Sunday, September 16, 2012

महाराष्ट्रासाठी मराठ्यांनी निकोप राहणे गरजेचे : डॉ. मोरे

दैनिक एकमत, ११ सप्टेंबर २०१२ 
 महाराष्ट्र निकोप राहण्यासाठी मराठ्यांनी निकोप राहणे गरजेचे आहे असे मत जेष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले. गणेश वाचनालय व जनशक्ती वाचक चळवळ आयोजीत बी. रघुनाथ महोत्सवात एक पुस्तक एक दिवस या अंतर्गत राम जगताप, सुशील धसकटे यांनी संपादीत केलेल्या मराठा समाज वास्तव आणि अपेक्षा या ग्रंथावर परिचर्चा आयोजीत करण्यात आली होती.
 या परिचर्चेत स्वतः दोन्ही संपादक तसेच या पुस्तकाला ज्यांची प्रस्तावना लाभली आहे असे डॉ. सदानंद मोरे सहभागी झाले होते. पुढे बोलतांना डॉ. मोरे म्हणाले की या लेखातील बहुतेक लेख मराठा समाजातील लेखकांनी लिहलेले आहेत व ते चांगले आहेत. मराठ्यांनी लिहलेल्या लेखातही आत्मसमर्थनाचा सुर आहे. एकतर वास्तवाचे दर्शन आणि स्विकार किंवा आत्मटिका असे स्वरुप लेखांचे आहे. मराठ्यांमधील दोषाचे उदात्तीकरण करतांना कोणी दिसत नाही. हे लेख भांडारकर संस्था प्रकरणाच्या आधीचे आहेत. त्यामुळे पुर्वीचे अनेक संदर्भ आज बदलले आहेत. या प्रकरणानंतर मराठ्यांच्या संघटना आक्रमक झाल्या. मराठ्यांना दोषासगट स्विकारण्याची भाषा बोलु लागल्या. याचाच एक परिणाम म्हणजे मराठ्यांबद्दल चर्चा करण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे ते म्हणाले. सुरुवातीला लेखक सुशील धसकटे यांनी सांगितले की प्रस्तुत लेख संग्रहाची कल्पना आम्हाला सुचली ती सत्याग्रही जीवनधाराच्या मराठा विशेषंकावरुन विविध लेखांच्या माध्यमातुन छोट्या ग्रंथातुन वेळोवेळी मराठा समाजा विषयी लिखान झाले. काही वेळा तेवढ्या पुरती चर्चाही झाली. पण बहुतेक वेळा ती तेवढ्या पुरतीच राहिली. ती तशीच नियतकालीकांच्या पानाआडपडु न देता अधिकाधिक लोकांपर्यंत विशेषतः तरुण पिढी पर्यंत जावी म्हणुन त्यातील काही निवडक लेख या लेख संग्रहात उपलब्ध करुन दिले आहेत. राम जगताप म्हणाले की मराठा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज मानला जातो. मराठा तरुणांनी आत्मपरिक्षणाला सिध्द व्हावे हाच आमचा एकमात्र उद्देश हा पुस्तक निर्मितीमागे आहे असे ते म्हणाले कार्यक्रमास नागरीक उपस्थित होते.

Friday, September 7, 2012

समर्पक आणि समर्थ पर्यायी शब्दांसाठी...


अलीकडच्या काळात मराठीमध्ये कोशवाडमयाची परंपरा चांगलीच रोडावली आहे. कोश तयार करणं हे तसं प्रचंड वेळखाऊ आणि कष्टाचं काम असतं. शिवाय त्यासाठी मोठया आर्थिक साहाय्याची गरज असते. शिवाय इतक्या खस्ता खाऊन तयार केलेल्या कोशांना वाचकांचा म्हणावा तसा प्रतिसादही मिळत नाही. अशा अनेक कारणांमुळे कोशवाड्मयाची निर्मिती रोडावली, असे विश्लेषण काही लोक करतात. त्यात थोडेफार तथ्य आहे. पण थोडेफार म्हणावे इतकेच. कारण एकेकाळी मराठीमध्ये कोशवाड्मयाची समृद्ध आणि विपुल म्हणावी अशी परंपरा होती. अठराव्या-एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आजच्या तुलनेने सोयी-सुविधा फारशा नव्हत्या. आर्थिक साहाय्याचीही बोंब होती. पण केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेतून कितीतरी प्रकारच्या वैविध्यपूर्ण कोशांची निर्मिती झालेली दिसते. म्हणजे कोशनिर्मितीसाठी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षाच प्रबळ ठरते. हल्ली तिलाच काहीशी ओहोटी लागल्याने कोशवाङ्मयाचे दुर्भिक्ष्य जाणवते आहे. तरीही काही लोक निष्ठेने कोश तयार करत आहेतच. वि. शं. ठकार हे त्यापैकीच एक. नुकताच त्यांनी ‘इंग्रजी-मराठी पर्यायकोश’ तयार केला आहे.



या पर्यायकोशाची काही वैशिष्टय़ं आहेत. एक, हा मराठीतला अशा प्रकारचा पहिलाच कोश आहे. दोन, प्रत्येक इंग्रजी शब्दाला पाचपाच-सहासहा मराठी पर्यायी शब्द दिलेले आहेत. त्यामुळे त्यातून आपल्याला हव्या त्या योग्य शब्दाची निवड करणं सोप होतं. तीन, या कोशाची निर्मिती चांगली आहे. मजबुत पुठ्ठाबांधणी असूनही त्याची किंमत तुलनेनं स्वस्त म्हणावी अशी आहे. एक महत्त्वाचा फरक सुरुवातीलाच समजावून घेतला पाहिजे. हा ‘इंग्रजी-मराठी’ थिसॉरस आहे, पर्यायकोश आहे. ही इंग्रजी-मराठी डिक्शनरी नाही. डिक्शनरीमध्ये इंग्रजी शब्दांचा सरळ मराठी अर्थ दिलेला असतो. तो मूळ शब्दाच्या अर्थाच्या जवळ जाणारा असतो. थिसॉरस वा पर्यायकोश डिक्शनरीच्या पुढचा टप्पा असतो. यात मूळ शब्दाच्या विविध अर्थछटा लक्षात घेऊन त्याला एकापेक्षा जास्त पर्यायी शब्द सुचवलेले असतात. त्यामुळे मूळ शब्द त्या वाक्यामध्ये नेमका कोणत्या संदर्भाने वापरलेला आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी योग्य मराठी पर्याय शोधणे सोपे होते.

त्यामुळे हा कोश विशेषत: इंग्रजीतून मराठीमध्ये अनुवाद/भाषांतर करणा-या व्यावसायिक अनुवादकांसाठी, पत्रकारांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयोगी आहे. कुठल्याही भाषेतील शब्दांना त्या त्या भाषेतील सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक, राजकीय यांच्या संदर्भाबरोबरच प्रादेशिकतेचे आणि रीतीरिवाजांचेही कोंदण असते. शब्दांतून व्यक्त होण्याची प्रत्येक भाषेची एक विशिष्ट लकब असते, लहजा असतो. तो इतर भाषेत जसाच्या तसा अनुवादित करताना अनेकदा अडचणी येतात. कारण त्या भाषेत मूळ भाषेतल्या अर्थछटेसह त्या शब्दातली भावना व्यक्त होईल यासाठी तितका समर्पक आणि समर्थ शब्द असतोच असे नाही. ब-याचदा नसतोच. अशा वेळी त्या शब्दाच्या जवळ जाईल, असा पर्यायी शब्द योजावा लागतो. पण असा पर्यायी शब्द ऐनवेळी कसा सुचणार वा आठवणार? अनुवादकांना/भाषांतरकारांना अशा अडचणींना नेहमीच सामोरं जावं लागतं.

वाक्प्रचार-म्हणी यांचा अनुवाद करणं तर आणखीनच कठीण होतं. कारण या वाक्प्रचार-म्हणींना ब-याचदा मूळ भाषेतल्या सांस्कृतिकतेतून काही अर्थ चिटकलेले असतात. ते समजावून घेतल्याशिवाय त्यांचा अर्थासह अनुवाद करणं शक्य होत नाही. शिवाय इंग्रजी म्हणींचा अनुवाद करणं तर फार मुष्किलीचं काम होऊन बसतं. कवितेतील प्रतिमा आणि वाक्प्रचार-म्हणी ही अनुवादातील मोठी अडचण असते. ते लक्षात घेऊन ठकार यांनी इंग्रजी शब्दांसाठी मराठी वाक्प्रचार आणि म्हणीही सुचवल्या आहेत.

पुस्तकांचे अनुवाद करणा-यांकडे पुरेसा वेळ असतो, पण वर्तमानपत्रं वा वृत्तसंस्थांमध्ये काम करणा-या व्यक्तींना मात्र कमीत कमी वेळेत शक्य तेवढा निर्दोष अनुवाद करायचा असतो. अशा वेळी संबंधित अनुवादकाचं दोन्ही भाषांवर चांगलं प्रभुत्व असावं लागतं. शब्दसंग्रहही भरपूर असावा लागतो. पण तरीही योग्य वेळी योग्य शब्द सुचणे, हे तसं कसब आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी हाताशी एखादा चांगला पर्यायी शब्दकोश असणं उत्तम असतं. प्रस्तुत कोश त्यासाठी उत्तम पर्याय आहे. हल्ली मराठीमध्ये ब-याचदा भयानक वाक्यं आणि निर्थक शब्दांचा वापर केला जातो. त्याचं कारण योग्य शब्दांविषयीचं अज्ञान हेच असतं. म्हणायचं असतं एक, प्रत्यक्षात लिहिलं जातं दुसरंच, हा विनोद तर वर्तमानपत्रांमध्ये नेहमीच पाहायला मिळतो. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात अतिशय गैरलागू, धेडगुजरी शब्दांचा वापर केला जातो. म्हणून पत्रकारांनाही हा कोश हाताशी ठेवल्यास फायदा होऊ शकतो.

आणखी एक. कोश कसा वापरायचा हेही कौशल्याचं काम असतं. तो नियमित सरावाचा भाग असतो. सतत कोश वापरण्याची सवय लावून घेतल्याशिवाय कोशाच्या सामर्थ्यांचा नीट उलगडा होऊ शकत नाही. कोशातून आपल्याला हवी ती माहिती, शब्द अचूकपणे पटकन शोधून काढणे हा सरावाचा भाग असतो. एकदा का तो झाला की, मग कोश पाहण्याची गोडी लागते. तशी ती लागल्यावर कोशाच्या सामर्थ्यांचा सतत पुनप्रत्यय येतो. हा पर्यायकोश सतत जवळ बाळगळ्यास आणि वेळ मिळेल तसा अधूनमधून चाळल्यास आपल्या शब्दसंख्येत मोलाची भर पडू शकते. मराठी-इंग्रजी भाषांच्या अभ्यासक-प्राध्यापकांना, साहित्यिकांना, अनुवादकांना, पत्रकारांना आणि विद्यार्थ्यांना या कोशामुळे चांगलाच फायदा होईल. त्यांच्या इंग्रजी-मराठी या दोन्ही भाषा समृद्ध होण्यास हातभार लागेल. मराठी भाषाही चांगली समृद्ध असून एका शब्दाला किती विविध पर्यायी शब्द आहेत, याचा अंदाज या छोटेखानी कोशातून येईल. ‘हि-याला पैलू पाडणं’ हे कसब असतं. हि-यासारखे शब्दांनाही अनेक पैलू असतात. शब्दांचे हे विविध पैलू लक्षात घेऊन त्यांचा योग्य वेळी योग्य जागी वापर करणं, हेही कसबी कामच असतं. ते कसब शिकवण्याचं काम हा पर्यायकोश काही प्रमाणात नक्कीच करू शकतो.


