Monday, June 20, 2011

प्रखर आणि परखड
कुमार केतकर यांना आवडलेला प्रहार मधील अग्रलेख। त्यांचा SMS असा होता - Special congrats for a prompt and very good edit on Kamal Desai.- Kumar Ketkar
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

कमल देसाई यांच्या निधनाची फार मोठय़ा प्रमाणावर दखल घेतली जाण्याची शक्यता नाही आणि मराठी साहित्यविश्वातूनही फारशी हळहळ व्यक्त होणार नाही. कमलताई काही लोकप्रिय लेखिका नव्हत्या. दुसरी गोष्ट, कमलताईंच्या लिखित पुस्तकांची संख्या जेमतेम पाच आहे. दोन कथासंग्रह आणि तीन कादंब-या. त्यामुळे केवळ सतत लिहिणा-यांचेच वाचणा-यांच्या जगात कमलताईंसारखी प्रयोगशील, अस्तित्ववादी लेखिका मौजूद असणे हेच मुळी काहीसे अस्वाभाविक होते. तिसरे म्हणजे ‘काळा सूर्य’ आणि ‘हॅट घालणारी बाई’सारख्या आधुनिक संज्ञा-प्रवाहांना कवेत घेणा-या कादंब-या समजू शकणारा वाचकवर्ग मराठीत फार मोठय़ा प्रमाणात कधीही नव्हता आणि आजही नाही. मराठी वाचकवर्ग आजही प्राथमिक अवस्थेत आहे. त्याचे ऐतिहासिकतेविषयीचे आंधळे प्रेम आणि स्मरणरंजनवादी मानसिकता यांत कमलताईंसारखी प्रखर आधुनिक, बंडखोर आणि तरीही केवळ स्त्रीवादी नसणारी लेखिका बसू शकत नाही. 1962 साली पहिल्यांदा कमलताईंचा ‘रंग-1’ हा कथासंग्रह आला. निर्मिती, शोध आणि खेळ या प्रेरणा त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येतात. ‘रंग 1’ आणि 2 हे कथासंग्रह काय किंवा ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ काय ही कादंबरी काय- कमलताई साध्या गोष्टींपासून बोलायला सुरुवात करतात. मात्र बोलता बोलता खोल गंभीर तत्त्वचिंतनाकडे वाचकाला खेचून नेतात. हे सर्व त्या एवढय़ा अभावितपणे करतात की, वाचणा-याच्या ते त्या वेळी लक्षात येत नाही. त्यामुळे तो गाफील राहतो. कमलताई अचानक त्याला तत्त्वविचाराच्या चक्रव्यूहात उभा करतात, तेव्हा तो भांबावून जातो. त्याचा थेट अभिमन्यू होतो. म्हणूनच पहिली पाच-सहा वर्षे मराठी समीक्षकांना कमलताईंच्या लेखनाचा अदमासच आला नाही. हे साहित्य आहे का, असा प्रश्न त्यांना पडला. मात्र, मराठी साहित्यातील साडेतीन टक्क्यांच्या विरोधात उभे ठाकणा-या लघुनियतकालिकांच्या संपादक-लेखकांनी कमलताईंचे श्रेष्ठत्व मान्य केले. त्यामुळे विरोधाची धार काहीशी बोथट होत गेली, पण कमलताई सदाशिवपेठी साहित्याच्या शत्रू ठरल्या आणि अल्पसंख्य झाल्या. त्यांच्या कथा-कादंब-यांच्या नायिका स्त्रिया आहेत म्हणून त्यांना स्त्रीवादी लेबल लावणे धाष्टर्य़ाचे होईल. त्यांच्या लेखनात स्त्रीवादी प्रेरणा प्रखर असली तरी एक व्यक्ती म्हणून स्वत:ला प्रस्थापित करणे, ही त्यांची मुख्य प्रेरणा