Tuesday, December 23, 2014

आशिक मस्त फकीर

चंद्रकांत खोत हे कवी-कादंबरीकार-संपादक तर होतेच, पण त्यांची खरी ओळख 'आशिक मस्त फकीर' अशीच आहे. त्याचे कारण त्यांची जगण्यावरची आशिकी. ती शेवटपर्यंत कमी झाली नाही, त्यापायी त्यांनी फकिरीचीही फिकीर केली नाही. लघुअनियतकालिकांच्या चळवळीतले एक शिलेदार, 'अबकडई' या प्रयोगशील दिवाळी अंकाचे संपादक आणि आध्यात्मिक चरित्र कादंबऱ्या लिहिणारे लेखक असे त्यांच्या आयुष्याचे तीन टप्पे दाखवता येतीलही, पण या तिन्हींचा कोलाज त्यांच्यामध्ये कायमच वस्ती करून होता. इतके त्यांचे व्यक्तिमत्त्व गुंतागुंतीचे होते. त्यांच्या 'उभयान्वयी अव्यय', 'बिनधास्त', 'विषयांतर' या बोल्ड कादंबऱ्यांनी सत्तरच्या दशकात खळबळ उडवून दिली. त्यातील लैंगिकतेच्या उल्लेखांमुळे त्यांवर टीकाही झाली. लैंगिकतेचे उघडेनागडे दर्शन घडवण्याच्या बाबतीत त्यांचे भाऊ पाध्ये यांच्याशी नाते जुळते. समाजमान्य संकेत धाब्यावर बसवत त्यांनी तथाकथित संस्कृतिरक्षकांना अंगावर घेत आव्हान दिले होते. 'अबकडई' या दिवाळी अंकाचे संपादकही खोतांची ओळख अधिक सघन आणि समृद्ध म्हणावी अशी आहे. दिवाळी अंकांच्या रूढ चौकटींना फाटा देत त्यांनी १९७३ ते ९४ या काळात डायरी, आत्मकथा, मुलाखती या विशेषांकांसह तर्कातीत अनुभव, चमत्कार, पुनर्जन्म, श्रद्धा-अंधश्रद्धा, देव-धर्म अशा वेगवेगळ्या विषयांवर २१ दिवाळी अंक काढले. दुर्गा भागवत, विश्वास पाटील ('नवी क्षितिजे'कार), डॉ. श्रीराम लागू अशा अनेक मान्यवरांना या अंकांतून लिहिते केले, तर श्री. ना. पेंडसे यांच्यासारख्या काही मान्यवरांचे खास लिहून घेतलेले लेख आवडले नाहीत म्हणून त्यांना मानधन देऊन ते न छापण्याचे मराठीला अनोळखी असलेले धाडसही दाखवले. या अंकासाठी खोत वर्षभर मेहनत घेत. त्यामुळे हे अंक दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत आपल्या लखलखीत वेगळेपणाने उठून दिसत. यानंतरच्या टप्प्यावर खोत आध्यात्मिक लेखनाकडे वळले. 'दोन डोळे शेजारी', 'अनाथांचा नाथ', 'गण गण गणात बोते', 'संन्याशाची सावली' यांसारख्या चरित्र कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्याआधी त्यांच्याच म्हणण्यानुसार पद्मा चव्हाण नावाचे कांड घडले. ते त्यांच्या आयुष्यातील एक जीवघेणे वळणच. नंतर ते अज्ञातवासातच गेले. काही दिवसांनी ते भगव्या वेशात आर्थर रोडशेजारच्या एका मंदिरात सापडले. त्या अवस्थेतून त्यांना अलीकडच्या काळात लौकिकावस्थेत आणण्याचे प्रयत्नही झाले. नुकतेच त्यांच्या तिन्ही कादंबऱ्यांचे पुनर्मुद्रण झाले. त्यांना एक-दोन पुरस्कार मिळाले. त्यांची पंचाहत्तरीसुद्धा साजरी झाली. त्यांच्यावरच्या पीएच.डी.चे पुस्तकही प्रकाशित झाले. थोडक्यात, खोतांचे लेखन आणि आयुष्य दोन्हीही वादळी राहिले. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे- म्हणजे डाव्या विचारसरणीकडून उजव्या विचारसरणीकडे- झालेला प्रवास, लैंगिकतेविषयाच्या भावनांचे उघडउघड समर्थन करणारा कवी-कादंबरीकार आणि सत्तरच्या दशकातील मुंबईतल्या चाळजीवनाचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारा लेखक व्हाया आध्यात्मिक कादंबऱ्या, संन्यासी वृत्ती ते पुन्हा लेखक म्हणून उभे राहू पाहण्याची धडपड, ही खोतांच्या आयुष्याची उलथापालथ बुचकळ्यात टाकणारी आहे. सात्त्विक प्रवृत्तीच्या माणसांविषयी जसे भारतीय- विशेषत: महाराष्ट्रीय लोकांना आकर्षण असते तसेच काहीसे तामसी प्रवृत्तीच्या लोकांबद्दलही असते. खोतांचा प्रवास तर सात्त्विक- तामसी- सात्त्विक असा झाला. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती बरेच गूढ आणि अनाकलनीय प्रश्नांचे जाळे आहे. माणूस आणि लेखक म्हणून खोत आव्हानात्मक आहेत. अशा व्यक्तिमत्त्वांचा धांडोळा घेत त्यांची उकल करून दाखवण्याचे धाडस कुणी तरी दाखवायला हवे. तसे झाले तर खोत यांचा थांग लागू शकेल.