इंग्रजी-मराठी पर्यायकोश : संकलक-संपादक : वि. शं. ठकार

नितीन प्रकाशन, पुणे

पाने : 328, किंमत : 200 रुपये

Monday, August 27, 2012

शहाणा वाचक आणि पुस्तकं

दुपारी एकपर्यंतचा वेळ टंगळमंगळ करण्यात गेला. नंतर सुशील आला. मग दोघं अविनाश काळे यांच्याकडे गेलो. रात्री नऊला त्यांच्याकडून परतलो. दुपारी सुशीलसोबत काम करताना एक गंमत सुचली. सुशीलच्या कायम बॅगेत असलेलं पुस्तक म्हणजे प्रा. यास्मीन शेख यांचं ‘मराठी शुद्धलेखन मार्गदर्शिका’ आणि माझ्या बॅगेत अरुण फडके यांचे ‘शुद्धलेखन तुमच्या खिशात’ व ‘मराठी लेखन कोश’. सुशीलने त्याच्या पुस्तकावर ‘माझं बायबल’ असं लिहिलं आहे. ते वाचून मी माझ्या दोन्ही पुस्तकांवर ‘माझं कुराण’ असं लिहिलं.
..................................................
काल रात्री साडेनऊच्या सुमारास सुनीता देशपांडे यांचं ‘प्रिय जी. ए.’ हे पुस्तक वाचायला घेतलं. मौजेने आतापर्यंत जीएंच्या पत्रांचे चार खंड काढले आहेत. त्यातल्या पहिल्या खंडात त्यांनी फक्त सुनीताबाईंना लिहिलेली पत्रं आहेत, तर इतर तीन खंडांत म. द. हातकणंगलेकर, जयवंत दळवी, माधव आचवल, अशा लेखकांना लिहिलेली पत्रं आहेत. ‘प्रिय जी. ए.’मध्ये सुनीताईंना लिहिलेली एकंदर 47 पत्रं आहेत. जी. एं.च्या पत्रांचे चारही खंड चाळताना ते पटकन विकत घ्यावे आणि निवांत वाचावे, अशी काही इच्छा झाली नाही. पण सुनीताबाईंचं हे पुस्तक चाळताना मात्र ते विकत घ्यावं, असं तीव्रतेनं वाटलं. किंबहुना हे जी. एं.च्या पत्रांपेक्षा सरसच वाटलं. म्हणून ते परवा मुद्दाम विकत घेतलं. काल रात्री इतर कुठलं काम करायचा कंटाळा आल्याने वाचायला घेतलं. अगदी दोन वाजेपर्यंत 155 पानं वाचून काढली. पुस्तक एकंदर 184 पानांचं आहे. पण पुस्तक काही विशेष आवडलं नाही. किंबहुना जवळवळ नाहीच. उगाच विकत घेतलं, असं वाटलं. एखाद्या ग्रंथालयातून मिळवून वाचलं असतं तरी चाललं असतं. सुनीताबाईंनी तशी कुठल्याच विषयांवर फार गंभीर चर्चा केलेली नाही. अमूक पुस्तक मी वाचलं, तुम्ही वाचलं का; मला आवडलं, तुम्हालाही आवडेल; अमूक पुस्तक तुम्हाला पाठवू का, अशी अगदीच प्राथमिक स्वरूपाची चर्चा आहे. बाकी नुसत्याच अळमटळम गप्पा. चकाट्या म्हणाव्यात अशा. 

हे पुस्तक चाळताना त्यातले पुस्तकांवरचे एक-दोन अभिप्राय वाचून सुनीताबाईंची वाचक म्हणून प्रगल्भता चांगली वाटली, म्हणून पुस्तक तत्परतेनं विकत घेतलं. वर वाचायचे कष्टही घेतले. पण निराशा झाली. मग ते ठेवून ज्यॉ पॉल सात्र्चं ‘वर्ड’ हे आत्मचरित्र वाचायला घेतलं. त्यातील ‘रीडिंग’ या पहिल्या प्रकरणातील 20-30 पानं वाचली. नंतर ‘उत्तम पुस्तक वाचताना लेखकाबरोबरचे मतभेद शोधले पाहिजेत’ हा विश्वास पाटील यांचा ‘ललित’च्या 2000सालच्या दिवाळी अंकातील लेख वाचायला घेतला. पाटील यांनी अतिशय चांगला लेख लिहिला आहे. पण तो पहिल्या चार पानांतच संपवायला हवा होता. नंतरचा मजकूरही सुरेख आहे खरा, पण तो आधीच्या मजकुराशी विसंगत वाटतो. कारण नंतर वाचनसंस्कृतीवरील चर्चा एकदम धर्माच्या प्रश्नाकडे वळते. पाटील लिहितात, ‘‘थोडक्यात बरेच काही सांगता येते. तो कौशल्याचा आणि तुमच्या भाषाप्रभुत्वाचा भाग असतो. पण मराठीतल्या साहित्य शारदेच्या वारसदारांना आणि मराठी प्राध्यापकांना हे किमान कौशल्य अवगत करता येत नाही, याचे पुरावे त्यांच्या लेखनातून, भाषणांतून, बोलण्यातून मिळत राहतात.’’ याच लेखात पाटील यांनी ‘क्रिटिक ऑफ रिलिजन अँड फिलॉसफी’ या पुस्तकाचा आणि त्याचा लेखक वॉल्टर कॉफमान याचा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. कॉफमान लिहितो, ‘‘एका परिच्छेदात सांगून होईल ते सांगण्यासाठी पानंच्या पानं व पाच-दहा पानांत सांगून होईल त्याच्यासाठी पुस्तकच्या पुस्तक खर्ची घालणा-या लेखकांपासून शहाण्या वाचकानं दूर राहावं.’’
..................................................
आज रविवार असल्याने दिवसभर सुट्टी होती. त्यामुळे एका ग्रंथप्रेमी मित्राचा ग्रंथसंग्रह पाहायला त्याच्या घरी जायचं होतं. निघायला थोडासा वेळ होता म्हणून प्रा. रा. ग. जाधव यांचा एक चरित्र-वाङ्मयाविषयीचा लेख वाचायला घेतला. त्यात त्यांनी एके ठिकाणी व्हॉल्टेअरचं एक चिंतनीय वचन उद्धृत केलं आहे. ते असं - We owe consideration to the living; to the dead we owe truth only.  म्हणजे, जे जे गतकालीन आहे, गतार्थ आहे, केवळ इतिहास, परंपरा किंवा स्मृती यांच्या रूपानेच अवशिष्ट आहे; त्या त्या सर्वाबद्दल सत्य जाणून घेणं हीच आपली जबाबदारी आहे. उलट जे जे विद्यमान आहे, जिवंत व जगत आहे, वर्तमानकालीन आहे, त्याबाबत सत्यापेक्षा तारतम्यविवेक बाळगणं, ही आपली जबाबदारी आहे.’ श्रेष्ठ लेखक एका वाक्यात किती मोठा आशय आणि किती महत्त्वाचं सांगून जातो नाही? वॉल्टर कॉफमान म्हणतो ते खरंच आहे.

Tuesday, August 21, 2012

बंडखोर लेखिकेची पन्नाशी!

आपल्या लेखनाची सर्वाधिक किंमत चुकती करावी लागणं, त्यासाठी आपलं आयुष्यच पणाला लावावं लागणं, हे कुठल्याही काळात लेखकासाठी वेदनादायकच असतं. त्यातही धार्मिक कट्टरतावाद्यांविरुद्धचा लढा तर खूपच बिकट असतो. पण तो प्राणपणाने लढत जगातल्या असंख्य मुस्लीम आणि इतर स्त्रियांना आपल्यावर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरुद्ध बोलण्याची-लढण्याची प्रेरणा देणा-यांमध्ये तस्लिमा नासरीन यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागतो. त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा लेख......
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तस्लिमा नासरीन येत्या 25 ऑगस्टला वयाची पन्नाशी पूर्ण करत आहेत. पन्नाशी हा व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो, म्हणून त्यांच्या आजवरच्या लेखकीय कारकीर्दीचा आढावा घेणं सयुक्तिक ठरतं. 
“(Most of the) Publishers are afraid to publish her books. Book sellers are afraid to sell her books. Supporters afraid to support her publicly. Secularists are afraid to defend her when she is attacked by the religious fundamentalists.”
असं तस्लिमाच्या अधिकृत वेबसाइटवर एके ठिकाणी नमूद केलेलं आहे. 
तस्लिमाची आजवर 35 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांचं विषयवार वर्गीकरण केलं तर काय दिसतं? 1986 ते 2008 या काळात 13 कवितासंग्रह, 1990 ते 2007 या काळात 5 निबंधसंग्रह, 1991 ते 2009 या काळात 8 कादंब-या, 1994 ते 2007 या काळात 2 लघुकथासंग्रह आणि 1999 ते 2012 या काळात 7 आत्मचरित्रविषयक पुस्तकं अशी तस्लिमाची एकंदर ग्रंथसंपदा आहे. वयाच्या तेराव्या वर्षी तस्लिमानी लिहायला सुरुवात केली. वयाच्या 24 व्या वर्षी (1986 साली) त्यांचा ‘शिकोरे बिपुल खुधा’ (Hunger in the Roots) हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. 1990 पर्यंत आणखी दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले. 1990 मध्ये तस्लिमाच्या पहिल्या निबंधसंग्रहाचं प्रकाशन झालं. 1992 साली पहिली कादंबरी प्रकाशित झाली, तर 1999 साली पहिलं आत्मचरित्रविषयक पुस्तक प्रकाशित झालं. म्हणजे 2008 नंतर तस्लिमा पूर्णपणे कादंब-या आणि आत्मचरित्रविषयक लेखनाकडे वळल्या आहेत. 

तस्लिमाच्या ‘लज्जा’, ‘उतल हवा’, ‘नष्ट मेयेर-नष्ट गद्य’, ‘फरासी प्रेमिक’, ‘आमार मेयेबला’ या पुस्तकांचे आजवर मराठी अनुवाद झालेले आहेत. मराठीमध्ये या अनुवादित पुस्तकांवर कुठलेही वाद झालेले नाहीत, हे विशेष. या पुस्तकांचा खपही चांगला झालेला आहे. तस्लिमाच्या ‘फेरा’ या कादंबरीचा ‘फिट्टमफाट’ या नावानं अशोक शहाणे यांनी अनुवाद केला असून तो मुंबईतील ‘अक्षर प्रकाशन’च्या वतीने प्रकाशित झालेला आहे. बाकी सर्व पुस्तकांचे अनुवाद पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केले आहेत. त्यामुळे मराठी वाचकांनाही त्यांची जवळून ओळख आहे. 