होती. नैतिकता आणि मानवी मूल्य याविषयीची त्यांची भूमिका अतिशय ठाम होती; ती प्रत्यक्ष जगण्यात आणि लेखनातही. मात्र पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्वत:ची मूल्यव्यवस्था प्रस्थापित करू पाहणा-या कुणालाही सहजासहजी मान्यता मिळणे अवघड असते. कमलताईंच्या बाबतीत तेच झाले. पण त्याची त्यांना कधी खंत वाटली नाही. त्यांना जे वाटत होते आणि ज्या पद्धतीने त्या जगत होत्या, तशाच पद्धतीने त्या लिहीत राहिल्या. त्यांना जगण्याबद्दल अपार कुतूहल होते. साहित्य, तत्त्वज्ञान, संगीत, चित्रकला, चित्रपट, जाहिरातकला अशा अनेक विषयांमध्ये त्या रस घेत. म्हणूनच वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्या ‘एक कप च्या’ या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका केली होती. मुख्य म्हणजे पुरुषप्रधान व्यवस्था मोडीत काढण्याएवढे बळ आपल्याकडे नाही, पण आपण त्या विरोधात ठाम उभे राहू शकतो, इतरांना उभे राहण्याची प्रेरणा देऊ शकतो याचे भान त्यांना होते. त्यासाठी त्यांनी पर्याय निवडला तो ललित साहित्याचा. त्यामुळे प्रयोगशीलता आणि मिथके यांच्या पातळी-वरूनच त्या लिहीत राहिल्या. ‘काळा सूर्य’ आणि ‘हॅट घालणारी बाई’ या कादंब-या मराठीत मैलाचा दगड आहेत की नाहीत यावर वाद होतील, पण त्या अत्यंत प्रयोगशील कादंबऱ्या आहेत, यावर मात्र सर्वाचेच एकमत होईल. मळलेल्या वाटा नाकारत नव्या वाटा धुंडाळणा-यांच्या नशिबी मानसन्मान, प्रसिद्धी आणि मान्यता येणे कठीण असते. ‘शंभर लोक ज्या रस्त्याने चालले आहेत, त्याच रस्त्याने आपणही जाणे; म्हणजे आपण योग्य मार्गाने जात आहोत असे नाही’, असे बायबलमध्ये एक वचन आहे. कमलताईंना ‘योग्य मार्ग’ कुठला याचे अतिशय सम्यक भान होते.

Sunday, June 19, 2011

ग्रंथ-मार्गदर्शकाच्या पाऊलवाटामहाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आणि व्युत्पन्न पंडित गोविंद तळवळकर यांचं ‘सौरभ’ हे नवीन पुस्तक नुकतंच बाजारात आलं आहे. तळवळकरांचं लेखन अतिशय नेमकं, मुद्देसूद आणि तपशीलपूर्ण असतं. त्यांची भाषा प्रवाही असली तरी ती अनंलकृत असल्याने तिच्यामध्ये एक प्रकारचा आकर्षकपणा असतो. त्यामुळे त्यांचं लेखन खिळवून ठेवत नसलं तरी ते वाचलं जातं. शिवाय तळवळकरांनी निवडलेली पुस्तकंच अशी असतात की, त्यांच्याबद्दलचं वाचकांचं कुतूहल अनावर असतं. मुळात ग्रंथप्रेम हे तळवळकरांच्या पिढीचंच काहीसं व्यवच्छेदक लक्षण आहे. मग ते श्यामलाल असोत की गिरीलाल जैन असोत. श्यामलाल यांची ‘अ हंड्रेड एन्काउंटर्स’ आणि ‘इंडियन रिअ‍ॅलिटिज’ ही ग्रंथपरीक्षणाची पुस्तकं आणि तळवळकर यांच्या ‘वाचता वाचता’चे दोन खंड ही केवळ त्यांनी वाचलेल्या पुस्तकांविषयीची पुस्तकं नाहीत तर ते ज्या काळात लिहीत होते, त्या काळाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा तो दस्तएवज आहे. जगभर काय लिहिलं जातं आहे, ते कुठल्या पद्धतीचं आणि काय प्रतीचं आहे याचा तो सफरनामा आहे. तळवलकर आणि श्यामलाल यांची पुस्तकं वाचताना हा पुन्हा पुन्हा प्रत्यय येतो.