Saturday, December 20, 2014

...निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

डिसेंबर हा महिना जगभरातल्या वाचकप्रेमींसाठी काहीसा कुतूहलाचा असतो, कारण या महिन्यात जगभरातली- विशेषत: इंग्रजीतील अनेक नियतकालिके, वर्तमानपत्रं त्या वर्षांतील बेस्ट पुस्तकांच्या याद्या जाहीर करतात. परंपरागत वार्षिक प्रथेप्रमाणे या वर्षीच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत, होत आहेत. 'पब्लिशर्स वीकली', 'द गार्डियन', 'गुड रीडस् डॉट कॉम', 'अॅमेझॉन डॉट कॉम', 'द टेलिग्राफ', 'द न्यू यॉर्क टाइम्स', 'किरकस रिव्ह्य़ू', 'मदर जोन्स' (प्रसिद्ध अमेरिकन न्यूज-फीचर्स एजन्सी), 'टाइम', 'वॉशिंग्टन पोस्ट', 'द ग्लोब अँड मेल', 'हफिंग्टन पोस्ट' अशा कितीतरी नियतकालिकांनी आपापल्या याद्या जाहीर केल्या आहेत. कथा, कादंबरी, कविता, ललितेतर, वैज्ञानिक, अनुवादित अशा विविध विषयांतील पुस्तकांच्या स्वतंत्र आणि एकत्रित याद्यांचा त्यात समावेश आहे. या वर्षांतील रशियन भाषेतील बेस्ट, चायनीजमधील बेस्ट अशाही याद्या काहींनी प्रकाशित केल्या आहेत.
या याद्या कितपत विश्वासार्ह असतात, असा प्रश्न काहींना पडू शकतो किंवा असाच प्रश्न 'या याद्या खरोखर मार्गदर्शक असतात काय?' असा बदलून घेतला तर काय दिसतं? आधी काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. एक, या याद्या व्यक्तिसापेक्ष वा संस्थासापेक्ष असतात. दुसरं, 'अॅमेझॉन', 'गुड रीडस'सारख्या याद्यांमध्ये प्रकाशक, लेखक यांचं लॉबिंग असतं. या यादीत आपलं पुस्तक यावं, ते अमुक क्रमांकावर यावं इतक्या बारक्या बारक्या गोष्टींसाठीही लॉबिंग केलं जातं. तिसरं, यातल्या कुठल्याही याद्या एकमेकांशी फारशा जुळत नाहीत. म्हणजे बेस्ट नॉन फिक्शनच्या दोन याद्या एकमेकींशी ताडून पाहिल्या तरी हा फरक लक्षात येतो. चौथं, या याद्या सरसकट बनचुक्या असतात असंही नाही. त्यातली काही पुस्तकं ही खरोखर चांगलीही असतात. पाचवं, इंग्रजीत वर्षभरात जगभर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या अवाढव्य असते. (उदा. भारतात इंग्रजीत प्रकाशित होणारी पुस्तकं ही ६०-७० हजारांच्या घरात असतात, असं म्हटलं जातं.) त्यामुळे त्यातल्या काही महत्त्वाच्याच पुस्तकांची चर्चा, परीक्षणं प्रसारमाध्यमांतून येणं शक्य असतं. त्यामुळे अनेकदा या याद्यांमध्ये त्या वर्षांतली चांगली, पण प्रसारमाध्यमांमध्ये चर्चिली न गेलेली पुस्तकं असतात. काही वेळा खूप चर्चिली गेलेलीही पुस्तकं असतात. आणि सहावं, कुठल्याही यादीत निवडलेल्या पुस्तकांचा संक्षिप्त परिचय दिलेला असतोच. त्यामुळे त्या पुस्तकाची साधारण कल्पना येते. शिवाय त्या पुस्तकाविषयीची आणखी माहिती, त्याविषयीची परीक्षणे इंटरनेटवर शोधून, वाचून त्या पुस्तकांचा बऱ्यापैकी अंदाज बांधता येतो.
