Monday, September 5, 2011

बेकारी आणि पुस्तकं

माझ्या २००६ च्या दैनंदिनीतली ही काही पाने...


आज सोमवार होता. खिशात फक्त साडेसात रुपये. त्याचं पावशेर दही आणलं. त्यात साखर कालवून तेवढंच नाष्टय़ाला खाल्लं आणि बाहेर पडलो. आठवलेंकडे गेलो. त्यांच्याकडे ‘बासष्टचे गुन्हेगार’ आणि जॉन रीड यांचं ‘जगाला हादरवणारे दहा दिवस’ हे बोल्शेविक क्रांतीविषयीचं पुस्तक अशी दोन पुस्तकं उधारीवर घेतली, पन्नास रुपयांना. 
............
  आज जॉर्ज ऑर्वेलच्या निवडक लेखनाचा ओरिएंट लाँगमनचा एक छोटा संग्रह विकत घेतला. त्यातले सर्वच लेख चांगले आहेत. विशेषत: ‘व्हाय आय राईट?’ आणि ‘व्हाट इज सायन्स?’ हे दोन लेख उत्कृष्टच. ‘व्हाय आय राईट?’मध्ये ऑर्वेलनं लिहिलं आहे की, कोणताही लेखक चार कारणांसाठी लिहीत असतो- निव्वळ आत्माभिमान (Sheer egoism), सौंदर्यशोधाची ऊर्मी (Aesthetic enthusiasm), ऐतिहासिक जाणीव (Historical impulse) आणि राजकीय हेतू (Political purpose). ऑर्वेल म्हणतो गद्य लेखनामागे ही चार कारणं असतातच. ती व्यक्तीगणिक कमी-जास्त, मागे-पुढे असतील एवढाच काय तो फरक. पण या कारणांशिवाय लेखन करणारा लेखक दांभिक तरी असतो किंवा नि:सत्त्व तरी.     अप्पा बळवंत चौकातून आठवलेंकडे गेलो. सव्वाआठ वाजता. पाच-दहा मिनिटांनी आठवले आले. मग त्यांच्याकडे जॉर्ज आर्वेलची ‘अ‍ॅनिमल फार्म’, ‘लेनिन’ आणि ‘अरुण शौरी यांचे वडील एच.डी. शौरी यांच्यावरील एक पुस्तक अशी तीन पुस्तकं केवळ 25 रुपयांना घेतली. एच.डी. शौरी हे आयसीएस अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर दिल्लीमध्ये एक नागरी संस्था स्थापन करून बरंच काम केलं होतं. त्यांच्याविषयीचं हे पुस्तक निर्मितीच्या अंगानं नितांतसुंदर म्हणावं इतकं देखणं आहे. 
..............
आज संध्याकाळी डेक्कनवरील संभाजी पूलावरच्या रद्दीवाल्याकडे ‘प्राइड ऑफ इंडिया’च्या बऱ्याच प्रती दिसल्या. कॉफी टेबल आकाराचं हे पुस्तक आजवरच्या ‘मिस इंडियां’बद्दल होतं. ते पर्सिस खंबाटा या एका मिस इंडियानंच संपादित केलं होतं. पण पुस्तक १९९७पर्यंतचं होतं. म्हणजे दहाएक वर्षापूर्वीचं. पण या स्पर्धेची सुरुवात कशी झाली, आजवर कोण कोण मिस इंडिया झालं अशी बरीच महत्त्वाची माहिती त्यात होती. रद्दीवाल्याला किंमत विचारली तर म्हणाला 200 रुपये. विचार केला, ‘आपल्याला काय उपयोग या पुस्तकाचा?’ म्हणून त्याचा विचार सोडून दिला.
.................. 
आज परत डेक्कनवर गेलो तर कालच्या ‘प्राइड ऑफ इंडिया’च्या प्रती जशास तशा होत्या. मग पुस्तक पुन्हा एकदा चाळलं. चांगलं वाटलं. आता किंमत 100 रुपयावर आली होती. मग घेऊन टाकलं. 
...................
आठवले आज जरा उशिराच आले. पावसाची भूरभूर चालूच होती. आल्यावर ‘शेक्सपिअर खंड’, दि. पु. चित्रे यांचं ‘चाव्या’, अ.भा. नाटय़ संमेलन 1975ची स्मरणिका आणि ‘पूर्वाचलाचे आवाहन आणि आव्हान’ ही चार पुस्तकं 70 रुपयांना घेतली. मागील बाकी 110 रुपये. एकंदर 180 रुपये.
.................... 
सकाळी साडेसातला उठलो. पावणे नऊच्या सुमारास आठवलेंकडे गेलो. ‘लोकहितवादींची शतपत्रे’, ‘सांगते ऐका’, ‘जंगलातील दिवस’, ‘यशवंतराव चव्हाण - राजकारण व साहित्य’ आणि कार्ल मार्क्‍स-इंगल्स यांचं ‘भारताचे स्वातंत्र्युद्ध’ ही पाच पुस्तकं 120 रुपयांना घेतली. एकंदर बाकी 320 रुपये. तेथून लक्ष्मी रोडला आठवलेंच्या मुलाकडे आलो. रात्रीच ‘कॅथरीन मेयो आणि भारत’ हे पुस्तक वाचलं होतं. मेयोबाईंच्या ‘मदर इंडिया’ला प्रत्युत्तरादाखल लिहिलं गेलेलं ‘सिस्टर इंडिया’ मिळालं. ते 30 रुपयांना घेतलं. मग नॅशनल जिओग्राफिकचा जानेवारी 2006चा आणि एक जुना अंक 30 रुपयांना घेऊन त्याचीही 60 रुपये उधारी केली.

No comments:

Post a Comment