Sunday, April 17, 2011

प्रगल्भ वाचकांचा घाम काढणारं पुस्तकमराठीमध्ये दरवर्षी तीन हजार पुस्तकं प्रकाशित होतात. त्यातली जवळपास सत्ताविसशे पुस्तकं वाचायची तर सोडाच पण हातात घ्यायच्याही दर्जाची नसतात. उरलेल्या तीनशेंपैकी काही फक्त चाळण्यासाठी, काही नुसतीच पाहण्यासाठी, काही एकदा वाचून टाकून देण्यासाठी तर अगदीच थोडी पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी असतात. हे विधान कुणाला थोडंसं अतिशयोक्तीपूर्ण वाटलं तरी दुर्दैवानं ते सत्य आहे!


अलीकडेच प्रकाशित झालेलं ‘नवी क्षितिजे’कार विश्वास पाटील यांचं ‘कार्ल मार्क्‍स- व्यक्ती आणि विचार’ हे पुस्तक मात्र पुन्हा पुन्हा वाचावं असं आहे. कार्ल मार्क्‍सचं इतकं गंभीर स्वरूपाचं चरित्र मराठीमध्ये याआधी लिहिलं गेल्याचं ऐकिवात, वाचनात आणि पाहण्यातही नाही.


विश्वास पाटील हे अतिशय अभ्यासू आणि दांडगे वाचक होते. केवळ वाचनाला वेळ देता यावा म्हणून त्यांनी भारत पेट्रेलियम (आधीची ‘बर्मा सेल’) या कंपनीत आयुष्यभर कनिष्ठ पदावर नोकरी केली; वरिष्ठांनी दिलेली अनेक प्रमोशन्स नाकारली. ‘नवी क्षितिजे’ या वैचारिक त्रमासिकाचं त्यांनी पंचवीसेक वर्षे संपादन केलं. त्यातील त्यांचा एकेक लेख 30-40 पानांचा असे. पाटलांनी धर्म, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, अस्तित्ववाद या विषयावर बरंचसं लेखन केलं आहे. पण त्यांच्या हयातीत ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे त्यांचं एकमेव पुस्तक प्रकाशित होऊ शकलं. त्यानंतरचं हे दुसरं पुस्तक. त्यांच्या अप्रकाशित लेखनाची अजूनही काही पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. ती प्रकाशित झाल्यानंतर त्यांच्या व्यासंगाची, अभ्यासाची आणि बुद्धिमत्तेची ओळख महाराष्ट्राला होईल. तो दिवस लवकर येवो!


खरं म्हणजे विश्वास पाटील यांचं निधन होऊन आता जवळपास आठ वर्षे होत आली आहेत. इतक्या उशिरानं का होईना हे पुस्तक आता प्रकाशित झालं आहे, ते केवळ पाटलांच्या मुलीने घेतलेल्या पुढाकारामुळे. मात्र पाटलांनी हे लेखन कधी करून ठेवलं होतं, याची नोंद पुस्तकात नाही.


प्रस्तुत पुस्तक हे कार्ल मार्क्‍सचं वैचारिक चिकित्सा करणारं चरित्र आहे. त्यामुळे मार्क्‍सच्या वैयक्तिक आयुष्याविषयी विश्वास पाटलांनी फारच थोडी पानं खर्च केली आहेत. त्यांचा सर्व भर मार्क्‍सचं विचारविश्व समजून देण्यावर आणि त्यातल्या उणिवांवर नेमकेपणानं बोट ठेवण्यावर आहे. या पुस्तकात एकंदर सहा प्रकरणं आहेत. त्यातील ‘व्यक्ती आणि विचार’ हे पहिलंच प्रकरण तब्बल 245 पानांचं आहे, तर उर्वरित पाच प्रकरणांसाठी फक्त 89 पानं खर्च केली आहेत. पण हाच खरा या पुस्तकाचा गाभा आहे. या प्रकरणांमध्ये पाटलांनी मार्क्‍सच्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा आणि कम्युनिस्टांच्या भाबडेपणाचा अतिशय संयत भाषेत पण परखडपणे समाचार घेतला आहे.


आपले तीव्र स्वरूपाचे मतभेद नोंदवतानाही त्यांनी खूपच समतोल आणि प्रगल्भ भाषा वापरली आहे. सवंग विधानांचा आणि शेरेबाजीचा मोह कटाक्षानं टाळला आहे.


