Monday, July 23, 2012

कर्त्या जातीचा मागोवा

आमच्या 'मराठा समाज' या पुस्तकावर महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार पुरवनित (२२ जुलै २०१२) ,
प्रतिमा जोशी यांनी लिहिलेले परीक्षण.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्राचा विचार मराठ्यांना वगळून करता येणार नाही याबाबत बव्हंश समाजशास्त्रज्ञांचे आणि राजकीय विश्लेषकांचे दुमत नाही. इथे जातीचे मराठे नव्हे , तर मराठा जातीचे लोक अभिप्रेत आहेत. ती जशी महाराष्ट्राची सत्ताधारी जात आहे , तशी समाजजीवनावर प्रभाव टाकणारीही आहे का याबाबत मात्र मतांतरे असू शकतात. राम जगताप आणि सुशील धसकटे यांनी संपादित केलेल्या " मराठा समाजः वास्तव आणि अपेक्षा " या पुस्तकात त्याचे दाखले मिळतात. 

या संपादकीय जोडीचे मनोगतच त्या दृष्टीने बोलके आहे. ते म्हणतात की , हल्ली मराठा समाज आपल्या गतेतिहासाबद्दल आणि इतिहास पुरुषांबद्दल फार संवेदनशील आणि हळवा बनला आहे. ही काही प्रगल्भतेची निशाणी नाही. उलट तो प्रगतीला अडसरच असतो. मराठा तरुणांनी आत्मपरीक्षणाला सिद्ध व्हावे हा या पुस्तकामागचा उद्देश आहे. संपादक असेही म्हणतात की , आपल्याच समुहाचा कळप करून राहण्यात कोणताच शहाणपणा नाही , त्यातून आत्मोन्नती तर साधणार नाहीच , मग समाजपरिवर्तन तर फारच दूरची गोष्ट. किमान स्वतःच्या प्रगतीसाठी तरी मराठ्यांनी अनिष्ट रूढींना मूठमाती द्यावी असेही ते म्हणतात. त्या दृष्टीने डॉ. बाबा आढाव , डॉ. आ. ह. साळुंखे , प्रा. रंगनाथ पठारे , डॉ. भा. ल. भोळे , शांताराम पंदेरे , प्रा. सदानंद मोरे , प्रा. शेषराव मोरे , प्रा. प्रकाश पवार , बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबरोबरच डॉ. कुमार सप्तर्षी आणि वरुणराज भिडे तसेच गेल्या शतकातील परखड लेखिका ताराबाई शिंदे यांचे पूर्वप्रकाशित लेख या पुस्तकात संग्रहित केलेले आहेत. हे पुस्तक म्हणजे महत्वाचा वैचारिक ठेवा असले तरी प्र्रा. सदानंद मोरे यांची प्रस्तावना वगळता सर्वच लेख किमान १० आणि कमाल १०० वर्षांपूर्वीचे आहेत.

या लेखांमधील मराठ्यांच्या सामाजिक जीवनाचे आणि समजुतींबद्दलचे वास्तव काही प्रमाणात आजही तसेच असले तरीही ग्रथित करताना भिडे आणि शिंदे वगळता त्याच लेखकांकरवी त्यांना वर्तमानाची जोड देणे अपेक्षित होते. कालपरवापर्यंत राखीव जागांना प्राणपणाने विरोध करणाऱ्या मराठा समाजाने गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या अगदी लावून धरला आहे. या आरक्षणाचा काय जो निर्णय होईल तो होईल (बहुधा होईलच) , परंतु यानिमित्ताने मराठ्यांमध्ये गरिबी आहे ही बाब कुळीचा अभिमान बाळगणाऱ्या या जातीच्या पुढाऱ्यांनी काही कारणाने स्वीकारलेली दिसते. या गरिबीची कारणमीमांसा करत बसण्यापेक्षा थेट आरक्षणच मागण्याचे काय कारण असू शकते ? शेतजमिनीवरून गरीब मराठा हलाखीत निघालेला असला तरी तो सहसा इतरांचे नेतृत्व का स्वीकारत नाही ? या प्रश्नांबरोबरच महाराष्ट्रात एकंदरच समाजपरिवर्तनाची प्रक्रिया मंदावली आहे. स्त्रीभ्रूणहत्या केवळ खात्यापित्या मराठ्यांच्यातच नव्हे तर लेवा पाटलांपासून अनेक मध्यम जाती , अगदी ऊसतोडणी कामगारांपर्यंत बळावलेल्या असणे , स्वकर्तृत्वावर उभ्या राहू शकणाऱ्या महिला सत्ताकारणातून बाद होणे , दलित आणि अल्पसंख्याकांवरील हल्ले ही त्याचीच लक्षणे आहेत.

मराठा तरुण गतेतिहासाबद्दल हळवा बनला आहे हे संपादकांचे मतही त्यांनी हळवा हा शब्द वापरल्याने तपासून घ्यायला हवे. गेल्या सत्तरएक वर्षांत बहुजनवादी राजकारणाची चर्चा खूप झाली. या संपूर्ण कालावधीत मराठा नेतृत्वाने वेळोवेळी घेतलेली भूमिका पाहिली तर या तपासाचे एक टोक हाती लागते. विशेषतः मंडलोत्तर राजकारणात ओबीसींनी स्वतःसाठी जागा करून घेतल्यानंतर मराठे जात म्हणून अधिक सजग झाल्याचे दिसते. इतिहासाचा वापर हा त्याचाच एक भाग आहे. गरीब मराठे किंवा कुणब्यांना हे समजते तरीही त्यांना ते मंजूर असते याचे विश्लेषण याच पुस्तकातील बाबा आढाव , सदानंद मोरे , भा. ल. भोळे यांच्या लेखात सापडू शकते. विठ्ठल रामजी शिंदे आणि जागृतीकार पाळेकर यांनी तेच किती तरी आधी मांडलेले दिसते. 


उदारीकरणानंतर बदललेल्या राजकारणावर वित्ताचा म्हणजे पैशांचा प्रभाव आहे. राजकारणाचा पारंपरिक साचा बदलला आहे. इतरांच्या खांद्यावर बसून गावचे पुढारपण करणाऱ्यांना हे समजत नाही असे म्हणता येत नाही. एकंदर समाजावरील राजकारणाचा प्रभाव कमी होत जाताना सामाजिक आणि आर्थिक प्रभाव निर्माण करण्यास गत्यंतर उरत नाही. संपादकांना जे परिवर्तन व्हावेसे वाटते ते आणि वर्तमान वास्तव परस्परांच्या विरोधात आहे. " राजकीय सत्तास्थाने हे अंतिम ध्येय मानून ज्या जाती किंवा जातीसमूह प्रयत्न करीत आहेत , त्यांना त्या स्थानांवर प्रत्यक्ष पकड मिळवता येईल , तेव्हा माश्याही मारीत नाही आणि लाजही झाकत नाही , असे शेळीचे शेपूट आपल्या हाती आले आहे , असे त्यांना आढळेल " ज्येष्ठ राजकीय पत्रकार वरुणराज भिडे यांनी मे १९९९मध्ये लिहिलेल्या लेखाचा हा समारोपाचा परिच्छेद या संपादित पुस्तकातीलही अखेरचा परिच्छेद आहे. तो केवळ नवी राज्यव्यवस्था किंवा बहुजन राजकारण यावरच नव्हे , तर मराठ्यांच्या चाणाक्षपणावरही प्रकाश टाकतो.

या स्थितीत संपादकांना जी परिवर्तनाची कळकळ आहे ती प्रत्यक्षात यायची तर ताराबाई शिंदेंसारख्या धीट बायामाणसांतर्फेच वैचारिक फटकारे बसले तर कदाचित येईल. कारण बदलाची गरज सर्व महिलांप्रमाणे मराठा महिलांना जास्त आहे. मग या पुस्तकात चालू शतकातील एकाही विचारी महिलेला चार पाने मिळू नयेत याचे आश्चर्य वाटून राहते. असो. तरीही महाराष्ट्रातील कर्त्या जातीने हे पुस्तक किमान एकदा तरी वाचावे याबाबत दुमत नसावे.

मराठा समाजः वास्तव आणि अपेक्षा
संपादकः राम जगताप , सुशील धसकटे
प्रकाशक : राजहंस प्रकाशन , पुणे
पाने 
: २२६ , किंमतः २०० रूपये

Monday, July 16, 2012

नेमाडे पंचाहत्तरीत, ‘कोसला’ पन्नाशीत!

वयाच्या पंचविसाव्या वर्षी ‘कोसला’सारखी सशक्त कादंबरी लिहिणाऱ्या डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे, तर ‘कोसला’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीनेही सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे. ‘कोसला’ सलग तीन पिढय़ा वाचली जात असतानाच नेमाडय़ांची गेल्या वर्षी ‘हिंदू’ ही ‘हिंदू’ या संकल्पनेचीच पुनर्माडणी करणारी नवी कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यानिमित्ताने हा खास लेख...
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी 24 मे रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे, तर त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी लिहिलेली ‘कोसला’ ही कादंबरी लवकरच सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण करेल. मुख्यत: कादंबरीकार आणि कादंबरी-समीक्षक अशी नेमाडय़ांची ओळख सांगता येईल. पण नेमाड्यांविषयी साहित्यक्षेत्रात आणि साहित्याबाहेरच्या जगात ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ आहे. त्यामुळे वाद, टीका, कौतुक, हेटाळणी आणि द्वेष आजवर नेमाडे यांच्या वाटय़ाला आलेले आहे. त्यातून त्यांच्या कादंब-याही सुटलेल्या नाहीत. ‘कोसला’विषयी आजही असलेली उलटसुलट चर्चा आणि गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘हिंदू’विषयी अहमहमिकेने होत असलेले वाद, यातून ते स्पष्ट होते. 

नेमाडे यांचे शत्रूही खूप आहेत. आपल्या फटकळ बोलण्याने ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. सत्य बोलण्याची मोठी किंमत दर वेळीच मोजावी लागते. ती नेमाडे मोजत आलेत. पण त्यामुळे एकंदर मराठी साहित्याचं भलंच झालेलं आहे. साहित्यातल्या भोंदूगिरी, चापलूसगिरीला काही प्रमाणात तरी आळा बसला आहे. एकमेकांची तळी उचलणारे आणि नैतिक पातळीवर भ्रष्ट असलेले लोक समाजाचं, साहित्याचं पुढारपण करायला पुढे सरसावत असतात. त्यांना नेमाडे आपल्या एक-दोन फटका-यांनी ब-याचदा गारद करतात. ‘नेमाडपंथी दहशतवाद’ या शब्दाची निर्मिती त्यातूनच झाली आहे.

‘कोसला’नं तीन पिढय़ांवर आपला प्रभाव काही प्रमाणात का होईना कायम ठेवला आहे. आज पन्नाशी-साठीत असलेले लोक एकेकाळी ‘कोसला’नं खूप भारावून गेले होते. त्यांच्या तारुण्यात त्यांनी ही कादंबरी वाचली, तेव्हा त्यांच्यावर तिचा जो प्रभाव पडला, तो आजही काही प्रमाणात कायम आहे. ‘कोसला’, तिचा काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती याचा ‘कोसला’तलाच आलेख प्रमाण मानल्यामुळे या लोकांचं आकलन कसं राहिलं आणि आजही जे तरुण ‘कोसला’नं प्रभावित आहेत, त्यांचंही आकलन कसं आहे, याचा कुणीतरी सविस्तर अभ्यास करायला हवा. स्वातंत्र्यानंतर शिक्षणासाठी शहरात आलेल्या पहिल्या पिढीच्या मनोवस्थेचं चित्रण ‘कोसला’मध्ये आहे. त्यामुळे ती महाविद्यालयीन काळात प्रत्येक विद्यार्थ्यांला आवडते.
'कोसला'ची चवथी आवृत्ती. यात 'कोसला'चा लेखनकाळ २४ ऑगस्ट ते १० सप्टेंबर १९३८ असा दिला आहे.

