Tuesday, December 23, 2014

आशिक मस्त फकीर

चंद्रकांत खोत हे कवी-कादंबरीकार-संपादक तर होतेच, पण त्यांची खरी ओळख 'आशिक मस्त फकीर' अशीच आहे. त्याचे कारण त्यांची जगण्यावरची आशिकी. ती शेवटपर्यंत कमी झाली नाही, त्यापायी त्यांनी फकिरीचीही फिकीर केली नाही. लघुअनियतकालिकांच्या चळवळीतले एक शिलेदार, 'अबकडई' या प्रयोगशील दिवाळी अंकाचे संपादक आणि आध्यात्मिक चरित्र कादंबऱ्या लिहिणारे लेखक असे त्यांच्या आयुष्याचे तीन टप्पे दाखवता येतीलही, पण या तिन्हींचा कोलाज त्यांच्यामध्ये कायमच वस्ती करून होता. इतके त्यांचे व्यक्तिमत्त्व गुंतागुंतीचे होते. त्यांच्या 'उभयान्वयी अव्यय', 'बिनधास्त', 'विषयांतर' या बोल्ड कादंबऱ्यांनी सत्तरच्या दशकात खळबळ उडवून दिली. त्यातील लैंगिकतेच्या उल्लेखांमुळे त्यांवर टीकाही झाली. लैंगिकतेचे उघडेनागडे दर्शन घडवण्याच्या बाबतीत त्यांचे भाऊ पाध्ये यांच्याशी नाते जुळते. समाजमान्य संकेत धाब्यावर बसवत त्यांनी तथाकथित संस्कृतिरक्षकांना अंगावर घेत आव्हान दिले होते. 'अबकडई' या दिवाळी अंकाचे संपादकही खोतांची ओळख अधिक सघन आणि समृद्ध म्हणावी अशी आहे. दिवाळी अंकांच्या रूढ चौकटींना फाटा देत त्यांनी १९७३ ते ९४ या काळात डायरी, आत्मकथा, मुलाखती या विशेषांकांसह तर्कातीत अनुभव, चमत्कार, पुनर्जन्म, श्रद्धा-अंधश्रद्धा, देव-धर्म अशा वेगवेगळ्या विषयांवर २१ दिवाळी अंक काढले. दुर्गा भागवत, विश्वास पाटील ('नवी क्षितिजे'कार), डॉ. श्रीराम लागू अशा अनेक मान्यवरांना या अंकांतून लिहिते केले, तर श्री. ना. पेंडसे यांच्यासारख्या काही मान्यवरांचे खास लिहून घेतलेले लेख आवडले नाहीत म्हणून त्यांना मानधन देऊन ते न छापण्याचे मराठीला अनोळखी असलेले धाडसही दाखवले. या अंकासाठी खोत वर्षभर मेहनत घेत. त्यामुळे हे अंक दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत आपल्या लखलखीत वेगळेपणाने उठून दिसत. यानंतरच्या टप्प्यावर खोत आध्यात्मिक लेखनाकडे वळले. 'दोन डोळे शेजारी', 'अनाथांचा नाथ', 'गण गण गणात बोते', 'संन्याशाची सावली' यांसारख्या चरित्र कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्याआधी त्यांच्याच म्हणण्यानुसार पद्मा चव्हाण नावाचे कांड घडले. ते त्यांच्या आयुष्यातील एक जीवघेणे वळणच. नंतर ते अज्ञातवासातच गेले. काही दिवसांनी ते भगव्या वेशात आर्थर रोडशेजारच्या एका मंदिरात सापडले. त्या अवस्थेतून त्यांना अलीकडच्या काळात लौकिकावस्थेत आणण्याचे प्रयत्नही झाले. नुकतेच त्यांच्या तिन्ही कादंबऱ्यांचे पुनर्मुद्रण झाले. त्यांना एक-दोन पुरस्कार मिळाले. त्यांची पंचाहत्तरीसुद्धा साजरी झाली. त्यांच्यावरच्या पीएच.डी.चे पुस्तकही प्रकाशित झाले. थोडक्यात, खोतांचे लेखन आणि आयुष्य दोन्हीही वादळी राहिले. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे- म्हणजे डाव्या विचारसरणीकडून उजव्या विचारसरणीकडे- झालेला प्रवास, लैंगिकतेविषयाच्या भावनांचे उघडउघड समर्थन करणारा कवी-कादंबरीकार आणि सत्तरच्या दशकातील मुंबईतल्या चाळजीवनाचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारा लेखक व्हाया आध्यात्मिक कादंबऱ्या, संन्यासी वृत्ती ते पुन्हा लेखक म्हणून उभे राहू पाहण्याची धडपड, ही खोतांच्या आयुष्याची उलथापालथ बुचकळ्यात टाकणारी आहे. सात्त्विक प्रवृत्तीच्या माणसांविषयी जसे भारतीय- विशेषत: महाराष्ट्रीय लोकांना आकर्षण असते तसेच काहीसे तामसी प्रवृत्तीच्या लोकांबद्दलही असते. खोतांचा प्रवास तर सात्त्विक- तामसी- सात्त्विक असा झाला. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती बरेच गूढ आणि अनाकलनीय प्रश्नांचे जाळे आहे. माणूस आणि लेखक म्हणून खोत आव्हानात्मक आहेत. अशा व्यक्तिमत्त्वांचा धांडोळा घेत त्यांची उकल करून दाखवण्याचे धाडस कुणी तरी दाखवायला हवे. तसे झाले तर खोत यांचा थांग लागू शकेल.

Saturday, December 20, 2014

...निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

डिसेंबर हा महिना जगभरातल्या वाचकप्रेमींसाठी काहीसा कुतूहलाचा असतो, कारण या महिन्यात जगभरातली- विशेषत: इंग्रजीतील अनेक नियतकालिके, वर्तमानपत्रं त्या वर्षांतील बेस्ट पुस्तकांच्या याद्या जाहीर करतात. परंपरागत वार्षिक प्रथेप्रमाणे या वर्षीच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत, होत आहेत. 'पब्लिशर्स वीकली', 'द गार्डियन', 'गुड रीडस् डॉट कॉम', 'अॅमेझॉन डॉट कॉम', 'द टेलिग्राफ', 'द न्यू यॉर्क टाइम्स', 'किरकस रिव्ह्य़ू', 'मदर जोन्स' (प्रसिद्ध अमेरिकन न्यूज-फीचर्स एजन्सी), 'टाइम', 'वॉशिंग्टन पोस्ट', 'द ग्लोब अँड मेल', 'हफिंग्टन पोस्ट' अशा कितीतरी नियतकालिकांनी आपापल्या याद्या जाहीर केल्या आहेत. कथा, कादंबरी, कविता, ललितेतर, वैज्ञानिक, अनुवादित अशा विविध विषयांतील पुस्तकांच्या स्वतंत्र आणि एकत्रित याद्यांचा त्यात समावेश आहे. या वर्षांतील रशियन भाषेतील बेस्ट, चायनीजमधील बेस्ट अशाही याद्या काहींनी प्रकाशित केल्या आहेत.
या याद्या कितपत विश्वासार्ह असतात, असा प्रश्न काहींना पडू शकतो किंवा असाच प्रश्न 'या याद्या खरोखर मार्गदर्शक असतात काय?' असा बदलून घेतला तर काय दिसतं? आधी काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. एक, या याद्या व्यक्तिसापेक्ष वा संस्थासापेक्ष असतात. दुसरं, 'अॅमेझॉन', 'गुड रीडस'सारख्या याद्यांमध्ये प्रकाशक, लेखक यांचं लॉबिंग असतं. या यादीत आपलं पुस्तक यावं, ते अमुक क्रमांकावर यावं इतक्या बारक्या बारक्या गोष्टींसाठीही लॉबिंग केलं जातं. तिसरं, यातल्या कुठल्याही याद्या एकमेकांशी फारशा जुळत नाहीत. म्हणजे बेस्ट नॉन फिक्शनच्या दोन याद्या एकमेकींशी ताडून पाहिल्या तरी हा फरक लक्षात येतो. चौथं, या याद्या सरसकट बनचुक्या असतात असंही नाही. त्यातली काही पुस्तकं ही खरोखर चांगलीही असतात. पाचवं, इंग्रजीत वर्षभरात जगभर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या अवाढव्य असते. (उदा. भारतात इंग्रजीत प्रकाशित होणारी पुस्तकं ही ६०-७० हजारांच्या घरात असतात, असं म्हटलं जातं.) त्यामुळे त्यातल्या काही महत्त्वाच्याच पुस्तकांची चर्चा, परीक्षणं प्रसारमाध्यमांतून येणं शक्य असतं. त्यामुळे अनेकदा या याद्यांमध्ये त्या वर्षांतली चांगली, पण प्रसारमाध्यमांमध्ये चर्चिली न गेलेली पुस्तकं असतात. काही वेळा खूप चर्चिली गेलेलीही पुस्तकं असतात. आणि सहावं, कुठल्याही यादीत निवडलेल्या पुस्तकांचा संक्षिप्त परिचय दिलेला असतोच. त्यामुळे त्या पुस्तकाची साधारण कल्पना येते. शिवाय त्या पुस्तकाविषयीची आणखी माहिती, त्याविषयीची परीक्षणे इंटरनेटवर शोधून, वाचून त्या पुस्तकांचा बऱ्यापैकी अंदाज बांधता येतो.
'वॉशिंग्टन पोस्ट'ने टेन बेस्ट, फिक्शन, ग्राफिक नॉव्हेल, रोमान्स, थ्रिलर, ऑडियो बुक्स अशा पाच-सहा याद्या प्रकाशित केल्या आहेत. त्यातील पहिल्या यादीतील जवळपास सर्वच पुस्तकं चांगली म्हणावीत अशी आहेत. 'अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ सेव्हन किलिंग्ज', 'फोर्थ ऑफ ज्युली क्रीक', 'द नॅरो रोड ऑफ द डीप नॉर्थ', 'द पेइंग गेस्ट्स', 'स्टेशन इलेव्हन' ही त्यातील पहिली पाच पुस्तकं. यात अतुल गवांदे यांच्या 'बिइंग मॉर्टल'चा, बर्लिनचा इतिहास सांगणाऱ्या 'पोर्ट्रेट ऑफ अ सिटी थ्रु द सेंच्युरीज'चा आणि ढासळत्या पर्यावरणाची जाणीव करून देणाऱ्या 'अननॅचरल हिस्ट्री' या तीन पुस्तकांचाही समावेश आहे. या यादीचं वैशिष्टय़ म्हणजे ही यादी कुणा एकाने केली नसून ती दहा वेगवेगळ्या समीक्षकांनी मिळून बनवली आहे.
'गुडरीडस्'ने तर वीस साहित्य प्रकारांतल्या पुस्तकांच्या याद्या प्रकाशित केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी वाचकांकडूनच त्यांची पसंती मागवली होती. त्यानुसार 'ललित' प्रकारात 'लँडलाइन'ला ४६,१५४, 'ललितेतर' प्रकारात 'द ऑपोझिट ऑफ लोन्लीनेस'ला १९,७९३, 'आत्मचरित्रां'मध्ये 'द स्टार वोन्ट गो आऊट'ला २७,८५०, तर 'कवितां'मध्ये 'लल्बीज'ला ९,५७१ वाचकांची पसंती मिळाल्याने या पुस्तकांनी त्या त्या प्रकारात पहिला क्रमांक पटकावला आहे.
'अॅमेझॉन डॉट कॉम'ने १०० बेस्ट सेलर पुस्तकांची यादी जाहीर केली असली तरी त्यांची वेबसाइट सातत्याने पाहणाऱ्यांच्या लक्षात येईल की, ती फारच घाऊक प्रमाणात केली आहे. कारण त्यातील 'स्ट्रेंग्थ फाइंडर २.०', 'फ्रोझन लिटल गोल्डन बुक', 'लाफ-आऊट जोक्स फॉर किडस', 'द फॉल्ट इन अवर स्टार्स', 'डायरी ऑफ व्हिम्पी किड' ही सुरुवातीची काही पुस्तकं गेली काही महिने तरी याच क्रमानं होती आणि यातील बहुतांश पुस्तकं ही मुलांसाठीची आहेत. त्यामुळे ही यादी फारशी जमेस धरता येत नाही.
'द टेलिग्राफ'ने 'बेस्ट नॉव्हेल्स अँड फिक्शन बुक्स' या प्रकारात ३३ पुस्तकांची नावं दिली आहेत. ही संपूर्ण यादी समीर रहीम यांनी केली आहे. प्रत्येक पुस्तकाबद्दल अगदी नेमका- एका ओळीचा- अभिप्राय नोंदवत त्यांनी आपलं भाष्य केलं आहे. रहीम हे टेलिग्राफचे सहायक ग्रंथ संपादक आहेत. गेली पाच-सहा र्वष ते साहित्य पत्रकारिता करत आहेत. वेगवेगळ्या निवड समित्यांवरही त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे त्यांची यादी वेगळी नक्कीच आहे.
'द न्यू यॉर्क टाइम्स'ने २० बेस्टसेलर पुस्तकांची यादी १४ डिसेंबर रोजी प्रकाशित केली आहे. 'होप टू डाय', 'ग्रे माऊंटेन', 'द एस्केप', 'रिव्हावल', 'टॉम क्लान्सी - फुल फोर्स अँड इफेक्ट' ही त्यातील पहिली पाच पुस्तकं. या पुस्तकांविषयी जेमतेम एका ओळीचा अभिप्राय नोंदवल्याने आणि ही नेमकी कुणी यादी केली आहे, त्यावर वाचकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, याविषयी काहीही न सांगितल्याने या यादीतल्या पुस्तकांमागची बुकंबातमी जाणून घेण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार.
'द गार्डियन'ने बेस्ट पॉप्युलर सायन्सची यादी १८ डिसेंबर रोजी प्रकाशित केली आहे. त्यात 'हाऊ नॉट टू बी राँग- द पॉवर ऑफ मॅथेमॅटिकल थिंकिंग', 'विझार्ड्स, एलियन्स अँड स्टारशिप्स - फिजिक्स अँड मॅथ इन फँटसी अँड सायन्स फिक्शन', 'अॅलन टर्निग- द एनिग्मा', 'तम्बोरा - द इरप्शन दॅट चेंज्ड द वर्ल्ड' अशा बारा पुस्तकांचा समावेश आहे. त्याविषयी अकरा वाचकांनी आपली मतं नोंदवली आहेत. त्यातल्या अध्र्या लोकांनी या यादीविषयी असहमती दाखवली आहे. त्यातल्या काहींनी ही यादी अॅमेझॉनवरील यादीची कट- पेस्ट आवृत्ती असल्याचीही टीका केली आहे. एकानं म्हटलंय की, युरोपात गणित शिकवलं जात नाही. त्यामुळे या यादीचा काही उपयोग होणार नाही. जे शिकवलंच जात नाही ते वाचलं कुठून जाणार?
सरतेशेवटी 'पब्लिशर्स वीकली'बद्दल. हे साप्ताहिक १८७२ पासून न्यूयॉर्कहून प्रकाशित होत आहे. त्याचा खप पंचवीस हजारांहून अधिक आहे. यात अमेरिकेतील ग्रंथव्यवहाराची इत्थंभूत माहिती असते. हे साप्ताहिक ग्रंथजगतात बऱ्यापैकी विश्वासार्ह आणि नि:पक्षपाती मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या यादीकडे गांभीर्यानं पाहायला हरकत नाही. 'पब्लिशर्स वीकली'ने वीस बेस्ट पुस्तकांची यादी दिली आहे. प्रत्येक पुस्तकाची थोडक्यात माहिती दिली आहे. ज्यांना त्या पुस्तकाविषयी सविस्तर जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी त्या पुस्तकाच्या 'पब्लिशर्स वीकली'मध्येच प्रकाशित झालेल्या परीक्षणाची लिंकही दिली आहे. ही सोय इतर कुठल्याही यादीमध्ये नाही. यामुळे त्या पुस्तकाविषयी लगोलग साक्षेपानं जाणून घेता येतं. 'ऑन इम्युनिटी - अॅन इन्कोल्यूशन', 'थर्टीन डेज इन सप्टेंबर', 'द कॉर्प्ससे एक्झिबिशन', 'लिमोनोव्ह' आणि 'दोज हू लीव्ह अँड दोज हू स्टे' ही त्यातील पहिली पाच पुस्तकं.
हा मागोवा अगदी थोडक्यात आणि स्थूलरूपात आहे हे खरं, पण यातून आपल्या आवडीनिवडी, प्राधान्यक्रम ठरवायला, क्वचितप्रसंगी आपल्याकडून निसटलेल्या पुस्तकांविषयी जाणून घ्यायला मदत होईल. बघायला तर सर्वच हवं पण त्यातून आपलीही निवड करायला हवी. 'फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!' ही केशवसुतांची वृत्ती या याद्याकर्त्यांमध्ये जशी डोकावते तशी या याद्या वाचून तिचा शिरकाव आपल्यात झाला तर त्यातून योग्य ते पाखडून घेता येईलच.

Saturday, November 22, 2014

एका पुस्तकापायी...