‘व्यक्ती आणि विचार’ या पहिल्या प्रकरणाचे पाटलांनी सात पोटविभाग पाडले आहेत. त्यातल्या पहिल्यात मार्क्‍सचं बालपण, त्याची जडणघडण, जेनीबरोबरचे प्रेमप्रकरण, लग्न, मुद्रणाविषयीची त्याची मर्मदृष्टी, मार्क्‍सवरील हेगेल आणि लुडविग फोरवाखचा प्रभाव याविषयी लिहिलं आहे. दुस-यात, मार्क्‍सनं हेसकडून घेतलेली ‘शुद्ध तात्त्विक साम्यवादाची दीक्षा’, पॅरिसमधील वास्तव्य, एंगल्सशी ओळख आणि मैत्री आणि जेनी यांचा समावेश आहे. तिस-यात, आरंभीचा मार्क्‍सवाद, मार्क्‍सचा स्वभाव आणि लेखनशैली, बौद्धिक जडणघडण, हेगेलच्या तत्त्वज्ञानाचा मार्क्‍सनं लावलेला अन्वयार्थ इथपर्यंतचा भाग आहे. चौथ्यात, हेगेलकडून मार्क्‍सनं उसनवारीनं घेतलेल्या कल्पना, त्याचा जडवादाविषयीचा सिद्धांत; पाचव्यात मार्क्‍सच्या तात्त्विक संकल्पना; सहाव्यात हेगेलच्या दृष्टिकोनावरील आणि आधीच्या आर्थिक सिद्धांतावरील मार्क्‍सचे आक्षेप; आणि सातव्यात मत्ता आणि दुरावा याविषयीचं मार्क्‍सचं विवेचन यांचा आढावा आहे. थोडक्यात मार्क्‍सच्या विवेचनाचा, सिद्धांतांचा आणि त्याच्या आक्षेपांची सविस्तर ओळख या सात भागातून होते. पण ही चर्चा मुख्यत: तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील असल्यानं ती समजून घेणं थोडं जड जातं.


‘क्रांती : एक फसवी घोषणा’, ‘संवाद आणि विसंवाद’, ‘डाव्यांच्या बौद्धिक गोंधळातून बाहेर येण्यासाठी..’, ‘फसवी सत्ये’ आणि ‘मार्क्‍सवाद हाही एक धर्मपंथच’ ही या पुस्तकातल्या प्रकरणांची शीर्षकंच आपल्या मार्क्‍स आणि मार्क्‍सवादी तत्त्वज्ञानाविषयीच्या समजुतींना आणि समजांना उलटंपालटं करून टाकणारी आहेत.


‘क्रांती : एक फसवी घोषणा!’ या प्रकरणात ‘क्रांती’ या मार्क्‍स आणि मार्क्‍सवाद्यांच्या अतिशय हुकमी हत्याराची यथोचित चिरफाड केली आहे. ‘क्रांती’ या शब्दाच्या उत्पत्तीपासून मार्क्‍सला अभिप्रेत असलेल्या क्रांतिविषयक तीन संकल्पनांचा उलगडा केला आहे. ‘औद्योगिक क्रांती’, ‘हरित क्रांती’ हे शब्दप्रयोगच मुळात कसे निर्थक आहेत, हेही सांगितलं आहे. पाटलांच्या म्हणण्याच्या गर्भितार्थ असा आहे की, मार्क्‍सला अभिप्रेत असलेली क्रांती जगात अजून कुठंही घडलेली नाही आणि घडण्याची शक्यताही नाही. ते लिहितात,‘‘क्रांती हा शब्द अफूसारखा आहे. अनेक बुद्धिमंतांच्या व बुद्धिजीवींच्या मेंदूला त्या शब्दामुळे गुंगी येते; मग सामान्यांचा विचार न केलेलाच बरा! एवढे असूनही क्रांतीची कल्पना मोडीत निघण्याची मात्र शक्यता नाही.’’ समाजाचा उद्धार करावा, अशी महत्त्वाकांक्षा बाळगणारे आदर्शवादी बुद्धिजीवी समाजात आहेत, तोपर्यंत क्रांतीचे तत्त्वज्ञान मरणार नाही. कारण आधुनिक बुद्धिजीवींचं तेच एकमेव श्रद्धास्थान आहे, असा त्यांचा दावा आहे.


‘संवाद आणि विसंवाद’ या प्रकरणात पाटलांनी तीन नोव्हेंबर 1864 रोजी मिखाईल बाकुनिन यांनी कार्ल मार्क्‍स यांच्या घेतलेल्या शेवटच्या मुलाखतीचा सरळ अनुवाद छापून टाकला आहे. तिचं शीर्षक मात्र त्यांनी स्वत: दिलं असावं. कारण तोच त्यांचा या मुलाखतीचा अन्वयार्थ आहे. मलपृष्ठावर त्याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलं आहे,‘‘मिखाईल बाकुनिन याने मार्क्‍सची घेतलेली परखड मुलाखत म्हणजे मार्क्‍सची घेतलेली उलटतपासणीच आहे. ही मुलाखत म्हणजे संवाद आणि विसंवादाचा एकत्र आविष्कार आहे.’’