अपूर्व, द्रष्टी कादंबरी
जानेवारी 2000 मध्ये मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीनं ‘गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी’ या विषयावर एक चर्चासत्र घेण्यात आलं. त्यात गेल्या अर्धशतकातील सर्वश्रेष्ठ मराठी कादंबरी म्हणून ‘कोसला’चा आणि कादंबरीकार म्हणून नेमाडे यांचा गौरव काही समीक्षकांनी केला होता.

‘कोसला’विषयी पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते अशोक केळकर यांच्यापर्यंत अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा ‘कोसलाबद्दल’ हा समीक्षालेखांचा संग्रहही प्रकाशित झाला आहे. आकाशवाणी मुंबईनं  भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं ‘1947 ते 1997-सर्वोत्कृष्ट 10’ पुस्तकं अशी स्पर्धा घेतली होती. त्यात महाराष्ट्रभरातल्या वाचकांनी आपली पसंती कळवली. त्यात वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ला पहिला तर ‘कोसला’ला दुसरा क्रमांक मिळाला. 

ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव या कादंबरीबद्दल म्हणतात, ‘‘कोसला ही अपूर्व कादंबरी, द्रष्टी कादंबरी म्हणता येईल काय? वास्तवाकडे ती वेगळ्या नजरेने पाहते, सखोलपणे पाहते, मनुष्य जीवनाच्या अस्तित्वाच्या मूलभूत प्रवृत्तीच्या व आकांक्षांच्या परिप्रेक्ष्यात पाहते; मार्मिकपणे, स्वतंत्रपणे व काही एक नैतिक मूल्यभानाने पाहते व या प्रकारचे तिचे पाहणे एक प्रकारचे द्रष्टेपण ठरते, असे म्हणता येईल. सुजाण वाचक व समाज या दोहोंना अवतीभवतीच्या वास्तवाचे आकलन करण्याची डोळस दृष्टी ही कादंबरी देते, हेही खरे आहे.’’ पण कोसला पूर्णत्वाने द्रष्टेपण देत नाही, असाही निर्वाळा   रा. ग. जाधव देतात.थोडक्यात ‘कोसला’ आणि नेमाडे यांचा सत्तरीतल्या कादंबरी आणि कादंबरीकारांवर मोठा प्रभाव आहे.

पण साहित्याचे प्राध्यापक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि काही पत्रकार यांच्यापलीकडच्या समाजावर ‘कोसला’चा काही प्रभाव पडला आहे का? जे लोक गंभीर वाचनाचे भोक्ते आहेत, त्यांच्या ‘कोसला’विषयीच्या काय प्रतिक्रिया आहेत? ‘कोसला’ ज्या पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये घडते, तेथील सध्याच्या किती विद्यार्थ्यांनी ती वाचली आहे? याचा आता तरी कुणा जाणकारानं अभ्यास करायला हवा.

‘हिंदू’ संकल्पनेची पुनर्मांडणी
 गेली पंचवीस-तीस वर्ष येणार येणार म्हणून चर्चेत असलेल्या नेमाडे यांच्या ‘हिंदू’ या कादंबरी चतुष्टयाचा पहिला भाग गेल्या वर्षी प्रकाशित झाला. ‘हिंदू’चे अजून तीन भाग प्रकाशित व्हायचे आहेत, त्यामुळे त्याविषयी आताच काही ठोस विधान करणे बरोबर नाही. पण ‘हिंदू’ या संकल्पनेची पुनर्माडणी करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे यासंदर्भात नेमाडे यांनीच ‘हिंदू’च्या प्रकाशनाआधी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.

‘हिंदू’ प्रकाशित झाल्यापासून त्यावर बोलण्याची, लिहिण्याची अहमहमिकाच महाराष्ट्रात सुरू झाली आहे. गेल्या दीडेक वर्षात हिंदूवर लिहिल्या गेलेल्या लेखांचे पाच-सहाशे पानांचे स्वतंत्र पुस्तकच होऊ शकेल. याशिवाय औरंगाबाद आणि नांदेड इथं ‘हिंदू’वर चर्चासत्रं झाली. या निमित्ताने एक गोष्ट सिद्ध झाली की, ‘हिंदू’कडे आपली वैयक्तिक मतं, राग-लोभ, पूर्वग्रह, संस्कार यापलीकडे जाऊन पाहू शकतील असा आवाका मराठी समीक्षकांकडे नाही. त्यामुळे ‘हिंदू’ची यथायोग्य समीक्षा अजून तरी होऊ शकलेली नाही. 

‘हिंदू’ची समीक्षा करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं ‘खंडेराव, अडगळ आवरत जा राव!’ हा सुहास पळशीकर यांचा, ‘हिंदू : एक महाकथन’ हा विनय हर्डीकर यांचा आणि ‘हिंदू कशी वाचावी?’ हा डॉ. सदानंद मोरे यांचा लेख, असे तीनच लेख करतात. पळशीकर-हर्डीकर यांनी राजकीय-सामाजिक दृष्टिकोनातून ‘हिंदू’कडे पाहिले आहे, तर मोरे यांनी ‘‘हिंदू धर्म नावाच्या चमत्कारिक चीजेला इतक्या विविध अंगांनी भिडणारी, अभ्यासाचा पाया आणि वास्तवाची चौकट न सोडता सिद्ध झालेली ही कलाकृती सध्या तरी एकमेवाद्वितीयच म्हणावी लागेल’’, असे लिहून ‘हिंदू’चा परिप्रेक्ष्य नेमका काय आहे, याची दिशा सांगितली आहे. मोरे सांगतात त्या पार्श्वभूमीवर ‘हिंदू’ समजून घ्यायची तर मराठी समीक्षकांना खूपच अभ्यास करावा लागेल. तशी तयारी आणि क्षमता निदान सध्यातरी कुणा मराठी समीक्षकामध्ये आहे, असे दिसत नाही. त्यामुळे ‘हिंदू’ची सम्यक आणि समग्र समीक्षा व्हायला पुढची 25-30 वर्षे लागणार.

तोवर ‘कोसला’ टिकून राहिल का? आणि राहिली तर ते नेमाडे यांना स्वत:ला तरी आवडेल का हाही प्रश्न आहे. पण नेमाडे यांनी ‘हिंदू’चे उर्वरित भाग लवकरात लवकर लिहून प्रकाशित करावेत, असे नक्की वाटते.

कुचकामी आणि निरुपयोगी परिभाषा
कादंबरीलेखनाबरोबरच नेमाडे यांनी समीक्षालेखनात जे योगदान दिलेलं आहे, त्याचीही सम्यक चर्चा होण्याची गरज आहे. विद्यापीठीय पातळीवरील मराठी समीक्षा ही कुचकामी आणि निरुपयोगी परिभाषेत अडकून पडल्याने ती कधीचीच कालबाह्य झाली आहे. या प्राध्यापकी भाषेनेच मराठी भाषेच्या प्रवाहीपणाचं ब-याच प्रमाणात वाजीकरण करण्याचं काम केलं आहे. शिवाय या मराठी प्राध्यापकांचं राजकीय-सामाजिक-आर्थिक विषयांबाबतचं आकलन अतिसुमार असतं. सर्जनशील साहित्य कसं जन्माला येतं? ते समाजातल्या नैतिकतेच्या गोष्टी उचलूनच जन्माला येतं की नवी नैतिकता जन्माला घालतं, याचं उत्तर दिल्याशिवाय सर्जनशील साहित्याचा नेमका काय उपयोग असतो याचा न्यायनिवाडा कसा करता येईल?
‘बहुधा पंचविशीत जे पुस्तक लिहिलेलं असतं, ते लेखकाच्या बरोबर नेहमी जात असतं. कारण त्या लेखकासोबत लोक वाचत असतात आणि तेही लेखकाबरोबर मोठे होत होत पन्नाशीपर्यंत तरी ते पुस्तक तरंगत वर राहतं. नंतर पंचविशीतली नवी पिढी येते आणि ही मागची पिढी आपोआप बाद होत जाते,’ असं स्वत: नेमाडे यांनीच एका भाषणात म्हटलं आहे. ‘कोसला’च्या बाबत तसं झालं का? नसेल तर का झालं नाही? 

या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नसण्याचं एक कारण म्हणजे नेमाडे यांच्या लेखनाबद्दल असलेले गैरसमज वा त्याविषयी भक्तिभावानं केलं जाणारं लेखन हे तर नाही ना, याचाही विचार झाला पाहिजे.

कारण साहित्यिकांपासून पत्रकारांपर्यंत नेमाड्यांची ‘कावीळ’ झालेले लोक खूप आहेत. पण त्यांची विश्वासार्हता कवडीमोलाची असल्याने त्यांना कुणीही गंभीरपणे घेत नाही. पण हे लोक तरीही नेमाडेंचा द्वेष करत असतात. अशा लोकांना पुरून उरत नेमाडे यांनी ‘कोसला’कार ते ‘हिंदू’कार असा प्रवास केला आहे. शिवाय कादंबरीसारख्या सशक्त वाङ्मयप्रकाराची त्यांनी उत्तम समीक्षा केली आहे. चांगला लेखक आपल्यानंतर चार-दोन चांगले लेखक घडावेत यासाठी प्रयत्नशील असतोच. नेमाडे यांच्या कादंब-यांनी तशी सोय करून ठेवली आहे, एवढं नक्की!

Friday, July 13, 2012

वाचावे; पण काय, कसे, किती?


गोविंद तळवळकर यांना व्युत्पन्न पत्रकार, प्रकांड वाचक आणि साक्षेपी संपादक असे म्हणता येईल. महाराष्ट्र टाइम्सचे ते सलग 29 वर्षे संपादक होते. त्यामुळे त्यांना `संपादक' म्हणून खरोखर काहीतरी करून दाखवता आले. राजकारण-साहित्य-कला-संस्कृती अशा सर्व विषयांबाबतची मर्मदृष्टी आणि वाचन असल्याने त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला सांस्कृतिक चेहरा मिळवून दिला. वेगवेगळी सदरे, नवनवे विषय यांचा पाठपुरावा केला. नामांकितांपासून नवोदितांपर्यंत अनेक लेखकांना लिहिते केले. स्वत: ही पुस्तकांविषयी, साहित्या (मराठी-भारतीय आणि जागतिक)विषयी, विपुल म्हणावे इतके लेखन केले. इंग्रजी भाषेवर आणि लंडन या शहरावर तर तळवळकरांचे नको इतके प्रेम. त्यामुळे त्यांना काही लोक गंमतीने ब्रिटिश-भारतीय म्हणत. अर्थात हे तळवळकरांच्या पाठीमागे. समोर म्हणायची कुणाची बिशाद होती?

तळवळकरांनी लिहिलंही खूप. पण तळवळकरांच्या लेखणीला विश्लेषणाची जोड नसे, नसते. कारण ते अजून ही लेखन करतात. पण ही काही त्यांच्यावरील टीका होऊ शकत नाही. कारण वर्तमानपत्रांतमध्ये सामान्य वाचकांना गृहीत धरून लिहावे लागते. त्यात या सामान्य वाचकाला अजिबात माहीत नसलेल्या विषयाबद्दल सांगायचे असेल तर त्याचा रसाळ परिचय करून देणे, हा चांगला मार्ग असतो. तळवळकरांनी तेच केले. पण हेही खरे की, तळवळकरांनी महाराष्ट्राला इंग्रजी पुस्तकं वाचायची सवय लावली.


