Sunday, February 1, 2015

नवी आत्मकथा, नव्या व्यथा'आऊटलुक' या इंग्रजीतील चर्चित साप्ताहिकाचे माजी मुख्य संपादक विनोद मेहता हे त्यांच्या काहीशा चमत्कारिक दृष्टिकोनामुळे भारतीय पत्रकारितेत बहुतेकांना परिचित आहेत. एका जागी स्थिर न राहता सतत नव्या ठिकाणी जाऊन ते वर्तमानपत्र चर्चेत आणायचे आणि मग तिथून पोबारा करायचा, असा लौकिक असलेल्या मेहता यांनी तब्बल १७ वर्षे 'आऊटलुक'चे संपादकपद भूषवले. केवळ एवढेच नव्हे तर या साप्ताहिकाला भारतातील आघाडीचे साप्ताहिक बनवले. आणि तरीही त्यातून बाहेर न पडता ते अजून याच ठिकाणी एडिटोरिअल चेअरमन या पदावर कार्यरत आहेत. म्हणजे मेहता एका जागी स्थिर होऊनही पुष्कळ वर्षे लोटली आहेत. त्यामुळे त्याची चर्चा करण्यात काहीच हशील नाही. ..तर सध्या चर्चा आहे त्यांच्या नव्या पुस्तकाची. 'एडिटर अनप्लग्ड : मीडिया, मॅग्नेट्स, नेताज अँड मी'ची. २०११ साली त्यांच्या आत्मकथनाचा पहिला भाग 'लखनौ बॉय' या नावाने प्रकाशित झाला होता. त्याचाच हा पुढचा भाग आहे. 'लखनौ बॉय'मुळे मेहतांचे काही नवे शत्रू निर्माण झाले होते. 'एडिटर अनप्लग्ड'मुळे त्यात आणखी काही नावांची भर पडेल. या पुस्तकात मेहतांनी ख्वाजा अहमद अब्बास, जॉनी वॉकर, सचिन तेंडुलकर, रस्किन बॉण्ड, खुशवंतसिंग आणि अरुंधती रॉय या त्यांना कौतुकास्पद वाटलेल्या सहा व्यक्तींची प्रत्येकी १२०० शब्दांची व्यक्तिचित्रे लिहिली आहेत. नेहरू-गांधी घराण्याविषयीही खास त्यांच्या पद्धतीने लिहिले आहे. नुकत्याच 'आऊटलुक'मधील डायरी या सदरात मेहतांनी 'इंदिरा आणि प्रियांका या दोघींनीही संकटात लोटणाऱ्या नवऱ्यांची निवड केली' असे विधान केले होते. आणि अर्थातच नरेंद्र मोदींविषयीही लिहिले आहेच. त्यांना कसे सोशल लाइफ नाही, ते कसे एकाधिकारवादी आहेत इत्यादी इत्यादी. टाइम्स नाऊ वाहिनीच्या अर्णब गोस्वामी यांच्याबद्दलही तिरकसपणे लिहिले आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्याविषयीही. मध्यमवर्ग आणि दिल्लीतील राजकारण यांच्याविषयीची मते आणि निरीक्षणेसुद्धा नोंदवली आहेत. तिरकस, उपहासपूर्ण मते, काही प्रमाणात टवाळकी आणि सेलेब्रिटी गॉसिप्स असलेला मेहतांच्या आत्मकथेचा हा दुसरा भागही काही प्रमाणात वादग्रस्त होण्याची शक्यता आहेच.

गज्वी पोचले इंग्रजीत!

