Monday, June 4, 2012

‘चांगल्या वाचका’चं समृद्ध जग!

काही लोक केवळ वेळ घालवण्यासाठी वा करमणुकीसाठी पुस्तकं वाचत नाहीत. आपल्या जगण्याचा अपरिहार्य भाग म्हणून वाचतात. वाचता यावं असं काम निवडतात किंवा आपल्या दैनंदिन कामातून शक्य तेवढा वेळ काढून वाचत राहतात. अशा लोकांचं वाचन वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण होतं आणि ते वाचक म्हणून प्रगल्भतेच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहचतात. या उलट काही लोक आयुष्यभर वाचत राहतात, पण आपण ‘चांगले वाचक’ वा ‘प्रगल्भ वाचक’ आहोत, असा दावा त्यांना करता येत नाही. 

खरं तर पुस्तकं वाचायची ती आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी, आपण राहतो ते जग समजून घेण्यासाठी, आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, आजूबाजूला जे काही घडतं आहे, त्याचं योग्य आणि सामग्र्यानं आकलन करून घेण्यासाठी. थोडक्यात आपल्या भोवतीच्या जगाचा अन्वयार्थ लावण्यासाठी पुस्तकं वाचायची असतात. पण हे आपल्याकडे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर सांगितलं जात नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तकं वाचायची ती केवळ परीक्षा पास होण्यासाठी आणि इतर पुस्तकं वाचायची ती केवळ करमणुकीसाठी, असा बहुतेकांचा समज होतो. असे लोक जगण्याची रोजची लढाई काही काळ विसरण्यासाठी, आपलं दु:ख विसरण्यासाठी वाचतात. वस्तुत: सर्व संघर्षात-हालअपेष्टांमध्ये आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सद्भिरूचीनं जगावं कसं याची शिकवण पुस्तकांशिवाय जगातला कुठलाही शिक्षक देत नाही. जगण्याशी दोन हात कसे करावेत, आपल्या आधीच्या लोकांनी कसे केले होते, त्यांच्या वेळची परिस्थिती कशी होती, आपल्या वेळची कशी आहे, त्यात साम्य-भेद काय आहेत, त्या घटना-घडामोडींचा अन्वयार्थ कसा लावायचा, जुन्यातलं काय घ्यावं आणि काय घेऊ नये, या तरतमभावाचा आणि तारतम्याचा साक्षेप पुस्तकं आपल्याला देतात. तो ज्यांना कमवता येतो, तो ‘चांगला’ वाचक म्हणावा!

असे चांगले वाचक कालांतरानं आपल्या वाचनाविषयी-पुस्तकप्रेमाविषयी लिहितात. त्या पुस्तकांना इंग्रजीमध्ये ‘बुक ऑन बुक्स’ असं म्हणतात. पण अशा पुस्तक लेखनासाठी काही पूर्वअटी असतात. एक म्हणजे पुस्तकांवर तुमचं मनस्वी प्रेम असावं लागतं. नाहीतर तुमचं लेखन हे पुस्तक परीक्षणांच्या धर्तीचं होतं. ‘बुक ऑन बुक्स’मध्ये पुस्तकाचं समीक्षण नव्हे तर रसग्रहण अपेक्षित असतं. त्यात तुमचा स्वानुभव, पुस्तक, त्याचा विषय, त्यातली तुमची गुंतागुंत, त्या पुस्तकावरून आठवणारे इतर तपशील-किस्से-आठवणी, त्या पुस्तकांविषयी इतरांनी व्यक्त केलेले अभिप्राय, ते ताडून पाहिल्यावर तुमची होणारी प्रतिक्रिया, अशा गोष्टी येतात. पुस्तकाशी पूर्णपणे समरस झाल्यावर ते वाचण्यापूर्वीचे तुम्ही आणि नंतरचे तुम्ही यात फरक पडायलाच हवा. पुस्तक वाचून झाल्यावरही त्याचे साद-पडसाद काही दिवस मनामध्ये उमटायला हवेत. ऑफिसात असताना, जेवताना वा बेडरूममध्ये लोळत पडलेलो असताना त्यातले प्रसंग आठवून हसायला यायला हवं. 

