा झरा निर्माण होतो. आज संवेदनशीलता गमावून बसलेल्या आणि विलक्षण स्वार्थी बनलेल्या माणसांचे अनुकरण करीत आपण आपल्यापुरतंच आपल्यासाठीच वागले पाहिजे, असा संस्कारच रुजवणे सुरू असल्याच्या काळात ‘कर्ती माणसं’ या पुस्तकांसारखी पुस्तक काहीतरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी फार उपयुक्त आहेत. आपल्या जगण्याच्या परिघाबाहेर खूप माणसे आहेत त्यांना माणसासारखे जगता यावे म्हणून आपण काही तरी केले पाहिजे, ही जाणीव हे पुस्तक देते. 

Monday, May 14, 2012

शासनसंस्थांना झालंय गँगरीन!

साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, विश्वकोश निर्मिती मंडळ, या साहित्यसंस्था सध्या काय काम करतात? साहित्य-संस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी या संस्थांची निर्मिती झाली आहे. पण त्यांच्या कामाची गती आणि रीती पाहिली की, या स्वत:चं नेमून दिलेलं कामही धड करत नसल्याचा पुरावाच मिळतो. स्वत:ची कामंच धड या संस्था करत नसतील तर मग त्यांच्या कामांतून वाचन-संस्कृती, ग्रंथप्रेम आणि ग्रंथव्यवहार या अनुषंगिक गोष्टी घडून येणार तरी कशा?
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
शासन आणि शासनाच्या अंतर्गत राहून अधिकृतपणे मराठी भाषेसाठी काम करणा-या शासनसंस्था हा मराठी साहित्य व्यवहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. शासनाच्या माध्यमातून लेखक, वाचक आणि समाज यांना जोडणारा एक सक्षम दुवा बनण्यासाठी या संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावणं अपेक्षित असतं. त्यातून मराठी वाचनसंस्कृती जोपासण्याची एक चांगली संधी या संस्थांना उपलब्ध होते, पण आज तरी तशी संधी घेताना या संस्था दिसत नाहीत. या संस्था वर्षभर राबवत असलेल्या साहित्यविषयक कार्यक्रम-उपक्रमांची माहिती जाणून घेतली, तर त्या फारशा गंभीर आणि कार्यतत्पर नाहीत, असंच काहीसं निराशाजनक चित्र समोर येतं.

आपल्या देशात लोकशाही शासनव्यवस्था आहे. लोकशाही ही कल्याणकारी शासनसंस्था मानली जाते आणि ती जनतेला उत्तरदायी असते. त्यामुळेच महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. भाषा संचालनालय सुरू केलं. सुरुवातीला विश्वकोश निर्मिती मंडळही संस्कृती मंडळाच्या अंतर्गतच होतं. नंतर ते स्वायत्त झालं. पुढे राज्य मराठी विकास संस्था सुरू झाली. म्हणजे या चार संस्था अधिकृतपणे सरकारच्या वतीनं चालवल्या जाणा-या संस्था आहेत. त्यांच्या नावामध्येच त्यांच्या कामाच्या स्वरूपाचा स्पष्ट निर्देश आहे. 

या संस्थांची ज्या साहित्यिक कार्यक्रम-उपक्रमांसाठी आणि ध्येयधोरणासाठी निर्मिती झाली आहे, त्याचा एक अनुषंगिक आविष्कार ‘वाचनसंस्कृती’ची जोपासना आणि संवर्धन हा आहे. पण ‘संस्कृती’ हा शब्द ‘वाचना’शी जोडताना हाही विचार व्हायला हवा की, अशी काही स्वायत्त संकल्पना करता येऊ शकते का आणि ती केली तर तिचं स्वरूप काय असेल. त्याची जोपासना, रुजवण, संवर्धन हे फक्त सरकार वा सरकारी साहित्यसंस्था यांच्यावर ‘वाचनसंस्कृती’ची संपूर्ण जबाबदारी टाकून चालणार नाही. सरकार विविध योजना राबवतं, साहित्यसंस्था, साहित्यिक समित्या सुरू करतं. त्याचा उद्देश साहित्यविषयक जाणिवा वाढीस लागाव्या, ती जनमानसाच्या सांस्कृतिक जीवनातली एक अनिवार्य गोष्ट व्हावी, हाच असतो. 

