Sunday, September 21, 2014

साहित्य अकादमीचा चित्रमय इतिहास

हिंदी चित्रपट, क्रिकेट, शास्त्रीय संगीत आणि साहित्य, या गोष्टी भारतीयांच्या विविधतेतील एकात्मतेचे प्रतीक मानल्या जातात. पहिल्या दोन्हींसाठी हिंदी वा इंग्रजी भाषेची आवश्यकता असते. पण शास्त्रीय संगीतासाठी त्याचीही गरज नसते. त्यामानाने साहित्य हा सर्व भारतीय भाषांतील लेखक-वाचकांना जोडणारा दुवा कसा ठरेल आणि त्यातून एक सांस्कृतिक एकात्मता कशी आकाराला येईल, हे दूरदृष्टीचे आणि प्रतिभेचे काम होते. पण स्वातंत्र्यानंतर अल्पावधीतच पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी त्या दृष्टीने एका शिखर साहित्य संस्थेची निर्मिती करायचे ठरवले. त्यानुसार १२ मार्च १९५४ रोजी 'साहित्य अ‍ॅकॅडमी - द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ लेटर्स' या संस्थेची स्थापना करण्यात आली. नुकतेच या संस्थेने आपले हीरकमहोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. त्यानिमित्ताने या संस्थेचा सचित्र इतिहास सांगणाऱ्या 'साहित्य अ‍ॅकॅडमी-१९५४-२०१४' या कॉफी टेबल आकारातील देखण्या पुस्तकाचे प्रकाशन अकादमीने केले आहे. २००४ साली अकादमीला पन्नास र्वष पूर्ण झाली, तेव्हा 'फाइव्ह डिकेड- अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ साहित्य अ‍ॅकॅडमी' या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. त्यातून जसा अकादमीचा इतिहास तपशीलवार उलगडतो तसा या पुस्तकातून उलगडत नाही. याचे कारण हे चित्रमय चरित्र आहे. पण या पुस्तकातून अकादमीचा गाभा आणि आवाका समजून घ्यायला मदत होते. कुठल्याही व्यक्ती वा संस्थेचे मूल्यमापन करताना त्यांच्या कामाचा गाभा आणि आवाका समजून घेणे महत्त्वाचे असते. तो घेतला तर त्यांचे मूल्यमापन नीट करता येते.
आजघडीला साहित्य अकादमी ही केंद्र सरकारची स्वायत्त संस्था २४ मान्यताप्राप्त भारतीय भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित करणारी, साहित्यकृतींना उत्तेजन देणारी, त्यांच्या वेगवेगळ्या भाषांमधील अनुवादांना चालना देणारी आणि विविध साहित्य-उपक्रम घडवून आणणारी भारतातील सर्वात मोठी संस्था आहे. म्हणूनच 'लेखकांची, लेखकांनी, लेखकांसाठी चालवलेली संस्था म्हणजे साहित्य अकादमी' असे तिचे वर्णन केले जाते.
मान्यवर साहित्यिकांना गौरववृत्ती देणे; साहित्य अकादमी, भाषा सन्मान, युवा पुरस्कार, बाल साहित्य पुरस्कार, अनुवाद पुरस्कार आणि  विविध साहित्य-उपक्रम याद्वारे अकादमी भारतीय साहित्यातील विविधतेतील एकात्मतेला जोडून ठेवण्याचे आणि ती संघटित करण्याचे काम सतत करत आली आहे. 'इंडियन लिटरेचर', 'समकालीन भारतीय साहित्य', 'संस्कृत प्रतिभा' या तीन द्वैमासिकांद्वारे विविध भाषांतील साहित्याला भारतीय स्तरावर पोहोचवण्याचे काम करते. याशिवाय मान्यवर साहित्यिकांविषयीचे लघुपट, पुस्तक प्रदर्शने, चर्चासत्रे-शिबिरे-लेखक भेटी यांचे आयोजन सतत चालू असते. थोडक्यात काय तर अकादमीने गेल्या साठ वर्षांत भारतीय जनतेची साहित्यरुची, साहित्य गुणवत्ता आणि साहित्य-जाणिवा यांचे आपल्यापरीने भरणपोषण करण्याचे, ते प्रगल्भ करण्याचे काम केले आहे, करत आहे.
सुरुवातीला शिक्षण मंत्रालयाच्या एका खोलीत सुरू झालेले अकादमीचे ऑफिस नंतर कनॉट प्लेसच्या थिएटर कम्युनिकेशन इमारतीत गेले. १९६१ साली केंद्र सरकारने साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी आणि ललित कला अकादमी या तीन संस्थांसाठी तीन मजली स्वतंत्र इमारत उभारली. (तेव्हापासून या तिन्ही संस्था तेथून भारतीयत्वाचे प्रतिनिधित्व करत आहेत.) दिल्लीत मुख्यालय असले तरी १९५६ ला अकादमीचे पहिले विभागीय कार्यालय कलकत्तामध्ये सुरू झाले, १९५९ ला चेन्नईला; १९९० ला तेच बंगलोरला हलवले गेले, १९७२ ला मुंबईला कार्यालय सुरू झाले.