गोविंद तळवलकर संपादक असतानाच्या `महाराष्ट्र टाइम्स'च्या `मैफल' पुरवणीत `ग्रंथांच्या सहवासात' हे सदर प्रसिद्ध होत असे, त्यातलेच निवडक लेख सध्या `महाराष्ट्र टाइम्स'मध्ये पत्रकार असलेल्या सारंग दर्शने यांनी पुस्तक रूपाने आणले आहेत. शांताबाई शेळके, व्यंकटेश माडगूळकर, दुर्गाबाई भागवत, श्रीराम लागू, सोली सोराबजी, जयंत नारळीकर, मे. पुं. रेगे, शामलाल, एस. एल. भैरप्पा, ग. प्र. प्रधान, शा. शं. रेगे, मधु लिमये, गुलजार, श्री. बा. जोशी इत्यादी 23 मान्यवरांच्या वाचन-ग्रंथसंग्रहाविषयी लालित्यपूर्ण लेख आहेत. यातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या. पण हवी ती पुस्तके मिळवण्यासाठी केलेली धडपड आणि यातायात यात्र समान.

शामलाल हे `टाइम्स ऑफ इंडिया'चे माजी संपादक. त्यांनी जागतिक साहित्यातील तीन पिढय़ांचे साहित्य वाचले. शिवाय स्वत:च्या संग्रहातील 20 हजार पुस्तकांपैकी प्रत्येक पुस्तक स्वत: निवडूनच घेतले. तरी आपण कोणत्याही विषयातले तज्ञ नाही, असे ते नम्रपणे  सांगतात.

डॉ. श्रीराम लागू यांचे वाचन चौफेर, पण बेशिस्त. रसेलच्या निखळ बुद्धिप्रामाण्यवादाने त्यांना चांगलेच प्रभावीत केले. `मॅरेज आणि मॉरल्स' या रसेलच्या पुस्तकाने आपण आतून हलून गेलो, याची कबुली त्यांनी जाहीरपणे अनेकदा दिली आहे.

एस. एल. भैरप्पा भारतीय पातळीवरील एक आघाडीच्û कादंबरीकार, ते `क्लासिक' सदरात मोडणारीच पुस्तके विकत घेतात. `पर्व' ही कादंबरी लिहिण्याआधी तब्बल साडेसहा वर्ष केवळ महाभारत जीवनावरील पुस्तकांचे  वाचन ते करत होते. (अर्थात, भैरप्पा आपल्या प्रत्येक कादंबरीविषयी असेच करतात.)

दुर्गाबाइचा लेखही चांगला आहे. `मराठी संतसाहित्याने संस्कृत साहित्यात असलेली शास्त्रीय-वैज्ञानिक प्रवृत्ती नष्ट केली, नुसतेच भाषावैभव वाढवले,' हे त्यांचे निरीक्षण अतिशय नेमके आणि धारदार आहे.

खुशवंतसिंग यांचा छोटेखानी लेख त्यांच्या एकूण बिनधास्त आणि स्वच्छंदी व्यक्तिमत्त्वासारखाच आहे. `मी नको इतके वाचन करतो, कधी कधी दिवसाला एक पुस्तके वाचतो,' असे ते  म्हणतात. शिवाय स्वत:च स्वत:ला दरमहा तीन हजार रुपयांचा बुक अलाऊन्स देतात, जो त्यांचा आयकरही वाचवतो!

रमेशचंद्र सरकार हे तत्त्वज्ञानाचे  प्राध्यापक. त्यांनी माथेरानला घोडय़ावर बसण्याचा प्रयत्न फसल्यावर त्या विषयावरची दोन पुस्तके वाचून, त्यातल्या सूचना व छायाचित्रे अभ्यासून नाठाळ घोडय़ांना कसे इशाऱयाप्रयाणे वागवले, याचा किस्साही मस्तच आहे.

खरे तर या पुस्तकात असे कितीतरी किस्से आहेत.
काही गमतीजमतीही आहेतच. मे. पुं. रेगे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक `शनिमहात्म्य' आणि `शिवलीलामृत' यांना अवीट गोडीची पुस्तके असे सर्टिफिकेट देतात, वर `प्रत्येकाने ती वाचलीच पाहिजेत' अशीही शिफारस करतात!

शांताबाइचा लेखही चांगला, प्रामाणिक, पण वाचन बेशिस्त आणि ग्रंथसंग्रहही. वर शिस्तीच्या वाचकांना टोमणा की, `केवळ व्हिटामिन्सच्या पिल्सवर जगावे, फक्त पौष्टिक आणि भरपूर जीवनसत्वे असलेलाच आहार घ्यावा, तसे या मंडळींचे वाचन असते.' पण शेवटच्या काळात खुद्द शांताबाइनी आपल्या या बेशिस्त आणि स्वैरवाचनाबद्दल जाहीरपणे खेद व्यक्त केला. या पुस्तकात त्याचा उल्लेख नसला तरी वाचनापायी आपण आयुष्यातला बराचसा वेळ वाया घालवला अशी त्यांनी जाहीरपणे कबुली दिलेली आहे.

या पुस्तकाचे संपादन मात्र काटेकोरपणे झालेले नाही. लेखांचा अनुक्रम व्यवस्थित नाही. पहिलाच लेख वाईट आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व धर्मवीर भारती यांचे लेख त्रोटक तर त्र्यं. वि. सरदेशमुख, गंगाधर गाडगीळ, जयवंत दळवी यांचे ले ख भरकटलेले आहेत. मधु लिमये आणि शां. शं. रेगे यांचे लेख नको इतके मोठे आहेत. त्यामुळे या पुस्तकाला `संपादन' असे न म्हणता `संकलन' म्हणणे योग्य ठरले असते. संपादकांचे  मनोगतीही अतिशय मोघम आहे. मूळ सदराची कल्पना काय होती, त्यानुसार लेखन आले  का, सदर चालू असताना त्यावर होत असले ली चर्चा, याविषयी त्यात काहीच नाही...

निर्मितीच्या अंगाने  पुस्तक उत्तम आहे, विविध क्षेत्रांतल्या मान्यवर वाचकांच्या लेखांमुळे वैचित्र्यपूर्ण आणि रोचक झाले आहे. हे पुस्तक वाचून काय वाचावे, कसे वाचावे आणि किती वाचावे हे जाणकारांना ठरवता यावे.

ग्रंथांच्या सहवासात - संपादन : सारंग दर्शने 
मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
पाने  : 198 (1/4), किंमत : 250 रुपये

Monday, July 9, 2012

शहाणे करून सोडावे सकल जन...

शिक्षक, प्राध्यापक या शब्दांचे हल्ली नको तेवढे अवमूल्यन झाले आहे, तर विचारवंत हा शब्द स्वस्त झाला आहे. पण ज्यांना गंभीरपणे ‘विचारवंत’ हे विशेषण वापरता येईल, अशा मोजक्या व्यक्तींमध्ये प्रा. रामचंद्र महादेव उर्फ राम बापट यांचा समावेश होता. अगदी नेमकेपणाने सांगायचे तर बापटसर हे ‘लोकाभिमुख विचारवंत’ होते. पेशाने प्राध्यापक असलेल्या आणि वृत्तीने शिक्षक असलेल्या बापटसरांनी विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवल्या, तशाच महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींतील कार्यकर्ते घडवण्याचेही मोठे काम केले!
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
काही योगायोग मोठे करुण असतात. बापटसरांच्या निधनाची बातमी सोमवारी सक्काळी सक्काळी समजली. त्यानंतर तासा-दोन तासाने इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिरचे पत्र वाचायला मिळाले. ते पत्र होते, बापटसरांच्या ‘परामर्श’ या पहिल्यावहिल्या पुस्तकाला ‘उत्कृष्ट मराठी गद्या’चा पुरस्कार जाहीर झाल्याचे. बापट सर गेले काही दिवस आजारी होते. पण तरीही त्यांच्या निधनाच्या बातमीने महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते, प्राध्यापक आणि बुद्धिवाद्यांना खचल्यासारखे वाटले असेल. 

आपल्या मृदू स्वभावाने आणि प्रकांड व्यासंगाने गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील कितीतरी नेते-कार्यकर्ते बापटसरांकडे आकर्षित झाले होते. बापट सर कित्येक चळवळी-संघटनांचे मेंटॉर होते. 

‘आयडेंटिटी क्रायसिसमध्ये वाढलेली पिढी’ 
1960 ते 80 या काळात महाराष्ट्रातली तरुण पिढी समाजबदलाच्या ध्येयाने झपाटून गेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून बारा-तेरा वर्षे झाली होती. त्यामुळे उज्ज्वल आणि संपन्न भारताची स्वप्ने पाहणारी आधीची पिढी आणि विशी-बाविशीची तरुण पिढी स्वप्नाळू होती. पण स्वतंत्र भारताची सुरुवातीची पंधरा-सोळा वर्षे मोठी धामधुमीची होती. त्यातच 1962च्या युद्धात भारताला चीनकडून पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली. त्यानंतर अशा नामुष्कीची एक मोठी मालिकाच घडत गेली. 64 साली भारताचे आशास्थान असणा-या नेहरूंचे निधन झाले. 65 साली पाकिस्तानबरोबर युद्ध झाले. ताश्कंदमध्ये दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे आकस्मिक निधन झाले. त्यातच 67- 68 साली उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये प्रचंड मोठे दुष्काळ पडले.

साधारणपणे याच काळात अमेरिकेत हिप्पी संस्कृतीचा उदय झाला होता. फिडेल कॅस्ट्रो, चे गव्हेरा हे तरुणाईचे हिरो म्हणून पुढे येत होते, तर शेजारच्या पाकिस्तानमध्ये लष्कराचे वर्चस्व वाढत होते आणि पूर्व पाकिस्तानमध्ये बरेच अराजक माजले होते.

या सा-या परिस्थितीचा आणि अस्वस्थतेचा त्या वेळच्या तरुणाईवर मोठा परिणाम झाला. या घुसळणीतून ती तावूनसुलाखून निघाली. ‘युक्रांद’चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी ‘आयडेंटिटी क्रायसिसमध्ये वाढलेली पिढी’ असे त्या वेळच्या त्यांच्या पिढीचे वर्णन करतात. ‘भारत स्वतंत्र झाला असला तरी सामाजिक-राजकीय पातळीवर आमूलाग्र बदलाची गरज आहे. क्रांती झाल्याशिवाय भारत सामर्थ्यशाली होणार नाही, म्हणून क्रांती करायची. पण कशी, तर आधी वैचारिक क्रांती, नंतर सामाजिक क्रांती आणि मग सर्वागीण क्रांती करायची,’ असा मूलमंत्र काही जाणत्या लोकांनी तरुणाईला दिला. त्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. त्यातून महाराष्ट्रभर तरुण सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळी उभी राहिली.

ही फळी शिक्षण, मार्गदर्शन आणि प्रबोधन या मार्गाने उभी करणा-यांमध्ये गं. बा. सरदार, आचार्य जावडेकर, प्रा. राम बापट यांचा समावेश होता. 

निराशाजनक चित्र आणि समस्यांचा बागुलबुवा
महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी म्हणताना एक लक्षात घेतले पाहिजे की, तो काही एकट समूह नाही. त्यात अनेक त-हा आणि परी आहेत. लहान-मोठे अनेक गट आहेत. त्यांचा दृष्टिकोन वेगळा आणि कार्यपद्धतीही तितकीच भिन्न. यात पुरोगामी, सामाजिक, राजकीय चळवळी आहेत, तशा स्त्रीवादी, डाव्या चळवळी-संस्था-संघटनाही आहेत. पण या सर्वाना बापटसरांविषयी आस्था होती. थोडय़ाफार फरकानं या सर्वच संस्था त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून, आपला पाठिराखा म्हणून पाहत. 