त्यासाठी समाजाचीही त्या योजना, उपक्रम आणि मोहिमांना प्रतिसाद देण्याची, त्या अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं पदरात पाडून घेण्याची गरज असायला हवी. म्हणजे जनसामान्यांनी स्वत:च्या सांस्कृतिक अग्रकमांसाठी सरकारदरबारी आवाज उठवून त्या संदर्भात सरकारला पावलं उचलायला भाग पाडलं पाहिजे. कुठलंही सरकार आपण होऊन आपल्या जनतेला स्वातंत्र्य बहाल करत नसतं. त्यासाठी जनतेला सरकारशी वेळोवेळी भांडून हवं ते पदरात पाडून घ्यावं लागतं. लोकशाही शासनव्यवस्था अशा भांडून पदरात पाडून घेण्यासाठीच्या हक्कांसाठी सवरेत्तम मानली जाते.

सरकारबाबत आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, कुठल्याही नव्या सवलती देताना सरकार आपला हात कधीही सैल सोडत नाही, पण आधी दिलेल्या सवलतीही सहसा काढून घेत नाही. सरकारी कामाचं हे इंगित समजून घेतलं तर ब-याचशा गोष्टी सुकर होतात. पण नेमकी इथंच गडबड आहे. सरकार साहित्य-संस्कृतीबाबत पुरेसं गंभीर नाही, लोक त्याबाबत पुरेसे जागरूक नाहीत आणि सरकारी साहित्यसंस्थांवरील साहित्यिक मान्यवर स्वत:च्या स्वार्थापलीकडे जायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत ‘वाचनसंस्कृती’ची हेळसांड होणं अपरिहार्य होऊन बसतं. जे महाराष्ट्रात सध्या सर्वच क्षेत्रात दिसतं. सरकारी साहित्यसंस्था त्याला अपवाद नाहीत, त्या त्यामुळेच.

वस्तुत: आणि मुख्यत: वाचनसंस्कृतीसाठी स्वतंत्र असा अजेंडा म्हणून काहीच करायची गरज नसते. वाचनसंस्कृती हा मानवी समाजाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचा एक अनुषंगिक आविष्कार असतो. आणि तो तसाच असायला हवा! ‘चला, आता आपण वाचनसंस्कृती धोरण राबवूया’ असं म्हणून कुणी काही करायला गेलं तर त्याची फसगत होण्याची आणि पदरी नामुष्की येण्याचीच शक्यता असते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनं गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘सांस्कृतिक धोरणा’चं गाडं अजून रूळावरच यायला तयार नाही, हे तर अगदी काल-परवाचंच उदाहरण आहे. या सांस्कृतिक धोरणाबाबत त्याच्या अध्यक्षापासून सदस्यांपर्यंत कुणांमध्येही स्पष्ट कल्पना नव्हती आणि एकवाक्यताही. सारे आपले आपल्याला सुचेल ते रेटण्याचा प्रयत्न करत होते. परिणामी नुसत्या चर्चा, बैठका आणि निवेदनं तयार करण्यापलीकडे गाडी सरकली नाही. याचा दोष सर्वस्वी सरकारवर जाण्यापेक्षाही हे धोरण तयार करण्यासाठी नेमलेल्या अध्यक्ष आणि सदस्यांवर अधिक येतो. कारण सरकारनं संधी देऊ केली होती, पण तिचा अधिकाधिक लाभ करून घेण्यात हे लोक कमी पडले, असं चित्र निर्माण झालं. असो.

आता या संस्था कसं काम करतात ते पाहू. 

