Monday, April 12, 2010

विनय हर्डीकर-मराठीतले जॉर्ज ऑर्वेल?


कार्यकर्ता, पत्रकार, प्राध्यापक आणि लेखक म्हणून लक्षणीय काम केलेल्या विनय हर्डीकर यांनी नुकतीच आपल्या वयाची 60 वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने पुण्यात चार दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचा पूर्वार्ध मागच्या महिन्यात झाला. 10 आणि 11 एप्रिलला झाला. त्यानिमित्ताने...(दै. सकाळ, १२ फेब्रुवारी २०१०) 
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, 


विनय हर्डीकर अतिशय मोजकं लिहितात. वर्षाला एखाद्‌ दुसरा लेख. त्यामुळे गेल्या 30-32 वर्षांत त्यांची अवघी चारच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वयाच्या 29 व्या वर्षी लिहिलेले 'जनांचा प्रवाहो चालला' हे त्यांचे पहिलेच पुस्तक चांगलेच गाजले होते. आणीबाणीच्या विरोधात लिहिलेल्या या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारने आधी पुरस्कार जाहीर करून नंतर तो नाकारला होता. बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेवरील 'कारुण्योपनिषद' (1999) साहित्य-समाज क्षेत्रातील मान्यवरांविषयीच्या लेखांचे "श्रद्धांजली' (1997) आणि अलीकडचे 'विठोबाची आंगी' (2005) ही उरलेली तीन पुस्तके.
'माझं लेखन हे फर्स्ट पर्सन डॉक्‍युमेंटरी आहे' असे हर्डीकर स्वतःच्या लेखनाविषयी म्हणतात. कारण स्वतःचे अनुभवसिद्ध विश्‍व (आणि वाचन) हा त्यांच्या लेखनाचा गाभा असतो. हर्डीकरांचे अनुभवविश्‍वही तसे खूपच विस्तृत आणि वैविध्यपूर्ण आहे. साहित्य (मराठी-हिंदी-इंग्रजी), राजकारण, समाजकारण, सामाजिक चळवळी-आंदोलने, शास्त्रीय संगीत अशा क्षेत्रांत त्यांना कमालीचा रस आहे आणि त्यांची उत्तम जाणही.
ज्ञानप्रबोधिनी, न्यू क्वेस्ट, इंडियन एक्‍स्प्रेस, ग्रामायण, शेतकरी संघटना, देशमुख आणि कंपनी, रानडे इन्स्टिट्यूट (पुणे विद्यापीठ) आणि सध्या फ्लेम हे पुण्यातील खासगी विद्यापीठ, असा विनय हर्डीकरांचा आजवरचा प्रवास आहे. या प्रत्येक ठिकाणी ते स्वतःहून गेले आणि मनासारखं काम करता येत नाही हे लक्षात आल्यावर सुरुवातीच्या पाच ठिकाणांहून स्वतःहून बाहेर पडले.
हर्डीकरांनी 'इंडियन एक्‍स्प्रेस' या आघाडीच्या इंग्रजी दैनिकात तब्बल आठ वर्षे शोधपत्रकारिता केली. वस्तुनिष्ठ आणि समतोल बातमी हाच धर्म मानून त्यांनी पत्रकारिता केली. एका बातमीसाठी ते किती यातायात करीत याविषयीचा एक लेख त्यांच्या 'विठोबाची आंगी' या पुस्तकात आहे. तो प्रत्येकाने (आणि पत्रकारांनीही) आवर्जून वाचावा असा आहे. पाच-सात वर्षांपूर्वी त्यानी लिहिलेल्या 'सुमारांची सद्दी' या दोन भागातील लेखाचे बरेच कौतुक झाले होते; परंतु हा लेख लिहून झाल्यावर त्याचे 'सुमारांची सद्दी' हे शीर्षक सुचायला मात्र त्यांना तब्बल एक वर्ष लागले. 'प्रमोद महाजन-एक चिन्हांकित प्रवास' हा त्यांचा 'साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेखही महाजनांवर लिहिल्या गेलेल्या लेखांतील सर्वोत्कृष्ट लेख होता. नव्वदीनंतरच्या काळात 'विचारसरणीचा अंत' आणि 'मार्क्‍सवादाचा अंत' या संकल्पना लोकप्रिय होत असताना हर्डीकरांनी लिहिलेला 'एण्ड ऑफ आयडिऑलॉजी - एक मतलबी भ्रम' हा लेखही असाच मूलगामी आणि त्यांच्या व्यासंगाची साक्ष पटवणारा होता. अगदी अलीकडे त्यांनी लिहिलेले दोन लेख- पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक अप्पा पेंडसे आणि समाजवादी विचाराचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयीचे- असेच उत्तम लेखाचे नुमने ठरावेत! हर्डीकरांच्या लेखांची अशी मोठी यादीच देता येईल, पण आणखी एकच उदाहरण देतो- "भारतातल्या कोणत्याही पक्षाचे कॉंग्रेसीकरण झाल्याशिवाय त्याला सत्ता मिळवता येत नाही" या आपल्या एकाच विधानाच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी साधना साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीचीही बरीच चर्चा झाली होती.