गोष्ट आहे ८० वर्षांपूर्वीची. उर्दूमध्ये १९३२ साली नऊ कथा आणि एका एकांकिकेचा संग्रह 'अंगारे' या नावानं प्रकाशित झाला. भारतीय मुस्लिमांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रतिगामीपणाचा बुरखा फाडणारं हे लेखन सज़्‍जाद ज़्‍ाहीर, अहमद अली, रशीद जहाँ आणि महमूद-उझ-ज़्‍ाफर या पंचविशीच्या आतल्या चार लेखकांनी केलं होतं. यात ज़्‍ाहीर यांच्या पाच कथा, अली यांच्या दोन, जहाँ यांची एक कथा व एक एकांकिका आणि ज़्‍ाफर यांची एक कथा यांचा समावेश होता. नोव्हेंबर १९३२ मध्ये लखनौमधून या संग्रहाचं प्रकाशन करण्यात आले. त्याच्या एक हजार प्रती छापण्यात आल्या. किंमत होती चार आणे. एवढुसं पुस्तक पण ते प्रकाशित झालं आणि उत्तर भारतात हलकल्लोळ माजला. इस्लाम आणि मुसलमानांच्या विरोधात पाश्चात्त्य शिक्षणाने डोकं फिरलेल्या उन्मादी तरुणांचं हे षड्यंत्र आहे, हा इस्लाम आणि मुसलमानांना बदनाम करण्याचा डाव आहे, अशी भूमिका काही समाजकंटकांनी घेतली. धार्मिक संघटनांनी या पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घालण्याची आणि लेखकांना शिक्षा करण्याची मागणी केली. काही लोकांनी या पुस्तकाच्या लेखकांवर कारवाई करण्यासाठी फंड गोळा केला. फेब्रुवारीमध्ये झालेल्या शिया परिषदेमध्ये लेखिका डॉ. रशीद जहाँ यांच्यावर ठपका ठेवला गेला. एक मुस्लीम स्त्री धर्माच्या आणि मुस्लिमांच्या श्रद्धास्थांनांच्या विरोधात लिहिते ही गोष्ट तत्कालीन समाजाच्या पचनी पडण्यासारखी नव्हती. 'अंगारेवाली रशीद जहाँ' असं त्यांचं नावच पडलं.
शेवटी ब्रिटिश सरकारने १५ मार्च ३३ रोजी आय.पी.सी. कलम २९५ ए अंतर्गत पुस्तक जप्त करण्याचे आदेश दिले. सरकारी रेकॉर्डसाठी पाच प्रती ठेवून बाकी साऱ्या प्रती जाळून टाकण्यात आल्या. म्हणजे नोव्हेंबर १९३२ मध्ये हा संग्रह प्रकाशित झाला आणि मार्च १९३३ मध्ये -म्हणजे अवघ्या चार महिन्यांनी- त्यावर बंदी आली. याशिवाय पुस्तक लेखकांना सामाजिक बहिष्काराला, धार्मिक-उग्र संघटना यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पण चारही लेखकांनी कुठल्याही प्रकारे माफी मागायला विरोध केला. ते आपल्या मतावर शेवटपर्यंत ठाम राहिले.
या पुस्तकानं उर्दू साहित्यात क्रांती केली. कथालेखनाला नवी दिशा दिली. एवढंच नव्हे तर सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई, कैफ़ी आज़्‍ामी, हसन असकरी यांसारख्या अनेक लेखकांना प्रेरणा दिली. उर्दूमध्ये धार्मिक- सामाजिक रूढींबद्दल आणि स्त्री-पुरुष संबंधांबद्दल मोकळेपणानं लिहिण्याची परंपरा याच पुस्तकानं सुरू केली. या पुस्तकाचा प्रभाव हिंदी कथालेखनावरही पडला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या लेखनाचा प्रसार-प्रचार करण्याच्या हेतूनं एप्रिल १९३६ मध्ये प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्यात या पुस्तकाचे लेखक आघाडीवर होते. त्यांच्या पहिल्या संमेलनाला प्रेमचंद यांना बोलावण्यात आलं... ते आलेही.
थोडक्यात धार्मिक उन्माद आणि कर्मठ सामाजिक रूढींच्या विरोधात ब्र उच्चारण्याची प्रेरणा देणारं हे पुस्तक. पण दुर्दैवानं त्यानंतर या संग्रहाचं बराच काळ उर्दूमध्ये पुनर्प्रकाशन होऊ शकलं नाही आणि त्याचा इतर भाषांमध्येही अनुवाद होऊ शकला नाही. १९९५ साली प्रोग्रेसिव्ह रायटर्स
असोसिएशननं त्याचं पुनर्प्रकाशन  केलं, तर १९९० मध्ये शकील सिद्दिकी यांनी त्याचा हिंदी अनुवाद केला.
 


त्यानंतर आता या पुस्तकाचे एकाच वेळी दोन इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाले आहेत. हे दोन्ही अनुवाद थेट उर्दूमधून केले आहेत. पहिला अनुवाद विभा चौहान व खालीद अली यांनी केला असून तो 'अंगारे- ९ स्टोरीज अ‍ॅण्ड अ प्ले' या नावाने प्रकाशित झाला आहे, तर दुसरा अनुवाद स्नेहल सिंघवी यांनी केला असून तो 'अंगारे' या नावाने प्रकाशित झाला आहे. त्याच्या मुखपृष्ठावर 'द फर्स्ट- एव्हर इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ द बॅन्ड शॉर्ट-स्टोरी कलेक्शन' असं छापलं आहे. दोन्हींचे प्रकाशक वेगवेगळे आहेत. 

सज़्‍जाद ज़्‍ाहीर यांची मुलगी नादिरा बब्बर यांनी 'अंगारे- ९ स्टोरीज अ‍ॅण्ड अ प्ले'ला प्रस्तावना लिहिली आहे. तर खालिद अली यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असून त्यात त्यांनी संग्रहातील चारही लेखकांचा परिचय, पुस्तकावरून उठलेलं वादळ, त्याविषयी उर्दू वर्तमानपत्रांमध्ये लिहिले गेलेले लेख आणि अनुवाद करण्यामागची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. हे पुस्तक पेपरबॅक या प्रकारातलं असल्यानं त्याची किंमत माफक म्हणावी अशी आहे.
याउलट स्नेहल सिंघवी यांचा अनुवाद हार्ड बाऊंड असल्यानं तो जरा महाग आहे. त्यांनीही आपल्या मनोगतात या पुस्तकानंतरच्या वादळाचा थोडक्यात इतिहास दिला आहे. याशिवाय मूळ उर्दू पुस्तकाचं मुखपृष्ठ दिलं आहे. अनुवाद करताना त्यांनी मूळ पुस्तकाची शैली सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. परिशिष्टामध्ये तत्कालीन पोलिसांचं तक्रारपत्र, सेक्रेटरीचं पत्र आणि ज़्‍ाफर यांनी इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिलेला लेख दिला आहे. दोन्हींची मुखपृष्ठं वेगळी आहेत. दोन्ही पुस्तकांच्या अनुवादकांनी मूळ वादाविषयी लिहिलं असलं तरी त्याची पुनरावृत्ती फारशी झालेली नाही. 
प्रश्न निर्माण होतो की,  वाचक म्हणून यापैकी कुठलं पुस्तक घ्यावं? तुम्ही हिंदी-उर्दूशी थोडेफार परिचित असाल तर आणि भारतीय इंग्रजी वाचणं एन्जॉय करू शकत असाल तर  'अंगारे- ९ स्टोरीज अ‍ॅण्ड अ प्ले' हे पुस्तक घ्यायला हरकत नाही. पण तुमचं प्राधान्य चांगला अनुवाद, चांगली इंग्रजी भाषा यांना असेल तर मात्र तुम्ही स्नेहल सिंघवी यांचं -थोडं महाग असलं तरी- पुस्तक घ्यावं.
एकच पुस्तक दोन वेगवेगळ्या लेखकांनी एकाच भाषेत एका वेळी अनुवादित करण्यामागं नेमकं काय कारण असावं? सध्या भारतात पुस्तकांवरील सेन्सॉरशिप वाढते आहे. दिनानाथ बात्रा हे त्यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव आहे. पण केवळ 'बात्रांचाच खतरा' आहे, असं नाही. आपल्या श्रद्धेय विषयावरील टीकात्मक लेखन स्वीकारण्याची भारतीय समाजाची मानसिकताच संकुचित होत चालली आहे. आणि त्याला हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, असा कुठलाही धर्म वा त्यांतील समाजगट अपवाद नाहीत. या पाश्र्वभूमीवर आपल्या लेखनाचा निडरपणे पुरस्कार करणाऱ्या, त्यावर ठाम राहणाऱ्या आणि कुठल्याही दबावाला बळी न पडणाऱ्या लेखकांचं 'अंगारे' हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. उर्दू साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या या पुस्तकापासून लेखकांना धैर्याची प्रेरणा मिळो आणि समाजकंटकांना सद्बुद्धी सुचो.
--------------------------
अंगारे  : अनुवाद - स्नेहल सिंघवी, पेंग्विन बुक्स, गुरगाव, पाने : १६७, किंमत : ४९९ रुपये.

--------------------------
अंगारे  : अनुवाद - विभा एस. चौहान, खालीद अल्वी, रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने : १०५, किंमत: १९५ रुपये.

Sunday, November 9, 2014

कादंबऱ्यांतली बर्लिन भिंत

९ नोव्हेंबरला बर्लिन भिंत पाडायला सुरुवात केल्याच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने बर्लिनमध्ये वेगवेगळ्या सफरी, व्याख्याने, चित्रपटांचे खेळ असे बरेच कार्यक्रम होत आहेत. याच आठवडय़ात ब्रिटिश कादंबरीकार केन फॉलेट यांची 'हॅपी कोइन्सिडन्स' ही कादंबरी जर्मनीत प्रकाशित झाली असून ती लोकप्रिय ठरली आहे. शीतयुद्धाच्या पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या या कादंबरीमध्ये बर्लिन भिंतीच्या कोसळण्याचा बराच इतिहास आहे. सत्यकथा, फोटोंतून उलगडणारा इतिहास आणि ग्राफिक नॉव्हेल अशी वैशिष्टय़ं असणारी ही कादंबरी सध्या चर्चेचा विषय झाली आहे. त्यानिमित्ताने बर्लिन भिंतीला मध्यवर्ती ठेवून लिहिलेल्या इतर काही कादंबऱ्यांची संक्षिप्त ओळख करून घेणं रोचक ठरेल.

प्रसिद्ध ब्रिटिश गुप्तचर कादंबरीकार जॉन ले कॅरे यांच्या 'द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड' या १९६३ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीला त्या वर्षीचा 'बेस्ट क्राइम नॉव्हेल' हा पुरस्कार मिळाला, तसेच १९६५ साली या कादंबरीवर चित्रपटही आला- ज्यात रिचर्ड बर्टन यांनी नायकाची भूमिका केली आहे. शीतयुद्धाच्या भराचा काळ. पूर्व-पश्चिम जर्मनीच्या मध्ये बर्लिन भिंत उभी आहे. अशा वेळी ब्रिटिश गुप्तचर अलेक लीमास काही गोपनीय माहिती मिळविण्यासाठी पूर्व जर्मनीत येतो; पण त्याची ही पहिली मोहीम फसते. त्याचे सहकारी मारले जातात; पण त्याला पुन्हा दुसऱ्या कामगिरीवर बर्लिनमध्येच पाठवलं जातं. तिथे त्याला जर्मन गुप्तचर पकडतात. एका अधिकाऱ्याला आपला वरिष्ठ हा ब्रिटिशांचा एजंट आहे, हे त्याच्याकडून सिद्ध करून घ्यायचं असतं, तर दुसऱ्याला ब्रिटिशांची गुप्तचर यंत्रणेतील काही महत्त्वाची माहिती हवी असते. कॅरे यांची विलक्षण हातोटी, गुंतागुंतीचं कथानक आणि रहस्यमयता यांनी भरलेली ही कादंबरी खूप खपली आणि वाचलीही गेली आहे.


ब्रिटिश कादंबरीकार लेन डेग्टन यांची 'बर्लिन गेम' ही गुप्तचर कादंबरी 'गेम' आणि 'सेट अ‍ॅण्ड मॅच' या त्रि-कादंबरीधारेतली पहिली कादंबरी १९८३ साली प्रकाशित झाली. पूर्व जर्मनीतील एका ब्रिटिश गुप्तचर एजंटला पश्चिम जर्मनीत जायचं असतं. त्याला मदत करण्यासाठी नायक बर्नार्ड सॅम्पसनची नेमणूक केली जाते. खरं तर तो पाच वर्षांपूर्वीच नोकरीतून निवृत्त झालेला असतो; पण ही कामगिरी त्याच्यावर सोपवली जाते. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की, कुणी तरी त्याच्या मागावर आहे. तो त्याचा शोध घेतो आणि शेवटी ठरल्याप्रमाणे आपली कामगिरी फत्ते करतो.


'द डे बिफोर द बर्लिन वॉल- कुड वुइ हॅव स्टॉप्ड इट?' (२०१०) या अमेरिकन कादंबरीकार थॉमस एन्रिच एडवर्ड हिल यांच्या लांबलचक शीर्षकाच्या कादंबरीला 'अ‍ॅन अल्टरनेटिव्ह हिस्ट्री ऑफ कोल्ड वार एस्पिओनेज' असं उपशीर्षकही आहे. ही कादंबरी दंतकथेवर आधारित आहे आणि अर्थात गुप्तचरही.


बर्लिन भिंत पडत असताना अमेरिकेला कसा दोष दिला जातो, असं  कथानक असलेली अमेरिकन कादंबरीकार जॉन मार्क्‍स यांची 'द वॉल' (१९९९) हीसुद्धा गुप्तचर कादंबरीच आहे. 


'वेस्ट ऑफ द वॉल' (२००८) ही कादंबरी उत्तर अमेरिकेत 'टड्रीज प्रॉमिस' या नावानं प्रकाशित झाली आहे. भिंतीमुळे नवऱ्यापासून ताटातूट झालेल्या बायकोची आणि तिच्या मुलाची ही गोष्ट आहे. (कादंबरीकार मार्सिया प्रिस्टन हेही अमेरिकनच.)


पीटर श्नायडर (Peter Schneider) यांची १९८२ साली मूळ 'Der Mauerspringer' या नावाने जर्मनमध्ये आणि १९८४ साली 'द वॉल जम्पर' या नावाने इंग्रजीत अनुवादित झालेल्या या कादंबरीतली मध्यवर्ती व्यक्तिरेखाच बर्लिन भिंत आहे. शारीरिक विभागणीपेक्षा मानसिक पातळीवरील फरकांना अधोरेखित करणारी ही कादंबरी भिंत ओलांडून जाणाऱ्या अनेकांच्या कहाण्या सांगते.


जर्मन कादंबरीकार थॉमस ब्रुसेग यांची 'हेल्डन वीइ वुइर' ही कादंबरी जर्मनीत १९९५ साली प्रकाशित झाली. तिचा इंग्रजी अनुवाद 'हीरोज लाइक अस' या नावानं १९९७ साली प्रकाशित झाला. पूर्णपणे राजकीय असलेली ही कादंबरी तिच्यातील उपहासात्मक शैलीमुळे वाखाणली गेली. या कादंबरीचा न-नायक हा नोबेल पारितोषिकापासून वंचित राहिलेला लेखक असतो. यातून दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध आणि बर्लिन भिंत पाडण्याचं कारस्थान यांच्यातील धागेदोरे स्पष्ट केले आहेत. पूर्व जर्मनीतील कम्युनिझमचा पाडाव रेखाटणारी ही कादंबरी समीक्षकांनी गौरवली आहे. 


'फ्रेया ऑन द वॉल' (१९९७) ही जर्मन कादंबरीकार टी. डिजेन्स यांची कादंबरी वैयक्तिक आणि राजकीय इतिहासाची तपासणी करते. मोठय़ा प्रमाणावर प्रतीकात्मकता असलेल्या या कादंबरीची नायिका एक किशोरवयीन मुलगी असून तिचे नातेवाईक पूर्व-पश्चिम जर्मनीत असतात. बर्लिनची भिंत कोसळायच्या आधीची ही कादंबरी त्या वेळची सारी गुंतागुंत उलगडून दाखवते. 


'स्लम्बरलॅण्ड' ही आफ्रिकन-अमेरिकन कादंबरीकार पॉल बिटी यांची कादंबरी २००८ साली प्रकाशित झाली. क्रूर, अवडंबरपूर्ण आणि तरीही उल्हसित करणारी ही कादंबरी आहे. डी जे डार्की हा या कादंबरीचा नायक जॅझचा बादशहा चार्ल्स स्टोनचा शोध घेत बर्लिनला येतो. जिथे एक गोरी बाई हद्दपार केलेल्या काळ्या आणि आफ्रिकन कामगारांना राबवून घेत असते. काळ्यांच्या ओळखीचा शोध घेणारी ही कादंबरी बर्लिन भिंतीच्या साक्षीनं घडते.