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांच्या वाढीसाठी आवश्यक ती पुस्तकं प्रकाशित करणं आणि ती लिहून, भाषांतरित करून घेणं हे साहित्य-संस्कृती मंडळाचं काम.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अल्पावधीतच साहित्य-संस्कृती मंडळाची स्थापना होऊन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. सुरुवातीला विश्वकोश हे मंडळाचं एक मुख्य काम होतं. ते त्वरेनं पुरे करण्यासाठी ते मंडळापासून स्वतंत्र करण्यात आले. मग साहित्य-संस्कृती मंडळाचं काम अधिक सुटसुटीत झालं. तर्कतीर्थाच्या काळात मंडळानं खूप चांगलं काम केलं! त्यानंतर अध्यक्ष झालेल्या सुरेंद्र बारलिंगे,    य. दि. फडके, रा. रं. बोराडे या अध्यक्षांनीही आपापल्या परीनं चांगलं काम करायचा प्रयत्न केला. पण अलीकडच्या काळात असे अध्यक्ष मंडळाला लाभले नाहीत. तशा अध्यक्षांची नेमणूक सरकारनं केलेली नाही. परिणामी या मंडळाची मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू झाली आहे.
ज्येष्ठ साहित्यिकांना गौरववृत्ती, नवलेखकांना अनुदान, ग्रामीण भागात लेखक-वाचकांसाठी कार्यशाळा, उत्कृष्ट पुस्तकांना पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशनं अशी विविध कामं मंडळाकडून केली जातात. पण या कामांचा दर्जाही दिवसेंदिवस घसरत चालला आहे. मंडळानं आजवर प्रकाशित केलेल्या जवळपास 500 पुस्तकांची यादी पाहिली तरी कितीतरी महत्त्वाची आणि उत्कृष्ट म्हणावी अशी पुस्तकं त्यात दिसतात. त्यात अनुवादित पुस्तकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यात कितीतरी पुस्तकं अभिजात म्हणावी अशी आहेत. पण त्यातली सध्या किती पुस्तकं उपलब्ध आहेत? फारशी पुस्तकं उपलब्धच नाहीत. आहेत ती सरकारच्या विक्री विभागातच मिळणार, इतर कुठंही मिळणार नाहीत! म्हणून काही दिवसांपूर्वीच डॉ. जयंत नारळीकर यांनी मंडळाला पत्र लिहून कळवलं की, ‘साहित्य संस्कृती मंडळ कधी पुस्तकं काढतं आणि कुठं विकतं हे कळत नाही. त्यामुळे माझं पुस्तक कृपया यापुढे प्रकाशित करू नका’. नारळीकरांसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञानं उद्वेगानं लगावलेली चपराक मंडळाच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे काढणारी होती. मंडळानं ताबडतोब नारळीकरांची भेट घेऊन त्यांच्या पुस्तकाचा इत्थंभूत तपशील त्यांना कळवायला हवा होता आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची ग्वाहीही द्यायला हवी होती. पण मंडळाच्या अध्यक्षांनी ‘नारळीकरांचं पत्र दुर्दैवी आहे, पण त्यांच्या पुस्तकाचा आमच्याकडे कॉपीराइट आहे’ असा उफराटा खुलासा पत्रकार परिषदेत केला. नारळीकरांसारख्या शास्त्रज्ञाच्या सन्मानाची जिथं बूज राखली जात नाही, तिथं इतरांची काय राखली जाणार?

अलीकडच्या काळात तर मंडळाचा कारभार हा वावदूकपणाचा नमुना झाला आहे. जुलै 2004 मध्ये    रा. रं. बोराडे यांना साहित्य-संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर ते बराच काळ रिकामंच होतं. मग 2005 साली डॉ. यू. म. पठाण यांची त्यांची संमती न घेता परस्पर नियुक्ती करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्य आणि परस्पर नियुक्ती यामुळे पठाण यांनी दीड-दोन महिन्यांतच राजीनामा दिला. मग केशव मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ते पद सरतेशेवटी मधू मंगेश कर्णिकांकडे आलं. म्हणजे मधला दोनेक वर्षाचा काळ भाकड गेला. मंडळाचं काहीही काम होऊ शकलं नाही. कर्णिक यांची साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊनही आता पाच-सहा वर्षे झाली आहेत. या काळात अनेक कल्पना-योजना मांडल्या गेल्या परंतु त्या प्रत्यक्षात काही यायला तयार नाहीत. मंडळाच्या आधीच्या रखडलेल्या योजना-उपक्रम यांनाही फारशी गती देणं त्यांना शक्य होत नाही असंच दिसतं आहे. मग नव्या योजना तर दूरच राहिल्या. आणि ज्या योजना राबवल्या जात आहेत त्यांचा वकुबही सामान्य म्हणावा असाच आहे.