'वॉशिंग्टन पोस्ट'ने टेन बेस्ट, फिक्शन, ग्राफिक नॉव्हेल, रोमान्स, थ्रिलर, ऑडियो बुक्स अशा पाच-सहा याद्या प्रकाशित केल्या आहेत. त्यातील पहिल्या यादीतील जवळपास सर्वच पुस्तकं चांगली म्हणावीत अशी आहेत. 'अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ सेव्हन किलिंग्ज', 'फोर्थ ऑफ ज्युली क्रीक', 'द नॅरो रोड ऑफ द डीप नॉर्थ', 'द पेइंग गेस्ट्स', 'स्टेशन इलेव्हन' ही त्यातील पहिली पाच पुस्तकं. यात अतुल गवांदे यांच्या 'बिइंग मॉर्टल'चा, बर्लिनचा इतिहास सांगणाऱ्या 'पोर्ट्रेट ऑफ अ सिटी थ्रु द सेंच्युरीज'चा आणि ढासळत्या पर्यावरणाची जाणीव करून देणाऱ्या 'अननॅचरल हिस्ट्री' या तीन पुस्तकांचाही समावेश आहे. या यादीचं वैशिष्टय़ म्हणजे ही यादी कुणा एकाने केली नसून ती दहा वेगवेगळ्या समीक्षकांनी मिळून बनवली आहे.
'गुडरीडस्'ने तर वीस साहित्य प्रकारांतल्या पुस्तकांच्या याद्या प्रकाशित केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी वाचकांकडूनच त्यांची पसंती मागवली होती. त्यानुसार 'ललित' प्रकारात 'लँडलाइन'ला ४६,१५४, 'ललितेतर' प्रकारात 'द ऑपोझिट ऑफ लोन्लीनेस'ला १९,७९३, 'आत्मचरित्रां'मध्ये 'द स्टार वोन्ट गो आऊट'ला २७,८५०, तर 'कवितां'मध्ये 'लल्बीज'ला ९,५७१ वाचकांची पसंती मिळाल्याने या पुस्तकांनी त्या त्या प्रकारात पहिला क्रमांक पटकावला आहे.
'अॅमेझॉन डॉट कॉम'ने १०० बेस्ट सेलर पुस्तकांची यादी जाहीर केली असली तरी त्यांची वेबसाइट सातत्याने पाहणाऱ्यांच्या लक्षात येईल की, ती फारच घाऊक प्रमाणात केली आहे. कारण त्यातील 'स्ट्रेंग्थ फाइंडर २.०', 'फ्रोझन लिटल गोल्डन बुक', 'लाफ-आऊट जोक्स फॉर किडस', 'द फॉल्ट इन अवर स्टार्स', 'डायरी ऑफ व्हिम्पी किड' ही सुरुवातीची काही पुस्तकं गेली काही महिने तरी याच क्रमानं होती आणि यातील बहुतांश पुस्तकं ही मुलांसाठीची आहेत. त्यामुळे ही यादी फारशी जमेस धरता येत नाही.
'द टेलिग्राफ'ने 'बेस्ट नॉव्हेल्स अँड फिक्शन बुक्स' या प्रकारात ३३ पुस्तकांची नावं दिली आहेत. ही संपूर्ण यादी समीर रहीम यांनी केली आहे. प्रत्येक पुस्तकाबद्दल अगदी नेमका- एका ओळीचा- अभिप्राय नोंदवत त्यांनी आपलं भाष्य केलं आहे. रहीम हे टेलिग्राफचे सहायक ग्रंथ संपादक आहेत. गेली पाच-सहा र्वष ते साहित्य पत्रकारिता करत आहेत. वेगवेगळ्या निवड समित्यांवरही त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे त्यांची यादी वेगळी नक्कीच आहे.