'स्टासीलॅण्ड' या ऑस्ट्रेलियन कादंबरीकार अ‍ॅना फंडर यांच्या कादंबरीचं 'स्टोरीज फ्रॉम बिहाइंड द बर्लिन वॉल' असं उपशीर्षक असून ती ग्रँटा मासिकाच्या प्रकाशन विभागानं २०११ साली प्रकाशित केली. पूर्व जर्मनीतील गुप्त पोलिसांना स्टासी म्हणत. अ‍ॅना यांनी वर्तमानपत्रात रीतसर जाहिरात देऊन गुप्त पोलीस म्हणून काम करणाऱ्या अनेकांच्या मुलाखती घेतल्या. त्याआधारे हिटलर आणि स्टॅलिन यांच्या एकाधिकारशाहीचं चित्र त्यांनी या कादंबरीत मांडलं आहे. जॉर्ज ऑर्वेल यांच्या 'नाइन्टीन एटी फोर' या कादंबरीशी 'स्टासीलॅण्ड'ची तुलना समीक्षकांनी केली आहे.

Monday, November 3, 2014

मातीत रमणारा अभिनेता!

अनिल अवचट, निळू फुले आणि अमरापूरकर
सदाशिव अमरापूरकर यांच्या आयुष्याचा फार मोठा भाग ग्रामीण जीवनानं व्यापला होता. जन्मगाव (नगर जिल्ह्य़ातील) शेवगाव तालुक्यातील अमरापूर (ज्यावरून त्यांचं नाव अमरापूरकर पडलं), धोरजळ आणि देवाची आळंदी या तीन ठिकाणी त्यांचं बालपण गेलं. त्यांचे वडील शेती करायचे. शेत नांगरणं, मोट चालवणं, बैलांना चारा घालणं, गाईचं दूध काढणं, जत्रेत बैल पळवणं या सगळ्या गोष्टी अमरापूरकरांनी लहानपणी केल्या. त्यांच्याकडे १०० शेळ्या होत्या. रोज त्यांना चरायला घेऊन जाण्याचं काम अमरापूरकर करत. शेत नांगरणं, शेतात खत टाकणं, ही कामंही ते करत.

त्यांची एक आत्या आळंदीला राहायची. आषाढी कार्तिकीला पंढरपूरला वारीबरोबर पायी चालत जायची. अमरापूरकर तिच्यासोबत तीन-चार वेळा आळंदी ते पंढरपूर असे पायी चालत गेले. आळंदीला संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सोनोपंत दांडेकर राहत. ते वारकरी संस्थेचे अध्यक्ष होते. ते कथा, प्रवचन करत, शिकवत. टाळ कसे वाजवायचे, कीर्तनाला उभं कसं राहायचं, कशी सुरुवात करायची, या गोष्टी अमरापूरकर त्यांच्याकडून शिकले.

अमरापूरकर यांना वाचनाची गोडी लागली ती त्यांच्या आजोळला, आष्टीला. त्यांना गोष्टी ऐकायला आवडायचं. मीना नावाची बहीण त्यांना पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवायची. तिच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्ट ऐकण्याचा त्यांना छंदच लागला होता. तिथं त्यांनी पहिलं पुस्तक ऐकलं ते 'शामची आई'. साने गुरुजींच्या पुस्तकांनी त्यांना वाचनाची गोडी लावली, ती शेवटपर्यंत कायम होती. त्यांच्याकडे पाच ते सहा हजार पुस्तकं होती. ते रोज किमान तीन तास वाचन करत. मराठी-इंग्रजीतील नवनव्या पुस्तकांबाबतचं त्यांचं वाचन अतिशय अद्ययावत म्हणावं असं होतं. उदा. महाराष्ट्रात सेझचा प्रश्न गाजत होता, तेव्हा त्यावर एक कादंबरी आली होती. अमरापूरकरांनी ती लगेच मिळवून वाचली.

नगरलाच अहमदनगर एज्युकेशन सोसायटी नावाची न्या. रानडे यांनी बांधलेली शाळा आहे. अमरापूरकर तिचे विद्यार्थी. शालेय वयात ते अत्यंत हूड विद्यार्थी होते, पण क्रिकेट चांगले खेळायचे. पुढे महाविद्यालयात गेल्यावर क्रिकेट सुटलं आणि नाटक सुरू झालं. त्या दोन-चार वर्षांत मुंबईची प्रचंड नाटकं नगरला आली. त्या काळी मुलांना आठ आणे तिकीट होतं. अमरापूरकर प्रत्येक नाटक पाहायचे. त्या काळात त्यांनी प्रचंड नाटकं पाहिली.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नगर महाविद्यालयात गेले. भालचंद्र नेमाडे, मधुकर तोरडमल हे प्राध्यापक त्यांना शिकवायचे. त्या दरम्यान त्यांच्या मित्रानं एकांकिका करायला सुरुवात केली होती. त्यात अमरापूरकरांना नोकराचं काम मिळालं; पण आयत्या वेळेला हिरोचं काम करणारा मुलगा निघून गेला आणि ती भूमिका त्यांच्याकडे आली. त्या एकांकिकेला आणि अमरापूरकरांना उत्तेजनार्थ दहा रुपयांचं बक्षीस मिळालं. ती - 'पेटलेली अमावस्या' - त्यांची पहिली एकांकिका.
त्यानंतर त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर 'छिन्न', 'हँडसअप', 'काही स्वप्नं विकायचीयत', 'हवा अंधारा कवडसा', 'ज्याचा त्याचा विठोबा' अशा विविध नाटकांत काम केलं. 


अमरापूरकर यांचे वडील महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काँग्रेसकडून निवडून गेलेले. शिवाय वडील एक अनाथ संस्था चालवत, शेतकी शाळा चालवत. मुलानं शिकून नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. तरीही सुरुवातीला मुलगा नाटक करतोय म्हटल्यावर त्यांनी उत्तेजन दिलं; पण लग्न होऊन दोन मुलं झाली तरी अमरापूरकर नाटकच करत आहेत हे पाहिल्यावर मात्र त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. वडील अमरापूरकरांना 'नाच्या' म्हणत. तरीही वडिलांचा विरोध पत्करत त्यांनी नाटकं करणं चालूच ठेवलं. या काळात त्यांच्या पत्नी, सुनंदा यांनी त्यांना खूपच खंबीरपणे साथ दिली. पदवीधर झाल्यावर अमरापूरकरांनी परभणीला ऑल इंडिया रेडिओवर उद्घोषक म्हणून नोकरीही करायला सुरुवात केली, पण ते वातावरण त्यांना मानवलं नाही. शिवाय आणीबाणीचा काळ. त्या वातावरणातील मुस्कटदाबीला कंटाळून त्या नोकरीचा त्यांनी सहा महिन्यांत राजीनामा दिला. नंतर ते नोकरीसाठी जातो आहे, असे सांगून पुण्याला नाटक करायला आले. तेव्हा घरची आघाडी सांभाळून सुनंदाताईंनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं, त्यांची उमेद वाढवण्याचं मोठं काम केलं.

  'अर्धसत्य'मुळे अमरापूरकरांच्या जीवनात मोठा बदल झाला. मराठीतील शैलीदार कथालेखक श्री. दा. पानवलकर यांच्या 'सूर्य' या कथेवर गोविंद निहलानी यांनी विजय तेंडुलकर यांच्याकडून कथा-पटकथा लिहून घेऊन 'अर्धसत्य' हा चित्रपट १९८४ साली केला. त्यात रामा शेट्टीची छोटीशी भूमिका अमरापूरकर यांनी केली; पण त्यांच्या या छोटय़ा भूमिकेनं प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्या संदर्भातील दोन किस्से रंजक आहेत.
या चित्रपटाचं शूटिंग संपल्यावर अमरापूरकर गावी नगरला गेले. त्यांच्या मोठय़ा भावाला बाहेरगावी जायचं असल्याने वडिलांनी त्यांना तोपर्यंत किराणा मालाचं दुकान सांभाळायला सांगितलं. दरम्यान 'अर्धसत्य'च्या प्रीमिअरची तारीख जवळ आली. अमरापूरकरांनी त्याबाबत वडिलांना सांगितल्यावर ते म्हणाले, ''तो मुंबईत आहे ना, तू दुकान सांभाळ.'' त्यानंतर आठ-दहा दिवसांनी अमरापूरकर नगरहून एसटीने निघून पहाटे दादर बस स्टॅण्डला उतरले. तोवर 'अर्धसत्य'मधील रामा शेट्टी मुंबईत सर्वाना माहीत झाला होता. त्यामुळे त्यांना पाहताच टॅक्सीवाल्यांनी त्यांच्याभोवती गलका केला. एकानं बळजबरीनं त्यांना टॅक्सीत बसवून त्यांच्याकडून पैसेही न घेता त्यांना घरी सोडलं.
'अर्धसत्य'च्या कथेचे मूळ लेखक श्री. दा. पानवलकर यांनी या चित्रपटाविषयी 'शूटिंग' (१९८५) या नावाने एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी ओम पुरी आणि अमरापूरकर यांच्या समोरासमोरच्या दृश्याविषयी लिहिले आहे - ''इथं सदाशिव अमरापूरकरांचा रामा शेट्टी फार समजदारीनं संवादांतील सम खटकन पकडतो. हे सगळं दृश्य सदाशिव अमरापूरकर यांनी विनासायास अभिनयानं झक्कास तोलून धरलं. फिल्मी दुनियेत हे त्यांचं पदार्पण, पण 'वामना'च्या पहिल्या पावलासारखं नेमकं आणि भक्कम.''


त्या एवढय़ा भूमिकेवरून अमरापूरकरांना १८० चित्रपटांच्या ऑफर आल्या. त्यांची तुलना अमरीश पुरीशी केली गेली.
त्यानंतर आजतागायत त्यांनी ४५० हून अधिक हिंदी चित्रपटांत आणि ७०-८० मराठी चित्रपटांत भूमिका केल्या. याशिवाय भोजपुरी, गुजराती, बंगाली, उडिया चित्रपटांमध्ये काम केलं. अमरापूरकरांनी अमान जलाल यांच्या मालिकेत लोकमान्य टिळकांची छोटीशी भूमिका करून रुपेरी कारकीर्द सुरू केली, तर 'राज से स्वराज तक' या मालिकेत टिळकांची मोठी भूमिका केली. श्याम बेनेगल यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'तील म. फुले आणि 'सडक', 'हुकूमत', 'ऐलान-ए-जंग' या चित्रपटांतील खलनायकाच्या भूमिका त्यांना स्वत:लाही आवडलेल्या होत्या, तर मराठीतील सुमित्रा भावे यांच्या 'वास्तुपुरुष'मधील भूमिका त्यांना सर्वात आव्हानात्मक वाटली होती.


अमरापूरकरांनी 'कन्यादान'सारख्या काही नाटकांचं दिग्दर्शनही केलं. त्याचबरोबर 'किमयागार' हे नाटकही लिहिलं. वयाच्या सहाव्या वर्षी, श्रवण-दृष्टी-वाचा हरवून बसलेल्या हेलन केलर या अमेरिकी मुलीला तिची शिक्षिका अ‍ॅनी सुलेवान यांच्या अथक प्रयत्नांनी भाषा सापडते आणि तिच्या आयुष्यात मोठं परिवर्तन घडून येतं. त्या दोघींच्या आयुष्यावर पुढे याच नावानं एक नाटक अमेरिकन रंगभूमीवर आलं. त्याचं 'किमयागार' असं अगदी अचूक मराठीकरण वि. वा. शिरवाडकर आणि सदाशिव अमरापूरकर या लेखकद्वयांनी केलं. या दोघांचं नाव लेखक म्हणून या नाटकाला असलं तरी हे नाटक पूर्णपणे अमरापूरकरांनी लिहिलं आहे. शिरवाडकरांनी काही सुधारणा व थोडेफार बदल केले आहेत.
रिचर्ड बोलेस्लाव्हस्की यांच्या 'अ‍ॅक्टिंग - द फर्स्ट सिक्स लेसन्स' या पुस्तकावर आधारित सदाशिव अमरापूरकर आणि आनंद विनायक जातेगांवकर यांनी 'अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकावर काहीशी टीका झाली असली तरी अशा प्रकारचं हे मराठीतील पहिलंच पुस्तक आहे. आनंद पटवर्धन यांच्या 'वॉर अ‍ॅण्ड पीस' या लघुपटावरील त्यांचा लेख बराच गाजला होता.


सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या संस्था-संघटनांशीही अमरापूरकर संबंधित होते. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी झालेल्या 'लग्नाच्या बेडी' या नाटक संचात ते होते. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वध्र्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध होते.


अमरापूरकरांना अनेक गोष्टींविषयी उत्सुकता असे. वाचन तर ते सततच करत; पण ते पेन्सिल स्केचिंगही चांगल्या प्रकारे करत. शूटिंगदरम्यानच्या काळात वेळ मिळेल तेव्हा ते वाचन किंवा पेन्सिल स्केचिंग करत असत. एकदा त्यांना जपानी लेखक मासानोबु फुकुयोका यांचं 'एका काडातून क्रांती' हे नैसर्गिक शेतीविषयीचं पुस्तक मिळालं. ते वाचून अमरापूरकर भारावून गेले. त्यांनी पुण्यात सिंहगडाच्या पायथ्याजवळ अर्धा एकर शेत विकत घेतलं. तिथं नैसर्गिक पद्धतीची शेती करायचा प्रयत्न केला. त्या शेताच्या आजूबाजूला त्यांनी किती तरी झाडं लावली. सुरुवातीची तीन र्वष त्यांचं पीक जळून गेलं. एकदा त्यांनी भुईमूग पेरला. त्या वर्षी किती तरी पोती भुईमूग झाला. 


अमरापूरकरांनी खलनायकी भूमिका चित्रपटांतून केल्या असल्या तरी त्यांच्यातला माणूस अतिशय संवेदनशील, हळुवार होता. फिल्मी दुनियेत राहून ते तिथे कधी रमले नाहीत. ते रमायचे वाचनात, नाही तर शेतात.

Wednesday, October 22, 2014

दीपावली, ईद, नाताळ
 आणि 
नववर्षाच्या 
सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