19990 पासूनच बांगलादेशातील मुस्लीम कट्टरतावाद्यांनी तस्लिमा यांच्या विरोधात मोहीम सुरू केली होती. 1993 पासून 2004 पर्यंत तस्लिमा यांच्या एकंदर पाच पुस्तकांवर बंदी घालण्यात आली. ‘लज्जा’, ‘आमार मेयेबला’, ‘उतल हवा’, ‘को’, ‘सेई सोब ओन्ढोकार’ ही ती पाच पुस्तकं. तर ‘द्विखंडितो’ या पुस्तकावर प. बंगाल सरकारने 2003 साली बंदी घातली. मात्र सप्टेंबर 2005 मध्ये प. बंगालच्या उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतभर मोठय़ा प्रमाणावर दंगली, जाळपोळ आणि हिंसाचार झाला. याचीच प्रतिक्रिया म्हणून बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर तस्लिमा यांच्या ‘लज्जा’ या कादंबरीवर बंदी घालण्यात आली होती. 

1994 साली तस्लिमा यांना बांगलादेश सोडावा लागला. त्यानंतर त्या 10 वर्षे पाश्चात्य देशांमध्ये राहात होत्या. 2004 साली त्या कोलकात्यात परत आल्या. तिथे 2007 पर्यंत म्हणजे तीन वर्ष राहिल्या. 2008 मध्ये त्या स्वीडनला रवाना झाल्या. 2007मध्ये काही काळ दिल्लीमध्ये त्या राहत्या घरी स्थानबद्ध होत्या. तस्लिमा यांनी 2005  साली आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळावं, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांना केली होती. शिवराज पाटील तेव्हा गृहमंत्री होते. पण भारतातील प्रादेशिक विविधता आणि मुस्लीम समाजाची लक्षणीय संख्या विचारता घेता ताणतणाव निर्माण होण्याच्या खबरदारीतून त्यावर गृहमंत्र्यांनी काही निर्णय दिला नाही. 

पाकिस्तान आणि बांगलादेश हे मुस्लीमबहुल लोकसंख्या असलेले देश आहेत. तेथील धार्मिक कट्टरता आणि त्याच्या दुष्परिणामांच्या बातम्या सतत अधूनमधून येत असतात. मात्र अशा बातम्या भारतामध्ये क्वचित म्हणाव्या अशा संख्येने घडतात. भारतात मुस्लिमांची संख्या तशी लक्षणीय आहे. तरीही भारतीय मुसलमान हा सर्वसामान्यत: सहिष्णू मानला जाई. त्याला बाबरी मशिदीच्या पतनानंतर ब-याच प्रमाणात तडे गेले. गेल्या वर्षी जयपूरच्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सलमान रश्दी यांच्या उपस्थितीवरून वाद निर्माण होऊन त्यांना भारतातच येऊ न देण्याचा पण काही मुस्लीम संघटनांनी केला. असाच प्रकार तस्लिमा यांच्याबाबतीत प. बंगालमध्येही झाला होता. त्यांच्या ‘द्विखंडितो’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी नासरीन यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. 

सलमान रश्दी आणि तस्लिमा यांची नेहमी तुलना केली जाते, परंतु त्यांच्या लेखनामध्ये एक मूलभूत म्हणावा असा फरक आहे. रश्दींचं संपूर्ण लेखन हे इंग्रजीमध्ये आहे तर तस्लिमा या आपलं लेखन मुख्यत: बंगालीमध्ये म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये करतात. त्यानंतर त्याचे इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये अनुवाद होतात. रश्दी यांच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या 1988 साली प्रकाशित झालेल्या कादंबरीमुळे 14 फेब्रुवारी 1989 रोजी इराणचे धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी यांनी रश्दी यांना ठार मारण्याचा फतवा काढला. त्यानंतर बराच काळ रश्दी यांना भूमिगत राहून काळ काढावा लागला. या उलट तस्लिमा यांना त्यांच्या पुस्तकांमुळे बांगलादेश सोडावा लागला. त्यांच्यावर भारतात काही ठिकाणी हल्ले झाले. त्यांच्या पुस्तकांवर बंदी आली. पण त्यांना रश्दींसारखं फार काळ भूमिगत राहावं लागलं नाही. मुस्लीम कट्टरतावाद्यांनी तस्लिमाची हत्या करणा-याला दोन हजार डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं आहे. पण या फतव्याचंही काहीसं सलमान रश्दींसारखंच झालं आहे. तो आता अघोषितपणे मागे घेतल्यातच जमा आहे. 

रश्दी यांच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाने पाश्चात्य देशातील मुस्लीम लेखकांना इस्लाम आणि कुराण यांची चिकित्सा करण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर अशी पुस्तकं मोठय़ा संख्येनं लिहिली जाऊ लागली. अजूनही लिहिली जात आहेत. त्यात कथा-कादंब-या आणि वैचारिक अशा दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यातील अमेरिकास्थित लेखिका इरशाद मंजी यांच्या एका पुस्तकाचा गेल्या वर्षीच ‘तिढा आजच्या इस्लामचा!’ या नावानं मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनीही तस्लिमा यांच्याप्रमाणेच इस्लाम धर्मातील आणि कुराणातील अनेक विसंगतींवर टीका केली आहे. इस्लाम आणि कुराणमध्ये स्त्रियांविषयी जी प्रतिकूलता आहे, त्यावर त्या वस्तुनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ पद्धतीनं झोड उठवतात. धर्म हा मानवताविरोधीच असतो, हे त्यांना मान्य नाही. म्हणजे मंजी या मध्यममार्गी आहेत, तशा तस्लिमा नाहीत. त्यांना इस्लाम धर्मच संपवून टाकावा, असं वाटतं. अशी काही त्यांची मतं टोकाची म्हणावीत इतकी एकारलेली असतात. त्यांची ही धारणा टोकाच्या फँटसीसारखी आहे. या कारणांमुळे तस्लिमा यांच्या अलीकडच्या लेखनात आक्रस्ताळेपणाही वाढताना दिसतो आहे. ‘सारे जण आपल्याविरुद्ध कट करत आहेत’, अशाच भूमिकेतून त्यांचं लेखन आणि वागणं-बोलणं असतं. एकटया-दुकटया व्यक्तींच्या प्रतिक्रिया फार गांभीर्यानं घ्यायच्या नसतात, पण तस्लिमा ब-याचदा त्या प्रतिक्रियांनाच सामाजिक सिद्धान्त मानून लिहितात-बोलतात. हल्ली तस्लिमा जागतिक सेलेब्रिटी झाल्या आहेत. त्यामुळे त्या काय बोलतात, याकडे जगभरातील प्रसारमाध्यमांचं लक्ष लागलेलं असतं. अशा वेळी तस्लिमा यांच्याकडून अधिक जबाबदारपणाची आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा आहे. पण ती त्या नेहमीच धुडकावून लावतात आणि अतिशय सवंग विधानं करतात. नुकत्याच अमेरिकेत गुरुद्वारामध्ये झालेल्या हिंसाचाराविषयीची त्यांची प्रतिक्रिया अशाच स्वरूपाची आहे.

तस्लिमाचा लढा जगातल्या सर्वाधिक धार्मिक पगडा असलेल्या समाजातील मुल्ला-मौलवींविरोधात आहे. तेव्हा त्यांच्याशी त्यांच्याच पातळीवर जाऊन वाद-विवाद करण्याची गरज नसते. तस्लिमा यांच्या लेखनात ते भान ब-यापैकी पाळलंही जातं. पण त्यांची वक्तव्यं आणि विधानं यात मात्र त्या या गोष्टींना ब-याचदा हरताळ फासतात. टोकाची मतं व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना टोकाचा विरोध होतो, आणि म्हणून मोठय़ा प्रमाणावर बुद्धिमंतांचा पाठिंबाही मिळत नाही. त्यासाठी अधिक संयमितपणे व्यक्त व्हावं लागतं. विचारांची लढाई विचारांच्या पातळीवरच लढावी लागते. पाश्चात्य देशातील कितीतरी मुस्लीम लेखिका आणि लेखक अभ्यासावर आधारलेले आणि सज्जड पुरावे देणारं लेखन करत आहेत. त्यांचा प्रतिवाद मुस्लीम धर्माधांना सहजासहजी करता येत नाही. अशा लेखनाचा इष्ट परिणाम होऊन तो तळागाळातल्या समाजापर्यंत झिरपायला वेळ लागतो. कुठलाही सामाजिक बदल एकाएकी होत नाही. त्यासाठी मोठा काळ उलटावा लागतो. आणि त्या काळात आपल्या उद्दिष्टांसाठी अविरत काम करत राहणारी फौजही तयार करावी लागते. ती केली तरच या बदलाची गाडी सुरळीत राहते. कारण दीर्घकालीन समस्या या जटिल असतात, त्यामुळे त्यांच्यावरची उपाययोजनाही दीर्घकालीनच असावी लागते. असे प्रश्न शॉर्टकटने कधीही सुटत नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे सारेच प्रश्न जसे कायद्याने सुटत नाहीत, तसे मोर्चे-आंदोलने आणि लेखन यातूनही सुटत नाहीत. या सा-यांचा एकसमयावच्छेदेकरून व्हावा लागतो. सध्याची परिस्थिती त्या दिशेनेच प्रवास करत आहे. त्यामुळे काळही तस्लिमा यांच्या बाजूने आहे. फक्त गरज आहे ती मर्मदृष्टीची. 20-30 हे तारुण्याचं आणि बंडखोरीचं वय असतं. 40-50 हा आयुष्याच्या प्रगल्भतेचा टप्पा असतो. तस्लिमा यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याकडून तशा प्रगल्भ व संयत लेखनाची-वर्तनाची अपेक्षा करणं, नक्कीच अनाठायी ठरणार नाही.

Monday, August 13, 2012

ज्ञान ते सांगतो पुन्हा!