या पूर्वअटींना उतरणा-या वीणा वेणुगोपाल या पत्रकार-लेखिकेचं ‘वुड यू लाइक सम ब्रेड विथ दॅट बुक? अँड अदर इन्स्टन्सेस ऑफ लिटररी लव्ह’ या लांबलचक नावाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. नाव मोठं असलं तरी पुस्तक मात्र (डेमी आकार) अवघं 114 पानांचंच आहे. त्यात वाचनाविषयीचे-पुस्तकप्रेमाविषयीचे एकंदर चौदा लेख आहेत. ‘कमिंग होम’ आणि ‘लॉसिंग माय कॅरेक्टर’ या पहिल्या दोन लेखांत वेणुगोपाल बालपणापासूनचा आपला पुस्तकांशी आलेला संबंध आणि त्यांचा पडलेला प्रभाव सांगतात. पौगंडावस्थेतल्या एका मुलीची लैंगिक विषयावरील पुस्तकं वाचून काय अवस्था (!) होते, याचं मनमोकळं वर्णन ‘लॉसिंग माय कॅरेक्टर’ या लेखात आहे.
 
वीणा वेणुगोपाल या ‘आउटलुक बिझनेस’मध्ये साहाय्यक संपादक आहेत. पुस्तकं, प्रवास, कला, संस्कृती हे विषय असणा-या ‘बझ’ विभागाचं संपादन त्या करतात. सध्या त्या दिल्लीत राहत असल्या तरी पूर्वी  मुंबईत राहत. तेव्हा त्यांचं ऑफिस फोर्ट भागात होतं. पुस्तकप्रेमामुळे रोज संध्याकाळी या भागातल्या सेंकडहँड पुस्तकं विकणा-या विक्रेत्यांकडे चक्कर मारत. त्यात त्यांना अनेक गमतीशीर अनुभव आले. त्याचं वर्णन त्यांनी ‘पेपर व्हर्सेस पिक्झेल’ या तिस-या लेखात केलं आहे. एकदा त्यांनी मित्र निखिलसह 100 रुपयाला एक या प्रमाणे चौदा पुस्तकं विकत घेतली. त्यातल्या ‘अ हाऊस ऑफ मि. बिश्वास’ या पुस्तकावर Jahangir Mehta, September 12, 1980, A fox in search of a wolf असं लिहिलेलं असतं. या मेहतांचीच ती पुस्तकं असतात. त्यात वेणुगोपाल यांना बोर्डिग कार्डस, विमान तिकिटं, व्हिजिटिंग कार्डस, मेडिकल बिल्स अशा अनेक वस्तू सापडतात. काही पुस्तकांमध्ये काय काय लिहून ठेवलेलं असतं! निखिलकडच्या पुस्तकांमध्येही अशाच काही वस्तू सापडतात. त्यावरून हा जहांगीर मेहता कोण असावा, काय व्यवसाय करत असावा, याविषयी कॅफे माँदेगारमध्ये जोरदार गप्पा होतात. निखिलच्या एका पुस्तकात मेहतांचं एक शेअर सर्टिफिकेट मिळतं. त्यात  ACCचे 2000 शेअर त्यांनी घेतलेले असतात. निखिल आणि वेणुगोपाल ते त्यांना परत करायचे ठरवतात. मेहतांचा पत्ता शोधून काढतात. एके दिवशी दोघं काळबादेवीतल्या त्यांच्या घरी जातात. तेव्हा मेहतासाहेब त्यांची चांगलीच हजेरी घेतात. त्यांची Leeching Man, Parasites  अशा शब्दांत संभावना करतात. 

‘माय थ्री रुल्स फॉर रीडिंग इन अ बॉम्बे ट्रेन’ हा लेख लोकलमधल्या वाचनाची गंमत सांगतो. वेणुगोपाल म्हणतात, यातले दोन नियम हे अंतर्ज्ञानी आणि मूर्खपणाचे आहेत, तर एक स्वानुभवातून शिकलेला धडा आहे. त्यांचा पहिला नियम आहे, दर सोमवारी नव्या पुस्तकापासून वाचायला सुरुवात करावी. दुसरा नियम, कुठलंही मजेदार पुस्तक ट्रेनमध्ये वाचायचं नाही. आणि तिसरा नियम, पुस्तकांना तपकिरी रंगाचं कव्हर घालायचं. या तिन्ही नियमांची कारणमीमांसा वेणुगोपाल यांनी दिली आहे. हा लेख महिलांच्या डब्ब्यातून प्रवास करणाच्या वेणुगोपाल यांच्या स्वानुभवावर आधारित आहे. पण हे नियम पुरुषांच्या डब्ब्यातून प्रवास करणा-या स्त्रियांना लागू आहेत का किंवा पुरुषांच्या डब्ब्यातून प्रवास करणा-या पुरुषांनाही लागू पडू शकतात का, याविषयी त्यांनी काहीही म्हटलेलं नाही. मात्र हे नियम समजावून घेणं - ज्यांना ट्रेनमध्ये वाचन करायचं आहे - मुंबईकरांसाठी गरजेचं आहे.
 