सामाजिक चळवळींचा उद्देश कितीही नेक असला तरी त्या व्यवस्थेविषयी आणि सभोवतालच्या परिस्थितीविषयी जरा जास्तच निराशाजनक चित्र रंगवत असतात. परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्तच फुगवून सांगितल्याशिवाय आणि समस्यांचा बागुलबुवा केल्याशिवाय कार्यकर्ते पेटून उठत नाहीत, असा त्यांच्या नेत्यांचा समज असतो. आणि तशी कार्यपद्धतीही. शासनयंत्रणेविषयीची नकारात्मकता हा तर सर्वामध्ये कॉमन म्हणावा असा फॅक्टर असतो. अशा या चळवळी-संस्था-संघटनांचे शिक्षण करण्याचे काम बापटसरांनी आयुष्यभर केले.

जगाला एका विशिष्ट दिशेने ढकलण्याचे काम करण्यासाठी आपल्या परिघापुरते काम करून भागत नाही तर त्यासाठी आधी जगाचे नीट आकलन करून घेण्याचीही गरज असते. जग जसे आहे, ते तसे का आहे हे समजून घेतल्याशिवाय त्याविषयी काही विधाने करणे हे फारसे बरोबर ठरत नाही. हे तारतम्य आपल्या भाषणांमधून कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याचे, त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम बापटसरांनी केले. 

 आत्मटीका करणे हे खरे मर्म
‘माणूस, निसर्ग व पर्यावरण’ या 1998 साली लेखात बापटसरांनी लिहिले आहे, ‘‘गांधी, मार्क्‍स व बुद्ध यांचा वारसा आपल्याला लाभला पाहिजे. त्यातील सत्त्वांश उचलून व त्यावर परिस्थितीनुसार योग्य ते संस्कार करून आपली नवी पर्यावरणविषयक भूमिका निश्चित केली पाहिजे. गरिबीच्या प्रश्नावर तोडगा काढला तर पर्यावरणाचा गुंता सुटेल आणि पर्यावरणाच्या गुंत्यात लक्ष घातले तर गरिबीची पाळेमुळे कुठे कुठे दडलेली आहेत, हे पुरतेपणी समजून येईल. पर्यावरणाच्या प्रश्नाकडे पाहण्याची सत्याग्रही भूमिका यापेक्षा फार वेगळी असणार नाही.’’ आपल्याकडच्या तथाकथित पर्यावरणवाद्यांना आणि घायकुत्या पर्यावरणप्रेमींना या विधानात सणसणीत अशी चपराक आहे. पर्यावरणाच्या प्रश्नाचा गुंता कसा समजून घ्यायचा, याची दिशा यातून बापटसरांनी सूचित केली आहे. 


2006 साली प्रकाशित झालेल्या ‘भारतीय राष्ट्रवादापुढील आव्हाने’ या संपादित पुस्तकात ‘राष्ट्रवाद : काही सैद्धांतिक प्रश्न’ हा बापटसरांचा प्रदीर्घ लेख आहे. राष्ट्रवादाच्या मूळ संकल्पनेपासून भारतीय राष्ट्रवादाच्या वाटा-वळणापर्यंत जागतिक परिप्रेक्ष्याची ओळख करून देत बापटसर शेवटी म्हणतात, ‘‘आत्मटीका करणे हे राष्ट्रवादाचे खरे मर्म आहे असे मला वाटते. आपण जरी मार्क्‍सवादी असाल, मिलवादी, रेननवादी असाल, धर्मवादी असाल किंवा आंबेडकरांच्या अर्थाने धम्मवादी असाल तरी या सर्वानीच आत्मटीका करणे महत्त्वाचे आहे. कारण ते एक ऊर्जास्थान आहे. आपल्यात सुधारणा घडवून आणण्याचे ते एकमेव साधन आहे. संस्थात्मक पातळीवर आत्मटीका न करणारा राष्ट्रवाद मारकच ठरणार आहे. जागतिकीकरणाच्या युगात तुम्ही जर आत्मटीका केली नाही तर तुम्ही स्मृती हरवाल व त्यातून प्रवाहपतित होण्याचा धोका असतो. मग आजच्या जागतिकीकरणाच्या संदर्भात भूगोल व राष्ट्र यांचे अस्तित्व अप्रस्तुत ठरले आहे, या प्रचाराला आपण बळी पडू.’’ पण आत्मटीकेची सुरुवात दुस-यापासून व्हावी, अशी आपल्या समाजाची धारणा असल्याने बापटसर म्हणतात, त्या प्रचाराला आपण बळी पडतो आहोत. सामाजिक चळवळी, साहित्य, राजकारण, सर्वत्र याचा अनुभव येतो. 

बापट यांनी 1972 साली ‘समाजवादी मित्रांना अनावृत पत्र’ लिहून त्यांच्या समाजकारणाची व राजकारणाची जी चिरफाड केली आहे, ती तर अफलातून आहे. 

लोकाभिमुख विचारवंत
थोडक्यात, बापट सर समाजशिक्षक, लोकाभिमुख विचारवंत होते. शिक्षक-प्राध्यापक या शब्दांना हल्ली जवळपास शिव्यांचे स्वरूप आले आहे. इतके या शब्दांचे अवमूल्यन अलीकडच्या काळात झाले आहे. त्याला अपवाद असणाऱ्या मोजक्या प्राध्यापकांमध्ये बापटसरांचा प्राध्यान्याने समावेश केला जाई. 

लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारणे, ही खायची गोष्ट नाही. तिच्यासाठी प्रचंड मोठा त्याग करावा लागतो. डोक्यावर सतत बर्फाची लादी ठेवावी लागते. आणि एकच मुद्दा परत परत समजावून सांगावा लागतो. शिवाय एखाद्या प्राध्यापकाने असे उद्योग करणे, कमीपणाचे मानले जाते. स्वतंत्र लेखन सोडून असे उद्योग करणाऱ्याला विद्यापीठीय बुद्धिवाद्यांच्या जगात फारसे स्थान नसते. पण बापटसरांनी त्याची कधी तमा बाळगली नाही. प्राध्यापकाने लेखक असलेच पाहिजे, या दांभिक अट्टाहासाला ते कधी बळी पडले नाहीत. याउलट या अपप्रचाराला बळी पडलेले पुस्तकी पंडित, गेल्या वीस वर्षात ज्या जागतिकीकरणाच्या नावाने बोंबा मारत आहेत, नेमके याच काळात कालबाह्य होऊ लागलेत. 

या पार्श्वभूमीवर बापटसरांसारख्या लोकाभिमुख विचारवंतांची गरज पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. आता बापट नाही पण पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्रा. यशवंत सुमंत त्यांचा हा वारसा गेली काही वर्षे नेटाने आणि समर्थपणे चालवत आहेत. एवढेच नव्हे तर पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाला बापट, सुमंत, सुहास पळशीकर, राजेश्वरी देशपांडे या तत्त्वनिष्ठ प्राध्यापकांनी राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून दिला आहे.

‘मला उमजलेले’
बापट हे काही बैठक मारून लिहिणारे लेखक नव्हते. ते त्यांच्या स्वभावातच नव्हते आणि बहुधा त्यांना ते करायचेही नव्हते. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षात त्यांचे एकही स्वतंत्र पुस्तक प्रकाशित झालेले नाही. वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले काही लेख आणि मराठीतल्या काही महत्त्वाच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना एवढेच काय ते लेखन त्यांच्या नावावर जमा आहे. मात्र त्यांचा राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, नाटय़शास्त्र, कला, सौंदर्यशास्त्र, संरक्षणशास्त्र, सामाजिक चळवळी, महाराष्ट्राची वैचारिक परंपरा यांचा गाढा अभ्यास होता.

गेल्या वर्षी त्यांचे ‘परामर्श’ हे संकलित पुस्तक प्रकाशित झाले. ते त्यांचे पहिले पुस्तक. (इतर दोन लेखसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.) या पुस्तकात त्यांनी ‘स्वातंत्र्य, समता आणि न्याय’ (मे. पुं. रेगे), ‘न्याय आणि धर्म’ (अशोक चौसाळकर), ‘इतिहासचक्र’ (राम मनोहर लोहिया), ‘तुकारामदर्शन’ (सदानंद मोरे), ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य’ (गो. मा. पवार), ‘कथा मुंबईच्या गिरणगावची’ (नीरा आडारकर व मीना मेनन) या सहा पुस्तकांना लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनांचा समावेश आहे. यातील काही प्रस्तावना पन्नास-साठ पानांच्या आहेत. 

या प्रस्तावना त्या त्या पुस्तकाचे मर्म आणि त्यामागची संबंधित लेखकांची भूमिका उलगडून दाखवतात. (ग. प्र.) प्रधानमास्तरांनी अशाच इतरांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनांच्या संग्रहाला ‘मला उमजलेले’ असे अन्वयर्थक शीर्षक दिले आहे. बापटांची भूमिकाही त्यापेक्षा वेगळी नाही. प्रस्तावना नेमकी कशासाठी आणि कशी लिहायची याचा वस्तुपाठ म्हणाव्या अशा आहेत. 

समाजशिक्षक
पण बापटसरांचं मुख्य योगदान त्यांच्या समाजशिक्षकाच्या भूमिकेत आहे. त्यांनी गेल्या 40-50 वर्षात सामाजिक संस्था- संघटना व चळवळी यांच्या विविध उपक्रमांत, अभ्यासवर्गात व शिबिरांत विश्लेषक व चिकित्सक मांडणी करणारी काही हजार भाषणे तरी दिली असतील. महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके इतकेच काय पण छोटी-मोठी खेडीही त्यांनी अभ्यासवर्ग, शिबिरे आणि व्याख्यानांसाठी पालथी घातली आहेत. नियोजित कार्यक्रम कितीही आडबाजूला असो, वाहतुकीची कशीही सोय असो ते तिथे जाणार. सलग दीड-दोन तास आपला विषय रसाळपणे मांडणार. बापट हे दीर्घ पल्ल्याचे वक्ते होते. दहा-पंधरा मिनिटांत त्यांना विषय मांडता येत नसे. त्यासाठी त्यांना दीड-दोन तास लागत. मग त्यांनाही समाधान मिळत असे आणि समोरच्या श्रोत्यांची अवस्था तर ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ अशीच होई. 

बापट यांची भाषणे विचारप्रवर्तक असत. ती एकाच प्रश्नाला किती बाजू असतात, याचा पट उभा करत. प्रश्नाची व्यामिश्रता सांगताना त्यावरील मार्ग सांगण्याचे कामही करत. त्यांच्या भाषणामुळे आपल्या विचारांना दिशा मिळते. मुख्य म्हणजे विचार कसा करावा, याचा परिप्रेक्ष्य मिळतो. लोकाभिमुख विचारवंताचे हेच काम असते. ते बापटसरांनी अगदी शेवट शेवटपर्यंत निष्ठेने केले.

Wednesday, June 27, 2012

`पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?'