‘अथातो ज्ञानजिज्ञासा’  हे यशवंत रायकर यांचे पुस्तक ज्ञान संकल्पनांची ओळख करून देणारे आहे. या पुस्तकाचा पहिला भाग 2010 मध्ये प्रकाशित झाला, तर दुसरा भाग नुकताच प्रकाशित झाला आहे. भाग दोन प्राधान्याने तत्त्वज्ञ, त्यांच्या संकल्पना यांची ओळख करून देणारा आहे. यातील बहुतेक तत्त्वज्ञ, विचारवंत विदेशी आहेत. भारतीय तत्त्वज्ञानात शंकराचार्य यांच्यानंतर नवा कोणताही तत्त्वविचार मांडला गेला नाही, अशी मांडणी सुरेश द्वादशीवार यांनी अलीकडेच लिहिलेल्या त्यांच्या ‘मन्वंतर’ या पुस्तकात केली आहे. म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान शंकराचार्य यांच्याबरोबरच थांबलं, त्यानंतर त्यात नवी भर कुणीच टाकलेली नाही, असा या मांडणीचा स्वच्छ अर्थ होतो. असो. हा मुद्दा वेगळा आहे. पण ‘अथातो ज्ञानजिज्ञासा’ असे म्हणताना भारतीय तत्त्वविचारापलीकडे जगात काय काय आहे आणि ते कुणी कुणी मांडलं आहे, याचा परामर्ष घ्यावा लागतो. रायकरांचं हे पुस्तक (भाग एक व दोनसह) त्यासंबंधीचा एक प्रयत्न आहे.
‘प्रस्थापित ज्ञानाने काही शंकांचे निरसन न केल्याने जिज्ञासेची कांस धरावी लागणे’, ही प्रस्तुत पुस्तकामागची रायकरांची भूमिका आहे. इथं प्रस्थापित ज्ञान म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान असं रायकरांना अभिप्रेत असावं. भाग एकमध्ये ‘एका अभ्यासूने जिज्ञासूंशी साधलेले मुक्तसंवाद’ अशी रायकरांची भूमिका होती, ती या भाग दोनमध्ये ‘एका वाचकाने जिज्ञासूंशी साधलेला मुक्तसंवाद’ अशी झाली आहे. जगातील ज्ञान संकल्पनांच्या अफाटतेचा केवळ अंदाज आल्यावर, त्यातील काहींचा प्रत्यक्ष परिचय करून झाल्यावर अशी नम्र भूमिका होणं अपरिहार्य असतं.
पुस्तकाची सुरुवात सॉक्रेटिस-प्लेटो-अ‍ॅरिस्टॉटल या ग्रीक तत्त्वज्ञ त्रयीपासून होते. मग गॅलिलिओ, व्हॉल्टेर, कांट, आँग्यूस्त काँत, चार्लस डार्विन, नित्शे, युनॅमुनो, ऑर्तेगा, बट्र्राड रसेल, सात्र्, कार्ल पॉपर, खलिल जिब्रान, जॉर्ज मिकेश अशा जवळपास तीसेक तत्त्वज्ञांचा समावेश आहे. त्यात विसाव्या शतकातील दोन प्रसिद्ध विचारवंतांचाही समावेश आहे. ते म्हणजे इसाया बर्लिन आणि एडवर्ड सैद. ‘विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ विचारवंत’ असा बर्लिन यांचा सार्थ गौरव केला जातो. रायकरांनी त्यांचं ‘संकल्पनांचे इतिहासकार’ असं वर्णन केलं आहे. बर्लिन यांनी ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेची नव्याने मांडणी केली. त्यावर गेली पन्नास-साठ वर्षे चर्चा चालू आहे, या एकाच गोष्टीतून बर्लिन यांचं महत्त्व अधोरेखित होतं. सैद यांना ‘दुर्दम्य विचारवंत’ असं रायकरांनी म्हटलं आहे, ते मात्र फारसं समर्पक वाटत नाही. सैद यांच्या व्यक्तिगत आयुष्यापेक्षा त्यांचा विचार आणि त्यासाठीचा त्यांचा त्याग या गोष्टी ते हयात असतानाही वरचढ होत्या आणि आहेत. ‘ओरिएण्टॅलिझम’ या 1979 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात सैद यांनी पाश्चिमात्यांचा पौर्वात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा पूर्वग्रहदूषित आहे, याची सोदाहरण चिरफाड केली. या पुस्तकाने पाश्चिमात्यांच्या बौद्धिक एकाधिकारशाहीला पहिल्यांदाच इतक्या ठोसपणे तडाखे लगावले. याचबरोबर पॅलेस्टिनींची भरभक्कमपणे बाजू मांडण्याचं, इंडालॉजीचा पुरस्कार करण्याचं आणि सबाल्टर्न स्टडीजला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं अतिशय महत्त्वाचं कामही सैद यांनी केलं आहे. रायकरांनी सैद यांच्या या योगदानाचाही उल्लेख केला आहे. पण एक उल्लेख त्यांच्याकडून बहुधा अनावधानाने राहून गेला असावा. तो म्हणजे सैद हे विसाव्या शतकातल्या ‘विचारवंतांचे प्रतिनिधी’ होते-आहेत. ‘रिप्रझेंटेशन ऑफ इंटेलेक्च्युअल’ या पुस्तकात त्यांनी विचारवंत कोणाला म्हणावे आणि विचारवंतांची कर्तव्यं कोणती याची मांडणी करताना विचारवंतांनाही चार खडे बोल सुनावले आहेत. सैद यांनी ‘ओरिएण्टॅलिझम’मध्ये भारताचा समावेश केला नाही, अशी तक्रार केली आहे. ते मात्र तर्काला धरून नाही.
या विदेशी तत्त्वज्ञांनंतर टिळक, टागोर, इकबाल या भारतीयांचा तर पृथ्वी, मृत्यू, लोकसंख्या, शेतीची जन्मकथा, फलज्योतिष, बलात्कार अशा नऊ-दहा घटितांचाही समावेश आहे. या विषयसूचीवरून पुस्तकाचे सरळसरळ तीन भाग पडतात. रायकरांनी ते स्वतंत्रपणे नमूद केले नसले तरी ते लक्षात यावेत अशी उतरत्या क्रमाने त्यांची मांडणी केली आहे.
जागतिक पातळीवरील तत्त्वज्ञांनी मांडलेल्या ज्ञान संकल्पनाची थोडक्यात ओळख करून देत, त्या तत्त्वज्ञांचाही परिचय करून दिल्याने हे पुस्तक रोचक झाले आहे. तत्त्वज्ञान हाच मुळात काहीसा रुक्ष आणि अवघड विषय. त्यामुळे तो सर्वसामान्यांना कंटाळवाणा आणि दुबरेध वाटतो. हे लक्षात घेऊन रायकरांनी या पुस्तकाचं लेखन सर्वसामान्यांना रुचेल आणि पचेल अशाच पद्धतीने केलं आहे. पुस्तकभर या व्यवधानाचा प्रत्यय येत राहतो. बहुधा यातील सर्व लेख हे सदररूपाने वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी लिहिले असल्याचा हा परिणाम असावा.
‘ज्या वेळी जे मनाला भिडले त्याचा अमूक एक मर्यादेपर्यंत पाठपुरावा केला’ या विधानातून रायकरांनी स्वत:च एकप्रकारे या पुस्तकाची मर्यादाही सांगितली आहे. म्हणजे हा अभ्यास ज्ञानमार्गाच्या शिस्तीपेक्षा रायकरांच्या स्वत:च्या कुतूहलातून झाला आहे. दुसरं म्हणजे ही काही कथा-कादंबरी नव्हे. हे तत्त्वज्ञ आणि तत्त्वविचार यांची सांगड घालणारं पुस्तक आहे. ज्ञानाची आस काही सर्वानाच असत नाही आणि ज्यांना ती असते त्यांनाही ते पूर्णपणे समजावून घेता येतेच असं नाही. यातील पहिल्या प्रकारातल्या वाचकांना ज्ञानाकडे वळवण्याचं आणि दुस-या प्रकारातल्या लोकांना आश्वस्त करण्याचं काम, हे पुस्तक काही प्रमाणात निश्चित करू शकते.
रायकरांच्या भाषेला संशोधनाची शिस्त आहे. त्यामुळे ती सौष्ठवपूर्ण आणि आटोपशीर आहे. प्रगल्भ भाषा हा लेखकाच्या जमेचा भाग असतो, तेव्हा तो वाचकांच्या कसोटीचाही असतो. कारण लेखकाने जे लिहिले आहे ते आणि बिटविन द लाइन्स या दोन्ही गोष्टी समजावून घेत वाचकाला पुढे जावं लागतं.
‘अथातो ज्ञानजिज्ञासा’ हा ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ असा स्वत:ला आकळलेलं इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे ज्ञानसंकल्पना आणि वाचक यांच्यामध्ये संवादाची भूमिका निभावू पाहणारं पुस्तक आहे. या पुस्तकातील तत्त्वज्ञांचा विचार समजावून घेऊन त्यांच्या मूळ पुस्तकांपर्यंत वाचकाने गेलं पाहिजे, तेव्हाच ती ज्ञानजिज्ञासा ‘अथातो’ ठरेल!
अथातो ज्ञानजिज्ञासा : यशवंत रायकर
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे
पाने : 171,
किंमत : 200 रुपये                  