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळानं आजवर ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, सरस्वती सन्मान असे राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांच्या परिचयाचं एक पुस्तक प्रकाशित करण्याचं ठरवलं. तशी 150 साहित्यिकांची यादी तयार केली. हे पुस्तक लिहिण्याचं काम मंडळाच्याच दोन सदस्यांनी स्वीकारलं. त्यातला एक जण 100 नोंदी लिहिणार आहे आणि दुसरा 50 नोंदी. असं का? हे काम वेगवेगळ्या लोकांना का दिलं गेलं नाही, असं मी एका सदस्याला विचारलं तेव्हा त्यांनी सांगीतलं की, ‘मग हे पुस्तक लवकर तयार होणार नाही.’ अर्थात कामाचं वाटप न करता लेखनाची सर्व जबाबदारी दोघांनीच घेतल्यानं हे पुस्तक अजूनही तयार होतंच आहे.
आता विश्वकोश निर्मिती मंडळ. हे मंडळ संस्कृती मंडळाच्या अंतर्गत होतं, तेव्हा आणि ते स्वतंत्र झालं, तेव्हापर्यंत त्याचे तत्कालीन अध्यक्ष आणि मुख्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी 23 खंडी विश्वकोशाची रचना, स्वरूप आणि खंड यांची रूपरेषा तयार करून पहिले 16 खंड प्रकाशित केले. तर्कतीर्थानंतर आलेल्या मे. पुं. रेगे, रा. ग. जाधव या अध्यक्षांनीही विश्वकोशाच्या कामाला चालना दिली. पण त्यांच्यानंतर मात्र ते काम इतकं थंडावलं की, उर्वरित खंड अजून प्रकाशितच होत आहेत. हा 23 खंडी विश्वकोश पन्नास वर्षाचा काळ गेला तरी पूर्ण व्हायलाच तयार नाही. 

विजया वाड यांची डिसेंबर 2005मध्ये विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, तेव्हा बराच गदारोळ उडाला होता. अरुण टिकेकर, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ, मिलिंद मालशे यांच्यासारख्यांनी मंडळाचे राजीनामे दिले. ही खरं तर वाडबाईंच्या गुणवत्तेची योग्यता दाखवणारी घटना होती. तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. पण वाडबाई तटून राहिल्या. त्यांनी दपरेक्ती केली की, ‘मी माझ्या कामातून दाखवून देईन.’ सरकारनंही एवढा गदारोळ होऊन बाईंचीच पाठराखण केली. आता सहा वर्षानंतर या वाडबाईंनी विश्वकोशाचं काम किती पुढं नेलं, त्याला किती गती दिली, याचा आढावा घेतला तर हाती काय येतं? जवळपास शून्य. 

अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी उर्वरित खंडांच काम त्वरेनं पूर्ण करण्यावर भर न देता विश्वकोशाची वेबसाइट तयार करण्यावर भर दिला. ‘मी ते स्वप्न पाहिलं’ असं विश्वकोशाच्या वेबसाइटवरील मनोगतात त्यांनी लिहिलं आहे. पुढे त्या लिहितात, ‘‘दुपट्यात एखादं गोजिरवाणं बाळ असावं तशी ही वेबसाइट आहे. अगदी नवजात अर्भकासारखी.’’ वाडबाईंसारखी दाई त्याचं संगोपन करायला असेल तर ते शेवटपर्यंत अर्भकच राहण्याची शक्यता आहे. 

वाडबाईंचा सारा कारभार एखाद्या शाळेच्या हेडमास्तरणीसारखा चालू आहे. विश्वकोशाच्या शाळेत लेखनस्पर्धा घे, बोलका विश्वकोश नावाची भनगड सीडी तयार कर, विश्वकोशाचं स्वागत गीत तयार कर, असा सारा शाळकरी कारभार! यात कुठंही आणि चुकूनही बाईंनी विश्वकोशाच्या उर्वरित खंडांना चालना देण्यासाठी आणि ते शक्य तेवढय़ा लवकर पूर्ण करण्यासाठी काही प्रयत्न केल्याचं दिसत नाही. 

