Sunday, June 19, 2011

ग्रंथ-मार्गदर्शकाच्या पाऊलवाटामहाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आणि व्युत्पन्न पंडित गोविंद तळवळकर यांचं ‘सौरभ’ हे नवीन पुस्तक नुकतंच बाजारात आलं आहे. तळवळकरांचं लेखन अतिशय नेमकं, मुद्देसूद आणि तपशीलपूर्ण असतं. त्यांची भाषा प्रवाही असली तरी ती अनंलकृत असल्याने तिच्यामध्ये एक प्रकारचा आकर्षकपणा असतो. त्यामुळे त्यांचं लेखन खिळवून ठेवत नसलं तरी ते वाचलं जातं. शिवाय तळवळकरांनी निवडलेली पुस्तकंच अशी असतात की, त्यांच्याबद्दलचं वाचकांचं कुतूहल अनावर असतं. मुळात ग्रंथप्रेम हे तळवळकरांच्या पिढीचंच काहीसं व्यवच्छेदक लक्षण आहे. मग ते श्यामलाल असोत की गिरीलाल जैन असोत. श्यामलाल यांची ‘अ हंड्रेड एन्काउंटर्स’ आणि ‘इंडियन रिअ‍ॅलिटिज’ ही ग्रंथपरीक्षणाची पुस्तकं आणि तळवळकर यांच्या ‘वाचता वाचता’चे दोन खंड ही केवळ त्यांनी वाचलेल्या पुस्तकांविषयीची पुस्तकं नाहीत तर ते ज्या काळात लिहीत होते, त्या काळाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा तो दस्तएवज आहे. जगभर काय लिहिलं जातं आहे, ते कुठल्या पद्धतीचं आणि काय प्रतीचं आहे याचा तो सफरनामा आहे. तळवलकर आणि श्यामलाल यांची पुस्तकं वाचताना हा पुन्हा पुन्हा प्रत्यय येतो.यामुळे तळवळकरांचं लेखन महाराष्ट्रातील जिज्ञासूंच्या कायम कुतूहलाचा विषय राहिलं आहे. महाराष्ट्राच्या जाणकारांच्या दोन-चार पिढय़ा तळवकरांची शिफारस प्रमाण मानून घडल्या आहेत. तळवळकरांनी पाच-सहा वर्षापूर्वी ‘ललित’ या ग्रंथप्रसाराला वाहिलेल्या मासिकामध्ये ‘सौरभ’ या नावाने जीवनाच्या विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या अलक्षित पैलूंची ओळख मुख्यत: ग्रंथांच्या माध्यमातून करून द्यायला सुरुवात केली, तेव्हा हे सदर अल्पावधीतच लोकप्रिय झालं होतं. म्हणूनच त्यातील निवडक लेखांचा पहिला खंड त्यांनी नुकताच पुस्तकरूपाने प्रकाशित केला आहे.प्रस्तुत पुस्तकात एकंदर बावीस लेख आहेत. त्यामध्ये गर्ट्रुड बेल, गिलगुड, जॉर्ज ऑर्वेल, डिकन्स, महाकवी गटे, उमर खय्याम, चेकॉव्ह, ओरहान पाहमूक, अ‍ॅलन बुलक, केनान, जी. के. गालब्रेथ, थॉमस पेन, आइन्स्टाइन अशा जागतिक साहित्यातील लेखक, कादंबरीकार, इतिहासकार आणि तत्त्वज्ञ यांचा समावेश आहे. यामध्ये दोनच भारतीय व्यक्ती आहेत. त्या म्हणजे इंदिरा गांधी आणि रामानंद चतर्जी. तळवळकर यांची पिढी ही नेहरूवादाची कट्टर पुरस्कर्ती आहे. त्याचप्रमाणे त्यांना इंदिरा गांधींबद्दलही सम्यक सहानुभूती आहे. त्यामुळे वरकरणी या पुस्तकात त्यांचा समावेश थोडासा अनुचित वाटला तरी स्वाभाविक आहे आणि नावाप्रमाणेच हा लेखही इंदिरा गांधींचं वाचन, त्यांची पक्षीनिरीक्षणामधली जाणकारी, चित्रपटांबद्दलची आत्मीयता, चित्रकला अशा पैलूंची पत्रव्यवहारातून ओळख करून देणारा आहे.एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतामध्ये विविध विषयांना वाहिलेली आणि दर्जेदार अशी नियतकालिकं प्रकाशित होत होती. त्यावेळच्या कलकत्ता या शहरामधून रामानंद चतर्जी ‘मॉडर्न रिव्ह्यू’ हे नियतकालिक चालवत. बंगाली साहित्य आणि संस्कृतीचे अभिमानी असलेले चतर्जी आपल्या मासिकातून मात्र भारतातील विविध भाषा आणि संस्कृती यांची ओळख करून देत. तळवळकरांनी लिहिले आहे की, त्या वेळच्या नियतकालिकांमध्ये चतर्जी यांचे ‘मॉडर्न रिव्ह्यू’ परिपूर्ण आणि प्रगल्भ असं नियतकालिक होतं. गुणवत्तेच्या बाबतीत तर ते अव्वलच होतं. सर यदुनाथ सरकार, नीरद चौधरी, रवीन्द्रनाथ टागोर अशा मान्यवरांनी त्यात लेखन केलं. चतर्जी यांची पंधरावीस पानांची संपादकीय लेख ‘मॉडर्न रिव्ह्यू’चे खास वैशिष्टय़ होतं.