Sunday, September 21, 2014

साहित्य अकादमीचा चित्रमय इतिहास

हिंदी चित्रपट, क्रिकेट, शास्त्रीय संगीत आणि साहित्य, या गोष्टी भारतीयांच्या विविधतेतील एकात्मतेचे प्रतीक मानल्या जातात. पहिल्या दोन्हींसाठी हिंदी वा इंग्रजी भाषेची आवश्यकता असते. पण शास्त्रीय संगीतासाठी त्याचीही गरज नसते. त्यामानाने साहित्य हा सर्व भारतीय भाषांतील लेखक-वाचकांना जोडणारा दुवा कसा ठरेल आणि त्यातून एक सांस्कृतिक एकात्मता कशी आकाराला येईल, हे दूरदृष्टीचे आणि प्रतिभेचे काम होते. पण स्वातंत्र्यानंतर अल्पावधीतच पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी त्या दृष्टीने एका शिखर साहित्य संस्थेची निर्मिती करायचे ठरवले. त्यानुसार १२ मार्च १९५४ रोजी 'साहित्य अ‍ॅकॅडमी - द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ लेटर्स' या संस्थेची स्थापना करण्यात आली. नुकतेच या संस्थेने आपले हीरकमहोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. त्यानिमित्ताने या संस्थेचा सचित्र इतिहास सांगणाऱ्या 'साहित्य अ‍ॅकॅडमी-१९५४-२०१४' या कॉफी टेबल आकारातील देखण्या पुस्तकाचे प्रकाशन अकादमीने केले आहे. २००४ साली अकादमीला पन्नास र्वष पूर्ण झाली, तेव्हा 'फाइव्ह डिकेड- अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ साहित्य अ‍ॅकॅडमी' या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. त्यातून जसा अकादमीचा इतिहास तपशीलवार उलगडतो तसा या पुस्तकातून उलगडत नाही. याचे कारण हे चित्रमय चरित्र आहे. पण या पुस्तकातून अकादमीचा गाभा आणि आवाका समजून घ्यायला मदत होते. कुठल्याही व्यक्ती वा संस्थेचे मूल्यमापन करताना त्यांच्या कामाचा गाभा आणि आवाका समजून घेणे महत्त्वाचे असते. तो घेतला तर त्यांचे मूल्यमापन नीट करता येते.
आजघडीला साहित्य अकादमी ही केंद्र सरकारची स्वायत्त संस्था २४ मान्यताप्राप्त भारतीय भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित करणारी, साहित्यकृतींना उत्तेजन देणारी, त्यांच्या वेगवेगळ्या भाषांमधील अनुवादांना चालना देणारी आणि विविध साहित्य-उपक्रम घडवून आणणारी भारतातील सर्वात मोठी संस्था आहे. म्हणूनच 'लेखकांची, लेखकांनी, लेखकांसाठी चालवलेली संस्था म्हणजे साहित्य अकादमी' असे तिचे वर्णन केले जाते.
मान्यवर साहित्यिकांना गौरववृत्ती देणे; साहित्य अकादमी, भाषा सन्मान, युवा पुरस्कार, बाल साहित्य पुरस्कार, अनुवाद पुरस्कार आणि  विविध साहित्य-उपक्रम याद्वारे अकादमी भारतीय साहित्यातील विविधतेतील एकात्मतेला जोडून ठेवण्याचे आणि ती संघटित करण्याचे काम सतत करत आली आहे. 'इंडियन लिटरेचर', 'समकालीन भारतीय साहित्य', 'संस्कृत प्रतिभा' या तीन द्वैमासिकांद्वारे विविध भाषांतील साहित्याला भारतीय स्तरावर पोहोचवण्याचे काम करते. याशिवाय मान्यवर साहित्यिकांविषयीचे लघुपट, पुस्तक प्रदर्शने, चर्चासत्रे-शिबिरे-लेखक भेटी यांचे आयोजन सतत चालू असते. थोडक्यात काय तर अकादमीने गेल्या साठ वर्षांत भारतीय जनतेची साहित्यरुची, साहित्य गुणवत्ता आणि साहित्य-जाणिवा यांचे आपल्यापरीने भरणपोषण करण्याचे, ते प्रगल्भ करण्याचे काम केले आहे, करत आहे.
सुरुवातीला शिक्षण मंत्रालयाच्या एका खोलीत सुरू झालेले अकादमीचे ऑफिस नंतर कनॉट प्लेसच्या थिएटर कम्युनिकेशन इमारतीत गेले. १९६१ साली केंद्र सरकारने साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी आणि ललित कला अकादमी या तीन संस्थांसाठी तीन मजली स्वतंत्र इमारत उभारली. (तेव्हापासून या तिन्ही संस्था तेथून भारतीयत्वाचे प्रतिनिधित्व करत आहेत.) दिल्लीत मुख्यालय असले तरी १९५६ ला अकादमीचे पहिले विभागीय कार्यालय कलकत्तामध्ये सुरू झाले, १९५९ ला चेन्नईला; १९९० ला तेच बंगलोरला हलवले गेले, १९७२ ला मुंबईला कार्यालय सुरू झाले.
साहित्य अकादमीशी भारतीय भाषांतील मान्यवर साहित्यिक सुरुवातीपासूनच जोडलेले आहेत. महादेवी वर्मा यांच्यापासून गिरीश कार्नाड यांच्यापर्यंत आणि गंगाधर गाडगीळ यांच्यापासून भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंत भारतीय भाषांतील साहित्यिक इतक्या मोठय़ा प्रमाणावर इतर कुठल्याही संस्थेशी निगडित नाहीत. साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष म्हणून पं. नेहरू यांची निवड करण्यात आली, ती ते पंतप्रधान होते म्हणून नव्हे तर एक लेखक म्हणून. साहित्य अकादमीचे बोधचिन्ह सत्यजित राय यांनी तयार केले, एवढेच नव्हे तर 'मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर' या साहित्यमालिकेतील काही पुस्तकांची मुखपृष्ठं त्यांनी काढली. अकादमीविषयीचा सुवर्णमहोत्सवी वर्षांतला लघुपट प्रसिद्ध गीतकार-कवी गुलज़ार यांनी बनवला आहे.
हा सर्व वैभवशाली इतिहास या पुस्तकातून समर्पक छायाचित्रांद्वारे उलगडून दाखवला आहे. या पुस्तकाचे लेखन-संयोजन इंग्रजीचे प्राध्यापक, समीक्षक आणि 'इंडियन लिटरेचर'चे माजी संपादक डी. एस. राव यांनी केले आहे. त्यांनीच 'फाइव्ह डिकेड - अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ साहित्य अ‍ॅकॅडमी' या पुस्तकाचेही लेखन केले. या पुस्तकातून त्यांची विचक्षण दृष्टी प्रत्ययाला येते. समर्पक छायाचित्रे आणि त्यांना उचित मजकुराची जोड, यांची भट्टी जमून आल्याने हे पुस्तक हीरकमहोत्सवी वर्षांतले अकादमीचे एक उत्कृष्ट प्रकाशन ठरले आहे.
हे पुस्तक चाळताना गेल्या साठ वर्षांतील अकादमीचा इतिहास आपल्यासमोर प्रत्ययकारी रीतीने सिनेमाच्या रिळासारखा उलगडत राहतो. छायाचित्रांची निवड आणि दर्जा चांगला असल्याने ती पूर्ण पाहिल्याशिवाय पुढचे पान उलटावेसे वाटत नाही, ही या पुस्तकाची एक जमेची बाजू आहे.
अकादमीचा विस्तार भारतभर पसरलेला असल्याने तिला महावृक्षाचीच उपमा द्यायला हवी. अकादमी भारतीय साहित्याचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संस्था असल्याने अनेक गोष्टींच्या पहिलेपणाचे मान तिच्याकडे जातात. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांचीही ओळख होते. उदा. भारतीय साहित्याची राष्ट्रीय सूची, हुज हू इन इंडियन लिटरेचर, विविध भाषांतील साहित्याचा इतिहास, भारतीय साहित्याचे निर्माते ही पुस्तकमालिका, भारतीय साहित्याचा विश्वकोश, एकाच व्यासपीठावर वेगवेगळ्या भाषांमधील साहित्यिकांना आणणे इत्यादी.
एका संस्थेचा हा चित्रमय इतिहास असल्याने आणि तो हौसेखातर प्रकाशित केला असल्याने त्याला शास्त्रकाटय़ाची कसोटी फारशी लावता येत नाही. पण तरीही एक खटकणारी गोष्ट नोंदवायला हवीच. एरवी अकादमी प्रकाशित करत असलेल्या पुस्तकांच्या किमती या सर्वसामान्य वाचकांना परवडतील अशा असतात. त्यामुळे ती पुस्तके कुणालाही सहजपणे विकत घेता येतात. या कॉफी टेबल पुस्तकाचा वाचकवर्ग मर्यादित असला तरी साहित्याच्या प्रेमापोटी हे पुस्तक हौसेने खरेदी करणाऱ्यांची संख्या थोडी असेल, पण असेलच. कारण हे पुस्तक संग्राह्य़ नक्कीच आहे. पण त्याची किंमत मात्र अकादमीच्या नेहमीच्या लौकिकाला साजेशी ठेवली गेलेली नाही.
साहित्य अ‍ॅकॅडमी - १९५४-२०१४ : डी. एस. राव,
साहित्य अ‍ॅकॅडमी, नवी दिल्ली,
पाने : १९०, किंमत : २५०० रुपये.

Thursday, September 4, 2014

दादोजी, शिवाजी महाराज आणि सत्य

'सध्याचे युग हे इतिहासाचे सर्वाधिक भान असलेले युग आहे. आधुनिक मानवाला कधी नव्हती इतकी स्वत:ची आणि म्हणून इतिहासाची जाणीव असते.. भूत, वर्तमान आणि भविष्य हे जिला शेवटचे टोक नाही अशा इतिहासाच्या साखळीतले दुवे आहेत.' 
हे अवतरण प्रसिद्ध इतिहासकार ई. ए. कार यांच्या 'इतिहास म्हणजे काय' या पुस्तकातील १५९ पानावरील आहे. भांडारकर संस्थेवरील हल्ल्यानंतरच्या गेल्या १० वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या इतिहासाच्या प्राध्यापकांचं, अभ्यासकांचं आणि काही स्वयंघोषित संशोधकांचं इतिहासाविषयीचं भान आणि इतिहासातील योग्य दुवे जोडण्याचे प्रयत्न हे हेतुपुरस्सररीत्या आणि संशयास्पद असल्याचं उघड उघड दिसतं. ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही, पण भांडारकर संस्थेवरील हल्ल्यानंतर त्याला जे विघातक स्वरूप आलं आहे, त्यातून इतिहासाची मोडतोड करण्याची, तो सोयीस्कररीत्या लिहिण्याची आणि इतिहासाच्या नावाखाली दमदाटी करण्याची अहमहमिकाच सुरू असल्याचं दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज तर यातील सर्वाधिक स्फोटक आणि वादग्रस्त विषय झाला आहे.
जेम्स लेन नामक एका पाश्चात्त्य लेखकानं 'शिवाजी : अ हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकात दादोजी कोंडदेव यांच्याविषयी केलेलं एक विधान या सर्वाला कारणीभूत ठरलं. आणि दादोजी यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासातून हद्दपार करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. इयत्ता चौथीचे क्रमिक पुस्तक बदलणं, लाल महालातील दादोजी यांचा पुतळा हटवणं आणि या सर्वाच्या आधी भांडारकरवरील हल्ला अशी ही मालिका पद्धतशीरपणे घडवली गेली. मराठा संघटना इतक्या आक्रमक झाल्या की, परिणामी शिवाजी महाराजांविषयी काही काळ बोलणंच बंद झालं. इतिहासाविषयी लेखन करणाऱ्यांमध्ये ब्राह्मण-ब्राह्मणेतर असे सरळ सरळ दोन तट पडले. आणि या दोन्ही तटांनी विविध ठिकाणी लेख लिहून एकमेकांना खोडून काढायला सुरुवात केली. 

या पुस्तकात ब्राह्मणेतरांनी दादोजी यांच्याबद्दल केलेल्या दाव्यांचं खंडण-मंडण करण्याचा प्रयत्न आहे. ब्राह्मणेतर लेखकांच्या लेखनात जसा आवेश, केवळ दोषारोप आणि आक्रमकता दिसते, तशीच या पुस्तकातही काही प्रमाणात आहे. पण ती ब्राह्मणेतर लेखकांइतकी अनाठायी नाही.
दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं, त्यांची नेमणूक खुद्द शहाजीराजांनीच केली होती, या दोन विधानांत या पुस्तकातलं सार संपतं. बाकी ब्राह्मणेतर लेखकांच्या लेखांना प्रत्युत्तर, त्यांचे दावे खोडून काढणं आणि त्यांच्या विधानातील विसंगती उघड करणं, असा भाग आहे. सरळ आणि स्पष्टच सांगायचं तर ब्राह्मणेतर लेखकांनी दादोजींविषयी केलेल्या लेखनाला खोडून काढण्याचा हा प्रयत्न आहे. आणि तो एका मर्यादित अर्थानं स्तुत्य आहे. कारण दादोजी यांचं शिवाजी महाराजांच्या जडणघडणीतलं स्थान नाकारण्यात काहीच अर्थ नाही. ज्यांना सत्य बोलण्याचं भय वाटतं, ते लोक असत्य विधानं करतात तेव्हा खरं तर इतिहासाचं काहीच नुकसान होत नाही. समाजाची काही काळ दिशाभूल होते. पण शेवटी जॉर्ज ऑर्वेल म्हणतो त्याचं प्रत्यंतर येतंच. तो म्हणतो - 'तुम्ही सर्व काळ सर्व लोकांना मूर्ख बनवू शकत नाही.' या पुस्तकाच्या वाचनातून लक्षात घेण्याची गोष्ट आहे ती एवढीच.
ज्यांना केवळ पुराव्यांची मोडतोड करायची आहे, सत्य दडवून ठेवायचं आहे आणि निव्वळ दमदाटी करायची आहे, त्यांची दखल न घेण्यातच सुज्ञता आहे. आणि ती महाराष्ट्रातील सुज्ञ जाणकारांनी गेल्या १० वर्षांत चांगल्या प्रकारे या प्रसंगाच्या संदर्भात दाखवली आहे. कारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर इतिहासविषयक लेखन करणाऱ्यांची शाब्दिक लढाई सत्यापेक्षा सत्याचा अपलाप करणारी आहे. आणि म्हणून त्याज्य आहे. असो. या पुस्तकातून लेखकाची तळमळ दृगोचर होते. आणि ती इष्टच आहे.
'हिंदूवी स्वराज्याचे कारभारी दादोजी कोंडदेव : खंडण आणि मंडण' - श्यामसुंदर सुळे, अखिल भारतीय मराठा विकास परिषद, तळेगाव, जि. पुणे, पृष्ठ- २४८,  मूल्य- ८० रुपये.

Monday, August 18, 2014

मराठा आरक्षणाचे मतलबी गाजर

मराठा आरक्षणाची मागणी ही तशी १९८९ पासून केली जात आहे. अलीकडच्या काळात, विशेषत: मंडलोत्तर जागतिकीकरणाच्या काळात तिला विशेष जोर आला आहे. आरक्षणाची मागणी करणाऱ्या विविध मराठा संघटना उदयाला आल्या. नवशिक्षित-अर्धशिक्षित बेरोजगार आणि संतप्त मराठा तरुणांना या संघटनांनी 'आरक्षणामुळे आपले प्रश्न सुटतील' असे आमिष दाखवल्याने आणि त्यांच्या सरंजामी मानसिकतेला चुकीच्या इतिहासाचे खतपाणी घातल्याने आरक्षणाच्या प्रश्नाचा तवा तापत आला आहे. अखेर एकदाचे जुलै महिन्यात राज्य सरकारने शिक्षण व नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देऊ  केले आहे. 'मराठा आरक्षण-भूमिका आणि वास्तव' हे पुस्तक त्याआधी दोन-चार दिवस म्हणजे २९ मे रोजी प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात पंचवीस लेख आहेत. कालेलकर आयोग, मंडल आयोग, न्या. बापट अहवाल, नचिअप्पन अहवाल याविषयीची थोडक्यात माहिती दिली आहे.  गोपीनाथ मुंडे, अशोक चव्हाण, विनोद तावडे, सुभाष देसाई, नारायण राणे, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले या राजकीय नेत्यांचे लेख आहेत, तर छत्रपती संभाजीराजे भोसले, विनायक मेटे, पुरुषोत्तम खेडेकर, प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे, दत्तात्रय परभणे या मराठा संघटनांच्या नेत्यांचे लेख आहेत. लेखकाच्या म्हणण्यानुसार त्याने संबंधितांच्या मुलाखती घेऊन हे लेख तयार केले आहेत; तर शरद पवार यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर एका स्वतंत्र लेखात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राजकीय नेत्यांचे व संघटनांच्या पुढाऱ्यांचे लेख वाचून खरे म्हणजे मोठी करमणूक होते. या सर्वानीच मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे, अशी भूमिका घेतली आहे. 'आपण मराठा समाजाच्या विरोधात आहोत', या अपप्रचाराच्या भीतीचे मूर्तिमंत रूप त्यांच्या लेखात स्वच्छपणे पडलेले दिसते.
या पुस्तकात पी. बी. सावंत, बी. जी. कोळसे-पाटील या माजी न्यायाधीशांचेही आरक्षणाचे समर्थन करणारे लेख आहेत. मराठा आरक्षणाचे उघड आणि थेट समर्थन तर करता येत नाही, म्हणून मग थोडंफार आडवळण घेत, राजकीय पुढाऱ्यांवर टीका करत त्यांनी आरक्षणाचे समर्थन केले आहे. सावंत हे मंडल आयोग छाननी समितीत होते. तरीही ते सुरुवातीपासून आणि या पुस्तकातील लेखातही मराठा आरक्षण घटनेच्या निकषावरही टिकेल असे म्हणतात, ही आश्चर्याची बाब आहे.
एकीकडे मराठी समाजाचा ओबीसीत समावेश केला म्हणजे आरक्षण देता येईल, या हुशारीने मराठा समाजाच्या काही संघटना आणि त्यांचे नेते मराठय़ांना ओबीसी कोटय़ातून आरक्षण मिळायला हवे, अशी भूमिका कधी छुपेपणाने तर कधी उघडपणाने घेताना दिसतात. या पुस्तकातील त्यांच्या लेखांमधूनही तीच रणनीती उघड होते.
पण हे सर्व लेख प्रतिक्रियावजा आहेत. लेखकाने केलेले शब्दांकन यथातथा म्हणावे या पात्रतेचे आहे. 'लोकांना सत्य समजावे' म्हणून लेखकाने केलेला 'नि:पक्ष आणि प्रामाणिक प्रयत्न' स्तुत्यच आहे, पण त्याला अधिक मेहनतीची आणि अभ्यासाची जोड दिली असती तर अधिक बरे झाले असते. कुठलाही तार्किक विचार नसल्यावर आणि कुठल्याही विषयाचा नीट अभ्यास नसल्यावर तांबट आळीतल्या ठोकाठोकीसारखा नुसताच खणखणाट होत राहतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठा आरक्षणावरून केले जाणारे राजकारण. ते किती वरवरचे, मतलबी आणि संधिसाधू आहे, याची झलक या पुस्तकातून नक्की कळू शकेल.
 'मराठा आरक्षण : भूमिका आणि वास्तव' - व्यंकटेश पाटील, ज्योतीचंद्र पब्लिकेशन, लातूर,

पृष्ठे - १६८, मूल्य - १०० रुपये. 