‘डाव्यांच्या बौद्धिक गोंधळातून बाहेर येण्यासाठी..’ या प्रकरणाची मांडणी पाटलांनी थोडय़ाशा आक्रमकपणे केली आहे. त्यांचा असा चढा स्वर केवळ याच प्रकरणात लागला आहे, पण तरीही त्यांचे युक्तिवाद तेवढेच समर्थ आहेत. सध्याच्या घडीला डावी विचारसरणी जगाचं आकलन करून घेण्यात आणि तिचं विश्लेषण करण्यात कशी कमकुवत झाली आहे, याची साधार मांडणी पाटलांनी केली आहे. ती अतिशय धारदार आहे. जगाचा व्यवहार दिवसेंदिवस अनाकलनीय होत चालला असला तरी डावे आपलीच पोथी प्रमाण मानत असल्यानं त्यांची कशी भंबेरी उडाली आहे हे सांगताना ते लिहितात, ‘‘..उजव्यांना विरोध करीत राहणे, हीच डाव्या राजकीय कृतीची परिसीमा आहे. या कोंडीतून कदाचित सुटका नसावी. तथापि, या संबंधात असे म्हणावेसे वाटते की, जोवर हा बौद्धिक संभ्रम असाच टिकून राहिल, तोवर आमचे बौद्धिक जीवनही तसे निकृष्ट राहिल.’’


‘फसवी सत्ये’ या प्रकरणात ‘काम मिळण्याचा हक्क’ ही कामगारांची मागणी समूहाच्या पातळीवर विचार करता कशी तर्कदुष्ट आहे याचं विवेचन आहे. पाटील म्हणतात, ‘‘काम मिळण्याचा हक्क कामगाराला आहे; पण काम न देण्याचा हक्क मालकाला नाही, असे काहीतरी हे तर्कशास्त्र असावे.’’ याच प्रकरणाच्या दुस-या भागात रूसो या विचारवंतानं मांडलेल्या ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेची उलटतपासणी केली आहे. ‘स्वातंत्र्य ही संकल्पना विरोधाभासात्मकतेवर आधारलेली गोष्ट आहे’ हा त्यातील प्रतिपाद्य विषय आहे.


‘मार्क्‍सवाद हाही एक धर्मपंथच’ हे शेवटचं प्रकरण तर कोणत्याही साचेबंद विचारसरणीची मेंदूवरील झापडं दूर करेल असं आहे. उदाहरणादाखल त्यातील काही वाक्येच पाहू- - मार्क्‍सवाद हा राजकीय कार्यक्रम वा प्रोजेक्ट आहे. इतिहास काही निश्चित नियमांना धरून पुढे पुढे सरकतो आणि मार्क्‍सला या नियमांचे पक्के पूर्वज्ञान आहे, हे यामागील गृहीतकृत्य. इतिहासाची विरोध-विकासात्मक वाटचाल, या वाटचालीतील कामगारवर्गाची भूमिका, हे सर्व वस्तुनिष्ठ आहे, असे तो मानतो. परंतु कामगारवर्गाला मार्क्‍सने दिलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका कामगारवर्ग घेऊ शकतो, ही गोष्ट मार्क्‍सने विचारातच घेतलेली नाही. (पान 339) - मार्क्‍स जरी सांगत असला की, शेवटी मानवजातीचे काय होणार आहे, हे इतिहासाने आधीच सांगून ठेवले आहे, तरी खरी गोष्ट अशी आहे की, माणसाचा उद्या, त्याचे भविष्य नेहमीच ओपन किंवा अनिर्णित असते. भूतकाळापासून आपण खूप शिकू शकतो, परंतु आपला भूतकाळच भविष्याला जन्म देईल, या प्रकारची भाकिते कोणीही काढू शकत नाही. कोणी काढली, तर ती भाकिते खोटी ठरण्याचीच शक्यता अधिक असते. (पान 340) - मार्क्‍सवाद आणि साम्यवाद दोन्हीही धर्मसंप्रदाय आहेत-ज्यू, ख्रिस्ती व इस्लाम या संप्रदायाइतकेच कडवे. ज्यू,ख्रिस्ती व इस्लाम धर्म परमेश्वराच्या आश्वासनांचा हवाला देतात; तर साम्यवाद इतिहासाच्या. परंतु चौघेही पुढे येणा-या ‘सुखी’ या अर्थाने परमेश्वरी राज्याचे आश्वासन देतात. (पान 341)


विश्वास पाटलांची ही विधानं अतिशय विचारशील आहेत हे खरे, पण ती मार्क्‍सवाद्यांच्या दृष्टीनं विवादास्पद आणि स्फोटक आहेत. पण इथं हेही स्पष्ट केलं पाहिजे की, त्यांनी आपल्या विधानांचं पुरेसं स्पष्टीकरण केलेलं आहे. अनेक नामवंत विचारवंतांची अवतरणं दिलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पाटलांची भाषा अतिशय नेमकी आणि नेटकी आहे. तिला उपमा, प्रतिमा आणि अलंकारांचा अजिबात सोस नाही. आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी त्यांनी कुठेही गैरलागू आणि असंबद्ध उदाहरणं दिलेली नाहीत. थोडक्यात या पुस्तकाची भाषा प्रगल्भ स्वरूपाची आहे. त्यामुळे ते थांबून थांबून काळजीपूर्वक वाचावं लागतं. म्हणून ते वाचकाकडून भरपूर वेळेची मागणी करतं.


