Tuesday, July 28, 2015

कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावणारा कादंबरीकार

आदर्श, परंपरा, प्रेरणा, मानदंड, निकष, धारणा या सतत बदलणाऱ्या गोष्टी असतात, असायला हव्यात. कारण प्रत्येक नवी पिढी ही आधीच्या पिढीची टीकाकार असते. आधीच्या पिढीने जी काही मांडणी केलेली असते, त्यातील उणिवा शोधणे, त्या मांडणीत नवी भर घालणे, प्रसंगी त्यातील कालबाह्य भाग नाकारून नवी मांडणी करणे ही नव्या पिढीची कामे असतात. एवढेच नव्हे, तर कर्तव्य असते. कुणाही एका व्यक्तीने केलेल्या मूल्यमापनाला मर्यादा असतात. कारण त्या व्यक्तीच्या साहित्याचे काहीच पैलू उलगडले जाऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही साहित्याचे पुन्हापुन्हा मूल्यांकन करणे हे समीक्षकांचे कामच असते. त्यामुळे त्या व्यक्तीचे योगदान नेमकेपणाने जाणून घ्यायला मदत होते. काळाच्या ओघात त्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेले गैरसमज दूर होण्यास मदत होते. आधीच्या समीक्षकांकडून कळत-नकळत झालेला अन्याय दूर करता येतो. मात्र, याबाबतीत मराठी साहित्यातील समीक्षक कमी पडतात, ही वस्तुस्थिती आहे. मराठी समीक्षकांनी साठोत्तरी प्रवाहानंतर फारसे नवे सिद्धान्त मांडलेले नाहीत आणि ज्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांची दखलही घेतलेली नाही. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे, तर प्राध्यापक रा. ग. जाधव यांनी ‘साहित्याचे परिस्थितीविज्ञान’ (ecology off literature) हा आधी मांडलेला आपला सिद्धान्त दोनेक वर्षांपूर्वी नव्याने मांडून दाखवला आहे; पण त्याची साधी दखलही मराठी समीक्षकांनी घेतलेली नाही. त्याची जाधव यांनाही पूर्वकल्पना होती, म्हणूनच त्यांनी माझे पुस्तक कोणी वाचणार नाही, असे नि:संदिग्धपणे सांगितले होते.
अशा प्रकारची उदासीनता ही अनभ्यस्ततेतून निर्माण होते. जुन्याच जोखडांना चिकटून राहिल्याने आणि जे आपल्याला पटत नाही, ते सरसकट नाकारायचेच या वृत्तीने मराठी समीक्षा विद्यापीठीय वर्तुळापुरती मर्यादित झाली. तिचा समाजाशी असलेला अनुबंध तुटला; पण त्याचे सोयरसुतक समीक्षकांना आहे, याचे दाखले फारसे सापडताना दिसत नाहीत.
या प्रकारामुळे प्रयोगशीलता, नवे रचनाबंध, नवे दृष्टिकोन यांची उपेक्षा करणे, त्याची दखल न घेणे वा त्यावर अनभ्यस्त पद्धतीने टीका करणे हे प्रकार वाढीला लागलेले दिसतात.
याची अलीकडची दोन महत्त्वाची उदाहरणे म्हणजे विलास सारंग आणि श्याम मनोहर.
 सारंग यांची अकारिक प्रयोगशीलता तर मराठी समीक्षक, लेखक आणि वाचक यांना पेलवलीच नाही. ज्यांनी सारंग यांची पुस्तके प्रकाशित केली, त्या प्रकाशकांना ती कळली असेही नाही. शिवाय, सारंग यांनी आपला शिष्य संप्रदाय जमवला नाही. अशा प्रयोगशील लेखकाकडे नवे लेखक आकर्षित होतात; पण सारंग यांच्या बाबतीत तेही फारसे झालेले दिसत नाही. त्यामुळे सारंग यांच्या साहित्याचे यथोचित मूल्यमापन तर सोडाच; पण ते नीट समजून घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न मराठी समीक्षेकडून पुरेशा प्रमाणात झाला आहे, असे दिसत नाही.
जी उपेक्षा सारंग यांची झाली, तोच प्रकार श्याम मनोहर यांच्या बाबतीत होताना दिसतो आहे.
खरं म्हणजे श्याम मनोहर यांच्या सुरुवातीच्या कथा-कादंबरी-नाटक या वाङ्मय प्रकारातील लेखनाची दखल काही प्रमाणात घेतली गेली आहे, नाही असे नाही; पण मूल्यमापन मात्र काही विशेषणाच्या पलीकडे जाताना दिसत नाही. ‘ब्रेन टीझर कादंबरीकार’, ‘प्रयोगशील कादंबरीकार’, ‘विक्षिप्त कादंबरीकार’ या विशेषणांपलीकडे मनोहर यांच्या कादंबऱ्यांकडे पाहिले जाते आहे, असे जाणवत नाही. ‘शंभर मी’ या कुठलाच नायक नसलेल्या आणि फारसे घटनाप्रसंग नसलेल्या मनोहरांच्या कादंबरीवरील प्रतिक्रिया पाहिल्या तर ते प्रकर्षाने जाणवते.
मनोहर यांच्या अलीकडच्या कादंबऱ्यांची चमत्कारिक वाटणारी नावे (उदा. खूप लोक आहेत, उत्सुकतेने मी झोपलो, खेकसत म्हणणे आय लव्ह यू, शंभर मी) याचीच चर्चा अधिक होते आहे; पण मनोहर या कादंबऱ्यांमधून जे सांगू-मांडू पाहत आहेत, त्याला भिडण्याची तयारी मराठी समीक्षा दाखवताना दिसत नाही. “ही काय कादंबरी आहे का?”, “हा तर चक्रमपणा झाला!”, “तत्त्वज्ञानच झोडायचे आहे, तर मग तसे पुस्तकच लिहावे ना, ते कादंबरीत कशाला घुसडायचे?” असे प्रश्नोपनिषद उभे केले जात आहे. “मनोहर यांना सरळपणे काहीच सांगता येत नाही. ते कायम वळसे घेत काहीतरी दुर्बोध सांगण्याचा प्रयत्न करतात,” हा समज तर मराठी साहित्यात सार्वत्रिक होत चालला आहे. मनोहर हे मराठी कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावू पाहणारे कादंबरीकार आहेत. (हाच प्रकार नाट्यदिग्दर्शक म्हणून पं. सत्यदेव दुबे यांनी केला आहे. फरक एवढाच की, दुबेंनी ते इतरांच्या संहितेच्या बाबतीत केले आहे. मनोहर यांची नाटककार म्हणून ओळख झाली ती दुबेंमुळेच.) कादंबरीच्या अक्षांश- रेखांशमध्ये जे-जे काही करता येणे शक्य आहे, त्याच्या जेवढ्या म्हणून शक्यता आहेत, त्या-त्या पणाला लावून पाहण्याचा प्रयत्न ते त्यांच्या प्रत्येक कादंबरीत करत आले आहेत.
या साऱ्या प्रयोगातून मनोहर यांना काय सांगायचे आहे? मनोहर म्हणतात, “मला कादंबरीची नवी संकल्पनात्मक मांडणी करायची आहे. मी तिची नवी व्याख्या करू पाहतो आहे. बदलती समाजाची सभ्यता आणि ‘मी कोण आहे’ या दोन्ही प्रश्नांना कादंबरीच्या माध्यमातून भिडण्याचा प्रयत्न करतो आहे. ‘मी कोण आहे’ हा प्रश्न आपण अध्यात्मात लोटून दिला आहे. त्याला मला कादंबरीत आणून, त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा आहे.”
मराठी कादंबरीकार बौद्धिक प्रश्नांशी झोंबी घेत नाहीत, ही तर वस्तुस्थिती आहे. श्याम मनोहर यांनी जेवढ्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत, तेवढीच नाटकंही लिहिली आहेत. त्यांचे प्रयोगही झालेले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचे अभिवाचन, त्यावर आधारित नाट्यप्रयोगही होत आहेत; पण त्यांचे स्वरूप प्रायोगिक असेच आहे. ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे की, ते तरुण लेखक-कलाकार आहेत. नव्यांना रूढ संकेतांना फाटा देणाऱ्या, अब्सर्ड धर्तीच्या आणि प्रसंगी आपल्याला नीट न उमगलेल्या गोष्टींची ओढ अधिक असते. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे; पण त्यांच्याकडून मूल्यमापनाची, समग्र आकलनाची फारशी अपेक्षा ठेवता येत नाही. त्यासाठी अभ्यस्त समीक्षकांचीच गरज असते; पण मराठी समीक्षेचा निदान अलीकडच्या काळातला लौकिक तरी आस्वादक आकलनाच्या पलीकडे फारसा जाताना दिसत नाही. मनोहरांच्या बाबतीत तर तो खूपच जाणवतो. त्यांच्या कादंबऱ्या आस्वादाच्या पातळीवर समजून घ्यायला-द्यायला मराठी समीक्षा कमी पडते आहे. उदा. ‘शंभर मी’ ही कादंबरी पाहू. या कादंबरीत १२५ हून अधिक प्रकरणे आहेत; पण या कादंबरीला कुठलाही नायक नाही. फारसे घटनाप्रसंगही नाहीत. माणसाच्या शंभरहून अधिक प्रवृत्ती त्यांनी एकेका प्रकरणातून मांडल्या आहेत. ही कादंबरी नीट वाचली तर कळते की, या प्रवृत्तीच या कादंबरीच्या नायक आहेत; पण व्यक्तीला नायक मानून त्याला चांगल्या-वाईट प्रवृत्ती चिकटवण्याची मराठी कादंबरीकारांची परंपरा असल्याने मराठी समीक्षकांना या कादंबरीकडे कसे पाहावे, हेच कळेनासे झाले आहे. कमी-अधिक फरकाने मनोहरांच्या सर्वच कादंबऱ्यांबाबत अशीच स्थिती आहे. सामान्य माणूस त्याच्या दैनंदिन जगण्याकडे कसे पाहतो, त्यातील संगती-विसंगती आणि विक्षिप्तपणा आपल्या कादंबऱ्यांमधून मनोहर मांडण्याचा प्रयत्न करतात. माणूस हे किती गुंतागुंतीचे प्रकरण असते, एकाच माणसामध्ये किती प्रकारच्या प्रवृत्ती असतात, त्याचा शोध घेण्याचे काम मनोहर करू पाहतात; पण ही गोष्ट समजून घेण्यात मराठी समीक्षा उणी पडते आहे, असे खेदाने म्हणावे लागते.