Tuesday, July 29, 2014

तिस-या प्रहरातील प्रश्नोपनिषद

प्रा. विजया राजाध्यक्ष म्हटले की, ‘बहुपेडी विंदा’, ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’, ‘कवितारती’, ‘शोध मर्ढेकरांचा’, ‘पुन्हा मर्ढेकर’ असे समीक्षाग्रंथ आठवतात. ‘संवाद’ या पुस्तकामध्ये विजयाबाईंनी विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ आणि वा. ल. कुलकर्णी यांच्या घेतलेल्या वाङ्मयीन मुलाखती मोठ्या रोचक आहेत.  विजयाबाईंनी आस्वादक समीक्षेला मराठीमध्ये काहीएक प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कामी काही दमदार पावले टाकली आहेत. पण तरीही आस्वादक समीक्षेविषयीचे समज काही पूर्णपणे नाहिसे झालेले नाहीत. या समीक्षालेखनाला दुय्यम मानले जातेच. पण विजयाबाईंनी त्याची पर्वा न करता आपले लेखन चालूच ठेवले आहे. दोन वर्षापूर्वी त्यांना विंदा करंदीकरांच्या नावाचा पहिला पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी आरती प्रभूंवर लेखन करण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

थोडक्यात विजयाबाई पूर्णपणे वाङ्मयीन स्वरूपाचे-त्यातही समीक्षात्मक स्वरूपाचे लेखन करणा-या लेखिका आहेत. पण एवढीच काही त्यांची ओळख नाही. विजयाबाई प्रदीर्घ काळ कथालेखनही करत आल्या आहेत. आत्तापर्यंत त्यांचे सतरा-अठरा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. नुकतेच त्यांचे नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पण ते समीक्षालेखन नाही की कथासंग्रह नाही. तो चक्क दोन कादंब-यांचा संग्रह आहे. या पुस्तकाचे नाव आहे, तीन प्रहर. या संग्रहामध्ये दोन लघुकांदब-या आहेत. म्हणजे आकाराने त्या लहान आहेत म्हणून त्यांना ढोबळ अर्थाने लघुकादंब-या म्हणायचे. विजयाबाईंनी ‘कादंबरी की लघुकादंबरी? वाचकांनीच ते ठरवावे’ असे प्रास्ताविकात सांगून टाकले आहे.

विशेष म्हणजे कादंबरी लेखनाचा विजयाबाईंचा हा पहिलाच प्रयत्न आहे. यातील ‘बंदिश’ ही पहिली कादंबरी ‘माझ्या लेखनप्रवासात घडलेला हा एक अपघात आहे’ असे त्यांनी प्रास्ताविकात लिहिले आहे, तर ‘आयुष्य : पहिलं की तिसरं?’ ही दुसरी कादंबरी हाही कादंबरी लेखनाची वाट शोधण्याचा, ती काही अंशी सापडली असे वाटण्याचा अनुभव’ असे लिहिले आहे. म्हणजे पुस्तकाचे नाव ‘तीन प्रहर’, त्यात दोन लघु म्हणाव्या अशा कादंब-या आणि प्रत्यक्षात तिस-या प्रहरातल्या विजयाबाईं-सारख्या व्रतस्थ समीक्षक-कथालेखिकेनं लिहिलेल्या, असा हा योग आहे. यातून या दोन्ही कादंब-यांचे विषय माणसाच्या तिस-या प्रहारातील जीवनाविषयीचे आहेत, हे ठसठशीतपणे अधोरेखित करायचे असावे.

‘बंदिश’ ही कादंबरी एका शास्त्रीय गायकाविषयीची आहे. म्हणजे संगीत हे तिच्या मध्यवर्ती आहे. जोगबुवा आणि विष्णू यांच्या संबंधांतून ही कादंबरी फुलत जाते. आयुष्य सपाट नसते, त्यात अनेक आरोह आणि अवरोह असतात. या दोन्हींची मिळून बंदिश होते.

‘आयुष्य : पहिलं की तिसरं?’ ही तर सरळ सरळ ‘नयन लागले पैलतीरी’ अशा अवस्थेत असलेल्या वामनराव आणि त्यांच्या कुटुंबाची कथा आहे. या दोन्ही कादंब-यांचे तपशील खूप देता येतील, पण त्या लघुकादंब-या असल्याने ते फार देण्यात अर्थ नाही. पण या दोन्ही कादंब-यांची काही साम्यस्थळे सांगता येतील. या दोन्हींमध्ये तिसरा प्रहर हा काळ मुख्य आहे. म्हणजे त्या काळात जगणा-या दोन नायकांची ही रुढार्थाने कथा आहे. शिवाय या दोन्हींमध्ये पात्रांची संख्या अगदी मोजकी आहे. ही कथानके तशी फार नावीन्यपूर्ण नाहीत, पण वाचनीय नक्कीच आहेत.

लेखिका काहीतरी सांगू पाहतेय, ते आपल्यापर्यंत पोहचतेही. पण थेटपणे भिडते का, याचे उत्तर फारसे समाधानकारकपणे देता येत नाही. पण लेखिकेनं या दोन्ही कादंब-यांच्या निमित्ताने वाधर्क्यातील माणसांविषयी काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते प्रश्नोपनिषद समजून घ्यायला हवे.

विजयाबाईंनी काही वर्षापूर्वी ‘मराठीतील काही कादंब-या या भरकटलेल्या कथा आहेत, असे म्हटले जाते. त्याला धरून असे म्हणता येईल की काही कथा या गुदमरलेल्या कादंब-या आहेत,’ असे विधान केले होते. त्याची इथे आठवण इथे होते, पण ती निराळ्या अर्थाने. कारण प्रस्तुत पुस्तक वाचून वाटते की, हा काही नियम असेलच असे मानायचे कारण नाही. किमान या पुस्तकाला तरी ते लागू पडत नाही. कारण विषयाच्या आवाक्यानुसारच त्यांची लांबी आहे. त्याला कादंबरी म्हणा किंवा लघुकादंबरी फारसा काही फरक पडत नाही. पण हे सगळे आपले वाचक म्हणून. अभ्यासू समीक्षकांची मते कदाचित वेगळीही असू शकतात.

तीन प्रहर : विजया राजाध्यक्ष, राजेंद्र प्रकाशन, मुंबई

‘मायाबाजारा’तली माणसं!

या संकलनात मंटोनं लिहिलेली बारा व्यक्तिचित्रं आहेत आणि त्या सर्वच व्यक्ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आहेत. यात अशोककुमार, नर्गिस, नसीम बानो, बाबूराव पटेल, सितारा, नूरजहाँ या परिचित नावांचा समावेश आहे, तसाच कुलदीप कौर, रफ़ीक ग़ज़नवी, बी. ए. देसाई, नवाब काश्मिरी, पारो, श्याम अशी काही फारशा चित्रपटशौकिन नसणा-यांसाठी अपरिचित म्हणावी अशीही नावं आहेत.

मंटो हाच मुळात कलंदर आणि वेडापीर म्हणावा असा लेखक! जगण्याशी सतत चार हात करत अनेक लेखकांना सतत प्राप्त परिस्थितीशी झगडावं लागतं. पण मंटोला तर त्याच्या लेखनाशीही झगडावं लागलं. त्याच्या लेखनावरून अनेकदा गदारोळ झाले, कोर्टकचे-या झाल्या; त्याचा मंटोला खूप मनस्तापही झाला. मंटो आपल्या परीनं झगडत राहिला. त्यात काही काळ मंटो मुंबईतल्या हिंदी चित्रपटसृष्टीतही झगडत होता. त्या काळात मंटोचा पडद्यावरील आणि पडद्यामागच्या अनेक कलाकारांशी संपर्क आला. मंटो मुळात माणसांचा लोभी होती. त्याला माणसं आवडायचीच. तो सतत माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करत असायचा. त्याच्या कथा वाचताना याचा सातत्यानं प्रत्यय येत राहतो.

या संकलनाच्या मलपृष्ठावर मुहम्मद हसन अस्करी यांचा अभिप्राय आहे. तो असा- ‘‘मंटोच्या दृष्टीने कोणताही माणूस मूल्यहीन नव्हता. तो प्रत्येक माणसाला अशा विश्वासाने भेटायचा की त्याच्या अस्तित्वात कोणता ना कोणता अर्थ दडलेला असेल आणि एक ना एक दिवस हा अर्थ व्यक्त होईल. अशा विलक्षण माणसांबरोबर त्याला आठवडेच्या आठवडे भटकताना मी पाहिलं आहे. मला आश्चर्य वाटायचं की मंटो यांना कसं काय सहन करतो! पण मंटोला बोअर होणं माहीत नव्हतं. त्याच्यासाठी प्रत्येक मानवी जीवन आणि माणूस निसर्गाचं एक रूप होतं; तसंच प्रत्येक व्यक्ती मनोवेधक होती. चांगलं व वाईट, बुद्धिमान व मूर्ख, सभ्य व असभ्य असा प्रश्न मंटोजवळ जरादेखील नव्हता. त्याच्याजवळ माणसांचा स्वीकार करण्याची इतकी विलक्षण क्षमता होती की त्याच्यासोबत जो माणूस असेल, त्याच्यासारखाच तो व्हायचा.’’

या संकलनातली माणसं काही तशी सामान्य नव्हेत. मंटो ज्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत वावरत होता, तेव्हा ही माणसं फारशी नावारूपाला आली नव्हती, त्यातली काही नंतर बाहेरही पडली. पण अस्करी म्हणतात त्याप्रमाणे मंटोनं त्यांच्यासोबत जो काही काळ घालवला, त्यांचं काम पाहिलं, तो संपूर्ण काळच मंटोनं प्रत्येक व्यक्तिचित्रात उभा केला आहे. माणूस समजून घेताना मंटो त्याचा भवतालही समजून घेत असे. त्याच्या नजरेनं जगाकडे पाही. त्यामुळे ही सर्वच व्यक्तिचित्रं मनोवेधक झाली आहेत.

जगण्याचा संघर्ष, ऐश्वर्य आणि परत गतकाळाकडे हे चक्र उलटसुलट, तिरपागडं किंवा वाकडंतिकडं वाटय़ाला आलेल्या माणसांच्या कहाण्या काहीशा विदारक होतात. त्याला कधीकधी फार तार्किक कारणंही नसतात. पण कधीकधी चुकीचा काळ मात्र असतो. मंटोचे या संकलनातले नायक-नायिका तर ‘मायाबाजारा’तलेच होते आणि मंटोही त्यांच्यातच होता. त्यामुळे त्याच्यासाठी आतले-बाहेरचे असा हा प्रवास नव्हता. म्हणून या संकलनातून या बारा व्यक्तींबरोबर मंटोही तुकडय़ातुकडय़ातून उलगडतो.

याचा अनुभव अशोककुमारवरील पहिल्याच लेखात येतो. मंटोनं या लेखात अशोककुमार आणि बॉम्बे टॉकिजविषयी  लिहिलं आहे. अशोककुमारच्या अगदी साध्यासाध्या गोष्टीतून त्याच्या व्यक्तिमत्त्वावर पुरेसा प्रकाश टाकला आहे. पण त्याचवेळी या प्रकाशाचा एक झोत सतत मंटोवरही राहिला आहे. त्यामुळे या व्यक्तिचित्राचा शेवट अशोककुमारच्या नोटेशनवर न होता, तो मंटोचं पुढे काय होतं, या नोटेशनवर होतो.

नर्गिसच्या व्यक्तिचित्राची सुरुवातच फार मजेशीरपणे होते. मंटोची बायको आणि तिच्या दोन बहिणी मंटोच्या न कळत फावल्या वेळात वेगवेगळ्या अभिनेत्रींना फोन करून टाइमपास करत असतात. त्यात एकदा त्या नर्गिसला फोन करतात. तिची खूप तारीफ करतात. हा सिलसिला बरेच दिवस चालू राहतो. एकेदिवशी त्या नर्गिसला आपल्या घरी बोलावतात. नर्गिस जद्दनबाईला घेऊन त्यांना भेटायला जाते. पण नेमका त्याच दिवसी मंटो लवकर घरी येतो. मंटो त्या वेळी ‘फिल्मिस्तान’मध्ये नोकरी करत असतो. त्यामुळे जद्दनबाई त्याला फार चांगल्या पद्धतीनं ओळखत असतात. पण त्याविषयी त्याची बायको आणि मेहुण्या मंटोला काहीच सांगत नाहीत.

मंटोचीही ती नर्गिसशी पहिलीच भेट असते. पुढे मंटोनं नर्गिसच्या अभिनयाविषयी फार छान लिहिलं आहे. मंटो लिहितो, ‘‘नर्गिसने अभिनयाचे टप्पे हळूहळू गाठले, हे चांगलं झालं. एकाच उडीत तिने शेवटचा टप्पा गाठला असता तर चित्रपट पाहणा-या जाणकार मंडळींच्या व प्रेक्षकांच्या भावनांना अजाणतेपणाने दु:खाचा स्पर्श झाला असता. आपल्या अल्लडपणाच्या वयातही ती चित्रपटाच्या पडद्याबाहरेही अभिनेत्री बनून राहिली असती आणि चलाख व धूर्त व्यापाराच्या फुटपट्टीने आपलं आयुष्य मोजत राहिली असती.’’ शेवटी मंटोनं लिहिलं आहे, ‘‘शेवटी आयुष्य म्हणजे छाया-प्रकाशाची गुंफण आहे. या छाया-प्रकाशाच्या गुंफणीचं चित्रण म्हणजे हे फिल्मी जीवन! पण कधी कधी या फिल्मी जीवनात असा काही पेच पडतो, असं काही वळण येतं की प्रकाश हा प्रकाश उरत नाही, सावली ही सावली उरत नाही.’’

मेरठची कैची अर्थात पारो या अभिनेत्रीविषयी लिहिताना मंटोनं परत अशोककुमार यांच्याविषयीही लिहिलं आहे. कारण ही अभिनेत्री ‘फिल्मिस्तान’ची होती. पारो ही मेरठची वारांगना होती. हिंदी चित्रपटात काम करण्याच्या आवडीपायी ती ‘फिल्मिस्तान’मध्ये आली. तिनं काही चित्रपटही केले. पण त्यापेक्षा मंटोनं पारोचं व्यक्तिमत्त्व ज्या पद्धतीनं उभं केलं आहे, ते वाचून पाहण्यासारखंच आहे.

असं यातल्या सर्वच व्यक्तिचित्रांबद्दल सविस्तर लिहिता येईल. लिहायलाही हवं. पण लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, मंटोनं या संकलनातल्या प्रत्येक व्यक्तिचित्रात अशी काही जादू भरली आहे की, तुम्ही  प्रत्येक व्यक्तीमध्ये गुंतत जाता. या काही विजयाच्या कहाण्या नाहीत. मंटोनं कुणाचंही उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला नाही, तसंच कुणाचं खच्चीकरणही केलं नाही. त्यानं जे जे आहे ते ते तसं सांगितलं आहे. त्यामुळे यातल्या सर्वच व्यक्तिचित्रांमध्ये परस्परविसंगती, विसंवाद, संघर्ष, संकटं, मान-सन्मान, कौतुक, मानहानी, अशा अनेक गोष्टी येतात. विजय तेंडुलकरांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, ‘काही व्यक्ती या तुकड्या तुकड्यांनी लहान-मोठ्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही तुकडे मोठे असतात, काही तुकडे लहान असतात.’ मंटोची ही बारा व्यक्तिचित्रं अगदी तशीच आहेत.    


मुंबई नगरी बडी बांका

कुठल्याही शहराच्या स्थित्यंतराचा आलेख सातत्याने काढत राहणं, हे त्या शहराच्या स्थानीय इतिहासाच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वाचं असतं. मुंबई हे तर जगातलं एक महत्त्वाचं शहर आहे. त्याची न्यूयॉर्क आणि लंडनसारख्या शहराशी काहीशी अतिशयोक्त असली तरी तुलना केली जाते. मुंबईचं शांघाय वा सिंगापूर करण्याचीही भाषा राजकारणी मंडळी अधूनमधून करत असतात. मुंबईबद्दल बोलायला लागलो की, मूळ सात बेटं आणि ती जोडल्यानंतर वसत गेलेलं शहर, ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक इथे गुजरात आणि इतर ठिकाणांहून आणलेली माणसं, सुरुवातीचं मुंबई शहर अशा अनेक गोष्टींना सुरुवात होते. अठराव्या-एकोणिसाव्या शतकातली मुंबई ही खरोखरच काहीशी अद्भुत, रंजक आणि मनोरम्य म्हणावी अशी होती. ‘जिवाची मुंबई’ हा शब्दप्रयोग त्या मुंबईच्या भ्रमंतीतूनच तयार झाला असावा.

मुंबईचं वैभव म्हणजे मुंबईतल्या भव्य आणि प्रेक्षणीय वास्तू. या बव्हंशी वास्तू तयार करण्यात ब्रिटिशांचा मोठा वाटा आहे. ब्रिटिश ज्या ब्रिटनचे नागरिक त्यातल्या लंडन या शहराचं वास्तूवैभव तर कितीतरी प्रचंड आणि भव्य म्हणावं असं आहे. लंडन या शहराबद्दल किती पुस्तकं असावीत? साधारणपणे 25,000 पुस्तकं या एकटय़ा शहराविषयी आहेत, असं सांगितलं जातं. या पुस्तकांमध्येही कितीतरी प्रकारचं वैविध्य आहे. एकोणिसाव्या शतकातल्या लंडनमधील फॅशन, एकोणिसाव्या शतकात प्रकाशित झालेल्या पुस्तकांतील लंडन, 1945 नंतरचं लंडन, पहिल्या महायुद्धापूर्वीचं लंडन, दुस-या महायुद्धानंतरचं लंडन अशी कितीतरी विषयांवरील पुस्तकं आहेत. आणि अजूनही लिहिली जात आहेतच.