राजकीय-सामाजिक क्षेत्रातील प्रश्‍नांविषयी योग्य भूमिका असणारा, आपल्या भाषणांतून, लेखनातून तिचा आग्रह धरणारा, थोडक्‍या, 'करेक्‍टिव्ह फॅक्‍टर म्हणून रोल करण्याची' हर्डीकरांची भूमिका असते. मराठीतल्या बहुतांशी साहित्यिकांना राजकीय भूमिकांचे वा आयडिऑलॉजीचे वावडे असले, तरी ते हर्डीकरांना अजिबात नाही. आयडिऑलॉजी मानणारे लेखन हे कसदार असते, असे मराठीतल्या ललित साहित्याच्या बाबतीत त्यांनी (आपल्या पीएच.डी. प्रबंधाच्या निमित्ताने) मांडून दाखवण्याचाही प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने तो पूर्ण होऊ शकला नाही.
विनय हर्डीकर हा काहीसा कलंदर माणूस आहे. काही माणसं विनाकारण स्वतःविषयी गैरसमज निर्माण करून ठेवतात; तर काही माणसांबद्दल इतर लोक गैरसमज निर्माण करून घेतात. हर्डीकर या दोन्ही प्रवादांचे धनी आहेत आणि याची त्यांना स्वतःलाही चांगली जाणीव आहे, पण तरीही 'आपण बुवा असे आहोत आणि असेच राहू' हा त्यांचा बाणा आहे. त्यामुळे हर्डीकर इतरांना हेकेखोर वाटतात; तर त्यांना आपण बाणेदार आहोत असे वाटत असावे. हा त्यांचा बाणेदारपणा वयाच्या साठीनंतरही फारसा कमी झालेला नाही.
मूळचा सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड, पत्रकाराची शोधक दृष्टी, चौफेर भ्रमंती आणि जोडीला अनेकविध विषयांचा व्यासंग-अभ्यास आणि प्रत्येक विषयावरची स्वतःची खास ठाम आणि परखड मतं, यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेकांना भुरळ पडते. हर्डीकरांशी मैत्री असणं हा बौद्धिकदृष्ट्या फार आनंदाचा भाग असला, तरी ती सहज परवडणारी नसते. त्यांच्या वागण्या-बोलण्याला एक तीक्ष्ण आणि तिखट धार असते. अघळपघळपणा वा शिळोप्याच्या गप्पा या गोष्टी त्यांचा शब्दकोषात नाहीत.
माणूस म्हणून विनय हर्डीकर काहीसे तऱ्हेवाईक असले, तरी लेखक म्हणून मात्र अतिशय समतोल, तारतम्यपूर्ण आणि समंजस आहेत. त्यांचं बोलणं आणि लिहिणं यात कमालीचं साम्य आहे, त्यामुळे एकदा कागदावर उतरलेला मजकूर हाच त्यांचा अंतिम खर्डा असतो. त्यात काही बदल करण्याची गरज त्यांना पडत नाही. लेखनाबाबतचा त्यांचा हा शिस्तबद्ध आणि काटेकोरपणा वाखाणण्याजोगा आहे. (हर्डीकरांच्या विचार आणि व्यवहारातही असंच साम्य आहे).