त्या अर्थानं हे पुस्तक प्रगल्भ वाचकांचा घाम काढणारं आहे, त्याची दमछाक करणारं आहे..आणि मार्क्‍सवाद्यांना घाम फोडणारंही! निदान महाराष्ट्रात तरी अलीकडच्या काळात ‘मार्क्‍सवादा’ची इतकी परखड चिकित्सा इतर कुणी करू धजलेला नाही. कारण मार्क्‍सचं तत्त्वज्ञान हे कामगार वर्गाचं तत्त्वज्ञान बनवलं गेल्यानं मार्क्‍सच्या विरोधात बोलणं म्हणजे कामगार-शोषित-पीडित यांच्या विरोधात बोलणं आणि मार्क्‍सवाद्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘भांडवलदारांचा एजंट’ होणं, असं समीकरण तयार केलं गेलं आहे. त्यामुळे ते पातक स्वत:हून कोण कशाला ओढवून घेणार?


आता शेवटचा मुद्दा. ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे विश्वास पाटील यांचं पुस्तक बरंच गाजलं होतं. पण ते त्यांनी लं बाँ या फ्रेंच लेखकाचं ‘द क्राउड’ आणि एरिक हॉपर या अमेरिकन लेखकाचं ‘ट्रू बिलिव्हर’ या दोन पुस्तकांच्या आधारे लिहिलेलं होतं. तसा स्पष्ट उल्लेखही ते करत. परंतु त्या मूळ लेखनाचे जशास तसे भाषांतर न करता त्यातल्या प्रमुख मुद्दय़ांची ते मराठी वाचकांना समजेल अशा पद्धतीनं मांडणी करत. त्यामुळे मूळ लेखनाचा परिचय असलेल्या वाचकांना त्यात कधी कधी फार नवीन काही मिळतही नाही. पण प्रत्येक वाचकालाच काही जगातली तत्त्वज्ञानावरची सर्वच्या सर्व पुस्तकं वाचणं शक्य नसतं. अशा वाचकांसाठीच विश्वास पाटील लेखन करत. अनेक जगभरातल्या अनेक विचारवंतांच्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये विखुरलेल्या विचारांची ते सुसंगत पुनर्माडणी करतात. प्रस्तुत पुस्तकही त्याला अपवाद नाही. याही पुस्तकात पाटलांचं स्वत:चं फारच कमी आहे. प्रस्तुत पुस्तकात पाटलांनी जे काही लेखन केलं आहे, तेही जगातल्या त्या त्या क्षेत्रातले विचारवंत, अभ्यासक-संशोधक यांनी मांडलेल्या सिद्धांतांच्या आधारेच केलं आहे. त्यांनी मांडलेले अनेक मुद्दे सर इसाया बर्लिन ते मिर्सा एलियाड अशा अनेक विचारवंतांनी आधीच सांगितलेले आहेत. पण म्हणून काही या पुस्तकाचं महत्त्व कमी लेखण्याचं कारण नाही.


सुजाण आणि चांगलं काही वाचण्यासाठी आसुसलेल्या वाचकांसाठी हे पुस्तक मोठी बौद्धिक मेजवानी आहे. सध्याचं जागतिक राजकारण पाहता आणि जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये मार्क्‍सवादाचा झालेला पाडाव पाहता विश्वास पाटील यांचं हे पुस्तक अतिशय स्वच्छ आणि नवा दृष्टिकोन देणारं आहे. आजचं जग ज्या मार्क्‍सवादापलिकडच्या दिशेनं चाललं आहे, ती दिशा समजावून देणारं हे पुस्तक आहे. 
कार्ल मार्क्‍स - व्यक्ती आणि विचार विश्वास पाटील पद्मगंधा प्रकाशन, पुणे पाने- 344, किंमत- 280 रुपये

Sunday, April 3, 2011

विश्वासार्हतेची पंचवीस वर्षं‘फ्रंटलाइन’ला गेल्या वर्षी २५ वर्षा झाली, तेव्हा हा लेख लिहिला होता.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

प्रसिद्ध इतिहासकार आणि ‘इंडिया आफ्टर गांधी’ या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक रामचंद्र गुहा यांनी अलीकडेच ‘१९८४’ या सालाविषयी ‘द अ‍ॅक्सिस इयर’ या नावाचा एक लेख लिहिला आहे. त्याची सुरुवातच मुळी त्यांनी पुढील विधानाने केली आहे- When1984 finally did arrive, it was not an especially bad year for the countries that George Orwell had in mind.

काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी खरं तर दरवर्षीच घडत असतात. तशा त्या १९८४लाही घडल्याच. पण या वर्षाला भारतीय इतिहासात थोडं खास महत्त्व असण्याचं कारण म्हणजे, याच वर्षी इंदिरा गांधी यांची हत्या झाली. शाहबानो प्रकरण, भोपाळ दुर्घटना, महंमद अझरुद्दीनचा क्रिकेट संघात प्रवेश, हॅलेचा धूमकेतू, राकेश शर्माला पहिल्या भारतीय अवकाशयात्रीचा मान, बचेंद्री पालची एव्हरेस्ट चढाई, कोलकात्यात भारतातील पहिली मेट्रो रेल सेवा अशा काही घटना घडल्या त्याही १९८४लाच. यात एक छोटीशी चांगली घटना घडली, ती म्हणजे चेन्नईच्या ‘हिंदू ग्रूप ऑफ पब्लिकेशन’ने डिसेंबर ८४मध्ये ‘फ्रंटलाइन’ हे पाक्षिक सुरू केलं. ३१ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्याने ‘फ्रंटलाइन’चा पहिलाच अंक इंदिरा गांधींविषयीच होता. त्याच्या कव्हरस्टोरीचं शीर्षक होतं, ‘अ इयर ऑफ पोलिटिकल अपसेट्स.’

‘इंडियाज नॅशनल मॅगझिन’ अशी सार्थ टॅगलाइन असणा-या या पाक्षिकाला नुकतीच पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत.

‘फ्रंटलाइन’ हे इंग्रजीतील ‘युनिक’ म्हणावं असं पाक्षिक आहे आणि बहुधा एकमेवही. गंभीर आणि जबाबदार पत्रकारिता करणा-या ‘हिंदू’ ग्रूपच्या ते मालकीचं आहे. त्यामुळे ‘हिंदू’ वृत्तपत्राला जी प्रतिष्ठा आहे, तीच आणि तशीच पाक्षिक म्हणून ‘फ्रंटलाइन’ला आहे. ‘फ्रंटलाइन’ निर्विवादपणे एलिट क्लासचं पाक्षिक आहे. त्यातले सर्वच लेख गंभीर आणि सविस्तर असतात. हॉलिवुड-बॉलिवुड या गोष्टींना त्यात थारा नसतो. क्रिकेटविषयीही फारसं काही नसतं. क्रिकेट हा विषय गेल्या पंचवीस वर्षात ‘फ्रंटलाइन’च्या एकदाही कव्हरस्टोरीचा विषय होऊ शकलेला नाही! पॉप्युलर पत्रकारिता, पीत पत्रकारिता आणि चिप पत्रकारिता यापासून सदैव लांब राहण्याची दक्षता ‘फ्रंटलाइन’चे संपादक एन. राम यांनी घेतलेली आहे. त्यामुळे ‘फ्रंटलाइन’ला वाचकांचा अनुनय करण्याची गरज पडत नाही.

शोधवृत्तांत, चर्चा आणि भाष्य हे ‘फ्रंटलाइन’चं बलस्थान आहे. केवळ प्रादेशिक भाषांमध्येच (त्यात मराठीही आली) नव्हे तर इंग्रजीमध्येही पाक्षिक हा प्रकार चालत नाही. वर्तमानपत्र, साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक या चढत्या क्रमवारीत पाक्षिक आणि मासिकांच्या वाट्याला ‘लोकप्रियता’ आणि ‘ग्लॅमर’ या गोष्टी येत नाहीत. पण म्हणून त्यांचा दबदबा नसतो, असं मात्र नाही. ‘फ्रंटलाइन’ आणि ‘सेमिनार’ याची उत्तम उदाहरणं म्हणून सांगता येतील. बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक पाठराखण, विचारांचा आदर, सामाजिक बांधीलकी मानणारी पत्रकारिता आणि राजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक आणि बौद्धिक प्रश्नांविषयीची सजगता ही ‘फ्रंटलाइन’ आणि ‘सेमिनार’ची म्हणून खास वैशिष्ट्यं सांगता येतील.