अगदी एवढय़ा प्रमाणावर नसलं तरी मुंबईविषयीचं कुतूहल आणि आकर्षणही काहीसं असंच म्हणावं लागेल. त्यात परकीय लेखकांपासून स्वकीयांपर्यंत अनेक अभ्यासकांचा समावेश आहे. अलीकडेच दिवंगत झालेल्या शारदा द्विवेदी यांची मुंबईवरील देखणी कॉफीटेबल बुक्स अनेकांना माहीत असतील. ‘बिहाइंड द ब्यूटीफूल फॉरेव्हर - लाइफ, डेथ अँड होप इन अ मुंबई अण्डरसिटी’ हे अलीकडेच प्रकाशित झालेलं कॅथरीन बू या अमेरिकन महिला पत्रकाराचं पुस्तक सध्या भारतीय इंग्रजी वाचकांमध्ये बरंच गाजतं आहे. मुंबईतल्या अधोविश्वाबद्दलचं हे पुस्तक आहे.

मराठीमध्ये एखादं पुस्तक गाजत आहे, असं म्हणण्याची सोय नाही, पण अलीकडेच प्रकाशित झालेल्या अरुण पुराणिक यांच्या ‘हरवलेली मुंबई’ या पुस्तकाची अवघ्या दोन महिन्यात दुसरी आवृत्ती निघावी, ही या पुस्तकाबद्दलची वाचकपसंती नोंदवणारी उल्लेखनीय घटना म्हणावी लागेल. चौरस आकार, भरपूर कृष्णधवल छायाचित्रं, देखणी छपाई आणि पुराणिक यांनी कष्टपूर्वक, अभ्यास करून नोंदवलेली मुंबईच्या काही वैशिष्टय़ांची सफर ही या पुस्तकाची काही महत्त्वाची वैशिष्टय़ं. तसं तर संशोधन करून कुठल्याही विषयावर पुस्तक लिहिणं हे काही विशेष नवलाचं मानायचं कारण नाही. पण याबाबतीत पुराणिक बरेचसे सरस आहेत. कारण ते मूळचे मुंबईकर. त्यांचा जन्म गिरगावातल्या एका जुन्या चाळीत झाला. त्यामुळे लहानपणापासून त्यांना मुंबईची ओळख होत गेली. (मुंबईतल्या वेश्या पाहिल्याची त्यांची आठवण ते दोन वर्षाचे असतानाची आहे.) पण लहानपण आणि तरुणपण या काळात पुराणिकांनी पाहिलेली मुंबई आता राहिली नाही. त्याच्या काही खुणाच तेवढय़ा शिल्लक राहिल्या आहेत. त्याही आता एकेककरून नाहीशा होत आहेत. गिरणगावातले उंचच्या उंच टॉवर आणि मॉल यांनी लालबाग-परळचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. मुंबईच्या जुन्या साऱ्याच वैशिष्टय़ांचा चेहरा असा बदलला नसला तरी तो पहिला राहिलेला नाही, हेही तितकेच खरे.

मुंबईचं ही सर्व स्थित्यंतर टिपणं तसं अवघडच होतं. त्यामुळे पुराणिक यांनी आपल्या या पुस्तकात दक्षिण मुंबईवरच भर दिला आहे. शिवाय हे लेख त्यांनी सुटेसुटे वेगवेगळ्या वेळी लिहिले आहेत. पण हा प्रत्येक लेख म्हणजे मनोरम्य आणि रंजकतेची परमावधी म्हणावी असा आहे. ‘चोर बाजार’ या लेखात पुराणिक लिहितात, ‘‘त्यावेळी सॅण्डहर्स्ट रोडवरून जाताना, नळ बाजाराच्या समोरच्या गल्ल्यातून, ‘रास्ते का माल सस्ते में’, ‘जुना पुराना सामान’, ‘बे बे रुपया, कोई भी माल उठाव’, ‘मिठा खाजा, बै पैसा’ असे तारसप्तकात ओरडत रस्त्यावर आपला माल विकणाऱ्या या मुस्लीम फेरीवाल्यांचा (काबाडी लोकांचा) आवाज (तत्कालीन व्हाईसरॉयच्या) त्यांच्या कानी पडला. त्या काळात विरळ लोकवस्ती व रस्त्यांवर गाडय़ांची फराशी रहदारी नसल्याने रस्त्यांवर शांतता नांदत असे. तेव्हा फेरीवाल्यांच्या आवाजाच्या त्रासाला त्रासिकपणे ‘क्या शोर बाजार है’ असे म्हणून व्हाइसरॉयसाहेबांनी नाक मुरडले होते. त्यावरून या जुन्या बाजाराचे नाव ‘शोर बाजार’ पडले. लोकांनी त्याचा ‘चोर बाजार’ असा अपभ्रंश केला.’’ अशी माहिती दिली आहे. हा लेख इतका मजेशीर आहे की, असा काहीएक बाजार मुंबईत आहे याचाच आपल्याला अचंबा वाटतो.

पुस्तकातला पहिलाच लेख आहे चाळसंस्कृतीविषयी. (अलीकडेच नीरा आडारकर यांनीही मुंबईतल्या चाळींविषयी इंग्रजीमध्ये कॉफीटेबल बुक काढलं आहे!) या लेखासोबतची छायाचित्रं पाहण्यासारखी आहेत. गिरगाव, ठाकूरद्वार या भागातल्या चाळींची काही वैशिष्टय़े नोंदवली आहेत. ‘‘पहाटे दुधाच्या लाईनीत उभे राहण्यापासून ते रात्री गच्चीत झोपायला जागा मिळेपर्यंत इथे फक्त संघर्ष आणि संघर्षच असतो. इथे वेळप्रसंगी भांडण, मारामारी केल्याशिवाय मूल मोठेच होऊ शकत नाही, हे कटू वास्तव आहे. त्यामुळे ‘धाडस’ त्यांच्या रक्तात नकळत बाणवले जाते.’’ असे पुराणिक शेवटी शेवटी लिहितात तेव्हा या चाळीतल्या विश्वाची ‘खरी गंमत’ कळते. आणि ते जग यापुढच्या काळात पाहायला आणि अनुभवायला मिळणार नाही, याची चुटपूटही लागते.

या पुस्तकात एकंदर वीस लेख आहेत. ‘गिरगाव चौपाटी’, ‘पानसुपारी’, ‘पानवाला’, ‘अलेक्झांड्रा’, ‘नाक्यावरचा इराणी’, ‘मुंबईतील पोसखाने’, ‘रामा गडी’ या शीर्षकांवरूनच त्या त्या लेखाचा विषय समजतो आणि त्या लेखांना दिलेल्या समर्पक छायाचित्रांतून जिवंत होतो. खरं तर या सर्वच लेखांबद्दल, त्यांच्या वैशिष्टय़ांबद्दल लिहिता येईल. पण ते जागेच्या मर्यादेअभावी शक्य नाही. आणि त्यातून वाचकांची रंजकताही कमी होण्याचा धोका आहे. कारण चित्रपटाचा शेवट जसा सांगू नये तसा या पुस्तकातल्या कुठल्याच लेखाचा गाभा सांगण्यात हशील नाही. तो प्रत्यक्ष वाचूनच अनुभवायला हवा.

पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पुस्तक कुणासाठी आहे? मुंबईविषयीचे आहे म्हणून ते फक्त मुंबईकरांसाठी आहे, असे अजिबात नाही. ज्या ज्या कुणाला मुंबईविषयी प्रामाणिक कुतूहल आहे, तिच्या जुन्या रूपाबद्दल आस्था आहे आणि स्थानिय इतिहासामध्ये रस आहे, त्या सर्वासाठी हे पुस्तक आहे. ही काही कथा-कादंबरी नाही, ही मुंबई शहराची एक धावती सफर आहे. तुम्ही या पुस्तकातली ठिकाणं प्रत्यक्षात पाहिली असतील तर तुम्हाला पुनप्र्रत्ययाचा आनंद मिळेल, पाहिली नसतील तर हे पुस्तक वाचून ती पाहण्याची इच्छा होईल. म्हणजे त्या जुन्या मुंबईचे आत्ता जे काही अवशेष शिल्लक आहेत, ते पाहता येतील. जुनी मुंबई आता अनुभवता येणार नाहीच, त्यामुळे त्यासाठी हे पुस्तक हाच काय तो काळ समजून घेण्याचा एक दुवा आहे.

Thursday, July 17, 2014

चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील गेली ४० वर्षे प्रामुख्याने हिंदी कवितांचा मराठी अनुवाद करीत आहेत. तो व्यावसायिक हेतूने नसून केवळ आणि निव्वळ कवितेवरील प्रेमापोटी करीत आहेत. म्हणूनच अनुवादाचा पेशा स्वीकारलेल्या या प्राध्यापकाच्या निष्ठेला महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीने नुकताच जाहीर केलेला पुरस्कार हा त्यांच्या साहित्यसेवेला केलेला सलामच म्हटला पाहिजे. औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयातून वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले पाटील म्हणजे हिंदी-मराठी या भाषांमधला एक महत्त्वाचा सांस्कृतिक दुवा. भीष्म सहानींच्या 'तमस'च्या त्यांनी केलेल्या मराठी अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तसाच त्यांनी मराठीतल्या दलित कवितांचा 'सूरज के वंशधर' या नावाने केलेला हिंदी अनुवादही वाखाणला गेला. नामदेव ढसाळ यांच्या कविता पहिल्यांदा महाराष्ट्राबाहेर पोहोचवल्या त्या त्यांच्या हिंदी अनुवादाने. 'समकालीन हिंदी कविता' या त्यांच्या संग्रहातून मैथिलीशरण गुप्त यांच्यापासून असद झैदींपर्यंतच्या हिंदूी कवींच्या कविता मराठीत आल्या. हिंदी कवितेसाठीचे मार्गदर्शक म्हणावे असे हे पुस्तक आहे. 'भूखंड तप रहा है' ही चंद्रकांत देवताले यांची दीर्घ कविता 'भूखंड तापू लागलंय' या नावाने त्यांनी मराठीत आणली. २००८ साली पाटील यांनी 'कवितान्तरण' हा अनुवादित कवितांचा पाचशेहून अधिक पृष्ठांचा संग्रह प्रकाशित केला. त्यात शंभरावर देशी-विदेशीकवींच्या एकंदर जवळपास ४०० कविता (मराठीत!) आहेत. एकाच कवीने विविध भाषांमधील, वेगवेगळ्या काळांतील आणि अतिशय भिन्न प्रकृतीच्या कवितांचा मराठीला परिचय करून द्यावा, यातून त्यांची सांस्कृतिक असोशी दिसते. या संग्रहासाठी त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. हिंदूीबरोबरच इंग्रजी, पंजाबी व कन्नड भाषेतील कविताही त्यांनी मराठीत आणल्या.
थोडक्यात, अनुवादाच्या क्षेत्रात असामान्य म्हणावे असे कर्तृत्व पाटील यांच्या नावे जमा आहे. चोखंदळ काव्यदृष्टी आणि कवितेवरील अव्यभिचारी निष्ठा यांचे निरंतर पाठबळ लाभलेल्या पाटील यांनी सुरुवातीपासून मराठीतल्या लघुअनियतकालिकांच्या चळवळीत अशोक शहाणे- भालचंद्र नेमाडे- रवींद्र किंबहुने- सतीश काळसेकर यांच्याबरोबर काम केले. औरंगाबादला त्यांनी नेमाडे आणि इतरांबरोबर सुरू केलेले 'वाचा प्रकाशन' बरेच वादळी ठरले होते. त्यानंतर त्यांनी अगदी अलीकडे 'तुला प्रकाशन' या नावाने काही कवितासंग्रह प्रकाशित केले होते. 'नि:संदर्भ', 'इत्थंभूत', 'बायका आणि इतर कविता', 'दिक्काल' हे पाटील यांचे स्वतंत्र कवितासंग्रह, तर 'आणि म्हणूनच', 'कवितेसमक्ष' ही काव्यसमीक्षेची पुस्तके, 'चौकटीबाहेरचे चेहरे' आणि 'विषयांतर' या दोन लेखसंग्रहात त्यांनी वेगवेगळ्या साहित्यिकांवर लिहिलेले लेखही विशेष उल्लेखनीय आहेत.

जया दडकर

काही माणसांना मानमरातब, प्रसिद्धी, कौतुकसोहळे यांच्याशी काडीमात्र देणंघेणं नसतं. असिधाराव्रतासारखं ते आपलं काम करत असतात. मराठीतील ज्येष्ठ लेखक जया दडकर हे अशा कलंदर वल्लींपैकीच एक नाव.
 'एक लेखक आणि एक खेडे', 'चिं. त्र्यं. खानोलकरांच्या शोधात', 'वि. स. खांडेकर सचित्र चरित्रपट' ही महत्त्वपूर्ण पुस्तकं आणि 'प्रकाशक रा. ज. देशमुख', 'संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश' (खंड १, सहसंपादक), 'श्री. दा. पानवलकर', 'निवडक पत्रे - नरहर कुरुंदकर' ही संपादनं दडकर यांच्या वेगळेपणाची, व्यासंगाची आणि परिश्रमाची उत्तम म्हणावीत अशी उदाहरणं आहेत. अस्सल मुंबईकराची जिद्द आणि संशोधकीय बाणा दडकर यांच्या व्यक्तिमत्त्वात मुरलेला आहे. रूढ चरित्रलेखन वा ललितरम्यतेऐवजी वेगळ्या तऱ्हेने माणसाचा तळठाव शोधत, त्याचा गाभा आणि आवाका उलगडण्याची दडकर यांची हातोटी विलक्षण आहे. खांडेकरांचा चरित्रपट काय किंवा खानोलकरांचा शोध, यातून दडकर यांची कसोशी आणि असोशी दृग्गोचर होते. श्री. पु. भागवतांचा सहवास आणि लघुनियतकालिकांची सोबत या दोन्ही गोष्टींचे धनी होण्याची संधी दडकर यांना मिळाली. म्हणूनच 'ललित' या ग्रंथप्रसारासाठी वाहिलेल्या मासिकाचा सुवर्णमहोत्सव आणि केशवराव कोठावळे पारितोषिकाचं तिसावं वर्ष यांचं औचित्य साधून या वर्षी दिलं जाणारं केशवराव कोठावळे पारितोषिक दडकर यांच्या 'दादासाहेब फाळके- काळ आणि कर्तृत्व' या ग्रंथाला मिळावं, ही जणू औचित्याची परमावधीच. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांची मराठीमध्ये तत्पूर्वी तीन चरित्रं लिहिली गेली होती. पण त्यातून फाळके यांना न्याय मिळत नाही, हे लक्षात आल्यावर दडकर यांनी फाळके नावाच्या महत्त्वाकांक्षी, प्रचंड हुन्नर असलेल्या जिगरी माणसाचं कालातीत कर्तृत्व त्यांना साजेलशा विस्तृत कॅनव्हासवर मांडण्याचा प्रयत्न केला. दडकर यांनी ज्या जागतिक परिप्रेक्ष्यात फाळके यांचं कर्तृत्व पाहिलं, त्यातून फाळके यांची भव्यता नेमकेपणाने अधोरेखित होते. फाळके भारतीय चित्रपटाचा श्रीगणेशा करत असताना जागतिक चित्रपटसृष्टीची वाटचाल कशा पद्धतीने होत होती याचा त्यांनी घेतलेला सविस्तर आढावा स्तिमित करतो. मराठीमध्ये अशा प्रकारच्या चरित्रलेखनाची पद्धत फारशी रूढ नाही, त्यामुळे २०११ साली प्रकाशित झालेल्या या चरित्राकडे कसं पाहावं, ते कसं वाचावं हे मराठी समीक्षक-वाचकांना ठरवता आलं नाही. त्यामुळे या चरित्राची व्हावी तशी चर्चा झाली नाही. 'देखल्या देवा दंडवत' या न्यायाने का असेना, आता तरी वाचक या चरित्राकडे वळतील अशी आशा करू या.