तर असा हा स्वतःच्याच "टर्म ऍण्ड कंडिशन'वर जगणारा माणूस. त्यांच्या बेशिस्तीतही एक वेगळ्या प्रकारची शिस्त असते. गेली काही वर्षे विनय हर्डीकर 'मला कुणी मराठीतला जॉर्ज ऑर्वेल म्हटलं तर आवडेल' असं जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. त्यांचा हा दावा कुणी खोडून काढायचा प्रयत्न केला नसला, तरी ते खरोखरच 'मराठीतले जॉर्ज ऑर्वेल' आहेत का? जॉर्ज ऑर्वेल आणि विनय हर्डीकर यांच्यात 'राजकीय बांधिलकी मानून लेखन करणे' हे अतिशय लक्षणीय साम्य आहे. तेव्हा हर्डीकरांच्या या विधानाचा मराठीच्या प्राध्यापक-समीक्षकांनी अभ्यास करण्याची गरज आहे. पण हर्डीकरांचे लेखन पेलवण्याजोगे समीक्षक मराठीत आहेत का हाही प्रश्‍नच आहे.

शहाणे नावाचा ठार वेडा माणूस!

मी मोबाइलवर शहाणे यांचा काढलेला फोटो

 अशोक शहाणे हा कलंदर माणूस 75 वर्षांचा झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने एकत्र जमून गप्पा केल्या.आजकालच्या मराठी वाङ्‌मयावर क्ष-किरण टाकणाऱ्या अशोक शहाणे यांच्यावरही या मित्रपरिवारानं आपल्या प्रेमाच्या क्ष-किरणांचा वर्षाव केला.
(पूर्वप्रसिध्दी- सकाळ, ११\०२\२०१०)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अशोक शहाणे हा अवलिया आणि कलंदर माणूस अखेर 75 वर्षांचा झालाच. तेच अशोक शहाणे ज्यांनी मराठीतील लघु-अनियतकालिकाचा पाया घातला, त्याला चळवळीचे रूप दिले आणि काही प्रमाणात तिचे पुढारीपणही केले. शहाणे यांनी 'अथर्व' या लघु-अनियतकालिकाचा पहिला अंक काढला 1961 मध्ये; पण ते पहिल्या अंकानंतर बंद पडले. मग त्यांनी 1964 ला 'असो' काढले; त्याचे जेमतेम 16 अंक निघाले. मग 'वाचा' काढले, त्याचेही अवघे सहाच अंक निघाले. अशोक शहाणे यांच्या या अंकांवरून अनेकांनी स्फूर्ती, प्रेरणा घेतली आणि त्यांच्यासारखेच अल्पजीवी अंक काढून एकेकाळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण तापविण्याचे काम केले. तर अशा या अशोक शहाणे यांनी कालच्या 7 फेब्रुवारीला 75 व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने त्यांच्याजवळच्या काही मित्रांनी घरगुती स्वरूपाचा एक छोटासा कार्यक्रम गोरेगावमध्ये आयोजित केला होता. त्यानिमित्ताने लघुनियतकालिकांच्या चळवळीतील आणि शहाणे यांच्या मित्रपरिवारातील 50-60 मंडळी एकत्र आली होती. थोडंसं गाणं, थोडंसं खाणं आणि मनसोक्त गप्पा (अशोक शहाणे यांच्याविषयीच्या) असा हा आटोपशीर कार्यक्रम होता.
बंडखोरी करण्याचं वय तारुण्य असतं. या काळात बहुतांश जण ती करतात आणि नंतर मग ते वय संपलं, की प्रस्थापित होऊन जातात. शहाणे यांच्या काही मित्रांनीही हा कित्ता गिरवलाय; पण शहाणे यांचं वयच वाढत नसल्यानं त्यांची बंडखोरी कमी होण्याचं कारण नाही. परवाच्या कार्यक्रमातही ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. काही माणसं कितीही वय झालं तरी आहे त्याच वयाची वाटतात. महाराष्ट्रात अशी बरीच माणसं सापडतात. जयवंत दळवी जयहिंद प्रकाशनाचे ग. का. रायकरांना 'यष्टी म्हणावी अशी शरीरयष्टी' असे म्हणत. ते वर्णन अशोक शहाणेंनाही लागू पडतं आणि त्यामुळेच त्यांच्या वाढत्या वयाचा आपल्याला पत्ता लागत नाही.