मराठी समीक्षकांमध्ये एक (दुष्ट) प्रवृत्ती आहे की, ते काय लिहिले आहे, ते काय प्रतीचे आहे, यापेक्षा काय लिहिले नाही, याचीच जास्त चर्चा करतात. याचा अर्थ असा होतो की, प्रत्यक्षात लेखकाला काय म्हणायचे आहे, हे मराठी समीक्षक फारसे समजून घेताना दिसत नाहीत. त्यात केवळ कथा-कादंबऱ्या-नाटके लिहिणाऱ्या आणि सार्वजनिक सभा-समारंभात न बोलणाऱ्या, फारसे गद्यही न लिहिणाऱ्या मनोहरांसारख्या लेखकाविषयी कसे जाणून घेणार, हाही प्रश्न असतोच; पण आता त्याची सोडवणूक श्याम मनोहर आणि चंद्रकान्त पाटील यांनी केली आहे. मनोहर यांच्या निवडक भाषणांचे व लेखांचे ‘श्याम मनोहर : मौखिक आणि लिखित’ हे सव्वाशे पानी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यामुळे मनोहर केवळ कादंबरीच नाही, तर एकंदर फिक्शनचा कसा विचार करतात हे जाणून घेण्याची मोठीच सोय झाली आहे. या पुस्तकातील ‘फिक्शन हीही ज्ञानशाखा आहे’ या लेखात मनोहर म्हणतात, “माणसाच्या स्वत:च्या आवडीनिवडी असतात. स्वत:चे कल असतात, माणसात कुटुंबाचे असते. माणसात समाजघटकाचे वा जातीचे असते. शैक्षणिकतेवरूनचे, व्यावसायिकतेवरूनचे असते. भाषेचे असते. देशाचे असते. हे सगळे होत माणसाच्या माणूसपणापर्यंत जायचे असते. इतका पल्ला फिक्शनमध्ये घ्यायचा असतो आणि माणूस म्हणजे काय याचा शोध घ्यायचा असतो. त्या माणूसपात्राने त्याचे वर उल्लेखलेले सर्व बाळगत, त्यातील काही दुरुस्त करीत, त्यातील काहींना प्रश्न करीत, काहींचे विनोद करीत, काही लपवत त्या माणूसपात्राने जीवनाचा त्याचा स्वत:चा अर्थ शोधायचा असतो. हे माणसाचे कर्तव्य आहे. माणूस म्हणून हे करत नसेल, तर हे फिक्शनने करायचे असते किंवा फिक्शनने नागरिक वाचकांना त्याची जाणीव करून द्यायची असते.”
या उताऱ्यावरून मनोहरांची फिक्शनमागची नेमकी भूमिका काय आहे, हे सहज समजून घेता येईल.
आता प्रश्न एवढाच आहे की, मनोहर यांचे हे नवे पुस्तक वाचून मराठी समीक्षक त्यांच्या कादंबऱ्यांना नव्याने भिडण्याचे धाडस करतील की नाही? जे करतील, त्यांना हे लक्षात ठेवावे लागेल की, जुन्या हत्यारांनी नव्या लढाया लढता येत नाहीत. जिंकता तर अजिबातच येत नाहीत.   