Monday, July 30, 2012

वाचणा-याची रोजनिशी

११ फेब्रुवारी
आज पुस्तक प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळी लवकरच ते पाहायला गेलो. कुणीही आलेलं नव्हतं. त्यामुळे मला सर्व पुस्तकं निवांत पाहता आली. आधी ‘बंगाल डिव्हायडेड-१९३८ टू १९४७’ हे पुस्तक घेतलं. नंतर भारतातल्या एका ब्रिटिश नोकरशहाचं-आर्किटेक्टचं चरित्र घेतलं. पण ज्यामुळे खूप आनंद व्हावा, असं एकही पुस्तक मिळालं नव्हतं. शिवाय या दोन्हीपैकी पहिलं ‘सी’ कॅटेगेरीतलं म्हणजे १२० रुपयांना तर दुसरं ‘डी’ कॅटेगेरीतलं म्हणजे ५० रुपयांना होतं. त्यामुळे तीच घेण्याच्या विचारात होतो, तोच ‘द प्लेजर्स ऑफ रीडिंग’ हे अण्टोनिया फ्रेझर या लेखिकेने संपादित केलेलं पुस्तक मिळालं. प्रत थोडी कराब झालेली होती, पण पुस्तक चांगलं होतं. यात ४० वेगवेगळ्या लेखकांनी आपल्या वाचनाविषयी लेख लिहिले आहेत. त्यांना पूरक अशी उत्कृष्ट चित्रं ४० चित्रकारांनी काढलेली आहेत. रॉयल आकाराचं हे आर्टपेपरवर छापलेलं आणि संपूर्ण रंगीत असलेलं पुस्तक फारच सुंदर आहे. त्यातील लेखकांनी आपल्या वाचनावर झालेला घरचा - आजूबाजूच्या वातावरणाचा, सहवासातल्या लोकांचा-शिक्षकांचा - परिणाम, मनावर परिणाम करून गेलेली पुस्तकं, प्रभावित केलेली पुस्तकं याविषयी समरसून लिहिलं आहे. त्या त्या लेखाला चित्रकारानं अतिशय सुंदर चित्रं काढली आहेत. पुस्तकांचं महत्त्व, त्यांचे उपयोग आणि त्यांची फँटसी याविषयीची ही चित्रं बेहद्द अप्रतिम म्हणावी अशी आहेत. शिवाय प्रत्येक लेखकानं लेखाच्या शेवटी माझी आवडती पुस्तकं म्हणून दहा पुस्तकांची यादी दिली आहे. काहींनी तीच का आवडली, याची कारणमीमांसा केली आहे, तर काहींनी आवडती दहा पुस्तकं सांगणं कठीण आहे, तरीही फार विचार करून ही दहा नावं देत आहे, असा अभिप्राय दिला आहे. हे पुस्तक ‘ए’ वर्गातलं असल्यानं त्याची किंमत २५० रुपये होती. अर्थात ते ६०० रुपयांना असतं तरी मी घेतलंच असतं म्हणा. मग आधीची दोन्ही पुस्तकं टाकून देऊन हे एकच पुस्तक घेतलं आणि आनंदानं ऑफिसाला परतलो.
१२ फेब्रुवारी
अलीकडच्या काळात अगदी भरमसाठी म्हणावी इतकी पुस्तकं विकत घेतली. वाचलीही तशीच अधाशासारखी. त्यामुळे इंग्रजीतल्या अनेक नव्या लेखकांच्या आणि परकीय भाषांतल्या कितीतरी मान्यवर लेखकांच्या ओळखी झाल्या. हा ग्रंथसंचय भरपूर आनंद देणारा ठरला. आपलं अजून लग्न झालेलं नाही, वयाच्या या टप्प्यावरही आपण लग्नाविषयी फार गंभीर नाही आणि लग्न न होण्याचं वैषम्यही वाटत नाही, याचं मुख्य कारण म्हणजे ‘मैं और मेरी किताबें’!
१४ फेब्रुवारी
काही पुस्तकं पुन्हा पुन्हा भेटत राहतात. प्रदीप सॅबॅस्टीयन या पुस्तकप्रेमी लेखकाविषयी पहिल्यांदा ऐकलं ते जयप्रकाश सावंतांकडून. मग त्यांचे ‘द हिंदू’मधील लेख वाचायचा सपाटा लावला. अतिशय सुंदर लेख लिहितो हा माणूस! एके दिवशी सावंतांनी सांगितलं की, सॅबॅस्टीयन यांचं पुस्तक आलं आहे. मग ते फ्लीपकार्टवरून मागवलं. ‘द ग्रोनिंग शेल्फ अँड अदर इन्स्टन्सेस ऑफ बुक लव्ह’ हे त्यांचा वाचन, ग्रंथसंग्रह आणि ग्रंथांविषयीच्या ग्रंथांविषयीचा लेखसंग्रह आहेही उत्तम. त्याची निर्मितीही प्रकाशकानं चांगली केली आहे. या पुस्तकाच्या शेवटी पूरक वाचनासाठी संदर्भग्रंथांची यादी दिली आहे. त्यातली ‘एक्स लिब्रिस’, ‘द मॅन हू लव्हड बुक्स टू मच’, ‘८४ चेरिंग क्रॉस रोड’, ‘द बुक ऑफ लॉस्ट बुक्स’, ‘हिस्ट्री ऑफ रीडिंग’ अशी काही पुस्तकं आपल्या संग्रही आहेत आणि ती आपण यापूर्वीच वाचली आहेत, याचं समाधान वाटलं. पण इतर काही पुस्तकं मात्र वाचलेली नाहीत आणि ती आपल्या संग्रहीपण नाहीत, याचं वाईटही वाटलं. त्यामुळे ती आता एकेक करून मागवायची, असं ठरवलं.
१५ फेब्रुवारी
पाशा पिंपळापुरे यांनी मागच्या महिन्यात अमेरिकेहून येताना माझ्यासाठी ‘पॅशन फॉर बुक्स’ हे पुस्तक आणलं होतं. ते त्यांनी मला ६ फेब्रुवारीला दिलंही. पण त्यांनी ते आधीच वाचायला सुरुवात केली होती. त्यामुळे तेच त्याच्या प्रेमात पडले. पुस्तक देताना ते मला म्हणाले, ‘‘हे पुस्तक आणलंय तुझ्यासाठी, पण सध्या मीच ते वाचतोय. खूपच छान पुस्तक आहे. मलाही आवडलंय. माझं एक प्रकरण वाचून व्हायचं आहे, ते झालं की पुस्तक तुला देतो. दरम्यान या पुस्तकावर तुझं नाव लिहून ठेव.’’ मला पुस्तकावर स्वत:चं नाव लिहायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी विकत घेतलेल्या कोणत्याही पुस्तकावर - मग ते नवे असो की जुने - स्वत:चं नाव लिहीत नाही. पण हे पुस्तक परत आपल्या ताब्यात येईल की नाही, या धास्तीपोटी त्यावर मी नाव लिहून ते परत पिंपळापुरेंना वाचायला दिलं.
पण या पुस्तकाचा किस्सा भारी आहे. ‘पॅशन फॉर बुक्स’बद्दल मी पहिल्यांदा ऐकलं ते नीतीन रिंढे यांच्याकडून. गेल्या वर्षी त्यांनी त्यावर एक लेखही लिहिला. नंतर त्यांनी मला ते पुस्तक वाचायला दिलं. पुस्तक फार मस्त होतं. मग मी ते शोधायचा प्रयत्न केला. पण ते आता आऊट ऑफ प्रिंट झालं होतं. त्यामुळे निराश होऊन मी त्याचा पिच्छा सोडला. काही दिवसांनी या पुस्तकाची महती उन्मेष अमृते या मित्रापर्यंत गेली. तोही त्याच्या प्रेमात पडला. पण त्यालाही ते मिळेना, तेव्हा त्याने ते अमेरिकेतल्या मित्राकडून मागवायचं ठरवलं. तेव्हा त्याने माझ्यासाठीही एक प्रत मागवली. या दोन्ही प्रती हार्ड बाऊंड होत्या. नीतीन रिंढेंकडची प्रत मात्र पेपरबॅक होती. अमृतेने मागवलेल्या प्रती महिनाभरात आल्या. माझी प्रत त्याने रिंढेंकडे दिली. पण रिंढेंनी माझी हार्ड बाऊंड प्रत स्वत:कडेच ठेवून मला स्वत:कडची पेपरबॅक प्रत दिली. रिंढे मित्रच असल्याने मला काही बोलता आलं नाही. पण मी नाही म्हटलं तरी थोडा नाराज होणार, हे त्यांनी आधीच हेरून स्वत:कडची इतर दोन-चार पुस्तकं मला भेट दिली. ती पुस्तकं चांगली होती. त्यामुळे ही तडजोड मी मान्य केली.
‘पॅशन फॉर बुक्स’ची एक प्रत असताना पुन्हा त्याचीच दुसरी प्रत पिंपळापुरेंनी भेट दिली. तेव्हा माझ्याकडे हे पुस्तक आहे, असं मी त्यांना अजिबात सांगितलं नाही. कशाला सांगा? आपल्या आवडत्या पुस्तकाच्या एकापेक्षा जास्त प्रती संग्रही असलेल्या बऱ्याच. शिवाय मित्रांनी प्रेमाने दिलेल्या भेटीचा अनमान का करायचा? उन्मेषला मी पुस्तकाचे पैसे देऊ केले, तेव्हा तो तडकून म्हणाला होता, ‘‘लेका, फार पैसे झाले का तुझ्याकडे?’’ फार पैसे झाले नाही पण एकाच पुस्तकाच्या दोन प्रती झाल्या ना!
१९ फेब्रुवारी

‘एक्स लिब्रिस’ या अॅनी फीडमनच्या पुस्तकाविषयी पहिल्यांदा अरुण टिकेकरांच्या ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ या पुस्तकात वाचलं होतं. त्यानंतर दोनेक वर्षानी ‘एक्स लिब्रिस’ प्रत्यक्षात पाहायला मिळालं ते जयप्रकाश सावंतांकडे. मग ते झपाटल्यासारखे वाचून काढलं. अॅनीनं अतिशय जिव्हाळ्यानं पुस्तकांविषयी, तिच्या संग्रहाविषयी आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणींविषयी लिहिलं आहे. यातला ‘मॅरिइंग लायब्ररी’ हा पहिला लेख लेख तर केवळ अप्रतिम आहे. अॅनी आणि तिचा नवरा दोघांचाही ग्रंथसंग्रह एकाच घरात स्वतंत्र असतो. लग्न झालं, मुलं झाली, तेव्हा अॅनीला वाटलं की, आपण आता एकजीव झालेले पती-पत्नी आहोत, मग आपला ग्रंथसंग्रह तरी का स्वतंत्र ठेवायचा? तोही एकत्र करून टाकू. पण तो एकत्र करताना धम्माल उडते. दोघांच्या त - हा वेगवेगळ्या. त्यामुळे ग्रंथांचं सामिलीकरण करताना मतभेद होतात. पण प्रचंड चर्चा, वाद होऊन शेवटी ग्रंथसंग्रह एकत्र केला जातोच. अॅनी लेखाच्या शेवटी लिहिते, ‘हीज बुक्स अॅण्ड माय बुक्स आर नाऊ अवर बुक्स. वुई आर रिअली मॅरिड!’
हे पुस्तक वाचलं खरं, पण त्याच्या शीर्षकाचा काही तेव्हा उलगडा झाला नाही. अलीकडे पाशा पिंपळापुरे यांनी ‘पॅशन फॉर बुक्स’ हे पुस्तक भेट दिलं. अमेरिकेत दोन-तीन महिने लेकीकडे असताना त्यांनी ते हाफ प्राइज असणाऱ्या एका पुस्तकाच्या दुकानात घेतलं होतं. हे पुस्तक सेकंडहॅण्ड आहे. मात्र तरीही त्याची प्रत फारच चांगली आहे. अगदी नवी म्हणावी अशी. आधी हे पुस्तक ज्याचं होतं, तो उत्तम वाचक असावा आणि ग्रंथप्रेमीही. त्यामुळे त्याने हे पुस्तक फार जपून वाचलं. विकताना त्यावर आपली नाममुद्रा नोंदवून ठेवली. ती अशी - ‘एक्स लिब्रिस - डॅनिअल आर. विंटरिच.’ म्हणजे हे पुस्तक विंटरिंच यांच्या मालकीचं होतं. तेव्हा मला अॅनीच्या ‘एक्स लिब्रिस’ या पुस्तकाच्या शीर्षकाचा उलगडा झाला. हा मूळ लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘अमूकच्या मालकीचं’ असा आहे. इंग्रजीमध्ये अनेक लेखक-ग्रंथालयं त्यांनी विकत घेतलेल्या नव्या-कोऱ्या पुस्तकावर ‘एक्स लिब्रिस..’ असा स्टिकर लावतात. त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. या स्टिकरवर पुस्तकाशी संबंधित एक चित्र असतं. त्या चित्राच्या वरच्या बाजूला ‘एक्स लिब्रिस’ हे दोन शब्द आणि चित्राच्या खाली ज्याचं ते आहे त्याचं नाव असतं.
२१ फेब्रुवारी
आज फ्लीपकार्टवरून मागवलेली दोन पुस्तकं आली. त्यातील पहिलं आहे अर्नोल्ड बेनेट या लेखकाचं ‘हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे’. हे पुस्तक १९०८ साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. या पुस्तकाविषयी पहिल्यांदा वाचलं होतं, ते ‘प्लेजर ऑफ रीडिंग’मध्ये. त्यात मायकेल फूट या लेखक-राजकारण्याने अनरेल्ड बेनेटच्या ‘हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे’ आणि ‘लिटररी टेस्ट : हाऊ टु फॉर्म इट’ या दोन पुस्तकांचा उल्लेख केला आहे. ही दोन्ही पुस्तकं, पुस्तिका म्हणाव्यात इतकी छोटी आहेत. जेमतेम शंभरेक पानांची. पण फूटने त्यांचं खूपच कौतुक केलं आहे. फूट लिहितात, ‘आय डू थिंक दॅट लिटल बुक, लिटरली, चेंजज्ड माय लाइफ’.
दुसरं आलेलं पुस्तक आहे पलाश कृष्ण मेहरोत्राचं ‘द बटरफ्लाय जनरेशन’. या पुस्तकाविषयी फ्लीपकार्टवर पहिल्यांदा ‘न्यू रिलिज’ या विभागातली पुस्तकंपाहताना वाचलं होतं. पण आपल्या आवडीचा विषय नाही म्हणून ते दोन-चार वेळा पाहून सोडून दिलं होतं. पंधरा दिवसांपूर्वी त्यावर ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये परीक्षण आलं. ते फार छान लिहिलं होतं. त्यामुळे त्याविषयीची उत्सुकता पुन्हा चाळवली गेली. मागच्या आठवडय़ात ते फ्लीपकार्टवर पाच-सात वेळा पाहिलं. मग एकदाचं परवा मागवून टाकलं. आज आलंही. या पुस्तकाच्या फ्लॅपवर लिहिलं आहे, ‘‘हाफ ऑफ इंडियाज पॉप्युलशन इज अण्डर द एज ऑफ ट्वेन्टी फाइव्ह. इन २०२०, द अव्हरेज पर्सन इन इंडिया विल बी ओन्ली २९ इयर्स ओल्ड, कम्पेअर्ड विथ ४८ इन जपान, ४५ इन वेस्टर्न युरोप अॅण्ड ३७ इन चायना अॅण्ड द युनायटेड स्टेटस.’’ आजच्या भारतीय तरुणांना पलाशने ‘टेक्नीकुलर यूथ’ असं म्हटलं आहे.
ही दोन्ही पुस्तकं पाशांनी पाहिली तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तू असली पुस्तकं कशाला घेतोस? ती फार ऑर्डिनरी आहेत.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘पलाश कृष्ण मेहरोत्राचं पुस्तक आजच्या तरुणाईविषयीचं आहे. म्हणून मी ते मागवलं आहे. तर अनरेल्ड बेनेटच्या ‘हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे’विषयी मायकेल फूटने ‘प्लेजर्स ऑफ रीडिंग’मधल्या लेखात असं म्हटलंय की, या पुस्तकानं माझं आयुष्य बदलवलं. फूट हा काही ऑर्डिनरी माणूस नाही.’’ त्यावर पाशा म्हणाले, ‘‘फूट मार्क्सवादी होता. तो एमपी होता. लंडनचा पंतप्रधान होता होता राहिला. त्यानं असं म्हटलंय म्हणजे ते पुस्तक नीट वाचलं पाहिजे. नंतर मला वाचायला दे.’’