आम्ही अशोक शहाणे यांचं अभिनंदन करायला गेलो, तर त्यांनी नेहमीच्या पद्धतीनं स्वतःचीच खिल्ली उडवली. म्हणाले, " 'अमृतमहोत्सव' यातला पहिला शब्द संस्कृत आहे. आता आपल्याला फारसं संस्कृत कळत नसल्यानं त्याचा अर्थही माहीत नसतो. अमृत म्हणजे अ-मृत. अजून मेले नाही म्हणून महोत्सव." काही वर्षांपूर्वी त्यांच्या 'प्रास प्रकाशना'ला 'वि. पु. भागवत' पुरस्कार मिळाला. त्या कार्यक्रमात श्री. पु. भागवतांसह काही लोक शहाणेंबद्दल फारच चांगलं बोलले. तेव्हाही शहाणे म्हणाले होते, "तुम्ही एवढं माझ्याबद्दल चांगलं बोलला आहात की, मला वाटलं मी मेलो की काय!"
स्वतः मात्र फारसं काही लिहायचं नाही; पण इतरांना मात्र लिहायला उद्युक्त करायचं, प्रोत्साहन द्यायचं. त्यांच्या पुस्तकांची बाळंतपणं करायची, हे अशोक शहाणे यांचं योगदान; शिवाय वाचायचं भरपूर. मजेत जगायचं. आपल्याच धुंदीत. त्यामुळे इतरांना सल्ले द्यायचा, मार्गदर्शन करायचा आणि त्यांचा पाणउतारा करायचा अधिकार त्यांना आपोआपच पोचतो. तो ते पुरेपूर वापरतातही.
नाही म्हणायला शहाणेंच्या नावावर 'नपेक्षा' हे एकमेव पुस्तक आहे. तेही त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. बाकी त्यांनी बंगालीमधून मराठीत काही पुस्तकं मात्र अनुवादित केली आहेत. बंगाली साहित्यिक शंकर यांच्या 'जनअरण्य' व 'सीमाबद्ध' या दोन आणि माणिक बंदोपाध्याय यांची 'साईखड्याची गोष्ट' ही कादंबरी, तस्लिमा नसरीन यांच्या 'फेरा' या कादंबरीचा 'फिट्टमफाट' या नावानं अनुवाद. प्रसिद्ध सतारवादक अल्लाउद्दीन खॉं यांचं आत्मचरित्र 'माझी कहाणी' आणि 'माझा भारत' व 'इसम' ही दोन छोटी पुस्तकं. 'प्रचंड विजेरी सुतार' या मूळ बंगाली दीर्घ कवितेचा त्यांनी केलेला अनुवाद अजून लघु नियतकालिकाच्याच अंकात पडून असला तरी तो प्रसिद्ध कथाकार जी. ए. कुलकर्णी यांना प्रचंड आवडला होता. किंबहुना त्यांनी केलेले सर्वच अनुवाद उत्कृष्ट म्हणावे असे आहेत. बंगाली भाषेवर तर त्यांचं कमालीचं प्रभुत्व आहे. दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी आणि त्यांच्या चमूला त्यांनी बंगाली नाटककार अजितेश बंदोपाध्याय यांचं महाभारताच्या शेवटच्या पर्वावरील 'हे समय उत्तान समय' हे मूळ बंगाली नाटक वाचून दाखवलं, तेव्हा त्यांच्या हातात बंगाली पुस्तक होते अन्‌ ते वाचत होते मराठीत आणि ते वाचन अतिशय सुगम आणि अस्खलित होतं, याची आठवण रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी अजूनही सांगतात.
अशोक शहाणे यांनी 'प्रास प्रकाशन' ही संस्था काढली. त्यामार्फत अनेक चांगली पुस्तकं काढली. अरुण कोलटकरांची मराठी-इंग्रजी पुस्तकं काढली. पुस्तकांच्या रूढ होऊ पाहणाऱ्या साचेबद्ध आकारांना सुरुंग लावण्याचं काम केलं. पुस्तक तर काढायचं आहे; पण त्यासाठी पैसे नाहीत, या विवंचनेतून त्यांनी पुस्तकांच्या आकारात, मांडणी, सजावटीमध्ये जे बदल केले आहेत, ते मराठी वाचकांना चांगलेच माहीत आहेत.