वाडबाईंच्या कारकिर्दीत 17 वा खंड प्रकाशित झाला खरा, पण त्यात त्यांचं योगदान शून्य आहे. कारण त्याची छपाई 2005 सालीच सुरू झाली होती. आता 18वा खंड परिभाषा कोश म्हणून प्रकाशित होत असल्याची घोषणा वेबसाइटवर केलेली असली तरी तो खंड तर्कतीर्थाच्या काळात 1973 सालीच प्रकाशित झालेला आहे. त्याचं केवळ पुनर्मुद्रण केलं जाणार आहे. खरं तर उर्वरित सर्व खंडांचा आराखडा पूर्ण तयार आहे. नकाशा खंड व सूची खंड वगळता इतर खंडांत यावयाच्या 95 टक्के नोंदी तयार आहेत. फक्त पाच टक्के नोंदी तयार व्हावयाच्या आहेत. या 95 टक्के नोंदी 25-30 वर्षापूर्वी लिहिल्या गेल्या असल्यानं त्यांचं पुनर्लेखन, संपादन आणि त्यात नवी भर घालून त्या अद्ययावत करण्याची गरज आहे आणि विश्वकोशाच्या अध्यक्षानं त्यालाच सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं, पण नेमकं तेच बाजूला ठेवून अध्यक्ष इतर गोष्टींनाच ‘माझं स्वप्न’ म्हणून मिरवत असतील तर कठीण आहे!

खरं तर विश्वकोशनिर्मिती हा स्थायी स्वरूपाचा प्रकल्प आहे. त्यात काळानुसार वेळावेळी अपडेशन आणि अपग्रेडेशन होणं अत्यंत आवश्यक होतं. प्रत्येक वर्षी प्रत्येक खंडाला पुरवणी खंड जोडणं गरजेचं आहे, पण तसं काहीच काम पुढच्या काळात न झाल्यामुळे मराठीतलं हे महत्त्वाचं काम कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

विश्वकोश मंडळाचं मुख्य काम बाजूला ठेवून भलत्याच गोष्टींना प्राधान्य देण्याची पद्धत श्रीकांत जिचकारांनी सुरू केली. त्यांनी ‘विश्वकोश वार्षिकी’ असं नवं फॅड काढलं. वाडबाईंनी त्यांचाच कित्ता गिरवला. त्या ‘महाराष्ट्र कन्याकोशा’चा संकल्प सोडून मोकळ्या झाल्या! म्हणजे विश्वकोशाच्या अध्यक्षाचं जे मुख्य काम आहे, ते सोडून वाडबाईंनी भलतीच कामं केली. ती केली नसती तरी फार काही बिघडलं नसतं. हा विश्वकोशच आता जवळपास कालबाह्य झाल्यानं त्यांची सीडी तयार करून फारसा फायदा होणार, हा प्रश्नच आहे.
आता राज्य मराठी विकास संस्थेचा कारभार पाहू. मराठीची प्रतिष्ठा वाढण्यासाठी न्यायव्यवहार, तंत्रज्ञान, प्रशासन, उच्चशिक्षण, शालेय शिक्षण, विज्ञान आणि सामान्य व्यवहार अशा व्यवहारात जोमानं उपयोग सुरू व्हावा यासाठी निरनिराळे उपक्रम राबवणं, यासाठी मराठी विकास संस्था सुरू करण्यात आली. पण या संस्थेनं सुरुवातीपासूनच त्या दिशेनं नीटपणे काम केलं याचा निर्णायक पुरावा देता येत नाही. डॉ. सरोजिनी वैद्य या संस्थेच्या संचालक असताना त्यांनी चांगलं काम केलं, असा निर्वाळा डॉ. अशोक केळकर यांच्यासारखे भाषावैज्ञानिकही देतात. पण त्या कामावरून नजर फिरवली तर लक्षात येतं की, ती सुरुवात होती. संस्थेनं त्यापुढे जाऊन काम करायला हवं होतं. 

म्हैसूर येथील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन लँग्वेजेस ही संस्था आणि गुजरातमध्ये गणेश देवी ज्या पद्धतीनं भारतीय भाषा, बोलीभाषा यांच्यासाठी काम करतात, त्या पद्धतीनं योजनाबद्ध रीतीनं काम व्हायला हवं होतं, तसं झालेलं नाही. ‘यंत्रालयाचा ज्ञानकोश’, ‘मराठी ग्रंथसूची’ ही दोन अभिमानास्पद प्रकाशनं संस्थेनं प्रकाशित केली असली तरी पुस्तक प्रकाशनापलीकडे मराठीच्या वाढीसाठी, मराठीचा सर्व क्षेत्रात उपयोग व्हावा, प्रसार व्हावा, सर्व संकल्पना, ज्ञान मराठीमध्ये उपलब्ध व्हावं यासाठी काहीही प्रयत्न या संस्थेकडून झालेलं नाहीत, हेही तितकेच खरं. 