जॉर्ज ऑर्वेल यांची जन्मशताब्दी 2003 मध्ये साजरी झाली. त्यानिमित्ताने तळवळकरांनी ऑर्वेलच्या समग्र लेखनाची ओळख करून देताना ऑर्वेलविषयी लिहिली गेलेली पुस्तकं, त्याच्या पुस्तकांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या यांचाही साधार आढावा घेतला आहे. तर ‘अ‍ॅन्टन चेकॉव्ह अ‍ॅन्ड हिज टाइम्स’ या चेकॉव्हच्या मित्रांनी लिहिलेल्या पुस्तकाचा ‘मित्रांच्या दृष्टीतून चेकॉव्ह’ या लेखात परिचय करून दिला आहे. अठराव्या शतकात जर्मनीच्या सांस्कृतिक जीवनाचं अविभाज्य भाग असलेल्या गटे यांच्या पुस्तकाची ओळख करून देताना त्याच्या विचारविश्वाचीही सफर घडवली आहे.उमर खय्याम यांच्या रुबायाबद्दल आपण ऐकून असतो. जागतिक वाङ्मयात खय्यामला कीर्ती मिळाली ती रुबायामुळेच. एडवर्ड फित्झेराल्ड या इंग्रजी कवीने त्यांच्या रुबायाचा इंग्रजी अनुवाद केला आणि पाश्चात्य जगात या पौर्वात्य कवीने आपली नाममुद्रा उमटवली. इंग्लंड-अमेरिकेत तर खय्यामच्या नावाने क्लब स्थापन झाले. त्या सर्वाचा मागोवा तळवळकरांनी घेतला आहे. खय्यामच्या रुबायांनी प्रभावित झालेल्यांमध्ये अमेरिकेचे सांस्कृतिक दैवत मार्क ट्वेन यांचाही समावेश होता. ट्वेनच्या नर्मविनोदी साहित्याने आणि त्यांच्या हजरजबाबी चातुर्याने तर जगभरातल्या वाचकांना वेड लावलं आहे.थोडक्यात तळवळकरांचे हे पुस्तक त्यांना आवडलेल्या पुस्तकांचा आणि लेखकांचा परिचय करून देणारे आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा ओळख करून देण्यात फार हशील नाही. पण मग याचं महत्त्व काय? तर हे पुस्तक वाचून आपल्याला काय वाचावं आणि काय वाचू नये याचा विवेक करता येईल असं वाटतं. कुठलाच माणूस जगातली सर्व पुस्तकंच काय पण आपल्या भाषेत प्रकाशित झालेली सर्व पुस्तकंही वाचू शकत नाही. खरं तर तशी गरजही नसते. पण अजिबात शिस्त नसलेल्या आणि भरकटलेल्या वाचनाचा काहीही उपयोग होत नाही. त्या त्या वेळी त्याचं आपल्याकडून समर्थन केलं जातं. पण उतारवयात जेव्हा आपली क्रयशक्ती आणि वाचनशक्ती कमी होते आणि अजून खूप वाचून व्हायचं बाकीच आहे असं लक्षात येतं, तेव्हा आपण आजवर खूप वेळ क्षुल्लक पुस्तकं वाचण्यात घालवला असं वाटायला लागतं. अशी कबुली मराठीतल्या अनेक मान्यवर लेखकांनीही वेळोवळी दिली आहे. अशी पश्चातापाची वेळ येऊ द्यायची नसेल तर एका चांगल्या ग्रंथ-मार्गदर्शकाची गरज असते. तळवळकरांचे हे पुस्तक ती भूमिका उत्तमप्रकारे निभावू शकते.मात्र तळवळकरांनाच पूर्णपणे प्रमाण मानता कामा नये. कारण या पुस्तकात फक्त ओळखपरेड आहे, ही काही समीक्षा नाही. किंबहुना कुठल्याही पुस्तकाबद्दल लिहिताना तळवळकर टीकेचा स्वर शक्यतो लावत नाहीत. लेखकाला काय सांगायचं आहे आणि ते त्याने कशाच्या आधारे सांगितलं आहे, याचाच ते वेध घेतात. अर्थात ही त्यांच्या लेखनातली उणीव नव्हे तर पुस्तकांकडे कसं पाहावं याचा तो वस्तुपाठ आहे. उत्तम वाचक होण्यासाठी आधी उत्तम पुस्तकं वाचली पाहिजेत आणि उत्तम पुस्तकं कुठली हे जाणून घेण्यासाठी तळवळकरांसारख्या ग्रंथ-मार्गदर्शकाच्या पाऊलवाटेवरून चाललं पाहिजे.या पुस्तकाबाबत एकच छोटासा आक्षेप नोंदवता येईल. तोही अनुक्रमणिकेपुरता मर्यादित आहे. त्यात दिलेला ‘सुंदर मी होणार’ हा चौथ्या क्रमांकाचा लेख मूळ पुस्तकात नाही. त्यामुळे त्यापुढील सर्वच पानांचे अनुक्रमांक चुकले आहेत. पण ते न पाहताही हे पुस्तक आपल्याला हवं तिथपासून वाचता येईलच.

No comments:

Post a Comment