‘फ्रंटलाइन’चं वेगळेपण असण्याची चार प्रमुख कारणं आहेत. एक, ते नियतकालिक पत्रकारिता गांभीर्याने घेतात. गंभीर पत्रकारितेचे सध्याच्या काळात आणि भविष्यात काय तोटे होऊ शकतात, हे माहीत असूनसुद्धा ‘फ्रंटलाइन’ हे जाणीवपूर्वक करत आहे. दोन, ‘फ्रंटलाइन’चा भर मुख्य विषयावर असतो. ‘बिहाइंड एव्हरी इश्यू, देअर्स अ डिपर इश्यू’ हा त्यांचा बाणा आहे. तिसरं, अमूक विषयाकडे कसं पाहावं, हा दृष्टिकोन देण्यावर ‘फ्रंटलाइन’चा जोर असतो. त्यामुळे त्यात सर्व प्रकारच्या विचारांच्या लेखांना स्थान दिलं जातं. भलेही मग ते संपादकीय धोरणाच्या विरोधात असलं तरी आणि चौथं कारण आहे, आपली स्वत:ची स्वतंत्र आणि वेगळी ओळख सातत्याने जपणं.

आणि असं सगळं असूनही ‘फ्रंटलाइन’ व्यावसायिक मूल्यांना कमी मानते, असंही नाही. उत्तम निर्मिती, चांगली छपाई, चांगला कागद आणि मांडणी याबाबत कसल्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. २००६मध्ये ‘हिंदू’ आणि ‘फ्रंटलाइन’ या दोन्हींचं रि-डिझायनिंग करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजल्या गेलेल्या गार्सिया मीडियाच्या टीमला बोलावण्यात आलं होतं. एकविसाव्या शतकाचा विचार करून मारिओ गार्सिया, जॉन मिलर आणि गुंटर झवेरिना यांनी ‘फ्रंटलाइन’चं दृश्यरूप बदलवलं. तेव्हापासून ते अधिक देखणं झालं आहे.

एखाद्-दुसरा चांगला अंक काढणं ही तशी तुलनेने सोपी गोष्ट असते, पण प्रत्येक अंक चांगला काढणं आणि सलग अनेक वर्ष त्यात सातत्य ठेवणं ही खूपच कठीण गोष्ट असते. सातत्य, समयसूचकता आणि अचूकता याबाबत स्वत:ला सतत अग्रेसर ठेवणं ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. ‘फ्रंटलाइन’ गेली २५ वर्ष तारेवरची कसरत करत आहे. त्यामुळे त्याचे मुख्य संपादक एन. राम आणि त्यांचे संपादकीय सहकारी आर. विजय शंकर, के. के. केशवर मेनन, व्ही. एम. राजेश्वर, के. जयंती, आर. कृष्णकुमार, सरबारी सिन्हा आणि सैन्यअल अब्राहम यांचं अभिनंदन करायला हवं.

सध्याचा काळ हा घटना, वास्तव आणि सत्य यांच्या सरमिसळीचा काळ आहे. ‘घटना’च जणू काही वास्तव आणि अंतिम सत्य आहेत, अशा पद्धतीने आपल्यापुढे मांडण्याचं काम काही प्रसारमाध्यमांकडून होत आहे. वास्तववादाशी फारकत आणि सत्याशी गफलत असणा-या सध्याच्या काळात ‘फ्रंटलाइन’ची विश्वासार्हता मात्र अबाधित आहे.

Saturday, April 2, 2011

तू माझी बायको हवी होतास, मर्दा!


गोष्ट पंधरा-वीस वर्षापूर्वीची आहे. मराठवाडय़ातल्या एका दुर्गम म्हणाव्या अशा खेडय़ातली. आमच्या घराशेजारी पारुबाई, त्यांचे पती धोंडिबा आणि त्यांची दोन गोजिरवाणी मुलं असं एक चौकोनी कुटुंब राहत होतं. त्यांची दहा-बारा एकर शेती होती. बागायती नव्हती, पण पैठणच्या डाव्या कालव्याचं पाणी होतं. त्यामुळे थोडीशी बागायत व्हायची, भाजीपाला व्हायचा. त्यात त्यांचं चालायचं. शिवाय दोन्ही मुलं, पांडू आणि पिंटू तसे लहान होते. चार आणि पाच वर्षाचे. पारुताई कष्टाळू होत्या. पाहावं तेव्हा त्या कामातच असायच्या. मग ते घरी असो नाही तर शेतात. आमचं आणि त्यांचं शेतही शेजारी शेजारी होतं. त्यामुळे पारुबाई काम करून थकत कशा नाहीत असा मला प्रश्न पडायचा. मी त्यांना कधी कधी विचारी, ‘पारुबाई, तुम्हाला कामाचा कंटाळा येत नाही का हो? बघावं तेव्हा तुम्ही आपलं कामात असता.’ त्यावर त्या म्हणत, ‘राजाभाऊ, आपण गरीब माणसं. काम केलं नाही तर खाणार काय? शेंदूर फासलेले देव तुमच्या पोटाला घालत नाहीत, ते आपलं आपल्यालाच बघावं लागतं.’
पारुबाई देवाबद्दल असं कडवट बोलत असल्या तरी त्या फार धार्मिक होत्या. पहाटे साडेचारला देवपूजा करूनच त्यांचा दिवस सुरू होई. शिवाय दिवसभर सतत तोंडात ‘बा पांडुरंगा, इठ्ठला’ असा जप चाललेला असे. याच्या उलट धोंडिबा. तो बघावं तेव्हा गावात कुठेतरी दारू पिऊन पडलेला असे किंवा दारूसाठी कुणाला तरी पैसे मागत असे. त्याची गयावया आणि पारुबाईचा कामाचा रामरगाडा पाहून लोक म्हणत, ‘हा गडय़ासारखा गडी पण दारू पिऊन गटारात लोळत पडतो आणि आमची पारुबाई घरी-शेतात राब राब राबते.’ सारं गाव धोंडिबाल्ली दोष देई, पण त्याला त्याचं काही वाटत नसे. शेजारीपाजारी, जुनेजाणते त्याला समजावण्याचा प्रयत्न करत. धोंडिबा तेवढय़ापुरतं ‘हो हो’ म्हणे. त्यांना आपल्या दोन्ही मुलांची शपथ घेऊन सांगे, पण ती संध्याकाळ संपली की, धोंडिबा सकाळीच भिल्लांच्या दारू- भट्टीची वाट उतरताना दिसे. पिऊन तर्र असे.