अजिबात मुद्देसुद नसलेले टीपण. यावर मुद्देसुद चर्चा कशी होणार? आणि तिची अपेक्षा तरी कशी करणार? कधी कधी मुद्देसुद बोलत नाही आपण तसेच कधी कधी मुद्देसुद लिहित पण नाही. हे टीपण त्यातलाच प्रकार.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

हिंदीतील मान्यवर कवी (कै.) गजानन माधव मुक्तिबोध यांच्या एका कवितेतील ही ओळ म्हटलं तर फार साधीसुधी आहे. सूचक आहे. आणि तितकीच मर्मभेदक आहे, खोचक आहे. तशी भोचकही आहे. कारण `राजकारण' या शब्दाविषयी आपल्याकडे भयानक आणि भयंकर असे समज-गैरसमज आहेत. हा शब्द भारतीयांनी इतका बदनाम करून ठेवला आहे की, तो आता शिवी म्हणूनच वापरला जातो. अर्थात इथे `राजकारण' या शब्दाचा इतिहास, वर्तमान किंवा त्याची व्युपत्ती आणि मूलार्थ हा प्रतिपाद्य विषय नाही. त्यामुळे ती चर्चा इथेच थांबवू. मुक्तिबोध यांच्या या कवितेत `पॉलिटिक्स' हा शब्द कोणत्या अर्थाने आला आहे, ते समजून घेऊ. ही संपूर्ण कविता वाचल्यावर लक्षात येते की, मुक्तिबोधांनी इथे `रोल' वा `भूमिका' या अर्थाने हा शब्द वापरला आहे. म्हणजे `पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?'
याचा अर्थ, `मित्रा, तुझी नेमकी भूमिका काय आहे?'

...या एका प्रश्नातच समोरच्याची दांडी उडवता येते. त्याला कोंडीत पकडता येतं. `प्रश्न विचारण्यातून शहाणपण दिसतं तर उत्तरातून हुशारी दिसते' असं म्हणतात. `पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?' या प्रश्नाचं उत्तर कोण कसं देईल, यावरूनही या अनुमानाचा प्रत्यय येतोच. पण हाही जरा तात्त्विक विचार झाला. बहुतेक लोकांनी - त्यात पत्रकार-लेखक-संपादक-प्राध्यापक-वकील-डॉक्टर-सामाजिक कार्यकर्ते असे सर्व लोक आले - याचा कधी विचारच केलेला नसतो. स्वत:ला सतत प्रश्न विचारण्याची आणि स्वत:ची सतत समीक्षा करण्याची `सवय' अनेकांना नसते, ती त्यांच्या अंगवळणी पडलेली नसते. आणि अशी `सवय' लावून घेतली पाहिजे, याचाही त्यांनी कधी विचार केलेला नसतो. त्यामुळे `पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?' या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळेलच याची पुरेशी खात्री नसते. कारण विचार आणि व्यवहार यातली तफावत कमीत कमी ठेवण्यासाठी धडपडणारे लोकही कमीच असतात...आणि म्हणूनच `पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?' हा प्रश्न सतत समोरच्याला विचारत राहून त्याला त्यावर विचार कराण्यासाठी सूचित करणं, या प्रश्नाचाही आपण विचार करायचा असतो, हे ध्यानात आणून देणं, हे `सामाजिक काम' ठरतं. भलेही त्याला प्रत्येक जण योग्य प्रतिसाद देईल न देईल. आपण आपला संयम पूर्ववत ठेवत हा प्रश्न विचारात राहिलं पाहिजे. 

पण हा प्रश्न कुणी कुणाला विचारावा? ज्याचं स्वत:चं पॉलिटिक्स ठरलेलं आहे, त्याच्याकडेच हा प्रश्न विचारण्याचं नैतिक बळ असेल. पण मग आता पॉलिटिक्स म्हणजे काय? जॉर्ज ऑर्वेल म्हणतो, `राजकारण हा शब्द शक्य तितक्या उदारपणे घ्यावा. जगाला एका विशिष्ट हेतूने ढकलणं, हाही राजकीय हेतूचा/धोरणाचाच भाग असतो.' 

थोडक्यात राजकारण म्हणजे आपली जगाबद्दलची, जगण्याबद्दलची भूमिका काय आहे? पण मग ही भूमिका कशी ठरते? वा ठरवायची? लोकशाही ही फक्त केवळ शासनप्रणाली नसून ती जीवनप्रणाली आहे, असं म्हणतात. तसंच भूमिकेचं असतं. ती जीवनप्रणाली असावी लागते. तरच तिचं महत्त्व कळू शकतं. शिवाय ती तुम्ही कुठे जन्म घेता, बालपण-जडणघडणीच्या वयात तुमच्या अवतीभवतीचं वातावरण कसं आहे आणि तुमचे शिक्षक-मित्रमैत्रिणी कोण असतील यावर अवलंबून असतं. पण निसर्गानं आई-वडील, आजूबाजूचं वातावरण व लोक आणि शिक्षक-प्राध्यापक यांच्या प्रभावातून बाहेर पडायचा पर्यायही आपल्याला दिलेला असतोच. त्याचा सुयोग्य वापर करून घेण्याची संधू फारच कमी जण घेतात, तो भाग वेगळा!

माणसाला जगण्यासाठी धर्माची गरज असते की नाही, धर्माशिवाय माणूस सुखा-समाधानाने जगू शकतो की नाही हा नेहमीच विवादाचा विषय राहिला आहे. त्यामानाने माणसाला जगण्यासाठी आयडिऑलॉजीचा किती उपयोग होतो, आयडिऑलॉजीमुळे माणसाचं जगणं किती सुखकर, समृद्ध बनू शकतं, याविषयीही वाद होत आले आहेत. आयडिऑलॉजी प्रमाण मानून जगणारे स्वत:च्या संपन्न आयुष्याची उदाहरणं देऊन त्याचे समर्थन करतील, तर त्यांचे विरोधक आयडिऑलॉजी प्रमाण मानूनही ज्यांचं आयुष्य विपन्नावस्थेत गेलं, त्यांची उदाहरणं देऊन आधीच्यांचा प्रतिवाद करतील. आयडिऑलॉजी ही भौतिकतेशी संबंधित गोष्ट नाही, ती बौद्धिकतेशी संबंधित गोष्ट आहे. थोडक्यात माणूस म्हणून जगण्यासाठी विचारसरणी गरजेची असते, हे स्वत:ला आणि इतरांना पटवून देणं ही फार म्हणजे फारच अवघड गोष्ट असते.

शिवाय अशी आयडियॉलॉजी प्रमाण मानून आयुष्यभर तिच्याशी प्रामाणिक राहणारे, त्यासाठी कुठलीही तडजोड न करणारे लोक आपल्याला आजूबाजूला असतात. आपल्या देशातल्या हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट हे आपली आयडिऑलॉजी प्रमाण मानणारे लोक आहेत. आयुष्यभर आपल्या आयडिऑलॉजीला चिकटून राहणारे हिंदुत्ववादी, कम्युनिस्ट वा इतर वादी आपल्या आयडिऑलॉजीविरोधात बोलणाऱयांशी सतत पंगा घेत राहतात. पण आयुष्याच्या उत्तरार्धात आक्रमकता कमी झाली की, गडबड होते. काही सुविद्यांना आपल्या आयडिऑलॉजीमधील वैगुण्य दिसायला लागतात. मग ते तिचा त्याग करतात. काहींच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा उजागर होऊन त्यांना वैफल्य येतं. ते बाजूला होतात. काही मात्र या आयडिऑलॉजीचा सरळ त्याग करून दुसऱया आयडिऑलॉजीचा स्वीकार करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- भाजपा किंवा कम्युनिस्ट पक्ष यातून बाहेर पडलेले लोक त्याविषयी नंतर अत्यंत कडवटपणे बोलतात, लिहितात. मराठीमध्ये अशा पद्धतीच्या पुस्तकांची संख्या बरीच आहे. 

या दोन्ही आयडिऑलॉजी `प्रेम आणि द्वेष' (Lover and Hate) यावर संकल्पनेवर आधारलेल्या आहेत. हिंदुत्ववादी मुस्लिमांचा द्वेष करतात, जातीयवादाचं समर्थन करतात; तर याच कारणांसाठी कम्युनिस्ट त्यांचा तिरस्कार करतात. कम्युनिस्टांना दीनदलितांबद्दल प्रेम वाटतं. कारण कामगार मुख्यत: याच वर्गातून येतात. शिवाय क्रांती नेहमी खालच्या वर्गातून सुरू होते, हा सिद्धान्त मार्क्सने सांगून ठेवलाय. तो 100 टक्के अजून तरी कसोटीला उतरला नसला तरी कम्युनिस्ट मार्क्सला अभिप्रेत असलेली क्रांती जगात होणारच, असा दुर्दम्य विश्वास बाळगून असतात. इकडे हिंदुत्ववादीही हा देश केवळ हिंदूंचा देश होणार, असा दुर्दम्य विश्वास बोलून दाखवत असतात. 

या दोघांचेही स्वप्न पूर्ण होणार नाही. कसे होणार? भारतात ते शक्य तरी आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित करून त्यावर आपण प्रश्नचिन्ह कायमस्वरूपी ठेवून देऊ शकतो.
पण एक खरेच आहे की, या दोन्ही आयडिऑलॉजी काहीशा आक्रमक आणि वास्तवाशी विसंगत ठरणाऱया आहेत. दोन्हींमध्ये `प्रेम आणि द्वेष' (Lover and Hate) हा फॉर्म्युला असल्याने त्यांना भारतात व्यापक जनाधार आजवर तरी मिळालेला नाही.
पण म्हणून या आयडियॉलॉजी संपलेल्या आहेत असे मानायचे कारण नाही. तशी कुठलीही आयडियॉलॉजी संपत नाही. फार तर तिची पिछेहाट होते. 

बर्लिनची भिंत पडली तेव्हा आता आयडिऑलॉजीचा अंत झाला आहे, अशी जगभर चर्चा सुरु झाली. Francis फुकुयामा यांनी तर The End Of History and the Last Man असे पुस्तकच लिहिले. पण त्या आधी Daniel Bell यांनी १९५० मध्ये The End of Ideology: On the Exhaustion of Political Ideas in the Fifties   असे पुस्तक लिहून आयडिऑलॉजीचा अंत या विचाराला सुरुवात केली होती. या पुस्तकांवर जगभर खुप चर्चा झाली. त्यावर अनेक लेख, पुस्तके लिहिली गेली. सध्या भांडवलवादाची सरशी आणि साम्यवादाची पिछेहाट झालेली दिसते. पण ती अजून काही काळ अशीच चालू राहून भांडवल वादाची पिछेहाट सुरु होईल असे अनेक विचारवंतान्ना वाटते. 

खर्या आयडिऑलॉजी दोनच. भांडवलवाद आणि साम्यवाद असेही काही विचारवंत मानतात. पण ही संकल्पना फारशी स्वीकारली गेलेली नाही.


Monday, June 25, 2012

अस्मितेचे प्रश्न, हिंसाचाराची धग

डॉ. अमर्त्य सेन यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. ‘कल्याणकारी अर्थशास्त्र’ या शाखेला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचा हा सिद्धान्त जगभर नावाजला. नोबेल पुरस्कारानंही त्यावर पसंतीची मोहोर उठवली. सेन हे कोणतीही विचारसरणी अंतिम मानत नाहीत. काहीसा कठोर नि:पक्षपातीपणा आणि चिकित्सक वास्तववाद हे त्यांच्या संशोधनाचे निकष राहिले आहेत. निधर्मीवाद, सहिष्णुता, मानवता आणि आशावाद ही मूल्ये मात्र ते प्रमाण मानतात. गरिबांविषयी त्यांना खूप आस्था आणि कणव आहे. ‘अर्थशास्त्र हे गरीब, पीडित लोकांविषयी भाष्य करते; म्हणूनच मला ते जवळचे वाटते’, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. विषमता, गरिबी आणि दुष्काळ याविषयी लोकशाही पद्धतीने उपाययोजना या संदर्भात त्यांनी बरेच लेखन केले आहे. ‘कल्याणकारी अर्थशास्त्रा’तील योगदानामुळे त्यांना 1998 सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

डॉ. सेन यांनी राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांची मांडणी करणारे लेखनही केले आहे. ‘अर्ग्युमेंटेटिव्हव्ह इंडियन’आणि ‘आयडेंटिटी अँड व्हायोलन्स’ ही त्यांची दोन पुस्तके त्याची उदाहरणे आहेत. (पहिल्याचा ‘वाद-संवादप्रिय भारतीय’या नावाने शारदा साठे यांनी आणि दुस-याचा अनुवाद ‘अस्मिता आणि हिंसाचार’या नावाने   डॉ. सुप्रिया सहस्र्बुद्धे यांनी मराठी अनुवाद केला आहे.) ही दोन्ही पुस्तके पेंग्विन इंडियाच्या यात्रा बुक्सने प्रकाशित केली आहेत. ‘वाद-संवादप्रिय भारतीय’ हे पुस्तक भारतीयत्वाचा समृद्ध वारसा सांगणारे आहे, तर ‘अस्मिता आणि हिंसाचार’मध्ये लोकांच्या संकुचित व क्षुद्र होण्याचे भयानक परिणाम सांगितले आहेत.