यामुळे तळवळकरांचं लेखन महाराष्ट्रातील जिज्ञासूंच्या कायम कुतूहलाचा विषय राहिलं आहे. महाराष्ट्राच्या जाणकारांच्या दोन-चार पिढय़ा तळवकरांची शिफारस प्रमाण मानून घडल्या आहेत. तळवळकरांनी पाच-सहा वर्षापूर्वी ‘ललित’ या ग्रंथप्रसाराला वाहिलेल्या मासिकामध्ये ‘सौरभ’ या नावाने जीवनाच्या विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या अलक्षित पैलूंची ओळख मुख्यत: ग्रंथांच्या माध्यमातून करून द्यायला सुरुवात केली, तेव्हा हे सदर अल्पावधीतच लोकप्रिय झालं होतं. म्हणूनच त्यातील निवडक लेखांचा पहिला खंड त्यांनी नुकताच पुस्तकरूपाने प्रकाशित केला आहे.प्रस्तुत पुस्तकात एकंदर बावीस लेख आहेत. त्यामध्ये गर्ट्रुड बेल, गिलगुड, जॉर्ज ऑर्वेल, डिकन्स, महाकवी गटे, उमर खय्याम, चेकॉव्ह, ओरहान पाहमूक, अ‍ॅलन बुलक, केनान, जी. के. गालब्रेथ, थॉमस पेन, आइन्स्टाइन अशा जागतिक साहित्यातील लेखक, कादंबरीकार, इतिहासकार आणि तत्त्वज्ञ यांचा समावेश आहे. यामध्ये दोनच भारतीय व्यक्ती आहेत. त्या म्हणजे इंदिरा गांधी आणि रामानंद चतर्जी. तळवळकर यांची पिढी ही नेहरूवादाची कट्टर पुरस्कर्ती आहे. त्याचप्रमाणे त्यांना इंदिरा गांधींबद्दलही सम्यक सहानुभूती आहे. त्यामुळे वरकरणी या पुस्तकात त्यांचा समावेश थोडासा अनुचित वाटला तरी स्वाभाविक आहे आणि नावाप्रमाणेच हा लेखही इंदिरा गांधींचं वाचन, त्यांची पक्षीनिरीक्षणामधली जाणकारी, चित्रपटांबद्दलची आत्मीयता, चित्रकला अशा पैलूंची पत्रव्यवहारातून ओळख करून देणारा आहे.एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतामध्ये विविध विषयांना वाहिलेली आणि दर्जेदार अशी नियतकालिकं प्रकाशित होत होती. त्यावेळच्या कलकत्ता या शहरामधून रामानंद चतर्जी ‘मॉडर्न रिव्ह्यू’ हे नियतकालिक चालवत. बंगाली साहित्य आणि संस्कृतीचे अभिमानी असलेले चतर्जी आपल्या मासिकातून मात्र भारतातील विविध भाषा आणि संस्कृती यांची ओळख करून देत. तळवळकरांनी लिहिले आहे की, त्या वेळच्या नियतकालिकांमध्ये चतर्जी यांचे ‘मॉडर्न रिव्ह्यू’ परिपूर्ण आणि प्रगल्भ असं नियतकालिक होतं. गुणवत्तेच्या बाबतीत तर ते अव्वलच होतं. सर यदुनाथ सरकार, नीरद चौधरी, रवीन्द्रनाथ टागोर अशा मान्यवरांनी त्यात लेखन केलं. चतर्जी यांची पंधरावीस पानांची संपादकीय लेख ‘मॉडर्न रिव्ह्यू’चे खास वैशिष्टय़ होतं.