आमचे दादा धोंडिबाचे लहानपणापासूनचे मित्र. ते सांगत, ‘पूर्वी धोंडिबा असा नव्हता. कामाला वाघ होता. पण व्यसनापुढे माणसाचं काही चालत नाही. शेतीतल्या कामानं आंबून कधी तरी थोडीशी घेणारा धोडिंबा या थराला जाईल असं वाटलं नव्हतं..’ पण मी कधीच धोंडिबाला शेतात काम करताना पाहिलं नव्हतं. तो शेतात आला तरी दुपारचा, जेवायलाच. भाजी त्याच्या आवडीची नसली तर तिथंच पारुबाईला शिव्यांची लाखोली वाही. त्यांना धड जेवूही देत नसे. त्या तशाच रागारागात पंगतीतून उठत आणि डोळे पुसत कामाला लागत. मग रोजंदारीवर आलेल्या बायाबापडय़ा त्यांना काम करता करता चार घास खायला लावत. पण पारुबाई खमक्या होत्या. शेताली सगळी कामं त्या एकटय़ा करत. अगदी नांगरणी, कोळपणी, औत हाकणं, पेरणी. बैलगाडीत धान्याची पाच-पन्नास पोती गडय़ांच्या मदतीनं रचून त्या घरी आणत. शेतातली कष्टाची पुरुषांची सगळी कामं करत. त्यामुळे सगळ्या गावाला त्यांचं कौतुक होतं. खेडय़ातल्या बलुतेदारी आणि पुरुषप्रधान कृषीसंस्कृतीत पारुबाईंच्या धाडसाचं कौतुक जुन्याजाणत्यापासून तरुणांपर्यंत सर्वाना होतं. लोक म्हणत, ‘पारुबाईच्या हिमतीला मानलं पाहिजे राव. बाई चार पुरषांच्या तोंडात मारते गडय़ा!’


धोंडिबा गावातल्या सगळ्यांच्या निंदेचा, कुचेष्टेचा आणि हेटाळणीचा विषय झाला असला तरी पारुबाई मात्र त्याच्याबद्दल फारसं वाईट बोलत नसे. उलट त्याला कोणी शिव्याशाप दिलेले तिला चालत नसत. ती चूक कुणाची आहे हे ऐकून न घेता त्या माणसाचा उद्धार करत असे. त्याच्या नावानं बोटं मोडत, भयानक शिव्याशाप देई. पण धोिडबा रोज काहीतरी कुरापत करीच. मग लोक येऊन पारुबाईकडे गा-हाणं करत. पण संध्याकाळी शेतातून आल्या आल्या पारुबाईचा पहिला उद्योग असे, तो धोंडिबाला शोधून घरी आणण्याचा. अशा वेळी आई आम्हाला पारुबाईला मदत करण्यासाठी पिटाळत असे. मग आम्ही धोंिडबाला शोधून घरी आणत असू. पारुबाई त्याला विचारी, ‘सकाळपासून काही खाल्लं का नाही? का नुसती दारूच ढोसली? शिंक्यावर भाकरी-कोरडय़ास काय माझ्या सासऱ्यासाठी ठेवलं होतं? तुम्ही काऊन माझ्या आयुष्याचा पंचनामा मांडलाय? आत्ताच्या आत्ता या भाकऱ्या संपवा नाहीतर घरात घेणार नाही उद्यापासून.’ धोंडिबानं सकाळ न्याहारी केलेली असे. दुपारी तो घरीच येत नसे तर जेवणार केव्हा? मग तो अधाश्यासारखा आमच्यासमोर भाक-या खाई. पारुबाई त्याच्याकडे प्रेमानं पाहत म्हणे, ‘आता कसं शहाण्यासारखं वागलात. रोज असंच वागायला काय होतं?’