Sunday, July 26, 2015

विवेकवाद हीच खरी नैतिकता!

अलीकडच्या काही वर्षांत वर्तमानपत्रांच्या खपाचे आकडे वाढत असले, तरी साप्ताहिकं, मासिकं, पाक्षिकं, त्रैमासिकं यांची संख्या मात्र दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. महाराष्ट्रातल्या नियतकालिकांची अवस्था तर अजूनच बिकट झाली आहे. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या पोस्ट खात्याचा सर्वाधिक फटका या नियतकालिकांना बसत आहे. केवळ वेळेवर अंक न पोहोचण्यामुळे अनेक नियतकालिकं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा दुर्धर परिस्थितीत ‘आजचा सुधारक’ या नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या आणि ‘विवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी मासिक’ असा लौकिक असलेल्या मासिकानं रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करावं, ही खचितच कौतुकास्पद गोष्ट आहे; पण याची फारशी दखल महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमांकडून घेतली जाण्याची शक्यता नाही. आज सर्वच क्षेत्रातला विवेक हरवत चालला असताना, ‘आजचा सुधारक’सारख्या गंभीर मासिकाची दखल घेतली जाणं, हे स्वाभाविकच म्हणायला हवं. अर्थात, त्याची फिकीर या मासिकाच्या संपादक मंडळालाही नाही. ते आपले काम इमानेइतबारे करत आहेत.
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक दि. य. देशपांडे यांनी ‘आजचा सुधारक’ हे मासिक एप्रिल- १९९०मध्ये सुरू केलं. सुरुवातीला त्याचं नाव ‘नवा सुधारक’ असं होतं. गोपाळ गणेश आगरकर यांच्या ‘सुधारक’ या साप्ताहिकापासून प्रेरणा घेऊन हे मासिक सुरू करण्यात आलं. (पाच-सहा वर्षांपूर्वी र. धों. कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचंही पुनर्प्रकाशन सांगलीहून डॉ. प्रदीप पाटील यांनी सुरू केलं आहे.) डिसेंबर-१९९० पासून त्याचं नाव ‘आजचा सुधारक’ असं करण्यात आलं. आगरकरांच्या ‘सुधारक’चा समकालीन नवा अवतार असलेल्या या मासिकात विवेकवादी तत्त्वज्ञानाचा सर्व बाजूंनी चर्चा-ऊहापोह केला जाईल, असं देशपांडे यांनी पहिल्या संपादकीयात म्हटलं होतं, तर एप्रिल- १९९८मध्ये संपादक म्हणून निवृत्ती स्वीकारताना त्यांनी लिहिलं होतं, “मासिकाचं स्वरूप विवेकवादी आहे. केवळ विवेकवादाला वाहिलेलं दुसरं मासिक महाराष्ट्रात नाही, असं मला वाटतं. मासिकाने आपलं वैशिष्ट्य टिकवून ठेवावं. त्याचा कटाक्ष श्रद्धेचा उच्छेद, विचार आणि जीवन यात विवेकावर भर देणं, जीवनाच्या विविध क्षेत्रांत समंजसपणा, विवेकीपणा अंगी बाणेल असे प्रयत्न करणं, यावर असावा. लोक पूर्ण इहवादी होतील, अशी आशा करणं भाबडेपणाचं होईल; पण तरीही विवेकवाद जितका वाढेल, तितका वाढविण्याचा प्रयत्न करावा... मासिकाचं धोरण व्यक्तिस्वातंत्र्यवादी आणि समतावादी राहिलं आहे. सर्व मानव समान आहेत, त्यात स्त्रियांचाही समावेश आहे, तसेच त्यांचा विज्ञानावर भर असावा. वैज्ञानिक दृष्टी अंगी बाणेल, असा प्रयत्न करावा. विज्ञानाच्या विकृतीपासून सावध राहावं.”
त्याच धोरणानुसार, या मासिकाची आजपर्यंतची वाटचाल राहिली आहे. गेल्या २५ वर्षांत या मासिकानं कितीतरी विषय हाताळले. नागरीकरण, शेती, शिक्षण अशा अनेक विषयांवर विशेषांक काढले. नुकतीच http://aajachasudharak.in या नावानं बेवसाइटही सुरू केली आहे. त्यावर अंकातील लेख स्वतंत्रपणे आणि संपूर्ण अंक पीडीएफ स्वरूपात वाचता येतो; पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, या मासिकाची वर्गणीदारसंख्या २५ वर्षांनंतरही हजाराचा आकडा आेलांडू शकलेली नाही; पण केवळ वर्गणीदारांची संख्या वाढण्यासाठी अंकाचा दर्जा खाली आणण्याची वा त्यात रंजकता आणण्याची क्लृप्ती वापरण्याची गरज कधी संस्थापक, संपादकांना वाटली नाही आणि त्यानंतरच्या संपादकांनाही. त्यावरून या मासिकाचे आजवरचे सर्वच संपादक अल्पसंतुष्ट आहेत किंवा मिजासखोर आहेत, असं काहींना वाटू शकतं आणि ती खरीच गोष्ट आहे. गंभीरपणे काम करणाऱ्यांना, विवेकवादाला प्रमाण मानणाऱ्यांना आपल्या पाठीमागे फार लोक येणार नाहीत, असं वाटलं तर फारसं आश्चर्य नाही. आज तसं घडणं हे महदाश्चर्य ठरू शकतं. याचा अर्थ पूर्वी महाराष्ट्राची परिस्थती फार चांगली होती असं नाही. १९व्या-२०व्या शतकातही विवेकवादाचा-उदारमतवादाचा वारसा अंगिकारण्याची जीगिषा बाळगणाऱ्यांची संख्या कमीच होती; पण तेव्हा त्याची चाड असणारा छोटा का होईना, एक वर्ग अस्तित्वात होता. आता तर तो पूर्णपणे नाहीसा झाला असावा, असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. समाजाच्या कुठल्याच समूहात, गटात, वर्गात, पंथात विवेकवाद शाबूत आहे, असं म्हणण्याची सोय राहिलेली नाही. २००४ साली ‘आजचा सुधारक’चा १५वा वर्धापन दिन साजरा झाला. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांना बोलावलं होतं. त्या वेळी ते म्हणाले होते, “आजचा सुधारक हे नियतकालिक वाचेपर्यंत विवेक आणि विवेकवादाशी आपला काहीही संबंध नव्हता. विवेकवादाने जगणं आज अशक्य नाही; परंतु कठीण मात्र झालं आहे.”