जॉर्ज ऑर्वेल यांची जन्मशताब्दी 2003 मध्ये साजरी झाली. त्यानिमित्ताने तळवळकरांनी ऑर्वेलच्या समग्र लेखनाची ओळख करून देताना ऑर्वेलविषयी लिहिली गेलेली पुस्तकं, त्याच्या पुस्तकांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या यांचाही साधार आढावा घेतला आहे. तर ‘अ‍ॅन्टन चेकॉव्ह अ‍ॅन्ड हिज टाइम्स’ या चेकॉव्हच्या मित्रांनी लिहिलेल्या पुस्तकाचा ‘मित्रांच्या दृष्टीतून चेकॉव्ह’ या लेखात परिचय करून दिला आहे. अठराव्या शतकात जर्मनीच्या सांस्कृतिक जीवनाचं अविभाज्य भाग असलेल्या गटे यांच्या पुस्तकाची ओळख करून देताना त्याच्या विचारविश्वाचीही सफर घडवली आहे.उमर खय्याम यांच्या रुबायाबद्दल आपण ऐकून असतो. जागतिक वाङ्मयात खय्यामला कीर्ती मिळाली ती रुबायामुळेच. एडवर्ड फित्झेराल्ड या इंग्रजी कवीने त्यांच्या रुबायाचा इंग्रजी अनुवाद केला आणि पाश्चात्य जगात या पौर्वात्य कवीने आपली नाममुद्रा उमटवली. इंग्लंड-अमेरिकेत तर खय्यामच्या नावाने क्लब स्थापन झाले. त्या सर्वाचा मागोवा तळवळकरांनी घेतला आहे. खय्यामच्या रुबायांनी प्रभावित झालेल्यांमध्ये अमेरिकेचे सांस्कृतिक दैवत मार्क ट्वेन यांचाही समावेश होता. ट्वेनच्या नर्मविनोदी साहित्याने आणि त्यांच्या हजरजबाबी चातुर्याने तर जगभरातल्या वाचकांना वेड लावलं आहे.थोडक्यात तळवळकरांचे हे पुस्तक त्यांना आवडलेल्या पुस्तकांचा आणि लेखकांचा परिचय करून देणारे आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा ओळख करून देण्यात फार हशील नाही. पण मग याचं महत्त्व काय? तर हे पुस्तक वाचून आपल्याला काय वाचावं आणि काय वाचू नये याचा विवेक करता येईल असं वाटतं. कुठलाच माणूस जगातली सर्व पुस्तकंच काय पण आपल्या भाषेत प्रकाशित झालेली सर्व पुस्तकंही वाचू शकत नाही. खरं तर तशी गरजही नसते. पण अजिबात शिस्त नसलेल्या आणि भरकटलेल्या वाचनाचा काहीही उपयोग होत नाही. त्या त्या वेळी त्याचं आपल्याकडून समर्थन केलं जातं. पण उतारवयात जेव्हा आपली क्रयशक्ती आणि वाचनशक्ती कमी होते आणि अजून खूप वाचून व्हायचं बाकीच आहे असं लक्षात येतं, तेव्हा आपण आजवर खूप वेळ क्षुल्लक पुस्तकं वाचण्यात घालवला असं वाटायला लागतं. अशी कबुली मराठीतल्या अनेक मान्यवर लेखकांनीही वेळोवळी दिली आहे. अशी पश्चातापाची वेळ येऊ द्यायची नसेल तर एका चांगल्या ग्रंथ-मार्गदर्शकाची गरज असते. तळवळकरांचे हे पुस्तक ती भूमिका उत्तमप्रकारे निभावू शकते.मात्र तळवळकरांनाच पूर्णपणे प्रमाण मानता कामा नये. कारण या पुस्तकात फक्त ओळखपरेड आहे, ही काही समीक्षा नाही. किंबहुना कुठल्याही पुस्तकाबद्दल लिहिताना तळवळकर टीकेचा स्वर शक्यतो लावत नाहीत. लेखकाला काय सांगायचं आहे आणि ते त्याने कशाच्या आधारे सांगितलं आहे, याचाच ते वेध घेतात. अर्थात ही त्यांच्या लेखनातली उणीव नव्हे तर पुस्तकांकडे कसं पाहावं याचा तो वस्तुपाठ आहे. उत्तम वाचक होण्यासाठी आधी उत्तम पुस्तकं वाचली पाहिजेत आणि उत्तम पुस्तकं कुठली हे जाणून घेण्यासाठी तळवळकरांसारख्या ग्रंथ-मार्गदर्शकाच्या पाऊलवाटेवरून चाललं पाहिजे.या पुस्तकाबाबत एकच छोटासा आक्षेप नोंदवता येईल. तोही अनुक्रमणिकेपुरता मर्यादित आहे. त्यात दिलेला ‘सुंदर मी होणार’ हा चौथ्या क्रमांकाचा लेख मूळ पुस्तकात नाही. त्यामुळे त्यापुढील सर्वच पानांचे अनुक्रमांक चुकले आहेत. पण ते न पाहताही हे पुस्तक आपल्याला हवं तिथपासून वाचता येईलच.