साहित्य अकादमीशी भारतीय भाषांतील मान्यवर साहित्यिक सुरुवातीपासूनच जोडलेले आहेत. महादेवी वर्मा यांच्यापासून गिरीश कार्नाड यांच्यापर्यंत आणि गंगाधर गाडगीळ यांच्यापासून भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंत भारतीय भाषांतील साहित्यिक इतक्या मोठय़ा प्रमाणावर इतर कुठल्याही संस्थेशी निगडित नाहीत. साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष म्हणून पं. नेहरू यांची निवड करण्यात आली, ती ते पंतप्रधान होते म्हणून नव्हे तर एक लेखक म्हणून. साहित्य अकादमीचे बोधचिन्ह सत्यजित राय यांनी तयार केले, एवढेच नव्हे तर 'मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर' या साहित्यमालिकेतील काही पुस्तकांची मुखपृष्ठं त्यांनी काढली. अकादमीविषयीचा सुवर्णमहोत्सवी वर्षांतला लघुपट प्रसिद्ध गीतकार-कवी गुलज़ार यांनी बनवला आहे.
हा सर्व वैभवशाली इतिहास या पुस्तकातून समर्पक छायाचित्रांद्वारे उलगडून दाखवला आहे. या पुस्तकाचे लेखन-संयोजन इंग्रजीचे प्राध्यापक, समीक्षक आणि 'इंडियन लिटरेचर'चे माजी संपादक डी. एस. राव यांनी केले आहे. त्यांनीच 'फाइव्ह डिकेड - अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ साहित्य अ‍ॅकॅडमी' या पुस्तकाचेही लेखन केले. या पुस्तकातून त्यांची विचक्षण दृष्टी प्रत्ययाला येते. समर्पक छायाचित्रे आणि त्यांना उचित मजकुराची जोड, यांची भट्टी जमून आल्याने हे पुस्तक हीरकमहोत्सवी वर्षांतले अकादमीचे एक उत्कृष्ट प्रकाशन ठरले आहे.
हे पुस्तक चाळताना गेल्या साठ वर्षांतील अकादमीचा इतिहास आपल्यासमोर प्रत्ययकारी रीतीने सिनेमाच्या रिळासारखा उलगडत राहतो. छायाचित्रांची निवड आणि दर्जा चांगला असल्याने ती पूर्ण पाहिल्याशिवाय पुढचे पान उलटावेसे वाटत नाही, ही या पुस्तकाची एक जमेची बाजू आहे.
अकादमीचा विस्तार भारतभर पसरलेला असल्याने तिला महावृक्षाचीच उपमा द्यायला हवी. अकादमी भारतीय साहित्याचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संस्था असल्याने अनेक गोष्टींच्या पहिलेपणाचे मान तिच्याकडे जातात. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांचीही ओळख होते. उदा. भारतीय साहित्याची राष्ट्रीय सूची, हुज हू इन इंडियन लिटरेचर, विविध भाषांतील साहित्याचा इतिहास, भारतीय साहित्याचे निर्माते ही पुस्तकमालिका, भारतीय साहित्याचा विश्वकोश, एकाच व्यासपीठावर वेगवेगळ्या भाषांमधील साहित्यिकांना आणणे इत्यादी.
एका संस्थेचा हा चित्रमय इतिहास असल्याने आणि तो हौसेखातर प्रकाशित केला असल्याने त्याला शास्त्रकाटय़ाची कसोटी फारशी लावता येत नाही. पण तरीही एक खटकणारी गोष्ट नोंदवायला हवीच. एरवी अकादमी प्रकाशित करत असलेल्या पुस्तकांच्या किमती या सर्वसामान्य वाचकांना परवडतील अशा असतात. त्यामुळे ती पुस्तके कुणालाही सहजपणे विकत घेता येतात. या कॉफी टेबल पुस्तकाचा वाचकवर्ग मर्यादित असला तरी साहित्याच्या प्रेमापोटी हे पुस्तक हौसेने खरेदी करणाऱ्यांची संख्या थोडी असेल, पण असेलच. कारण हे पुस्तक संग्राह्य़ नक्कीच आहे. पण त्याची किंमत मात्र अकादमीच्या नेहमीच्या लौकिकाला साजेशी ठेवली गेलेली नाही.
साहित्य अ‍ॅकॅडमी - १९५४-२०१४ : डी. एस. राव,
साहित्य अ‍ॅकॅडमी, नवी दिल्ली,
पाने : १९०, किंमत : २५०० रुपये.