तेंडुलकरांच्या म्हणण्याला आता दहा वर्षे झाली आहेत. परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. सर्वसामान्य जनतेकडून विवेकवादाची फारशी अपेक्षा करता येत नाही; पण महाराष्ट्रातील सुशिक्षित आणि बुद्धिवादी समाजाकडून तरी थोड्याफार विवेकवादाची अपेक्षा करायला फारशी अडचण पडू नये; पण महाराष्ट्रातील हा वर्ग आजघडीला सामाजिक नीतिमत्तेच्या दृष्टीनं इतका बेबंद आणि संकुचित झाला आहे की, ज्याचं नाव ते. सामाजिक नीतिमत्ता हा विषय परंपरा, आदर्श आणि प्रेरणा यांच्यावर अवलंबून असतो, असं त्र्यं. शं. शेजवलकर म्हणतात. ते पुढे लिहितात की, समाजहितासाठी स्वत:चा स्वार्थ, अहंकार आणि आवडीनिवडी यांना कात्री लावणं म्हणजेच सामाजिक नीतिमत्ता होय. सुशिक्षित आणि बुद्धिवादी समाज ज्याला म्हणता येईल, तो समाज हा नेहमी मध्यमवर्गच असतो आणि हाच वर्ग समाजाचं पुढारपण करत असतो; पण महाराष्ट्रातील मध्यमवर्गाचे गेल्या २५ वर्षांतले प्राधान्यक्रम या गतीनं आणि रीतीनं बदलत गेले आहेत, त्यावरून या वर्गाला समाजहिताची किती चाड आहे, याचा आलेख सहजपणे दिसून येतो. उदारीकरणानंतर या वर्गाची ज्या झपाट्यानं वाढ झाली, ती स्तिमित करणारी आहे. ठोकरता येईल तेवढा समाज ठोकरायचा, करता येतील तेवढ्या खटपटी करायच्या आणि आेरबाडता येईल तेवढा पैसा आेरबाडायचा, एवढीच महत्त्वाकांक्षा या वर्गाला लागलेली दिसते. आपल्या पलीकडे समाज आहे, जग आहे, याची जाणीवच हा वर्ग विसरून गेला आहे.
उदारीकरणाचा सर्वाधिक उपभोक्ता हाच मध्यमवर्ग होता, आहे आणि आज केवळ त्याच्याच इच्छा-आकांक्षांना महत्त्व आलं आहे. सरकारपासून प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांना याच वर्गाला खुश करायचं आहे. असा सगळा ‘तुझ्या गळा-माझ्या गळा...’ छाप पद्धतीचा कारभार सुरू असताना ‘आजचा सुधारक’, ‘साप्ताहिक साधना’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’ अशा नियतकालिकांची आेळख कितीजणांना असणार? किती लोकांना ही नियतकालिकं वाचायची असोशी असणार? पण हेही तितकंच खरं की, ही नियतकालिकं केवळ खप वाढवण्यासाठी सुरू झालेली नाहीत, नव्हती. ‘आजचा सुधारक’ तर देणग्याही स्वीकारत नाही आणि जाहिरातीही आणि तरीही ते गेली २५ वर्षे अव्याहृत चालू आहे. ज्यांना विवेकवादाच्या मार्गानं जाण्याची इच्छा आहे, त्यांनीच या मासिकाच्या वाट्याला जावं. आजघडीला विवेकवाद हिच खरी नैतिकता आहे. ज्यांना स्वत:ला आरशात पाहायचं असेल आणि आपल्या आजूबाजूंच्या चारजणांना आरसा दाखवावासा वाटत असेल, त्यांनी ‘आजचा सुधारक’सारखी जड मासिकं प्रयत्नपूर्वक वाचायला हवीत. हे मासिक वाचताना झोप येते, असा एक आरोप काही वाचनदुष्ट लोक करतात; पण आता तर सर्वांचीच झोप हराम होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी ‘आजचा सुधारक’ खडबडून जागं करण्याचंही काम करू शकतो.  