Sunday, June 5, 2011

‘श्यामची आई’ची जन्मकथा!

1935 नाही, 36!
‘श्यामची आई’च्या पहिल्या आवृत्तीवर दासनवमी शके 1857 असे छापलेले असल्याने ही आवृत्ती 1935 सालीच प्रकाशित झाली, असा ढोबळ अंदाज केला जातो आणि तोच गृहीत धरला जातो. अनाथ विद्यार्थी गृह (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित केल्यावर पहिल्या आवृत्तीचे साल 1935 असेच छापले. ते अजूनही तसेच छापले जाते. खरी गोष्ट अशी आहे की, शके आणि इसवीसन या दोन कालगणनांमध्ये 78 वर्षाचा फरक असतो. पण शके ही भारतीय कालगणना असल्याने त्याच्या वर्षाची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार मार्च-एप्रिलमध्ये होते. त्यामुळे शकेच्या सालामध्ये इंग्रजी महिन्यांचा मार्च-एप्रिल ते मार्च-एप्रिल हा काळ येतो. मग दासनवमी शके 1857 चे इसवीसनामध्ये अचूक वार, तारीख, महिना आणि साल काय येईल, याचा साने गुरुजींची पुतणी सुधा बोडा यांनी बराच शोध घेतला. त्यांनी जुन्या पंचांग तज्ज्ञांकडून सारे पडताळून घेतले, तेव्हा ‘श्यामची आई’ची अचूक तारीख 16 फेब्रुवारी 1936 आहे, हे सिद्ध झाले. त्यामुळे चालू वर्ष ‘श्यामची आई’चे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.
‘पुस्तक म्हणजे ज्यातून स्वत:ला साठवावे, आठवावे आणि वाटावेही’ अशी साने गुरुजींनी चांगल्या पुस्तकाची व्याख्या केली आहे. ती त्यांच्या सर्वच लेखनाला लागू पडते. त्यातही गुरुजींचे सर्वात आवडते पुस्तक आहे, ‘श्यामची आई’. या पुस्तकाला तर ही व्याख्या अगदीच समर्पक आणि यथायोग्य वाटते.
साने गुरुजींनी आपल्या उत्तर आयुष्यातील 1930 ते 1950 या वीस वर्षापैकी तब्बल सहा वर्ष सहा महिने हा काळ धुळे, नाशिक, जळगाव आणि येरवडा येथील तुरुंगात काढला. याच काळात त्यांनी बरेचसे लेखन केले. 17 जानेवारी 1932 ते ऑक्टोबर 33 हे एकवीस महिने गुरुजी नाशिकच्या तुरुंगात होते. तिथेच त्यांनी दररोज रात्री आपल्या सहका-यांना आधी आईच्या आठवणी सांगितल्या. मग त्यांच्या आग्रहावरून त्या लिहून काढल्या. ते पुस्तक म्हणजे ‘श्यामची आई’. या पुस्तकातील 36 रात्री साने गुरुजींनी 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 1933 या पाच दिवसांतल्या चार रात्रींत लिहून काढल्या. उरलेल्या नऊ रात्री मात्र त्यांनी तुरुंगातून सुटका झाल्यावर लिहिल्या. मात्र पुस्तक करताना त्यातील तीन रात्री त्यांनी वगळून फक्त 42 रात्रींचेच पुस्तक केले. त्या तीन रात्रींमध्ये कोणत्या आठवणी होत्या, हा प्रश्न कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा आहे. पण त्याविषयी गुरुजींनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत आणि इतरत्रही काहीही खुलासा केलेला नाही.