Monday, July 23, 2012

कर्त्या जातीचा मागोवा

आमच्या 'मराठा समाज' या पुस्तकावर महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार पुरवनित (२२ जुलै २०१२) ,
प्रतिमा जोशी यांनी लिहिलेले परीक्षण.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्राचा विचार मराठ्यांना वगळून करता येणार नाही याबाबत बव्हंश समाजशास्त्रज्ञांचे आणि राजकीय विश्लेषकांचे दुमत नाही. इथे जातीचे मराठे नव्हे , तर मराठा जातीचे लोक अभिप्रेत आहेत. ती जशी महाराष्ट्राची सत्ताधारी जात आहे , तशी समाजजीवनावर प्रभाव टाकणारीही आहे का याबाबत मात्र मतांतरे असू शकतात. राम जगताप आणि सुशील धसकटे यांनी संपादित केलेल्या " मराठा समाजः वास्तव आणि अपेक्षा " या पुस्तकात त्याचे दाखले मिळतात. 

या संपादकीय जोडीचे मनोगतच त्या दृष्टीने बोलके आहे. ते म्हणतात की , हल्ली मराठा समाज आपल्या गतेतिहासाबद्दल आणि इतिहास पुरुषांबद्दल फार संवेदनशील आणि हळवा बनला आहे. ही काही प्रगल्भतेची निशाणी नाही. उलट तो प्रगतीला अडसरच असतो. मराठा तरुणांनी आत्मपरीक्षणाला सिद्ध व्हावे हा या पुस्तकामागचा उद्देश आहे. संपादक असेही म्हणतात की , आपल्याच समुहाचा कळप करून राहण्यात कोणताच शहाणपणा नाही , त्यातून आत्मोन्नती तर साधणार नाहीच , मग समाजपरिवर्तन तर फारच दूरची गोष्ट. किमान स्वतःच्या प्रगतीसाठी तरी मराठ्यांनी अनिष्ट रूढींना मूठमाती द्यावी असेही ते म्हणतात. त्या दृष्टीने डॉ. बाबा आढाव , डॉ. आ. ह. साळुंखे , प्रा. रंगनाथ पठारे , डॉ. भा. ल. भोळे , शांताराम पंदेरे , प्रा. सदानंद मोरे , प्रा. शेषराव मोरे , प्रा. प्रकाश पवार , बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबरोबरच डॉ. कुमार सप्तर्षी आणि वरुणराज भिडे तसेच गेल्या शतकातील परखड लेखिका ताराबाई शिंदे यांचे पूर्वप्रकाशित लेख या पुस्तकात संग्रहित केलेले आहेत. हे पुस्तक म्हणजे महत्वाचा वैचारिक ठेवा असले तरी प्र्रा. सदानंद मोरे यांची प्रस्तावना वगळता सर्वच लेख किमान १० आणि कमाल १०० वर्षांपूर्वीचे आहेत.

या लेखांमधील मराठ्यांच्या सामाजिक जीवनाचे आणि समजुतींबद्दलचे वास्तव काही प्रमाणात आजही तसेच असले तरीही ग्रथित करताना भिडे आणि शिंदे वगळता त्याच लेखकांकरवी त्यांना वर्तमानाची जोड देणे अपेक्षित होते. कालपरवापर्यंत राखीव जागांना प्राणपणाने विरोध करणाऱ्या मराठा समाजाने गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या अगदी लावून धरला आहे. या आरक्षणाचा काय जो निर्णय होईल तो होईल (बहुधा होईलच) , परंतु यानिमित्ताने मराठ्यांमध्ये गरिबी आहे ही बाब कुळीचा अभिमान बाळगणाऱ्या या जातीच्या पुढाऱ्यांनी काही कारणाने स्वीकारलेली दिसते. या गरिबीची कारणमीमांसा करत बसण्यापेक्षा थेट आरक्षणच मागण्याचे काय कारण असू शकते ? शेतजमिनीवरून गरीब मराठा हलाखीत निघालेला असला तरी तो सहसा इतरांचे नेतृत्व का स्वीकारत नाही ? या प्रश्नांबरोबरच महाराष्ट्रात एकंदरच समाजपरिवर्तनाची प्रक्रिया मंदावली आहे. स्त्रीभ्रूणहत्या केवळ खात्यापित्या मराठ्यांच्यातच नव्हे तर लेवा पाटलांपासून अनेक मध्यम जाती , अगदी ऊसतोडणी कामगारांपर्यंत बळावलेल्या असणे , स्वकर्तृत्वावर उभ्या राहू शकणाऱ्या महिला सत्ताकारणातून बाद होणे , दलित आणि अल्पसंख्याकांवरील हल्ले ही त्याचीच लक्षणे आहेत.

मराठा तरुण गतेतिहासाबद्दल हळवा बनला आहे हे संपादकांचे मतही त्यांनी हळवा हा शब्द वापरल्याने तपासून घ्यायला हवे. गेल्या सत्तरएक वर्षांत बहुजनवादी राजकारणाची चर्चा खूप झाली. या संपूर्ण कालावधीत मराठा नेतृत्वाने वेळोवेळी घेतलेली भूमिका पाहिली तर या तपासाचे एक टोक हाती लागते. विशेषतः मंडलोत्तर राजकारणात ओबीसींनी स्वतःसाठी जागा करून घेतल्यानंतर मराठे जात म्हणून अधिक सजग झाल्याचे दिसते. इतिहासाचा वापर हा त्याचाच एक भाग आहे. गरीब मराठे किंवा कुणब्यांना हे समजते तरीही त्यांना ते मंजूर असते याचे विश्लेषण याच पुस्तकातील बाबा आढाव , सदानंद मोरे , भा. ल. भोळे यांच्या लेखात सापडू शकते. विठ्ठल रामजी शिंदे आणि जागृतीकार पाळेकर यांनी तेच किती तरी आधी मांडलेले दिसते. 


उदारीकरणानंतर बदललेल्या राजकारणावर वित्ताचा म्हणजे पैशांचा प्रभाव आहे. राजकारणाचा पारंपरिक साचा बदलला आहे. इतरांच्या खांद्यावर बसून गावचे पुढारपण करणाऱ्यांना हे समजत नाही असे म्हणता येत नाही. एकंदर समाजावरील राजकारणाचा प्रभाव कमी होत जाताना सामाजिक आणि आर्थिक प्रभाव निर्माण करण्यास गत्यंतर उरत नाही. संपादकांना जे परिवर्तन व्हावेसे वाटते ते आणि वर्तमान वास्तव परस्परांच्या विरोधात आहे. " राजकीय सत्तास्थाने हे अंतिम ध्येय मानून ज्या जाती किंवा जातीसमूह प्रयत्न करीत आहेत , त्यांना त्या स्थानांवर प्रत्यक्ष पकड मिळवता येईल , तेव्हा माश्याही मारीत नाही आणि लाजही झाकत नाही , असे शेळीचे शेपूट आपल्या हाती आले आहे , असे त्यांना आढळेल " ज्येष्ठ राजकीय पत्रकार वरुणराज भिडे यांनी मे १९९९मध्ये लिहिलेल्या लेखाचा हा समारोपाचा परिच्छेद या संपादित पुस्तकातीलही अखेरचा परिच्छेद आहे. तो केवळ नवी राज्यव्यवस्था किंवा बहुजन राजकारण यावरच नव्हे , तर मराठ्यांच्या चाणाक्षपणावरही प्रकाश टाकतो.

या स्थितीत संपादकांना जी परिवर्तनाची कळकळ आहे ती प्रत्यक्षात यायची तर ताराबाई शिंदेंसारख्या धीट बायामाणसांतर्फेच वैचारिक फटकारे बसले तर कदाचित येईल. कारण बदलाची गरज सर्व महिलांप्रमाणे मराठा महिलांना जास्त आहे. मग या पुस्तकात चालू शतकातील एकाही विचारी महिलेला चार पाने मिळू नयेत याचे आश्चर्य वाटून राहते. असो. तरीही महाराष्ट्रातील कर्त्या जातीने हे पुस्तक किमान एकदा तरी वाचावे याबाबत दुमत नसावे.