Wednesday, July 8, 2015

पोस्टाची अवकळा मराठी नियतकालिकांच्या मुळावर

वाचनाच्या नावडीपासून अर्थकारणाच्या आेढग्रस्तीपर्यंत अनेक घटक आज मराठी नियतकालिकांच्या मुळावर आले आहेत. आता त्यात पोस्ट खात्याचीही भर पडत चालली आहे. या नव्या संकटाने ही 
नियतकालिके त्रस्त झालीत.
............................................................................................
सलग २० हून अधिक दिवस पुण्याच्या ‘एफटीआय’मधील विद्यार्थ्यांचे नव्या संचालकांविरोधातले आंदोलन तग धरून आहे. त्यातून इतर काही निष्पन्न होईल न होईल; पण एक गोष्ट सिद्ध व्हायला हरकत नाही की, आपल्यावरील अन्यायाला आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे दिवस अजूनही पूर्णपणे इतिहासजमा झालेले नाहीत; पण ही मिणमिणती पणती म्हणावी,
तशा प्रकारची अंधूक आशादायक घटना आहे. कारण महाराष्ट्रातल्या सामाजिक क्षेत्रातल्या, कलाक्षेत्रातल्या आणि साहित्यक्षेत्रातल्या चळवळी जवळपास संपल्यात जमा आहेत. या क्षेत्रातील मान्यवर संस्था-संघटना यांनाही मरगळ आली आहे. सुशिक्षित, बुद्धिजीवी (हल्ली यांनाच ‘बुद्धिवादी’ म्हणण्याची/समजण्याची प्रथा पडली आहे.) मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने
साहित्य-कला हे विषय, विशेषत: नियोजनपूर्वक वेळ देऊन वाचन या गोष्टी बिनमहत्त्वाच्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे हा सगळा अनर्थ ओढवला आहे, असं एक आकलन हल्ली अनेक मान्यवर मांडत असतात. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे, नाही असं नाही; पण ते एकमेव कारण आहे, असं मात्र निश्चित म्हणता येणार नाही.
मराठीतल्या नियतकालिकांची अलीकडच्या

काळात शोचनीय म्हणावी इतकी वाईट स्थिती झाली आहे. त्यांची वाचकसंख्या रोडावत चालली आहे. त्यांचे वर्गणीदार वाढते नाहीत. नवे वर्गणीदार मिळवण्यासाठी ते आपल्या परीने प्रयत्न करत आहेत; पण त्यात म्हणावं तसं यश येत नाही. आकर्षक योजना, सवलत योजना, बक्षिसं देऊनही नव्याने मिळालेले वर्गणीदार टिकत नाहीत. त्यांचं आर्थिक भांडवलही तुटपुंजं असल्याने त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा पडतात.
तुटपुंज्या वर्गणीदारांच्या संख्येवर अंकाचं अर्थकारण चालू शकत नाही आणि अंकाचा खप मर्यादित असल्याने जाहिराती मिळायलाही अडचणी येतात. दुसरीकडे अंकाच्या निर्मितीचा खर्च वाढतो आहे. अशा परिस्थितीत मराठीतल्या अनेक मासिकांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून मिळणारं अनुदान आणि भारतीय टपाल खात्याकडून अंक
पाठवण्यासाठी मिळणारी सवलत, हाच काय तो आधार उरला आहे; पण साहित्य आणि संस्कृती मंडळाचं अनुदान अतिशय तुटपुंजं असतं. ‘अंतर्नाद’सारख्या मासिकाला वर्षाला फार तर ४० हजार रुपये अनुदान दिलं जातं. त्यातून त्यांचा जेमतेम एकच अंक निघतो. हे मंडळ महाराष्ट्रातील ३०-३५ मासिकांना अशा प्रकारे अनुदान देतं. ती चांगलीच गोष्ट आहे; पण त्याचा आकडा फारच तोकडा असल्याने त्यातून
म्हणावा तसा परिणाम साधला जात नाही. मराठीतल्या मासिकांना कालपरवापर्यंत दुसरा मोठा आधार होता तो, भारतीय पोस्ट खात्याचा. अंक पोस्टाने पाठवण्यासाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर या मासिकांना भरपूर सवलत मिळते. अंक पाठवण्यासाठी वजनानुसार २५ पैसे, ५० पैसे आणि एक रुपया असा अधिभार पोस्टखात्याकडून आकारला जातो.  दर आठवड्याचे, पंधरवड्याचे वा महिन्याचे
चार-दोन हजार अंक पाठवण्यासाठी हा खर्च तसा खूपच कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हजारभर नियतकालिकांना त्याचा मोठा आधार होता; पण गेल्या काही वर्षांत पोस्ट खात्याकडून या नियतकालिकांची मोठ्या प्रमाणावर अडवणूक केली जात आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठं नवंच उभं ठाकलं आहे.
काय होतं आहे नेमकं?
गेल्या काही वर्षांत पोस्ट खात्याकडून आपल्याला येणाऱ्या पत्रांमध्ये, नियतकालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. याचं कारण पाहू गेल्यास असं दिसतं की, पोस्ट खात्यालाच अवकळा आली आहे. केंद्र सरकारने या खात्याची अतोनात हेळसांड चालवली आहे. या खात्यातली माणसं निवृत्त झाली की, त्यांच्या जागी नव्या नेमणुका केल्या जात नाहीत. नवी भरती तर पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे उर्वरित पोस्टमनवर कामाचा प्रचंड ताण येतो. एकाच पोस्टमनला रोज दहा-बारा किलोमीटर फिरायला सांगितलं जातं. ते कुणाही माणसाला शक्य नसतं. त्यामुळे पोस्टमन त्रासून गेले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो आहे. याची अगदी वरपर्यंत चौकशी केल्यावर समजतं की, या परिस्थितीवर सध्याच्या घडीला कुठलाच सकारात्मक उपाय पोस्ट खात्याला करता येत नाही. कारण केंद्र सरकारच्या दृष्टीने हे खातं बेदखल झालं आहे. त्यामुळे सरकारकडून कुठल्याही प्रकारचं साहाय्य, मदत, सेवा-सुविधा पुरवल्या जात नाहीत. आहे त्या स्थितीत काम करायला सांगितलं जात आहे.
अशा परिस्थितीत कोणता उपाय उरतो?
तर जेवढं शक्य, तेवढं करायचं, बाकीचं बाजूला टाकायचं. पोस्टमन नेमकं तेच करत आहेत. आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल की, अलीकडच्या काळात नित्यनेमाने दिसणारा पोस्टमन आता कधीतरीच दिसतो. चार-पाच दिवसांतून एकदा त्याचं दर्शन झालं तरी खूप. बऱ्याचदा तो आठवडा-आठवडा दिसतही नाही. याचं कारण, आता कुणी एकमेकांना पत्र लिहीत नाही, कुणी मनिऑर्डर पाठवत नाही. हल्ली शुभेच्छा कार्डही
पाठवली जात नाहीत. लहान मुलांच्या वाढदिवसांपासून लग्नाच्या वाढदिवसांपर्यंत आणि दिवाळीपासून नववर्षापर्यंतच्या सर्व सणांच्या निमित्ताने दिल्या-घेतल्या जाणाऱ्या शुभेच्छांसाठी कुणी पोस्टाचा आधार घेत नाही. फेसबुक-वॉट्सअॅप-मोबाइल त्यापेक्षा जास्त जलद आणि सोयीचे ठरतात. यामुळे पोस्ट खात्याला अवकळा आली, असं आपण समजतो; पण खरा प्रकार असा नाही. अजूनही अनेक प्रकारची नियतकालिकं, कार्यालयीन
पत्रव्यवहार आणि इतर बराचसा पत्रव्यवहार पोस्टामार्फतच होतो; पण एकंदर पत्रव्यवहार कमी झाला आहे, ही खरी गोष्ट आहे. अलीकडच्या काळात पोस्टाने वेगवेगळ्या योजना राबवून, बचतीच्या योजना आखून स्वत:ला टिकण्याचे वेगळे पर्याय शोधलेले आहेत; पण दैनंदिन बटवडा कमी झाला आहे, हेही तितकंच खरं.
याचा सर्वात मोठा परिणाम झाला आहे तो मराठीतल्या नियतकालिकांवर. कारण पोस्ट खात्याकडे असलेलं मनुष्यबळ आणि त्यांच्याकडे येणारा रोजचा पत्रव्यवहार यांचं प्रमाण पूर्णपणे व्यस्त आहे. कामाचा डोंगर रोज उभा राहतो; पण तो उपसायला माणसं आणणार कुठून? त्यामुळे पोस्ट खात्याकडून सरळ-सोपा मार्ग अवलंबला जातो. तो म्हणजे, जे फारसं महत्त्वाचं नाही, ते सरळ बाजूला टाकलं जातं. याचा पहिला फटका मराठी नियतकालिकांना बसतो. कारण या नियतकालिकांचे अंक १५ दिवसांनी दिले काय आणि महिन्याने दिले काय, त्यामुळे कुणाचंही फारसं नुकसान होत नाही, असा पोस्ट खातं विचार करतं. त्यामुळे ही नियतकालिकं पोस्ट खात्यातच सरळ बाजूला काढली जातात आणि महिन्यातून कधीतरी एकदम वाटली जातात. दुसरी गोष्ट अशी की, पोस्टात फारसे कर्मचारीच नसल्याने या नियतकालिकांवर टिकिटं लावण्याचं कामही आता त्या त्या नियतकालिकांच्याच माणसांनाच करायला सांगितलं जातं. अंकावर रजिस्ट्रेशन क्रमांकच छापलेला नाही, यावेळी अंकाची वाढलेली पानेच आगाऊ सांगितलेली नाहीत, अंक वेळेवरच आणले नाहीत, अंकावर पृष्ठसंख्याच टाकली नाही, अशा बारीकसारीक गोष्टींवरून अडवणूक करायचा प्रयत्न केला जातो. जेणेकरून पोस्टाच्या या जाचाला कंटाळून ही नियतकालिकं वेगळा पर्याय शोधतील, असा त्यामागचा होरा आहे.