साने गुरुजींचे नाव पांडुरंग असले तरी त्यांचे घरगुती नाव पंढरीनाथ होते. पण त्यांना स्वत:ला मात्र ‘राम’ हे नाव अधिक आवडत असे. पुढे ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिताना गुरुजींनी ‘श्याम’ हे नाव घेतले. कारण त्यांच्या आईचे नाव ‘यशोदा’ होते. ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांनी याविषयी एके ठिकाणी नमूद केले आहे. पुढे ‘श्याम’ या नावानेच गुरुजींनी इतरही काही लेखन केले.


‘श्यामची आई’चे हस्तलिखित साठ-सत्तर लोकांनी वाचले, ऐकले, असे साने गुरुजींनीच लिहिले आहे. त्यातले एक होते यशवंतराव चव्हाण. दयार्णव कोपर्डेकर यांचा गुरुजींशी चांगला परिचय होता. साने गुरुजींनीच कोपर्डेकरांचे लग्न ठरवले होते. हे कोपर्डेकर आणि यशवंतराव चव्हाण शालेय मित्र. चव्हाणांची कोपर्डेकरांनी साने गुरुजींशी ओळख करून दिली होती. दयार्णव कोपर्डेकर ‘सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला’च्या प्रचारासाठी फिरते विक्रेते म्हणून काम करत होते. जळगाव, इंदूर, देवास, उज्जन, रतलाम, बडोदे, सोलापूर, अकोला, अमरावती अशा अनेक ठिकाणी फिरून त्यांनी पुस्तकांची विक्री केली होती. कोपर्डेकरांनी आपले ‘श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशित करावे, अशी साने गुरुजींची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी हस्तलिखिताच्या वह्या कोपर्डेकरांकडे दिल्या. त्या त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना ‘हे पुस्तक प्रकाशित करावे का?’ यासाठी वाचायला दिल्या. त्याविषयी चव्हाणांनी लिहिले आहे, ‘‘श्यामची आई वाचत असताना अनेक वेळा माझे डोळे पाणावून आले.. साने गुरुजींचे प्रत्येक वाक्य भावनेने ओथंबून गेलेले व आईच्या प्रेमाने ओसंडून चाललेले होते.’’ चव्हाणांनी कोपर्डेकरांना हे पुस्तक त्वरेने प्रकाशित करण्याची सूचना केली, पण काही कारणाने कोपर्डेकरांना ते शक्य झाले नाही.


मग, ‘श्यामच्या आई’ची पहिली आवृत्ती अमळनेरच्या जगन्नाथ गोपाळ गोखले यांनी प्रकाशित केली. त्यावर दासनवमी शके 1857 असा उल्लेख आहे. किंमत आहे एक रुपया. या पुस्तकाचे मुखपृष्ठही गुरुजींच्या नागेश पिंगळे या विद्यार्थ्यांने तयार केले आहे. या पुस्तकावर मात्र पां. स. साने असा उल्लेख आहे. हे पुस्तक अमळनेरहून प्रकाशित झाले असले तरी त्याची छपाई मात्र पुण्यातल्या लोकसंग्रह छापखान्यात झाली. ‘श्यामची आई’ प्रकाशित झाल्यावर काही महिन्यांनीच गुरुजींच्या ‘पत्री’ या कवितासंग्रहावर इंग्रज सरकारने बंदी आणली. हा संग्रह पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृहाच्या मालकीच्या लोकसंग्रह छापखान्याने छापला होता. त्यामुळे त्यांच्याकडे इंग्रज सरकारने दोन हजार रुपयांचा जामीन मागितला, तो त्यांनी भरलाही. पण आपल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या संस्थेला नाहक भरुदड बसला, याचे साने गुरुजींना फार वाईट वाटले. त्यामुळे त्यांनी ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे सर्व हक्क 500 रुपयांमध्ये अनाथ विद्यार्थी गृहाला देऊन टाकण्याचा निर्णय घेतला.