मराठा समाजः वास्तव आणि अपेक्षा
संपादकः राम जगताप , सुशील धसकटे
प्रकाशक : राजहंस प्रकाशन , पुणे
पाने 
: २२६ , किंमतः २०० रूपये

Monday, July 16, 2012

नेमाडे पंचाहत्तरीत, ‘कोसला’ पन्नाशीत!

वयाच्या पंचविसाव्या वर्षी ‘कोसला’सारखी सशक्त कादंबरी लिहिणाऱ्या डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे, तर ‘कोसला’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीनेही सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे. ‘कोसला’ सलग तीन पिढय़ा वाचली जात असतानाच नेमाडय़ांची गेल्या वर्षी ‘हिंदू’ ही ‘हिंदू’ या संकल्पनेचीच पुनर्माडणी करणारी नवी कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यानिमित्ताने हा खास लेख...
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी 24 मे रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे, तर त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी लिहिलेली ‘कोसला’ ही कादंबरी लवकरच सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण करेल. मुख्यत: कादंबरीकार आणि कादंबरी-समीक्षक अशी नेमाडय़ांची ओळख सांगता येईल. पण नेमाड्यांविषयी साहित्यक्षेत्रात आणि साहित्याबाहेरच्या जगात ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ आहे. त्यामुळे वाद, टीका, कौतुक, हेटाळणी आणि द्वेष आजवर नेमाडे यांच्या वाटय़ाला आलेले आहे. त्यातून त्यांच्या कादंब-याही सुटलेल्या नाहीत. ‘कोसला’विषयी आजही असलेली उलटसुलट चर्चा आणि गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘हिंदू’विषयी अहमहमिकेने होत असलेले वाद, यातून ते स्पष्ट होते. 

नेमाडे यांचे शत्रूही खूप आहेत. आपल्या फटकळ बोलण्याने ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. सत्य बोलण्याची मोठी किंमत दर वेळीच मोजावी लागते. ती नेमाडे मोजत आलेत. पण त्यामुळे एकंदर मराठी साहित्याचं भलंच झालेलं आहे. साहित्यातल्या भोंदूगिरी, चापलूसगिरीला काही प्रमाणात तरी आळा बसला आहे. एकमेकांची तळी उचलणारे आणि नैतिक पातळीवर भ्रष्ट असलेले लोक समाजाचं, साहित्याचं पुढारपण करायला पुढे सरसावत असतात. त्यांना नेमाडे आपल्या एक-दोन फटका-यांनी ब-याचदा गारद करतात. ‘नेमाडपंथी दहशतवाद’ या शब्दाची निर्मिती त्यातूनच झाली आहे.

‘कोसला’नं तीन पिढय़ांवर आपला प्रभाव काही प्रमाणात का होईना कायम ठेवला आहे. आज पन्नाशी-साठीत असलेले लोक एकेकाळी ‘कोसला’नं खूप भारावून गेले होते. त्यांच्या तारुण्यात त्यांनी ही कादंबरी वाचली, तेव्हा त्यांच्यावर तिचा जो प्रभाव पडला, तो आजही काही प्रमाणात कायम आहे. ‘कोसला’, तिचा काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती याचा ‘कोसला’तलाच आलेख प्रमाण मानल्यामुळे या लोकांचं आकलन कसं राहिलं आणि आजही जे तरुण ‘कोसला’नं प्रभावित आहेत, त्यांचंही आकलन कसं आहे, याचा कुणीतरी सविस्तर अभ्यास करायला हवा. स्वातंत्र्यानंतर शिक्षणासाठी शहरात आलेल्या पहिल्या पिढीच्या मनोवस्थेचं चित्रण ‘कोसला’मध्ये आहे. त्यामुळे ती महाविद्यालयीन काळात प्रत्येक विद्यार्थ्यांला आवडते.
'कोसला'ची चवथी आवृत्ती. यात 'कोसला'चा लेखनकाळ २४ ऑगस्ट ते १० सप्टेंबर १९३८ असा दिला आहे.

अपूर्व, द्रष्टी कादंबरी
जानेवारी 2000 मध्ये मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीनं ‘गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी’ या विषयावर एक चर्चासत्र घेण्यात आलं. त्यात गेल्या अर्धशतकातील सर्वश्रेष्ठ मराठी कादंबरी म्हणून ‘कोसला’चा आणि कादंबरीकार म्हणून नेमाडे यांचा गौरव काही समीक्षकांनी केला होता.

‘कोसला’विषयी पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते अशोक केळकर यांच्यापर्यंत अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा ‘कोसलाबद्दल’ हा समीक्षालेखांचा संग्रहही प्रकाशित झाला आहे. आकाशवाणी मुंबईनं  भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं ‘1947 ते 1997-सर्वोत्कृष्ट 10’ पुस्तकं अशी स्पर्धा घेतली होती. त्यात महाराष्ट्रभरातल्या वाचकांनी आपली पसंती कळवली. त्यात वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ला पहिला तर ‘कोसला’ला दुसरा क्रमांक मिळाला. 

ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव या कादंबरीबद्दल म्हणतात, ‘‘कोसला ही अपूर्व कादंबरी, द्रष्टी कादंबरी म्हणता येईल काय? वास्तवाकडे ती वेगळ्या नजरेने पाहते, सखोलपणे पाहते, मनुष्य जीवनाच्या अस्तित्वाच्या मूलभूत प्रवृत्तीच्या व आकांक्षांच्या परिप्रेक्ष्यात पाहते; मार्मिकपणे, स्वतंत्रपणे व काही एक नैतिक मूल्यभानाने पाहते व या प्रकारचे तिचे पाहणे एक प्रकारचे द्रष्टेपण ठरते, असे म्हणता येईल. सुजाण वाचक व समाज या दोहोंना अवतीभवतीच्या वास्तवाचे आकलन करण्याची डोळस दृष्टी ही कादंबरी देते, हेही खरे आहे.’’ पण कोसला पूर्णत्वाने द्रष्टेपण देत नाही, असाही निर्वाळा   रा. ग. जाधव देतात.थोडक्यात ‘कोसला’ आणि नेमाडे यांचा सत्तरीतल्या कादंबरी आणि कादंबरीकारांवर मोठा प्रभाव आहे.

पण साहित्याचे प्राध्यापक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि काही पत्रकार यांच्यापलीकडच्या समाजावर ‘कोसला’चा काही प्रभाव पडला आहे का? जे लोक गंभीर वाचनाचे भोक्ते आहेत, त्यांच्या ‘कोसला’विषयीच्या काय प्रतिक्रिया आहेत? ‘कोसला’ ज्या पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये घडते, तेथील सध्याच्या किती विद्यार्थ्यांनी ती वाचली आहे? याचा आता तरी कुणा जाणकारानं अभ्यास करायला हवा.

‘हिंदू’ संकल्पनेची पुनर्मांडणी
 गेली पंचवीस-तीस वर्ष येणार येणार म्हणून चर्चेत असलेल्या नेमाडे यांच्या ‘हिंदू’ या कादंबरी चतुष्टयाचा पहिला भाग गेल्या वर्षी प्रकाशित झाला. ‘हिंदू’चे अजून तीन भाग प्रकाशित व्हायचे आहेत, त्यामुळे त्याविषयी आताच काही ठोस विधान करणे बरोबर नाही. पण ‘हिंदू’ या संकल्पनेची पुनर्माडणी करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे यासंदर्भात नेमाडे यांनीच ‘हिंदू’च्या प्रकाशनाआधी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.

‘हिंदू’ प्रकाशित झाल्यापासून त्यावर बोलण्याची, लिहिण्याची अहमहमिकाच महाराष्ट्रात सुरू झाली आहे. गेल्या दीडेक वर्षात हिंदूवर लिहिल्या गेलेल्या लेखांचे पाच-सहाशे पानांचे स्वतंत्र पुस्तकच होऊ शकेल. याशिवाय औरंगाबाद आणि नांदेड इथं ‘हिंदू’वर चर्चासत्रं झाली. या निमित्ताने एक गोष्ट सिद्ध झाली की, ‘हिंदू’कडे आपली वैयक्तिक मतं, राग-लोभ, पूर्वग्रह, संस्कार यापलीकडे जाऊन पाहू शकतील असा आवाका मराठी समीक्षकांकडे नाही. त्यामुळे ‘हिंदू’ची यथायोग्य समीक्षा अजून तरी होऊ शकलेली नाही. 

‘हिंदू’ची समीक्षा करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं ‘खंडेराव, अडगळ आवरत जा राव!’ हा सुहास पळशीकर यांचा, ‘हिंदू : एक महाकथन’ हा विनय हर्डीकर यांचा आणि ‘हिंदू कशी वाचावी?’ हा डॉ. सदानंद मोरे यांचा लेख, असे तीनच लेख करतात. पळशीकर-हर्डीकर यांनी राजकीय-सामाजिक दृष्टिकोनातून ‘हिंदू’कडे पाहिले आहे, तर मोरे यांनी ‘‘हिंदू धर्म नावाच्या चमत्कारिक चीजेला इतक्या विविध अंगांनी भिडणारी, अभ्यासाचा पाया आणि वास्तवाची चौकट न सोडता सिद्ध झालेली ही कलाकृती सध्या तरी एकमेवाद्वितीयच म्हणावी लागेल’’, असे लिहून ‘हिंदू’चा परिप्रेक्ष्य नेमका काय आहे, याची दिशा सांगितली आहे. मोरे सांगतात त्या पार्श्वभूमीवर ‘हिंदू’ समजून घ्यायची तर मराठी समीक्षकांना खूपच अभ्यास करावा लागेल. तशी तयारी आणि क्षमता निदान सध्यातरी कुणा मराठी समीक्षकामध्ये आहे, असे दिसत नाही. त्यामुळे ‘हिंदू’ची सम्यक आणि समग्र समीक्षा व्हायला पुढची 25-30 वर्षे लागणार.

तोवर ‘कोसला’ टिकून राहिल का? आणि राहिली तर ते नेमाडे यांना स्वत:ला तरी आवडेल का हाही प्रश्न आहे. पण नेमाडे यांनी ‘हिंदू’चे उर्वरित भाग लवकरात लवकर लिहून प्रकाशित करावेत, असे नक्की वाटते.