पोस्ट खात्यापुढे दुसरा पर्याय नसल्याने त्यांनी हा सोयीचा मार्ग अवलंबला असला, तरी तो या नियतकालिकांसाठी गैरसोयीचा ठरत आहे. कुठलाही वर्गणीदार असा विचार करतो की, मला पैसे भरूनही अंक वेळेवर मिळत नसतील, तर त्याचा काय उपयोग? मग, तो एकदा वर्गणी संपली की, पुन्हा तिचं नूतनीकरण करत नाही. यामुळे मराठीतल्या अनेक नियतकालिकांच्या वर्गणीदारांची संख्या रोडावत चालली आहे.
‘रूपवाणी’, ‘मराठी संशोधन पत्रिका’, ‘अंतर्नाद’, ‘मसाप पत्रिका’, ‘साहित्य’, ‘पंचधारा’, ‘युगवाणी’, ‘आजचा सुधारक’, ‘पालकनीती’, ‘मिळून साऱ्याजणी’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’, ‘भाषा आणि जीवन’, ‘नव अनुष्टुभ’, ‘आपलं पर्यावरण’, ‘वनराई’, ‘सत्याग्रही विचारधारा’, ‘साहित्य सूची’, ‘ललित’, ‘समाज प्रबोधन पत्रिका’, ‘नवभारत’, ‘प्रतिष्ठान’, ‘आपले जग’, ‘शेतकरी संघटक’, ‘माहेर’, ‘मेनका’, ‘जडण-घडण’, ‘वसंत’, ‘अर्थबोधपत्रिका’, ‘साप्ताहिक साधना’, ‘श्री व सौ’, ‘विकल्पवेध’, ‘व्यापारी मित्र’, ‘पुरुष उवाच’, ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘किस्त्रीम’, ‘ग्राहकहित’, ‘मुलांचे मासिक’, ‘कवितारती’, ‘बळीराजा’, ‘गतिमान संतुलन’ अशी किमान हजारभर नियतकालिकं मराठीमध्ये प्रकाशित होतात. या सर्वांनाच कमी-अधिक फरकाने पोस्ट खात्याच्या गलथानपणाचा सामना करावा लागतो आहे. यातील अनेक