प्रेमानंद गज्वी हे मराठीतील सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारे नाटककार आहेत. त्यांच्या 'घोटभर पाणी', 'किरवंत' आणि 'गांधी-आंबेडकर' या तिन्ही नाटकांनी- अगदी बिनचूक शब्दांत सांगायचे तर पहिल्या एकांकिकेने आणि नंतरच्या दोन नाटकांनी- मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता ही तिन्ही नाटके रूपांतराच्या निमित्ताने इंग्रजीमध्ये दाखल झाली आहेत. त्या रंगभूमीवर ती प्रयोगक्षम ठरतात की नाही हे येत्या काळात कळेलच. 'घोटभर पाणी'चे मराठीमध्ये तीन हजार प्रयोग झाले. या एकांकिकेत अस्पृश्यतेच्या शापामुळे पाण्यापासून वंचित राहिलेल्याची वेदना मांडली आहे. त्यानिमित्ताने गज्वी यांनी भारतीय संस्कृतीतील दांभिकतेचे वाभाडे काढले आहेत. 'किरवंत' या नाटकाची प्रशंसा डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती. या नाटकात ब्राह्मण 'किरवंत'ला (अंत्यविधीची क्रियाकर्मे करणारी व्यक्ती) कशा प्रकारची वागणूक देतो, याचे भेदक आणि वास्तव चित्रण केले आहे. 'जो ब्राह्मण समाज स्वत:च्याच समाजाला न्याय देऊ  शकत नाही, तो इतर समाजाला काय न्याय देणार आणि सन्मानाने वागवणार,' असा जळजळीत प्रश्न या नाटकातून गज्वी यांनी उपस्थित केला आहे. 'गांधी-आंबेडकर' हे नाटक म. गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील संघर्षांची मांडणी करते. १९३१ सालच्या पहिल्या गांधी-आंबेडकर भेटीने हे नाटक सुरू होते आणि गांधी हत्येनंतर आंबेडकरांच्या स्वगताने संपते. गांधी-आंबेडकर यांचे संबंध सुरुवातीपासून तणावाचेच राहिले. त्याविषयी त्यांच्या हयातीपासून बोलले जातेच आहे. हे नाटकही त्याचाच एक भाग म्हणून अवतरले.
'घोटभर पाणी'चा इंग्रजी अनुवाद शांता गोखले यांनी तर 'किरवंत' आणि 'गांधी-आंबेडकर' यांचा अनुवाद म. द. हातकणंगलेकर यांनी केला आहे. पहिल्या दोन्ही नाटकांत महाराष्ट्रीय समाजातील भेदक वास्तव तर तिसऱ्या नाटकांत हिंदू आणि दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन भारतीय समाजपुरुषांमधील संघर्ष रेखाटला आहे. मराठीमध्ये ही तिन्ही नाटके नावाजली गेली, वाखाणलीही गेली. महत्त्वाचीही मानली गेली. कारण महाराष्ट्रात त्यांना मोठा इतिहास आहे. तसे इंग्रजीत होईलच असे नाही.
द स्ट्रेंग्थ ऑफ अवर रिस्ट्स : प्रेमानंद गज्वी,
अनुवाद- शांता गोखले, म. द. हातकणंगलेकर,
नवयान पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली,
पाने : १५५, किंमत : २५० रुपये.