Thursday, September 4, 2014

दादोजी, शिवाजी महाराज आणि सत्य

'सध्याचे युग हे इतिहासाचे सर्वाधिक भान असलेले युग आहे. आधुनिक मानवाला कधी नव्हती इतकी स्वत:ची आणि म्हणून इतिहासाची जाणीव असते.. भूत, वर्तमान आणि भविष्य हे जिला शेवटचे टोक नाही अशा इतिहासाच्या साखळीतले दुवे आहेत.' 
हे अवतरण प्रसिद्ध इतिहासकार ई. ए. कार यांच्या 'इतिहास म्हणजे काय' या पुस्तकातील १५९ पानावरील आहे. भांडारकर संस्थेवरील हल्ल्यानंतरच्या गेल्या १० वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या इतिहासाच्या प्राध्यापकांचं, अभ्यासकांचं आणि काही स्वयंघोषित संशोधकांचं इतिहासाविषयीचं भान आणि इतिहासातील योग्य दुवे जोडण्याचे प्रयत्न हे हेतुपुरस्सररीत्या आणि संशयास्पद असल्याचं उघड उघड दिसतं. ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही, पण भांडारकर संस्थेवरील हल्ल्यानंतर त्याला जे विघातक स्वरूप आलं आहे, त्यातून इतिहासाची मोडतोड करण्याची, तो सोयीस्कररीत्या लिहिण्याची आणि इतिहासाच्या नावाखाली दमदाटी करण्याची अहमहमिकाच सुरू असल्याचं दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज तर यातील सर्वाधिक स्फोटक आणि वादग्रस्त विषय झाला आहे.
जेम्स लेन नामक एका पाश्चात्त्य लेखकानं 'शिवाजी : अ हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकात दादोजी कोंडदेव यांच्याविषयी केलेलं एक विधान या सर्वाला कारणीभूत ठरलं. आणि दादोजी यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासातून हद्दपार करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. इयत्ता चौथीचे क्रमिक पुस्तक बदलणं, लाल महालातील दादोजी यांचा पुतळा हटवणं आणि या सर्वाच्या आधी भांडारकरवरील हल्ला अशी ही मालिका पद्धतशीरपणे घडवली गेली. मराठा संघटना इतक्या आक्रमक झाल्या की, परिणामी शिवाजी महाराजांविषयी काही काळ बोलणंच बंद झालं. इतिहासाविषयी लेखन करणाऱ्यांमध्ये ब्राह्मण-ब्राह्मणेतर असे सरळ सरळ दोन तट पडले. आणि या दोन्ही तटांनी विविध ठिकाणी लेख लिहून एकमेकांना खोडून काढायला सुरुवात केली. 

या पुस्तकात ब्राह्मणेतरांनी दादोजी यांच्याबद्दल केलेल्या दाव्यांचं खंडण-मंडण करण्याचा प्रयत्न आहे. ब्राह्मणेतर लेखकांच्या लेखनात जसा आवेश, केवळ दोषारोप आणि आक्रमकता दिसते, तशीच या पुस्तकातही काही प्रमाणात आहे. पण ती ब्राह्मणेतर लेखकांइतकी अनाठायी नाही.
दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं, त्यांची नेमणूक खुद्द शहाजीराजांनीच केली होती, या दोन विधानांत या पुस्तकातलं सार संपतं. बाकी ब्राह्मणेतर लेखकांच्या लेखांना प्रत्युत्तर, त्यांचे दावे खोडून काढणं आणि त्यांच्या विधानातील विसंगती उघड करणं, असा भाग आहे. सरळ आणि स्पष्टच सांगायचं तर ब्राह्मणेतर लेखकांनी दादोजींविषयी केलेल्या लेखनाला खोडून काढण्याचा हा प्रयत्न आहे. आणि तो एका मर्यादित अर्थानं स्तुत्य आहे. कारण दादोजी यांचं शिवाजी महाराजांच्या जडणघडणीतलं स्थान नाकारण्यात काहीच अर्थ नाही. ज्यांना सत्य बोलण्याचं भय वाटतं, ते लोक असत्य विधानं करतात तेव्हा खरं तर इतिहासाचं काहीच नुकसान होत नाही. समाजाची काही काळ दिशाभूल होते. पण शेवटी जॉर्ज ऑर्वेल म्हणतो त्याचं प्रत्यंतर येतंच. तो म्हणतो - 'तुम्ही सर्व काळ सर्व लोकांना मूर्ख बनवू शकत नाही.' या पुस्तकाच्या वाचनातून लक्षात घेण्याची गोष्ट आहे ती एवढीच.
ज्यांना केवळ पुराव्यांची मोडतोड करायची आहे, सत्य दडवून ठेवायचं आहे आणि निव्वळ दमदाटी करायची आहे, त्यांची दखल न घेण्यातच सुज्ञता आहे. आणि ती महाराष्ट्रातील सुज्ञ जाणकारांनी गेल्या १० वर्षांत चांगल्या प्रकारे या प्रसंगाच्या संदर्भात दाखवली आहे. कारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर इतिहासविषयक लेखन करणाऱ्यांची शाब्दिक लढाई सत्यापेक्षा सत्याचा अपलाप करणारी आहे. आणि म्हणून त्याज्य आहे. असो. या पुस्तकातून लेखकाची तळमळ दृगोचर होते. आणि ती इष्टच आहे.
'हिंदूवी स्वराज्याचे कारभारी दादोजी कोंडदेव : खंडण आणि मंडण' - श्यामसुंदर सुळे, अखिल भारतीय मराठा विकास परिषद, तळेगाव, जि. पुणे, पृष्ठ- २४८,  मूल्य- ८० रुपये.