नियतकालिकांचे अंक त्यांच्या वर्गणीदारांना वेळेवरच काय; पण अनेकदा सहा-सहा महिने किंवा वर्षभरही मिळत नाहीत. अंक मिळाला नाही तरी, काही वर्गणीदार संबंधित नियतकालिकाकडे तक्रार करत नाहीत. अनेकदा ते कळवतही नाहीत; पण मग पुढच्या वर्षाची वर्गणीच भरत नाहीत. अर्थात, अजूनही काही वर्गणीदार फोन करून तक्रार करतात; पण अंक न
मिळण्याच्या तक्रारी इतक्या वाढल्या आहेत की, हल्ली जवळपास सगळ्याच नियतकालिकांना आपल्या अंकामध्ये ‘पोस्ट खात्याकडून अंक वेळेवर न मिळाल्यास अमुक तारखेपर्यंत कळवावे. म्हणजे नवीन अंक पाठवला जाईल,’ अशा प्रकारची निवेदनं छापावी लागतात. बरीच नियतकालिकं तक्रार आली की, नवीन अंक पोस्टाने पाठवतात; पण तेही मध्येच गायब होतात. त्यामुळे काही नियतकालिकांनी असे दुसरे अंक कुरियरने पाठवण्याची सोय केली आहे; पण तक्रारींची संख्या सातत्याने वाढत असल्याने ते प्रत्येक वेळीच शक्य होत नाही. मनुष्यबळ आणि आर्थिकबळ या दोन्ही पातळ्यांवर या नियतकालिकांना लढावं लागत आहे. अनेक नियतकालिकांना ते शक्य होत नाही. त्यांचं अर्थकारण मर्यादित स्वरूपाचं असल्याने त्यांना तसं करणं परवडत नाही.
या सर्वांचा परिणाम असा होतो आहे की, या नियतकालिकांची अवस्था चक्रव्यूहात सापडल्यासारखी झाली आहे.
काहीजण याचा दोष या नियतकालिकांनाच देतात. त्यांना दूरदृष्टी नाही. त्यांना मार्केटिंग, वितरण, जाहिरात यांवर पैसे खर्च करायचे नसतात. नोकरीवर ठेवलेल्या कामगारांना व्यवस्थित पगार द्यायचा नसतो. दहा कोटींच्या महाराष्ट्रात एखाद्या नियतकालिकाच्या दहा-बारा हजार प्रती खपायला काय लागतं? महाराष्ट्रात किती शाळा, महाविद्यालयं, ग्रंथालयं, संस्था-संघटना आहेत. कितीतरी वाचक आहेत. त्यांना नवीन वाचायला

मिळालं, तर हवंच आहे. शिवाय, नवा वाचक सातत्याने तयार होतो आहे. ग्रामीण भागात शिक्षणाच्या प्रसारामुळे तिकडे साक्षरतेचं प्रमाण वाढत आहे. तिथल्या नवशिक्षितांना वाचनाची आवड आहे; पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो का? आपल्या कार्यालयात बसून वाचक मिळत नाहीत, असा कंठशोष करायचा... अशाने वाचक मिळत नसतात... स्वत:ची वेबसाइट सुरू करणं, त्यावर अंक टाकणं, मेलवरून अंक पाठवणं, हा आधुनिक मार्ग हाताळायला काय हरकत आहे? आता कितीतरी लोक इंटरनेट सुविधेचा वापर करतात... असे सल्ले अनेक धुरीण देताना दिसतात. त्यांना बहुधा, या नियतकालिकांचं स्वरूप, त्यांचा उद्देश आणि अर्थकारण माहीत नसतं.
आणि भारतातील इंटरनेट सुविधा वापरणाऱ्यांची संख्या १० टक्क्यांच्या पुढे नाही, याचीही खबरबात नसते. ते संगणक, इंटरनेट, स्मार्टफोन वापरतात, म्हणून सगळं जगच ते वापरतं, असा त्यांचा समज असतो.
असो. काही उदाहरणं पाहता येतील. ‘रूपवाणी’ हे प्रभात चित्र मंडळाचं मासिक गेली २० हून अधिक वर्षं प्रकाशित होत आहे. चित्रपटविषयक लेखनाला वाहिलेल्या या मासिकाचे वर्गणीदार जेमतेम दीड-दोन हजार आहेत. ‘मराठी संशोधन पत्रिका’ हे मराठी संशोधन मंडळाचं नियतकालिक मराठीतल्या साहित्यविषयक संशोधनाला