अशी पाच-सहा वर्षे तरी गेली असतील. पारुबाईची दोन्ही मुलं मोठी होऊन शाळेत जाऊ लागली. दोघेही अतिशय हुशार. पण त्यांच्या शिक्षणाचा खर्च, शेतीचा लहरीपणा वाढतच चालला होता. धोंडिबाची स्थिती ‘जैसे थे’च होती. गावातल्या लोकांनी पुढाकार घेऊन त्याला औरंगाबाद, पुणे, मुंबई इथल्या दवाखान्यात दाखवून आणलं, स्वत:बरोबर त्याला दोन-चार वेळा पंढरपूरच्या वारीला घेऊन गेले. पारुबाईही त्याची दारू सुटावी म्हणून वेगवेगळ्या देव्यांना नवस बोली. पण पालथ्या घडय़ावर पाणी. दहा-पंधरा दिवसानंतर धोंडिबा पुन्हा दारू प्यायला लागे. वय वाढत चाललं तशी पारुबाई चिडचिडय़ा होऊ लागल्या. शेतातून घरी आल्या आणि धोंडिबा घरी नसला की, त्या त्याला असेल तिथून पराफरा ओढत आणत. शिव्याशाप देत आरडाओरडा करत. एकदा दारातच धोंडिबाला म्हणाल्या, ‘तुम्ही पुरषासारखे पुरुष पण काय उपेग तुमचा? नुसतं ढोसायला पाह्यजे, कामाला नगं. तू माझी बायको हवी होतास, मर्दा! आणि मी तुझा नवरा.’ पारुबाईचा हा अवतार नवा होता. आजवर त्या असं कधीच बोलल्या नव्हत्या. आम्ही गंमत म्हणून रात्री आजीला सांगितलं. आमच्या आजीबाईही थोरच! त्यांनी सकाळी सकाळी पारुबाईला बोलावून घेतलं आणि दम दिला की, ‘पारे, तुला काही कळतं का? नवऱ्याला असं बोलतात? काही झालं तरी तो तुझ्या कुंकवाचा धनी हाय. भवाने, तूच त्याचा असा कचरा केलास तर त्या पुरषाची काय इज्जत राहिल गावात?’ पारुबाईच्या डोळ्यात टपाटपा पाणी आलं. आजीच्या गळ्यात पडून त्या म्हणाल्या, ‘गंगूबाई, रागाच्या भरात बोलले. चुकी झाली. असं परत बोलणार नाय.’


पण गावातले लोक म्हणाले, ‘पारुबाई, बोलली ते बरोबरच आहे. धोडिंबा मेंगळटच आहे. पारूबाई एवढं राबराबती आणि हा शहाणा तिच्या जीवावर दारू ढोसत राहतो नुसता.’


पण काही दिवसांनी पारुबाईंनी परत ‘तू माझी बायको हवी होतास, मर्दा! आणि मी तुझा नवरा.’ असे खडे बोल धोंडिबाला सुनावलेच. हळूहळू ते रोजचंच झालं. एक आमची आजी सोडली तर इतर कुणालाच त्याचं काही वाटेनासं झालं. कारण पारुबाईंच्या म्हणण्यात खोटं तर काहीच नव्हतं. उलट ‘चार पुरषांच्या तोंडात मारणारं काम करते राव पारुबाई!’ असंच सगळं गाव म्हणत होतं.. आणि आम्हा मुलांसाठी तर पारुबाईचा हा डायलॉग ‘शोले’तल्या ‘कितने आदमी थे रे कालिया’सारखा खेळण्याचा विषय झाला. कुणाला नीट काम करता आलं नाही किंवा जमलं नाही की आम्ही पोरं म्हणत असू ‘तू माझी बायको हवी होतास, मर्दा! आणि मी तुझा नवरा.’


आता पारुबाईंच्या पांडू आणि पिंटू या दोन्ही मुलांची लग्नं झालीत. दोन्ही गुणी आणि कष्टाळू आहेत आणि सुनाही. धोंडिबाही मुलांच्या धाकानं आपोआपच सुधारला. पण पारुबाईला अजूनही मुलांनी त्याला उलटं बोललेलं चालत नाही. ती मुलांवर रागावते, ‘मेल्यांनो, तो माझा नवरा हाय. त्याला शबद बोलायचा काम नाही तुमचं. त्याच्या जोरावरच तुम्हाला एवढं लहानचं मोठं केलं.’
पारुबाईच्या या अजब तर्कशास्त्राचं आणि धोंडिबावरच्या अजोड प्रेमाचं कोडं मला अजूनही उलगडत नाही.