अलीकडच्या काळात केवळ महाराष्ट्राला, भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना अस्मितेच्या दिवसेंदिवस उग्र होऊ पाहणा-या समस्येने ग्रासले आहे. या अस्मितेपायी जगभर कशा पद्धतीने हिंसाचार होतो आहे, याचा वेध डॉ. सेन यांनी ‘अस्मिता आणि हिंसाचार’ या पुस्तकात घेतला आहे. या पुस्तकात प्रास्ताविक, प्रस्तावनेसह एकूण नऊ प्रकरणे आहेत. त्यातली पहिली सहा प्रकरणे ही डॉ. सेन यांनी नोव्हेंबर 2001 ते एप्रिल 2002 या काळात बोस्टन विद्यापीठात दिलेली व्याख्याने आहेत. नंतरच्या तीन प्रकरणांत नोव्हेंबर 1998 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या एका व्याख्यानाचा आणि त्यांच्या इतर लेखनाचा समावेश आहे.

डॉ. सेन ‘कल्याणकारी अर्थशास्त्रा’चे पुरस्कत्रे असले तरी ते जागतिकीकरणाचेही पाठीराखे आहेत आणि या दोन्हींचा योग्य समतोल कसा ठेवला जाऊ शकतो, या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकातील ‘पाश्चिमात्य जग आणि त्याला विरोध’ आणि ‘जागतिकीकरण आणि उच्चारस्वातंत्र्य’ हेही अनुक्रमे पाचवे आणि सातवे प्रकरण विशेष वाचनीय आहे. सातव्या प्रकरणात सेन यांनी ‘जागतिकीकरणाला विरोध हा केवळ पाश्चिमात्त्यीकरणाला विरोध’ या टीकेचा यथोचित समाचार घेऊन पाश्चिमात्यीकरणाचा पाया दृढ करण्याचे काम पौर्वात्यांनी’ कसे केले आहे, याची सोदाहरण मांडणी केली आहे. तर पाचव्या प्रकरणात ‘जे जे पाश्चात्त्य ते ते त्याज्य’ या द्वेषाच्या भावनेचेही योग्य पण संयत शब्दांत खंडन केले आहे.

‘संस्कृती आणि केंद्र’ या सहाव्या प्रकरणात संस्कृती हीच मुळी कशी परिवर्तनीय असते याची मांडणी केली आहे. ‘विशिष्ट संस्कृतीत जन्म घेणे हा सांस्कृतिक स्वातंत्र्याचा प्रकार नव्हे हे तर उघड आहे आणि केवळ जन्मामुळे एखाद्या व्यक्तीवर ज्या गोष्टीचा ठसा उमटत असेल, ती गोष्ट टिकवून ठेवणे, हा स्वातंत्र्याचा विनियोग नव्हे,’ हे त्यांचे निरीक्षण त्या दृष्टीने चिंतनीय आहे. सध्याच्या सांस्कृतिक संपर्कातून जगभरातील कुठलीच संस्कृती अस्सल देशी राहणे, कसे अवघड आहे याची मांडणी ‘बहुसंस्कृतिवाद आणि स्वातंत्र्य’ या आठव्या प्रकरणात केली आहे.

जगाविषयीचे विनाकारण असलेले भ्रम आणि इतरांचा द्वेष हीच माणसांची अस्मिता आहे/असते, हे ठरवण्याच्या अट्टाहासातून जगभर कशा प्रकारचा हिंसाचार होतो आहे, याचा वेध इतर प्रकरणांतून घेतला आहे. डॉ. सेन यांच्या मतांशी सर्वच जण सहमत होतील असे नाही, परंतु त्यांच्या तर्कशुद्ध युक्तिवादांचा आणि प्रत्येक प्रश्नाच्या सर्व बाजू समजून घेण्याच्या पद्धतीचा प्रतिवाद करणे मात्र अवघड आहे. त्यांची लेखनशैली अतिशय संयमित वाटत असली तरी ती तितकीच रोखठोकही आहे.

अस्मिता आणि हिंसाचाराचा प्रश्न नेमका काय आहे आणि त्याचे जगभरचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.

आयडेंटिटी अँड व्हायोलन्स - डॉ. अमर्त्य सेन
पेंग्विन इंडिया, दिल्ली
पाने : 240, किंमत : 299 रुपये

Friday, June 22, 2012

मराठा समाज- वास्तव आणि अपेक्षा


 दै. सकाळमध्ये आलेले टीपण. १ जानेवारी २०११ रोजी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मराठा समाजाचा समाज म्हणून विचार करून तसे लेखन झाले तरी ते एकत्रित नव्हते. डॉ. बाबा आढाव यांनी 1971 मध्ये लिहिलेला लेख; त्यानंतर डॉ. आ. ह. सांळुखे यांनी 1981 मध्ये लिहिलेल्या लेखाने बरीच चर्चा घडवून आणली होती. त्यानंतर बाळासाहेब विखे यांनी लिहिलेला मोठा लेख, त्यावर झडलेली चर्चा या साऱ्याचा वेध घेत, नव्याने काही जणांना लिहायला लावून राम जगताप आणि सुशील धसकटे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. विश्‍लेषण, इतरांबरोबरचे संबंध, स्त्रियांची स्थिती, मराठ्यांचे हीरो, अनुभव-निरीक्षणे, बदलता काळ व मराठा समाज अशा सहा भागांत यामध्ये 13 लेख देण्यात आले आहेत.
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे (020-24473459) 
पृष्ठे : 226, मूल्य : 200 रुपये.

Monday, June 18, 2012

वस्तुपाठ नीतिमान व धैर्यवान बातमीदारीचा!


एक सजग आणि जबाबदार पत्रकार किती उत्तम प्रकारची बातमीदारी आणि कामगिरी करू शकतो, आपल्या काळाचा कसा उत्तम साक्षीदार बनू शकतो आणि इतिहास घडवण्यात आपलाही खारीचा वाटा कसा उचलू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणून वि. स. माडीवाले यांच्या `अशी ही बिकट वाट' या 1972 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाकडे पाहता येईल. हे मराठीतले एक महत्त्वाचे पण काहीसे दुर्लक्षित असे पुस्तक आहे. 

माडीवाले यांनी मराठी वृत्तपत्रांमध्ये पस्तीस-छत्तीस वर्षे पत्रकारिता केली. 1937च्या सुमाराला माडीवाले पुण्याच्या दै. प्रभातमध्ये वार्ताहर म्हणून रुजू झाले. पुढे प्रभातमधून बाहेर पडून ते `काळ'मध्ये रुजू झाले. नंतर `लोकमान्य' आणि त्यानंतर पुन्हा `केसरी'मध्ये गेले. शेवटी `केसरी'तूनच निवृत्त झाले. 
 
माडीवाले यांनीच म्हटल्यानुसार हे पुस्तक एका वार्ताहराची दैनंदिनी आहे. त्यांनी लिहिले आहे, ``हे पुस्तक कथा नाही, कादंबरी नाही. प्रबंध तर नाहीच. मराठी वृत्तपत्रांतील एका वार्ताहराने आपल्या आयुष्यात जे अनुभवले, सोसले, बोचले, व भोगलेही त्याच्या या जिवंत स्मृति! मराठीत असा प्रयत्न पहिलाच असावा अशी माझी तरी समजूत आहे. तो कितपत साध्य झाला हे रसिकांनी ठरवावे. तेच सर्वेच्च न्यायालय. '' पण सर्वेच्च न्यायालयात बऱयाचदा महत्त्वाचे खटलेही प्रलंबित राहतात. तसाच प्रकार माडीवाले यांच्या प्रस्तुत पुस्तकाबाबत झाला आहे असे म्हणावे लागेल. निदान मराठी पत्रकारितेमध्ये तरी पाहिलेल्या, अनुभवलेल्या, घडवलेल्या आणि घडलेल्या घटनांचा इतिहास सांगणारं पुस्तक कुणी लिहिल्याचं आपल्या पाहण्यात नाही, असे माडीवाल्यांनी म्हटले आहे.

हे पुस्तक तीन-चार कारणांसाठी महत्त्वाचे आहे. पहिले, उत्कृष्ट बातमीदारी कशी करावी याचे हे पुस्तक आदर्श नमुना आहे. दुसरे, माडीवाले यांनी पुण्यातच पत्रकारिता केली. त्यामुळे यातील सर्व घटना पुण्यातील आहे. त्यातून पुण्याचा तत्कालिन इतिहास उलगडण्यास मदत होते. तिसरे, पत्रकारांना बातम्या कशा मिळतात याचे सर्वसामान्यांना फार कुतूहल असते. ते शमवण्याचे कामही हे पुस्तक शंभर टक्के करील असा भरवसा वाटतो. चौथे, माडीवाले हाडाचे बातमीदार आहेत. त्यांच्या अंगोपांगांत बातमी मुरलेली आहे. उभ्या आयुष्यात त्यांनी एकच व्यसन केले, ते म्हणजे बातम्या मिळवण्याचे. ही वाट बिकट असली तरी माडीवाले कधी कंटाळले नाहीत. कारण रोज नव्या बिकट वाटेवरून त्यांना चालावे लागे. रोज नव्या संघर्षाला, प्रसंगाला आणि अंगावर शेकू पाहणाऱया घटनांना तोंड द्यावे लागे. पण त्या सर्वांतून माडीवाल्यांनी अतिशय कौशल्याने मार्ग काढला, त्यावर आपल्या हजरजबाबीपणामुळे मात केली. म्हणून ही बिकट वाट अथपासून इतिपर्यंत कुठेही कंटाळवाणी झालेली नाही. 

मराठी वृत्तपत्र व्यवसायाला सुरुवात झाली, तीच मुळी लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून. हा प्रवाह स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाला, स्वातंत्र्यानंतरही सुरुवातीच्या काही दशकांमध्ये तो बळकट होता. (मात्र ऐंशीनंतर हा प्रवाह फारच क्षीण झाला आहे. याला स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत असली तरी पत्रकारितेच्या नीतिमूल्यांबाबतचा कमी होत चाललेला आग्रह आणि विश्वास हेही कारणीभूत आहेत असे वाटते.) माडीवाल्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली तीच मुळी स्वातंत्र्यपूर्व काळात. त्यामुळे त्यांनी समाजहित आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. कोणत्याही परिस्थीतीत पत्रकारितेच्या नीतीमूल्यांशी तडजोड केली नाही. केवळ सनसनाटी बातम्या हा तेव्हाच्या वृत्तपत्रसृष्टीचाच स्वभावधर्म नव्हता, त्यामुळे तशा प्रकारच्या बातम्या मिळूनही माडीवाल्यांनी तो मोह कटाक्षानं टाळला. 