वाहिलेलं त्रैमासिक आहे. त्याच्या वर्गणीदारांची संख्या हजाराच्या घरातही नाही. ‘प्रति सत्यकथा’ असा साहित्य जाणकारांकडून ज्याचा उल्लेख केला जातो, त्या ‘अंतर्नाद’च्या वर्गणीदारांची संख्याही दोन हजाराच्या आसपास आहे. ‘मसाप पत्रिका’चे वर्गणीदार दहा हजार आहेत; पण त्यांच्यापर्यंत अंक दर महिन्याला पोहोचवायचा कसा, हाच प्रश्न साहित्य परिषदेला भेडसावतो आहे. ‘पंचधारा’ हे आंध्र प्रदेश साहित्य परिषदेकडून प्रकाशित होणारं द्वैमासिक हैदराबादमधून निघतं. महाराष्ट्राबाहेरून निघणारं हे मासिक मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड आणि तेलुगू या पाच भाषांतील साहित्याचा चांगला ऊहापोह करतं. ‘आजचा सुधारक’ हे वैचारिक स्वरूपाचं मासिक नागपूरहून प्रकाशित होतं; पण अतिशय गंभीर स्वरूप असल्याने त्याचे वर्गणीदारही मोजके आहेत आणि खपही. परिणामी, त्याला जाहिरातीही मिळत नाहीत. अलीकडच्या काळात नवीन लेखनही मिळेनासं झालं आहे. त्यामुळे या नियतकालिकाला हल्ली इतर मासिकं, वर्तमानपत्रं यांमध्ये आलेलं लेखन पुनर्प्रकाशित करावं लागतं. ‘पालकनीती’, ‘मिळून साऱ्याजणी’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’, ‘भाषा आणि जीवन’, ‘नव अनुष्टुभ’, ‘आपलं पर्यावरण’, ‘वनराई’, ‘सत्याग्रही विचारधारा’, ‘समाज प्रबोधन पत्रिका’, ‘नवभारत’, ‘प्रतिष्ठान’, ‘आपले जग’, ‘शेतकरी संघटक’, ‘अर्थबोधपत्रिका’, ‘साप्ताहिक साधना’, ‘विकल्पवेध’, ‘व्यापारी मित्र’, ‘पुरुष उवाच’, ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘किस्त्रीम’, ‘ग्राहकहित’, ‘मुलांचे मासिक’, ‘कवितारती’, ‘बळीराजा’, ‘गतिमान संतुलन’ या नियतकालिकांना अशाच प्रकारे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे.
ही सर्वच नियतकालिकं विशिष्ट ध्येयाने सुरू झालेली आहेत. ‘समाज प्रबोधन पत्रिका’ला एकेकाळी मराठीतलं ‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली’ समजलं जात असे. ‘बळीराजा’ हे महाराष्ट्रातलं प्रचंड खपाचं एक अग्रगण्य कृषी नियतकालिक आहे. १९७० सालापासून ते नियमितपणे पुण्यातून प्रकाशित होत आहे. ‘अंतर्नाद’ हे मासिक लवकरच २० वर्षं पूर्ण करेल. ‘साधना’ साप्ताहिक पंचाहत्तरीच्या दिशेने दमदार वाटचाल करत आहे. किर्लोस्करवाडीहून प्रकाशित होणारे वसंत आपटे यांचं ‘आपले जग’ किंवा कोकणातील कुडावळे येथून प्रकाशित होणारं दिलीप कुलकर्णी यांचं ‘गतिमान संतुलन’ अशी नियतकालिकं विज्ञानविषयक दृष्टिकोन रुजवण्याच्या प्रेरणेने चालवली जात असलेली नियतकालिकं आहेत.
वर उल्लेख केलेल्यांपैकी बहुतांशी नियतकालिकं ही एकखांबी तंबूसारखी आहेत. त्यांचा जीवही छोटा आहे आणि पसाराही. प्रसंगी पदराला खार लावून ती चालवली जात आहेत; पण विशिष्ट उद्देशाने ती चालवली जात असल्याने त्यांना ‘ध्येयवादी नियतकालिकं’ म्हणायला हरकत नाही. अशा नियतकालिकांची खरी बांधिलकी ही त्यांच्या वर्गणीदारांशीच असते. हा वर्गणीदार त्यांचा ध्येयवाद मान्य असणारा असतो. त्यानुसार, आपलं जगणं जगायचा प्रयत्न करणारा असतो. साहजिकच, अशा विशिष्ट विचाराशी बांधिलकी मानणारे लोकच ही नियतकालिकं वाचतात. ती स्टॉलवर, एसटी स्टँडवर, इतकंच काय; पण पुस्तकांच्या दुकानात विक्रीला ठेवली तर ती विकली जाणार नाहीत, जात नाहीत. मुंबईत ‘पीपल बुक हाऊस’ या फोर्टमधल्या पुस्तकाच्या दुकानात हिंदी-मराठी-इंग्रजीतील बरीचशी नियतकालिकं विक्रीला ठेवलेली असतात; पण त्यातल्या कुणाचीही विक्री समाधानकारक होत नाही. कारण या नियतकालिकांचा वाचकवर्गच वेगळा असतो. तो मनोरंजनासाठी वाचणारा नसतो, तर गंभीर वाचनासाठी आसुसलेला असतो. आपल्या आवडीच्या विषयाबाबतचं वाचन तो प्राध्यान्याने करतो. म्हणून त्याला या नियतकालिकांचा आधार वाटतो.
यातली अनेक नियतकालिकं ही काही सामाजिक संस्था-संघटनांशी निगडित आहेत. कुठलीही संघटना बहराच्या काळात असते, तेव्हा तिच्याबद्दल लोकांना उत्सुकता असते, आत्मीयता असते आणि कुतूहलही असतं. चळवळ थंडावत चालली की, तिच्या मुखपत्रांनाही ओहोटी लागते, हा आपल्याकडचा आजवरचा इतिहास आहे. त्याचाही परिणाम त्यांच्या वर्गणीदारांच्या संख्येवर होतो आहे, नाही असं नाही. ‘युक्रांद’चे संस्थापक कुमार सप्तर्षी ८० च्या दशकात महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांचे हिरो होते. त्यामुळे त्यांचं ‘सत्याग्रही विचारधारा’ जोरावर होतं. आता मात्र ते ‘युक्रांद’शी संबंधित लोकांपुरतंच मर्यादित झालं. ही गोष्ट ओळखून सप्तर्षींनी ‘सत्याग्रही विचारधारा’ला थोडं व्यापक करण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून ते अजूनही चालू आहे; पण त्याचा खप काही दोन-अडीच हजारांच्या पुढे जाऊ शकलेला नाही. शरद जोशी यांच्या चळवळीचंही तसंच झालं आहे. ‘शेतकरी संघटक’ या शरद जोशी यांच्या पाक्षिकाचा खप पाच हजार आहे.
पण संस्था-संघटना-चळवळी यांच्याशी संबंधित असल्याने या नियतकालिकांकडे काहीशा पूर्वग्रहाने पाहिलं जातं. त्यांनी सर्वसमावेशक होण्याचा प्रयत्न केला, तर तोही यशस्वी होत नाही. त्यातही सामाजिक आशयाची नियतकालिकं म्हटलं की, बलस्थानांआधी त्यांच्या मर्यादांबद्दलच बोललं जातं. आक्रस्ताळेपणा, ऊरबडवेपणा, पूर्वग्रहदूषित दृष्टी आणि एकसुरीपणा या चार शब्दांनी त्यांचं भवितव्य अधोरेखित केलं जातं. कारण ही नियतकालिकं रूढार्थानं वाचकांचं मनोरंजन करण्याचं, त्यांचा अनुनय करण्याचं टाळतात; पण ही नियतकालिकं राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घटना-घडामोडींचं विश्लेषण करून वाचकांच्या विचारांना दिशा देण्याचं काम करतात. 

एकेकाळी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून नियतकालिकांतल्या चांगल्या लेखांची, वादांची झलक वाचायला मिळत असे. तीही आता दिसत नाही. मात्र हल्ली वर्तमानपत्रं या नियतकालिकांची दखलच घेईनाशी झाली आहेत. या साऱ्या समस्यांमध्ये आता पोस्टाची भर पडली आहे. ती डोकेदुखी म्हणावी इतकी त्रस्त समस्या बनू पाहत आहे.
टीव्हीचं आक्रमण, इंग्रजी माध्यमामुळे मराठीपासून दुरावत चाललेली तरुणपिढी, वाचनाच्या सवयीचा अभाव, चांगल्या साहित्याचा संकोचत चाललेला अवकाश, तुटपुंजी वितरण यंत्रणा, जाहिरातींचं दुर्भिक्ष, मराठी माणसांची अल्पसंतुष्ट वृत्ती अशा अनेक अडचणी सांगितल्या जातात. त्याबद्दल तावातावाने चर्चाही केली जाते. त्यात काही प्रमाणात नक्कीच तथ्य आहे. थोडक्यात काय तर, मराठीतल्या अनेक नियतकालिकांची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. त्यातून बाहेर कसं पडायचं, हा यक्षप्रश्न आहे.