असेच केवळ स्त्रियांनी वाचावेत असे आणखी दोन लेख या पुस्तकात आहेत. ‘व्हॉट नॉट टु रीड व्हेन यू आर प्रेग्नंट’ आणि ‘वुड यू लाइक सम ब्रेड विथ दॅट बुक’ हे ते लेख. पहिल्या लेखात वेणुगोपाल स्वत: गर्भवती असताना गर्भधारणेच्या काळाविषयीचं एक पुस्तक वाचत असतात. त्या पुस्तकातल्या टिप्स आणि वेणुगोपाल यांचं रोजचं जगणं, याविषयीचा हा लेख आहे. ‘वुड यू लाइक सम ब्रेड विथ दॅट बुक’ या लेखात वेणुगोपाल यांनी आपलं पाकनैपुण्य कोणकोणत्या पुस्तकांवर बेतलेलं आहे, याची रुचकर रेसिपी सांगितली आहे! 
 
खुद्द सुकेतू मेहतालाच त्याचं मुंबईवरील पुस्तक विकत घेऊन वाचण्यासारखं नाही, असं वेणुगोपाल सांगतात. तेही ते वाचण्याआधीच. तेव्हा मेहता त्यांना तुम्ही वाचून तर पहा, कारण मीच या पुस्तकाचा लेखक आहे, असं सांगतो. त्यावर वेणुगोपाल शरमिंद्या होऊन त्याला कॉफी प्यायला घेऊन जातात. हा सुखसंवाद घडतो ‘स्ट्रँड’मध्ये. ‘द जॉय ऑफ रीडिंग’ या लेखात आपल्या लेकीला पुस्तकं वाचून दाखवतानाचा अनुभव, तर ‘द अल्युअर ऑफ अरेबिया’ हा लेख अरेबियामधील स्त्रियांचं जगणं उलगडणा-या पुस्तकांविषयी आहे.
 
या छोट्याशा पुस्तकात वेणुगोपाल यांनी बालपण, नोकरी, लग्न, मूल, प्रवास, करिअर, संसार अशा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पुस्तकांनी केलेली सोबत, त्यांचा लाभलेला सहवास यांच्याविषयी ममत्वानं लिहिलं आहे. पत्रकारितेत असल्यानं वेणुगोपाल यांची शैली साधी-सोपी-सरळ आहे. ‘नमनाला घडाभर तेल’ घालवायचा उपद्व्याप त्यांना रुचणारा नसल्यानं सारे लेख आटोपशीर आणि नेमके आहेत. जगात दोन प्रकारची माणसं असतात, असं वेणुगोपाल यांना वाटतं. एक, जे एव्हरेस्टवर जाण्यासाठी एक आठवडा बेस कॅम्पवर ट्रेनिंग घेतात, खाऊन घेतात. दुसरे, जे रात्री शांतपणे झोपू शकत नाहीत. हे पुस्तक या दुस-या प्रकारच्या लोकांसाठी आहे, असं त्या सांगतात. कारण जगण्याच्या समस्येवरची काही गुपितं त्यांनी यात सांगितली आहेत. अन् ती कुठलाही आव न आणता, कुठलंही ठाम विधान न करता. शहाण्या माणसानं पुस्तकांच्या सोबतीनं जगायचं असतं! वेणुगोपाल यांनी आत्तापर्यंत तसं केलं आणि ते आता या पुस्तकातून इतरांशी शेअरही केलं आहे.  

वुड यू लाइक सम ब्रेड विथ दॅट बुक? अँड अदर इन्स्टन्सेस ऑफ लिटररी लव्ह : वीणा वेणुगोपाल
योडा प्रेस, नवी दिल्ली
पाने : 114, किंमत : 195 रुपये

2 comments:

  1. आवडली पोस्ट. भेजाफ्राय ऐवजी भेजाखुराक असे नाव तुम्ही द्यायला पाहिजे.
    वाचकांना प्रतिसादावर लेखकाचाही प्रतिसाद वाचायला आवडतो.:))

    ReplyDelete
  2. तुमच्या अभिप्रायाबद्दल आभार.
    लेखकाच्या प्रतिसादाबद्दलची तुमची तक्रार मला मान्य आहे. त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. कारण एकदा पोस्ट वाचल्यावर आणि त्यावर अभिप्राय दिल्यावर वाचक परत त्या पोस्टला भेट देतो का? मग त्याला आपण दिलेला प्रतिसाद कसा कळेल, असा सामान्य प्रश्न मला नेहमी पडतो. त्यामुळे मी तसा प्रयत्न केला नाही, पण या पुढे नक्की करेन.

    ReplyDelete