या पुस्तकातून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर या दोन्ही काळातल्या पत्रकारितेतला फरक स्पष्ट होतो. ब्रिटिश काळात तर बातमीचा माग काढताना माडीवाल्यांच्या अनेक वेळा जिवावर बेतले. पण ते त्यातून सहीसलामत बाहेर पडले, ते सुदैवाने वगैरे नाही तर पत्रकारितेनेच निर्माण केलेल्या नीतिमूल्यांनी. शिवाय त्या वेळी दूरदर्शन, वृत्तवाहिन्या नव्हत्या. त्यामुळे लोकही वृत्तपत्रांवरच अवलंबून होते. मात्र तेव्हा आताच्यासारख्या सोयी-सुविधा नसल्याने पत्रकारिता करणे कठीण होते. `अशी ही बिकट वाट' या नावातूनच ते पुरेसे स्पष्ट होते. त्यामुळे माडीवाल्यांसारख्या पत्रकारांची विशेष दखल वाचकांकडून घेतली जात असे. 

1935-36 साली मराठी वृत्तपत्रात एकच वार्ताहर असायचा. गंगूबाईने पाटली चोरल्यापासून डॉ. धनंजयराव गाडगीळ यांची अर्थशास्त्रावरील किंवा स्वा. सावरकर, भाई डांगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्रीनिवास शास्त्रीय यांची राजकारणावरील भाषणे-जाहीर मुलाखती, न्यायालयात गाजलेले खटले, चोऱया-दरोडे, खून-बलात्कार अशा सर्व प्रकारच्या वार्ता या एकाच वार्ताहराला द्याव्या लागत. या सर्व गोष्टींमुळे माडीवाले यांना जीवनाचं सर्व अंगांचं, बाजूंचं आणि पैलूंचं चांगलं दर्शन झालं. समाजमनाच्या मनोव्यापाराचा सूक्ष्म अभ्यास करता आला. त्या सर्व गोष्टींचं प्रतिबिंब या पुस्तकात पडलं आहे. त्यामुळे हे पुस्तक अतिशय रोचक, रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक झालं आहे. 

माडीवाले तसे मिष्किल आहेत. त्यांनी पत्रकारांचे तुटपुंजे पगार, वृत्तपत्रांची हलाखीची अवस्था, संपादकांचा तऱहेवाईकपणा याविषयी थोडक्यात लिहिले आहे. 
माडीवाले यांनी अनेक महत्त्वाच्या बातम्या `ब्रेक' केल्या. त्या वाचताना आपण हर्षभरीत होतो. त्यांच्या या कामगिरीवर तेव्हाच्या पत्रकारांना हेवा वाटायचाच, पण आजच्या वार्ताहरांनीही हेवा वाटावा अशा या बातम्या आहेत. यातली एकेक बातमी माडीवाल्यांनी कशी मिळवली हे वाचताना आपण गुंग होऊन जातो.

माडीवाले यांनी या  सबंध पुस्तकात कुठेही भाष्य करण्याचे टाळलेले आहे. त्यांनी फक्त घटना सांगितल्या आहेत, पण त्या घटनाच इतक्या बोलक्या आहेत की, त्यावर वेगळ्या भाष्याची गरजच राहत नाही. 1941 साली वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम सुरू झाली. या सत्याग्रहाची आचारसंहिता काँग्रेसने ठरवून दिली होती. त्यानुसार वैयक्तिक सत्याग्रह करणाऱयांना दंड झाला तर तो न भरता तुरुंगातच गेलं पाहिजे असा दंडक होता. स्वातंत्र्याच्या भावनेने सर्वात पहिल्यांदा जागृत झाला तो मध्यमवर्ग. त्याला सत्याग्रह करून तुरुंगात जाण्याची आणि पर्यायाने देशासाठी काहीतरी केल्याची भावना महत्त्वाची वाटत होती. अशाच एका पुण्यातल्या मध्यमवर्गीय बाइभनी सत्याग्रह केला. न्यायालयात त्यांना दंडाची शिक्षा झाली पण त्यांनी तो भरण्याचं नाकारल्यामुळे त्यांची रवानगी सकाळी अकरा वाजता येरवडय़ाच्या तुरुंगात झाली. सकाळी माडीवाले न्यायालयात असल्याने त्यांना या बाई माहीत होत्या. दुपारी कुणीतरी अज्ञाताने न्यायालयात जाऊन परस्पर त्या त्या बाईचाही दंड भरला . त्यामुळे चार वाजता न्यायालयाने बाईना मुक्त करण्याचा आदेश दिला. त्यामुळे या बाईना आनंद होण्याऐवजी उलट दु:ख झालं. बाई कष्टी होईन तुरुंगाच्या बाहेर आल्या आणि टांगा करून घरी परतल्या. तो टांगेवाला माडीवाल्यांचा मित्र होता. संध्याकाळी भेटल्यावर तो माडीवाल्यांना म्हणाला, ``आज दुपारी येरवडा तुरुंगातून एका सत्याग्रही बाइची सुटका झाली व मीच त्यांना घरी पोचतं केलं. पण बाई फारच कष्टी होत्या.'' माडीवाल्यांना त्या घटनेचा लगेच उलगडा झाला. ते त्यांच्या घरी गेले. नोकराकडे निरोप दिल्यावर आतून बाइचा आवाज त्यांचा कानावर पडला, `काळचा बातमीदार कुठला! काळच आलाय.' अतिशय म्लान चेहरा करून त्या बाई बाहेर आल्या, माडीवाल्यांशी बोलल्या. त्या काळात ही बातमी मोठी खळबळजनक होती! 
बातमीदार किती चाणाक्ष असावा लागतो याचं उदाहरण या बातमीतून येतं.

अशा अनेक खळबळजनक बातम्या माडीवाल्यांनी दिल्या असल्या तरी काही बातम्या मिळूनही त्या समाजहित लक्षात घेऊन दिल्या नाहीत.
मॅट्रिकच्या परीक्षेचा पेपर आदल्या दिवशी फुटल्याची बातमी त्यांना मिळाली होती. तिने संबंध महाराष्ट्रात खळबळ उडाली असती, पण माडीवाल्यांनी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन नये म्हणून ती बातमी दिली नाही, अनेक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवलं नाही. अशीच एक बातमी न देऊन त्यांनी परप्रांतीयांच्या घशात जाणारा साखर कारखाना वाचला.
1942च्या लढय़ात अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले होते. त्यातल्या अच्युतराव पटवर्धन यांच्या मागावर पोलिस होते, पण पटवर्धन काही त्यांना सापडत नव्हते. मग पोलिसांनी पत्रकाराला त्याची नक्की माहीत असेल म्हणून पुण्यातल्या काही ठिकाणचे पत्ते देऊन त्या ठिकाणी अच्युतराव आले की, आपल्याला कळवण्याची जबाबदारी अत्यंत विश्वासाने माडीवाले यांच्यावर सोपवली होती. पण देशप्रेम जागृत असलेल्या माडीवाल्यांनी त्या ठिकाणी अच्युतरावांनी येऊ नये अशी व्यवस्था केली.
बातमीपेक्षाही काही प्रसंगी समाजहित महत्त्वाचं असतं याचा वस्तुपाठ या घटनांनी मिळतो. 

पण अनेक वेळा बातमी देणं हे वार्ताहराचं कर्तव्य असतं. ती बातमी बाहेर फुटू नये म्हणून हितसंबंधी लोक कमालीची गुप्तता पाळतात. निदान त्या काळात तरी तशी पद्धतच होती. अशा वेळी वार्ताहराचा कस लागतो. पण अशा अनेक प्रसंगांवरही माडीवाल्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर मात केली. 42च्या चळवळीत अनेक कार्यकर्त्यांना अटक करून 40-50 तरुणांवर महाराष्ट्र कटाचा खटला भरवण्याची तयारी पोलिसांनी चालवली होती. पण हा खटला न्यायालयात टिकणार नाही असं काही पोलिस अधिकाऱयांना वाटत होतं, तर काही खटल्याच्या बाजूने होते. ही बातमी मिळवण्यासाठी माडीवाले एका बडय़ा पोलिस अधिकाऱयाच्या घरी गेले, पण त्यांनी त्याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. चहा देऊन माडीवाल्यांची बोळवण करण्याच्या बेतात असतानाच तिथे त्यांच्या बरोबरीचे दुसरे अधिकारी आले. यजमान अधिकाऱयाला माडीवाल्यांना जा म्हणता आलं नाही, ती संधी साधून माडीवाले चेहऱयासमोर टाइम्स अंक धरून बसले. नेहरू शर्ट, काळी टोपी, धोतर, वाढलेली दाढी असा माडीवाल्यांचा गबाळा वेष पाहून त्या अधिकाऱयाला वाटलं हा कुणीतरी मदत मागायला आलेला असावा. नंतर त्या अधिकाऱयाने महाराष्ट्र कटाचा खटला कसा उभा राहू शकत नाही असं वरिष्ठांचंही मदत असल्याची इत्थंभूत माहिती दिली. माडीवाल्यांना मोठी बातमी मिळाली होती. यजमान पोलिस अधिकाऱयाने ``याद राख, यातील एक अक्षर जर बाहेर फुटलं, तर त्याचे परिणाम फार वाईट होतील'' असा सज्जड दम देऊनही माडीवाल्यांनी `महाराष्ट्र कटाचा खटला बारगळला' अशी तब्बल आठ कॉलमी बातमी दिली. तिने मोठी धमाल उडवून दिली. ही बातमी कशी फुटली, कोणी दिली याची बरीच चौकशी झाली, पण त्याचा तपास शेवटपर्यंत लागला नाही. कसा लागणार? कारण ती बातमी फुटली होती हे खरे, पण ती कुणीही माडीवाल्यांना दिली नव्हती. ती त्यांनीच अक्कल हुशारीने मिळवली होती. 

माडीवाल्यांनी दरोडेखोरांच्याही अनेक बातम्या दिल्या. त्यात त्यांनी त्यांची सत्प्रवृत्तीही नोंदवली आहे. पण उलटय़ा काळजाच्या दोन गुन्हेगारांना बोलतं करण्यात पोलिसांनाही मोठी मदत केली. त्यातल्या पहिल्याला खून केलेल्या जागी उलटा टांगण्याची युक्ती सुचवून, तर दुसरा त्याच्याविषयीची माडीवाल्यांची बातमी वाचून कोसळला. 

तो काळच असा होता की, घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येणं होईल की नाही याचा भरवसा नसे. माडीवाले पुण्याच्या पोलिस इन्सपेक्टरच्या तावडीतून एकदोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा मरता मरता वाचले. शहरात रोज निदर्शनं, मोर्चे, लाठीमार चालू होता. पोलिस वैतागून गेले. 1942च्या चले जावच्या घोषणेने मोठे रणकंदन माजवले होते. अनेक नेते भूमिगत झाले होते. पण त्यांच्या आदेशानुसार विद्यार्थी शाळा-महाविद्यालयातून बाहेर पडले. त्यांच्यावर पोलिसांनी अमानुष पद्धतीने लाठीमार-गोळीबार केला. त्यात 9 ऑगस्टला पुण्यातल्या एस. पी. महाविद्यालयासमोर पुण्याचा मुख्य पोलिस अधिकारी हॅमंडच्या हातून दोन्ही माणसं वाचली. ते दोघे वार्ताहर होते, एक होते स्वत: माडीवाले आणि दुसरे भि. ना. ठाकोर. त्यानंतर 12 ऑगस्टला पुण्यात ब्रेनगेन असलेल्या चिलखती गाडय़ा फिरू लागल्या. दिसेल त्याच्यावर गोळीबार करू लागल्या. अप्पा बळवंत चौकात झालेल्या गोळीबारातून माडीवाले आणि ठाकोर मरता मरता वाचले. 
पुढच्या वर्षी 26 जानेवारीला पुण्यातल्या राजा बहादूर गिरणीला मोठा आग लागली होती. फरासखान्याजवळ माडीवाले उभे होते आणि तिथून दोन आगीचे बंब ठणाणा करत निघाले. त्यावरून कुठेतरी मोठी आग लागली हे माडीवाल्यांनी ताडलं आणि ते त्यांचा पाठलाग करत गिरणीजवळ पोचले. हॅमंडनं सरळ त्यांच्या छातीलाच पिस्तुल लावलं आणि विचारलं, ``तू नेमका या वेळी येथे कसा अलास? गिरणीला आग लागणार हे तुला अगोदर माहीत असलं पाहिजे. खरं सांग ही आग कोणी लावली?'' तेवढय़ात नांदे फौजदार धावत हॅमंडजवळ येऊन म्हणाले, ``सर, ही इज रिपोर्टर.'' तासाभरानं आग विझल्यावर आणि हॅमंडचं डोकं शांत झाल्यावर त्यानं माडीवाल्यांची माफी मागितली. 