मध्यंतरी सरकारनं राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य आणि संस्कृती मंडळाचं विलिनीकरण करण्याचं ठरवलं होतं. या दोन्ही संस्था पुस्तकं प्रकाशित करण्यापलीकडे फार काही करत नसतील तर त्यांचं विलिनीकरण करायलाच हवं. पण त्यावर हाताच्या बोटावर मोजाव्या इतक्या लोकांनी आरडाओरड केली. मराठी अभ्यास केंद्र या मुंबईतल्या एकमेव संस्थेनं त्याविरोधात बराच थयथयाट केला. नंतर त्यांना अशोक केळकर यांच्यासारख्या भाषावैज्ञानिकानं पाठिंबा दिला!  विदर्भ साहित्य संघ, मराठी साहित्य महामंडळ यांनीही नंतर त्याचं समर्थन केलं. त्यामुळे सरकारनं उचललेलं पाऊल बारगळलं.
खरं तर इतक्या अल्पसंख्य लोकांच्या आरडाओरडीची काहीही पर्वा शासनानं करायची गरज नव्हती. त्यांचा उद्देश चांगला होता. कारण मराठी विकास संस्था गेली काही वर्षे काहीही काम करत नाही. त्यामुळे एकतर ती बंद करायला हवी किंवा तिचं विलिनीकरण करायला हवं. शासनानं दुसरा पर्याय निवडला. तो अतिशय स्तुत्य होता. पण या संस्थेच्या विलिनीकरणातून जो गदारोळ झाला, त्यातून पुन्हा हेच सिद्ध झालं की, सरकारच्या सगळ्या निर्णयाकडे संशयास्पद रीतीनंच पाहायचं आणि ते हाणून पाडायचे एवढाच एककलमी कार्यक्रम राबवायचा, असा काहींनी आपला स्वभावधर्म केलेला आहे. यामुळे सरकारला काम करणं आणि निर्णय घेणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. त्यामुळे मग सरकार निर्णय घेतही नाही आणि ते रद्दही करत नाही. परिणामी या संस्था काहीही काम करू शकत नाहीत. 

आता भाषा संचालनालय. प्रथम यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं पाहू. पदनाम कोश, वित्तीय शब्दावली, शासन व्यवहार कोश, न्याय व्यवहार कोश, ग्रंथालय परिभाषा कोश, गणितशास्त्र परिभाषा कोश, समाजशास्त्र परिभाषा कोश, वाणिज्य परिभाषा कोश, तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश..असे रसायनशास्त्र, भूशास्त्र, शिक्षणशास्त्र, यंत्र अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, कृषिशास्त्र, राज्यशास्त्र असे किमान 30 कोश प्रकाशित केले आहेत. म्हणजे मराठी भाषा सर्व क्षेत्रांत आणि विषयांत परिपूर्ण व स्वयंभू करण्याच्या दिशेनं भाषा संचालनालयानं आपल्या परीनं चांगले प्रयत्न केले आहेत. पण प्रश्न असा आहे की, याची सर्वसामान्यांना, त्या त्या विषयातील अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना नीट माहिती तरी आहे का? त्यांच्यापर्यंत हे कोश पोहचण्यासाठी, त्या त्या विषयात त्यांचा वापर सुरू व्हावा, यासाठी या संचालनालयानं काय प्रयत्न केले? या कोशांतले कोणते पर्यायी शब्द-संकल्पना त्या त्या क्षेत्रात स्वीकारल्या गेल्या, कुठल्या गेल्या नाहीत, त्या का गेल्या नाहीत, याची माहिती या संचालनालयाकडे नाही. कारण ते कोश तयार करून मोकळे झाले. पुढे त्यांनी काहीच केलं नाही. आणि आता तर हे कोश संचालनालयाकडे विकत मिळायचीही मारामार आहे! केवढी ही अनास्था!!