'द न्यू यॉर्क टाइम्स'ने २० बेस्टसेलर पुस्तकांची यादी १४ डिसेंबर रोजी प्रकाशित केली आहे. 'होप टू डाय', 'ग्रे माऊंटेन', 'द एस्केप', 'रिव्हावल', 'टॉम क्लान्सी - फुल फोर्स अँड इफेक्ट' ही त्यातील पहिली पाच पुस्तकं. या पुस्तकांविषयी जेमतेम एका ओळीचा अभिप्राय नोंदवल्याने आणि ही नेमकी कुणी यादी केली आहे, त्यावर वाचकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, याविषयी काहीही न सांगितल्याने या यादीतल्या पुस्तकांमागची बुकंबातमी जाणून घेण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार.
'द गार्डियन'ने बेस्ट पॉप्युलर सायन्सची यादी १८ डिसेंबर रोजी प्रकाशित केली आहे. त्यात 'हाऊ नॉट टू बी राँग- द पॉवर ऑफ मॅथेमॅटिकल थिंकिंग', 'विझार्ड्स, एलियन्स अँड स्टारशिप्स - फिजिक्स अँड मॅथ इन फँटसी अँड सायन्स फिक्शन', 'अॅलन टर्निग- द एनिग्मा', 'तम्बोरा - द इरप्शन दॅट चेंज्ड द वर्ल्ड' अशा बारा पुस्तकांचा समावेश आहे. त्याविषयी अकरा वाचकांनी आपली मतं नोंदवली आहेत. त्यातल्या अध्र्या लोकांनी या यादीविषयी असहमती दाखवली आहे. त्यातल्या काहींनी ही यादी अॅमेझॉनवरील यादीची कट- पेस्ट आवृत्ती असल्याचीही टीका केली आहे. एकानं म्हटलंय की, युरोपात गणित शिकवलं जात नाही. त्यामुळे या यादीचा काही उपयोग होणार नाही. जे शिकवलंच जात नाही ते वाचलं कुठून जाणार?
सरतेशेवटी 'पब्लिशर्स वीकली'बद्दल. हे साप्ताहिक १८७२ पासून न्यूयॉर्कहून प्रकाशित होत आहे. त्याचा खप पंचवीस हजारांहून अधिक आहे. यात अमेरिकेतील ग्रंथव्यवहाराची इत्थंभूत माहिती असते. हे साप्ताहिक ग्रंथजगतात बऱ्यापैकी विश्वासार्ह आणि नि:पक्षपाती मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या यादीकडे गांभीर्यानं पाहायला हरकत नाही. 'पब्लिशर्स वीकली'ने वीस बेस्ट पुस्तकांची यादी दिली आहे. प्रत्येक पुस्तकाची थोडक्यात माहिती दिली आहे. ज्यांना त्या पुस्तकाविषयी सविस्तर जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी त्या पुस्तकाच्या 'पब्लिशर्स वीकली'मध्येच प्रकाशित झालेल्या परीक्षणाची लिंकही दिली आहे. ही सोय इतर कुठल्याही यादीमध्ये नाही. यामुळे त्या पुस्तकाविषयी लगोलग साक्षेपानं जाणून घेता येतं. 'ऑन इम्युनिटी - अॅन इन्कोल्यूशन', 'थर्टीन डेज इन सप्टेंबर', 'द कॉर्प्ससे एक्झिबिशन', 'लिमोनोव्ह' आणि 'दोज हू लीव्ह अँड दोज हू स्टे' ही त्यातील पहिली पाच पुस्तकं.
हा मागोवा अगदी थोडक्यात आणि स्थूलरूपात आहे हे खरं, पण यातून आपल्या आवडीनिवडी, प्राधान्यक्रम ठरवायला, क्वचितप्रसंगी आपल्याकडून निसटलेल्या पुस्तकांविषयी जाणून घ्यायला मदत होईल. बघायला तर सर्वच हवं पण त्यातून आपलीही निवड करायला हवी. 'फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!' ही केशवसुतांची वृत्ती या याद्याकर्त्यांमध्ये जशी डोकावते तशी या याद्या वाचून तिचा शिरकाव आपल्यात झाला तर त्यातून योग्य ते पाखडून घेता येईलच.