कुचकामी आणि निरुपयोगी परिभाषा
कादंबरीलेखनाबरोबरच नेमाडे यांनी समीक्षालेखनात जे योगदान दिलेलं आहे, त्याचीही सम्यक चर्चा होण्याची गरज आहे. विद्यापीठीय पातळीवरील मराठी समीक्षा ही कुचकामी आणि निरुपयोगी परिभाषेत अडकून पडल्याने ती कधीचीच कालबाह्य झाली आहे. या प्राध्यापकी भाषेनेच मराठी भाषेच्या प्रवाहीपणाचं ब-याच प्रमाणात वाजीकरण करण्याचं काम केलं आहे. शिवाय या मराठी प्राध्यापकांचं राजकीय-सामाजिक-आर्थिक विषयांबाबतचं आकलन अतिसुमार असतं. सर्जनशील साहित्य कसं जन्माला येतं? ते समाजातल्या नैतिकतेच्या गोष्टी उचलूनच जन्माला येतं की नवी नैतिकता जन्माला घालतं, याचं उत्तर दिल्याशिवाय सर्जनशील साहित्याचा नेमका काय उपयोग असतो याचा न्यायनिवाडा कसा करता येईल?
‘बहुधा पंचविशीत जे पुस्तक लिहिलेलं असतं, ते लेखकाच्या बरोबर नेहमी जात असतं. कारण त्या लेखकासोबत लोक वाचत असतात आणि तेही लेखकाबरोबर मोठे होत होत पन्नाशीपर्यंत तरी ते पुस्तक तरंगत वर राहतं. नंतर पंचविशीतली नवी पिढी येते आणि ही मागची पिढी आपोआप बाद होत जाते,’ असं स्वत: नेमाडे यांनीच एका भाषणात म्हटलं आहे. ‘कोसला’च्या बाबत तसं झालं का? नसेल तर का झालं नाही? 

या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नसण्याचं एक कारण म्हणजे नेमाडे यांच्या लेखनाबद्दल असलेले गैरसमज वा त्याविषयी भक्तिभावानं केलं जाणारं लेखन हे तर नाही ना, याचाही विचार झाला पाहिजे.

कारण साहित्यिकांपासून पत्रकारांपर्यंत नेमाड्यांची ‘कावीळ’ झालेले लोक खूप आहेत. पण त्यांची विश्वासार्हता कवडीमोलाची असल्याने त्यांना कुणीही गंभीरपणे घेत नाही. पण हे लोक तरीही नेमाडेंचा द्वेष करत असतात. अशा लोकांना पुरून उरत नेमाडे यांनी ‘कोसला’कार ते ‘हिंदू’कार असा प्रवास केला आहे. शिवाय कादंबरीसारख्या सशक्त वाङ्मयप्रकाराची त्यांनी उत्तम समीक्षा केली आहे. चांगला लेखक आपल्यानंतर चार-दोन चांगले लेखक घडावेत यासाठी प्रयत्नशील असतोच. नेमाडे यांच्या कादंब-यांनी तशी सोय करून ठेवली आहे, एवढं नक्की!

Friday, July 13, 2012

वाचावे; पण काय, कसे, किती?


गोविंद तळवळकर यांना व्युत्पन्न पत्रकार, प्रकांड वाचक आणि साक्षेपी संपादक असे म्हणता येईल. महाराष्ट्र टाइम्सचे ते सलग 29 वर्षे संपादक होते. त्यामुळे त्यांना `संपादक' म्हणून खरोखर काहीतरी करून दाखवता आले. राजकारण-साहित्य-कला-संस्कृती अशा सर्व विषयांबाबतची मर्मदृष्टी आणि वाचन असल्याने त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला सांस्कृतिक चेहरा मिळवून दिला. वेगवेगळी सदरे, नवनवे विषय यांचा पाठपुरावा केला. नामांकितांपासून नवोदितांपर्यंत अनेक लेखकांना लिहिते केले. स्वत: ही पुस्तकांविषयी, साहित्या (मराठी-भारतीय आणि जागतिक)विषयी, विपुल म्हणावे इतके लेखन केले. इंग्रजी भाषेवर आणि लंडन या शहरावर तर तळवळकरांचे नको इतके प्रेम. त्यामुळे त्यांना काही लोक गंमतीने ब्रिटिश-भारतीय म्हणत. अर्थात हे तळवळकरांच्या पाठीमागे. समोर म्हणायची कुणाची बिशाद होती?

तळवळकरांनी लिहिलंही खूप. पण तळवळकरांच्या लेखणीला विश्लेषणाची जोड नसे, नसते. कारण ते अजून ही लेखन करतात. पण ही काही त्यांच्यावरील टीका होऊ शकत नाही. कारण वर्तमानपत्रांतमध्ये सामान्य वाचकांना गृहीत धरून लिहावे लागते. त्यात या सामान्य वाचकाला अजिबात माहीत नसलेल्या विषयाबद्दल सांगायचे असेल तर त्याचा रसाळ परिचय करून देणे, हा चांगला मार्ग असतो. तळवळकरांनी तेच केले. पण हेही खरे की, तळवळकरांनी महाराष्ट्राला इंग्रजी पुस्तकं वाचायची सवय लावली.


गोविंद तळवलकर संपादक असतानाच्या `महाराष्ट्र टाइम्स'च्या `मैफल' पुरवणीत `ग्रंथांच्या सहवासात' हे सदर प्रसिद्ध होत असे, त्यातलेच निवडक लेख सध्या `महाराष्ट्र टाइम्स'मध्ये पत्रकार असलेल्या सारंग दर्शने यांनी पुस्तक रूपाने आणले आहेत. शांताबाई शेळके, व्यंकटेश माडगूळकर, दुर्गाबाई भागवत, श्रीराम लागू, सोली सोराबजी, जयंत नारळीकर, मे. पुं. रेगे, शामलाल, एस. एल. भैरप्पा, ग. प्र. प्रधान, शा. शं. रेगे, मधु लिमये, गुलजार, श्री. बा. जोशी इत्यादी 23 मान्यवरांच्या वाचन-ग्रंथसंग्रहाविषयी लालित्यपूर्ण लेख आहेत. यातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या. पण हवी ती पुस्तके मिळवण्यासाठी केलेली धडपड आणि यातायात यात्र समान.

शामलाल हे `टाइम्स ऑफ इंडिया'चे माजी संपादक. त्यांनी जागतिक साहित्यातील तीन पिढय़ांचे साहित्य वाचले. शिवाय स्वत:च्या संग्रहातील 20 हजार पुस्तकांपैकी प्रत्येक पुस्तक स्वत: निवडूनच घेतले. तरी आपण कोणत्याही विषयातले तज्ञ नाही, असे ते नम्रपणे  सांगतात.

डॉ. श्रीराम लागू यांचे वाचन चौफेर, पण बेशिस्त. रसेलच्या निखळ बुद्धिप्रामाण्यवादाने त्यांना चांगलेच प्रभावीत केले. `मॅरेज आणि मॉरल्स' या रसेलच्या पुस्तकाने आपण आतून हलून गेलो, याची कबुली त्यांनी जाहीरपणे अनेकदा दिली आहे.

एस. एल. भैरप्पा भारतीय पातळीवरील एक आघाडीच्û कादंबरीकार, ते `क्लासिक' सदरात मोडणारीच पुस्तके विकत घेतात. `पर्व' ही कादंबरी लिहिण्याआधी तब्बल साडेसहा वर्ष केवळ महाभारत जीवनावरील पुस्तकांचे  वाचन ते करत होते. (अर्थात, भैरप्पा आपल्या प्रत्येक कादंबरीविषयी असेच करतात.)

दुर्गाबाइचा लेखही चांगला आहे. `मराठी संतसाहित्याने संस्कृत साहित्यात असलेली शास्त्रीय-वैज्ञानिक प्रवृत्ती नष्ट केली, नुसतेच भाषावैभव वाढवले,' हे त्यांचे निरीक्षण अतिशय नेमके आणि धारदार आहे.

खुशवंतसिंग यांचा छोटेखानी लेख त्यांच्या एकूण बिनधास्त आणि स्वच्छंदी व्यक्तिमत्त्वासारखाच आहे. `मी नको इतके वाचन करतो, कधी कधी दिवसाला एक पुस्तके वाचतो,' असे ते  म्हणतात. शिवाय स्वत:च स्वत:ला दरमहा तीन हजार रुपयांचा बुक अलाऊन्स देतात, जो त्यांचा आयकरही वाचवतो!

रमेशचंद्र सरकार हे तत्त्वज्ञानाचे  प्राध्यापक. त्यांनी माथेरानला घोडय़ावर बसण्याचा प्रयत्न फसल्यावर त्या विषयावरची दोन पुस्तके वाचून, त्यातल्या सूचना व छायाचित्रे अभ्यासून नाठाळ घोडय़ांना कसे इशाऱयाप्रयाणे वागवले, याचा किस्साही मस्तच आहे.

खरे तर या पुस्तकात असे कितीतरी किस्से आहेत.
काही गमतीजमतीही आहेतच. मे. पुं. रेगे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक `शनिमहात्म्य' आणि `शिवलीलामृत' यांना अवीट गोडीची पुस्तके असे सर्टिफिकेट देतात, वर `प्रत्येकाने ती वाचलीच पाहिजेत' अशीही शिफारस करतात!

शांताबाइचा लेखही चांगला, प्रामाणिक, पण वाचन बेशिस्त आणि ग्रंथसंग्रहही. वर शिस्तीच्या वाचकांना टोमणा की, `केवळ व्हिटामिन्सच्या पिल्सवर जगावे, फक्त पौष्टिक आणि भरपूर जीवनसत्वे असलेलाच आहार घ्यावा, तसे या मंडळींचे वाचन असते.' पण शेवटच्या काळात खुद्द शांताबाइनी आपल्या या बेशिस्त आणि स्वैरवाचनाबद्दल जाहीरपणे खेद व्यक्त केला. या पुस्तकात त्याचा उल्लेख नसला तरी वाचनापायी आपण आयुष्यातला बराचसा वेळ वाया घालवला अशी त्यांनी जाहीरपणे कबुली दिलेली आहे.

या पुस्तकाचे संपादन मात्र काटेकोरपणे झालेले नाही. लेखांचा अनुक्रम व्यवस्थित नाही. पहिलाच लेख वाईट आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व धर्मवीर भारती यांचे लेख त्रोटक तर त्र्यं. वि. सरदेशमुख, गंगाधर गाडगीळ, जयवंत दळवी यांचे ले ख भरकटलेले आहेत. मधु लिमये आणि शां. शं. रेगे यांचे लेख नको इतके मोठे आहेत. त्यामुळे या पुस्तकाला `संपादन' असे न म्हणता `संकलन' म्हणणे योग्य ठरले असते. संपादकांचे  मनोगतीही अतिशय मोघम आहे. मूळ सदराची कल्पना काय होती, त्यानुसार लेखन आले  का, सदर चालू असताना त्यावर होत असले ली चर्चा, याविषयी त्यात काहीच नाही...

निर्मितीच्या अंगाने  पुस्तक उत्तम आहे, विविध क्षेत्रांतल्या मान्यवर वाचकांच्या लेखांमुळे वैचित्र्यपूर्ण आणि रोचक झाले आहे. हे पुस्तक वाचून काय वाचावे, कसे वाचावे आणि किती वाचावे हे जाणकारांना ठरवता यावे.

ग्रंथांच्या सहवासात - संपादन : सारंग दर्शने 
मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
पाने  : 198 (1/4), किंमत : 250 रुपये