रवीन्द्र गोडबोले

प्रकाशन व्यवसायात ते काहीसे अपघातानेच आले. पुण्याच्या 'देशमुख आणि कंपनी'चे रा.ज. आणि सुलोचना देशमुख यांच्यानंतर या प्रकाशन संस्थेची मालकी गोडबोले यांच्याकडे आली. ते सुलोचनाबाईंचे भाचे. रा. ज. यांच्या निधनानंतर सुलोचनाबाईंना ते प्रकाशनाच्या कामात १९९५ पासून मदत करू लागले होते. ९८ मध्ये सुलोचनाबाईंचे निधन झाल्यावर त्यांनी 'देशमुख आणि कंपनी'चा प्रकाशन व्यवहार पूर्णपणे  बघायला सुरुवात केली. प्रकाशनासाठी कुठलेही पुस्तक स्वीकारताना संबंधित लेखकाबरोबर सविस्तर चर्चा करून त्याला पुन:पुन्हा त्याच्या हस्तलिखिताचे पुनर्लेखन करण्यास उद्युक्त करून त्याचे पुस्तक शक्य तितके परिपूर्ण करण्यावर गोडबोले यांचा कटाक्ष असे. त्यामुळे एकेका पुस्तकावर ते तीन तीन वर्षे काम करत. 'वेध महामानवाचा' (शिवाजी महाराजांवरील श्रीनिवास सामंत यांची कादंबरी), 'निवडक माटे', 'बा. भ. बोरकरांची समग्र कविता', 'धर्मक्षेत्रे-कुरुक्षेत्रे' (विश्वास दांडेकर), 'उत्तरायण' (रवींद्र शोभणे), 'निवडक कुरंदकर' अशी मोजकीच, पण महत्त्वाची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. गेल्या तीन वर्षांत त्यांनी केवळ दोनच कादंबऱ्या प्रकाशित केल्या. गोडबोले हे व्यवसायाने केमिकल इंजिनीअर. काही काळ त्यांनी विविध नोकऱ्याही केल्या. नंतर महाविद्यालयातल्या तीन मित्रांबरोबर त्यांनी अ‍ॅक्व्ॉरिअस टेक्नॉलॉजीज ही कंपनी १९९१ साली सुरू केली. बांधकामाला लागणारी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामग्री ते बनवत. रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग दर्शवणारे पट्टे, भिंतींना प्लास्टर करणारे यंत्र यांची भारतातील पहिली निर्मिती त्यांचीच. या कंपनीच्या अनेक उत्पादनांची युरोपकडे मोठय़ा प्रमाणावर निर्यात केली जाते. या कामातही त्यांची विचक्षण दृष्टी पाहायला मिळते. थोडक्यात गोडबोले निराळ्या वाटेने विचार व कृती करणारे आणि प्रत्येक कामात अचूकतेचा आग्रह धरणारे प्रकाशक आणि उद्योजक होते. विचाराने आधुनिक असले तरी गोडबोले यांना प्राचीन भारतीय संस्कृतीबद्दल डोळस कौतुकही होते. त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता यांचा अतिशय चांगला संगम त्यांच्यामध्ये पाहायला मिळत असे.
गेल्या पाचेक वर्षांत त्यांना महाभारताने झपाटले होते. महाभारताच्या प्रमाण संहितेपासून या विषयावरील अनेक पुस्तकांचे त्यांनी अतिशय बारकाईने वाचन केले होते. त्यातून 'महाभारत- संघर्ष आणि समन्वय' या पुस्तकाची निर्मिती झाली. महाभारताकडे इतक्या चिकित्सेने पाहणारा इरावती कर्वे यांच्या 'युगान्त'नंतरचा हा ग्रंथ असे त्याचे वर्णन जाणकारांनी केले आहे. 'औरंगजेब- शक्यता आणि शोकांतिका', 'सम्राट अकबर', 'इंद्राचा जन्म' आणि 'वेदांचा तो अर्थ' या चार संशोधनपर पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. ही पुस्तके म्हणजे त्यांची चिरस्थायी ओळख ठरेल.

नदीन गॉर्डिमर

20 November 1923 – 13 July 2014
वर्णविद्वेषाच्या काळ्याकुट्ट अरण्याला भेदत जाणारी लेखिका म्हणून नदीन गॉर्डिमरचे नाव १९९१ सालच्या नोबेल पुरस्काराने सर्वतोमुखी झाले असले तरी ती त्याआधी कित्येक वर्षांपासून रस्त्यावर आणि कागदावर त्या विरोधात सातत्याने झगडत होती. नदीनचे वडील ज्यू तर आई ब्रिटिश. व्यवसायानिमित्त हे कुटुंब दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले. वडिलांच्या दुकानात येणाऱ्या काळ्यांना ज्या तुच्छतेने वागवले जाई, ते पाहून लहानग्या नदीनच्या संवेदनशील मनावर ओरखडे उमटत. या ओरखडय़ांनी नदीन वयाच्या नवव्या वर्षांपासूनच लिहायला लागली. पंधराव्या वर्षी तिचे पहिले पुस्तक  प्रकाशित झाले.
आफ्रिकेत काळ्या-गोऱ्या वर्णसंघर्षांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये काही गोरेही होते. त्यापैकी एक बुलंद आवाज होता नदीनचा. महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या धर्तीवर 'आफ्रिकन नॅशनल काँग्रेस' शांततामय मार्गाने काम करीत असे. त्यात नदीन रुजू झाली. गोऱ्या सत्ताधीशांना नदीनचा हा संघर्ष कळत नव्हता. 'ही बया, गोरी असून काळ्यांच्या बाजूने का लढते?' असा त्यांचा सवाल असे. पण नदीन आपल्या अवतीभवती काळ्यांना जनावरांपेक्षाही अमानुष पद्धतीने वागवले जात असताना पाहूच शकत नसे. तिचा शांत स्वभाव अशा वेळी चवताळून उठे, तिच्या आवाजाला आणि शब्दांना धार येई. तिचे हे प्रखर शब्द आफ्रिकन सरकारला चटके देऊ लागले, तेव्हा 'द लेट बर्जर्स वर्ल्ड', 'अ वर्ल्ड ऑफ स्ट्रेंजर्स', 'बर्जर्स डॉटर', 'जुलैज पीपल' या तिच्या चार पुस्तकांवर सरकारने बंदी घातली. यातील पहिल्या दोन्ही पुस्तकांवरील बंदी दशकाहून अधिक काळ होती. मग नदीनची लढाई सेन्सॉरशिपच्या विरोधातही सुरू झाली. नदीनसाठी परदु:ख शीतल नव्हतेच. दु:खात असा भेदभाव करताच येत नाही, याचा वस्तुपाठ म्हणजे नदीनच्या कादंबऱ्या आणि कथा. १९९१ साली तिला नोबेल जाहीर करताना समितीने, 'तिच्या भव्य महाकाव्यासारख्या लेखनात परदु:खाबद्दलची तिची आत्मीयता प्रखरपणे प्रकट होते' असे नमूद केले. नोबेलबद्दल नदीनचे नेल्सन मंडेलांकडून अभिनंदन अपेक्षितच होते, पण जेव्हा तत्कालीन (आणि द. आफ्रिकेचे शेवटचे गोरे) राष्ट्राध्यक्ष फ्रेडरिक विलेम दि क्लर्क यांनीही तिचे अभिनंदन केले, तेव्हा नदीनला एक संघर्ष तडीस गेल्यासारखे वाटले. १५ कादंबऱ्या, २० कथासंग्रह आणि पाच लेखसंग्रह लिहिणारी नदीन जशी समर्थ लेखिका होती, तशीच समर्थ कार्यकर्तीही होती आणि तितकीच समर्थ आईसुद्धा. नव्वदच्या दशकात आफ्रिकन समाजाला एड्ससारख्या दुर्धर आजाराने ग्रासायला सुरुवात केली, तेव्हा त्याविषयी नदीनने तडफेने आणि हिरिरीने जनजागृती केली. ही संघर्षयात्रा १३ जुलै रोजी तिच्या निधनाने संपली.

Friday, July 11, 2014

ये मेरी जोहराजबीं तुझे मालूम नहीं....

Zohra Sehgal  (27 April 1912 – 10 July 2014)
'टायटॅनिक' जहाज तब्बल १०२ वर्षांपूर्वी- म्हणजे १९१२ साली बुडाले, त्याच वर्षी जोहरा सेहगल जन्मल्या. हा निव्वळ योगायोग. त्या बुडालेल्या जहाजाशी जोहरा यांचा ओढूनताणून संबंध लावणे चूकच ठरेल. जगाला गवसणी घालण्याची जिद्द आणि तरीही आपला प्रवास आपल्याच वेगाने करण्याचा स्वभाव जोहरा यांच्याकडे होताच, पण मजेत जगण्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक आणि सांस्कृतिक समृद्धीही त्यांच्याकडे होती. या चैतन्यमयी आयुष्याची आनंदयात्रा आता निमाली आहे. एका शतकभराच्या साक्षीदार होण्याचे भाग्य लाभलेल्या सेहगल यांची सगळी आयुष्ययात्रा ही धाडसाची, संघर्षांची पण चैतन्याने रसरसलेली होती. त्यांच्या या प्रवासात हिंदी चित्रपटांचा किनारा जरा उशिराच आला. आज अनेकांना त्या आठवत असतील 'चीनी कम'मधील अमिताभ बच्चनच्या आईच्या भूमिकेसाठी. खुद्द अमिताभ यांनाही ही आई संस्मरणीय वाटली होतीच, मग चाहत्यांची काय कथा. 'माय' लागून गेलेल्या या आजीने वयाच्या ९५ वर्षी उत्साह, ऊर्जा, चैतन्य याबाबतीत या तगडय़ा अभिनेत्याला खरोखरीची तुल्यबळ साथ दिली. अशी साथ मिळाली की माणसे स्पर्धा करीत नाहीत, विनम्रपणे दुसऱ्याचे गुण स्वीकारतात. अमिताभ यांनीही म्हणे या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर जोहरा यांच्या प्रशंसेसाठी शम्पेन पाठवले आणि सोबत एक चिठ्ठी.. 'तुम्हालाही कदाचित माझ्यासह काम करणे आवडले असेल, अशी आशा आहे. तुमच्यासह काम करणे हा माझ्यासाठी नवलोत्सव होता.. तुमची अदम्य ऊर्जा साऱ्याच तरुणांना स्फूर्ती देणारी आहे'! अर्थात, या स्तुतीने जोहराआजी फुशारल्या नसतील.. लॉरेन्स ऑलिव्हिए, पृथ्वीराज कपूर, सई परांजपे, त्याहीआधी दिग्गज नर्तक उदय शंकर अशांसह काम करण्याची सवयच त्यांना झालेली होती.
उत्तर प्रदेशातील खानदानी मुसलमान कुटुंबातला जोहरा यांचा जन्म. हे घराणे ब्रिटिशांच्या आगमनानंतरही नोकझोक टिकवून राहिलेले. वाघिणीच्या दुधाचा स्वीकार करणारे आणि आचारविचारानेही तरक्कीपसंद. त्यामुळेच, शालेय शिक्षण पूर्ण होता-होता 'लग्नापेक्षा करिअरच करेन म्हणते मी' असे जोहरा म्हणाल्यावर काका, भाऊ यांच्याकडून पाठिंबाच मिळाला. वयाच्या अठराव्या वर्षी त्या जर्मनीला नृत्य शिकायला गेल्या. तीन वर्षांनी भारतात परत आल्यावर, भारतीय नृत्यशैलींचा प्रसार जगभर करणारे प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांच्या नृत्यसंस्थेत त्या रुजू झाल्या. पुढील आठ वर्षांतील त्यांचे जगभ्रमण याच संस्थेमार्फत झाले आणि इथेच त्यांना जन्माचा जोडीदारही मिळाला.. कामेश्वर सेहगल. लाहोरमध्ये स्थायिक होऊन या जोडप्याने स्वत:ची डान्स अकॅडमी सुरू केली. पण लवकरच फाळणीचे वातावरण सुरू झाले. हा देश की तो, याचा निर्णय घ्यावाच लागणार हे दिसू लागले, तेव्हा पतीसह त्या मुंबईला आल्या आणि इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेचा सांस्कृतिक आधार त्यांना सहज मिळाला. इप्टा हीच १९४०-५० या काळात मुंबईतील सर्वाधिक मोठी सांस्कृतिक चळवळ होती. मुंबईतील बुजुर्ग, जानेमाने आणि नवोदित कलाकार मोठय़ा संख्येने इप्टाशी संबंधित. उदय शंकरांच्या तालमीत वाढलेल्या सेहगल नाटय़ऋषी इब्राहिम अल्काझी आणि पृथ्वीराज कपूर यांच्या सहकारी झाल्या आणि त्यांच्या नृत्यकौशल्याला अभिनयाचे पैलू पडू लागले. जातिवंत कलाकाराला आपल्या कलेशिवाय बाकी साऱ्या गोष्टी शून्यवत वाटतात. त्यामुळेच, इप्टात चालून आलेल्या पदास नकार देऊन त्या पृथ्वीराज कपूर यांच्या 'पृथ्वी थिएटर्स'मध्ये आल्या. १९४५ ते ५९ पर्यंत त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासह 'दीवार' 'शाकुंतल',  'पठाण', 'गद्दार', 'आहुती', 'कलाकार', 'पैसा', 'किसान' अशा नाटकांची निर्मिती केली. 'पठाण'पासून नाटकात छोटय़ामोठय़ा भूमिकाही करायला सुरुवात केली. तब्बल १४ वर्षे त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासह काम केले. पतीच्या अपघाती निधनामुळे १९५९ साली जोहरा यांनी पृथ्वी थिएटरचा राजीनामा दिला आणि पुढच्याच वर्षी ही मातबर नाटय़संस्था बंद पडली.
जहाज बुडेलशी परिस्थिती असताना अंत:प्रवाह ओळखून जहाजाने नवा मार्ग शोधावा, तसे जोहरा यांनी पुढल्या दोन वर्षांत केले.. मुंबईऐवजी दिल्लीत राहून तेथील नाटय़संस्थेत काम आणि शंकर्स वीकलीमध्ये नृत्य समीक्षालेखन, अशी दुहेरी जबाबदारी जोहरा सांभाळू लागल्या. याच काळात तत्कालीन रशिया, पूर्व जर्मनी आणि झेकोस्लोव्हाकियाचा तीन महिन्यांचा दौरा करून, भारतीय नृत्य आणि नाटय़ाविषयी अनेक व्याख्याने त्यांनी दिली. मग १९६२ मध्ये अभिनय अभ्यासक्रमासाठी त्यांना ब्रिटिश शिष्यवृत्ती मिळाली आणि लंडनमध्ये त्यांच्या आयुष्यातील तिसरे पर्व सुरू झाले. तब्बल दशकभरच्या लंडन-वास्तव्यात सुरुवातीला त्यांनी कारकुनी केली, काही काळ चहाचे हॉटेलही चालवले. पण १९६६ मध्ये 'द लाँग डिस्टन्स डय़ुएल' या बीबीसीवर सादर होणाऱ्या कार्यक्रमात भूमिका मिळाली. मग बीबीसीच्याच रुडयार्ड किपलिंगवरील मालिकेत आणि इतर नाटकांत कामे मिळत गेली. तरीही १९७४ साली त्या दिल्लीला परतल्या. 'राष्ट्रीय लोकनृत्य पथका'चे काम केंद्र सरकारने त्यांच्यावर सोपवल्यामुळे, सर्व भारतीय भाषांतील लोकनृत्ये बसवून त्यांचे भारतभर प्रयोग जोहरा यांनी केले. पण लवकरच आणीबाणी लागू झाली आणि त्या एकाधिकारशाहीने या संस्थेचा बळी घेतला. इथे काही खरे नाही हे ओळखून त्या लंडनला परतल्या. १९८७ पर्यंत लंडनच्या रंगभूमीवरील तसेच बीबीसीवरील अनेक नाटकांत भूमिका केल्या. सर लॉरेन्स ऑलिव्हिए, दिग्दर्शक सर टायरॉन गथ्री, फिओना वॉकर, प्रिसिला मॉर्गन आणि जेम्स केरी या ब्रिटिश रंगभूमीवरील दीपस्तंभांबरोबर काम केले.
इप्टा, पृथ्वी थिएटर, लंडनमधील ओल्ड विक, द ब्रिटिश ड्रामा लीग, बीबीसी अशा चढत्या भाजणीच्या प्रवासात जोहरा यांची वाटचाल सुखकर झाली असे नाही. प्रत्येक वेळी विस्थापितासारखा त्यांना आपला गाशा गुंडाळून नव्या ठिकाणी स्वत:बरोबर आपल्या कलेचेही पुनर्वसन करावे लागले. पण त्या कधी हिंमत हरल्या नाहीत की त्यांनी आपली प्रतिभा आळसावू दिली नाही. मिळेल त्या मार्गाने त्या वाट काढत राहिल्या. आठ वर्षे उदय शंकर, १४ वर्षे पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर आणि तब्बल २५ वर्षे लंडनमध्ये टीव्हीवर काम केल्यावर सेहगल ८७ साली भारतात परतल्या तेव्हा खरे तर अनेक संधींनी त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहायला हवे होते. पण त्यांना हिंदी चित्रपटांतील छोटय़ा छोटय़ा भूमिका कराव्या लागल्या. तरीही त्यांनी उतारवयात १५ इंग्रजी नाटके, २६ चित्रपट आणि १४ टीव्ही मालिकांत काम केले. १९९३ ते २००५ या काळात काव्य-अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम केले. जाहिरातींसाठीही विचारणा होऊ लागली आणि जोहरा नाही म्हणाल्या नाहीत.. अशाच एका जाहिरातीत  विवेक ओबेरॉय त्यांचा हात हातात घेऊन म्हणतो, 'ये मेरी जोहराजबी, तुझे मालूम नहीं..'    
 काम करण्याची अफाट ऊर्जा, 'जाऊ तिथे तगून राहू' ही महत्त्वाकांक्षा, यांच्या जोडीला जगण्यावरचे नितांत प्रेम या गोष्टींनी जोहरा सेहगल यांना कायम चिरतरुण ठेवले. त्यांना पडद्यावर पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असेच म्हणावेसे वाटत असणार. उत्फुल्ल रसिकता आणि सळसळते चैतन्य यांचे शतक साजरे करून, त्याहीवर दोन वर्षे जगून त्या गेल्या.. न फुटण्याचे वरदान कोणत्याही जहाजाला मिळालेले नसते, पण आपले जहाज कसे डौलात पुढे नेत राहायचे, हे समजावे लागते. त्यासाठी केवळ निर्णयशक्ती नव्हे तर तंत्रावरली हुकमत आणि कौशल्यही आवश्यकच असते. हे सारे जोहरा नावाच्या जहाजाकडे होते. त्यालाही काळाच्या समुद्राने कवेत घेतले.