याला सरकार जबाबदार आहे, तसेच मराठी साहित्यिकही जबाबदार आहेत. सरकारनं तयार केलेल्या ‘पदनाम कोशा’ची तर ‘बदनाम कोश’ म्हणून टिंगलटवाळी करण्याचा विडाच काही साहित्यिकांनी उचलला होता. त्यामुळे हा कोश सरकारी खात्यापलीकडे कुणी वापरलाच नाही. खरं पाहता त्यातले कितीतरी चांगले शब्द दैनंदिन व्यवहारात सहजगत्या वापरता येण्यासारखे होते आणि आहेत. तसा त्यांचा वापर सरकारी पातळीवर झाला आहे, आणि ते शब्द महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब-यापैकी रुजलेही आहेत. काही शब्द मात्र फारच तांत्रिक आणि जटील आहेत. पण त्यांना चांगले पर्याय शोधण्यासाठी मराठी साहित्यिक पुढे आले नाहीत. ‘पदनाम कोशा’ची टिंगळटवाळी आमचे साहित्यिकच करणार असतील तर त्याकडे सामान्य लोक कशाला वळतील?

म्हणजे चांगले काम करायचे आणि गोदामे भरून ठेवायची, हा सरकारी खाक्या तर सरकारच्या कामात केवळ चुका कशा काढता येतील हा काही मराठी साहित्यिकांचा बाणा!
पण असे प्रश्न उपस्थित केले की, नेहमी सरकारी पातळीवर इच्छाशक्ती नाही, सरकार निधी वेळेवर देत नाही, तो पुरेसा देत नाही, निर्णय घ्यायला वेळ लावते, अशी ठरावीक उत्तरं या संस्थांवर काम करणा-या साहित्यिकांकडून पुढे केली जातात. म्हणजे सरकारनं दिलेल्या पदांची प्रतिष्ठा आपल्या वर्तनानं घालवायची आणि खापर मात्र सरकारच्या माथी फोडायचं, असा हा दुटप्पीपणा झाला. इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी सरकारपेक्षाही या संस्थांवर काम करणा-या व्यक्तींकडे असायला हवी. ती असल्याची उदाहरणं अलीकडच्या काळात तरी दिसत नाहीत. सरकार देऊ करेल ती पदं स्वीकारायची, मग त्यासाठी आपण पात्र आहोत की नाहीत, याचा विचारही करायचा नाही. उलट ती मिळवण्यासाठी सरकार दरबारी रांगा लावायच्या, हस्ते-परहस्ते निरोप पाठवायचे, अशा ‘उद्योगी’ साहित्यिकांची सरकार पत्रास ठेवत नाही, हे योग्यच आहे!

सरकारकडून आपल्याला हवं ते पदरात पाडून घेणं, हाही कौशल्याचा भाग असतो. लोकभयास्तव आणि लोकलाजेस्तव सरकारला या संस्थांची फार गळचेपी करता येत नाही आणि त्या बंदही करता येत नाहीत. सध्याच्या काळात तर नाहीच नाही. ही मोठी उपलब्धी आहे. याबाबत प्रसारमाध्यमं नेहमी सरकारपेक्षा या संस्था-संघटनांच्या बाजूनं असतात, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचा पुरेसा लाभ करून घ्यायला या संस्थांवरील व्यक्तीच कमी पडतात, असं दुर्दैवानं म्हणावं लागतं. 

साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट या केंद्रीय संस्थांमध्ये कन्नड, तमिळ, बंगाली या भाषांचे लोक आपल्या भाषेसाठी अधिकाधिक सोयीसुविधा पदरात पाडून घेण्यासाठी जे कसोशीनं प्रयत्न करतात ते पाहण्यासारखे असतात. त्यांच्या त्या प्रयत्नांना आपण ‘आरडाओरडा’ असं विशेषण बहाल करून मोकळे होणार, पण त्यांच्या स्वत:च्या भाषेबाबतच्या निष्ठेचा आदर्श घेणार नाही, याला काय म्हणणार? 

थोडक्यात चांगल्या उद्देशांचं कसं भजं होतं, याची या सरकारी साहित्यसंस्था उत्तम उदाहरणं आहेत.