16 ऑक्टोबर 1936 रोजी झालेला हा करार मोठा मजेशीर आहे. अनाथ विद्यार्थी गृहाने गुरुजींना पुस्तकावर दहा टक्के मानधन देण्याची तयारी दाखवली होती, पण ते त्यांना नको होते. म्हणून मग गुरुजींना कराराच्या आधी 50 रुपये आणि उरलेले 450 रुपये करार झाल्यानंतर दिले. पण त्याच वेळी संस्थेला देणगी म्हणून गुरुजींकडून 100 रुपये घेण्यात आले. म्हणजे त्यांच्या हातात अवघे 400 रुपयेच पडले. त्याबदल्यात गुरुजींनी ‘श्यामच्या आई’चे तहहयात हक्क देऊन टाकले. त्यात भाषांतराच्या हक्काचाही समावेश होता. हा करार करून गुरुजी घरी आले खरे पण त्यांना खूप वाईट वाटले. आपले अतिशय आवडते पुस्तक त्यांना नाइलाजास्तव विकावे लागल्याची निराशा त्यांना लपवता आली नाही. हताशपणे ते सहका-यांना म्हणाले, ‘आज मी माझ्या आईला विकून आलो’.
मराठीमधले रांगा लावून लोकांनी विकत घेतलेले पहिले पुस्तक म्हणजे लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’. ‘गीतारहस्य’ विक्रीसाठी तयार असल्याची जाहिरात 15 जून 1915 च्या ‘केसरी’च्या अंकात प्रकाशित झाली. ती वाचून सकाळपासूनच लोकांनी केसरी वाडय़ासमोर रांगा लावल्या. ‘गीतारहस्या’ची सहा महिन्यातच दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. तेव्हापासून या ग्रंथाचे गेली 95 वर्षे सातत्याने पुनर्मुद्रण होत आहे.
विनोबा भावे यांनी 1930 मध्ये ‘गीताई’ लिहिले. ‘गीताई’च्या 1932 पासून आतापर्यंत 240 आवृत्त्या निघाल्या, सुमारे 40 लाख प्रती विकल्या गेल्या. विनोबांनीच 1932 मध्ये धुळ्याच्या तुरुंगात ‘गीता प्रवचने’ दिली, ती साने गुरुजींनी लिहून घेतली. त्याचे पुस्तक 1945 मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकाच्याही आत्तापर्यंत 40 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. शिवाय देशी-परदेशी मिळून 23 भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्या सर्वाचा विचार केला तर या पुस्तकाच्या सुमारे पंचविसेक लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.
या तीन पुस्तकानंतर आवृत्त्या, विक्री आणि प्रभाव या तिन्ही बाबतींत ‘श्यामची आई’चा नंबर लागतो. आजवर ‘श्यामची आई’च्या 56 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्याचा हिंदी अनुवाद 1940 मध्येच झाला. त्यानंतर दोन इंग्रजी अनुवाद झाले. त्यातला एक पुणे विद्यार्थी गृहाने प्रकाशित केला तर दुसरा भारतीय विद्या भवनने. याशिवाय कानडीमध्येही अनुवाद झाला. ‘चित्ररूप श्यामची आई’ ही कॉमिक्स आवृत्तीही प्रकाशित झाली. डॉ. मु. ब. शहा यांनी ‘संवादरूप श्यामची आई’ लिहिले तर प्रभाकर ठेंगडी यांनी ‘श्यामची आई’चे नाटय़रूपांतर केले.