Tuesday, June 24, 2014

हालहवाल एका धडपडय़ा प्रकाशकाची

प्रकाशनसंस्थांच्या संस्थापकांची आत्मचरित्रे आणि चरित्रे मराठीमध्ये फारच कमी आढळतात. मातब्बर म्हटल्या जाणाऱ्या रा. ज. देशमुख, श्री. पु. भागवत, रामदास भटकळ या प्रकाशकांनीही आत्मचरित्र लिहिण्याचे टाळले आहे. यातील काहींचे गौरवग्रंथ निघाले आहेत खरे, पण आत्मचरित्र ही फस्र्टहँड डॉक्युमेंटरी असते. संबंधित प्रकाशकाने स्वत: अनुभवलेला काळ त्यानेच सांगणे जास्त महत्त्वाचे असते. शिवाय मराठीमध्ये मोजके अपवाद वगळता गौरवग्रंथाची परंपरा ही फारशी नावाजण्याजोगी नाही. अलीकडच्या काळात तर ज्या प्रकारचे गौरवग्रंथ प्रकाशित होतात, त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे. असो. तर पहिल्या फळीतल्या प्रकाशकांनी आपली आत्मचरित्रे फारशी लिहिली नसली तरी दुसऱ्या फळीतल्या प्रकाशकांनीही फारशी लिहिलेली नाहीतच. पण त्यातील काही मात्र अलीकडे लिहू लागले आहेत. पुष्पक प्रकाशनाचे ह. ल. निपुणगे यांचे 'हलचल' हे त्यापैकीच एक. हे आत्मचरित्र खऱ्या अर्थाने प्रकाशकीय म्हणावे असे नाही. कारण निपुणगे यांनी केवळ प्रकाशन एके प्रकाशन असे काही केलेले नाही. खरं तर त्यांनी प्रकाशनाचा व्यवसाय करून पाहिला, मुद्रण व्यवसाय करून पाहिला, लायब्ररी चालवून पाहिली, दिवाळी अंक चालवला, कृषिवलसारख्या वार्षिक दैनंदिनी काढल्या, मासिक चालवले आणि उतारवयात मसापचे पदाधिकारी म्हणूनही काम केले. पण यापैकी कुठेच फार उल्लेखनीय म्हणावी अशी कामगिरी निपुणगे यांना करता आलेली नाही. पण हेही तितकेच खरे की, काय केले नाही यापेक्षा जे काही केले ते काय प्रतीचे आहे, असे पाहणे हे अधिक सयुक्तिक ठरते. निपुणगे यांच्या या आत्मचरित्राबाबतही तोच दृष्टिकोन ठेवला तर ते फारसे निराश करत नाही.
याची काही कारणे आहेत. एक म्हणजे अतिशय सामान्य परिस्थितीतून काबाडकष्टांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व पिढीतील निपुणगे आहेत. फारसे शिक्षण नसताना, जवळ कुठल्याही प्रकारचे भांडवल नसताना मंचरसारख्या ठिकाणाहून नेसत्या वस्त्रानिशी आईसह पुण्यात आले. भाडय़ाच्या खोलीत राहू लागले. आधी आलेपाक, मग उदबत्त्या, मग पेपर टाकणे, मग प्यून, नंतर कम्पाउंडर, लग्न व्यवस्थापक, बांधकाम मॅनेजर अशा मिळेल त्या नोकऱ्या करत निपुणगे यांनी आपली वाट शोधत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. नंतर ते व्हीनस प्रकाशनात कामाला लागले. त्यानंतर वोरा बुक कंपनीत. पडेल ते काम करण्याचा स्वभाव असल्याने आणि प्रामाणिकपणा अंगात मुरलेला असल्याने निपुणगे जातील तिथे लोकांचा विश्वास संपादन करत राहिले. वोरा कंपनीत काम करत असतानाच त्यांनी मित्राबरोबर नेपच्यून लायब्ररी सुरू केली. शाळा-कॉलेजमधील मुलांसाठी असलेल्या या लायब्ररीला चांगला प्रतिसादही मिळाला. लायब्ररी चालू असतानाच १ जून १९६३ रोजी निपुणगे यांनी पुष्पक प्रकाशन सुरू करून 'रेखन आणि लेखन' हे आपले पहिले पुस्तक प्रकाशित केले. या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पुण्यात एका होतकरू आणि धडपडय़ा प्रकाशकाची भर पडली.
निपुणगे यांनी प्रकाशनाला सुरुवात केली, त्याला आता जवळपास पन्नास र्वष होऊन गेली आहेत. या काळात त्यांनी   रा. चिं. ढेरे, उद्धव शेळके,   ह. मो. मराठे, बाळ गाडगीळ, ग. वि. अकोलकर अशा काही लेखकांची पुस्तके प्रकाशित केली. आचार्य अत्रे यांच्याविषयीची 'साहेब' ही कादंबरी उद्धव शेळके यांच्याकडून तर ग. दि. माडगूळकर यांच्याविषयीची 'निर्मोही' ही कादंबरी रवींद्र भट यांच्याकडून लिहून घेतली. या दोन्ही पुस्तकांकडून त्यांची फार अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. पण गप्प बसतील ते निपुणगे कसले. त्यांनी आपला धडपड करण्याचा उद्योग चालूच ठेवला. १९८१ सालापासून 'विशाखा' या दिवाळी अंकाचे पुनप्र्रकाशन करायला त्यांनी सुरुवात केली, मग बळीराजा, गृहिणी, कृषिवल या वार्षिक दैनंदिनींचे प्रयोग करून पाहिले. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. थोडेफार आर्थिक स्थैर्य आले.
त्यांच्या पत्नी त्यांना 'मारा अंधारात उडय़ा आणि धडपडा' असे म्हणत. निपुणगे यांच्या प्रकाशन, मुद्रण, मासिक, दैनंदिनी, दिवाळी अंक या सर्व उद्योगांसाठी हेच वर्णन समर्पक ठरते. त्यांच्या या प्रयोगांना त्यांच्या पत्नीची खंबीर साथ होती हेही तितकेच खरे. शिवाय त्यांनी नोकरी करून घर सांभाळले. त्यामुळे निपुणगे यांना धाडसी प्रयोग करून पाहण्याचे आणि सतत धडपडण्याचे स्वातंत्र्य मिळत राहिले!
प्रकाशकाने प्रकाशित केलेल्या एखाद्या पुस्तकावरून काही वादविवाद झाले नाहीत, न्यायालयीन खटले लढावे लागले नाहीत, असे सहसा होत नाही. सध्याच्या काळात या सव्यापसव्याच्या भीतीने अनेक मराठी-इंग्रजी प्रकाशक आपली पुस्तके सपशेल मागे घेतात किंवा नष्ट करून टाकतात. तर ते असो. विनोदी लेखक बाळ गाडगीळ यांच्या 'वळचणीचे पाणी' या आत्मचरित्राविषयी वर्षभराने फग्र्युसनचे माजी प्राचार्य बोकील यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून गाडगीळ आणि निपुणगे यांना न्यायालयात खेचले. त्याची छोटीशी हकिकतही रोचक म्हणावी अशी आहे.
असे संघर्षांचे छोटे-मोठे प्रसंग निपुणगे यांच्या आयुष्यात सतत आले आहेत. हे आत्मचरित्र अशा हकिकतींनीच भरले आहे. पण त्या सर्व आर्थिक संघर्षांच्या आणि व्यावहारिक हिकमतीच्या आहेत. निपुणगे यांनी त्यांना जमेल तेवढे आणि तसे प्रयोग करून स्थिर होण्याचा प्रयत्न केला. पण अशा गोष्टींना मूलभूत मर्यादा असते. त्यामुळे या चौकटीत जे आणि जेवढे शक्य होते, तेवढेच यश निपुणगे यांना मिळाले.
दिवाळी अंकासाठी, मासिकासाठी जाहिराती मिळवण्यासाठी काय काय करावे लागले, याविषयी निपुणगे यांनी सविस्तर लिहिले आहे, तसेच विशाखा या दिवाळी अंकात दरवर्षी काय काय साहित्य छापले याविषयी एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. केशवराव कोठावळे, श्री. ग. माजगावकर, वोरा कंपनीचे अमरेंद्र गाडगीळ, बाळ गाडगीळ अशा प्रकाशनव्यवहाराशी संबंधित व्यक्तींच्या स्वभावाचे काही पैलू निपुणगे यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून नोंदवले आहेत. शेवटचे प्रकरण हे त्यांच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतील कामाविषयीचे आहे. या प्रकरणातून मसापचे अंतरंग काही प्रमाणात जाणून घ्यायला मदत होते. या साहित्यिक संस्थेत कशा प्रकारचे राजकारण चालते, त्याची चांगल्या प्रकारे माहिती होते आणि राजकारणी काय किंवा साहित्य व्यवहारात लुडबुड करणाऱ्या व्यक्ती काय, यांच्यात कसा फारसा फरक नसतो, हे आपसूकच समजायला मदत होते.
प्रकाशनापासून सुरुवात करून पुस्तक विक्री, मुद्रण व्यवसाय, दिवाळी अंक इथपर्यंत प्रवास केलेल्या एका धडपडय़ा प्रकाशकाचे हे आत्मचरित्र आहे. साडेतीनशे पानांचे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकाला आवडेलच
असे नाही, पण प्रकाशन व्यवहाराशी संबंधित असलेल्यांना यातून काही संदर्भ-माहिती मिळू शकते आणि ज्यांना या क्षेत्राकडे वळायचे आहे त्यांना काय करू नये आणि कशा प्रकारे करू नये, याचा धडा या आत्मचरित्रातून नक्की मिळू शकतो. त्यांनी या पुस्तकाच्या वाटेला जायला काहीच हरकत नाही. फार थोर असे काही हाती लागणार नाही हे खरे, पण फार अपेक्षाभंगही होणार नाही.  
'हलचल' - ह. ल. निपुणगे, पुष्पक प्रकाशन, पुणे,
पृष्ठे - ३५२, मूल्य - ३५० रुपये.

कर्तेपणाकडून शहाणपणाकडे?

भारतीय प्रशासन सेवेतील माजी ज्येष्ठ अधिकारी पवन के. वर्मा यांची वर्तमान भारतीय समाजाचे भाष्यकार म्हणून ओळख झाली ती, १९९८ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'द ग्रेट इंडियन मिडल क्लास' या पुस्तकामुळे. जागतिकीकरणोत्तर भारतीय लोकव्यवहाराचे, विशेषत: मोठय़ा शहरांमधील नव्याने उदयाला येत असलेल्या मध्यमवर्गाचे वर्मा यांनी या पुस्तकात अतिशय यथार्थ विश्लेषण केले आहे. साहजिकच या पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि विदेशी भाषांमध्येही अनुवाद झाले. त्यानंतर २००० साली वर्मा यांनी पत्रकार रेणुका खांडेकर यांच्यासह 'मॅक्झिमाइज युवर लाइफ- अ‍ॅन अ‍ॅक्शन प्लॅन फॉर द इंडियन मिडल क्लास' या पुस्तकाचे लेखन केले. त्यानंतर 'बिइंग इंडियन- द ट्रथ अबाऊट व्हाय द २१ सेन्चुरी विल बी इंडियाज' (२००४), 'बिकमिंग इंडियन - द अनफिनिश्ड रिव्हॉल्युशन ऑफ कल्चर अँड आयडेंटिटी' (२०१०) ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील पहिल्या पुस्तकाची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली. म्हणजे गेली सोळा-सतरा वर्षे वर्मा सातत्याने भारतीय मध्यमवर्गाचे निरनिराळे प्रकारे विश्लेषण करत आहेत, त्याला त्याच्या कर्तव्याची, पूर्वाश्रमीच्या समृद्ध वारशाची, भारतीय संस्कृतीची, समाजाप्रतिच्या उत्तरदायित्वाची आणि भविष्यातील आव्हानांची जाणीव करून देत आहेत.
जागतिकीकरणोत्तर भारतीय मध्यमवर्ग हा महत्त्वाकांक्षी आणि सुख-समृद्धीला प्राध्यान्य देणारा आहे. सुशिक्षित, करिअरिस्ट असलेल्या या वर्गाला देशाचे राजकारण स्वच्छ, कार्यक्षम आणि विकासाभिमुख हवे आहे. साहजिकच या वर्गाच्या इच्छा-आकांक्षांचा प्रतिध्वनी उमटायला सुरुवात झाली. दुसरीकडे जागतिकीकरणामुळे शिक्षण, आरोग्य, राहणीमान, संधी यांचा लाभ मिळवून या वर्गाच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत गेली. त्यामुळे भारतीय राजकारणाचे कर्तेपणही याच वर्गाकडे आले. त्याचे ठसठशीत प्रतिबिंब २०१४च्या निवडणुकांत उमटलेले पाहायला मिळाले. त्यामुळे 'भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारी निवडणूक,' असे भविष्यात या निवडणुकीचे वर्णन केले जाण्याची शक्यता आहे.
आजच्या भारतीय मध्यमवर्गाची भूमिका बदलण्याची सात कारणे वर्मा यांनी पहिल्या प्रकरणात दिली आहेत. या वर्गाची वाढती आणि मतपेटीवर परिणाम करू शकणारी संख्या, पॅन-इंडियनसारखा स्वत:चा विस्तारलेला समूह, आपल्या वर्गाबाबतची सजगता, हा वर्ग वयाने पंचविशीच्या आतबाहेर असणे, या वर्गाचे सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाइल या साधनांवरील आधिपत्य, सामाजिक प्रश्नांविषयीचे भान आणि सरकार-प्रशासन यांच्या अकार्यक्षमतेविषयीची चीड, ही ती सात कारणे. या सात कारणांमुळे या मध्यमवर्गाच्या व्यक्तिमत्त्वात, भूमिकेत, प्रभावात आणि गुणवत्तेत बदल झाला आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्नांबाबत हा वर्ग रस्त्यावर उतरू लागला आहे, आपल्यापरीने त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करू लागला आहे, ही चांगली गोष्ट आहे, असे वर्मा म्हणतात. पण त्याच वेळी काही कळीचे प्रश्नही उपस्थित करतात. याची भविष्यातील दिशा काय असेल, मध्यमवर्गाच्या या संतापाला आणि सामाजिकतेला भविष्यात क्रांतिकारी, सकारात्मक बदलाचे कोंदण मिळू शकेल काय? की आहे ते बदला, पण नवे काहीच धोरण नाही, असा हा प्रकार आहे का? मध्यमवर्गाची ही ऊर्जा 'गेम चेंजर' ठरणार की हा 'सिनिकल गेम प्लॅन' ठरणार?
दुसऱ्या प्रकरणात मध्यमवर्गाच्या सामाजिक आणि राजकीय भूमिकेविषयी नेमके प्रश्न विचारले आहेत. त्यासाठी त्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मध्यमवर्गाची भूमिका नेमकेपणाने विशद केली आहे. म. गांधी, पं. नेहरू, आणीबाणी, बाबरी मशीद, आरक्षण, आर्थिक सुधारणा याबाबतच्या तत्कालीन मध्यमवर्गाच्या भूमिकेचे दाखले दिले आहेत.
तिसऱ्या प्रकरणात मध्यमवर्गाला राजकारणात बदल हवाय, पण त्या बदलाची दिशा काय असायला हवी, याचा ऊहापोह केला आहे.
शेवटच्या समारोपाच्या प्रकरणात वर्मा  मध्यमवर्गाने राज्यकर्त्यांची मानसिकता त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारून बदलायला हवी, असे सांगतात. कारण योग्य प्रश्न विचारण्यातून तुमचे शहाणपण सिद्ध होत असते. हे शहाणपण दाखवतानाच भारतात धार्मिक सौहार्द आणि सुप्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या दोन्ही तितक्याच सामंजस्याने हाताळल्या जायला हव्यात, हेही वर्मा नमूद करतात.
थोडक्यात कर्त्यांच्या भूमिकेत गेलेल्या मध्यमवर्गाने शहाण्यासुरत्याचीही भूमिका निभवायला हवी आणि त्यासाठी कशाकशाचे भान ठेवायला हवे, हे सांगणारे हे पुस्तक आहे.
द न्यू इंडियन मिडल क्लास -
द चॅलेंज ऑफ २०१४ अँड बियाँड :
पवन के. वर्मा,
हार्पर कॉलिन्स, नोएडा,
पाने : १०१, किंमत : २९९ रुपये.