पण हा प्रश्न केवळ सरकारी संस्थांपुरताच मर्यादित नाही. एकंदरच सार्वजनिक संस्था आणि संस्थात्मक जीवन या दोन्ही गोष्टींचे मानदंड उभे राहतील, असे प्रयत्न आपल्याकडे होताना दिसत नाहीत. शंभर-दीडशे वर्षानंतरही महाराष्ट्रातली एखादी संस्था सुरुवातीच्याच उत्साहानं आणि जोमानं सुरू आहे, असं चित्र अपवादानंही पाहायला मिळत नाही. 
हे असं का होतं? याची कारण आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक चारित्र्यात शोधावी लागणार! इतिहासकार शेजवलकर म्हणतात त्याप्रमाणे ‘समाजहितासाठी स्वत:च्या व्यक्तिगत आवडीनिवडी, स्वार्थ आणि अहंकार यांना कात्री’ लावल्याशिवाय ही परिस्थिती सुधारणार नाही. आणि ही परिस्थिती सुधारली तर मग आपोआपच साहित्य-संस्कृतीही सुधारेल. आधीच म्हटल्याप्रमाणे वाचनसंस्कृती हा साहित्य-संस्कृतीचा अनुषंग असल्यामुळे तोही आपोआपच सुधारेल. त्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची गरज राहणार नाही. पण हे होणार कसं? शरीराच्या एखाद्या अवयाला गँगरीन झालं तर तेवढा भाग शरीरापासून वेगळा करता येईल, पण संपूर्ण शरीरच गँगरीनमय झालं तर मग काय काय वेगळं करणार? 
सरकारी संस्था-समित्यांवर नेमणूक होण्यासाठी लाचारासारखे रांगेत उभे असणा-यांना स्वाभिमानाचं सोयरसुतक नसतं. अशा लोकांकडून कोणत्याही प्रकारच्या चांगल्या कामाची अपेक्षा करता येत नाही. साहित्य-संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था आणि इतर सरकारी समित्या यावर नेमणुका करताना अलीकडच्या काळात सरकार संबंधित सदस्यांची साधी संमतीही न घेता त्यांची नावं जाहीर करतं, तशा नेमणुका झालेल्यांनाही त्यात आपला सन्मान वाटतो! यावरून सरकार आणि साहित्यिक यांच्या अधोगतीची परिसीमा जाहीर होते! 

आता साहित्य-संस्कृतीची उत्तम जाण असणारे यशवंतरावांसारखे राजकारणीही नाहीत आणि तर्कतीर्थासारखे तत्त्वनिष्ठ साहित्यिकही नाहीत. उलट अप्रामाणिक साहित्यिकांनीच भ्रष्ट राजकारण्यांच्या मदतीनं या साहित्य संस्थांची हेळसांड चालवली आहे. हे वास्तव नुकत्याच सुरू झालेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात आणखीनच विषण्ण करतं.

सरकारी साहित्य-संस्थांच्या कारभाराचं हे चित्र काहींना जरा जास्तच निराशाजनक वाटण्याची शक्यता आहे. पण हेही लक्षात घ्यायला हवं की, या संस्था गँगरीननं पोखरल्या असल्या तरी ते मानसिक स्वरूपाचं आहे. त्यामुळे त्यावर प्रबळ इच्छाशक्ती हा एकमेव उपाय आहे. परिस्थिती खूपच हाताबाहेर गेलेली आहे, असं अजिबात नाही. आहे त्या परिस्थितीतही खूप काही करता येण्यासारखं आहे. संतापजनक आहे ते एवढंच की, परिस्थिती पुरेशी अनुकूल असूनही फार काही घडताना दिसत नाही आणि आहे त्यातही काही घडवून दाखवण्याची धमक असणा-यांची तर या साहित्य संस्थांमध्ये मोठीच वानवा आहे.

‘वाचनसंस्कृतीसाठी काय करायला हवं?’ असा प्रश्न काही वर्षापूर्वी डॉ. भालचंद्र नेमाडे यांना एका कार्यक्रमात विचारला गेला होता. तेव्हा त्यांनी ‘काही नाही, सरळ वाचनच करायला हवं’ असं त्याचं त्याच तत्परतेनं उत्तर दिलं होतं. वाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी सरकार आणि सरकारी साहित्यसंस्थांनी काय करायला हवं, याचं उत्तरही असंच आहे की, ‘काही नाही, त्यांनी आपलं कामच नीट करायला हवं.’