Saturday, September 24, 2011

आणखी एक ‘कन्नड टागोर’!


इतिहासाची जाण नसणं हे न्यून मानण्यालाच कंबार यांचा आक्षेप होता. त्यांच्या मते ब्रिटिशांसमोर आपण स्वीकारलेल्या बौद्धिक शरणागतीमुळेच इतिहासाच्या चौकटीबाहेरचं जगणं आपल्यालाही लांच्छनास्पद वाटू लागलं.
पाश्चात्यांच्या पावलांवर पाऊल टाकून आपणही आपल्या भूतकाळाचे अवशेष मांडून ठेवण्यासाठी संग्रहालयं उभारली, पण मुळात आपण आपला भूतकाळ आपल्या वर्तमानातून जगणारी माणसं होतो. कंबार सांगतात, इतिहासाची ब्रिटिश व्याख्या स्वीकारल्यामुळेच आपण आपलंच साहित्य शतखंडीत रूपात पाहू लागलो आहोत. 
  - शशी थरुर, 2003

कंबार हे दुर्मिळ साहित्यदृष्टी लाभलेले असे  साहित्यिक आहेत, ज्यांनी स्थानिक लोकसमूहांनी जपलेली विश्वात्मकता जाणली. ते नव्या पुराणांचे रचनाकार आहेत.
- यू. आर. अनंतमूर्ती, 2011

कन्नड साहित्य हे अखिल भारतीय साहित्यात सर्वात मानाचं, सुप्रतिष्ठित, चर्चेतलं आणि दर्जेदार मानलं जातं. एकविसाव्या शतकातल्या इंटरनेट, वेबसाईटस आणि गुगल यांचा भारतात कुणी सर्वाधिक उपयोग करून घेतला?असेल तर तो हिंदी आणि कन्नड या दोन भाषांनी. हिंदीतल्या तर जवळ जवळ एकूण एक मासिकांच्या वेबसाईट आहेत, नवं लेखन सातत्यानं ब्लॉगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातं. अनेक लेखक-पत्रकार नियमितपणे ब्लॉग लिहितात. असंच कन्नडबाबतही आहे. मराठी मासिकं आणि मराठी साहित्यिक यांना वेबसाईट आणि ब्लॉग यांची दुनिया अजून अपरिचितच आहे.
 
आजवर सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार कन्नड साहित्यिकांनाच मिळाले आहेत. कुप्पली वेंकटआप्पा पुटप्पा (कुवेंपू) (1967), द. रा. बेंद्रे (1973), के. शिवराम कारंथ (1977), माटी व्यंकटेश अय्यंगार (1983), व्ही. के. गोकाक (1990), यू. आर. अनंतमूर्ती (1994), गिरीश कार्नाड (1998) आणि नुकत्याच जाहीर झालेल्या पुरस्काराचे मानकरी चंद्रशेखर कंबार (2010).
 
चंद्रशेखर कंबार यांची ओळख कवी, नाटककार, कादंबरीकार, लोककथाकार, फिल्ममेकर आणि संगीतकार अशी बहुविध आहे. कंबार यांचे साहित्य लोककलेचा वारसा सांगणारं आहे. उत्तर कर्नाटकातल्या लोककथा आणि मिथकथा यांचा त्यांच्या लेखनावर प्रभाव दिसतो. कंबार बालपणापासून लोकनाटय़ाशी संबंधित आहेत. माणसांचं जगण-वागणं त्यांनी आपल्या नाटकांमधून समर्थपणे उभं केलं आहे. त्यामुळे समकालीन भारतीय रंगभूमीनं त्यांच्या अनेक नाटकांची दखल घेतली आहे. ‘महामाई’, ‘गाणं पंचरंगी पोपटाचं’, ‘कहाणी वाघाच्या सावलीची’, ‘श्रीचंपा’ अशा त्यांच्या काही नाटकांचे मराठी अनुवाद झाले आहेत.
 
कंबार हे कन्नडमधील    द. रा. बेंद्रे यांच्यानंतरचे महत्त्वाचे द्रष्टे कवी आहेत. कंबार यांच्या नावावर 21 नाटकं, 8 कवितासंग्रह, 3 कादंब-या, 12 संशोधनपर लेखसंग्रह अशी विपुल ग्रंथसंपदा आहे. ‘संगीथा’, ‘सांग्या बाल्या’ आणि ‘सिंगरेव्वा मट्ट् अरमाने’ या त्यांच्या तीन पुस्तकांवर चित्रपट झालेले आहेत, तर ‘काडू कुदुरे’ (जंगली घोडा) या चित्रपटाचे दिग्दर्शन कंबार यांनी केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक लघुपट बनवले आहेत. अनेक ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शनही केले आहे. कंबार यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये दोन वर्षे अध्यापन केले. त्यानंतर बेंगलोर विद्यापीठात वीस वर्षे अध्यापन केले, हम्पी विद्यापीठाचे ते संस्थापक कुलगुरू झाले. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे चेअरमन, कर्नाटक नाटक अकादेमीचे संचालक अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत. कबीर सन्मान, कालिदास सन्मान, टागोर साहित्य सन्मान, संगीत नाटक अकादेमी पुरस्कार, साहित्य अकादेमी पुरस्कार, पद्मश्री आणि ‘काडू कुदुरे’च्या गीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक सन्मानही त्यांना मिळाले आहेत. यावरून कंबार यांच्या सर्वस्पर्शी संचाराचा अंदाज यायला हरकत नाही. ‘आयुष्यभर केवळ लेखन, वाचन, मनन करणे ही समाजविकृती आहे’ असं इतिहासकार शेजवलकर यांनी म्हटलं आहे. ही समाजविकृती कन्नड साहित्यिकांमध्ये दिसत नाही. कंबारही त्याला अपवाद नाहीत.
 