गुलज़ार बोलतात त्याची कविता होते

भारतीय मध्यमवर्गाचा ताळेबंद मांडणाऱ्या पवन वर्मा यांनी अलीकडे अनुवादकाच्या भूमिकेत प्रवेश केला आहे आणि उर्दू-हिंदीतील लोकप्रिय गीतकार-कवी गुलज़ार यांची पुस्तके इंग्रजीत अनुवादित करण्यास सुरुवात केली आहे. गुलज़ार यांच्या 'सिलेक्टेड पोएम्स', 'निग्लेक्टेड पोएम्स' या दोन कवितासंग्रहानंतर 'ग्रीन पोएम्स' हा त्यांनी अनुवादित केलेला तिसरा संग्रह. दरम्यान 'हाफ अ रुपी' या नावाने गुलज़ार यांच्या निवडक कथांचाही अनुवाद केला आहे. वर्मा यांनी याआधी कैफ़ी आज़्‍ामी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचाही इंग्रजी अनुवाद केला आहे. त्यामुळे कवितांचा अनुवाद करायला ते सरावलेले आहेत, असं समजायला हरकत नाही. या संग्रहात गुलज़ार यांच्या निसर्गाविषयीच्या ५९ कविता आहेत. नदी, तळी, ओढे, पर्वत, बर्फ, पाऊस, ढग, आकाश, जमीन, हवा, झाडे यांच्याविषयीच्या या कविता निसर्गाविषयीची हळुवार आणि चैतन्यशील भावना उजागर करतात. माती, जमीन, पाणी याविषयी गुलज़ार यांचं आतडय़ाचं नातं आहे. निसर्गाला ते आपल्या अवतीभवतीची सर्वात चैतन्यशील आणि रसरशीत दुनिया मानतात. त्यामुळे त्याविषयी लिहिताना गुलज़ार आपली अक्षरे मोरपंखाच्या बोरूने लिहितात. या कविता म्हणजे जणू काही निसर्गातील विविध घटकांची स्वगतं आहेत, फक्त ती गुलज़ार यांच्या शब्दांतून उतरली आहेत. त्यामुळे आपलं म्हणणं सांगताना ती काव्यमय भाषेचा आणि लीनतेचा आधार घेतात. अतिशय प्रेमानं आपल्याशी हिजगूज करतात. त्यामुळे ही निसर्गसूक्तं आवाहनांनी भरलेली आहेत. त्यांच्या हाकांनी आपलं लक्ष वेधून घेतात.
गुलज़ार ज्याला स्पर्श करतील त्याची कविता होते. त्या कवितेला लय, नाद, स्वाद, रुची, गंध, सारं काही असतं. म्हणून ती समोरच्याला वेढून टाकते. या कविता वाचकाला नवी 'नजर' देतात, निसर्गाकडे पाहण्याची. त्याला अनुभवण्याची. त्याच्या जवळ जाण्याची. आणि त्याला आपल्यात सामावून घेण्याचीसुद्धा.
वर्मा यांनी इंग्रजी अनुवादाबरोबर त्यांचे हिंदी लिप्यंतर दिले आहे. त्यामुळे अनुवाद ताडून पाहण्याचीही आयतीच सोय झाली आहे.
ग्रीन पोएम्स : गुलज़ार, अनुवाद - पवन के. वर्मा,
 पेंग्विन बुक्स, गुरगाव,
 पाने : १३१, किंमत : २५० रुपये.भारत नावाचं डम्पिंग ग्राउंडभारतातील इंग्रजी प्रकाशन व्यवसाय भारतीय मध्यमवर्गाबरोबरच वाढतो आहे. त्यामुळे अमेरिकेतील मोठय़ा प्रकाशन संस्थाही भारतीय बाजारात पेठेत दाखल होऊ लागल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच अ‍ॅमेझॉन डॉट कॉमनं पुस्तक विक्री आणि इतर वस्तूंच्या ऑनलाइन विक्रीत उडी घेऊन फ्लिपकार्ट, इन्फिबीम, ईबे यांसारख्या काही कंपन्यांपुढे मोठं आव्हान उभं केलं आहे. ही स्पर्धा इतकी अटीतटीची होऊ पाहत आहे की, 'आम्ही आमची कंपनी कुठल्याही परिस्थितीत कुणालाही विकणार नाही,' असं सांगणारे फ्लिपकार्टचे संस्थापक प्रमुख सचिन-बिनी बन्सल आता बंगलुरूमधील Myntra या ऑनलाइन कंपनीबरोबर विलीनीकरणाच्या पवित्र्यात आहेत. असो. सांगायचा मुद्दा असा की, या पाश्र्वभूमीवर 'भारत हे अमेरिकन साहित्याचं डम्पिंग ग्राउंड होण्याची शक्यता आहे,' असं विधान ब्रिटिश लिटररी एजंट डेव्हिड गॉडविन यांनी नुकत्याच कोलकात्यात झालेल्या साहित्य महोत्सवामध्ये केलं आहे. गॉडविन ही प्रकाशनक्षेत्रातील अतिशय जाणकार आणि अभ्यासू व्यक्ती आहे. याशिवाय ते अरुंधती रॉय, विक्रम शेठ, अरविंद अडिगा, किरण देसाई, विल्यम डॅलरिम्पल, जीत थाईल या बुकर प्राइझपर्यंत पोचलेल्या वा त्यासाठी नामांकन मिळालेल्या लेखकांचे 'लिटररी एजंट' आहेत. गॉडविन यांनी पुढं म्हटलं आहे की, 'मोठय़ा प्रकाशन संस्था भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे पण त्यामुळे छोटय़ा प्रकाशन संस्था स्पर्धेतून बाहेर फेकल्या जात आहेत.' मोठय़ा प्रकाशन संस्थांकडे मोठं आर्थिक बळ, यंत्रणा आणि संसाधनं असल्यानं छोटय़ा आणि एकहाती चालणाऱ्या प्रकाशन संस्थांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संस्था प्रकाशन व्यवसायातल्या 'समांतर चळवळी'चे शिलेदार आहेत. त्या प्रवाहाबाहेर फेकल्या जाणं, हे भारतीय प्रकाशन व्यवसायासाठीच नव्हे तर चांगलं साहित्य वाचू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठीच आपत्ती ठरू शकतं. मात्र या नव्या बाजाराचा अमेरिकन प्रकाशन संस्था मोठय़ा प्रमाणावर फायदा करून घेत आहेत. सध्या भारतीय बाजारात ज्या प्रकारचं पल्प फिक्शन दिसतं, ते बहुतांशी अमेरिकन तरी असतं किंवा त्याचं अनुकरण तरी. रॅण्डम हाऊससारख्या मोठय़ा प्रकाशन संस्था भारतीय बाजारपेठेत बेस्टसेलर ठरलेली वा ठरवली गेलेलीच पुस्तकं पाठवतात. याच प्रकाशन संस्थांची चांगली, दर्जेदार म्हणावी अशी पुस्तकं भारतीय पुस्तक विक्रेत्यांनी मागितली तर त्यांच्या मागणीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही वा ते गांभीर्यानं घेतलं जात नाही. बऱ्याचदा भारतात चांगली पुस्तकं विकत मिळत नाहीत, त्याचं कारणही हेच आहे. म्हणजे आपल्याला हवा तोच माल रेटत राहायचा, त्याचीच सवय लोकांना लावायची आणि रग्गड पैसा मिळवायचा, अशी सरळ सरळ व्यावसायिक रणनीती अमेरिकन प्रकाशन संस्थांची आहे.  आणि त्यात आपण फसतो आहोत… निव्वळ कचरा माथ्यावर मारून घेत आहोत.