अशोक शहाणे हे प्रयोगशील आणि उद्योगी गृहस्थ आहेत. प्रयोग प्रयोगासाठी असतात; त्यांचे सामाजिक सिद्धान्त सहसा होत नाहीत. राजकारण घ्या, समाजकारण घ्या, साहित्य घ्या वा इतर सांस्कृतिक कला घ्या. भरपूर उदाहरणं देता येतीलड पण शहाणे यांना त्याची पर्वा नसते. आधीची प्रमाणकं मानायची नाहीत आणि ती आपल्या प्रयोगांना फूटपट्टीसारखी लावूनही पाहायची नाहीत, हा त्यांचा बाणा आहे.
प्रस्थापितांना सतत आणि सातत्याने विरोध करायला त्यांना जाम आवडतं. त्यामुळे त्यांच्या तडाख्यातून भले भले लोक सुटत नाहीत; अगदी टिळक-आगरकरही. मग इतरांची काय कथा! 40-45 वर्षांपूर्वी त्यांनी 'आजकालच्या मराठी वाङ्‌मयावर 'क्ष किरण' आणि त्यानंतर 'तीस वर्षांची पुस्तकी हालहवाल' हे लेख लिहून अशीच खळबळ उडवून दिली होती. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स', 'आज दिनांक', 'महानगर' आणि 'साप्ताहिक सकाळ'मध्ये अल्पकाळ केलेले सदर लेखनही असेच चर्चेचा विषय झाले होते.
म्हणूनच पत्रकार अंबरीश मिश्र त्यांच्याविषयी म्हणतात, "अशोकमध्ये अवाढव्य ऊर्जा आहे. आगीचा किंवा चाकाचा शोध लावलेल्या माणसांमध्ये अशीच ऊर्जा असणार. मन नितळ, स्वभाव बेरका, त्याच्या करड्या नजरेतनं काहीच सुटत नाही." मग तुम्ही-आम्ही कसे सुटणार? 7 फेब्रुवारीला मित्रपरिवारानं त्यांचं कौतुक केलं. त्यांनी स्पष्टपणे 'पुष्पगुच्छ' कुणीही आणू नका' असं सांगितलं असतानाही आणले. त्यांना दिले. एकानं चक्क त्यांच्यावर कविताही केली. मग शेवटी शहाणेच उभे राहिले आणि म्हणाले, "आपल्याकडे नाहीतरी म्हणायची पद्धत आहे, गप्प बसायचं काय घेतो?'
पण मी काही गप्प बसणार नाही. कारण- अजून बरंच काम बाकी आहे... तुम्ही लोक असं समजू नका, की आता मी संपलोय. तुम्हाला वॉर्निंग देण्यासाठी मी बोलतोय." आणि त्यांनी घडाघडा आपल्या आगामी योजना सांगून टाकल्या.
त्यात कवी अरुण कोलटकर यांनी तुकोबांच्या अभंगांविषयी केलेले संशोधन आहे. महाराष्ट्र शासनानं छापलेल्या तुकोबांच्या गाथेतले काही अभंग त्यांचे नाहीत आणि तुकोबांचे म्हणून असलेल्या बऱ्याच अभंगांचाही त्यात समावेश नाही. अशा एकूण जवळपास नऊ हजार अभंगांचा शोध कोलटकरांनी घेतला आहे. ते शहाणेंना छापायचे आहे. कोलटकरांचे आणखी काही अप्रकाशित साहित्य आहे. प्रसिद्ध कॅलिग्राफी तज्ज्ञ र. कृ. जोशी यांच्या मराठी अंकलिपीचे पुस्तक, वसंत गुर्जर यांच्या कविता, सिनेदिग्दर्शक अरुण खोपकरांचे पुस्तक, नुकतेच दिवंगत झालेल्या रघू दंडवते यांची एक कादंबरी आणि कवितासंग्रह, 'असो' आणि 'वाचा'मधील सर्व लेखनाचे स्वतंत्र पुस्तक अशा योजना त्यांच्या हाताशी आहेत.
याशिवाय संगणकावर मराठीची जी हेळसांड चालली आहे, त्याविषयीही ते पोटतिडकीने बोलत होते. मराठीच्या युनिकोडच्या प्रामाणिकीकरणाविषयी काहीतरी करायला हवे, त्याचा सध्या जो गैरवापर चाललाय, त्याने ते अस्वस्थ आहेत.
त्यामुळे अगदी शहाणेंच्याच शब्दांत सांगायचे, तर "गप्प बसण्याचा काळ अद्याप आलेला नाही. तुम्ही जरा सावध राहा!"