सर्वच कन्नड साहित्यिक आपल्या मातृभाषेचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. अनंतमूर्ती, भैरप्पा, कार्नाड आणि कंबारही. शालेय शिक्षण मातृभाषेतूनच द्यायला हवे, असा त्यांचा आग्रह असतो आणि आहे. त्यासाठी ते आपल्यापरीने प्रयत्नही करतात. शासन व्यवस्थेशी पंगा घेण्याची तयारी दाखवतात. ही ‘कन्नडिगा वृत्ती’ अनुकरणीय आहे.
 
टागोरांइतक्याच सर्वस्पर्शी प्रतिभेची देणगी लाभलेला माणूस म्हणून ‘यक्षगान’कर्ते के. शिवराम कारंथ यांचं वर्णन रामचंद्र गुहा यांनी ‘कन्नड टागोर’ असं केलं आहे. चौफेर मुशाफिरी करणारे चंद्रशेखर कंबार हेही कारंथांसारखा लोकसंस्कृतीचा वारसा आपल्यापरीने सांगत आलेत. त्यामुळे त्यांना दुसरा ‘कन्नड टागोर’ असं म्हटलं तर त्यात फारशी अतिशयोक्ती होईल असं वाटत नाही. कारण कुठलंही साहित्य हे त्या त्या प्रदेशाच्या इतिहास, भूगोल, संस्कृती, लोककला, मिथकं, परंपरा, आदर्श, प्रेरणा यांच्या सामीलकीतूनच निर्माण होत असतं. त्याचा नाद केवळ कंबार यांच्या लेखनातूनच नव्हे तर कन्नडमधल्या अनेक साहित्यिकांच्या लेखनातून येतो. त्यामुळेच कन्नड साहित्य हे भारतीय भाषेतलं सर्वोत्तम साहित्य आणि कन्नड भाषा ही अभिजात भाषा ठरते. कंबार त्याच परंपरेचे पाइक आहेत. लेखन ही त्यांची जगण्याविषयी बोलण्याची भाषा आहे. ज्ञानपीठ मिळाल्यावर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली तीही मार्मिक होती. ते म्हणाले की, ‘लेखकाला असे वाटत असेल की, त्याचे लेखन त्याला पूर्णपणे समाधान देते आहे, तर त्यानं लेखन थांबवलं पाहिजे. मला अजून तसं वाटत नाही. म्हणून मी लिहितो.’
 
भारतीय समाजाचं असं एक वैशिष्टय़ं आहे की, त्याला सगळ्याच गोष्टींमध्ये काहीतरी तिरपागडं दिसत असतं. निदान तसं तो शोधून तरी काढतोच. त्यामुळे केवळ पुरस्कारावर लेखनाचा दर्जा अवलंबून असतो का, असं कृतक समाधान काही लोक करून घेतात. पण कृतघ्नतेच्याही अनेक गोष्टी, विरोधाभास भारतीय समाजामध्ये दिसतात. त्यामुळेच ‘मानवी अनुभवातील सर्वात गौरवास्पद आणि सर्वात घृणास्पद असं जे जे काही आहे ते भारतात आढळतं’ असं पं. नेहरूंनी म्हटलं होतं. भारत हे एक अस्वाभाविक राष्ट्र आहे. विविध भाषा, विविध धर्म, विविध पंथ-वर्ग, विविध जाती-जमाती यांचं कडबोळं म्हणावं असा भारत आहे. पण ‘विविधेतत एकता’ या समानसूत्रावर भारताची सांस्कृतिक उभारणी झालेली आहे. त्यात सर्वात मोठा वाटा आहे, तो लोककलेचा. चंद्रशेखर कंबार नाटककार आणि कवी म्हणून या लोककलेचा वारसा सांगत आले आहेत. त्या समृद्ध वारश्याची जपणूक करत आले आहेत. भारतीय समाजाला आणि संस्कृतीला कशाचं अगत्य आहे, त्यांच्या स्वागतशील वृत्तीचं नेमकं गमक काय, या प्रश्नाचं खणखणीतपणे आणि अगदी ठासून सांगावं असं उत्तर आहे, लोककला. 

 इतरांना सतत नाकं मुरडणाऱ्या मराठी साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या लोककलेला असं व्यासपीठ मिळवून दिलं आहे का? मराठी नाटककारांनी अशी लोककलेच्या वारशाची जपवणूक केली आहे का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधीतरी मिळायला हवी की नको? आपल्याकडे रा. चिं. ढेरे आणि तारा भवाळकर हे दोनच लोककलेचे संशोधक-अभ्यासक. बाकी लोककलेचा अभ्यास होणार तो विद्यापीठीय पातळीवर आणि त्याचा परिघ विद्यापीठाच्या आवारापुरताच, असाच महाराष्ट्राच्या लोककलेचा आलेख असेल तर महाराष्ट्राला कन्नडकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.

1 comment:

  1. कंबार यांची ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार.

    >>मराठी मासिकं आणि मराठी साहित्यिक यांना वेबसाईट आणि ब्लॉग यांची दुनिया अजून अपरिचितच आहे.>>
    तुरळक अपवाद वगळता मराठी ब्लॉगविश्व अजूनही बाल्यावस्थेत आहे असे कधीकधी वाटायला लागते.

    ReplyDelete