ब्रिटिश सरकारने हजारो नेते-कार्यकर्ते यांना तुरुंगात डांबलं होतं. पोलिस अधिकारी त्याविषयीच्या वार्ता चाळून, गाळून देत. त्यातल्या कुणी उपोषण केलं, कुणाला मारहाण झाली याचा सुगावा लागणं शक्य नव्हतं. त्यांची दहा ओळींचा बातमी आली तरी लोकांना हायसं वाटत असे. पण त्या बातम्या मिळणार कशा? वार्ताहरांना येरवडा तुरुंगात प्रवेश नव्हता. मग माडीवाले यांनी एक शक्कल लढवली. तुरुंगातल्या कैद्यांच्या जेवणाचे डबे बाहेरून जात.  आत जाताना त्यांची तपासणी होई पण ते खरकटे डबे बाहेर येताना त्यांची तपासणी होण्याचं कारण नव्हतं. मग माडीवाल्यांनी त्या परतीच्या डब्यांतून आतल्या घडामोडी कार्यकर्त्यांना लिहून पाठवायला सांगितल्या. त्यामुळे वर्तमानपत्रात रोजच्या रोज वार्ता प्रसिद्ध होऊ लागल्या. लोक त्यामुळे खूश होऊ लागले, तर पोलिस हैराण झाले. मात्र त्यांना काही त्या बातम्यांचा तपास लागेना. पण एके दिवस लागला तेव्हा माडीवाल्यांची `डबा-वार्ता सर्व्हिस' बंद झाली. 

अशीच आणखी एक बातमी. महात्मा गांधी पंधरा दिवस पुण्यात असताना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील जान्यामान्या पत्रकारांचा मोठा ताफा त्यांच्याबरोबर होता. एक पत्रकार तर गांधींजींसोबत संपूर्ण भारत फिरलेला होता. पण त्या सर्वांना गुंगारा देऊन माडीवाल्यांनी गांधीजींविषयीच्या ज्या बातम्या त्या काळात दिल्या, त्याने तर या पत्रकारांनीही आश्चर्याने तोंडात बोटं घातली होती. 

देहू रोड बॉम्ब कट, महाराष्ट्र कट, कॅपिटॉल व वेस्टएण्ड बॉम्बस्फोट अशा अनेक स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्त्वाच्या घटनांविषयीच्या बातम्यांचं पितृत्व माडीवाल्यांकडे जाते, त्याविषयी त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. 

पारतंत्र्याच्या काळात वार्ताहरांचं जीवन अगदीच हलाखीचं म्हणावं असं  होतं. समाजात मान नव्हता, राजदरबारी प्रतिष्ठा होती, आर्थिक स्थिती समाधानकारक नव्हती. अधिकारी तिरस्कारानं पाहत, उपेक्षा करत अणि बातम्या तर सर्वच प्रकारच्या मिळवाव्या लागत. बहुधा त्यामुळेच या आव्हानांना तोंड देण्यास माडीवालेंसारखे वार्ताहर सुसज्ज असत. प्राणपणाने काम करत.  माडीवाल्यांनी तर बहादरदार बातमीदारी केली. एवढेच नव्हे तर `मंडई विद्यापीठ' आणि `मनमाड मार्ग' हे दोन नवे शब्दप्रयोगही घडवले. त्यांच्या
हकिकतीही मजेशीर आहेत.

या पुस्तकातल्या सुरुवातीच्या 125 पानांमध्ये माडीवाल्यांनी फक्त स्वातंत्र्यापूर्वीच्या पत्रकारितेविषयी लिहिलं आहे, तर उरलेल्या 102 पानांमध्ये 1947 ते 62 या काळातल्या पत्रकारितेविषयी लिहिलं आहे. 14 ऑगस्ट 1947 या दिवशी संपूर्ण देशाप्रमाणेच पुणे शहरालाही सणाचं रूप आलं होतं. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी (आणि पुढे पुणे शहराला नवा चेहरा देणारे कर्तबगार पालिका आयुक्त) स. गो. बर्वे यांनी राष्ट्रध्वज फडकवला. 
पुण्याची म्युनिसिपालिटी रद्द करण्याचा निर्णय, केसरीचे संपादक तात्यासाहेब केळकर यांचं निधन, महात्मा गांधी यांच्या खुनानंतर पुण्यात उसळलेला आगडोंब, केशवराव जेधे-शंकरराव मोरे यांच्या प्रचारसभांची धुमाळी, शेकापचा दाभाडी प्रबंध, गोवामुक्ती संग्राम अशा अनेक घटनांविषयी माडीवाल्यांनी दिलेली माहिती वेगळी आणि रोचक आहे.

त्यानंतर सुरू होतो तो संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा लढा. त्या काळात पुण्यात काय वातावरण होतं याचं उत्तम चित्र माडीवाल्यांनी उभं केलं आहे. 
12 जुलै 1961 या दिवशी पानशेतच्या रूपाने पुणे शहरावर अवकळा पसरली होती, त्याची बातमीही माडीवाल्यांनीच पहिल्यांदा डेक्कन जिमखान्याच्या इन्स्पेक्टरला दिली. याशिवाय इतर अनेकांना फोन करून सजग करायचे काम केले. त्यावेळचा गोंधळ त्यांनी चांगल्या प्रकारे टिपला आहे. पानशेत फुटीची वार्ता `केसरी'चे संपादक जयंतराव टिळक यांना माडीवाल्यांनी दिली, तेव्हा त्यांनी पुराच्या पाण्याने केसरीवाडय़ाचे काय नुकसान होईल याची पर्वा न करता ताबडतोब नारायण पेठेतल्या नदीकाठच्या अनाथ हिंदू महिलाश्रमात धाव घेतली. स्वत:चा जीव धोक्यात घालून तिथल्या स्त्रिया व मुलींची मोठय़ा संकटातून धैर्यानं सुटका केली. तो प्रसंग टिळकांच्या परंपरागत वारशाची खूण सांगणारा आहेच, पण उदात्त माणुसकीचंही दर्शन घडवणारा आहे. 
 
माडीवाल्यांचं हे पुस्तक 1972 साली केसरी प्रकाशनानं प्रकाशित केलं. डेमी क्राऊन आकारातल्या सोळा + 227 पानांचं पुस्तक आहे. यातली 227 पानं कमालीची वाचनीय आहेत. पहिल्या सोळा पानांतील बारा पानं मात्र वाया घालवली आहेत. अर्थात त्यात लेखकाचीच चूक आहे. कारण त्याला आपण कोणत्या प्रकारचं पुस्तक लिहिलं आहे, याचा नीट अंदाज आला नसावा. म्हणून त्यांनी हे बारा पानी प्रस्तावनेचं ठिगळ त्याला जोडलं असावं. बरे ती प्रस्तावनाही कुणा जाणकार संपादकाची घ्यावी, तर तसंही केलं नाही. पत्रकारितेच्या जगाची फारशी माहिती नाही अशा पण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हटल्या जाणाऱया पु.ल. देशपांडे यांची प्रस्तावना घेतली. पण माडीवाले यांची ही चूक माफ करण्यासारखी आहे. कारण पुस्तक वाचताना सुरुवातीच्या प्रस्तावनेच्या आपल्याला पार विसर पडतो. 

पत्रकारांचं जग अनेकरंगी, बहुढंगी असतं. त्यात जगाचं रोज नवं दर्शन होत असतं. राजकारण्यांच्या जगात वावरताना, त्यांच्या मनातील गुपितं फोडताना, स्वत:च्या बुद्धीचा कस लागेल तर कधी गुन्हेगार जगात महशूर असलेले गुन्हेगारही भेटतील. भोंदूबाबांशी गाठ पडेल तशी सज्जनांशीही ओळख होईल. कलाक्षेत्रातल्या लोकांचं मुखवटे आणि खरे चेहरे एकाच वेळी अनुभवायला मिळतील. त्यामुळे अनेकरंगी, बहुढंगी असलं तरी पत्रकारितेइतकं बेभरवशाचं दुसरं क्षेत्र नाही. या सर्वांतून स्वत:चं स्वत्व काय ठेवणं, ते जपणं ही मोठी अवघड गोष्ट होऊन बसते. मात्र तरीही `हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं' असा अहंकाराचा वास आपल्या वागण्या-बोलण्याला येऊ द्यायचा नसतो. 
स्वत:च्या जबाबदारीची योग्य जाणीव ठेवली तर आणि ती निरपेक्ष बुद्धीने वापरली तर पत्रकारिता ही फार मोठी शक्ती असते. लोकशाहीमध्ये पत्रकारितेला चौथा स्तंभ म्हटलं जातं ते याचसाठी. याचं नितांतसुंदर दर्शन माडीवाल्यांनी या पुस्तकातून घडवलं आहे.

डाव्या आणि उजव्या नाकीपुडीसाठी दोन वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जायला लागण्याचा सध्याचा काळ आहे. हे स्पेशलायझेशन सर्वच क्षेत्रात बेसुमार पद्धतीनं झालं आहे. पत्रकारिताही त्याला अपवाद नाही. सध्या विषयवार बातमीदारांची फलटण प्रत्येक वृत्तपत्राच्या दिमतीला असते. त्यामुळे जीवनाच्या सर्व अंगांना भिडण्याची, ती समजावून घेण्याची संधी हल्लीच्या बातमीदारांना मिळेलच असं नाही, हेही तितकंच खरं आहे. पण म्हणून माडीवाल्यांचं पुस्तक युटोपिया ठरत नाही, हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. हे पुस्तक चांगल्या बातमीदारीचा वस्तुपाठ आहे. म्हणून ते पत्रकारितेच्या सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य पाठय़पुस्तक म्हणून लावावंच, पण प्रत्येक वृत्तपत्रांत बातमीदारी करणाऱया बातमीदारानंही सदोदित जवळ बाळगावं असं आहे... आणि पत्रकारितेबद्दल कुतूहल असणाऱयांनीही हे पुस्तक वाचायलाच हवं. शिवाय ज्यांना 1937-61 या काळात पुणेकेंद्रित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटना-घडामोडी जाणून घ्यायच्या असतील त्यांच्यासाठीही हे पुस्तक महत्त्वाचं आहे. या काळात पुणे-मुंबई ही शहरं राजकारण-समाजकारण-पत्रकारिता-मोर्चे आंदोलनं-चळवळी-सभा-संमेलने असे अनेकविध गोष्टींचे केंद्र होतं, त्याची झलकही या पुस्तकात पाहायला मिळते. मात्र हे पुस्तक सध्या उपलब्ध नाही, ते कुणातरी जाणकार प्रकाशकानं पुनर्मुद्रित करायला हवं.